१९५७च्या कादंबरीचं ६२ वर्षांनंतर, आज जागतिक अणुयुद्धाचा धोका नसताना मी भाषांतर का करतो आहे? आजच्या भौतिक स्थितीचं आकलन स्पष्ट करण्यासाठी...
ग्रंथनामा - झलक
नंदा खरे
  • ‘ऑन द बीच’च्या मराठी अनुवादाचं मुखपृष्ठ
  • Sat , 23 January 2021
  • ग्रंथनामा झलक नेव्हिल शूट ऑन द बीच नंदा खरे

मानवी सत्तास्पर्धेतून झालेल्या संघर्षामुळे उद्भवलेल्या अणुयुद्धाच्या परिणामांचे भयानक वास्तव मांडणारी ‘ऑन द बीच’ ही नेव्हिल शूटची गाजलेली कादंबरी. तिचा ज्येष्ठ कादंबरीकार-संपादक नंदा खरे यांनी केलेला मराठी अनुवाद नुकताच मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. या अनुवादामागची भूमिका स्पष्ट करणारी नंदा खरे यांची ही प्रस्तावना...

..................................................................................................................................................................

मी कॉलेजात असताना, साधारणपणे १९६१-६७ या काळात दुसऱ्या महायुद्धाबाबतची पुस्तकं, चित्रपट वगैरेंची रेलचेल असायची. गांभीर्यानं तो इतिहास जाणू पाहणारे ‘राईज अँड फॉल ऑफ द थर्ड राईश’ वगैरे वाचायचे, तर बहुतेकांची भिस्त कादंबऱ्यांवर असायची आणि कादंबरीकारांमध्ये एक इज्जतदार नाव होतं नेव्हिल शूट (Nevil Shute Norway – १८९९-१९६०). हे कादंबऱ्यासाठीचं नाव होतं. विमानं व इतर शस्त्रास्त्रांचा डिझायनर म्हणून काम करताना तो ‘नेव्हिल शूट नॉर्वे’ हे पूर्ण नाव वापरायचा.

त्याच्या अनेक कादंबऱ्यांमधून वैमानिक या वर्गाचा इतिहास दिसतो; जत्रांमधून ‘जॉय राईड्स’ देणारे, ते टेस्ट पायलट्स. शूटनं सुमारे दोन डझन कादंबऱ्या लिहिल्या, ज्याच्या सर्व मिळून दीडेक कोटी प्रती खपल्या. यामुळे कधीकधी शूटला ‘प्रिन्स ऑफ द स्टोरीटेलर्स’ म्हटलं जाई. पण दुसरं महायुद्ध, विमानं यांपेक्षा वेगळ्याही काही कादंबऱ्या शूटनं लिहिल्या. त्यांपैकी शेवट-शेवटची कादंबरी म्हणजे ‘ऑन द बीच’ (१९५७) ही ‘अॅपोकॅलिप्टिक’ किंवा युगांताची कथा.

दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी मानवानं आपल्याच मानवी शत्रूंवर एक अत्यंत विध्वंसक शस्त्र वापरलं - अॅटमबाँब किंवा अणुबाँब नावाचं. त्याची संहारकता इतकी जास्त होती की, ते शस्त्र घडवण्यात भाग घेतलेल्या अनेकानेक शास्त्रज्ञांना स्वत:बद्दलच घृणा वाटायला लागली. अनेक शास्त्रज्ञांनी शस्त्रास्त्रं घडवण्यासाठी काम करणार नाही अशा शपथा घेतल्या. अणुविज्ञानापासूनचं सकारात्मक तंत्रज्ञान ‘अॅटम्स फॉर पीस’ या नावानं घडू लागलं. मला शाळकरी आयुष्यात अणुभट्ट्यांची रचना दाखवणारी चित्रं, मॉडेल्स वगैरेंचं फिरतं प्रदर्शन अणुऊर्जा सामान्य माणसांना समजावून देण्यासाठी भारतभर फिरवलं गेल्याचं आठवतं व स्वत: नागपुरात ते पाहिल्याचंही आठवतं.

काही शास्त्रज्ञ मात्र जास्त जास्त संहारक बाँब्स रचण्यातच गुंतून राहिले. डाव्या-उजव्या साम्राज्यवादी देशांची सरकारं त्या कार्यक्रमाला भरघोस पैसेही पुरवत राहिली. त्यातून साध्या हिरोशिमा-नागासाकी नमुन्याच्या अणुबॉम्बऐवजी हायड्रोजन, कोबाल्ट, न्यूट्रॉन वगैरे नावांची राक्षसी बॉम्बची नवनवी रूपे घडली. अण्वस्त्रसज्ज देशांची संख्याही वाढत गेली. गेल्या वर्षीच्या एका अंदाजानुसार माणसांनी २,४७८ अणुस्फोट केले आहेत; ज्यांपैकी दोनच युद्धांमधले आहेत तर इतर सारे चाचण्या म्हणून केले गेलेले आहेत. आजवर केल्या गेलेल्या अणुबॉम्ब स्फोटांची एकूण संहारकता तीस कोटी टन टीएनटी इतकी होती; म्हणजे हिरोशिमा व नागासाकी स्फोटांच्या बेरजेच्या दहा हजार पट! तेव्हा विरळ वस्तीच्या जपानमध्ये दोनच स्फोटांत सुमारे पावणेदोन लाख माणसे मेली (प्रत्यक्ष अंदाज १.२९ लाख ते २.२६ लाख असे आहेत.) जर चाचण्यांऐवजी तीस कोटी टन टीएनटी युद्धात वापरले गेले असते, तर पावणेदोन अब्ज माणसे मेली असती. आजची जगाची लोकसंख्येची दाटी पाहता हा आकडा दुप्पटही होऊ शकतो. म्हणजे आजच्या जगाची जवळपास अर्धी माणसे आजवरच्या चाचण्यांमध्ये मरू शकली असती!

..................................................................................................................................................................

आंबेडकरांना सहन करावा लागलेला विकृत व अविचारी वैरभाव या व्यंगचित्रांमधून उघड होतो. त्याचबरोबर ऐतिहासिक अन्याय सहन केलेल्या आंबेडकरांचं वास्तविक चरित्रही उजेडात येतं.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये खरेदीसाठी करण्यासाठी क्लिक करा - 

https://www.booksnama.com/book/5282/Hasanyawari-Neu-Naka

..................................................................................................................................................................

अर्थातच या नव्या शस्त्रांसोबत एक नवं युद्धशास्त्रही घडलं. शत्रूनं अनेक बॉम्ब वापरून हल्ला केला, तरी आपली किती शस्त्रं टिकू शकतील? दुतर्फा एकेक हल्ला झाल्यानंतर दोघांकडे काय काय उरेल? हे आणि असले प्रश्न विचारत नवनवी धोरणं रचली जाऊ लागली. याचे कृष्ण-विनोदी रूप ‘डॉक्टर स्ट्रेंजलव्ह ऑर हाऊ आय लर्न्ड टू लव्ह द बॉम्ब’ या चित्रपटाने दाखवलं. शोधा आणि चित्रपट पाहा! या युद्धशास्त्रानं एक नवी भाषाच घडवली. एक शब्द होता - ‘MAD’ (मॅड) उर्फ Mutually Assured Destruction; दोन्ही पक्षांनी खात्रीनं एकमेकांचा सर्वनाश करणं! पण हा खात्री देण्याचा सोस पुरा व्हायच्या आधीच, थोड्याशाच बॉम्बचा किरणोत्सर्ग सर्व मानवजातीला मारू शकतो हे जाणवलं. हे माप ‘बीच’ म्हणून ओळखलं जायचं. त्याचं नाव शूटच्या ‘ऑन द बीच’ कादंबरीवरनं आलं होतं! नेमकं आठवत नाही, पण एक मॅड सुमारे अडीच बीच इतकं होतं.

हे सर्व गणित एकीकडे रशिया (USSR) आणि दुसरीकडे नाटो (NATO) एकमेकांचा सत्यानाश करण्याच्या हेतूने करत होते. या दोन महासत्तांचं हे दंडातल्या बेटकुळ्या दाखवणं आणि शड्डू ठोकणं (‘थाय फाईव्ह’, रे भाऊ!) शीतयुद्धाच्या काळात सुरू होतं, १९४५ ते १९८९. त्या काळात सर्व ‘विकसित’ देश (अमेरिका, कॅनडा, युरोप, सोव्हिएत रशिया, जपान) काळजीत असत. १९८२मध्ये एका पंचविशीच्या फ्रेंच मुलीला माझ्या एका स्नेह्याने विचारलं, “जगापुढची सर्वांत मोठी समस्या कोणती?’’ ती म्हणाली “अणुयुद्ध!’’

आपण मात्र पुरेसं अन्न कमवायला धडपडत होतो, कारण आपण विकसित नव्हतो, विकसनशील होतो! आता आपण महासत्ता होऊ पाहतो आहोत. आपल्याही काळज्या वाढतील.

‘ऑन द बीच’ ची गोष्ट साधी, सरळसोट आहे. उत्तर गोलार्धातल्या क्षुल्लक कारणावरून भडकलेल्या अणुयुद्धानं त्या क्षेत्रातली सर्व माणसे मेली आहेत. काही अमेरिकन खलाशी वाचतात, कारण ते पाणबुड्यांमध्ये असतात. ते पाणबुड्यांसकट दक्षिण गोलार्धात जातात; बेवारस, निर्वासित, इतरही बरंच, म्हणा! त्यांचे दक्षिणी यजमान, ते स्वत:, यांना इतर जगापेक्षा दोनेक वर्ष मिळालेली असतात. संथपणे किरणोत्सारी द्रव्यांच्या दूषित वातावरणाच्या रूपात मृत्यू दक्षिणेकडे सरकत असतो. त्याला माणसांनी दिलेले काही प्रतिसाद कादंबरी रेखाटते.

विक्षिप्त धैर्य, चांगुलपणा, भावबंध, बंधुभाव, सगळं टिकतं, तेही अतिरंजित, मेलोड्रामॅटिक रूपात नाही. गोष्ट एवढीच आहे, ‘हीन’ जळून जात माणुसकीच फक्त उरण्याची आणि मग तीही संपून जाण्याची!

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

भारतातल्या वाचकांना खटकतील अशा काही गोष्टी ‘बीच’ मध्ये आहेत. जसं, टावर्जनं म्वाराचे प्रेम-संदेश नाकारतानाच तिला वारंवार ‘हनी’ म्हणणं. शूट लिहीत होता तो दुसऱ्या महायुद्धाचा काळ इंग्लंड-अमेरिकेत झपाट्याने वाढणाऱ्या स्त्री-पुरुष समानतेचा काळ होता. पण त्या काळात एखादवेळी असंबद्ध स्त्रीला काहीशा प्रेमानं संबोधणं समतेला मारक मानलं जात नसेल. मला माहीत नाही, पुरुषानं स्त्रीला तसं संबोधणं योग्य की अयोग्य ते!

जास्त महत्त्वाचा मुद्दा आहे पुस्तकभर पसरलेली सिगारेटी आणि दारूची सप्रेम चर्चा. एक तर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सिगारेटी ना आरोग्याला हानिकारक मानल्या जात, ना नैतिकदृष्ट्या आक्षेपार्ह. हे भारतातही खरं होतं; अशोक कुमारच्या नायक म्हणूनच्या चित्रपटांत तो सतत सिगारेटी ओढायचा. इंग्लंड-अमेरिकेतही ‘शिलगावणे’ हे मैत्र्या घडवण्याचे तंत्र मानले जात असे. एकेकाळी ग्रामीण भारतात तंबाखूची मळलेली चिमूट हे काम करत असे, हे तर मीही सांगू शकतो. त्याहून महत्त्वाचं हे की, ‘बीच’मध्ये सार्वत्रिक आणि अटळ मृत्यू पुढ्यात उभा आहे.

पुस्तकाचं नाव टी.एस. एलियटच्या ‘द हॉलो मेन’ या कवितेतून येतं. काही माणसं एका फुगलेल्या नदीच्या किनाऱ्यावर शेवटचं भेटताहेत. संवाद साधणं कठीण झालं असल्यानं भाषेचाही वापर न करता ती माणसं चाचपडताहेत. जग दणक्यानं संपणार नसून कण्हत, कुथत आणि केकाटत संपणार आहे. माणसांना असंबद्ध, विसंगत, डिसकनेक्टेड, हतबल व कस्पटासमान ठरवणाऱ्या व्यवस्थेनं तीव्र परात्मभाव (एलियनेशन) जागवला आहे. हा व्यवस्थेनं केलेला अपमान सहन करायला दारूचं मलम वापरणं मला समजतं. आजच्या भारतातलं गरिबांचं दारू पिणं, ताकदीबाहेर पिणं, हेही एका समांतर परात्मभावातून येतं, असं माझं मत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे त्या परात्मभावाच्या हिमनगाचं उघडं टोक आहे, आणि पायाखाली व्यसनं आहेत, संख्येनं कित्येक पट मोठी. मला कल्पना आहे की या मतावरून माझे जास्त नैतिक, जास्त कर्मठ स्नेही नाराज होतील. माझा मात्र नाईलाज आहे. मला ‘बीच’मधल्या सिगारेटी, तिथली दारू, समजते.

पण १९५७च्या कादंबरीचं ६२ वर्षांनंतर, आज जागतिक अणुयुद्धाचा धोका नसताना मी भाषांतर का करतो आहे?

जीव नष्ट होणं, अख्ख्या जीवजाती बहरून पुढे त्या नष्ट होणं, हे या पृथ्वीला नवं नाही. ते वारंवार घडलेलं आहे; असा पुराजीवशास्त्राचा निष्कर्ष आहे, भरपूर पुराव्यांनी सिद्ध झालेला. पण आजवर हे जीव-जीवजाती नष्ट होणं त्या जीव-जीवजातींच्या कृतींमुळे झालेलं नाही.

‘ऑन द बीच’मधला युगांत मात्र माणसांच्या कृतींमुळे झालेला आहे. त्यातही सर्व मानवजात दोषी नाही. पुस्तकात वारंवार दक्षिण गोलार्धातली माणसं विचारतात, “आमची काय चूक होती की आमच्यावर ही पाळी येते आहे?’’

ते काल्पनिक अणुयुद्ध बेजबाबदार सत्तास्पर्धेतून घडलं होतं. आज बेजबाबदार उपभोग-स्पर्धेतून जगाचं हवामान बदलतं आहे. आपण दक्षिण गोलार्धातल्यांचा प्रश्‍न विचारत नाही आहोत कारण आपण आजही ‘कुठे काय झालंय हवामानाला?’ असा प्रश्न विचारतो आहोत. मानसोपचारात ‘मला कुठे काही समस्या आहे?’ या प्रश्नाला ‘डिनायल’ म्हणतात. आपण आज डिनायलमध्ये आहोत.

सध्या ग्रेटा थुन्बर्ग ही किशोरी डिनायलच्या बाहेर यायला सांगते आहे, आणि अनेकानेक लोक तसे बाहेर येऊ पाहत आहेत; पण ते पुरेसं नाही. विकास, सुसंस्कृत जगणं याच्या ठार चुकीच्या व्याख्या करत-वापरत आपण एका वेगळ्या बीचकडे जात आहोत.

हे माझं आजच्या भौतिक स्थितीचं आकलन स्पष्ट करायला शूटचं भाषांतर करतो आहे. यावर माझ्या निराशावादाचा, निगेटिव्हिटीचा उद्धार होईल. त्यावर मात्र मी डिनायलमध्ये जाणार नाही!

..................................................................................................................................................................

‘ऑन द बीच’ या जगप्रसिद्ध कादंबरीच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5288/On-the-Beach

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......