अजूनकाही
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री, (महा)राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक धडाडीचे नेते धनंजय मुंडे सध्या एका मोठ्या वादात सापडले आहेत. मुंडे आज ना उद्या कोणत्या तरी वादात सापडणार याचा अंदाज कधीचाच आलेला होता आणि त्याप्रमाणे हे जे घडलंय किंवा घडवून आणलं गेलंय म्हणून त्याचं काहीच आश्चर्य वाटून घेण्याचं कारण नाही. ‘घडवून आणलं गेलंय’ असं म्हणण्याचं कारण हे एक राजकीय षडयंत्र आहे, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्यातील एक ज्येष्ठ मंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. त्यांच्यासारख्या एका जबाबदार नेत्यानं म्हटलं म्हणजे त्यात काही तरी तथ्य असू शकतं, मात्र अलीकडच्या दोन-अडीच दशकांत कोणत्याही राजकीय नेत्यावर क्षुल्लक किंवा पूर्ण चौकशीअंती अगदी साधार जरी कारवाई झाली तरी त्यामागे राजकीय काही तरी आहे, असं म्हणायची फॅशन आलेली आहे, हे विसरता येणार नाही.
‘अशा’ (म्हणजे विवाहबाह्य लैंगिक संबंध) रीतीने वादग्रस्त ठरलेले धनंजय मुंडे हे काही देशाच्या राजकारणातील पहिले नेते नाहीत. गेल्या सव्वाचार दशकांच्या पत्रकारितेत ‘अशा’ वादात सापडलेले आणि ‘असे’ उद्योग मनसोक्तपणे करूनही कोणत्याच वादात न सापडलेले अनेक नेते महाराष्ट्रातही पाहण्यात आलेले आहेत. ही सर्वपक्षीय आणि राष्ट्रीय लागण आहे. किस्से नव्हे तर (किस्से सांगोवांगी असतात म्हणून!) अशा अनेक हकिकती आणि आठवणी राजकीय वृत्तसंकलन केलेल्या माझ्या पिढीच्या अनेक पत्रकारांच्या पोतडीत आहेत. पण शिष्टाचार, संकेत आणि सभ्यपणा म्हणून ‘अशा’ आठवणी आणि हकिकतींची ती पोतडी कधीच सार्वजनिक पातळीवर उघडायची नसते, याचं भान आम्हा सर्वांना आहे.
धनंजय मुंडे प्रकरणात काय खरं आणि काय खोटं, याचा तपास आता पोलीस करणार आहेत आणि त्यांच्या राजकीय भवितव्याचा फैसला ते ज्या पक्षात आहेत, त्या पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार करणार आहेत. त्यामुळे त्या संदर्भात सध्या तरी कोणतीही टिपणी किंवा अटकळबाजी करण्यात काहीही मतलब नाही, कारण राजकारणात घडलेल्या ‘अशा’ कोणत्याही प्रकरणाचा शेवट (अखेर न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे नारायण दत्त तिवारी यांचा अपवाद वगळता) किमान कडक कारवाईने झाला किंवा त्या नेत्याच्या राजकीय कारकीर्दीवर ‘अशा’ प्रकरणाचा काही परिणाम झाला, असं काही आजवर घडल्याचं आठवत नाही. उलट ‘अशा’ प्रकरणात अडकलेले काही नेते आपल्याही राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि किमान अर्ध्या डझनावर तरी नेते ‘चीफ मिनिस्टर इन वेटिंग...’ होते, हे विसरता येणार नाही. त्यामुळे धनंजय मुंडे प्रकरणाचा काही तरी ‘लॉजिकल’ शेवट होईल, अशी आशा बाळगणं भाबडेपणाचं ठरेल.
.................................................................................................................................................................
विसंगती व सुसंगती समजून घेण्यासाठी उपयुक्त पुस्तक - वासंती दामले
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/4299/Madhyamvarg---ubha-adva-tirpa
.................................................................................................................................................................
आपण हे लक्षात घेतलंच पाहिजे की, हे ‘असं’ केवळ राजकारणातच आणि केवळ पुरुषांकडूनच घडतंय हे समजणं हा शुद्ध भाबडेपणा ठरेल. ‘वैवाहिक जीवनात सुख आहे आणि व्यभिचारी जगण्यात आनंद आहे’, अशी धारणा असणारे असंख्य पुरुष आणि काही स्त्रिया केवळ राजकारणातच आहेत असं नाही, तर समाजाच्या सर्वच क्षेत्रात आहेत (चित्रपटसृष्टीतल्या आशा अनेक घटना कायम चर्चेत असतात आणि आमची पत्रकारिताही त्याला अपवाद नाही!) मात्र ते मान्य करण्याचं धाडस आपल्यात नाही. यातल्या केवळ मोठ्या पदावरच्या स्त्री किंवा/आणि पुरुषाच्या ‘अशा’ संबंधांचा बोभाटा काही काळ तरी जास्त होतो.
‘अशा’ संबंधांच्या संदर्भात समाजात होते ती केवळ कुजबुज किंवा माध्यमांतून त्या संदर्भात प्रकाशित/प्रक्षेपित होतं, ते केवळ गॉसिप. ‘अशी’ ९९ टक्के प्रकरणे अशा कुजबूज किंवा/आणि गॉसिपच्या पातळीवर जन्म घेतात आणि त्याच पातळीवर विझूनही जातात, कारण आपल्या समाजात नैतिक आणि अनैतिकच्या वाटा फारच निसरड्या आहेत. या वाटांवरून चालण्यात पुरुष जास्त ‘पटाईत’ असतात, त्या तुलनेत ‘पटाईत’ स्त्रियांचं प्रमाण फारच कमी आहे. या वाटांवरून चालणारे अनेक पुरुष आणि मोजक्या का असेना स्त्रिया, मला चांगल्या ठाऊक आहेत. बहुसंख्य घटनात ‘ती’ त्या दोघांची गरज असते, कधी आकर्षण, कधी मजबुरी तर कधी तो एक सरळ-सरळ व्यवहार असतो. आपण मात्र त्याला नैतिकता आणि अनैतिकतेची लेबल्स लावण्याचा प्रयत्न करतो, कारण त्या संदर्भात उघड चर्चा करणं किंवा त्या संबंधांचा खुलेपणानं स्वीकार करणं ही आपली संस्कृती नाही, असा कथित संस्कार आपल्यावर झालेला असतो.
केवळ स्त्रीचे लैंगिक शोषण होण्याच्याही घटना खूप घडतात हेही खरं आहे, पण वर म्हटल्याप्रमाणे ती स्त्री, तिचं कुटुंब, पोलीस आणि समाज अशा सर्वच पातळ्यांवर अशा प्रकरणांचा ‘लॉजिकल’ शेवट घडवून किंवा करवून आणणं फारच कठीण असतं. शिवाय स्त्रिया या संदर्भात तातडीनं पुढं येत नाहीत, कारण त्यात त्यांची असह्य आगतिकता असते, हे लक्षात न घेता ‘इतका उशीर का लावला म्हणजे ती तशीच असणार’ अशी मुक्ताफळं उधळण्यात समाजाला धन्यता वाटते.
‘अशा’ घटनात प्रलोभन हा कळीचा मुद्दा आहे आणि त्याला बळी पडण्याचं जास्त प्रमाण स्त्रियांचं आहे, ही वस्तुस्थिती आहे. ‘लिव्ह इन’ नावाचा सापळा, स्वतंत्र घरं, मोठ्या प्रमाणात धन, मूल जर झालं तर त्याला नाव म्हणजे अधिकृत दर्जा आणि नाव न दिलं तर आणखी धन अशी प्रलोभनाची व्यापकता आहे.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार आणि दोस्तयार निशिकांत भालेराव याची एक पोस्ट अशी-
“आमच्या मराठवाड्यात हे फार कॉमन आहे. चुकीचे आहेच. २५ वर्षांपूर्वी मी शेगाव पाथर्डी भागात कोल्हाटी समाजाच्या काही महिलांवर स्टोरी करण्यासाठी काही महिला कार्यकर्त्या समवेत मेळाव्याला गेलो होतो. दोन तीन भगिनीच्या घरी चहा पिण्यास गेलो, तेव्हा त्या काळातील आमच्या भागातील बहुतेक पुढार्यांचे फोटो दिवाणखान्यात पाहून मला फारच आशर्य वाटले. पण काही जणींनी तिथे खेळणाऱ्या मुलांकडे पाहून चक्क सांगितले ‘हा यांचा’, ‘त्यो त्येंचा’ वगैरे. मी फार अस्वस्थ होतो त्या प्रकाराने. आज पाथर्डी-शेगावऐवजी ‘बॉलिवुड’ असते एवढेच काय ते! सार्वजनिक जीवनात असल्यावर हे प्रकार नकोच. प्रश्न खाजगी नाही असू शकत.”
निशिकांतच्या या अनुभवाला पुष्टी देणार्या राजकीय नेते, प्रशासकीय अधिकार्यांच्या अनेक हकिकती सांगता येतील.
.................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
स्त्रीला वश करण्यात मर्दानगी आणि त्या कथित मर्दानगीची भुरळ पडणार्या स्त्रिया असं, हे दुष्टचक्र आहे. ‘मी अमुक तमुक म्हणजे दोन-तीन स्त्रिया भोगण्याचा अधिकार आम्हाला आहे आणि आम्ही कोणत्याही स्त्रीला कधी वार्यावर सोडलेलं नाही’, अशा केवळ फुशारक्या मारणारेच नाही तर त्याप्रमाणे वागणारे आपल्या अवतीभवती किती आहेत, याचा शोध आपल्यापैकी किती जणांनी आजवर घेतला आहे? असा शोध घेतला, आपण अशा नैतिकतेच्या कोणत्या पातळीवर आहोत, हे निश्चित केलं (कारण कोणत्या ना कोणत्या पातळीवर अध:पतन ही एक मूलभूत क्रिया आहे) आणि महत्त्वाचं म्हणजे एकदा व्यक्तिगत व सार्वजनिक नैतिकतेची निश्चित व्याख्या केली की, नंतरच त्या संदर्भात खुलेपणानं चर्चा करता येऊ शकेल.
माझं व्यक्तिगत मतही इथं नोंदवायला हवं. कोणतेही अन्य हेतू मनाशी न बाळगता परस्पर संमतीने होणार्या स्त्री-पुरुष लैंगिक संबंधाना हरकत घ्यावीशी मला तरी वाटत नाही, मात्र असं फार कमी वेळा घडत असल्याचा अनुभव आहे. शिवाय अधिकृतपणे वैवाहिक बंधन संपुष्टात न आणता विवाहित स्त्री किंवा पुरुषानं ‘लिव्ह इन’च्या नावाखाली घातलेला धुडगूस असणार्या पत्नीचा मानसिक आणि शारीरिक छळ आहे, त्याबद्दल तो छळ करणार्या शिक्षा झालीच पाहिजे, असंही मला ठामपणे वाटतं.
..................................................................................................................................................................
लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या - www.praveenbardapurkar.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Rajkranti walse
Sat , 16 January 2021
excellent