ऑर्वेलच्या अंतरंगाचा वेध घेताना त्याचं व्यक्तित्व आणि साहित्य यांचा संगम साधण्याचा हा प्रयत्न आहे. हे पुस्तक वाचकांना ऑर्वेलशी जोडणारा पूल ठरावं...
ग्रंथनामा - झलक
विशाखा पाटील
  • ‘जॉर्ज ऑर्वेल : करून जावे असे काही’ या चरित्राचे मुखपृष्ठ
  • Sat , 23 January 2021
  • ग्रंथनामा झलक जॉर्ज ऑर्वेल George Orwell Nineteen Eighty Four 1984 अ‍ॅनिमल फार्म Animal Farm विशाखा पाटील Vishakha Patil

जॉर्ज ऑर्वेल. ‘1984’ आणि ‘अ‍ॅनिमल फार्म’ या कलाकृतींनी जागतिक साहित्यात मोहर उमटवणारा निर्भीड कादंबरीकार. धारदार, तर्कशुद्ध आणि स्फटिकशुभ्र भाषेत लिहिणारा निबंधकार. हुकूमशाही आणि साम्राज्यशाहीचा कट्टर विरोधक. अनुभवांच्या शोधात बेघर फिरस्त्यांसोबत राहणारा मानवतावादी. जिवावर उदार होऊन लढणारा शूर सैनिक. हळव्या मनाचा बाप. हा मनस्वी लेखक कसा जगला? त्याचे सार्वकालिक ठरलेले विचार  कोणत्या विलक्षण अनुभवांच्या मुशीतून घडले? कोणत्या विचारांचं बीज पेरत होता तो? त्याच्या आयुष्याची आणि साहित्याची ओळख करून देणारं ‘जॉर्ज ऑर्वेल : करून जावे असे काही’ हे लेखिका विशाखा पाटील यांनी लिहिलेलं चरित्र नुकतंच राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं आहे. त्यातील पाटील यांचं हे मनोगत...

..................................................................................................................................................................

जॉर्ज ऑर्वेलची ओळख झाली ती पदवीला शिकत असताना. ‘Nineteen Eighty Four’ (1984) या त्याच्या नावाजलेल्या कादंबरीमुळे. सोव्हिएत रशियाची नुकतीच शकलं उडाली होती. या उलथापालथीकडे सगळं जग डोळे विस्फारून बघत होतं. ऑर्वेलनं ‘1984’मध्ये केलेल्या भविष्यवाणीवर चर्चा होत होत्या. पण मला मात्र तो खरा ठरल्याचं दु:ख वाटत होतं. घरी ‘सोव्हिएत लँड’, ‘सोव्हियत युनियन’ असे अंक येत. लहानपणापासून मी ते अधाशासारखी उघडून बघे. त्यातल्या गुळगुळीत पानांवरचे चकचकीत फोटो बघून रशियाचं आकर्षण वाटे. आपला देश तेव्हा रशियाकडे झुकलेला होता. रशियाकडून आपल्याला वेळप्रसंगी मदत मिळत होती. शिवाय तरुण वयात साम्यवादी विचारसरणीचं आकर्षण वाटे. पदवीला असतानाच ‘Animal Farm’ ही ऑर्वेलची छोटेखानी कादंबरी वाचली आणि झोपेतून दचकून उठल्यासारखं वाटलं. क्रांतीतून उगम पावणाऱ्या हुकूमशाहीचं चित्रण वाचून डोळे उघडले.  

माझे वडील अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांचे मित्र रोज गप्पा मारायला घरी येत. साम्यवादी, उजव्या मतांचे, समाजवादी किंवा कोणत्याही वादानं पछाडलेले नसलेले! वडलांना म्हणजे दादांना एक सवय होती. खोडच. साम्यवादी मित्र आले की, ते खुल्या अर्थव्यवस्थेच्या बाजूनं बोलत. व्यक्तीच्या आयुष्यातून धर्माला वगळणं अशक्य असल्याचं ठासून सांगत. त्यासाठी रशियाचंच उदाहरण देत. तावातावानं चर्चा चालत. कोरड पडली की, दोन्ही पक्षांकडून चहाच्या ऑर्डरी सुटत. शेवटी ‘तुला काही कळत नाही,’ असं एकमेकांना म्हणून चर्चासत्र संपे. पुन्हा चार दिवसांनी तोच प्रकार. तात्कालिक राजकीय घडामोडींवरच्या चर्चेनं मैफिलीला आरंभ होई, जुगलबंदीचा सूर चढे आणि ‘तुला काही कळत नाही,’ने समापती होई.

गंमत म्हणजे, त्यांचे उजव्या विचारांचे मित्र आले की हाच प्रकार घडे. अशा मित्रांपुढं दादा साम्यवाद उलगडून दाखवत, भांडवलशाहीवर टीका करत आणि धर्मानं माणसाचं किती नुकसान केलंय हे उदाहरणासहित पटवण्याचा प्रयत्न करत. आई चहा करताना पुटपुटे, ‘‘यांचं हे असंच! कुणाला घोड्यावरही बसू देत नाही अन् पायीही चालू देत नाही!’’

जेवताना ते आज कुणाकुणाला वादविवादात कसं हरवलं, ते सांगत. त्यांच्या उलटसुलट बोलण्यावर आम्ही हसत असू, टीका करत असू. ते दरवेळी म्हणत, ‘‘कोणतीही विचारसरणी परिपूर्ण नसते. प्रत्येकात गुणदोष असतात. परिस्थितीनुसार योग्य वेळी योग्य ते स्वीकारायला हवं. तेवढा लवचीकपणा ठेवायला हवा.’’ पुढंपुढं त्यांचे डायलॉग आम्हीच म्हणत असू. मी पदवीला असताना त्यांनी मला ऑर्वेल समजावून सांगितला. त्याचा संबंध आपल्या देशाचं वळण बदलण्याशी जोडला. १९९१चा तो काळ. त्या वेळी राजकारणातले, अर्थकारणातले ताणेबाणे मला फारसे कळत नव्हते.

..................................................................................................................................................................

आंबेडकरांना सहन करावा लागलेला विकृत व अविचारी वैरभाव या व्यंगचित्रांमधून उघड होतो. त्याचबरोबर ऐतिहासिक अन्याय सहन केलेल्या आंबेडकरांचं वास्तविक चरित्रही उजेडात येतं.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये खरेदीसाठी करण्यासाठी क्लिक करा - 

https://www.booksnama.com/book/5282/Hasanyawari-Neu-Naka

..................................................................................................................................................................

ही कादंबरी आम्हाला शिकवत होते प्रा. एन. एम. नेरकर. ऑर्वेलचा व्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा समजावताना त्यांनी सांगितलेली लहानशी रूपककथा माझ्या स्मरणात राहिली. त्यानंतर ऑर्वेल लख्ख कळला. ते रूपक असं होतं : हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये एका रशियन कुत्र्याची आणि भारतीय कुत्र्याची भेट झाली. रशियन कुत्रा चांगला गुबगुबीत, भारतीय कुत्रा बिचारा खंगलेला. भारतीय उदासपणे म्हणाला, ‘‘गड्या, तू किती भाग्यवान! मला खायला मिळण्याची मारामार. बघ कशी हाडंहाडं दिसतायत.’’ त्यावर रशियन खिन्नपणे उत्तरला, ‘‘अरे बाबा, तूच भाग्यवान! तुला भुंकण्याचं स्वातंत्र्य आहे. माझा जीव घुसमटतोय.’’

पुढं जग फार बदललं. दादाही अकाली गेले. अधूनमधून ऑर्वेलचं वाचन चालू होतं. तीन-चार वर्षांपूर्वी जॉर्जियाला जाणं झालं. हा एकेकाळी सोव्हियत रशियाचा भाग असलेला कॉकेशस पर्वतरांगांमधला देश. मुख्य म्हणजे, स्टालीनची मायभूमी म्हणून याची ओळख. जॉर्जिया बघण्याचं कुतूहल होतं. हा देश स्वतंत्रपणे उभा राहण्यासाठी धडपडतोय, हे लगेचच लक्षात आलं. गोगी हा हुशार, उत्साही तरुण सोबत होता. त्याचा जन्म सोव्हिएत रशियाचं विघटन झाल्यानंतरचा. म्हणजे स्वतंत्र देशातली ही पहिली पिढी. लेनीन, स्टालीन यांच्याविषयी त्याला ममत्व नव्हतं. स्टालिनचं जन्मगाव ‘गोरी’वरून जाताना तो म्हणाला, ‘‘इथं स्टालीनचं म्युझियम आहे. त्यात काय बघायचं? स्टालीनच्या वस्तू, फोटो आहेत. त्याला विमानात बसायची भीती वाटे. त्याची ट्रेनची आलिशान बग्गी तिथं उभी आहे. आधी तिथं स्टालीनचा पुतळा होता, आमचा देश स्वतंत्र झाल्यावर तो पाडला. आता पर्यटक येतात म्हणून पुन्हा बसवलाय.’’

रशियाचा प्रभाव पुसून टाकण्याची जॉर्जियाची धडपड चाललेली दिसत होती. पुतळा दिसल्यावर गोगी माहिती पुरवे, ‘‘हा आमचा महाकवी रुस्तएवलीचा पुतळा. इथं आधी लेनीनचा पुतळा होता. हा आमचा मध्ययुगातला पराक्रमी राजा डेव्हिड. इथं स्टालीनचा पुतळा होता. आम्हाला तो मधला इतिहास आठवायचाच नाहीये. आता स्वातंत्र्याचं जतन करायचंय.’’ ऑर्वेलचं वाक्य आठवलं, “If there is hope, … it lies in the proles.”

यानंतर एकदीड वर्षांनी ऑर्वेल पुन्हा भेटला तो इजिप्तला. २०११मध्ये या देशात क्रांतीचा आवाज घुमला. तरुणांपासून वृद्धांपर्यंत स्त्रीपुरुष रस्त्यावर आले. पण अजूनही या देशाला लोकशाहीचा मार्ग सापडलेला नाही. लोकांचा भ्रमनिरास झाला. एके दिवशी हाताशी वेळ होता. सोबतचा महमूद टेकडीवरच्या राजवाड्यात घेऊन गेला. खाली अस्ताव्यस्त पसरलेलं आणि रया गेलेलं कैरो शहर दिसत होतं. त्या जुन्या राजवाड्याच्या परिसरात तुरुंग लागला. लहानलहान अंधाऱ्या कोठड्या रांगेत उभ्या होत्या. महमूद सहजपणे म्हणाला, ‘‘राजाविरोधात बोलणाऱ्याची पूर्वी इथं रवानगी होई. आताही सरकारविरोधात बोललं की, तुरुंगात रवानगी होतेच. त्यासाठी नवे तुरुंग बांधले जातायत.’’ मग आजूबाजूला बघत हसत म्हणाला, ‘‘कुणी ऐकलं, तर मी उद्या त्या नव्या तुरुंगात!’’ ऑर्वेलनं दाखवलेलं भयाचं राज्य तिथं अवतरलं होतं.

याच दरम्यान ‘फॅसिझम’, ‘राष्ट्रवाद’, ‘प्रचारतंत्र’ हे शब्द कानावर आदळू लागले. संपूर्ण जगच एका विचित्र अवस्थेतून जाऊ लागलं. बघता बघता जग दोन गटांत दुभंगलं. एक रांग डाव्यांची, दुसरी रांग उजव्यांची. अधल्यामधल्यांसाठी रांगच उरली नाही. उजव्या किंवा डाव्या रांगेत जाऊन उभं राहण्याचा अट्टाहास सुरू झाला. एकदा आमच्या विचारसरणीची झूल पांघरली की, ती उतरवायची नाही - ही दोन्हीकडची अट. प्रत्येक विषय त्याच चष्म्यातून बघायचा. टीव्हीवरच्या आक्रस्ताळ्या चर्चा हेच आपलं वैचारिक खाद्य झालं. समाजमाध्यमांचा कलकलाट सुरू झाला. गतवैभवाचे भावनिक उमाळे येऊ लागले. काय खरं, काय खोटं ते कळेनासं झालं. ऑर्वेल म्हणतो, “To see what is in front of one’s nose needs a constant struggle.” (नाकाच्या शेंड्यापलीकडचं बघणं अवघड झालं.)

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

अशा या भांबावून टाकणाऱ्या काळात ऑर्वेल पुन्हा खुणावू लागला. तो म्हणू लागला, ‘फॅसिझम म्हणजे काय हे समजून घ्यायचंय का? ‘Fascism and Democracy’ हा माझा निबंध वाच.’ ‘उरी, पुलवामा, बालाकोट यावर तावातावानं चर्चा सुरू आहे ना. देशभक्ती आणि राष्ट्रवादातला फरक हवाय का? ‘Notes on Nationalism’ वाच.’ ‘गांधी तटस्थपणे समजून घ्यायचाय का? मी मोठा ग्रंथ लिहिला नाही, लहानसाच निबंध लिहिलाय. ‘Reflections on Gandhi’ वाच.’ एकामागोमाग एक तो वाट दाखवत होता. वाचूनच दमायला होई. अवघ्या सत्तेचाळीस वर्षांच्या आयुष्यात केवढं काम करून गेला हा! राजकारण, साहित्य, समाज, संस्कृती अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्याची लेखणी लीलया तळपली. ऑर्वेलचं स्वच्छ शब्दांमधलं लेखन वाचताना काळे ढग दूर पळून कोवळं ऊन पसरल्यासारखं वाटे.

‘Burmese Days’ ही त्याची कादंबरी वाचायला घेतली आणि हा निर्भय लेखक ‘आपला’ वाटू लागला. तो बर्मात आला, त्या वेळी तो भाग ब्रिटिश इंडियामध्ये होता. त्या काळात भारताची प्रतिमा रंगवणं सोपं होतं. साधूसंतांचा, सापगारुड्यांचा, हत्तींचा आणि दरिद्री, अशिक्षित लोकांचा देश दाखवायचा किंवा पौर्वात्य संस्कृती म्हणजे पुरातत्त्ववाद्यांनी खणून काढलेली, म्युझियम सजवण्यासाठी योग्य असलेली अशी दाखवायची. ऑर्वेल या दोन्ही गटांपेक्षा निराळा होता. ‘ब्रिटिश साम्राज्यशाही हे ‘Pax Britannica’ नसून ‘Pox Britannica’ आहे, आम्ही तुम्हाला लुटायला आलो आहोत,’ हे प्रामाणिकफणे सांगण्याची हिंमत बाळगणारा होता. आपल्या विद्यापीठांमध्ये किपलिंग, ई. एम्. फॉस्टर या नावांचा दबदबा. बाकी ब्रिटिश आणि अमेरिकन कादंबरीकार अभ्यासाला असतातच. पण वाटलं, ऑर्वेलची ही बाजू आपण लक्षात घेतली नाही, हा आपला दोष!

ऑर्वेलचं लेखन अनुभवातून उतरलेलं असल्यानं साहजिकच त्याच्या जीवनाकडे लक्ष गेलं. त्याचं लेखन जेवढं विलक्षण, तेवढंच त्याचं जगणंही विलक्षण. तो अनुभवांच्या शोधात वणवण भटकला. जगलाही विलक्षण काळात. चर्चिल, रुझवेल्ट, हिटलर, मुसोलिनी, स्टालीन, फ्रँको हे त्या काळातले नेते. ऑर्वेलच्याच मते, या सर्वांपेक्षा उत्तुंग ठरले ते गांधी. तेही याच काळातले. या काळाच्या पार्श्वभूमीवर ऑर्वेलच्या व्यक्तित्वाचा मी शोध घेऊ लागले. 

व्यक्तीच्या अंतरंगाचा ठाव घेणं, तिच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचणं हे मोठंच आव्हान. त्यात ऑर्वेल हा कलात्मकता आणि राजकीय हेतूचा संगम साधणारा सर्जनशील कलावंत. खरं तर, तो शेक्सपिअर किंवा टॉलस्टॉयसारखा प्रतिभासंपन्न लेखक नव्हता. पण हेच त्याचं सामर्थ्य आहे. लियोनल ट्रिलिंग हे अमेरिकन समीक्षक म्हणतात, ‘He is not a genius - what a relief!’ त्यांच्या मते, ऑर्वेल सर्वांनाच आपला वाटतो, त्याचं हे एक कारण आहे. सुरुवातीच्या काळात त्यानं स्वत:ला घडवलं. त्यासाठी प्रचंड परिश्रम घेतले. आपले विचार आणि अनुभव लेखनातून प्रामाणिकपणे मांडण्याचा त्याचा प्रयत्न होता. कसलाही अभिमान किंवा न्यूनगंड न बाळगता तो व्रतस्थासारखं लेखन करत राहिला आणि त्यातूनच त्याच्यातली प्रतिभा उसळून बाहेर आली.

