गोगलगायीवर बसलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर जवाहरलाल नेहरू चाबूक उगारतायंत, असं दाखवणारं शंकर यांचं १९४९ सालचं व्यंगचित्र एनसीईआरटीच्या एका पाठ्यपुस्तकात समाविष्ट होतं. त्यावरून २०१२ साली बराच गदारोळ उडाला. दलितांनी त्याविरोधात निषेध नोंदवला आणि कलात्मक स्वातंत्र्याच्या निकषावर सवर्णांनी या निषेधाचा प्रतिकार केला. त्यानंतर अभ्यासक व व्यंगचित्रकार उन्नमती श्याम सुंदर यांनी इंग्रजी वर्तमानपत्रांमधील आंबेडकरांवरच्या व्यंगचित्रांचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यातून भारतातील आघाडीच्या प्रकाशनांमधल्या शंभरहून अधिक व्यंगचित्रांचं ‘No Laughing Matter : The Ambedkar Cartoons, 1932-1956’ हे संकलन तयार झालं. शंकर, अन्वर अहमद व आर. के. लक्ष्मण इत्यादी व्यंगचित्रकारांनी रेखाटलेली ही व्यंगचित्रं आहेत. आंबेडकरांना सहन करावा लागलेला विकृत व अविचारी वैरभाव या चित्रांमधून उघड होतो. प्रत्येक व्यंगचित्रासोबत केलेल्या धारदार भाष्यामुळे आंबेडकरांसारख्या ऐतिहासिक अन्याय सहन केलेल्या माणसाचं वास्तविक चरित्रही उजेडात येतं. ‘No Laughing Matter : The Ambedkar Cartoons, 1932-1956’ या मूळ इंग्रजी पुस्तकाचा ‘हसण्यावारी नेऊ नका’ हा मराठी अनुवाद कादंबरीकार अवधूत डोंगरे यांनी केला असून तो नुकताच मधुश्री पब्लिकेशनने प्रकाशित केला आहे. या पुस्तकाला मूळ लेखकाने लिहिलेल्या मनोगताचा हा संपादित अंश...
..................................................................................................................................................................
मी लहानाचा मोठा होत होतो तेव्हा माझ्यासाठी डॉ. भीमराव रामजी आंबेडकर हे कायम एक दूरस्थ नाव होतं. त्यांनी दलितांसाठी काहीतरी चांगलं केलं, एवढीच माहिती मला होती. विजयवाडामध्ये १९९०च्या दशकात मी शाळेत गेलो, तेव्हा आमच्या शालेय अभ्यासक्रमाचा अविभाज्य भाग असलेले ‘बापूजी’ व ‘चाचा’ नेहरू यांच्याशी माझी चांगली ओळख झाली. आंबेडकरांचं नाव मात्र वर्गात कधी ऐकायला मिळत नसे, अगदी सामाजिक विज्ञानाच्या तासालाही नाही. गांधींच्या नावाशी परिचय झालेला असल्यामुळे बारावीत मी त्यांचं आत्मचरित्र- ‘माझे सत्याचे प्रयोग’ २० रुपयांना विकत घेतलं. ते बरंचसं कंटाळवाणं होतं. दक्षिण आफ्रिकेत त्यांना ट्रेनच्या डब्यातून बाहेर काढण्यात आलं, तो प्रसिद्ध प्रसंग वगळता मला त्या पुस्तकात फार काही रस वाटला नाही. माझे वडील भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये अतिशय सक्रिय असल्यामुळे घरात मी वारंवार लेनिन व मार्क्स ही नावं ऐकत होतो, पण आंबेडकरांचं नाव तिथेही कधी कानावर पडायचं नाही.
ही स्थिती कॉलेजातही कायम राहिली. नागार्जुनसागरमधल्या ‘आंध्र प्रदेश रेसिडेन्शिअल डिग्री कॉलेजा’त मी प्रवेश घेतला. दलित व आदिवासी विद्यार्थ्यांसाठीचं हे एक सामाजिक कल्याण महाविद्यालय आहे. तर, इथेही ‘आंबेडकर’ हे नाव क्वचितच ऐकू यायचं. एम.ए. करण्यासाठी २००२ साली मी पाँडिचेरी विद्यापीठात गेलो, तेव्हा एका मित्राने मला आंबेडकरांचं लेखन व भाषणं वाचावीत असं सुचवलं. भारतासमोरच्या सर्व सामाजिक आणि राजकीय समस्यांवरचे उपाय आंबेडकरांकडे होते, असं तो मित्र म्हणाला. मग मी ‘जातिव्यवस्थेचं उच्चाटन’ची तेलुगू प्रत विकत घेतली. विख्यात वकील, नागरी अधिकार कार्यकर्ते व आंबेडकरवादी बोज्जा थारकम यांनी तेलुगू भाषांतर केलं होतं. सुरुवातीला मला आंबेडकरांचा युक्तिवाद कळला नाही. कदाचित तेव्हा माझ्यासाठी ते विद्वज्जड ठरलं असेल.
लहानपणापासून मला रेखांकनाचं अंग होतं. पाँडिचेरी विद्यापीठात माझे एक शिक्षक ‘मुद्रित माध्यमं व संदेशन’ यावरचा पेपर शिकवायचे. त्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून विद्यार्थ्यांनी एक टॅब्लॉइड काढणं अपेक्षित होतं. त्यात काही लेखांसोबतची चित्रं काढण्याची सूचना मला करण्यात आली. नंतर, २००४ साली मी इतिहासात एम.ए. करण्यासाठी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) दाखल झालो, तेव्हा माझ्या वरच्या वर्गातला अनूप कुमार मला भेटला. त्याने विद्यापीठातल्या ‘आंबेडकर स्टडी सर्कलच्या इन्साइट’ या द्वैमासिकाची स्थापना केली होती. इन्साइटमध्ये आणि विद्यापीठाच्या आवारातल्या इतर नियतकालिकांमध्ये मी व्यंगचित्रं काढू लागलो. तेव्हाही आंबेडकरांमधला माझा रस क्षणिक स्वरूपाचाच होता. मग मी एम.फिल.साठी नोंदणी केली – ‘वासाहतिक काळातील भारतीय व्यंगचित्रं’. त्यातही तेलुगू भाषेतल्या व्यंगचित्रांवर विशेष लक्ष केंद्रित केलं जाईल, असा माझा विषय होता.
..................................................................................................................................................................
हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये खरेदीसाठी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5282/Hasanyawari-Neu-Naka
..................................................................................................................................................................
दफ्तरांचं संशोधन करत असताना सामाजिक सुधारणा, जात व अस्पृश्यता यांवरची व्यंगचित्रं योगायोगाने माझ्या समोर आली. सामाजिक प्रश्नांवर मांडणी करण्यासाठी एक कलारूप म्हणून व्यंगचित्रकलेचा वापर कसा झाला, हे मला ‘राष्ट्रवादाची व उपराष्ट्रवादाची दृश्यात्मक अभिव्यक्ती - वासाहतिक आंध्रामधील व्यंगचित्रं, १९१३-१९५३’ या माझ्या एम.फिलच्या लघुप्रबंधादरम्यान (२००९) लक्षात आलं. बाह्य तपासनीसाने माझा लघुप्रबंध नाकारला आणि त्यावर नकारात्मक अहवाल दिला, तेव्हा मी जात व भेदभावाच्या प्रश्नांवर त्वेषाने रेखांकनं करायला लागलो. विद्यापीठातही हे प्रश्न मला भेडसावतच होते. ही चित्रं मी बहुतांशाने जेएनयूमधल्या माझ्या समविचारी मित्रांना दाखवायचो. पण कालांतराने त्यातले अनेक जण लाभदायक अवकाशांच्या शोधात विद्यापीठाच्या आवारातून निघून गेले. फेसबुकच्या माध्यमातून आम्ही संपर्कात राहत होतो. माझी व्यंगचित्रं पाहायला मिळत नसल्याची रुखरुख वाटणाऱ्या मित्रांनी मला चित्रं ऑनलाइन प्रसिद्ध करायला सांगितलं. यामुळे माझं काम व्यापक प्रमाणात लोकांपर्यंत पोचलं. त्यानंतर थोड्याच काळाने ‘राउंड टेबल इंडिया’सारख्या आंबेडकरी संकेतस्थळांवर माझी चित्रं प्रसिद्ध होऊ लागली.
एनसीईआरटीने प्रकाशित केलेल्या बारावीच्या सामाजिक विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकात आंबेडकरांचं वादग्रस्त व्यंगचित्र असल्याची बातमी एप्रिल-मे २०१२मध्ये बाहेर आली. के. शंकर पिल्लई यांनी मुळात २८ ऑगस्ट १९४९ रोजी ‘शंकर्स वीकली’मध्ये प्रकाशित केलेल्या व्यंगचित्राचं पुनर्मुद्रण एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकात करण्यात आलं होतं. परंतु, हे काही मी पाहिलेलं आंबेडकरांसंबंधीचं पहिलं व्यंगचित्र नव्हतं. एम.फिलसाठी काम करत असताना ‘कृष्ण पत्रिका’ या तेलुगू वर्तमानपत्रात १९३३ साली प्रकाशित झालेलं आंबेडकरांवरचं एक व्यंगचित्रही मला सापडलं होतं. तेही मुळात शंकर यांच्या एका व्यंगचित्राचं पुनर्मुद्रण होतं. ‘द टॉवेल, टार-ब्रश अँड द हॅमर’ (टॉवेल, डांबराचा ब्रश आणि हातोडा) या शीर्षकाचं ते व्यंगचित्र पहिल्यांदा ‘हिंदुस्तान टाइम्स’मध्ये (१७ फेब्रुवारी १९३३) प्रकाशित झालं होतं; आता ते या पुस्तकातही समाविष्ट केलेलं आहे (पहिल्या विभागातलं- १९३०चं दशक- पाचवं व्यंगचित्र). तरीही, आंबेडकरांवरच्या किंवा त्यांच्या संदर्भातल्या इतर सर्व व्यंगचित्रांचा तपास करावा आणि त्यावर संशोधन करावं, असा काही माझा कल नव्हता.
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकातील व्यंगचित्रावरून वाद झाल्यानंतर, संबंधित पाठ्यपुस्तकांचं पुनरावलोकन करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष व भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष सुखदेव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. समितीने या विषयावरील अनेक तज्ज्ञांना बोलावलं. ‘नवयान’चे एस. आनंद यांना संपर्क साधण्यात आला, तेव्हा त्यांनी माझं नाव सुचवलं, कारण माझ्या कामाशी त्यांचा परिचय होता. आम्ही दोघेही एनसीईआरटीच्या दिल्लीमधील कार्यालयात एकाच बैठकीला उपस्थित राहिलो, चहा प्यायलो, बिस्किटं खाल्ली आणि बघ्याची भूमिका निभावून परतलो. एकाच व्यंगचित्रावर इतकी तावातावाने चर्चा होत असल्याचं बघितल्यावर मला वाटलं - आंबेडकरांचं चित्रण असलेल्या इतर सर्वच व्यंगचित्रांचा विचार करून बघायला हवा.
अशा प्रकारचं काम अर्थातच आधी झालेलं होतं. (शांतिलाल शाह यांनी संकलित केलेलं) ‘गांधी इन कार्टून्स’ हे पुस्तक नवजीवन ट्रस्टने १९७० साली प्रकाशित केलं होतं, आणि नेहरूंवरची व्यंगचित्रं व्यंगचित्रकार शंकर यांच्या ‘डोन्ट स्पेअर मी, शंकर’ या पुस्तकात स्वतंत्रपणे आलेली होती. चिल्ड्रन्स बुक ट्रस्टने १९८३ साली संकलित व प्रकाशित केलेल्या या पुस्तकाला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची प्रस्तावना होती. आंबेडकरांवरच्या बहुतांश व्यंगचित्रांमध्ये त्यांचं विपरित चित्रण झालेलं असलं, तरी त्यांच्या संदर्भातल्या व्यंगचित्रांचं असं पुस्तक कसं काय नाही, असा विचार माझ्या मनात आला. हा विचार डोक्यात घेऊन मी १९३० सालापासून (या वर्षी पहिली गोलमेज परिषद पार पडली आणि तथाकथित राष्ट्रीय प्रसारमाध्यमांना आंबेडकरांची दखल घेणं भाग पडलं) १९५६ सालापर्यंतची (या वर्षी आंबेडकरांचं निधन झालं) दफ्तरं धुंडाळायला सुरुवात केली.
दिल्लीतल्या गांधी संग्रहालयात गांधी इन कार्टून्सची प्रत विकत घेतल्यानंतर मला धनंजय कीर यांनी लिहिलेलं ‘डॉ. आंबेडकर : लाइफ अँड मिशन’ हे चरित्रही सापडलं. अरुण शौरींचं अतिशय द्वेषबुद्धीने लिहिलेलं ‘वर्शिपिंग फॉल्स गॉड्स’ हे मी विद्यापीठात असताना वाचलेलं आंबेडकरांवरचं पहिलं पुस्तक. त्यात त्यांनी आंबेडकरांना ‘ब्रिटिशांचा दलाल’ संबोधलं आहे. शौरींच्या पुस्तकासंबंधीच्या वादांमुळे दुर्दैवाने मला ते पुस्तक आधी माहीत झालं, परंतु कीर यांच्या पुस्तकाबद्दल मात्र नंतर समजलं. गांधींनी आंबेडकरांवर खूप मोठा अन्याय केला, असं मला कीरांचं पुस्तक वाचल्यानंतर वाटलं. त्याच वेळी दफ्तरांमधून संकलन करत असताना माझ्या लक्षात आलं की, अगदी नियम असल्याप्रमाणे आंबेडकरांचं नकारात्मक चित्रण करताना ‘राष्ट्रवादी’ भारतीय प्रसारमाध्यमांनीही त्यांच्याबाबतीत अन्याय्य भूमिका घेतली.
..................................................................................................................................................................
हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये खरेदीसाठी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5282/Hasanyawari-Neu-Naka
..................................................................................................................................................................
त्याच दरम्यान, जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेला ‘बाबासाहेब आंबेडकर’ (२०००) हा चरित्रपट मी माझ्या कम्प्युटरवर अनेक वेळा बघितला. आंबेडकरांचा एक आफ्रिकी-अमेरिकी मित्र एकदा त्यांना घेऊन न्यूयॉर्कमधल्या चर्चमध्ये जातो, तेव्हा तिथले प्रमुख धर्मोपदेशक इतरांना आंबेडकरांची ओळख करून देताना म्हणतात, ‘आपल्यासारखंच त्यांनाही त्यांच्या देशात भेदभावाला सामोरं जावं लागतं. चला, आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करू’. हे चित्रपटातलं दृश्य पाहून मी सर्वाधिक हेलावून गेलो. कदाचित माझी स्वतःची पार्श्वभूमी दलित ख्रिस्ती असल्यामुळे हे दृश्य मला खोलवर स्पर्श करून गेलं असावं आणि त्यातून मला संशोधनासाठी प्रेरणा मिळाली. आंबेडकरांशी संबंधित व्यंगचित्रं व बातम्या शोधण्याकरिता दफ्तरं धुंडाळायला जाताना मी बरेचदा हे दृश्य बघायचो.
सुरुवातीला मी हैदराबाद, मद्रास, दिल्ली, मुंबई, पुणे व कलकत्ता इथल्या दफ्तरांमधली वर्तमानपत्रं व नियतकालिकं तपासली. काही वेळा तुलनेने कमी प्रसिद्ध ठिकाणी - उदाहरणार्थ आंध्रातल्या प्रकाशम जिल्ह्यामध्ये वेटापालेम इथे असलेलं गांधीवादी ग्रंथालय- मला अचानक काही रत्नं सापडून जायची. मी काय शोधतोय, असं ग्रंथपाल आणि पदाधिकारी मला विचारायचे, तेव्हा मी गांधींवर काम करत असल्याचं सांगायचो. मी आंबेडकरांचं नाव घेतलं असतं, तर माझ्यासाठी ग्रंथालयाची दारं बंद झाली असती, अशी मला भीती वाटायची. तसंही बाबासाहेबांनीसुद्धा १९१७ साली बडोद्यात डोक्यावरचं छप्पर टिकवण्यासाठी पारशी असल्याचा बहाणा करू पाहिला होता, पण त्यांची खरी ओळख उघड झाल्यावर त्यांना हुसकावून बाहेर काढण्यात आलं.
पुस्तक तयार करणं, हे काही माझं पहिलं उद्दिष्ट नव्हतं. आंबेडकरांशी संबंधित काहीही रोचक मला सापडलं की, मी ते स्कॅन करून फेसबुकवर प्रसिद्ध करायचो, जेणेकरून दलित व जातविरोधी चळवळीतल्या ज्या मित्रांना समाजमाध्यमं उपलब्ध आहेत, त्यांना या गोष्टी पाहता येतील आणि इतरांना दाखवता येतील. शेवटी माझ्याकडे व्यंगचित्राचा मोठा साठा जमा झाल्यावर, त्यांचं संकलन पुस्तक रूपात करावं असं मला वाटलं.
अशा प्रकारच्या प्रकल्पाचा विचार करणारा मी पहिला नव्हतो, हे मला कळलं. डॉ. आंबेडकरांनी १९५१ साली नेहरूंच्या मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला, तेव्हापासून अनौपचारिकरित्या त्यांचे सचिव व टंकलेखक म्हणून नानक चंद रत्तू (१९२२-२००२) यांनी काम पाहिलं. त्यांनीच आंबेडकरांच्या कागदपत्रांचा प्रचंड व्याप व्यवस्थित लावायला मदत केली आणि ‘द बुद्ध अँड हिज् धम्म’ व ‘रिडल्स इन हिंदुइझम्’ या पुस्तकांची हस्तलिखितं तयार करण्यामध्येही त्यांनी मदत केली. आंबेडकरांवरच्या व्यंगचित्रांचं एक संकलन प्रसिद्ध करणार असल्याची घोषणा त्यांनी २००० साली केली होती, पण असं पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वीच रत्तू यांचं निधन झालं. एनसीईआरटीने अकरावीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकात अठराव्या पानावर पुनर्मुद्रित केलेल्या एकमेव व्यंगचित्राव्यतिरिक्त आंबेडकरांचं भारतीय व्यंगचित्रांमध्ये कशा प्रकारचं चित्रणं झालं, याबद्दल आपल्याला फारशी माहिती नाही.
भारतातील राजकीय व्यंगचित्रांचा पुरेसा सूक्ष्म अभ्यास अकादमिकांनी अजून केलेला नाही. ‘अवध पंच’ आणि ‘पारसी पंच’ यांमधल्या व्यंगचित्रांचं संकलन मुशिरुल हसन यांनी केलं होतं आणि त्यांना संक्षिप्त प्रस्तावनाही जोडल्या होत्या, तो अपवाद वगळता आधुनिक इतिहासाची नोंद करणाऱ्या या महत्त्वाच्या कलाप्रकाराकडे अभ्यासकांनी फारसं गांभीर्याने पाहिलेलं नाही.
..................................................................................................................................................................
हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये खरेदीसाठी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5282/Hasanyawari-Neu-Naka
..................................................................................................................................................................
२००६ साली या संदर्भात आढावा घेताना व्यंगचित्रकार ई. पी. उन्नी यांनी पुढील निरीक्षण नोंदवलं होतं - ‘वाढीला मानवणाऱ्या सुमारे शंभरेक वर्षांच्या प्रवासानंतरही आपल्या व्यंगचित्रांच्या क्षेत्रात बराचसा असमतोल दिसतो. त्याहून वाईट म्हणजे त्यांना काही अधिकृत वावर नाही. आपल्याकडे व्यंगचित्रकला वाढीला लागली, त्याच दरम्यान जपानमध्ये व्यंगचित्रकलेचा विस्तार झाला, पण तिथे आहेत तशी व्यंगचित्रांचे दफ्तरखाने किंवा संग्रहालयं आपल्याकडे नाहीत.’
क्वचित प्रसंगी भारतीय व्यंगचित्रांची चर्चा झालीच असेल, तरी आंबेडकरांचं चित्रण असलेल्या व्यंगचित्रांचा काही विशेष संदर्भ अभ्यासकांनी दिलेला नाही, किंवा जातीचा प्रश्न आणि दलितांविरोधातील भेदभाव यांचं चित्रण व्यंगचित्रांमधून कशा रितीने झालं याचाही काही तपास त्यांनी केलेला नाही.
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकातील व्यंगचित्रावरून वाद होईपर्यंत आंबेडकरांवरची व्यंगचित्रं हा विषय अस्पृश्य होता, ही वस्तुस्थिती आहे. तो वाद झाला नसता, तर कदाचित आपण यावर इतकाही संवाद साधला नसता. उदाहरणार्थ, केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेसने २०१४ साली प्रकाशित केलेल्या ‘कॅरिकेचरिंग कल्चर इन इंडिया : कार्टून्स अँड हिस्ट्री इन द मॉडर्न वर्ल्ड’ या पुस्तकामध्ये मानववंशशास्त्रज्ञ रितू गैरोला खंदुरी यांनी आंबेडकरांच्या एकमेव ‘ज्ञात’ व्यंगचित्राची दखल घेतली आहे. त्याबद्दल मत नोंदवताना त्या म्हणतात -
‘‘पाठ्यपुस्तकांमध्ये निवडक व्यंगचित्रांचा समावेश करण्याचा एनसीईआरटीच्या सल्लागारांनी घेतलेला निर्णय, एक ‘आक्षेपार्ह’ व्यंगचित्र काढून टाकण्याची मागणी करत राजकारण्यांनी केलेला निषेध, या वादासंदर्भात एका वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित झालेली अकादमिकांमधील चर्चा (ही चर्चासुद्धा व्यंगचित्रांबद्दल पुढे येणाऱ्या सार्वजनिक कथनाचा भाग झाली)- या सगळ्यामध्ये अर्थाच्या निवाड्याबाबतचे दावे होते.’’
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
खंदुरी यांनी एक अख्खं प्रकरण गांधींना समर्पित केलेलं आहे. दक्षिण आफ्रिकेत असताना गांधींनी वर्तमानपत्रं चालवली आणि त्यात ब्रिटिश वर्तमानपत्रांमधली व ‘हिंदी पंच’मधल्या (सत्याग्रहाच्या प्रयत्नांशी सुसंगत असलेल्या) निवडक व्यंगचित्रांनाही जागा दिली, या कालखंडावर त्यांनी विशेष भर दिला आहे. त्यावर खंदुरी यांनी पुस्तकात अनेकदा तपशीलवार भाष्यही केलं आहे -
‘‘इंडियन ओपिनियनचे संपादक व ब्रिटिश व्यंगचित्रांचा विषय असलेले गांधी निरीक्षक टीकाकारही होते आणि विश्लेषणाची विषयवस्तूही होते. साम्राज्यवादी योजनांमधील हवा काढून टाकणारं अस्त्र म्हणून सत्याग्रहाच्या शक्तीचं चित्रण व्यंगचित्रकार करत असल्याचं त्यांनी त्यांच्या वाचकांना सांगितलं. भाषांतरकार व अर्थ सांगणारा अशा दोन्ही भूमिका निभावत गांधी व्यंगचित्रांच्या अर्थाबाबतही निवाडा देत होते. यात त्यांचं स्वतःचं सामर्थ्य दाखवलं जात होतंच, शिवाय सत्याग्रह ही प्रचंड मोठी प्रतिकारक आत्मिक शक्ती आहे हेही बिंबवू पाहत होते... या भाषांतरांद्वारे व अर्थनिर्णयनांद्वारे इंग्रजी व्यंगचित्रं म्हणजे स्थलांतरित भारतीय वाचकांसाठी एक सांस्कृतिक व राजकीय संहिता बनली. या उपलब्ध संहितेद्वारे त्यांना साम्राज्यवादी मनावर आक्रमण करता येत होतं.’’
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
परंतु राष्ट्रवादी वर्तमानपत्रांमधल्या व्यंगचित्रांमध्ये आंबेडकरांचं चित्रण कसं झालं किंवा त्यांनी स्थापन केलेल्या व चालवलेल्या चार मराठी वर्तमानपत्रांमध्ये (‘मूकनायक’, ‘बहिष्कृत भारत’, ‘जनता’ व ‘प्रबुद्ध भारत’) व्यंगचित्रं- नवीन किंवा पुनर्मुद्रित- का नव्हती, यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न खंदुरी यांनी केलेला नाही. ‘व्यंगचित्रांनी जवळपास दोन दशकं माझ्या मनाचा ताबा घेतला होता’, त्यातूनच संबंधित पुस्तक तयार झाल्याचं खंदुरी म्हणतात, पण आंबेडकरांच्या संदर्भात मात्र केवळ एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकातलं व्यंगचित्रं आणि त्याचे पडसाद यांची चर्चा करण्यापुरतीच त्यांची गुंतवणूक आहे.
परंतु, व्यंगचित्रकलेवरील अकादमिक वाङ्मयामधली ही गंभीर तफावत भरून काढणं हा प्रस्तुत पुस्तकाचा अधिकार नाही, किंवा आंबेडकरांशी संबंधित सर्व व्यंगचित्रांची सर्वांगीण यादीही इथे दिलेली नाही. माझं काम संशोधकीय कार्यक्रमापेक्षाही राजकीय निकडीचं होतं. या चौकटीमध्ये मला माझं शोधकार्य बहुतेकदा महानगरांमधील ग्रंथालयं व दफ्तरखाने आणि इंग्रजी प्रसारमाध्यमांपुरतंच मर्यादित ठेवावं लागलं.
..................................................................................................................................................................
हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये खरेदीसाठी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5282/Hasanyawari-Neu-Naka
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Mon , 18 January 2021
उन्नमती श्याम सुंदर,
काही विशिष्ट हेतूने व्यंगचित्र काढले जाणे म्हणजे विकृत व अविचारी वैरभाव नव्हे. इतर वेळेला कलाकारांचं अभिव्यक्तीस्वातंत्र्य वगैरे मोठमोठ्या गप्पा हाणल्या जातात. मग हेच स्वातंत्र्य व्यंगचित्र काढणाऱ्या कलाकारांना नाही का? शिवाय इतक्या क्षुल्लकशा कारणावरून अंगाला भोकं पडायला आंबेडकर काय दुर्बळ व भित्रे थोडेच होते ! ते राजकारणात उतरलेले होते. ते गटार आहे. तिथे अंगावर चिखल उडणारच. दोन दिले दोन घेतले. मामला खतम. ज्यांना पाहिजे त्यांनी खुशाल कुरवाळीत बसावं आपापल्या दुखावलेल्या भावना.
आपला नम्र,
-गामा पैलवान