१६ डिसेंबर १९०२ रोजी लोकमान्य टिळकांनी ‘केसरी’मध्ये एक महत्त्वाचा अग्रलेख लिहिला. त्याचे नाव होते – ‘पाच्छाहीपणा का गुलामगिरी?’ ‘पाच्छाहीपणा’ हे ‘इम्पिरिअॅलिझम’चे टिळकांनी केलेले भाषांतर. ‘इम्पिरिअॅलिझम’चे आधुनिक मराठीमध्ये भाषांतर होईल – ‘साम्राज्यवाद’. विषय कुठलाही असो, सामाजिक राजकीय अथवा अजून कुठला; टिळकांच्या व्यक्तिमत्त्वाची तत्त्वज्ञानात्मक बैठक त्या लिखाणातून सतत प्रतीत होत राहते.
‘गीता’ हा टिळकांच्या सततच्या चिंतनातला विषय होता हे सर्वांनाच माहीत आहे. समोर आलेले प्रश्न वैयक्तिक असोत, सामाजिक असोत अथवा राजकीय असोत त्यांच्या विषयी विचार करताना; गीतेने मानवापुढे ठेवलेले शहाणपण टिळक कधी विसरत नाहीत. ‘गीता’ हा टिळकांसाठी एक दीपस्तंभ होता. गीतेने प्रदान केलेल्या भूमिकेतून टिळक हे सर्व जग बघतात. गीतेवर त्यांचा प्रगाढ विश्वास होता.
या अग्रलेखात त्यांनी मांडलेले विचार गीतेवर आधारलेले होते. टिळकांनी मांडलेले हे विचार किती दूरगामी होते; आणि टिळकांनी ज्या संकटाचा इशारा दिला होता, त्याच खाईत सगळे जग पुढच्या ६०-७० वर्षांच्या कालावधीत कसे पडले, हे बघण्यासारखे आहे.
टिळक सुरुवातीसच लिहितात की, साम्राज्यवादाच्या भुताने इंग्लंड देशास गिळून टाकले आहे. साम्राज्यवाद नक्की कुठल्या विचारांमाधून आसुरी रूप घेतो, हेसुद्धा टिळक स्पष्ट शब्दांत स्पष्ट करून सांगतात. ते म्हणतात – “इम्पिरिअॅलिझमचे थोडक्यात स्वरूप सांगायचे म्हणजे - आमच्या आंगात तुमच्यापेक्षा अधिक बळ आहे म्हणून तुम्ही आमचे वर्चस्व सर्वस्वी कबूल करून आमचे गुलाम बनून राहिले पाहिजे - अशा प्रकारची स्वतःच्या बलिष्ठपणाविषयींची आसुरी कल्पना होय.”
साम्राज्यवादाच्या सुरुवातीच्या काळात इंग्लंडमध्ये साम्राज्यवादाच्या विचारांमध्ये थोडासा मानवतावाद अध्याहृत होता. जिंकून घेतलेल्या राष्ट्रांत मानवतावादी सुधारणा घडवून आणण्याची इच्छा इंग्लंडच्या राज्यकर्त्यांमध्ये होती. पुढील काळामध्ये मानवतावादाचा प्रसार करण्याची ही मानसिकता बदलून गेली. तिची जागा एका मुजोर मानसिकतेने घेतली.
ही मानसिकता कशी आहे हे सांगताना टिळक लिहितात – “इंग्रज लोक हे जगाचे स्वामी, त्यांच्या सुखाकरितां उपभोग्य वस्तूंचा संग्रह म्हणून इतर देश परमेश्वराने निर्माण केले आहेत, व यामुळें या परमेश्वराच्या या लाडक्या लेकरांच्या बरोबरीचे हक्क इतर देशांतील लोकांस देणे हें आमच्या आकाशांतील बापाच्या इच्छेविरुद्ध आहे, अशा प्रकारच्या कल्पना हल्लीं हळू हळू इंग्रजी समाजांत पसरत चालल्या आहेत.”
