नाही पापलेट, नाही सुरमई; म्हणून का तुम्ही साहित्य संमेलनाकडे फिरकत नाही?
पडघम - साहित्य संमेलन विशेष
टीम अक्षरनामा
  • चित्र - सतीश सोनवणे
  • Sat , 04 February 2017
  • साहित्य संमेलन Sahitya Sammelan आगरी युथ फोरम Agri Youth Forum सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल Savlaram Maharaj Sport Complex

डोंबिवलीत भरलेल्या ९०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा पहिला दिवस फ्लॉप गेला. ना उदघाटनाच्या कार्यक्रमाला गर्दी होती, ना पुस्तक प्रदर्शनाला, ना इतर कार्यक्रमांना, ना खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर... सगळीकडे शुकशुकाट होता. आगरी युथ फोरमने हे संमेलन आयोजित करूनही पापलेट, बांगडे, सुरमई, कोळंबी, रावस, मोरी, चिंबोरी यापैकी काहीच जेवणात नाही. म्हणून कदाचित हा प्रकार घडला असावा. जे साहित्यरसिक आले त्यांनाही बहुधा इथं दरवर्षी प्रमाणे आगरी युथ फोरमने खाद्यमहोत्सव भरवला असावा असेच वाटले असावे. डोंबिवलीमध्ये १३९ वर्षांनी अखिल भारतीय साहित्य संमेलन होत आहे. त्यामुळे डोंबिवलीकरांचा उत्साह सळसळायला हवा होता. ठाण्यासापासून बदलापूर-कर्जतपर्यंत मराठी माणसं मोठ्या प्रमाणावर आहेत, असं सांगितलं जातं. शिवाय मराठी माणूस साहित्यप्रेमी असल्याचीही जपमाळ ओढली जाते. पण साहित्यप्रेमी मराठी माणसांना साहित्य संमेलनाकडे फिरकावंसं वाटलं नाही. खुद्द डोंबिवलीतील साहित्य रसिकही फारसे फिरकले नाहीत.

असं का झालं असावं? त्याची अनेक कारणं आहेत. एक म्हणजे आयोजक संस्थेनं डोंबिवली शहरात या संमेलनाची पुरेशी जाहिरात केलेली नाही. महत्त्वाच्या रस्त्यावर मोठ्या कमानी उभारायला हव्या होत्या. मोठ्या चौकांमध्ये मोठे फ्लेक्स लावायला हवे होते. संमेलनस्थळाशेजारच्या परिसरात तर विशेष सजावट करायला हवी होती. पण तसं काहीही केलेलं नाही. त्यामुळे डोंबिवलीमध्ये यंदाचा सर्वांत मोठा साहित्य महोत्सव भरला आहे, याची फारशी कुणाला खबरबात नाही. रिक्षावाल्यांना तर साहित्य संमेलन नावाची गोष्टही फारशी माहीत नाही. पण त्यांना घरडा सर्कल, रोटरी गार्डन किंवा म्हात्रे क्रीडा संकुल मात्र व्यवस्थित माहीत आहे. पण याच परिसरात होत असलेल्या संमेलनाविषयी मात्र फारशी काही माहिती नाही. असो.

संमेलनाचं सुंदर व कल्पक प्रवेशद्वार. त्याच्याकडे पाहताच साहित्याचं संमेलनाचा मूड तयार होतो. पुस्तकांच्या चिदघोषाची खूण पटते.

पण त्या प्रवेशद्वाराचं जरा लांबून छायाचित्र घेतलं तर काय दिसतं? हे पहा.

संमेलनात हौश्या-नवश्या-गवश्यांची गर्दी होतेच होते. खास त्यांच्यासाठी मुख्य मंडपासमोर ही लेखणीची भव्य प्रतिकृती उभारली आहे. त्याला दोन्ही बाजूंनी पायऱ्या आहेत. जेणेकरून ज्यांना वर जाऊन सेल्फी काढायचा आहे किंवा त्याच्या साक्षीने सेल्फी काढायचा आहे, त्यांची सोय व्हावी. पण सेल्फी काढणाऱ्यांची संख्यासुद्धा तुरळक म्हणावी इतकी विरळ होती.

मुख्य मंडपात संमेलनाचा उदघाटन सोहळा सुरू झाल्यानंतरचं हे छायाचित्र. उदघाटनाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आलेले. हिंदीतील ज्येष्ठ साहित्यिक विष्णू खरे, माजी संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस आणि विद्यमान संमेलनाध्यक्ष अक्षयकुमार काळे आदी मंडळी व्यासपीठावर होती. पण व्यासपीठासमोर मात्र ही अशी गर्दी होती.

मुख्य मंडपाचंच हे उजव्या बाजूनं घेतलेलं छायाचित्रं. लालभडक खुर्च्या साहित्यरसिकांची वाट पाहत ताटकळून गेल्या आहेत.

हे डाव्या बाजूचं छायाचित्र. ये लाल रंग कब मुझे छोडेगा!

हे लेखणीची जी भव्य प्रतिकृती आहे, तिच्यावर चढून घेतलेलं छायाचित्र. हे मुख्य मंडपाच्या बरोबर मध्यभागाचं आहे. तिथंही ही अशी अवस्था आहे.

हे लेखणीची जी भव्य प्रतिकृती आहे, तिच्यावर चढून उजव्या बाजूचं घेतलेलं छायाचित्र.

उदघाटन सोहळा संध्याकाळी सुरू झाला. पण काल दुपारपासून आपापले पुस्तकांचे स्टॉल्स खपून तयार करणाऱ्या, सजवणाऱ्या विक्रेत्यांनी सकाळी सात-आठपासून साहित्यरसिकांची वाट पाहायला सुरुवात केली. पण तिथंही हा असा शुकशुकाट होता. त्यात हे छायाचित्र तर महानुभाव साहित्याची पुस्तकं विकणाऱ्या स्टाॅलचे. त्याकडे फिरकणाऱ्या साहित्यरसिकांची संख्या तर अजूनच कमी.

लोखंडी शेल्फांमध्ये ओळीने बसलेल्या या पुस्तकांवर दिवसभर साहित्यरसिकांची वाट पाहण्याची वेळ आली. लोक येतील आपल्याला पाहतील, हाताळतील, आवडलो तर घरी घेऊन जातील आणि जमलं तर वाचतील, हे या पुस्तकांचं आणि त्यांच्या विक्रेत्यांचं स्वप्न पहिल्या दिवशी तरी काहीसं विरून गेलं.

उदघाटन समारंभाला नाही, पुस्तक प्रदर्शनाला नाही, निदान खाण्यापिण्याच्या स्टॉल्सवर तरी साहित्यरसिकांनी गर्दी करावी की नाही? तर तिथंही ही अशी दारुण अवस्था. लोक निवांत गप्पा मारले उभे आहेत किंवा चहा पित.

 शुक्रवार होता. त्यामुळे गर्दी कमी होती. उद्या आणि परवा सुट्ट्या असल्यामुळे गर्दी वाढेल असं आयोजकांकडून सांगितलं गेलं. शाळा-महाविद्यालयाची मुलं आज संमेलन पाहायला येणार आहेत. त्यामुळे आज तरी गर्दी वाढेल असा वहिम आहे.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘आप’च्या पराभवाची जबाबदारी अरविंद केजरीवाल यांची आहे. त्यांच्या अहंमन्य तत्त्वशून्य आणि स्वार्थी राजकारणामुळे ‘आप’चा पराभव झाला...

अशा तत्त्वशून्य अहंमन्यतेचा पराभव होणं गरजेचं होतं. तसा तो झाला. याबाबतीत वाईट वाटण्याचं कोणतंच कारण नाही. भ्रष्टाचारविहीन शुद्ध चारित्र्याच्या राजकारणाचे स्वप्न ‘इंडिया अगेन्स करप्शन’ आंदोलनाने जनतेला दाखवले होते. त्याकडे मध्यमवर्गीय समाज आणि तरुण आकर्षितही झाले होते. या मध्यमवर्गाचा भ्रमनिरास करण्याचं पाप केजरीवालांनी केलं आणि त्याची शिक्षा त्यांना मिळाली. दुःख इतकंच की, ‘सापनाथ गेला आणि नागनाथ आला’.......

आजच्या राजकीय वातावरणात हर्षवर्धन सपकाळ हा ‘गांधीवादी साधेपणा’चा ब्रँड आदर्श, स्वप्नवत (युटोपियन) वाटू शकतो, परंतु तीच त्यांची खासीयत आहे!

हर्षवर्धन सपकाळ पारंपरिक राजकारण्याच्या साच्यात बसत नाहीत. ते कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून येतात. त्यांचे आई-वडील सरकारी कर्मचारी होते. त्यामुळे स्वतःच स्वतःला घडवलेल्या नेत्यांपैकी ते एक आहेत. त्यांनी १९९०च्या दशकात औपचारिकपणे काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचा राजकीय प्रवास त्यांच्या गावच्या सरपंच पदापासून सुरू झाला. काँग्रेसला पुन्हा उभारणे हे आता सपकाळ यांच्यासमोरचे आव्हान आहे.......