डिसेंबर २०१८चा बाराशिव साहित्य पुरस्कार प्रफुल्ल शिलेदार यांच्या ‘पायी चालणार’ या कवितासंग्रहाला प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते देण्यात आला. त्या वेळी त्यांनी केलेलं हे भाषण…
..................................................................................................................................................................
मित्रहो, बाराशिव पुरस्कार वितरणाच्या निमित्ताने दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा मी तुमच्यासमोर उभा आहे. बाराशिवला येणं आणि कवितेवर बोलणं या दोन्ही आवडीच्या गोष्टी असल्यामुळे फारसे आढेवेढे न घेता मी हे निमंत्रण स्वीकारलं. मागच्या वेळी दिनकर मनवर यांच्या कवितेविषयी बोललो होतो. या वेळी मला प्रफुल्ल शिलेदार यांच्या कवितेविषयी बोलायचं आहे. शिलेदार हे माझे आवडते कवी आहेत आणि त्यांचे दोन्ही संग्रह मी विकत घेऊन वाचलेले आहेत.
मित्रहो, शिलेदार हे केवळ कवी नाहीत तर मराठी वाङ्मय व्यवहारात गंभीरपणे आपल्या भूमिका पार पाडणारे ते वाङ्मयकर्मी आहेत. ते उत्तम अनुवादक आणि उत्तम संपादक आहेत. त्यांनी अनुवादित केलेल्या विनोदकुमार शुक्ल यांच्या अनेक कविता मला पाठ आहेत. अलीकडेच त्यांनी अनुवादित केलेला ज्ञानेंद्रपती यांचा ‘संशयात्मा’ हा एक मोठा आणि महत्त्वाचा कवितासंग्रह साहित्य अकादमीने प्रकाशित केलेला आहे. तोही माझा आवडता कवितासंग्रह आहे. अनेक हिंदी-इंग्रजीतल्या चांगल्या कवितांचे त्यांनी अनुवाद केलेले आहेत. शिवाय कवींवर त्यांनी लिहिलेली टिपणंही मला फार आवडतात.
मित्रहो, शिलेदार जसे उत्तम अनुवादक आहेत, तशीच त्यांनी काही महत्त्वाची संपादनंही केलेली आहेत. दिवंगत कवी-मित्र भुजंग मेश्राम यांच्या समीक्षालेखांचं एक महत्त्वपूर्ण संपादन त्यांनी केलेलं आहे. शिवाय ‘युगवाणी’सारख्या सकस वाङ्मयीन नियतकालिकाचं संपादनही ते करतात. मी आणि माझी कविता अशा वर्तुळात न गुंतता निर्मळ वाङ्मय व्यवहारासाठी जे जे करणं आवश्यक आहे, ते ते ते आनंदानं करतात.
मित्रहो, नवीन कवी आणि त्यांच्या कवितेची मला जरा भीतीच वाटते. मारक्या म्हशीसारखे ते कायम तुंबलेले असतात. शिलेदारांची कविता नवी आणि अत्याधुनिक असूनही ती तशी नाही. ती दुधाळ, मायाळू गायीसारखी आहे. ती तुम्हाला जवळ घेते आणि भरपूर काही देते. अशा कवितेचे आपण कायम कृतज्ञ असतो. त्या कृतज्ञतेचा भाग म्हणूनच तुम्ही त्यांना या वर्षीचा बाराशिव पुरस्कार दिलेला आहे. अशाच कारणासाठी याआधी तुम्ही दिनकर मनवर यांच्या कवितेला पुरस्कृत केलेलं होतं.
मित्रहो, ज्या पुस्तकाला तुम्ही हा पुरस्कार दिलाय त्याचं नाव आहे – ‘पायी चालणार’. शीर्षकापासूनच हे पुस्तक मला माझं आत्मचरित्र वाटायला लागलं. कारण नोकरीला लागल्यानंतर २५ वर्षं माझ्याकडं वाहन नव्हतं. घरापासूनच नोकरीचं ठिकाण तीन किलोमीटर होतं. मी पायीच जायचो-यायचो. शिवाय लहाणपणी गावात शाळा नसल्यामुळे सगळं शिक्षण पाच किलोमीटर रोज जाऊन-येऊनच झालेलं होतं. त्यामुळे पायी चालण्यातला आनंद आणि पायी चालणाऱ्याची मानसिकता मी चांगला जाणून आहे. आजही मी पायी चालण्यातला आनंद मनसोक्त घेतो. म्हणून शीर्षक वाचताच मला ही कविता माझी वाटायला लागली.
.................................................................................................................................................................
हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5255/Srujan-Sanwad-bhag-1-ani-bhag-2
..................................................................................................................................................................
मित्रहो, या पुस्तकाचं मुखपृष्ठही मोठं अन्वर्थक आहे. चित्रकार मित्र सरदार जाधव यांनी सगळ्या पशू-पक्ष्यांच्या पावलांचे शुभ्र आणि नक्षीदार ठसे सर्वत्र दाखवून मानवी पावलाचा फताडा, काळा ठसा त्यांच्यावर चाल करताना दाखवलाय. माणसानं नेहमीच सृष्टीवर आक्रमण करून तिच्यातली स्वाभाविकता नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. ते सगळं सरदारनं मुखपृष्ठावर नेमकेपणानं दाखवलं आहे. पर्यावरण संरक्षण हा या कवितांच्या घटकाचा नेमका गाभा चित्रकारानं मुखपृष्ठावर पकडला आहे. पायी चालणाऱ्याची भूमिका उद्देशिकेसारखी पहिल्याच पानावर टाकली आहे. त्यातून पायी चालणाऱ्याचं थोरपण प्रतिबिंबित होतं –
जमिनीशी नातं जपणारा प्रत्येक जण
पृथ्वीचा खेळखंडोबा करण्याविरुद्ध
पायी चालत असतो.
संग्रहातली पहिलीच कविता जगातून नष्ट होत चाललेल्या चांगुलपणाच्या खुणा शोधणारी आहे. आणि शेवटी या कवितेत कवीनं प्रश्न विचारला आहे – ‘दोन हातात मावेल एवढीच पृथ्वी, हिरवेपण तोलणारे तळवे कुठं आहेत?’ या पार्श्वभूमीवर पुढच्याच कवितेत जगताना अवघडून टाकणाऱ्या प्रश्नांची यादी कवी देत जातो. ‘कधीच नव्हते सोपे या पृथ्वीवर जगणे’ हा त्याचा निष्कर्ष आहे.
‘पण कुठलाच माणूस’ या कवितेत बधीर झालेल्या, संवेदनशीलता हरवलेल्या माणसावर भाष्य येतं. जगात रोजच जराजर्जर, मृत्यू दिसत असताना कुणीही बुद्ध होत नाही ही खंतही व्यक्त होते. कवीला बुद्धाची संवेदनशीलता इथं अपेक्षित आहे. ‘राहू देत कित्येकांना सोबत’ या कवितेत निसर्गाच्या कलानं जगणाऱ्या माणसाची गोष्ट येते. तो किड्यामुंग्यांना आणि डासाचिलटांच्याही जगण्याचा हक्क मान्य करतो. ‘उंचावरच्या खिडकीत’ या कवितेत चिमणी घरटं बांधताना काडीकचरा वेचून तिच्या पिलाच्या स्वागतासाठी आपला खोपा करून तयार असते. पण माणूस मात्र तिला मारण्यासाठी काठी घेऊन उभा असतो. आणि हे सगळं निरागस डोळ्यांची मुलगी पाहत असते. निरागस मुलगी, निसर्गाला मदत करणारा काडीकचरा आणि निसर्गविरोधी माणूस, असं विरोधाभासी चित्र कवी निर्माण करतो. ‘वापरून गुळगुळीत’ या कवितेत पावसाच्या आगमनानिमित्त त्याच्याशी केलेला सुखसुंवाद कवीच्या मनातील निसर्गाची ओढ प्रकट करतो. ‘चालढकल’ या कवितेत सृष्टीशी बलात्काऱ्यासारखा धसमुसळेपणा करणाऱ्या निर्लज्ज माणसाला शरमिंदं करणारे उपहासात्मक बोल कवी बोलतो.
‘मुंगी’ आणि ‘रस्ते कसे’ या कवितेत मोठी धरणं आणि मोठे रस्ते यांच्याविरोधी सूर येतो. एकूण काय तर निसर्गाला चिरडून काहीही करण्याला कवीचा विरोध आहे. मुंगी धरण फुटण्याची वार्ता ओरडून सांगते. पण तिच्या नगण्य अस्तित्वासारखंच तिचं म्हणणंही नगण्य समजलं जातं. या कवितेतला ‘मी’ म्हणजे तुम्ही-आम्ही सगळे आणि या कवितेतली मुंगी म्हणजे ‘मेधा पाटकर’. पर्यावरण आणि आदिवासींना वाचवण्यासाठी मोठ्या धरणाला त्या प्राणपणाने विरोध करतात. अशी धरणं म्हणजे पर्यायानं पर्यावरण आणि आपणाला संपवणारी असतात. ‘रस्ते कसे’ कवितेत कवी लिहितो –
अंथरले शेतामधून
काळे शार गालीचे
शेवर्ली व्होक्सवॅगन
बीएमडब्ल्यू आल्यायत
हवेत चालायच्यात
अंगावर घालायच्यात
रस्ते कसे
टकाटक हवेत
निसर्ग आणि सामान्य माणसाला होणाऱ्या प्रत्येक विरोधाला कवीचा विरोध आहे.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
‘वाघ’ कवितेतला वाघ होऊन जगण्यातल्या अडचणी समजून घेत स्वत:तलं वाघपण विसरणारा वाघ म्हणजे आधुनिक माणूसच आहे. ज्याला सतत अडचणींशी तडजोडी करत जगावं लागतं. त्यापुढच्या ‘एकटाच आहे’ या कवितेत सतत पोज घेत जगण्याचा कंटाळा येऊन सामान्य जगण्याचाही अभिनय करावा लागण्याची वेळ आजच्या माणसावर कशी आलेली आहे, ते येतं. पुढच्या एका कवितेत समाजात वाढत असलेल्या टोकाच्या कडवटपणामुळे समाजाला येणाऱ्या पंगुत्वाची कवीला चिंता वाटते. खरं खरं खिंकाळल्यावर सत्तेवर सत्याचा शहारा उमटवणारा दुर्मीळ घोडाही शिलेदारांच्या एका कवितेत येतो. इतर अनेक कवितांतून सद्य परिस्थितीतल्या हिंसेवर भाष्य येतं. जात, धर्म, देश, भाषेच्या दुराभिमानाला बळी गेलेल्यांचे निनावी संदर्भ येतात. एका कवितेत शिलेदार लिहितात –
इथली मातीही संथपणे धुमसते आहे
तिच्या आचेवर भाकरी भाजून घेत आहातच आज
पण राखेतून पीक काढणं
मुश्किल होणार आहे पुढं
‘जादुई वास्तव’, ‘कादंबरीत डोकावलो’, ‘आपल्या भाषेत’ या कविता म्हणजे कवीच्या वाचननोंदी आहेत; तर ‘भेट’ ही कविता कविमित्र भुगंज मेश्राम याच्या शेवटच्या भेटीवर आधारीत आहे. कवीची कविता म्हणजे कवीला चिरंतन करणारं पिरॅमिड, कवी मेला तरी कवितेत तो शाबूत असतो, असं शिलेदारांना वाटतं. कवितांची अक्षरं म्हणजे काळे किडे. कवीचं काळीज कुरतडून बाहेर येणारे हे काळे किडे रसिकांसाठी मात्र काळीजखुणा असतात, असंही शिलेदारांना वाटतं. इथं मर्ढेकरांची ‘काळ्यावरती जरा पांढरे’ ही ओळ आठवून जाते.
‘चूळबूळ’ या कवितेत निर्मिती, पुनर्लेखन, निराशा, विषयांतर या कविता लिहिण्याच्या अवस्था येतात. ‘कविता हसत हसत’ ही कवीच्या केविलवाण्या अवस्थेची कविता आहे. निर्मितीसाठी आतुर पण कवितेचा क्षण पकडता न येणारं कवीचं मन इथं दिसतं. कवीला वरायला आलेली पण त्याची अवस्था पाहून हसत हसत परत निघालेली कविता इथं दिसते. सावकाशीचा अवकाश मागणाऱ्या कवितेची कवी, प्रकाशक, संपादक, गायक, समीक्षक या सगळ्यांनी अति घाई केल्यामुळे होणारी कुत्तरओढ ‘घाई’ कवितेत येते.
‘कवीला पडलेलं पुस्तक प्रकाशनाविषयी दु:स्वप्न’ या एका कवितेचं हे शीर्षकच या कवितेचा सगळा आशय सांगून जातं. हौसी कवीच्या कवितासंग्रहाचा प्रकाशनसमारंभ हे वाङ्मय व्यवहारातलं एक विडंबनच असतं. त्याचंच या कवितेत साक्षात्कारी दर्शन घडवलेलं आहे. माणूस समरसून काव्यमय जगतो, तेव्हा कविता लिहून ठेवायचं भानही त्याला राहत नाही. त्याचं जगणंच कवितामय झालेलं असतं, असा मागच्या कवितेच्या नेमका विरोधी विषय पुढच्या ‘लक्षच नाही’ या लहानशा कवितेत येतो. कारण अशा माणसाचं जगणंच कविता झालेलं असतं.
अनुवाद प्रक्रियेत प्रत्येक कवीच्या भूमिकेत शिरताना आपण कितीतरी समृद्ध होत जातो, याचा प्रत्यय देणारीही एक कविता शिलेदारांनी लिहिली आहे. कवितालेखनाची सजग, जीवघेणी प्रक्रिया ‘आणखी एक खर्डा’ या कवितेत येते. कविता लिहिण्यापेक्षा कविता जगण्यावर कवीचा जास्त भरवसा आहे. एका कवितेत ते लिहितात –
कविता लिहिण्यासारखी परिस्थिती
फक्त माझ्याच अवती-भवती नाही
प्रत्येकाच्याच भोवती हवी
मग कुणी कविता लिहिली नाही
तरी चालेल.
..................................................................................................................................................................
‘खिंडीत’ : शैक्षणिक जगताच्या अंतरंगाची विरूपता भेदकपणे उलगडणाऱ्या कथा
हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5254/Khindit
..................................................................................................................................................................
लिहून झालेल्या कवितेशी कवीचं नातं शोधणारीही एक (‘इथपर्यंत’) कविता शिलेदारांनी लिहिलेली आहे. सार्वजनिक शेणात पडणाऱ्या कवीच्या पायात आपलेही पाय असू नयेत म्हणून धडपणारा कवी एका (‘कवीचा आत्मा’) कवितेत दिसतो. या कवितेतला कवीचं बीभत्स रूप दर्शवणारा हा तुकडा –
कवितेची पोस्टरं अंगावर घेऊन मिरवणं
नखरेलपणे मंचावर चढणं
बाजाराचा वास घेऊन
झाकलेलं अंग उघडं करणं
आपल्यापासून सुट्या झालेल्या कवितेशी
अतिप्रसंग करत
वारंवार लोकांपुढे ओढत आणणं
टाळ्या पिटणाऱ्या जमावासमोर
शब्दांच्या कठपुतळ्या
कंबर लचकवत नाचवणं
पोट तट्ट भरलेलं असताना
तोंड वेंगाडत फिरणं
या साऱ्या शिताफीच्या गोष्टी
आपल्याही कन्फेशनचा भाग होऊ शकतात
या काळजीनं मी नखं कुरतडतोय
मित्रहो, अशा कितीतरी कवितांतून कवी, कविता, कवितेची निर्मितीप्रक्रिया हे विषय आलेले पहायला मिळतात.
शिलेदारांच्या कवितेत संगीतातल्या प्रतिमाही पाहायला मिळतात. त्याची काही कवितांतून येणारी ही उदाहरणं –
१.
चिरेबंदी वाड्यात शिरून
झुमऱ्यातील मल्हार सोहळा मी ऐकत राहतो
२.
भैरव, भटियार, भंखर
समान प्रेमानं गातो
३.
छोट्या खालाचा गज दिसताच
घट्ट धरून ठेवतो
‘बँडबाजा’ ही आख्खी कविताच संगीताच्या प्रतिमेतून येते. ‘पुरुषोत्तमदास’ ही एका संगीतप्रेमीवर लिहिलेली अप्रतिम कविता आहे. पुरुषोत्तमदास मला माझंच रूप वाटलं. मीही असंच संगीतावर प्रेम केलं आणि एकेका गाण्यासाठी वणवणलो. लाखो रुपये आणि लाखो तास त्यावर खर्च केले. त्यामुळे ही कविता मी पुन्हा पुन्हा वाचली. या कवितेतल्या माझं आत्मचरित्र सांगणाऱ्या या काही ओळी –
मुंबईपासून कलकत्त्यापर्यंत सगळे बाजार पालथे घातले
उन्हातान्हात हातात मिळालेल्या रेकॉर्डच्या
जडजुड पिशव्या घेऊन हिंडलो
भरपूर वेळ असणाऱ्या श्रीमंतांचा हा शौक
माझ्यासारख्या शेतकऱ्यानं जीव ओतून केला
चार चार दिवस पावसाची झड लागायची
तेव्हा रेकॉर्ड ऐकल्या
दुष्काळात पाण्याचा थेंब विहिरीत नसे
तेव्हा रेकॉर्डस ऐकल्या
पानगळ होताना काय अन नवती फुटताना काय
डोक्यात रेकॉर्डसच फिरत असायच्या.
‘माथेरान’, ‘सेवाग्राम’, ‘सूर्य बघायला’, ‘पुरुषोत्तमदास’ या कविता म्हणजे स्थळवर्णने आहेत. अर्थातच ती कवीनं केलेली स्थळवर्णनं असल्यामुळे इथं कमीत कमी तपशिलात अधिकाधिक संवेदना संप्रेषित केल्या जातात. ही एका अर्थानं कवितेतून केलेली प्रवासवर्णनं आहेत. या कविता वाचताना मला वसंत बापट यांच्या ‘प्रवासातल्या कविता’ आठवत गेल्या.
मित्रहो, मागे एक मुंगी येऊन गेली, पुढंही एका कवितेत सामान्य माणसाची प्रतिनिधी मुंगी येते. थेट कवी कविता लिहीत बसलेल्या टेबलावर कवीसमोरच्या पुस्तकावर तुरतुरते. कवीला वाटतं ही वाळवी, म्हणून तो हातातलं पेन उलटं करून तिला चिरडून टाकतो. आणि मग त्याचं चिंतन सुरू होतं- तोच या कवितेचा विषय. कुणीच दाद देत नाही म्हणून आपली तक्रार घेऊन ती कवितेत शिरायला आली असावी, या कल्पनेनं त्याला अपराधी वाटतं.
‘लेखकाच्या आत्मचरित्रातील पुस्तकविषयक काही नोंदी’ या शीर्षकासारख्या प्रदीर्घ असलेल्या या कवितेत मला पुन्हा माझं आत्मचरित्र दिसलं. यातल्या पुस्तकविषयक संवेदना आणि वेदनांशी मला माझं विलक्षण साम्य दिसलं. कवींसाठी पुस्तक ही त्याच्या आयुष्याची खोळ असते, शोभेसह सुरक्षितताही वाढवणारी.
.................................................................................................................................................................
विसंगती व सुसंगती समजून घेण्यासाठी उपयुक्त पुस्तक - वासंती दामले
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/4299/Madhyamvarg---ubha-adva-tirpa
.................................................................................................................................................................
‘पायी चालणार’ ही या संग्रहातली शीर्षक कविता. त्याविषयी मी आधी बोललोच आहे. त्या कवितेतल्या या ओळी –
पायी चालण्यानं हवाच काय
कुणाचं मनही कलुषित होत नाही
मीदेखील पायी चालतो निष्ठेनं
आणि पाऊल टाकण्यापूर्वी
जीवनाचे जडाव अंगाखांद्यावर सांभाळत
अधांतरी रिंगण धरणाऱ्या पृथ्वीला
विचारून घेतो
मायबाई, मी तुझ्या अंगावर
भार तर झालो नाही नाही?
अशी कृतज्ञताच माणसाला थोर आणि खऱ्या अर्थानं श्रीमंत बनवत असते.
.................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
‘जगातला सगळ्यात स्वादिष्ट पदार्थ’ ही कविता वाचताना माशांचा जीव घेण्यासाठी वापरली जाणारी तंत्रं पाहून अंगावर काटा येतो. जिभेचे चोचले पुरवण्यासाठी माणूस किती क्रूरपणे सृष्टीजीवाशी खेळतो हे पाहिलं की, आपण माणूस असल्याचीच किळस येते. ‘तेहतीस कोटी अपराध पोटात घालून’ या कवितेतल्या गायीनं पोटात घातलेले अपराध म्हणजे माणसाचं अनैसर्गिक वागणं आहे.
नदीच्या उगमासारखं सतत पाणी झरतंय आताशा
गाईच्या डोळ्याच्या कोपऱ्यातून
घोंगावणाऱ्या माशा शेपटीने हाकलत
तेहतीस कोटी अपराध पोटात घालून
गाय बसली आहे रस्त्याच्या मधोमध
तोंडात आलेली प्लॅस्टिकची कॅरीबॅग चघळत
भवसागर तरून जाण्याचं स्वप्न पाहत
या ओळी वाचल्या आणि ३५ वर्षांपूर्वी प्रथमच औरंगाबादमध्ये शिक्षणासाठी गेलो, तेव्हा पाहिलेलं असंच दृश्य आणि त्याविषयी लिहिलेल्या चार ओळी आठवल्या –
गुलमंडीवर गेलं तर
दिसतात कागदं खाणाऱ्या गाई
अरे आपण काय द्यावेत पोरींना धक्के
डोळ्यासमोर येते अर्धनग्न मायबाई
‘खूप माणूस होऊन जगायचंय’ ही शेवटची कविता आहे या संग्रहातली. ही एका अर्थानं प्रार्थना, पसायदानच आहे. ही कविता शेवटी टाकली त्या अर्थी कवीलाही तेच अपेक्षित आहे. ही कविता म्हणजे उत्तम पुरुषलक्षणांचीच यादी आहे. आपण उत्तम पुरुष होऊन जगावं ही कवीची आस आपल्या सगळ्यांची आस व्हावी, अशी प्रार्थना करून मित्रहो मी इथं थांबतो.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment