मागील ५० वर्षे महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात पत्रकार-संपादक या नात्याने कार्यरत असलेले कुमार केतकर कालच्या ७ जानेवारीला ७५ वर्षांचे झाले आहेत. वयाचा अमृतमहोत्सव आणि पत्रकारितेतील कारकिर्दीचा सुवर्णमहोत्सव असा हा योग म्हणता येईल. सेवाज्येष्ठता आणि कार्यश्रेष्ठता या दोन्ही निकषांवर, आज हयात असलेल्या महाराष्ट्रातील पत्रकार-संपादकांमध्ये केतकरांचेच नाव अव्वल नंबरवर घ्यावे लागते.
सुरुवातीच्या काळातील दोन दशके इंग्रजी पत्रकारितेत, प्रामुख्याने ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ व ‘इकॉनॉमिक टाइम्स’ या वृत्तपत्रांमध्ये ते कार्यरत राहिले. वयाची पन्नाशी जवळ आली, तेव्हा ते ‘महाराष्ट्र टाइम्स’चे संपादक झाले, तिथे सहा वर्षे राहिले. त्यानंतर एक वर्ष ‘लोकमत’चे संपादक आणि मग आठ वर्षे ‘लोकसत्ता’चे संपादक. त्यानंतरची चार-पाच वर्षे ‘दिव्य मराठी’चे संपादक. म्हणजे मराठी पत्रकारितेतील त्यांची कारकीर्द दोन दशकांची राहिली.
मागील दोन-अडीच वर्षे ते काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार म्हणून कार्यरत आहेत. आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात डाव्या पक्ष-संघटनांमध्ये सक्रीय होते. ‘ग्रंथाली’ या वाचनसंस्कृतीच्या चळवळीतही त्यांचा सहभाग राहिला. मात्र त्यांची ओळख पत्रकार-संपादक आणि वक्ते-भाष्यकार अशीच राहिली. ‘विचारवंत’ हा शब्दप्रयोग गांभीर्याने वापरायचा ठरवला तर तो केतकरांना लावता येईल. कारण ज्याच्याकडे काही एक निश्चित व निर्णयात्मक असा दृष्टिकोन आहे आणि त्या दृष्टिकोनातून केलेल्या मांडणीचे काहीएक प्रभावक्षेत्र निर्माण झाले आहे, त्या व्यक्तीला ‘विचारवंत’ ही संज्ञा वापरता येते आणि म्हणून केतकरांना ती संज्ञा बहाल करता येईल.
..................................................................................................................................................................
हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये खरेदीसाठी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5282/Hasanyawari-Neu-Naka
..................................................................................................................................................................
पत्रकार आणि त्यातही मोठ्या दैनिकाचा संपादक म्हटले की ‘जॅक ऑफ ऑल अॅन्ड मास्टर ऑफ नन्’ हे गृहीत धरलेले असते. पण त्यातील फार थोडे संपादक असे असतात की, त्यांना ‘मास्टर ऑफ नन्’ असे म्हणता येणे अवघड होऊन जाते. कुमार केतकर हे अशा फार थोड्यांपैकी आहेत. राजकारण, समाजकारण, साहित्य, संस्कृती, अर्थकारण, विज्ञान-तंत्रज्ञान, कला-संस्कृती या सर्व प्रमुख क्षेत्रांत वाचक-श्रोत्यांना मुशाफिरी घडवून आणण्याइतकी ताकद त्यांनी कमावलेली आहे. त्यामुळे त्यांचा संचार अनेकविध क्षेत्रांतील व्यक्ती, संस्था, संघटना यांच्यामध्ये राहिला आहे.
त्यांच्या अग्रलेखांची व लेखांची डझनभर मराठी पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. ‘बदलते विश्व’ आणि ‘त्रिकालवेध’ या पुस्तकांत त्यांचा गाभा व आवाका दिसतो. त्यांनी उत्साह दाखवलेला नाही, (किंबहुना उत्साह दाखवणाऱ्यांना होकार दिलेला नाही), अन्यथा त्यांची आणखी डझनभर तरी पुस्तके प्रकाशित झाली असती. ‘लोकसत्ता’ व ‘महाराष्ट्र टाइम्स’मधील त्यांचे लेख व अग्रलेख इतक्या विपुल प्रमाणात असंग्रहित आहेत की, विशिष्ट थिम्स घेऊन ते संग्रहित करायचे ठरवले तर १०-१२ पुस्तके सहज आकाराला येतील. अर्थातच, उत्तम दर्जाचे, वाचनीय व आजही कालसुसंगत असे लेखन निवडले तरी! याशिवाय, त्यांनी विविध व्यासपीठांवरून केलेल्या भाषणांची संख्या काही हजारांमध्ये भरेल. दूरचित्रवाणीवरील चर्चा, मुलाखती, संवाद यांचा हिशोब वेगळा करावा लागेल.
इतके सर्वव्यापी असलेल्या केतकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे, विचारांचे व कार्याचे काही कवडसे पकडायचे ठरले तरी अनेक जण अचंबित होतात. ज्यांच्या प्रत्येक लहान-मोठ्या भाषणात व लेखनात ‘काल-आज-उद्या’ यांचा संगम असतोच असतो, अशा दुर्मीळ लोकांमध्ये त्यांचा समावेश करावा लागतो. शिवाय, बहुविद्याशाखीय अभ्यास करण्याच्या प्रक्रियेचा पुढचा टप्पा म्हणून प्रत्येक प्रश्नाचा/समस्येचा विचार स्थानीय, प्रादेशिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिप्रेक्ष्यांमध्ये करण्याची सवय क्वचित काही लोकांना असते, त्यातही केतकरांचा समावेश करावा लागतो. या सर्वांच्या जोडीला सतत कार्यक्षम व कार्यमग्न राहणे आणि तेही उत्साहाने, हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रधान वैशिष्ट्य राहिले आहे. अशी कार्यमग्नता ठेवूनही त्यांच्या वर्तन-व्यवहारात उमदेपणा कायम कसा राहतो, याचे अनेकांना आश्चर्य वाटते.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
केतकरांच्या चाळीस वर्षांच्या पत्रकार-संपादक कारकिर्दीमध्ये सर्वोच्च कालखंड म्हणून ते ‘महाराष्ट्र टाइम्स’ व ‘लोकसत्ता’ या दैनिकांमध्ये संपादक होते, त्याचाच उल्लेख करावा लागेल. १९९५ ते २०१० हाच तो दीड दशकांचा कालखंड. दोन मोठ्या वृत्तसमूहांची ही दोन मोठी व प्रभावशाली दैनिके असल्याने त्या दैनिकांच्या मुख्य संपादकांची ताकद खूपच जास्त परिणाम करत असते. अन्य सर्व क्षेत्रांत तर ती परिणाम करीत असतेच, पण राजकारणातही खूप चांगल्या प्रकारे हस्तक्षेप करीत असते. अर्थातच त्या संपादकाकडे तेवढे नैतिक बळ असावे लागते, बौद्धिक आवाका प्रचंड असावा लागतो, नि:स्पृह वृत्ती भिनलेली असावी लागते आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कोणतीही किंमत चुकवण्याची तयारी ठेवणारा निर्भयपणा असावा लागतो.
इतके सारे अजब रसायन संपादकांच्या व्यक्तिमत्त्वात भिनलेले नसेल तर, कितीही मोठे व प्रभावशाली दैनिक असूनही काही उपयोग होत नाही. आणि म्हणूनच मागील चार-पाच दशकांचा विचार केला तर केतकरांच्या आधी माधवराव गडकरी व गोविंदराव तळवलकर, केतकरांचे समकालीन अरुण टिकेकर आणि केतकरांच्या नंतरचे गिरीश कुबेर इतकीच नावे ठळकपणे पुढे येतात.
..................................................................................................................................................................
हेही वाचा : कुमार केतकर नावाचा ज्ञानसंपन्नतेचा दरवळ! - प्रवीण बर्दापूरकर
..................................................................................................................................................................
वरील निकषांवर अन्य लहान वा प्रादेशिक दैनिकांचा विचार केला तर ‘मराठवाडा’चे अनंतराव भालेराव आणि ‘महानगर’चे निखिल वागळे व आणखी दोन-चार नावे निघतील. १९९१ नंतरच्या दीड दशकाला मराठी पत्रकारितेतील ‘टिकेकर-केतकर पर्व’ असे म्हणता येईल. १९व्या शतकाच्या अखेरच्या पाव शतकातील दीड दशक (१८८१-१८९५) मराठी पत्रकारितेतील ‘टिळक-आगरकर पर्व’ म्हणून ओळखले जाते; त्या पर्वाचा प्रभाव त्यानंतर काही दशके तरी मोठ्या प्रमाणात राहिला. त्या पर्वाशी टिकेकर-केतकर पर्वाची तुलना करण्याचा हेतू इथे नाही. मात्र हे अधोरेखित केले पाहिजे की, टिकेकर हे ‘आगरकर स्कूल’चे तर केतकर हे ‘टिळक स्कूल’चे म्हणता येतील. अर्थातच दोन्ही स्कूलचे म्हणून विशेष असे महत्त्व आहेच. ज्याच्या व्यक्तिमत्त्वाला जे योग्य ठरेल ते त्याने केले/करावे एवढे शहाणपण अंगी बाणवले असेल तर, त्या दोहोंमध्ये श्रेष्ठ-कनिष्ठ ठरवण्याचा किंवा एकाने दुसऱ्याला तुच्छ लेखण्याचा किंवा वाळीत टाकण्याचा वेडेपणा उद्भवत नाही.
तर मुद्दा असा की, या दीड दशकात टिकेकर व केतकर ज्या सातत्याने अग्रलेख व लेख लिहीत होते आणि आपापल्या वृत्तपत्रांतून जे आशय-विषय चव्हाट्यावर आणत होते, तो साराच प्रकार रोचक आणि रोमांचक होता. शिवसेना व भाजप यांचा उत्कर्ष, काँग्रेसची वेगवान घसरण, समाजवादी व कम्युनिस्ट यांचा नको तितका ऱ्हास आणि देभरात सर्वत्र लहान-मोठ्या प्रादेशिक पक्षांचे वर्चस्व असा तो राजकीय कालखंड होता. शिवाय, देशात आर्थिक उदारीकरण पर्व अवतरल्यानंतरचा तो काळ असल्याने उद्योग, व्यापार, साहित्य, कला, क्रीडा, तंत्रज्ञान इत्यादी सर्व क्षेत्रांत कमी-अधिक चांगले व वाईट बदल दिसू लागले होते. त्यामुळे सामाजिक संस्था-संघटना व चळवळी, आंदोलने यांच्यातही कोलाहल निर्माण झाला. शेती व शिक्षण क्षेत्रांवर इष्ट-अनिष्ट असे दूरगामी परिणाम झाले.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
याच काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर व भारतीय उपखंडात बरीच उलथापालथ चालू होती. परिणामी, सर्वच समाजघटकांच्या आशा, अपेक्षा, आकांक्षा वाढीस लागल्या होत्या. जात, धर्म, भाषा, प्रदेश, लिंग या प्रकारच्या अस्मिताही अधिक टोकदार होत होत्या. त्या काळाचे प्रतिबिंब टिकेकर-केतकर यांच्या लेखनात व त्यांच्या वृत्तपत्रांत ठळकपणे दिसत होते. तिथे ते ‘दर्पणा’ची भूमिका पार पाडत होते आणि ‘दिग्दर्शना’चीही! त्यामुळे वाचन-लेखन करू इच्छिणाऱ्या त्या दीड दशकांतील तरुणाईला टिकेकर व केतकर या दोन ‘स्कूल’ आहेत असे वाटत असे. दोन्हींचीही आवश्यकता व अपरिहार्यता मान्य होत असे.
तर मुद्दा असा की, केतकरांची पत्रकारिता टिळकांशी नाते सांगणारी होती, हे लक्षात घेतले तर केतकरांकडे कसे पहावे हे समजून घेता येईल. टिळकांवर त्यांच्या हयातीत आणि मृत्यूनंतर शंभर वर्षांनीही वेगवेगळ्या कारणांनी टीका करणारा वर्ग होताच; तरीही वस्तुस्थिती हीच उरते की, विसाव्या शतकाच्या पहिल्या पाव शतकात आणि देशाचा स्वातंत्र्यलढा खऱ्या अर्थाने सुरू झाला त्या काळातही राष्ट्रीय स्तरावर पोहोचलेले पहिले महाराष्ट्रीय नेते लोकमान्य टिळक हेच होते. (नंतर हे स्थान डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मिळाले) अगदी तसेच कुमार केतकर यांच्या भूमिका व त्यांची मांडणी यासंदर्भात त्या काळात आणि आजही विविध प्रकारची टीका होत असली तरी, एकविसाव्या शतकाच्या पहिल्या पाव शतकात मराठी पत्रकारितेतील कार्यासाठी राष्ट्रीय स्तरावर ओळख असलेला संपादक म्हणून केतकरांचेच नाव घ्यावे लागेल.
..................................................................................................................................................................
हेही वाचा : ‘इंटलेक्चुअल अॅक्टिव्हिझम’ ही कुमारनं आमच्या पिढीला दिलेली देणगी आहे! - धनंजय गांगल
..................................................................................................................................................................
कुमार केतकर यांनी घेतलेल्या सामाजिक भूमिकांविषयी प्रतिगामी शक्ती वगळता कोणी आक्षेप घेतले नाहीत. अन्य क्षेत्रांतील त्यांच्या भूमिकांविषयीही फारसे वाद निर्माण झाले नाहीत. कॉन्सपीरसी थिअरीवर अतिरिक्त विश्वास आणि अराजकाची सातत्याने दाखवलेली भीती, यामुळे त्यांच्यावर काही प्रमाणात टीका झाली. मात्र त्यांच्या राजकीय भूमिकांविषयी त्यांचे अन्य घटकांशी असलेले नाते कायम ‘लव्ह-हेट’ स्वरूपाचे राहिले आहे. म्हणजे मार्क्सवादाशी व डाव्या विचारांशी घट्ट नाते सांगणारे केतकर कम्युनिस्टांना जवळचे वाटले नाहीत, याचे कारण डाव्यांची पोथीनिष्ठता, ठोकळेबाजपणा व जागतिकीकरणविरोधी भूमिका यांवर केतकरांनी सतत टीका केली.
एक पुरोगामी लेखक-विचारवंत म्हणून समाजवाद्यांमधील विविध गटांना केतकर जवळचे वाटायचे, पण इंदिरा गांधी परिवार व १९७५ची आणीबाणी यांचे समर्थन ज्या हिरिरीने केतकर करतात, ते समाजवाद्यांना कायम खटकत राहिले. काँग्रेस पक्षाच्या विचारांचे व गांधी-नेहरू यांच्या वारशाचे जोरदार समर्थन केतकर करायचे, पण सर्वच लहान-थोर काँग्रेसजनांवर ते ज्या पद्धतीने प्रहार करायचे, त्यामुळे बहुतांश काँग्रेसवाले त्यांच्यापासून दूर राहणे पसंत करायचे.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
केतकर यांनी सर्वाधिक कठोर टीका केली ती भाजप व संघ परिवारावर आणि हिंदुत्ववादी संघटनांवर; ते केतकरांचा द्वेषच करायचे, पण केतकर काय बोलतात व लिहितात हे मात्र आवर्जून वाचायचे; किंबहुना असा एखादा पत्रकार-संपादक आपल्या विचाराचा नाही, याचा त्यांना हेवा वाटायचा. तर अशा चारही प्रमुख राजकीय प्रवाहांतील लोकांना केतकरांविषयी आकर्षणही वाटत होते आणि कोणत्या ना कोणत्या कारणाने रागही होता.
वरील वस्तुस्थिती लक्षात घेतली तर काही लोकांना असे वाटेल की, केतकर हे नेमके आहेत तरी कोण? पण असा प्रश्न अन्य कोणाबद्दल उपस्थित करून शंका-कुशंका व्यक्त केल्या किंवा त्यांच्या धारणांविषयी संशय व्यक्त केला तर ते समजू शकते. मात्र पत्रकारिता हा धर्म आहे, असे मानणाऱ्या संपादकांबद्दल असा प्रश्न उपस्थित होत असेल तर तो त्यांचा गौरव मानायला हवा, तेच त्यांचे सर्वांत मोठे यश मानायला हवे. त्या अर्थाने कमालीचे यशस्वी ठरलेल्या कुमार केतकर या संपादकाला पुढील आरोग्यपूर्ण आयुष्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा!
‘साधना’ साप्ताहिकाच्या १६ जानेवारी २०२१च्या अंकातून साभार
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment