जोस सॅल्वडोर अल्वरेंगा : समुद्राच्या लाटांवर एक वर्ष जगण्यासाठी प्रचंड संघर्ष करणारा जिगरबाज दर्यावर्दी
ग्रंथनामा - झलक
गौरी कानेटकर
  • ‘मृत्यु पाहिलेली माणसं’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि जोस सॅल्वडोर अल्वरेंगा यांची छायाचित्रं
  • Mon , 18 January 2021
  • ग्रंथनामा झलक मृत्यु पाहिलेली माणसं Mrutyu Pahileli Manasa गौरी कानेटकर Gauri Kanetkar जोस सॅल्वडोर अल्वरेंगा José Salvador Alvarenga

पत्रकार गौरी कानेटकर यांचं ‘मृत्यु पाहिलेली माणसं’ हे भन्नाट पुस्तक नुकतंच समकालीन प्रकाशनाने प्रकाशित केलं आहे. माणसांवर मृत्यूच्या छायेत वावरण्याची वेळ येते, तेव्हा काय होतं? जेव्हा जगणं अवघड आणि मृत्यू म्हणजे सुटका असते, तेव्हा माणसं कशी वागतात? मृत्यूला शरण न जाता शेवटच्या क्षणापर्यंत तग धरून राहण्याचा चिवटपणा माणसाच्या मनात कुठून तयार होतो? मृत्यूला पुरून उरणारी अशी माणसं मुळातच असामान्य असतात की परिस्थिती त्यांना तसं बनवते?

या पुस्तकात मृत्युच्या दारातून परतलेल्या नऊ व्यक्तींच्या श्वास रोखून धरायला लावणाऱ्या चित्तथरारक कहाण्या आहेत. म्हटलं तर या साध्या कहाण्या आहेत. संकटातून माणसं कशी वाचली याच्या. म्हटलं तर ही माणसंही अगदी तुमच्या-माझ्यासारखी सामान्य आहेत; पण त्यांच्यावर परिस्थितीच अशी ओढवली की, त्यांना असामान्यत्व दाखवण्यावाचून इलाज राहिला नाही. मृत्यू पाहिलेली ही माणसं जगण्याबद्दल, स्वतःच्या क्षमता ताणण्याबद्दल खूप काही सांगून जातात. वेळ आलीच तर माणूस काहीच्या काही करू शकतो, असा विश्वास देऊन जातात. म्हणूनच चहूकडे अंधारून आलेल्या सध्याच्या करोनाकाळात हे पुस्तक जगण्याची नवी उभारी देतं, परिस्थितीशी चार हात करण्याचा आत्मविश्वास आणि बळ देतं. उदाहरणादाखल ही एक कहाणी…

..................................................................................................................................................................

ही गोष्ट आहे २०१२ सालची. मेक्सिकोतल्या कोस्टा अझूल नावाच्या छोट्या गावातल्या मच्छीमार वस्तीतली. जोस सॅल्वडोर अल्वरेंगा हा मूळचा मेक्सिकोच्या शेजारी असलेल्या मध्य अमेरिकेतल्याच एल सॅल्वडोर देशातला मच्छीमार. त्याच्या गावातल्या रोजच्या भांडणांना आणि मारामारीला वैतागून तो मेक्सिकोतल्या कोस्टा अझूलमध्ये स्थिरावलेला असतो. आई-वडील, प्रेयसी आणि तिच्यापासून झालेली मुलगी या सगळ्यांना मागे ठेवून. खरं तर एल सॅल्वडोरसारख्या देशातून बाहेर पडणारी माणसं सहसा अशा गरीबड्या गावांमध्ये थांबत नाहीत. ती मेक्सिको पार करून अमेरिकेत जाण्याच्या मागे असतात. पण अल्वरेंगाचं प्रकरण वेगळं असतं. त्याला मुख्य गावापेक्षा मच्छीमार वस्तीशी जास्त देणं-घेणं असतं आणि जमिनीवरच्या व्यवहारांपेक्षा प्रशांत महासागराची ओढ अधिक असते.

वयाच्या दहाव्या वर्षीपासून अल्वरेंगा मासेमारीचंच काम करत आलेला असतो. त्याच्याइतका तरबेज मच्छीमार त्या वस्तीत दुसरा नसतो. मनमोकळा स्वभाव, सर्वांना मदत करण्याची तयारी आणि मच्छीमारीतलं कसब यामुळे तो लवकरच कोस्टा अझूलच्या मच्छीमार वस्तीत लोकप्रिय होतो. त्याला आपल्या बोटीवर ओढण्यासाठी मालकांची चढाओढ सुरू असते; पण अल्वरेंगाला ना पैशांचा मोह असतो ना कसली महत्त्वाकांक्षा. मासेमारीसाठी समुद्रात झोकून देणं आणि परतल्यावर मित्रांसोबत खाणं-पिणं, मौज करणं एवढंच त्याचं आयुष्य असतं. सार्‍या वस्तीप्रमाणेच आपल्या बोटमालकांचाही तो मित्र होऊन जातो.

१७ नोव्हेंबर २०१२. वस्तीत कुठल्याशा पार्टीची तयारी सुरू असते. वादळवार्‍याचे दिवस असतात, त्यामुळे बहुतेक मच्छीमार समुद्र शांत व्हायची वाट पाहत किनार्‍यावर पार्टीच्या प्लॅनिंगमध्ये मश्गुल असतात. अल्वरेंगा मात्र अशा छोट्या-मोठ्या वादळांना घाबरून जमिनीवर थांबणारा नसतो. बोटीवरचा त्याचा नेहमीचा पार्टनर या वेळी काही कामामुळे त्याच्यासोबत येणार नसतो; पण त्यामुळे जाणं रद्द न करता तो नवा पार्टनर शोधतो, बोटीचं हवं-नको बघतो आणि पंचवीस फुटी मोटारबोट पाण्यात घालतो. त्याचा हा नवा पार्टनर कोर्डोबा नावाचा नवखा तरुण मुलगा असतो. त्याला ना मच्छीमारीचा फारसा अनुभव असतो, ना समुद्रात झोकून देण्याचा पिंड. पण एक दिवसाचा तर प्रश्न, असं म्हणून अल्वरेंगा त्याला सोबत नेतो. वादळ सुरूच असतं; पण अल्वरेंगाला त्याची सवय असते. त्यांची बोट आत नेहमीच्या ठिकाणी पोहोचल्यावर दोघंही प्रचंड जाळं समुद्रात टाकायला सुरुवात करतात.

..................................................................................................................................................................

आंबेडकरांना सहन करावा लागलेला विकृत व अविचारी वैरभाव या व्यंगचित्रांमधून उघड होतो. त्याचबरोबर ऐतिहासिक अन्याय सहन केलेल्या आंबेडकरांचं वास्तविक चरित्रही उजेडात येतं.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये खरेदीसाठी करण्यासाठी क्लिक करा - 

https://www.booksnama.com/book/5282/Hasanyawari-Neu-Naka

..................................................................................................................................................................

रात्री आठच्या सुमारास जाळं टाकून होतं. आता निवांतपणे बिडी ओढत मासे जाळ्यात अडकण्याची वाट बघत थांबून राहायचं एवढंच काम. रात्रभर मासळी पकडायची आणि सकाळी पुन्हा किनार्‍याच्या दिशेने मोहरा वळवायचा, हा त्याचा नेहमीचा दिनक्रम. छोट्या-मोठ्या वादळांनी आजवर हा नेम कधीही चुकलेला नसतो. पण जसजशी रात्र वाढत जाते, तसा वादळाचा जोर वाढतो. हे वादळ नेहमीपेक्षा ताकदीचं आहे, हे अल्वरेंगाच्या लक्षात येतं. थोडा वेळ वाट पाहिल्यावर तो जाळं काढून परतण्याचा निर्णय घेतो. तो आणि कोर्डोबा जाळं ओढू लागतात. निम्मं जाळं हातात येतं, तेव्हाच त्यांच्या लक्षात येतं, की या वेळी आपल्याला जबरदस्त मासळी हाती गावली आहे. तोवर अर्धा टन मासे त्यांनी बोटीच्या आइसबॉक्समध्ये रिकामे केलेले असतात. आता वादळाचा तडाखा आणखी वाढतो. मुसळधार पाऊस कोसळू लागतो. बोटीत पाणी साठू लागतं. बोट प्रचंड हेलकावे खाऊ लागते. ती उलटू नये यासाठी अल्वरेंगाला आपलं सगळं कसब अन् ताकद पणाला लावावी लागते. नवखा कोर्डोबा तर कमालीचा घाबरून जातो. अल्वरेंगा त्याला पाणी बाहेर काढण्याच्या कामाला लावतो; पण कितीही पाणी उपसलं तरी बोट पाण्याने भरतच चाललेली असते. बोट स्थिर ठेवणं, जाळं आत ओढणं आणि पाणी बाहेर टाकणं, सगळं एकाच वेळी करणं अशक्य असतं. त्यामुळे अल्वरेंगा तातडीने एक टोकाचा निर्णय घेतो- जाळं कापून टाकायचं आणि बोट माघारी वळवायची. कुठल्याही मच्छीमारासाठी जाळं कापण्याचा निर्णय अगदी शेवटचा असतो. तशीच वेळ आल्याशिवाय हजारो डॉलर्स किमतीचं आणि ज्यावर आपलं पोट अवलंबून आहे, ते जाळं कापण्याचा निर्णय कुणी घेत नाही. अल्वरेंगा तर नाहीच नाही. पण त्याच्या मते आता ती वेळ आलेली असते. तो फार विचार न करता जाळं कापून टाकतो आणि कंपासच्या साह्याने पूर्वेकडची किनार्‍याची दिशा पकडतो. हे थोडं अघटित घडलं खरं, पण आता लवकरच या वादळातून सहीसलामत बाहेर पडून मित्रांसोबत चिकन तंगडी हाणत असू, असा विचार करून अल्वरेंगा बोट हाकण्यावर लक्ष केंद्रित करतो.

नोव्हेंबरमध्ये तसाही समुद्र रासवट असतो; पण आजचं प्रकरण साधंसुधं नाही, हे तोवर त्यांच्या लक्षात आलेलं असतं. तब्बल दहा-दहा फुटी लाटा एखाद्या सर्फिंग बोर्डप्रमाणे त्यांची बोट वर उचलून पुन्हा खाली टाकत असतात. अल्वरेंगाच्या जागी आणखी कोणी असतं तर बोट दहा मिनिटांत उलटली असती हे नक्की. बोटीच्या हेलकाव्यांमुळे कोर्डोबाला एका जागी स्थिर राहता येत नसतं. त्यामुळे पोटात ढवळून तो सतत ओकत असतो, रडत असतो आणि जमेल तसं बोटीतलं पाणी बाहेर काढत असतो. मात्र, अल्वरेंगा म्हणजे समुद्रावरच वाढलेला जीव असल्यामुळे तो त्या वादळाचा स्वभाव समजून घेत त्याच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असतो. ‘प्रत्येक वादळाचा एक पॅटर्न असतो. जणू मोर्स कोडच. तो समजून घेतला की वादळातून तरून जाता येतं’, अशी अल्वरेंगाची अनुभवातून आलेली थिअरी असते. ती त्याला इथेही उपयोगी पडते.

पहाट होते. अल्वरेंगाचा कंपास सांगत असतो की, ते योग्य दिशेने चालले आहेत. सगळं काही सुरळीत झालं तर पाच-सहा तासांत किनार्‍याला पोहोचू असा त्याचा अंदाज असतो... आणि नेमकी तेव्हाच बोटीची मोटार आचके द्यायला सुरुवात करते. सुरुवातीला विचित्र घरघर ऐकू येते आणि थोड्याच वेळात मोटार बंदच पडते. आता मात्र अल्वरेंगालाही धोक्याची जाणीव होते. किनारा जवळ असला तरी एवढ्या वादळात, मोटार बंद पडलेल्या अवस्थेत आणि हातात कोणतंही वल्हं नसताना किनार्‍यापर्यंत पोहोचणार कसं? बोट वारं नेईल त्या दिशेने भरकटत जाण्याला पर्यायच नाही. अल्वरेंगा तातडीने रेडिओ उचलतो आणि किनार्‍यावर बोटीच्या मालकाला संदेश पाठवतो : ‘‘विली, आमची मोटार बंद पडली आहे. आम्ही किनार्‍यापासून फार लांब नाही, पण वादळ खूप जोरात आहे.’’ नशिबाने बोटीचा मालक विली रेडिओजवळच बसलेला असतो. तो लगेचच उत्तर देतो, ‘‘तुझं नक्की ठिकाण सांग, लगेच मदत घेऊन येतो.’’ पण अल्वरेंगाचा जीपीएस बंद पडलेला असतो. तो विलीला ते सांगतो, ‘‘आमची पुरती वाट लागली आहे. लवकर या, नाही तर...’’

किनार्‍यावरच्या लोकांनी ऐकलेले अल्वरेंगाचे हे शेवटचे शब्द ठरतात.

अल्वरेंगाला भीती असते त्यानुसारच वादळी वार्‍यांमुळे बोट किनार्‍यापासून दूर भिरकावली जात असते. मोटार बंद असताना बोटीचा तोल सावरण्यासाठीही त्याला जिवाचं रान करावं लागत असतं. पण आता आपले साथीदार थोड्याच वेळात आपली सुटका करणार याची खात्री दोघांनाही असते, पण तोवर तरी बोट तग धरेल का याची अल्वरेंगाला भीती वाटू लागते. शेवटी तो आणखी एक कठोर निर्णय घेतो- बोटीतली सगळी मासळी समुद्रात फेकून देण्याचा. ते केल्यावर तरी बोट थोडी स्थिर आणि पाण्याच्या वर राहील असा त्याचा अंदाज असतो. जास्त विचार न करता दोघं मिळून मासळी बाहेर फेकायला सुरुवात करतात. एवढे प्रचंड मासे फेकून द्यायलाही त्यांना तास लागतो. त्याच्या अंदाजानुसार बोटीचे हेलकावे काहीसे कमी होतात; पण तेवढ्यात त्यांना दुसरा धक्का बसतो. बोटीतला रेडिओही बंद पडतो. बचाव दलाशी संपर्क साधण्याचा मार्ग पूर्ण बंद होतो आणि वादळ तर बोटीला झपाट्याने आत समुद्रात ओढत असतं. इतका वेळ कोर्डोबाला समजावणार्‍या अल्वरेंगालाही रडू फुटावं अशी परिस्थिती आता आलेली असते.

इकडे अल्वरेंगाच्या बोटीचा मालक विली आणि इतर काही मित्रमंडळी तातडीने बोटी समुद्रात घालतात; पण बराच वेळ शोध घेऊनही त्यांना अल्वरेंगाचा पत्ता लागत नाही. वादळाचं अक्राळविक्राळ रूप पाहता जास्त आत बोटी घालणंही शक्य नसतं. सलग दोन दिवस शक्य तितका सगळा परिसर हे लोक धुंडाळतात, सरकारी मदतीने विमानाने पाहणी केली जाते; पण अल्वरेंगाची बोट गायब असते. एरवी कोणत्याही मच्छीमार बोटीसाठी दोन दिवस शोधाशोध करण्याची पद्धत असते, तरीही माणूस सापडला नाही तर तो मेला असं गृहीत धरलं जात असतं; पण अल्वरेंगाच्या बाबतीत मात्र अपवाद घडतो. त्याच्यासारख्या कसबी नाविकाची बोट उलटेल यावर कुणाचाच विश्‍वास बसत नाही. सार्‍यांचं अल्वरेंगावरचं प्रेमही कदाचित त्याला कारणीभूत असतं. त्यामुळे वादळ थंडावल्यावर थोड्या दिवसांनी पुन्हा शोधमोहिमा काढल्या जातात; पण व्यर्थ! समुद्राने जणू अल्वरेंगा आणि कोर्डोबाला गिळून टाकलेलं असतं. अखेर नाइलाजाने शोध थांबवला जातो. अल्वरेंगाच्या मित्रांच्या मनात मात्र कुठे तरी आशा असते, की तो इतक्या सहजासहजी हार मानणं शक्य नाही. तो नक्कीच जिवंत असणार.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

…त्यांचा विश्‍वास अनाठायी नसतो. सहा दिवस उलटून गेलेले असतात, पण अल्वरेंगा आणि कोर्डोबा दोघंही जिवंत असतात. एवढ्या वादळात, मुसळधार पावसात आणि कडाक्याच्या थंडीत हे दोघं कसा टिकाव धरू शकतात, हे एक आश्‍चर्यच. मासळी बाहेर फेकल्यावर रिकाम्या झालेल्या आइसबॉक्समध्ये शरीराची मुटकुळी करून एकमेकांना चिकटून ते दोघं पडून राहिलेले असतात. बोटीतलं पाणी उपसून उपसून कोर्डोबा अर्धमेला झालेला असतो. त्याचं मनोधैर्य तर पार रसातळाला गेलेलं असतं. ‘आता आपण नक्कीच मरणार. आपल्या नशिबात अतिशय वेदनादायी मृत्यू लिहिलेला आहे’, असा जप कोर्डोबा सतत करत असतो. अल्वरेंगा मात्र अजून हिंमत हरलेला नसतो. लवकरच एखादं बचाव दल आपली सुटका करेल किंवा एखादं मोठं जहाज आपल्याला पाहील अशी त्याला आशा असते.

अखेर आठवड्याभराने वादळ शांत होतं. त्यानंतर दोन टोकांच्या भावना अल्वरेंगा आणि कोर्डोबाला व्यापून असतात. एकीकडे वादळापासून सुटका झाल्याचा आनंद आणि दुसरीकडे अथांग समुद्रात एकटेच अडकून पडल्याची भीती. आता जे समोर येईल त्याला धीराने तोंड देणं एवढंच हातात असतं. जवळून एखादं मोठं जहाज गेलं तर त्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी काय करायचं याचा अल्वरेंगा विचार करून ठेवतो. दिवसभरात एखादं तरी जहाज जवळून जाईल अशी त्याला खात्री असते. दोन दिवस वाट पाहिल्यावर आणि अनेकदा चुकीचे इशारे मिळून निराशा झाल्यावर अखेर लांबवर एक जहाज त्यांच्या नजरेच्या टप्प्यात येतं, पण दुर्दैवाने ते बोटीच्या दिशेने येत नसतं. कितीही प्रयत्न करूनही त्या जहाजावरच्या लोकांचं लक्ष वेधून घेणं या दोघांना शक्य होत नाही. पहिल्यांदाच अल्वरेंगाच्या पोटात भीतीने गोळा येतो. आता पुढे काय? जीपीएस-रेडिओ-मोटार आणि खाण्या-पिण्याचा साठा यातलं काहीच साथीला नसताना समुद्राच्या मध्यात भिरकावलं जाण्याचा अर्थ काय हे त्याला चांगलं माहिती असतं. बोट उलटी होण्याचा अवकाश, शार्क्सच्या झुंडी एका क्षणात आपला चट्टामट्टा करून टाकतील, याची त्याला खात्री असते. आणि बोटीत असूनही उपयोग काय?

वादळ थांबल्यावर दुसरे धोके समोर उभे ठाकतात. उन्हाचा जबर तडाखा या दोघांना भाजून काढायला सुरुवात करतो. त्यापासून वाचण्यासाठी शक्य तितका वेळ आइसबॉक्समध्ये घालवायचा असं हे दोघं ठरवतात. पाण्याने वेढलेल्या बोटीमध्ये पिण्याच्या पाण्याचा एक थेंबही शिल्लक नसतो. दोघांच्याही घशाला शोष पडलेला असतो. आवंढा गिळणंही अशक्य झालेलं असतं. पण तरीही अल्वरेंगा कोर्डोबाची समजूत काढतो की, थोडा धीर धर. लवकरच पाऊस पडेल आणि आपली तहान भागेल. तोपर्यंत अल्वरेंगा मासे पकडण्याच्या प्रयत्नाला लागतो. समुद्रात टाकून द्याव्या लागलेल्या प्रचंड मासळीच्या विचाराने त्याचा जीव हळहळतो. खायला मिळालं नाही तर शरीर चरबी जाळायला सुरुवात करतं आणि तग धरून राहतं, असा अल्वरेंगाचा आजवरचा अनुभव असतो, पण त्यासाठी शरीराला पुरेसं पाणी मिळण्याची गरज असते. पाऊस त्यांना सतत हुलकावणी देत असतो. अनेकदा आकाशात ढग जमा होतात, अंधारून येतं; पण पाऊस पडत नाही. तहान-भूक दोघांनाही असह्य होते. कोर्डोबा निपचित पडून राहतो, तर अल्वरेंगा स्वतःची नखं कुरतडत नखाचा कणन् कण पोटात ढकलतो. एकदा नखं कुरतडताना त्याच्या मनात येतं, स्वतःचंच बोट कापून खाल्लं तर? नाही तरी करंगळीचा उपयोग काय असतो? भुकेने त्याच्या मनाचा ताबा घेतलेला असतो; पण सुदैवाने वेळीच तो भानावर येतो. करंगळी कापून पोट तर भरणार नाहीच, उलट रक्तस्रावाने आपण मरून जाऊ, हे त्याच्या लक्षात येतं. पण हा विचार डोक्यात आल्यामुळे त्याला पुढच्या धोक्यांची जाणीव होते. आपलं मन स्थिर ठेवणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे, हे त्याला जाणवतं.

अल्वरेंगा हातावर हात धरून बसून राहणारा माणूस नसतो. थोड्याच वेळात त्याला मासे पकडण्याची एक युक्ती सापडते. बोटीच्या जवळून सतत शार्क फिरत असतात. त्यामुळे समुद्रात उतरणं तर लांबच, हातही जास्त काळ समुद्रात ठेवणं शक्य नसतं. पण अल्वरेंगा बोटीला चिकटून बोटीचं एखादं उपकरण असल्यासारखाच हात स्थिर ठेवून थांबून राहतो. त्याच्या हाताला घासून मासे पोहत असतात. आपल्या मुठीच्या टप्प्यात आले की, मूठ बंद करायची आणि मासे पकडायचे, अशी पद्धत तो शोधून काढतो. मासे मिळू लागतात. जवळ आग पेटवायला काहीही साधन नसल्यामुळे दोघंही कच्चे मासे खाऊ लागतात. अजूनही पावसाचा पत्ता नसतो. त्यामुळे शेवटी अल्वरेंगा स्वतःची लघवी प्यायला सुरुवात करतो. कोर्डोबालाही तो त्यासाठी राजी करतो. हळूहळू दोघांचं एक रूटिन बसतं. सकाळी लवकर मासे पकडायचे, दिवसभर उन्हापासून वाचण्यासाठी आइसबॉक्समध्ये बसून राहायचं आणि संध्याकाळी पुन्हा बॉक्सबाहेर पडून मासे पकडायचे. बोटीच्या आसपास अनेकदा कचरा टाकलेली प्लास्टिकची पुडकीही वाहत येत असतात. कधी कधी त्यात खाण्याचे उरलेसुरले पदार्थ असतात, तर कधी सॉफ्टड्रिंकच्या संपलेल्या बाटल्या. अशा बाटल्यांमध्ये उरलेला सॉफ्टड्रिंकचा एखादा थेंब जिभेवर टाकणं हेही दोघांसाठी स्वर्गसुख ठरतं.

दहा दिवस उलटून जातात तरीही पाऊस येत नाही. पाण्याच्या कमतरतेमुळे दोघंही कासावीस झालेले असतात. डीहायड्रेशनचे भलभलते परिणाम त्यांच्या शरीरावर होऊ लागतात. श्‍वास घ्यायला त्रास होऊ लागतो. घशाला जखमा होतात. अल्वरेंगाला त्यावर एक उपाय सापडतो. समुद्राच्या या भागात प्रचंड कासवं असतात. मध्य अमेरिकेत सगळीकडे कासवाचं मांस आवडीने खाल्लं जातं. पण, अल्वरेंगा विचार करतो की, कासवाचं रक्त पिऊन तहान भागवली तर? थोडा वेळ प्रयत्न केल्यावर एक कासव त्याच्या हाताला लागतं. त्याच्या मासांचे तुकडे वाळवत टाकून अल्वरेंगा खरोखरच त्याचं रक्त पितो. कोर्डोबाला ते दृश्य बघूनही चांगलाच धक्का बसतो. रक्त पिणं म्हणजे पाप, असं त्याला वाटत असतं. अल्वरेंगाने परिस्थितीचं गांभीर्य समजावूनही तो काही केल्या रक्त प्यायला तयार होत नाही. अल्वरेंगाच्या आग्रहावरून तो कसाबसा मांस खाऊ लागतो, पण पाणी न प्यायल्यामुळे त्याची तब्येत खालावत जाते, ती जातेच.

...आणि अखेर पंधरा दिवसांनी अचानक पाऊस कोसळतो. दोघंही आनंदाने नाचू लागतात. बोटीवरच्या सगळ्या बाटल्या-कॅन-भांडी ते पाण्याने भरून ठेवतात. पावसाचं पाणी थेट तोंडात घेऊन मनसोक्त तहान भागवल्यावर मात्र अल्वरेंगा एक नियम तयार करतो- पाऊस थांबल्यावर दिवसातून फक्त तीन कप पाणी प्यायचं. पाऊस पुन्हा कधी पडेल याची शाश्‍वती नसल्यामुळे काटसकर करणं आवश्यक असतं. एक महिना उलटायला येतो. समुद्रावर एकट्याने काढलेला एवढा काळ कोणत्याही माणसाला वेड लावायला पुरेसा असतो. कोर्डोबालाही सतत नैराश्याचे झटके येत असतात. कधी तो घरच्या आठवणींनी व्याकूळ होत असतो, तर कधी ही असहाय अवस्था सहन न होऊन बोटीतून उडी मारण्याची इच्छा त्याच्यात उचंबळून येत असते. आपल्या तरुण सोबत्याची मन:स्थिती सांभाळणं हेही अल्वरेंगासाठी एक मुख्य काम होऊन बसतं. त्यासाठी तो अनेक क्लृप्त्या शोधून काढतो. कधी कधी कोर्डोबा पडल्या पडल्या ओरडतो, ‘‘मला संत्री खावीशी वाटताहेत.’’ अल्वरेंगा म्हणतो, ‘‘मी दुकानात चाललोच आहे. येताना घेऊन येतो.’’ तेव्हापासून दुकानातल्या अशा फेर्‍या रोजच्याच होऊन जातात. त्यांच्या काल्पनिक विश्‍वात हळूहळू दुकानंच नव्हे, तर इतरही अनेक गोष्टी दाखल होतात. प्रत्यक्ष आयुष्यात त्यांच्याकडे जे नसतं ते या जगात अवतरतं. लवकरच अल्वरेंगाच्या लक्षात येतं की, कोर्डोबाच्याच नव्हे, तर आपल्याही मानसिक स्वास्थ्यासाठी ते गरजेचं आहे.

अर्थात काल्पनिक जगात वावरताना अल्वरेंगाला वास्तवाचा विसर पडत नाही. आपल्याकडे भरपूर खाणं असायला पाहिजे, या इच्छेने तो झपाटलेला असतो. त्यातूनच त्याला आणखी एका खाद्याचा शोध लागतो. त्यांच्या बोटीवरून अनेक पक्षी उडत असतात. बोटीवरचं उघडं पाणी या पक्ष्यांच्या विष्ठेने खराब होऊ नये म्हणून त्यांना हाकलत राहणं हे अल्वरेंगाचं एक कामच असतं. पण, एकदा एक पक्षी बोटीच्या काठावर येऊन बसतो तेव्हा त्याला सुचतं की, या पक्ष्यांना पकडण्याचा प्रयत्न का करू नये? बरेच टक्केटोणपे खाल्ल्यावर अखेर एक पक्षी अल्वरेंगाच्या हाताला लागतो. लवकरच तो पक्षी पकडण्यातच नव्हे, तर आइसबॉक्समध्ये बसल्या बसल्या केवळ आवाजावरून पक्षी कोणता आहे, तो केवढा आहे, हे ओळखण्यात तो तरबेज होऊन जातो.

दिवस उलटत असतात. बोटीवर ना घड्याळ असतं ना फोन. नेमके किती दिवस उलटले हे अल्वरेंगा चंद्राच्या कलेवरून मोजत असतो. त्या दिवशी त्याच्या हिशोबानुसार ख्रिसमसच्या आदली संध्याकाळ असते. त्यानिमित्त दोघंही एक वेगळा पक्षी मारून खास जेवण करत असतात. पण जेवता जेवता अचानक कोर्डोबा कळवळतो. त्याच्या पोटातून कळ येते. तोंडातून फेस यायला लागतो. पोट बिघडतं. ते कोर्डोबा खात असलेल्या पक्ष्याची आतडी तपासतात, तर त्यात त्यांना एक साप सापडतो. कोर्डोबा मनाने घेतो, की ‘सापाचं विष माझ्या शरीरात पसरायला सुरुवात झाली असणार. आता मी मरणार.’ अल्वरेंगाही थोडा घाबरतोच; पण नशिबाने तसं काही घडत नाही. दोन दिवस उलट्या-जुलाब झाल्यावर कोर्डोबाच्या तब्येतीला आराम पडतो, पण त्यानंतर पक्ष्यांचं मांस खायचं कोर्डोबा साफ नाकारतो.

दीड महिना उलटतो. पुन्हा एकदा त्यांची बोट एका छोट्या वादळात सापडते, पण वादळासोबतच पाऊसही आल्याने दोघांना तक्रार करायला जागा नसते. बोटीवरचा कमी झालेला पाणीसाठा पुन्हा भरून निघतो. पाणी प्यायल्यामुळे डीहायड्रेशन कमी झालं की, त्या दोघांचं बोलणंही वाढत असतं. या गप्पांमध्ये जशा काल्पनिक विश्‍वातल्या सफरी असतात, तशाच गतायुष्यातल्या चुकांची उपरतीही असते. गेली सात-आठ वर्षं घरापासून लांब असलेल्या अल्वरेंगाच्या मनात आई-वडिलांना अंतर दिल्याचा, मुलीला सोडून आल्याचा अपराध भाव असतो. एरवी देवाबिवाला फारसा न मानणारा अल्वरेंगा कोर्डोबामुळे किमान प्रार्थना म्हणताना डोळे मिटू लागलेला असतो; पण तरीही कोर्डोबाचा मुख्य भर जसा प्रार्थनेवर असतो, तसा अल्वरेंगाचा भर स्वतःच्या सकारात्मकतेवर आणि यातून बाहेर पडण्याचे किंवा आहे तो काळ अधिक सुकर करण्याचे उपाय शोधण्यावर असतो. जशी परिस्थिती बदलेल तसा तो त्यात स्वतःला जुळवून घेत असतो. 

कोर्डोबा मात्र पुढे पुढे खचतच जातो. पक्षी खाणं त्याने सोडलेलंच असतं, पण हळूहळू मासे खाणंही तो कमी करून टाकतो. एके दिवशी अचानक तो अल्वरेंगाला विचारतो, ‘‘मी मेल्यावर तू मला खाशील का?’’ अल्वरेंगा त्याची चेष्टा करतो, ‘‘तुझ्या अंगात आता मांस कुठे राहिलंय? तुला खाऊन मला काय मिळणार?’’ अल्वरेंगा त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न करतो की, खात राहिलास तर तू मरणार नाहीस; पण त्याला ते पटत नाही. एकदा कोर्डोबाच्या मनात येतं, असं मरणाची वाट बघत राहण्यापेक्षा सरळ शार्कच्या झुंडीसमोर उडी मारलेली काय वाईट! एकदा अल्वरेंगाचं लक्ष नाही हे बघून तो उडी मारायचा प्रयत्नही करतो; पण तेवढ्यात अल्वरेंगा त्याला सावरतो. पुढे काही दिवस कोर्डोबा खाण्यासाठीही जागचा उठत नाही. अल्वरेंगाच त्याला खायला घालतो, पाणी पाजतो; पण त्याची जगण्याची इच्छा आणि टिकून राहण्याची ताकद कमी कमी होत चालल्याचं अल्वरेंगालाही जाणवू लागलेलं असतं.

…बोट भरकटून तीन महिने उलटून गेलेले असतात. एके दिवशी कोर्डोबा नेहमीपेक्षा जास्तच थकलेला वाटतो. बहुतेक त्याला आतून मरणाची चाहूल लागलेली असते. आता मी फार काळ जगत नाही, असं तो सतत पुटपुटत राहतो. अखेर अल्वरेंगाचाही धीर सुटतो. तो कोर्डोबावर ओरडतो, ‘‘तू मरू शकत नाहीस. तुला जगायला पाहिजेस. तू मेलास तर मी एकटा काय करू इथे?’’ पण हा उद्रेक ऐकायलाही कोर्डोबा जिवंत नसतो. त्याचे प्राण गेलेले असतात. अल्वरेंगा धाय मोकलून रडतो. इतके दिवस दोघांच्या टीमचं नेतृत्व अल्वरेंगाकडे असलं तरी कोर्डोबाची त्याला सोबत असते. शिवाय, आपल्यापेक्षा लहान आणि आपल्या जबाबदारीवर आलेला मुलगा म्हणून त्याची काळजी घेण्याचंही काम अल्वरेंगा पार पाडत असतो. आता अचानक ते काम संपून जातं. वर आकाश आणि खाली समुद्र यामध्ये आता अल्वरेंगा पूर्ण एकटा पडतो. आपल्या मृत सोबत्याचं शरीर समुद्रात फेकून देण्याचं धाडसही त्याला होत नाही. हा धक्का सहन करण्याचा सोपा मार्ग त्याला सापडतो, तो म्हणजे असं घडलंच नाही असं मानणं! कोर्डोबा मेलाच नाहीये असं मानून तो त्याच्याकडे बघत बोलत राहतो. स्वतःच कोर्डोबाच्या वतीने उत्तरंही देतो. एक आठवडा उलटतो. कोर्डोबाचं शरीर तसंच पडून असतं. एके रात्री तार्‍यांकडे पाहत अल्वरेंगा कोर्डोबाच्या शेजारी पहुडलेला असतो. त्याच्याशी बोलत असतो. अचानक झोपेतून जाग आल्याप्रमाणे त्याला जाणवतं की, आपण एका मृतदेहाशी बोलतो आहोत. आपलं मानसिक संतुलन बिघडलं तर नाही ना अशी शंका त्याला येऊ लागते. शेवटी धीर गोळा करून तो कोर्डोबाचा मृतदेह पाण्यात ढकलतो.

चार महिने उलटतात. अल्वरेंगा जिवंत असतो, पण एकटेपणाचा धक्का त्याला अजून पचवता आलेला नसतो. कोर्डोबाच्या आठवणीने त्याला अनेकदा रडू फुटतं. आपण जगलो-वाचलोच तर कोर्डोबाच्या आईला कसं तोंड दाखवणार याची चिंताही त्याला सतत खात असते. आपला नेहमीचा उत्साह, खंबीरपणा, जिवावरच्या संकटातही जागी असणारी विनोदबुद्धी आपल्याला सोडून चालली की काय, अशी शंका त्याला येऊ लागते.

पण तसं होत नाही. अल्वरेंगा लवकरच याही दुःखातून बाहेर पडतो, एकटेपणाला सरावतो; एवढंच नव्हे, तर त्याचा आनंदही घ्यायला लागतो. एकटं असण्याचे काही फायदे असल्याचंही त्याच्या लक्षात येऊ लागतं. मिळणार्‍या अन्नपाण्याचे दोन भाग करण्याची आता गरज नसते. शिवाय कोर्डोबाला समजावत राहण्यात, जी शक्ती खर्च होत असते तीही आता वाचते. त्या बोटीवर त्याचं त्याचं असं एक जग तयार होतं.

या प्रवासात समुद्रातलं एक वेगळंच जग त्याच्यासमोर उलगडत असतं. पट्टीचा मच्छीमार असूनही त्याला आजवर ते कधीही बघायला मिळालेलं नसतं. आकाशातले ग्रह-तारे त्याला नव्याने दिसू लागतात. चंद्राच्या कलांसोबत त्याचं जगणं जोडलं जातं. कधी एखादा महाकाय देवमासा त्याला दिसतो, तर कधी एखादा अनोखा पक्षी. शार्कची फौज तर कायमच त्याच्या बोटीच्या चहुबाजूंनी घोंघावत असते. एकदा त्याला बोटीपासून पंचवीस फुटांवर एक मोठ्या माशासारखा आकार वाहून जाताना दिसतो. त्याला लगडलेले मासे आणि वरून उडणारे पक्षी यामुळे तो मेलेला मासा असावा असं त्याला वाटतं. त्याची उत्सुकता एवढी वाढते की, मागचा-पुढचा विचार न करता तो समुद्रात उडी टाकतो. पोहायला लागल्यावर त्याच्या लक्षात येतं की, आपल्या शरीरात समुद्रामध्ये पोहण्याची ताकद उरलेली नाही आणि स्नायूंना व्यायामही राहिलेला नाही. तो कसाबसा पोहत त्या गोष्टीपर्यंत जातो. जवळ गेल्यावर लक्षात येतं की, तो मासा वगैरे नसून थर्माकोलचा मोठा तुकडा आहे. त्या तुकड्याचा उपयोग होईल, असा विचार करून तो तुकडा घेऊन परत बोटीकडे जायला निघतो, पण आपण बोटीपर्यंत पोहोचू की नाही, याची त्याला खात्री वाटेनाशी होते. आपण अशी अविचारी उडी कशी काय घेतली याचं त्याला आश्‍चर्य वाटतं. वाटेत शार्कनी हल्ला केला तर काय, याचाही विचार त्याने उडी मारताना केलेला नसतो. अखेरीस कसाबसा तो बोटीत येऊन चढतो आणि सुटकेचा नि:श्‍वास टाकतो.

पाच महिने उलटून गेल्यावर पहिल्यांदा सुटकेची खरीखुरी आशा तयार होते. अल्वरेंगा आइसबॉक्समध्ये झोपलेला असताना त्याला मोठमोठ्यांदा संगीत वाजत असल्याचा आवाज ऐकू येतो. उठून बघतो तर एक भली मोठी क्रूझ शेजारून चाललेली असते. अल्वरेंगा खच्चून ओरडतो, दिसेल ती वस्तू बोटीवर आपटून आवाज करतो, वस्तू फेकून मारतो; पण कशाचाच उपयोग होत नाही. ते प्रचंड धूड अल्वरेंगाची दखलही न घेता तिथून निघून जातं. अल्वरेंगा त्याकडे अविश्वासाने बघतच राहतो. एखादी बोट जवळ आली की, आपली सुटका नक्की, असं अल्वरेंगाला आतापर्यंत वाटत असतं, तो भ्रम आता दूर होतो. बोट जवळ आली तरी तिला आपण दिसूच असं नाही, हा नवाच हृदयात धडकी भरवणारा शोध त्याला लागतो. त्याची उरलीसुरली आशाही संपून जाते. आता किनार्‍याला लागलो तरच आपण वाचणार, हे अल्वरेंगाला कळून चुकतं.

थोडक्यात, याचा अर्थ असा की, आता बचावण्याची शक्यता फारच कमी आहे! आपण समुद्रात नेमके कुठे आहोत, इथून सगळ्यात जवळचा किनारा कुठे आहे, आपण त्याच दिशेने चाललो आहोत की नाही, कशाचाच त्याला पत्ता नसतो. अचानक त्याला जाणवतं की, आपण मरणाचे दमलेलो आहोत. आपल्या मनातली ऊर्जाही संपत चालली आहे. किती तरी काळ तो निराशेच्या गर्तेत पडून राहतो. त्या खोल अंधारातून त्याला बाहेर काढते ती त्याची मुलगी. आता १३ वर्षांची झालेली त्याची मुलगी सतत त्याच्या डोळ्यांसमोर येत असते. आपण तिला सोडून पळून गेल्याबद्दल तिची माफी मागण्यासाठी तरी आपण जगलंच पाहिजे, असं तो स्वतःला सांगत राहतो.

सहा महिने उलटतात. तीच बोट, तेच रूटिन, तोच एकटा प्रवासी. अल्वरेंगाला आता केबिन फिवरचा त्रास होऊ लागलेला असतो. बोटीवर अडकून पडल्यामुळे होणारा क्लॅस्ट्रोफोबिया. त्यावरही अल्वरेंगा उपाय शोधून काढतो. आपल्या आसपासच्या समुद्राची त्याला आता नीट ओळख झालेली असते. शार्क कधी येतात, कधी लांब असतात हे त्याला कळू लागलेलं असतं. शार्क आसपास नाहीत असं पाहून थोड्या थोड्या दिवसांनी तो समुद्रात उतरायला सुरुवात करतो. त्या दोन-पाच मिनिटांच्या पोहण्यामुळे त्याला जो काही आनंद मिळतो तो अवर्णनीय असतो. सुटकेची इच्छा कितीही तीव्र असली तरी या एकान्तातल्या आयुष्याचीही वेगळी मजा आहे, असं अल्वरेंगाला जाणवतं. आसपास कोणीही माणसं नाहीत, त्यामुळे नातेसंबंधांची कटकट नाही, चुका नाहीत की आपल्या हातून काही पाप घडेल याची भीती नाही. फक्त आपण आणि आपण..

एकदा अल्वरेंगा आइसबॉक्समध्ये झोपला असताना अचानक त्याच्या बोटीला धक्के बसू लागतात. त्याचं मन उसळी खातं. बोट किनार्‍याला लागली की काय? पण उठून पाहतो तर एक देवमासा त्याच्या बोटीला खेटून चाललेला असतो. नेहमीच्या माशांपेक्षा तो किती तरी मोठा असला तरी ते एक पिल्लू असतं. हे धूड आपली बोट उलटवणार तर नाही ना अशी त्याला शंका येते. पण तो मासा फक्त बोटीच्या आसपास फिरत राहतो. तो अल्वरेंगाला त्रासही देत नाही आणि तिथून निघूनही जात नाही. दिवसरात्र तो त्याच्या बोटीसोबतच पोहू लागतो. थोड्या दिवसांतच अल्वरेंगाला त्याची सोबत आवडू लागते. तो त्या व्हेलच्या बच्च्याशी गप्पा मारू लागतो. मनात साचलेल्या गोष्टी त्याला सांगू लागतो. जमिनीवरचे-समुद्रावरचे स्वतःचे अनुभव ऐकवू लागतो. त्याच्यामुळे अल्वरेंगाचं एकटेपणाचं दुःख किती तरी कमी होतं.

अशी सोबत असेल तर आपण कितीही दिवस समुद्रात काढू शकतो असं अल्वरेंगाला वाटतं. पण हा पाहुणा एक दिवस आला तसा निघून जातो आणि अल्वरेंगा पुन्हा एकटा पडतो. कुणाशी तरी बोलायला हवं, या ऊर्मीतून तो खाण्यासाठी पकडलेल्या एका पक्ष्याशीच गप्पा मारू लागतो. त्याला न मारता त्याला पाळीव पक्षी बनवतो.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

एक वर्ष उलटतं. अल्वरेंगा अजूनही जिवंत असतो. समुद्रातल्या या पर्यावरणात रोज होणारे बदल बघत राहणं हेच आता आपलं कायमचं आयुष्य आहे की काय, असं त्याला वाटू लागलेलं असतं. काही दिवसांनी अचानक समुद्रातले मासे कमी होऊ लागतात, पक्षी कमी होतात. त्याच्याकडचा अन्नसाठा झपाट्याने संपत जातो. त्याने खाण्यासाठी मारून ठेवलेले सगळे पक्षी संपतात, तेव्हा तो नाइलाजाने आपल्या पाळीव पक्ष्याला, पांचोला मारून खाण्याची वेळ त्याच्यावर येते. थोड्या दिवसांनी पिण्याचं पाणीही संपतं. काही दिवस पुन्हा एकदा उपासमार सहन करण्याची वेळ अल्वरेंगावर येते. पण तेही दिवस कसेबसे जातात. त्यातही अल्वरेंगा तग धरून राहतो. पुन्हा पाऊस पडतो. पुन्हा मासे दिसू लागतात. आधीपेक्षा मोठ्या आकाराचे पक्षी अल्वरेंगाच्या बोटीवर येऊन विसावतात. हा बदल म्हणजे जमीन जवळ आल्याची खूण की समुद्रात आणखी आत शिरल्याची? अल्वरेंगाला ते कळण्याचा काही मार्गच नसतो.

एके दिवशी अल्वरेंगाला एक जहाज आपल्याच दिशेने येताना दिसतं. एवढंच नव्हे, तर डेकवरची माणसं आपल्याकडेच बघत असल्याचंही त्याच्या लक्षात येतं. तो आनंदाने वेडापिसा होतो. आता आपली सुटका होणारच, आता काही अडथळा येऊ शकत नाही, असं म्हणत तो त्या माणसांच्या दिशेने हात करतो. ती माणसंही त्याला हात करतात. आता कोणत्याही क्षणी जीवरक्षक बोटी पाण्यात उतरतील, या आशेने अल्वरेंगा वाट बघत असतो; पण घडतं भलतंच. ती माणसं तशीच ‘अच्छा’ करत असताना बोट त्याच्यापासून दूर निघून जाते. बहुतेक अल्वरेंगा मासेमारीसाठी समुद्रात आला असावा असं त्यांना वाटत असावं. अल्वरेंगाला ही निराशा सहन करणं अशक्य होतं. इतके दिवस आपण काय काय म्हणून सहन केलं नाही! दरवेळी निराशा गिळून आपण पुढच्या संधीची वाट पाहत राहिलो. आणि आता संधी इतक्या जवळ येऊनही आपल्याला हुलकावणी का देते आहे, हे त्याला कळत नाही.

या घटनेने अचानक अल्वरेंगाचा जगण्यातला रस संपून जातो. खाण-पिणं सोडून तो नुसता पडून राहू लागतो. आपण कोर्डोबाला जसं हळूहळू संपत जाताना पाहिलं तसंच स्वतःलाही पाहण्याची वेळ आपल्यावर येणार असं त्याला वाटू लागतं. प्रत्येकाच्या मरणाची सुरुवात वेगळी-अनोखी असणार असं अल्वरेंगाला वाटत असतं. स्वतःच्या मरणाबद्दल त्याला उत्सुकताही असते. कोर्डोबाच्या मरणाची सुरुवात त्याच्या पोटापासून झालेली असते. अल्वरेंगाला जाणवतं, आपले गुडघ्यापासून खालचे पाय बधिर होत चालले आहेत. वरून पाऊस कोसळत असतानाही उठून आडोशाला बसण्याची इच्छाही अल्वरेंगाला होत नाही. पक्षी बोटीवर त्याच्या शेजारी येऊन बसतात, तरीही तो त्यांना पकडायला जात नाही की, त्याच्या अंगावर बसून त्याला चोची मारणार्‍या पक्ष्यांना हाकलत नाही. आपण एक मृतदेहच आहोत असं त्याला वाटू लागतं. पण आता त्याला जाणवतं की, आपण मृत्यूसाठी तयार आहोत. या समुद्रात एक वर्ष आपण टिकून राहिलो हेही कमी नाही. आपलं हे कर्तृत्व कुणाला कळलं नाही तरी बेहत्तर, पण त्यामुळे आपण स्वतःवर जाम खूष आहोत. आता कधीही मेलो तरी सुखाने मरू, असं म्हणत तो जीवनेच्छा सोडून देतो..

…पण नशिबात काही वेगळंच लिहिलेलं असतं. एके संध्याकाळी त्याला जागा येते तर दूरवर प्रकाशच प्रकाश दिसतो. ते जहाज नक्कीच नसतं. एवढे दिवे म्हणजे हे नक्कीच एखादं गाव असणार. हा भास नाही ना याची खात्री करून घेण्यासाठी तो पुन्हा काही वेळाने त्या दिशेला पाहतो. अजूनही दिवे चकाकतच असतात. तो किनारा असतो हे नक्की. पण बोट किनार्‍यापर्यंत नेणार कशी? आता नशीबच आपली बोट तिकडे नेऊ शकतं... त्यामुळे त्याचा विचार न करता अल्वरेंगा पडून राहतो. आणखी काही दिवस जातात. एके सकाळी अल्वरेंगा डोकं वर काढतो, तर समोर नारळाच्या झाडांनी व्यापलेलं बेट असतं. अल्वरेंगाच्या छातीचे ठोके वाढू लागतात. नदी असती तर उडी मारून पोहत जाता आलं असतं इतका किनारा जवळ असतो; पण अल्वरेंगाकडे तेवढी शक्ती नसते आणि शार्कच्या हल्ल्याची भीतीही त्याला समुद्रात उतरू देत नाही. पण आता मात्र केवळ वाट बघत राहणं त्याला असह्य होतं. या अस्वस्थतेवर मात करण्यासाठी तो बोटीवर आहे-नाही ते सगळं खायला सुरुवात करतो. पोट तुडुंब भरल्यावरही न थांबता खात राहतो. अखेर बोट इतकी जवळ येते की, आता तो त्या पाण्यात उभाही राहू शकत असतो.

बोटीतून बाहेर पडून अल्वरेंगा चालत किनार्‍यापर्यंत येतो. आपण चालू शकतो हेही त्याला विसरायला झालेलं असतं. आता आयुष्य म्हणजे बोटीच्या पंचवीस फुटांतली धडपड न राहता आपण मुक्त झालो आहोत, या आनंदाने तो तिथेच कोसळतो. त्याला जाग येते तेव्हा दुसर्‍या दिवशीची सकाळ झालेली असते. या बेटावर माणसं राहतात की, ते निर्मनुष्य आहे की इथे नरभक्षक आदिमानव राहतात याची अल्वरेंगाला कल्पना नसते. पण इथे कुणीही राहत नसलं तरीही मी आनंदाने इथे जगेन, असा विचार त्याच्या मनात येतो. पण तशी वेळ येत नाही. थोड्याच वेळात बेटावर राहणार्‍या एका आदिवासी कुटुंबाला तो सापडतो.

तारीख असते ३० जानेवारी २०१४. एल सॅल्वडोरपासून तब्बल १०,००० किलोमीटर भरकटत अखेर ऑस्ट्रेलियाच्या ईशान्येला असलेल्या मार्शल आयलंड्स बेटसमूहामधल्या एका छोट्या बेटावर अल्वरेंगा येऊन पोहोचलेला असतो. तग धरून राहण्यासाठी समोर येणार्‍या संकटांशी अन् बदलांशी जुळवून घेण्याची माणसाची शक्ती किती कमालीची असते, हे दाखवून देणार्‍या अल्वरेंगाचं नाव इतिहासात कायमचं नोंदवलं गेलेलं असतं.

..................................................................................................................................................................

मृत्यू पाहिलेली माणसं गौरी कानेटकर 

समकालीन प्रकाशन, पुणे

पाने – १४६, मूल्य - २०० रुपये

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......