संस्कृती म्हणजे काय? ती कशी निर्माण होते आणि तिची वैशिष्ट्ये कोणकोणती असतात?
ग्रंथनामा - झलक
ह. श्री. शेणोलीकर, प्र. न. देशपांडे
  • ‘महाराष्ट्र संस्कृती : घडण आणि विकास’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sat , 23 January 2021
  • ग्रंथनामा झलक महाराष्ट्र संस्कृती : घडण आणि विकास ह. श्री. शेणोलीकर प्र. न. देशपांडे

प्रा. ह. श्री. शेणोलकर आणि डॉ. प्र. न. देशपांडे यांचे ‘महाराष्ट्र संस्कृती : घडण आणि विकास’ हे नवे पुस्तक नुकतेच डायमंड पब्लिकेशनने प्रकाशित केले आहे. या पुस्तकातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश...

..................................................................................................................................................................

‘महाराष्ट्र संस्कृती’च्या इतिहासाचा मागोवा घेऊन तिच्या वैशिष्ट्यांची ओळख करून देणे, हा प्रस्तुत ग्रंथाचा मुख्य उद्देश आहे. भारताच्या अंतर्गत असलेला महाराष्ट्र प्रदेश वा महाराष्ट्र समाज यांचे ‘महाराष्ट्रीयत्व’ या संज्ञेने ओळखले जाणारे असे काही खास वैशिष्ट्य आहे की नाही? आणि असल्यास ते कशा प्रकारचे आहे? याचा शोध घेण्याचा अल्पसा प्रयत्न आम्ही या ग्रंथाच्या रूपाने करत आहोत. महाराष्ट्र संस्कृतीच्या प्राचीन परंपरेचे धागेदोरे जुळवण्यासाठी ‘महाराष्ट्राच्या कुळकथे’कडे वळण्यापूर्वी ‘संस्कृती’ या शब्दाच्या संकल्पनेत कोणकोणत्या गोष्टींचा अंतर्भाव होतो, यासंबंधी काही चिकित्सा करणे आवश्यक वाटते. कारण ‘संस्कृती’ या शब्दाचा उपयोग विविध अर्थाने आणि विविध प्रकारे आपणाकडून केला जातो, इतकी लवचिक प्रकृती या शब्दाला लाभली आहे.

‘संस्कृती’ शब्दाचे विविध उपयोग

एका बाजूला मानवी ‘संस्कृती’ या शब्दाने सर्व मानवांना आणि त्यांच्या सर्व जीवनाला व्यापून टाकण्याची झेप हा शब्द घेतो; तर दुसरीकडे ‘पुणेरी संस्कृती’, ‘आमच्या घराण्याची संस्कृती’ किंवा ‘ही माझी संस्कृती (स्वभावधर्म) नव्हे’, अशा उद्गारांनी ‘संस्कृती’ हा शब्द स्वत:ला अगदी आकुंचितही करून घेतो. पाश्चात्य-पौरस्त्य, भारतीय-युरोपीय, हिंदू-इस्लामी, आर्य-द्रविड, ब्राह्मणी-मराठा, महाराष्ट्रीय-कन्नड यांसारख्या शब्दांनी संस्कृतीचा अर्थ प्रादेशिक, धार्मिक, वांशिक, जातीय, प्रांतीय इत्यादी दृष्टीने मर्यादित केलेला आढळतो. तर प्राचीन, मध्ययुगीन, अर्वाचीन, कालची-उद्याची या शब्दांनी संस्कृतीला कालिक मर्यादा घातली जाते. पारध, कृषी, नागर किंवा सरंजामदारी, भांडवलदारी व समाजवादी या विशेषणांनी युगपरत्वे संस्कृतींचे पृथकत्व इतिहासकारांनी ठरवलेले दिसून येते; तर कित्येकदा भौतिक, आध्यात्मिक, वैज्ञानिक या शब्दांनी संस्कृतीच्या घटकांनाच भिन्नत्व बहाल केले जाते. अलीकडे प्रचलित झालेल्या ‘सांस्कृतिक खाते’ (Cultural Department) किंवा ‘सांस्कृतिक कार्यक्रम’ (Cultural Programme) या शब्दातील ‘सांस्कृतिक’ या विशेषणाने संस्कृतीच्या विविध अंगांपैकी ‘गायन-वादन, नृत्य-नाट्य, लोकनाट्य’ यासारख्या फक्त कलात्मक अंगांचाच प्रामुख्याने उल्लेख होतो. काही काही वेळा धर्म म्हणजेच संस्कृती असे मानून वैदिक संस्कृती, बौद्ध संस्कृती, ख्रिस्ती संस्कृती, या शब्दांचा आग्रह धरला जातो; तर अनेकदा डॉक्टरी पेशाची संस्कृती, प्राध्यापकाची संस्कृती, चोरांची संस्कृती अशा शब्दसमुच्चयातून त्या त्या व्यवसायाची विशिष्ट नीती या अर्थाने ‘संस्कृती’ शब्द वापरल्याचे दिसून येते. अशा प्रकारे विविध दृष्टिकोनातून ‘संस्कृती’ शब्दाचा वेगवेगळ्या अर्थाने उपयोग करण्यात येतो. त्यामुळे या शब्दाची अर्थनिश्चिती करणे किंवा संस्कृतीची एकच एक व्याख्या सांगणे, हे काम मोठे कठीण आहे. अशा वेळी शब्दाच्या व्युत्पत्तीकडून अर्थाकडे जाणे, हे श्रेयस्कर ठरते.

..................................................................................................................................................................

आंबेडकरांना सहन करावा लागलेला विकृत व अविचारी वैरभाव या व्यंगचित्रांमधून उघड होतो. त्याचबरोबर ऐतिहासिक अन्याय सहन केलेल्या आंबेडकरांचं वास्तविक चरित्रही उजेडात येतं.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये खरेदीसाठी करण्यासाठी क्लिक करा - 

https://www.booksnama.com/book/5282/Hasanyawari-Neu-Naka

..................................................................................................................................................................

संस्कृतीची दोन अंगे

मनुष्यसमूहाने आपली जीवितयात्रा सुखाची होण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा, प्रकाश, आरोग्य, स्वसंरक्षण आणि रंजन या बाबतीत अनेक सुखसाधने शोधून काढली आणि विविध खाद्ये, वस्त्रप्रावरणे, घरेदारे, रस्ते-बागा, औषधे नि हत्यारे व करमणूक-साधने यांची निर्मिती केली. त्यामुळे माणसांचे ऐहिक जीवन ज्या सुखसोयींनी संपन्न नि समृद्ध झाले आहे, त्या सुखसोयी म्हणजेच माणसांनी निर्मिलेले पदार्थमय जग, हे संस्कृतीचे भौतिक अंग होय. माणसाच्या अंत:करणातील स्वाभाविक सुखवासना व स्वार्थबुद्धी आणि तज्जन्य दुर्गुण (मत्सर, द्वेष, आळस, क्रौर्य इ.) यांना नियंत्रित करण्यासाठी वा त्यांवर विजय मिळवण्यासाठी माणसांनी निर्माण केलेल्या पाप-पुण्य, स्वर्ग-नरकादी धर्मकल्पना, नीतिनियम, कायदेकानू, विद्या-कला-साहित्य-तत्त्वज्ञान आणि शिष्टाचार इत्यादी मानवनिर्मित कल्पनामय जग, हे संस्कृतीचे आध्यात्मिक अंग. समाजातील चालीरीती, आचारपरंपरा, सामाजिक संस्था, समजुती, श्रद्धा, मूल्ये, निष्ठा व मानदंड या साऱ्यांचा समावेश संस्कृतीच्या या आध्यात्मिक अंगामध्ये होतो. Civilization म्हणजे भौतिक अंगाची सुधारणा आणि Culture (किंवा संस्कृती) म्हणजे मानवी जीवनातील आध्यात्मिक अंगाची सुधारणा किंवा मानसिक उन्नती होय. या दोन्ही अंगांनी मानवी जीवन परिपूर्ण होते.

संस्कृतीची व्याख्या

संस्कृतीच्या विविध अंगांची ओळख करून घेतल्यावर आता तिच्या व्याख्येसंबंधी आपण काही विचार करू शकू. ‘संस्कृती म्हणजे मानसिक उन्नतीचा दर्शक असा जीवनक्रम किंवा आदर्श वर्तनपद्धती.’ ही व्याख्या व्यक्तिगत स्वरूपाची असून सुसंस्कृत मनुष्य कोण हे ठरवताना या व्याख्येचा आधार सर्वसाधारण व्यवहारात घेतला जातो. “उच्च ध्येयवाद व तदनुसाराने आवश्यक असलेली जीवनपद्धती, असे वरील व्याख्येचे सार सांगता येईल.” (वैदिक संस्कृतीचा विकास, पान ५) परंतु इतिहास व समाजशास्त्र यांच्यातील तात्त्विक विवेचनात ‘संस्कृति’ शब्द व्यापक अर्थाने वापरला जातो. त्या दृष्टीने “मनुष्य व्यक्तिश: व समुदायश: जी जीवनपद्धती निर्माण करतो आणि जीवनसाफल्यार्थ स्वत:वर व बाह्य विश्वावर संस्कार करून जे आविष्कार करतो, ती पद्धती वा तो आविष्कार संस्कृती होय”, ही तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची व्याख्या प्रमाण धरून चालता येईल. मात्र इतिहासाच्या दृष्टीने पाहता या व्याख्येत स्थलकालाची दखल घेतलेली दिसत नाही. म्हणून ‘संस्कारपूर्ण व संस्कारमय जीवन जगण्याची देशकालविशिष्ट रीत (जीवनपद्धती व जीवनमूल्ये) म्हणजे संस्कृती’ ही डॉ. इरावती कर्वे यांनी दिलेली व्याख्या डोळ्यांपुढे ठेवून संस्कृतीचे स्वरूप समजावून घेऊ या.

‘संस्कृती’ हे मानवाचेच वैशिष्ट्य

पहिली महत्त्वाची गोष्ट ही की, संस्कृती ही मानवनिर्मित गोष्ट आहे. पशुपक्ष्यांचे जीवन पिढ्यानपिढ्या एकाच तऱ्हेने ठराविक चाकोरीतून चाललेले असते. त्यांच्या जीवनात बदल नसतो, की नवनिर्मिती नसते. मुंग्या, मधमाशा व पक्षी निसर्गातील काही वस्तूंचा उपयोग करून आपल्या वस्तीची स्थाने तयार करत असतात. परंतु पशू किंवा मनुष्येतर प्राणी सर्व निसर्गाचा उत्पादनसाधन म्हणून उपयोग करू शकत नाही. अत्यल्प असे संस्कारित जीवन पशुपक्ष्यांमध्येही असते; परंतु ते संस्कारही नैसर्गिकच असतात. तर्कबुद्धी, कल्पनाशक्ती व स्मृती यांच्या अभावी मानवाप्रमाणे ज्ञानाचा संचय वा संक्रमण करणे या गोष्टी त्यांना करता येत नाहीत. त्यामुळे वारूळ बांधणे, घरटे तयार करणे किंवा किडा, मुंगी, उंदीर असे खाद्य मिळवणे याबाबत पशुपक्ष्यांच्या दर पिढीला नवाच अनुभव पैदा करावा लागतो आणि निसर्गाशी जुळते घेऊनच पशुपक्ष्यांना जगावे लागते. निसर्ग किंवा पृथ्वी यांच्यात बदल घडवून आणणे त्यांना शक्य नसते. तसेच नैसर्गिक साधने वा सामर्थ्य यांत ती वाढ करू शकत नाहीत.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

मनुष्य हे सारे करू शकतो. तो सृष्टीचे रूप बदलू शकतो. आपल्या इंद्रियांचे सामर्थ्य वाढवू शकतो. आपल्या अनुभवाचा, ज्ञानाचा संचय करून भाषेच्या द्वारा व प्रत्यक्ष कृतीच्या द्वारा पुढील पिढीला तो अनुभव, ते ज्ञान मनुष्य संक्रमित करू शकतो. सृष्टीला नमवण्याची ही प्रवृत्तीच सर्व वस्तुरूप संस्कृतीची निर्माती आहे. मनुष्याने निर्मिलेली ही सारी वस्तुरूप संस्कृती म्हणजे निसर्गावरील मानवी विजयाची गाथाच होय. जीवनाचे वास्तव स्वरूप विशद करून ‘जगणे’ सुकर करण्यासाठी माणसाच्या बुद्धीने जी खटपट केली, जे विविध प्रयोग केले त्यातून भौतिक शास्त्रांची निर्मिती झाली. या शास्त्रज्ञानाच्या बळावर माणसाने अधिकाधिक सुखसोयी निर्माण करून आपले जीवन समृद्ध नि संपन्न केले आहे. या बाबतीत पाश्चात्य संस्कृती आशियातील देशांच्या मानाने कितीतरी पुढे आहे, यात शंका नाही. म्हणूनच तिला ‘भौतिकवादी’ म्हणतात. परंतु तिच्यातही आध्यात्मिक भाग आहेच.

संस्कृतीच्या आधात्मिक भागातही निसर्गावर विजय मिळवण्याची धडपड माणसाला करावी लागतेच. मनाच्या नैसर्गिक प्रवृत्तींवर नियंत्रण ठेवूनच माणसाला निरनिराळ्या सामाजिक संस्था निर्माण करता आल्या आणि घर, कुटुंब, विवाह, वर्ण, जात, वर्ग इत्यादी संस्थांच्या द्वाराच मनुष्य रानटी अवस्थेतून संस्कृतीच्या उच्चतम अवस्थेपर्यंतचा पल्ला गाठू शकला, अशी आजपर्यंतच्या इतिहासाची साक्ष आहे. स्त्री-पुरुषांना परस्परांविषयी आकर्षण वाटणे ही नैसर्गिक प्रवृत्ती होय. त्या प्रवृत्तीवर संस्कार करून पति-पत्नींमधील दृढ प्रीती हे मूल्य आणि त्या प्रीतीच्या आविष्काराला देशकालानुरूप योग्य ठरेल अशी विवाहसंस्था नि कुटुंबसंस्था माणसाने निर्माण केली; ही माणसाची आध्यात्मिक कामगिरीच होय. धर्म, नीती, कला यासंबंधीची उच्चतम मूल्ये जीवनसंग्रामात गढलेल्या माणसांनीच स्वप्रयत्नाने शोधून काढली आहेत. ‘हा मूल्यस्थापनांचा इतिहास म्हणजे मानवजातीच्या आध्यात्मिक संस्कृतीचा इतिहास होय.’ संस्कृतीचे हे अंगही मानवनिर्मितच आहे. संस्कृती ही गोष्ट मानवनिर्मितच असल्याने ‘मानवी संस्कृती’ ही संज्ञा निरर्थकच म्हणावी लागेल.

संस्कृतींची अनेकता

संस्कृतीच्या निर्मितीपाठीमागची सुखप्रेरणा ही जरी वैयक्तिक असली तरी तिची निर्मिती मात्र सामूहिक प्रयत्नाने होत असते. इतकेच नव्हे तर, संस्कृतीचा उपभोगही सामूहिक तऱ्हेने मनुष्य घेत असतो. निर्मिती आणि उपभोग या दोन्ही दृष्टींनी संस्कृती ही स्थलकालविशिष्ट अशा समाजाची असते. म्हणूनच “कोणत्याही मानव-समाजाने (एकट्यादुकट्या मानवाने किंवा एखाद्या महामानवाने नव्हे) निर्माण केलेली देशकालविशिष्ट जीवनपद्धती म्हणजे संस्कृती” अशी संस्कृतीची व्याख्या आपण करतो. देशकालपरिस्थितिभिन्नत्वाने पृथ्वीच्या पाठीवर भिन्न भिन्न समाज नांदत असल्याने संस्कृतींची विविधता दृष्टोत्पत्तीस येते. देशकालसमाजपरत्वे जीवनोपयोगी लहानसहान वस्तूंपासून आध्यात्मिक विचारांपर्यंत सर्वत्र भिन्न भिन्न प्रकारची निर्मिती आढळते. त्यामुळे संस्कृतींची अनेकता किंवा जगातील संस्कृतिवैचित्र्य ही वस्तुस्थिती मान्य करावी लागते. अनेकत्व नाकारून संस्कृतीच्या एकत्वाने स्वप्न पाहण्यात आज तरी काही तथ्य नाही.

संस्कृती म्हणजे संस्कार परंपरा

आणखी एका दृष्टीने संस्कृतींचे अनेकत्व आपणांस मान्य करावे लागते. संस्कृती ही नेहमी परंपरागत असते. परंपरा दोन प्रकारच्या आहेत : शारीर परंपरा आणि साहचर्य परंपरा. पशुपक्ष्यांना शारीर परंपरेने आई-बापाप्रमाणे शरीररचना व क्रियासामर्थ्य लाभते, पण त्यांच्यात साहचर्य परंपरा नसते. म्हणून पशुपक्ष्यांना नैसर्गिक जीवन आहे, पण संस्कृती नाही. गाय, मांजर यांसारख्या माणसाळलेल्या प्राण्यांमध्ये किंवा हत्ती, माकड यांसारख्या मानवसदृश बुद्धी लाभलेल्या प्राण्यांमध्ये दोन पिढ्यांत बरेच साहचर्य घडते. मांजराचे पिलू किंवा गाईचे वासरू जन्मते शारीर परंपरेप्रमाणे, पण आईच्या सहवासाने ते बऱ्याच गोष्टी शिकते. ही अत्यल्प अशी संस्कृतीची सुरुवात होय. माणसाच्या बाबतीतही अंगयष्टी, रंगरूप व काही गुणदोष शारीर परंपरेने येतात; पण जीवनाचे सर्व व्यवहार वडील पिढीकडून त्याला शिकावे लागतात. माणसाला दोन-तीन पिढ्यांचे साहचर्य बराच काळ मिळते. माता-पित्यांच्या छत्राखाली त्याचे संरक्षण होते, त्याबरोबरच ज्ञानानुभवाचे संक्रमणही होत राहते. खाणे-पिणे, बोलणे-वागणे, पोषाख नि अलंकार, आचार-विचार, श्रद्धा-समजुती, सणवार, व्रत-वैकल्ये, बऱ्यावाईटाच्या नि पापपुण्याच्या कल्पना, कलात्मक अभिरुची इत्यादी अनेकविध गोष्टींचे संस्कार घर, शाळा-कॉलेजे आणि इतर सामाजिक संस्था यांच्याद्वारा अगदी लहानपणापासून मनुष्याच्या मनावर होत राहतात. या संस्कार-परंपरेलाच संस्कृती म्हणतात.

मनुष्य ज्या देशात, प्रांतात, समाजात जन्मतो, वाढतो तेथली सामाजिक वा राष्ट्रीय संस्कृतीच तो आत्मसात करत असतो. अशा प्रकारे प्रत्येक पिढीला पूर्व पिढ्यांनी निर्माण केलेली जीवनपद्धती व जीवनमूल्ये परंपरेच्या रूपाने मिळत असतात. पूर्वजांच्या ठेवीचा हा सामाजिक वारसा म्हणजे संस्कृती होय. प्रत्येक देशातील समाजाच्या आचारविचारांची परंपरा भिन्न भिन्न प्रकारे वैशिष्ट्यपूर्ण असते. देशकाल-परिस्थितिभिन्नत्वामुळे परंपराभिन्नत्व आणि परंपराभिन्नत्वामुळे संस्कृतीचे अनेकत्व सिद्ध होते. मानव म्हणून आपणा सर्वांमध्ये बऱ्याच बाबतीत सारखेपणा असला तरी पाश्चात्य वा पौरस्त्य किंवा युरोपीय आणि भारतीय म्हणून अनेक गोष्टींत वेगवेगळेपणा जाणवतो; म्हणून युरोपीय व भारतीय संस्कृतींचे पृथकत्व मान्य करावे लागते. तीच गोष्ट भारतीयत्वाची आणि महाराष्ट्रीयत्वाची. पाश्चात्यांच्या किंवा आशियाई देशांच्या संदर्भात आपण जरूर भारतीय संस्कृतीचे आहोत, परंतु भारतीय असूनही आपल्यांत महाराष्ट्रीय, गुजराती, कर्नाटकी, आसामी, बंगाली असा प्रांतपरत्वे वेगळेपणा आहे. हा वेगळेपणा परंपरांचा आहे; म्हणजेच संस्कृतींचा आहे. म्हणून तर या ग्रंथांत ‘महाराष्ट्र संस्कृती’च्या वैशिष्ट्यांचा शोध आपण घेणार आहोत.

..................................................................................................................................................................

‘खिंडीत’ : शैक्षणिक जगताच्या अंतरंगाची विरूपता भेदकपणे उलगडणाऱ्या कथा

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5254/Khindit

..................................................................................................................................................................

कोणत्याही संस्कृतीची वैशिष्ट्ये त्या समाजाच्या इतिहासातूनच व्यक्त झालेली असतात. मात्र केवळ राजकीय इतिहासाच्या अभ्यासाने त्यांचा उलगडा होत नाही. संस्कृतीच्या अंगभूत असलेल्या विविध घटकांच्या ऐतिहासिक अभ्यासानेच राष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाची सिद्धता होते. ‘सांस्कृतिक इतिहास म्हणजे राष्ट्राचा आत्मिक वा मानसिक इतिहास होय.’ (प्रा. शं. दा. पेंडसे) समाजाचे अंतरंग नानाविध स्वरूपात आविष्कृत झालेले असते. समाजाचे आर्थिक, राजकीय, सामाजिक व धार्मिक जीवन, त्याचे तत्त्वज्ञान, त्याच्या नीतिविषयक कल्पना, शिक्षणपद्धती, वाङ्मयसंपदा व कलासृष्टी ही संस्कृतीची प्रमुख अंगे होत. त्या त्या क्षेत्रातील वैचारिक व प्रात्यक्षिक कामगिरीचा आढावा घेऊन त्या त्या देशाची संस्कृती जाणून घेता येते. संस्कृतीमध्ये अंतर्भूत होणाऱ्या सर्व घटकांचा एकत्रित उल्लेख या दृष्टीने पुढील तीन-चार व्याख्या लक्षात घेण्याजोग्या आहेत.

१) प्रा. क्रेच यांनी ‘संस्कृती’ शब्दाची पुढील व्याख्या केली आहे - “एखाद्या समाजाने आपल्या लोकांचे जीवनविषयक प्रश्न सोडवण्यासाठी जी एक विशिष्ट वस्तुरूप व वर्तनरूप परंपरा निर्माण केलेली असते, तिला ‘संस्कृती’ म्हणतात. प्रत्येक संस्कृतीला आपला एक घाट असतो. एखाद्या समाजाने निर्माण केलेल्या विविध संस्था व त्यांत ध्वनित झालेल्या त्या समाजाच्या समजुती, मूल्ये, मानदंड व जीवनविषयक गृहीतके यांचा संस्कृतीमध्ये अंतर्भाव होतो.”

२) सामाजिक शास्त्रे व तत्त्वज्ञान या विषयांची ज्ञानकोशात दिलेली Taylor यांची व्याख्या घटकांच्या नामनिर्देशाने सुस्पष्ट व सर्वसमावेशक झाली आहे. ते लिहितात -

"Culture or Civilization is that complex whole which includes knowledge belief, art, morals, law, customs and any other capabilities and habits acquired by man as a member of society." (Primitive Culture by E.B. Taylor).

3) संस्कृतीच्या विविध घटकांचा अभ्यास समाज घडणीच्या संदर्भात करण्याची जरुरी प्रतिपादन करताना रॅडक्लिफ् ब्राऊनही त्या घटकांचा स्पष्ट उल्लेख करतात. कसा तो पाहा - "All kinds of social phenomena - morals, law, etiquette, religion, government, economics, education, language-need to be studied not in abstraction or isolation, but in their direct and indirect relations to social sturcture i.e. with reference to the way in which they depend upon or affect the social relations between persons and groups of persons."

४) संस्कृतीच्या अभ्यासात काय काय येते, याचा थोडक्यात निर्देश पुढील व्याख्येतही आला आहे. ‘Culture is sum total of a people's institutions, customs and arts. It is an expression of man's relations with Nature, God, Men and Institutions.''

अमेरिकन मानवजातिशास्त्रज्ञ फ्रांझ बोस् यांनी अशाच प्रकारे संस्कृतीच्या तीन बाजू सांगितल्या आहेत. माणसे व समाजसंस्था या दोन्ही गोष्टी ते एकात धरतात आणि ईश्वरसंबंधात धार्मिकतेबरोबर इतर मूल्यांचाही समावेश करतात एवढाच फरक.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

सारांश, निसर्ग, माणसे, समाजसंस्था आणि ईश्वरविषयक कल्पना या चार गोष्टींशी माणसाचा विविध प्रकारे संबंध येतो. त्या सर्व संबंधांचा विचार संस्कृतीमध्ये अंतर्भूत होतो. विशिष्ट संस्कृतीच्या लोकांचे वास्तव्य असलेला भूप्रदेश व त्याची भौगोलिक वैशिष्ट्ये, त्या समाजातील लोकांचा पूर्वेतिहास किंवा वांशिक विशेष आणि निसर्गाच्या नियंत्रणाला आवश्यक असलेली भौतिक शास्त्रे किंवा विज्ञान इतक्यांचा समावेश ‘निसर्ग’ या शब्दात होईल. ‘माणसे’ या शब्दाने माणसामाणसांतील किंवा मनुष्य समूहासमूहातील परस्पर नाते-संबंधाचा बोध होतो. त्या दृष्टीने कुटुंब, वर्ण, जात आणि अनेक सामाजिक गट यांचा विचार आवश्यक ठरतो. माणसांनी निर्माण केलेल्या सामाजिक संस्था - राजकीय, धार्मिक, औद्योगिक किंवा व्यावसायिक संघटना, चालीरीती, रूढी, पंथ, संप्रदाय यांच्यामुळेच मानवी जीवन प्रगत होते, अगर त्या संस्था कालबाह्य झाल्या की, विकासाच्या मार्गात त्या अडथळा होऊन बसतात, तेव्हा माणसांना स्वनिर्मित संस्थांच्या विरुद्ध बंड उभारावे लागते. नव्या प्रथा, नव्या संस्था निर्माण कराव्या लागतात. परंपरा बदलाव्या लागतात. या घटनांचे स्वरूप कधी सुधारणांचे असते, तर कधी क्रांतीचे असते. निसर्ग, माणूस, संस्था यांच्या परस्पर संबंधाबाबत मनुष्याच्या मनात वेळोवेळी विशिष्ट प्रकारच्या बौद्धिक व भावनात्मक प्रतिक्रिया उत्पन्न होत असतात. त्यांचे वैचारिक दृढीकरण झाले की, त्यांना मूल्यांचे ध्येयरूप मानदंडांचे स्वरूप प्राप्त होते. यातच धार्मिक, नैतिक व सौंदर्यविषयक मूल्य कल्पनांचा समावेश होतो. तत्त्वज्ञान, नीतिशास्त्र व साहित्य-कला यांची शास्त्रे यांच्याकडून या मूल्यांचा परामर्श घेतला जातो. म्हणून त्या मूल्यांचा व तत्संबंधीच्या शास्त्रांचा संस्कृतीच्या अभ्यासात जरूर विचार करावा लागतो. अशा प्रकारे विविध ज्ञानक्षेत्रांशी आणि कार्यक्षेत्रांशी संस्कृतीच्या अभ्यासकाचा संबंध येतो.

..................................................................................................................................................................

‘महाराष्ट्र संस्कृती : घडण आणि विकास’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5283/Maharashtra-Sanskruti-Ghadan-ani-vikas

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......