वाचनवेडातून लहानपणीच लेखक होण्याचं ध्येय त्यानं ठरवलं होतं. त्या ध्येयावर लक्ष ठेवून तो चालत राहिला, वाटेत आलेले अनुभव घेतले, कधी अनुभव घेण्यासाठी मुद्दाम वाकड्या वाटेनं गेला, त्या वाटेत संकट असल्याचं ठाऊक असूनही तिच्यावर नीडरपणे चालत गेला. जीवनप्रवाह असीम आहे, गहन आहे, हे त्याला कळलं होतं. त्यात खोलवर उडी मारून अनुभवांचे शिंपले गोळा करण्यासाठी तो पोहत राहिला. त्याची ताकद त्या लहानमोठ्या रंगीबेरंगी शिंपल्यांचं बारकाईनं निरीक्षण करून, त्यांच्या आत शिरून त्याचं साहित्यात रूपांतर करण्याची होती. त्यासाठी तो मुक्तपणे भटकला. बर्मात पोलीस अधिकारी झाला, उत्तम पगाराची नोकरी सोडून भटक्यांमध्ये राहिला, कष्टकऱ्यांसोबत राबला, खाणकामगारांचं आयुष्य बघितलं, जिवावर उदार होऊन स्पेनमध्ये फॅसिझमविरुद्ध लढला, दुसऱ्या महायुद्धाचा संहार बघून दु:खी झाला. या महायुद्धाच्या काळात त्याची युद्धावर लढायला जाण्याचीही तयारी होती. पण प्रकृतीनं दगा दिला.

अमेरिकन साहित्यिक हेन्री मिलर हे त्याचे स्नेही. महायुद्धाला तोंड फुटेपर्यंत ते फ्रान्समध्ये राहत होते. युद्ध सुरू झाल्यावर ते अमेरिकेत परतले. ते कळल्यावर ऑर्वेल उपहासानं म्हणाला, ‘‘उद्या अमेरिकेत युद्ध पोहोचलं, तर ते दक्षिण अमेरिकेत सापडतील.’’ लेखकानं अनुभवांना निर्भयतेनं सामोरं जायला हवं, हा त्याचा आग्रह होता. 

..................................................................................................................................................................

‘खिंडीत’ : शैक्षणिक जगताच्या अंतरंगाची विरूपता भेदकपणे उलगडणाऱ्या कथा

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5254/Khindit

..................................................................................................................................................................

कशाचा शोध घेत होता तो? भोवताल, गुंतागुंतीची व्यवस्था, व्यवस्थेतलं माणसाचं स्थान यांचा शोध घेण्याची त्याची तृष्णा होती. व्यापक भूमिकेतून आणि डोळसपणे वास्तवाला भिडण्याची त्याची तगमग होती. केवळ अनुभव घेणं म्हणजे लेखन करणं नसतं. हजारो ब्रिटिश भारतात काम करत होते, पण त्या अनुभवांना नि:स्पृहपणे भिडणारा आर्वेलशिवाय दुसरा लेखक कोण? टी. एस. एलीयट, यीट्स, स्टीफन स्पेंडर, ऑडन हे कवी, ग्रॅहम ग्रीन, हेन्री ग्रीन, अँथनी फॉवेल हे कादंबरीकार त्याचे ब्रिटनमधले समकालीन. अनुभवांशी एकरूप होत, त्या उलथापालथीच्या काळाला खोलवर समजून घेत, साम्राज्यशाही, भांडवलशाही, समाजवाद, साम्यवाद, वंशवाद, राष्ट्रवाद अशा अनेक बाबींच्या मुळाशी जात, भूत-वर्तमान-भविष्य यांना कवेत घेणारे ऑर्वेलसारखे मोजकेच.

अनुभवविश्वातून त्याचा जीवनविषयक दृष्टिकोन तयार झाला होता. सत्य, न्याय, समता, स्वातंत्र्य, समाजवाद आणि लोकशाही या मूल्यांशी त्याची बांधीलकी होती. त्यासाठी तो आपल्याच लोकांशी लढला. सर्वांना धारेवर धरत गेला. स्वत:लाही तपासत गेला. स्पेनच्या युद्धातल्या अनुभवानं तो खडबडून जागा झाला. ऑर्थर कोस्लर यांना तो एकदा म्हणाला, ‘‘१९३६मध्ये इतिहास थांबला.’’ त्याच्यातल्या लेखकाचा पहिला जन्म झाला तो बर्मात आणि दुसरा स्पेनमध्ये. साम्राज्यशाही आणि हुकूमशाही या दोन्ही दुष्ट शक्तींशी लढण्यासाठी त्याची लेखणी तळपत राहिली. त्यातूनच त्याच्या कालातीत कादंबऱ्यांचा आणि निबंधांचा जन्म झाला.

कलावंताचा प्रवास कष्टप्रद असतो, याची त्याला जाणीव नव्हती का? निश्चितच होती! पण ‘करून जावे असेही काही...’ हा त्याचा ध्यास होता. म्हणूनच तो त्या खडतर वाटेवर चालत राहिला. त्या प्रवासाचं खणखणीत मोल चुकवण्याची त्यानं तयारी ठेवली होती. एकट्यानं चालताना त्याला यातना झाल्या, पण तो खचला नाही. मार्गापासून ढळण्याचा विचारही त्याला कधी शिवला नाही. त्यासाठी स्वावलंबीपणे जगला. अनेक बाबतीत तो गांधीजींसारखा होता. काटकसरीनं साधेपणानं जगणारा, सत्यनिष्ठ आणि स्वत:ला तपासून बघण्याची हिंमत बाळगणारा. शारीरिक श्रमाचं मोल जाणणारा. एक कुटी, गरजेपुरते कपडे, कोंबड्या-बकऱ्या, बाग हा त्याचा संसार. आत्मा धगधगता आणि कणा ताठ. म्हणूनच सर व्हिक्टर प्रिट्चेट् या समीक्षकांनी ऑर्वेलला ‘संता’ची उपाधी दिली.

..................................................................................................................................................................

हेही वाचा : 

ब्रिग ब्रदर इज वॉचिंग यू! - जॉर्ज ऑर्वेल

‘1984’ : २०१७ साली वाचलंच पाहिजे असं पुस्तक!

‘अ‍ॅनिमल फार्म’ची पंचाहत्तरी साजरी करण्याचे काही प्रयोजन आहे काय?

..................................................................................................................................................................

गांधी आणि ऑर्वेल दोघंही लोकांच्या भल्यासाठी जगले. त्यासाठी त्यांनी भरपूर टीकाही सहन केली. ऑर्वेलनंसुद्धा गांधींवर टीका केली. ऑर्वेल डावा असून डाव्यांना आपला वाटला नाही आणि त्याच्यावर डावेपणाचा शिक्का बसवल्यावर उजव्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आपण राजकीय हेतूनं लेखन करत असल्याचं ऑर्वेल सांगे. पण त्याच्या म्हणण्याचा अर्थ होता, कोणताही राजकीय रंग लावून न घेता राजकीय लेखन करणं. कलात्मक भान ठेवत तटस्थपणे बघणं. कारण गांधींप्रमाणेच त्याचा सामान्यांवर अतूट विश्वास होता. लोकशाहीचे दोघं खरेखुरे उपासक. कष्टकऱ्यांचं, गरिबांचं दु:ख समजून घेणारे. भारतीयांच्या मनाला लागलेला जातीचा आणि धर्मविद्वेषाचा रोग उपटून काढण्याची गांधींची तळमळ होती, तर ऑर्वेलची कळकळ ब्रिटिशांमध्ये मुरलेला वर्गव्यवस्थेचा, दांभिकतेचा आजार नष्ट करण्याची. या दोघांनाही समजून घेणं म्हटलं तर सोपं, पण तसं अवघडही. त्यामुळे दोन्हीकडचे लोक त्यांचा सोयीनुसार वापर करत राहिले.

अर्थातच, दोघांचे विचार अनेक बाबतीत वेगवेगळे होते. दोघं वेगवेगळ्या संस्कारात वाढले होते. स्वभाव वेगवेगळे. गांधींची अहिंसा, शाकाहार, ब्रह्मचर्य याकडे तो वळला नाही. अध्यात्माशी त्याचं सख्य नव्हतं. पण गांधींप्रमाणेच त्याचा हेतू सामान्यांना सावध करण्याचा होता. त्यासाठी त्यानं लेखन हे व्रत म्हणून स्वीकारलं होतं. त्याची हाक होती, ‘जागते रहो!’ हुकूमशाही कुठून कशी अवतरते, हे समजून घ्यायला तो सांगत होता. कारण गांधींप्रमाणेच सामान्यांचं जगणं समृद्ध व्हावं, ही त्याची अंतरीची कळकळ होती. त्या ध्यासामुळेच दोघं कालातीत ठरले. गांधींना व्यवस्था बदलून सामान्यांच्या आयुष्यात प्रकाश आणायचा होता; तर ऑर्वेलला व्यवस्था समजून घेऊन, तिला वेळीच विरोध करून. दोघंही एकाच काळात जगले, पण दुर्दैवानं त्यांची भेट झाली नाही. भारतात येण्याची ऑर्वेलची संधी प्रकृतीमुळे हुकली.

ऑर्वेलचं व्यक्तिमत्त्व गुंतागुंतीचं होतं. स्वत:ला तपासत गेल्यानं तो बदलत गेला. त्याच्यात विसंगतीही होती. त्या अर्थानं तो संत नव्हता; हाडामासाचा तुमच्या आमच्यासारखा माणूस होता. दु:खानं त्याच्याही मनाला यातना होत. तो स्खलनशील होता. बर्मातल्या बौद्ध भिख्खूंचा अतिशय तिरस्कार करणारा हा माणूस साम्राज्यशाहीचा विरोधक होता. नास्तिक असूनही अँग्लिकन चर्चविषयी आत्मीयता ठेवणारा होता. शांततावादी असूनही देशभक्तीनं प्रेरित होऊन युद्धावर जाण्यासाठी धडपडणारा होता. विचारानं आधुनिक असूनही राहण्याच्या बाबतीत जुन्या वळणाचा होता. उच्च वर्गाच्या सरकारी शाळांवर आयुष्यभर टीका करत राहिला, पण मुलाला सरकारी शाळेत घालावं ही इच्छा जगाचा निरोप घेताना व्यक्त करून गेला. नास्तिक असूनही मुलाची कुंडली बनवण्यासाठी तयार झाला.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

ऑर्वेलनं पैलतीर गाठून आता बरोबर सत्तर वर्षं झाली आहेत. या काळात साम्यवादाची पिछेहाट झाली. जागतिकीकरणाची लाट आली. जग पुन्हा आर्थिक राष्ट्रवादाच्या मार्गानं जायला निघालंय. जात-धर्म-वंश यांचं तण फोफावतंय. विचारक्षेत्र आक्रसतंय. टीव्हीवरची सवंग करमणूक आणि भडकवणाऱ्या राजकीय चर्चा आटोपल्या की, दिवस संपतो. ऑर्वेल ‘The Road to Wigan Pier’मध्ये म्हणतो, ‘पहिल्या महायुद्धानंतर चित्रपट आणि स्वस्तातल्या कपड्यांचं उत्पादन प्रचंड वाढलं. तुमच्या खिशात भले पैसे नसतील, तुम्हाला नोकरीची चिंता असेल; पण उंची ब्रँडचे लेबल लावलेले नक्कल केलेले स्वस्तातले कपडे घातले की, तरुण वर्ग नटनट्या बनण्याची स्वप्नं बघायला लागतो. वास्तवापासून दूर जातो.’ तसंच आपलं होतंय का? अशा काळात विचार करायला लावणारी मोजकी पाचूची बेटं कुठं कुठं एकटी शांतपणे उभी दिसतात. त्यातलंच एक ऑर्वेल नावाचं बेट. त्या बेटांवरच्या विचारांच्या जंगलातून भटकणं, निदान त्यांचा किनारा गाठणं आपल्याला शक्य नाही का? 

हे चरित्र वाचून ऑर्वेलचे निकोप, नितळ आणि खणखणीत विचार समजून घेण्याची वाचकांना उत्सुकता वाटली, त्याच्या कादंबऱ्यांबरोबरच निबंधांकडे ते वळले, त्याच्या विचारांमधून सभोवतालच्या घटनांचा तटस्थपणे अन्वय लावता आला; तर आनंद वाटेल. ऑर्वेलच्या अंतरंगाचा वेध घेताना त्याचं व्यक्तित्व आणि साहित्य यांचा संगम साधण्याचा हा प्रयत्न आहे. हे पुस्तक वाचकांना ऑर्वेलशी जोडणारा पूल ठरावं, हीच अपेक्षा.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......