..................................................................................................................................................................
हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये खरेदीसाठी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5282/Hasanyawari-Neu-Naka
..................................................................................................................................................................
ही नवी मानसिकता आसुरी कशी आहे हे विशद करण्यासाठी टिळक गीतेच्या सोळाव्या अध्यायची मदत घेतात.
इदमद्य मया लब्धमिमं प्राप्स्ये मनोरथम् ।
इदमस्तीदमपि मे भविष्यति पुनर्धनम् ।।१६/१३।।
असौ मया हत: शत्रुर्हनिष्ये चापरानपि ।
ईश्वरोऽहमहं भोगी सिद्धोऽहं बलवान्सुखी ।।१६/१४।।
आढ्योऽभिजनवानस्मि कोऽन्योऽस्ति सदृशो मया ।
यक्ष्ये दास्यामि मोदिष्य इत्यज्ञानविमोहिता: ।।१६/१५।।
गीतेचा सोळावा आध्याय आसुरी प्रवृत्तींबद्दल आहे. हा आसुरी प्रवृत्तींचा संदर्भ टिळक स्पष्ट करत नाहीत. त्यांना राजद्रोहासाठी १८९७ ते १८९९ तुरुंगवासाची सजा झाली होती. म्हणून इंग्रजांविषयी आणि इंग्रज सरकार विषयी लिहिताना ‘असु’र वगैरे विशेषणे ते टाळतात. याच कारणासाठी टिळक इथे १२ वा आणि १६ वा श्लोकदेखील देत नाहीत. आपण १२ ते १६ या श्लोकांचा अर्थ सलगपणे बघितला तर टिळकांना काय म्हणायचे आहे, हे जास्त स्पष्ट होते.
अनेक बंधनात (लोभांमध्ये) अडकल्यामुळे, आत्यंतिक क्रोध आणि वासनेच्या आहारी गेल्यामुळे, सुखांच्या हव्यासापोटी आणि त्यांच्या वासना तृप्त करण्यासाठी ते (असुर) अन्याय्य मार्गांनी संपत्ती गोळा करतात. ते सतत विचार करत राहातात - (गीता - १६/१२)
आज मला सुखाची ही गोष्ट मिळाली आणि उद्या मी ती गोष्ट मिळवेन. आज माझ्याकडे इतकी संपत्ती आहे आणि उद्या मी अजून संपत्ती मिळवेन. आज मी माझ्या एका शत्रूला मारले आहे आणि माझ्या इतरही शत्रूंना मी ठार मारेन. (१६/१३)
मी सार्वभौम आहे, मी लोकांचा राजा आहे, मी परिपूर्ण आहे, मी निपुण आहे, मी ताकदवान आहे, मी आनंदी आहे, मी भाग्यवान आहे, मी विशेषाधिकारी आहे, मी ह्या जगाचा भोग घेण्यासाठी जन्माला आलेलो आहे. (१६/१४)
मी श्रीमंत आहे, मी उच्च कुळात जन्माला आलेलो आहे. माझ्या सारखा या जगात कोण आहे? मी मिळवेन, मी व्यय करेन, मी आनंद घेईन. (१६/१५)
सोळाव्या श्लोकात श्रीकृष्ण सांगतात की, अशा रीतीने अहंगंडाने पछाडलेले, भ्रमित झालेले, वासनांचे व्यसन लागलेले, दिव्य पण चुकीची कर्मे करणारे, आपण जणू काही देवच आहोत, अशा विचारात अडकलेले लोक त्यांनी स्वतः तयार केलेल्या पापाच्या नरकात पडतात.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
साम्राज्यवादी व्यवस्था जी वाट चालते आहे, त्यामुळे सर्वनाश ओढवणार आहे, असे टिळक राजद्रोहाची आपत्ती टाळून जितक्या स्पष्टपणे सांगता येईल तितक्या स्पष्टपणे सांगत आहेत. इंग्रज समाजात ही प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे असे नमूद करून टिळक म्हणतात – “अशा प्रकारे इंग्रजी राष्ट्रांत हें गर्वाचे वारें भरलें आहे त्यामुळें इतर जिंकलेल्या राष्ट्रांचे किती नुकसान होणार आहे व त्यांना गुलामगिरीची स्थिति कशी येणार आहे, हें आमच्या वाचकांच्या सहज लक्षात येईल.” अधिकाराचा मद तयार झाला की, तो त्या सत्तेच्या नाशास कारण होतो. टिळकांचा तत्त्वावर विश्वास होता. इथे ब्रिटिश आहेत म्हणून फक्त टिळक या तत्त्वाचा आधार घेत आहेत असे नाही. पुढे एका लेखात ते उत्तर पेशवाईलासुद्धा हाच निकष लावतात.
त्यांच्या ‘स्वराज्य आणि सुराज्य’ (९ एप्रिल १९०७) या अग्रलेखात टिळक लिहितात – “राजे लोक अधिकारमदाने किंवा अन्य कारणांनीं अंध होऊन प्रजेच्या हिताकडे दुर्लक्ष करूं लागले किंवा जुलमी झाले म्हणजे स्वधर्मातील किंवा स्वदेशातील राजा असतांही त्यांचें राज्य लोकांस नकोसे होतें. पेशवाईच्या अखेरची स्थिती अशा प्रकारची होती, व म्हणूनच तेव्हां बाजीरावाचें राज्य जाऊन इंग्रजांचे राज्य झालें याचें लोकांस फारसे वाईट वाटले नाहीं.”
इंग्रजांच्या गर्वामुळे आणि लोभामुळे मोठ्या मोठ्या आपत्ती तयार होणार आहेत, आणि त्याचे दुष्परिणाम सगळ्या जगाला भोगावे लागणार आहेत असे टिळकांना सांगायचे आहे. तिसरे अफगाण युद्ध, पहिले महायुद्ध आणि दुसरे महायुद्ध अशी युद्धे पुढे याच मानसिकतेमुळे छेडली गेली.
टिळकांनी काळाची नस अचूक पकडली होती. साम्राज्यवादाच्या रोगाचे निदान त्यांनी अत्यंत अचुकपणे केले होते. साम्राज्यवादामागची आसुरी मानसिकता त्यांनी अत्यंत अचूकपणे अधोरेखित केली होती. या साम्राज्यवादातून आणि या आसुरीवृत्तीतून येणाऱ्या अरिष्टांविषयी भारतीय प्रजेला सावध देखील केले होते. साम्राज्यवादावरच्या या लेखात टिळक पुढे एक अत्यंत मोठा तात्त्विक विचार मांडतात. अधिकार आणि गुलामगिरी या गोष्टी वरवर बघितल्या असता परस्परविरोधी दिसतात. परंतु, सत्यामध्ये पाहू गेले असता त्या परस्परविरोधी नसतात. गुलाम जसा मालकाचा गुलाम असतो त्याचप्रमाणे मालकसुद्धा आपल्या गुलामाचा गुलाम बनलेला असतो - असा मुद्दा टिळक मांडतात.
मालक हा आपल्या गुलामाचा गुलाम कसा असतो हे समजून सांगण्यासाठी टिळक कैद्याच्या दंडाला दोरी बांधून नेणाऱ्या पोलिसांचे उदाहरण देतात. कैदी जसा पोलिसांचा कैदी असतो, त्याचप्रमाणे त्याला धरून नेणारे पोलिस हेसुद्धा त्याचे कैदी असतात. कैदी पळून जाऊ नये म्हणून त्यांना अनेक प्रकारचे प्रयत्न करावे लागतात आणि त्यामुळे पोलिसांचे स्वातंत्र्यसुद्धा नष्ट होते. कैदी रात्री पळून जाऊ नये म्हणून पोलिसांना रात्री जागावे लागते. झोप घ्यायची असेल, तेव्हा कैद्याच्या हातातील बेडीमध्ये आपलाही हात अडकवून घेऊन त्यांना झोप घ्यावी लागते.
इंग्लंडने भारत आणि इतर देश जिंकून घेतले. त्यामुळे इंग्लंड स्वतः या देशांचा गुलाम कसा झाला आहे, हे टिळक विशद करतात. भारतातून आणि इतर जिंकलेल्या देशातून ज्यांनी पैसा नेला ते लोक अतिशय श्रीमंत झाले. इंग्लंडच्या राजकारणात त्यांचा दरारा वाढला. निवडणुकीला कुणी उभे राहायचे आणि कुणी नाही याबाबत या श्रीमंत लोकांचे निर्णय महत्त्वाचे ठरू लागले. या लोकांच्या पाठिंब्यावर जे लोक निवडून येऊ लागले, त्यांना संसदेमध्ये आपली मते व्यक्त करताना त्यांना पाठिंबा देणाऱ्या लोकांची मते विचारात घ्यायची गरज निर्माण झाली. इंग्लंडच्या जनतेच्या हिताचे निर्णय होण्याऐवजी या साम्राज्यवादी लोकांच्या हिताचे निर्णय होऊ लागले. अशा तऱ्हेने साम्राज्यवादाची मिठी इंग्रज समाजाच्या भोवती जास्त जास्त घट्ट होऊ लागली. इंग्रज समाजाच्या स्वातंत्र्याचा लोप होऊ लागला.
पैशाची बेसुमार हाव समाजात शिरली. लष्कराची वाढ अतिशय मोठ्या प्रमाणात झाली. इतके देश टाचेखाली ठेवायचे म्हणजे बेसुमार लष्कर आवश्यक ठरले. लष्करात जाऊन मान आणि पैसा मिळू लागला. इंग्लंडमध्ये लष्कराचा मान गरजेपेक्षा जास्त वाढला. बौद्धिक शक्तिपेक्षा शारीरिक शक्तीचा जास्त उदोउदो होऊ लागला. विद्वान तरुणापेक्षा क्रिकेट किंवा फुटबॉल खेळणाऱ्या तरुणाला इंग्लंडमध्ये जास्त मान मिळू लागला.
..................................................................................................................................................................
हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये खरेदीसाठी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5282/Hasanyawari-Neu-Naka
..................................................................................................................................................................
साम्राज्यवादातून वाढीस लागलेल्या लष्करशाही विरुद्ध बोलणारे टिळक हे एकटेच विचारवंत नव्हते. इंग्लंडमधील तत्त्वज्ञ हर्बर्ट स्पेन्सर याने तर इंग्लंडमधील पार्लमेंट ही केवळ लष्कराला पैसे पुरवणारी यंत्रणा झाली आहे, असे दुःख व्यक्त केले होते.
हर्बर्ट स्पेन्सरचा हा मुद्दा पुढे नेताना टिळक सांगतात की, लष्कराच्या वाढत्या तृष्णेमुळे इंग्लंड मधील सामान्य जनतेला जास्त जास्त कर द्यावा लागत आहे. जनतेला जेवढा जास्त कर द्यावा लागतो, तेवढ्या जास्त प्रमाणात त्या जनतेच्या स्वातंत्र्याचा संकोच होतो हे तत्त्व टिळक येथे आवर्जून सांगतात. म्हणजे, भारतीय जनतेला गुलाम बनवण्याच्या प्रक्रियेत इंग्लंडमधील जनताच गुलाम कशी बनली आहे, हे टिळक अधोरेखित करतात.
टिळक लिहितात – “स्वतःचा आणि दुसऱ्याचा असे दोघांचेही गळे दोरीनें एकत्र बांधले जात असतां ती दोरी आंवळण्याचा प्रयत्न करणे, हे उभयतांसहि श्रेयस्कर नाही.” पुढच्या काळात याच साम्राज्यवादामुळे मोठी मोठी युद्धे उद्भवली हे आपण पाहिलेच. पहिले महायुद्ध आणि दुसरे महायुद्ध याची वरवरची कारणे काहीही असली तरी खरे कारण जर्मनीला जिंकून घ्यायला कुठलीही राष्ट्रे उरली नव्हती, हे आहे.
स्पॅनिश, डच, फ्रेंच आणि इंग्रज यांनी आपसात सगळे जग वाटून घेतले होते. नव्याने औद्योगिकीकरण झालेल्या जर्मनी, इटली आणि जपान या सारख्या देशांनी आपला माल विकायचा कोठे? कच्च्या मालासाठी त्यांनी लुटायचे कुठल्या देशाला? हिटलरने तर उघड उघड लेबेनस्रॉमची संकल्पना मांडली. लेबेनस्रॉम म्हणजे जगण्यासाठी आवश्यक असलेली जागा - स्पेस. जर्मनीला जगण्यासाठी, मोठे होण्यासाठी, पोलंड हवा होता, झेकस्लोव्हाकिया हवा होता, अनेक राष्ट्रे हवी होती, अगदी रशियासुद्धा हवा होता. इटलीला उत्तर अफ्रिका हवा होता. जपानला चीन, फिलिपीन्स, कोरिया, सिंगापूर, ब्रह्मदेश आणि भारत हवा होता. टिळक म्हणत होते की, साम्राज्यवादाचे आसुरी तत्त्वज्ञान एक नरक तयार करत आहे, तो हा सगळा नरक!
१९१४ला पहिल्या महायुद्धाला तोंड फुटले. तेव्हा जॉर्ज बर्नार्ड शॉ यानेही याच प्रकारचे विचार मांडले. ‘द डेली न्यूज’मध्ये त्याने लिहिले आहे – “हे युद्ध ब्रिटिशांच्या नसत्या व्यापारी साहसांमुळे आणि जर्मनी सेनेमध्ये वाढलेल्या फाजिल आत्मविश्वासामुळे घडते आहे.” ‘द संडे रिव्ह्यू’मध्ये त्याने लिहिले आहे – “दोन्ही बाजूंना असलेली सत्ताकांक्षा आणि दोन्ही बाजूंकडून खेळले जाणारे सत्तेचे राजकारण या गोष्टींमुळे हे युद्ध युरोपातील सामान्य जनतेच्या माथी थोपले गेले आहे.”
इथे राजद्रोहाच्या कायद्याच्या भीतीमुळे टिळकांना फार जपून शब्द वापरावे लागत होते. तिकडे शॉ बिनधास्त बोलत आणि लिहीत होता. अमेरिकन पत्रकार, मेरी ओ रियली हिला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला – “दोन्ही सैन्यातील सैनिकांनी आपल्या अधिकाऱ्यांना गोळ्या माराव्यात आणि आपल्या घरी निघून जावे. शेतकऱ्याच्या मुलांनी शेती करायला निघून जावे आणि शहरी मुलांनी आपापले धंदे करायला निघून जावे. प्रत्येक युद्धातून दरवेळी एकच शहाणपण शिकायला मिळते आणि ते हे की कुठल्याच युद्धातून मानवजात काहीच शहाणपण शिकत नाही.”
गीतेमधील तत्त्वज्ञानाचा विचार करून टिळक आपल्या निष्कर्षाप्रत आले होते. युरोपातील उदारमतवादी तत्त्वज्ञानाच्या मार्गाने शॉ त्याच्या निष्कर्षाप्रत आला होता. आणि, गंमत म्हणजे या दोन्ही निष्कर्षांमध्ये फारसा फरक नव्हता.
इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की, उदरामतवादाचा उगमदेखील अध्यात्म विचारातच आहे. सर्मन ऑन द माउंट मध्ये जीझस म्हणाला आहे - “All things whatsoever ye would that men should do to you, do ye even so to them.” (लोकांनी तुमच्याशी जसे वागलेले तुम्हाला आवडेल तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा.) मोझेस त्याच्या दहा आदेशांमध्ये म्हणतो - “Whatever is hurtful to you, do not do to any other person.” (तुम्हाला ज्या गोष्टीमुळे इजा होईल अशी कोणतीही गोष्ट तुम्ही इतरांबाबत करू नका.)
आधुनिक राजकारणाविषयी आणि साम्राज्यकारणाविषयी विचार मांडले जात होते आणि त्या विचारांची मुळे हजारो वर्षांपूर्वी मांडल्या गेलेल्या अध्यात्म विचारात होती. आपण ज्याला ‘सेक्युलर’ विचार म्हणतो, तो आपल्याला वाटतो एवढा ‘सेक्युलर’ नसतो! आपण ज्याला ‘आध्यात्मिक’ विचार म्हणतो, तो आपल्याला वाटतो एवढा खऱ्या ‘सेक्युलर’ विचारांपासून दूर नसतो.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
पहिले महायुद्ध १९१९ साली संपले. त्यात झालेला आसुरी संहार पाहायला टिळक हयात होते. सैनिक आणि नागरिक मिळून चार कोटी लोक या युद्धात ठार झाले. पहिल्या महायुद्धातून आणि व्हर्सायच्या तहामधून उद्भवलेले दुसरे महायुद्ध बघायला टिळक नव्हते, पण शॉ होता. (टिळक आणि शॉ एकाच वयाचे होते. टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ चा आणि शॉचा जन्म २६ जुलै १८५६ चा. दोघांमध्ये फक्त तीन दिवसांचा फरक होता.)
दुसऱ्या महायुद्धात पाच कोटी लोक ठार झाले. दुसऱ्या महायुद्धात इंग्लंड जरी विजयी झाले तरीदेखील दोन्ही महायुद्धांचा परिणाम म्हणून ब्रिटिश साम्राज्य लयाला गेले. टिळकांची वाणी खरी ठरली. त्यांचा गीतेमधील ज्ञानावरचा विश्वास खरा ठरला. शॉचा ‘उदारमतवादा’वरचा विश्वास खरा ठरला. त्याचा ‘सर्मन ऑन द माउंट’वरचा विश्वास खरा ठरला.
युद्धखोरी आणि वांशिक वर्चस्वाचे विचार पुन्हा पुन्हा डोके वर काढत राहतात. राष्ट्रवाद आणि वांशिक वर्चस्ववादाचे विचार सामान्य जनतेला वेळोवेळी भुरळ पाडतात. त्या भावनांचा फायदा घेण्याचा मोह कोणा ना कोणा आसुरी राज्यकर्त्याला नक्कीच होतो. अशा आत्यंतिक भावनिक काळात टिळकांचे कोण ऐकणार? शॉचे कोण ऐकणार?
‘गीता’ नक्की काय म्हणते आहे हे ज्यांना नीट समजले आहे, ते आसुरी वृत्तीच्या आहारी कशाला जातील? ‘सर्मन ऑन द माउंट’मध्ये केवढे मोठे शहाणपण सामावलेले आहे, याचा अंदाज ज्यांना आला आहे, ते मानवा-मानवातील बंधुभावाचा घात कसा करू शकतील?
‘गीते’मधील आणि ‘सर्मन ऑन द माउंट’मधील विचारांकडे दुर्लक्ष करण्याचा मोह जगभरातील जनतेला केव्हा ना केव्हा होतोच होतो आणि त्या क्षणापासून त्या देशाच्या इतिहासात आसुरी इतिहासाचे एक नवे पर्व सुरू होते.
..................................................................................................................................................................
लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.
sjshriniwasjoshi@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment