‘त्रिभंग’ : तीन स्त्रियांच्या नात्यातले संतुलन हरवलेला सिनेमा
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
सुहास किर्लोस्कर
  • ‘त्रिभंग’चे एक पोस्टर
  • Wed , 20 January 2021
  • कला-संस्कृती हिंदी सिनेमा त्रिभंग Tribhanga रेणूका शहाणे Renuka Shahane काजोल Kajol मिथिला पालकर Mithila Palkar तन्वी आझमी Tanvi Azmi वैभव तत्त्ववादी Vaibhav Tatwawaadi कुणाल रॉय कपूर Kunaal Roy Kapur

रेणुका शहाणे लिखित-दिग्दर्शित ‘त्रिभंग’ या सिनेमात एकाच घरातल्या तीन महिलांची कथा आहे. नयनतारा (आजी), अनुराधा (आई) आणि माशा (कन्या) या तीन पिढ्यांतील तिघींनी त्यांच्या आयुष्यातील आव्हानांचा सामना कसा केला आणि त्याचा त्यांच्या कुटुंबावर झालेला परिणाम, असे या सिनेमाचे ढोबळ स्वरूप असले तरीही या कथेला अनेक पदर आहेत. ही तिन्ही पात्रे तपशीलवार लिहिलेली असली तरी त्या तिघींचे दुःख आपल्यापर्यंत प्रभावीपणे पोहचत नाही. परिणामी आपण या तिघींचे आयुष्य विलक्षण तटस्थपणे ‘बोल’पटात ऐकत राहतो. चकमकीत आयुष्य जगणाऱ्या या स्त्रियांचा त्यांच्या आयुष्यातील पुरुष आणि परिस्थिती यांच्याबरोबर झालेला झगडा आपल्या मनाचा ठाव घेत नाही. त्यामुळे त्यांच्या अडचणी त्यांनी ओढवून घेतल्यासारख्या वाटत राहतात. 

नयनतारा आपटे (तन्वी आझमी) एक प्रागतिक विचारांची लेखिका आहे, पण लेखनासाठी हवा असलेला एकांत तिला मिळत नाही. शिवाय एक सून, पत्नी, आई या नात्यांना न्याय देण्यात ती कमी पडल्याचे जाणवून देत तिचे कुटुंबीय तिला समजून घेत नाही. नयनतारा यांनी लेखनासाठी एकांत मिळवण्याचा अतिरेक केल्याचे सिनेमात दाखवले आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटतत नाही. लेखनासाठी घर सोडणाऱ्या नयनतारा नंतर एका प्रकाशचित्रकाराशी संबंध जुळवणे पसंत करतात, परंतु घरामध्ये होणारे अत्याचार त्यांना दिसत नाहीत. त्यानंतर त्या भास्कर (कंवलजीत) बरोबर स्थिरावतात.

अनुराधा आपटे (काजोल) ही नयनतारा यांची मुलगी. त्यांच्याकडे लक्ष देण्यास तिच्या आई-वडिलांना वेळ नाही. त्यामुळे मोठी झालेली अनुराधा आपल्या आई-वडिलांबद्दल मनात आकस धरून आहे, जो योग्य आहे. एकंदर आयुष्याबद्दलच तिची तक्रार आहे, परंतु आईच्या आयुष्यात आलेल्या भास्कर या तिसऱ्या पुरुषामुळे तिला कलेची जाण येते आणि ती पंडित केलुचरण महापात्रा यांचा नृत्याविष्कार बघून ओडिसी नृत्य शिकण्याचे ठरवते. उठता–बसता, नृत्य कार्यक्रमापूर्वी ‘फ’कारादी शिव्या देणारी अनुराधा शिव्या देण्याचे समर्थनही करत राहते. प्रत्यक्षात सिनेमात ही नृत्यांगना कधीही रियाज करताना वा नृत्य करतानाही दिसत नाही. आपल्याला दिसते ती फक्त आकांडतांडव करणारी अनुराधा.

आपल्या आईला तातडीने हॉस्पिटलमध्ये घेऊन येणाऱ्या मिलन (कुणाल रॉय कपूर) याच्याविषयी कृतज्ञतेची भावनाही नसलेली अनुराधा प्रेक्षकांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरते. अनुराधा आजीने केलेले लाडू चवीने खाते आणि त्या चवीची तुलना समागमाच्या सुखाशी करते, तेव्हा आपल्याला डोक्यावर हात मारण्याशिवाय पर्याय राहत नाही! 

..................................................................................................................................................................

आंबेडकरांना सहन करावा लागलेला विकृत व अविचारी वैरभाव या व्यंगचित्रांमधून उघड होतो. त्याचबरोबर ऐतिहासिक अन्याय सहन केलेल्या आंबेडकरांचं वास्तविक चरित्रही उजेडात येतं.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये खरेदीसाठी करण्यासाठी क्लिक करा - 

https://www.booksnama.com/book/5282/Hasanyawari-Neu-Naka

..................................................................................................................................................................

माशा ही अनुराधाला ‘लिव्ह इन’ संबंधातून झालेली मुलगी. ती आता एका अशा कुटुंबात प्रेमविवाह करून गेली आहे, जिथे सासूबरोबर व्हिडियो कॉलवर बोलतानासुद्धा डोक्यावरून पदर घ्यावा लागतो, नवऱ्याला ‘अहो-जाहो’ म्हणावे लागते, कुटुंब एकत्र राहण्यासाठी पुरुषांनी धर्माच्या नावावर स्त्रियांवर घातलेली बंधने पाळावी लागतात. तिचे तिच्या आजीबरोबर चांगले संबंध आहेत. खरे तर ती सगळ्यांना सुखी ठेवण्यात आपल्या आयुष्याची होळी करत आहे की काय, अशी शंका येत राहते. 

नयनताराला अचानक हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागते आणि त्यानंतर या तीन स्त्रियांचे आपापसातील नातेसंबंध आणि गुंते आपण विलक्षण तटस्थपणे बघत राहतो. चकचकीत आयुष्य जगणाऱ्या या स्त्रियांची दुःखे प्रेक्षक या नात्याने आपल्याला कायमच परकी वाटत राहतात. स्त्रियांचे विश्व उभे करताना त्यांच्या आयुष्यातील पुरुषांच्या व्यक्तिरेखा व्यवस्थितपणे उभ्या राहत नाहीत. मग अनुराधाचा भाऊ (वैभव तत्त्ववादी) असो, अतिरेकी अट्टाहासाने शुद्ध हिंदी बोलणारा लेखक मिलन असो किंवा भास्कर.

काजोल मात्र विलक्षण आक्रस्ताळी वाटते. ओडिसी नृत्यांगना या नात्याने तिला ना या नृत्याबद्दल आपुलकी आहे, ना कोणत्याही व्यक्तीबद्दल, ना रियाजाबद्दल. ती ओडिसी नृत्यांगना असल्याची दोन-तीन छायाचित्रं तेवढी दिसत राहतात.

तन्वी आझमी यांनी नयनतारा उत्तमरीत्या साकारली आहे. मिथिला पारकरनेही लक्षणीय अभिनय केला आहे. तिची भूमिका तितक्या प्रभावीपणे पुढे येऊ शकली नाही की, तिच्या भूमिकेची लांबी कमी केली, हे मात्र समजण्यास वाव नाही. बाबा आझमी यांचे छायाचित्रण ठीकच आहे, कारण सर्व कलाकारांच्या अखंड बडबड करण्यामुळे कॅमेऱ्याची भाषा वापरलेलीच नाही. बराचसा चित्रपट बंदिस्त खोल्यामध्येच परंतु लख्ख प्रकाशात घडतो. 

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

रेणुका शहाणे यांनी आपल्या आयुष्यातील काही प्रसंग लेखणीमधून उतरवून आपल्याला दाखवल्याचे जाणवते. उदाहरणार्थ त्यांनी एका मुलाखतीमध्ये खुल्या वातावरणात मोठे झाल्याचे सांगताना नवऱ्याला ‘राणाजी’ म्हणणे, सासरी डोक्यावरून पदर घेत असल्याचे अभिमानाने सांगितले होते. त्यातला विरोधाभास मुलाखतीमध्ये जाणवला होता, तसाच तो या सिनेमातही जाणवतो.

ओडिसी नृत्यात तीन स्थिती असतात. ‘संभंग’स्थितीमध्ये शरीराचे वजन दोन्ही पायावर समानरीत्या विभागले जाते, पाठीचा कणा सरळ ठेवला जातो, दोन्ही हात कोपरामध्ये दुमडलेले असतात. ‘अभंग’ स्थितीमध्ये शरीराचे वजन कोणत्याही एका बाजूकडे झुकलेले असते, पाय गुडघ्यात दुमडलेले असतात. ‘त्रिभंग’मध्ये शरीराची स्थिती इंग्रजी ‘S’ अक्षरासारखी तीन विभागात वाकलेली असते, ज्याचे प्रतिबिंब बऱ्याच प्राचीन शिल्पांमध्ये दिसते. ‘त्रिभंग’ हे नाव देऊन तीन स्त्रियांची स्थिती वेगवेगळ्या दिशेने वाकलेली आहे, असे दाखवायचे असेल, तरी नृत्यातले संतुलन चित्रपटात राखता आलेले नाही, असे खेदाने म्हणावेसे वाटते. 

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

लेखक/लेखिकेनेच चित्रपट दिग्दर्शित करण्याची परंपरा अगदी चार्ली चॅप्लिनपासून ख्रिस्तोफर नोलानपर्यंत अनेक मातब्बर कलाकारांनी राखली आहे. हिंदी सिनेमांतही गुलज़ारपासून विशाल भारद्वाज-अनुराग कश्यप–झोया अख्तरपर्यंत लेखक-दिग्दर्शक या दोन्ही भूमिका उत्तमरीत्या साकारणारी एक परंपरा आहे. परंतु ‘त्रिभंग’मध्ये हे संतुलन राखण्यात दिग्दर्शिका रेणुका शहाणे कमी पडल्याचे जाणवत राहते. एकाच घरातील तीन स्त्रियांच्या वेगळ्या वाटांवरील तीन कथा बघताना ‘चारचौघी’ (प्रशांत दळवी लिखित, चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित) या विलक्षण नाटकाची आठवण येते. या नाटकात एकाच घरातील चार स्त्रियांची बांधीव कथा मांडताना लेखक-दिग्दर्शकांनी प्रत्येकीची भूमिका ठोसपणे मांडली आहे. हे नाटक पाहताना त्यांच्या धारणा वेगवेगळ्या असल्या तरीही प्रत्येक स्त्री तिच्या दृष्टीकोनातून बरोबर असल्याचे वाटत राहिले. ते ‘त्रिभंग’मध्ये कुठेतरी हरवल्याचे जाणवते.    

..................................................................................................................................................................

लेखक सुहास किर्लोस्कर सिनेअभ्यासक आहेत.

suhass.kirloskar@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख