‘महाराष्ट्र टाईम्स’, ‘लोकमत’, ‘लोकसत्ता’ आणि ‘दिव्य मराठी’ या मराठीतील चार आघाडीच्या वर्तमानपत्रांचे संपादकपद भूषवलेल्या कुमार केतकर यांनी ७ जानेवारी २०२१ रोजी वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली. त्यानिमित्ताने त्यांच्याविषयीचा हा पुनर्मुद्रित लेख...
..................................................................................................................................................................
माझी कुमार केतकरांशी ओळख झाली, ती ‘महाराष्ट्र टाइम्स’मुळे. मी तेव्हा पार्ले टिळक विद्यालयात सातवीला होतो. स्कॉलरशिप परीक्षेला बसायचे होते. माध्यम अर्थात मराठी. साल १९९३. मराठी पेपरला कल्पनाविस्तार असत. ‘सुख पहाता जवापाडे दु:ख पर्वताएवढे’, ‘आता विश्वात्मके देवे’ वगैरे सुभाषितं, ओव्या वगैरे असत. मला ते जमत नसे. तेव्हा माझ्या बाबांनी मला ‘महाराष्ट्र टाइम्स’चे अग्रलेख वाचायला लावले. आमच्या घरात ‘म.टा.’, ‘नवाकाळ’ ही वृत्तपत्रे येत. ‘लोकसत्ता’सुद्धा शेजारीपाजारी मिळे. ‘मटा’चे ‘अग्रलेख’ (हा शब्द नवीन होता), ‘मटा’चे ‘संपादक (हा आणखी एक नवीन शब्द) लिहीत, पण त्यावर त्यांचे नाव नसे. नंतर काही दिवसांनी ‘मटा’च्या शेवटच्या पानावर संपादक गोविंद तळवलकर, कार्यकारी संपादक कुमार केतकर ही ओळ सापडली. शेवटी स्कॉलरशिप परीक्षा संपली. मी राज्यात १९वा आलो. ‘मटा’ आणि ‘मटा’चे अग्रलेख वाचायची सवय तेव्हापासून जडली.
तो दंगलीचा काळ होता, आणि बाबरी मशीद उद्ध्वस्त होऊन काहीच आठवडे झाले होते. आजूबाजूला भयाचे वातावरण होते व गल्लोगल्ली आता कोणत्याही क्षणी आपल्यावर हल्ला होणार अशी भीती सतत घातली जात होती. बाहेरच्या एकूणच वातावरणातून ती अधिकाधिक पसरवली जात होती. आम्ही मुलेसुद्धा हातात खेळातील तलवारी, धनुष्यबाण घेऊन गच्चीवर गस्त घालत असू. अर्थातच शाळेला सुट्टी होती व रस्त्यावर वा सोसायट्यांमध्ये खेळताही फारसे येत नसे. तो वेळ मी माझे मराठी सुधारण्यात व सर्व वर्तमानपत्रे वाचण्यात घालवावा असे माझ्या आई-वडिलांना वाटे. कालांतराने दंगल ओसरली, नंतर मुंबईत मोठे बॉम्बस्फोट झाले आणि भीतीचे काहूर मनातून गेले नाही; अग्रलेख वाचायची सवय लागली होती. त्यात ‘मटा’चे अग्रलेख वेगळे असत. एक तर ‘मटा’च्या अग्रलेखांची भाषा वेगळी आणि सर्वांना समजेल अशी होती.
त्या वेळेचा ‘मटा’ हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक मापदंड होता व मध्यमवर्गीयांच्या तथाकथित बुद्धिमत्तेचे गंडस्थळ. कुमार केतकर हे त्याचे अनभिषिक्त सम्राट होते. ‘मटा’ला ‘एलिट’ स्थान प्राप्त झाले होते. (अर्थात एवढा विचार करायची पात्रता त्या वेळी माझ्यात नव्हती.) साहजिकच पार्ल्यात ‘मटा’च पॉप्युलर होता. त्यावेळचे ‘मटा’चे प्रत्येक पान हे संकल्पना, सुसूत्रता व एका अमूर्त समग्रतेने भरलेले असे. त्यातील अदृश्य हात हा संपादकांचा असतो, हे हळूहळू लक्षात येऊ लागले होते. कोणताही नवीन वैज्ञानिक शोध असो वा सांस्कृतिक घडामोड, एखादी वैश्विक घटना असो वा कलासाहसाचा आविष्कार, त्याला ‘मटा’च्या ‘बॉटम लीड’मध्ये रंगीत स्वरूपात व आकर्षक मथळ्यासह स्थान मिळत असे. त्याचबरोबर अग्रलेखात भाष्यही. मी ते सर्व वर्गात हिरीरीने वाचूनसुद्धा दाखवत असे! अग्रलेखातील वा विचारातील मांडणी व त्याचा सर्वसमावेशक वैश्विक दृष्टिकोन कोणीही सहजासहजी नाकारू शकत नसे.
कुमार केतकर दूरदर्शनवरसुद्धा झळकू लागले. त्यात ते जोशपूर्ण बोलताना, विनोद करताना आणि चक्क हसताना दिसत. शिवाय निरनिराळ्या कार्यक्रमांत त्यांची भाषणं देखील होत - विशेषतः मॅजेस्टिक गप्पांसारखे कार्यक्रम. त्यामुळे त्यांची पार्ल्यातील सांस्कृतिक कार्यक्रमांतून उपस्थिती वाढू लागली. केतकरांचे वाचन, व्यासंग आणि विद्वत्ता याने पार्लेच नव्हे तर समस्त मराठी मध्यमवर्गावर गारुड केले. कुमार केतकर कम्युनिस्ट असले तरी ‘ओपन’ आहेत, सर्वांना ‘स्पेस देणारे’ उदारमतवादी आहेत, चतुरस्र संपादक आहेत, राजकारणी असूनही रसिक आहेत, कम्युनिस्ट असूनही लोकशाहीवादी आहेत, हा विचार हळूहळू दृढ झाला. कुमार केतकरांच्या लिखाणाने आणि भाषणांनी विज्ञान, तंत्रज्ञान, अध्यात्म, तत्त्वज्ञान, वैद्यक व्यवसाय, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, यांतील नव्हे तर नाटक, चित्रपट, कलाक्षेत्रातील प्रत्येक कृतिशील माणसाला त्यांनी ‘मटा’मध्ये जोडून घेतले. कामगार चळवळ, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, पर्यावरणवादी चळवळींना त्यांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. याचे कारण सर्व मानवी व्यवहाराचे त्यांना कुतुहूल होते आणि ते त्याचा शोध घेत. ते त्या शोधप्रवासात वाचकाला त्यांच्याबरोबर घेऊन जात. त्यामुळे मला केतकरांच्या लिखाणाच्या वाचनाने जगाचे भान येऊ लागले. त्यांनी अनेक संशोधनात्मक लेखमालिका सुरू केल्या.
‘मटा’मधून त्यांनी सुरू केलेल्या ‘जात पंचायत’ या मालिकेत फक्त जातींचे वा त्यातील वैशिष्ट्यांचे चित्रण नव्हते. तर तो एक जातिव्यवस्थेचा, परस्पर मानवी संबंधांचा व त्यातील गुंतागुंतीचा शोध घेणारा मानववंशशास्त्रीय प्रयत्न होता. त्या संदर्भात त्यांनी 'concept of equality and caste system' असा शोधनिबंधस्वरूप लेख इतरत्र प्रसिद्ध केला होता. ‘जात पंचायत’नंतर आलेली ‘बदलती नाती’ ही लेखमालिकासुद्धा अशाच प्रकारे विलक्षण होती. १९९०च्या दशकात नात्यांमध्ये जी उलथापालथ होऊ लागली होती व एकूणच सांस्कृतिक व सामाजिक वातावरण बदलू लागले होते, त्याचे चित्रण त्यात होते व आजही त्यातले बरेचसे लागू आहे. तो वर्णनात्मक व विश्लेषणात्मक पत्रकारितेचा एक अभ्यासपूर्ण प्रयोग होता. तसे स्वरूप ‘मटा’च्या इतर पानांमध्येही झळकू लागले होते. ‘मटा’चे शेवटचे पान हे त्या दृष्टीने विशेष असे. तो प्रदीर्घ स्टोरीजचा खजाना होता - कधी चित्रपट परीक्षणाद्वारे वा कधी स्त्रियांवरच्या प्रश्नाद्वारे! त्यातून नवनवीन तरुण लेखक-पत्रकार महाराष्ट्राला मिळत गेले; त्यांची एक फौजच केतकरांनी उभी केली. केवळ पत्रकारांची नव्हे, तर वाचकांचीसुद्धा.
आपल्या लेखणीबरोबरच गावोगावी केलेल्या भाषण-संवादातून हा संपादक आपल्यातला आहे आणि आपण त्याला भेटू शकतो, त्याच्याशी बोलू शकतो, त्यांच्याशी संवाद साधू शकतो असा विश्वास त्यांनी वाचकांमध्ये निर्माण केला. ते सारे मानवी सभ्यता, संस्कृती, राजकारण व तत्त्वज्ञान यांचे वाटसरू बनून गेले. आजही महाराष्ट्रभर गावोगावी त्यांना त्यांचे वाचक भेटत असतात. मानवी इतिहासाच्या वाटेत आपण केतकरांबरोबरचे पांथस्थ आहोत, असा आत्मविश्वास व भान त्यांना केतकरांना भेटल्यावर येते; मी ते प्रत्यक्ष अनुभवले आहे.
बाबरी मशीद व त्यानंतरच्या भीषण दंगलीतून ९०चे दशक भराभर सरकले; त्यांनी संस्कृतीत, मूल्यात व राजकारणात आमूलाग्र बदल घडवले होते. राज्यात युतीचे सरकार १९९८ साली होते, तर केंद्रात एनडीएकृत वाजपेयींचे. मी शाळकरी असतानाच्या हिंस्रता आणि क्रौर्याच्या वातावरणाचा उल्लेख मी आधी केला आहे. त्या भीतीने मी मानसिक प्रश्नांनी घेरला होतो. इतरांचे मला माहीत नाही, पण मी सामाजिक, राजकीय भवतालातील अनेक प्रश्नांनी गांजलो होतो. अनेक प्रश्नांना माझ्याकडे उत्तरे नव्हती. तशी ती कोणाकडे असतील अशी माणसे माझ्या पाहण्यात नव्हती. अशा वेळी केतकर हीच एक आशा मला वाटली.
वाजपेयी सरकारने आल्या आल्या राष्ट्रवादाचा फुत्कार देत अणुस्फोटचाचण्या घडवल्या; व त्यावेळच्या भाजप सरकारने बाहू सरसावत चीनला व पाकिस्तानला चिथावायला सुरुवात केली; त्यापाठोपाठ पाकिस्ताननेसुद्धा अणुस्फोटचाचण्या करून त्याला उत्तर दिले. त्या चाचण्यांनी वस्तुत: आपापल्या सुशिक्षित व सुसंस्कृत मध्यमवर्गाची नशा उतरवली होती; परंतु भारतीय उपखंड एका अस्वस्थ दशकाच्या किंबहुना पर्वाच्या उंबरठ्यावर आणून ठेवला गेला होता. त्या वेळेच्या विशेष संपादकीयांची शीर्षके खूप बोलकी आहेत- ‘बुद्ध ढसाढसा रडला!’, ‘बुद्ध हतबुद्ध झाला’, ‘अणुस्फोट-भान आणि स्वाभिमान’ (‘विश्वामित्राचे जग’ या त्यांच्या पुस्तकात हे समाविष्ट आहेत.)
त्या वेळेच्या परिस्थितीचे संपादकीय भाष्य खरे म्हणजे त्या दशकाच्या अस्वस्थ करणाऱ्या घटनांची सांगड घालते - ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्यात आली आणि या बुद्धजयंतीला (१५ मे १९९८) अणुस्फोटचाचण्या घडवून आणल्या गेल्या. पहिली होती ‘हिंदू अस्मिता’ जिने देशाची मानसिक फाळणी घडवून आणली आणि दुसरा होता ‘राष्ट्राभिमान’, ज्यामुळे आपण असलेले मित्र गमावले आणि शत्रूंना अधिक सामर्थ्य प्राप्त करून दिले. बुद्ध ढसाढसा रडला तो त्यामुळेच.
‘विवेकाने वापरलेले ज्ञान’ म्हणजे ‘विज्ञान-मानवी संहाराचा वापर करणारे ज्ञान हे विज्ञान नव्हे’; असे आचार्य विनोबा भावे यांना उद्धृत करून लिहिलेला ‘जय विज्ञान’ हा अग्रलेख त्याच मालिकेतील. त्याच मालिकेत पुढे कुसुमाग्रजांची अणुस्फोट झाल्यावर बेचिराख झालेल्या या पृथ्वीच्या राखेतून उगवणाऱ्या अंकुराची साक्ष देणारी कविता छापली गेली. संस्कृतीच्या राजकारणाने विकृत रूप घेतले होते. त्याचा आणखी एक पुरावा म्हणजे पुढे तीन वर्षांनंतर ११ सप्टेंबरच्या भीषण हल्ल्यानंतर अफगाणिस्तानच्या इस्लामिक मूलतत्त्ववाद्यांनी बुद्धाच्या प्राचीन मूर्ती उद्ध्वस्त केल्या होत्या!
माझी आणि त्यांची प्रत्यक्ष भेट त्याच काळात, १९९८मध्ये झाली, ‘मटा’च्या कार्यालयात. ‘टाइम्स’च्या दगडी इमारतीला तेव्हा कडेकोट सिक्युरिटीची भिंत नसे. संपादक अग्रलेखात काहीही लिहीत असले, तरी व्यक्तिगत पातळीवर माणूसघाणे, दुटप्पी व मुजोर असू शकतात, असे मला अनेकांनी सांगितले होते. त्यामुळे माझ्या मनात प्रचंड धास्ती होती. शिवाय मी कोणतीही भेटीची वेळ त्यांच्याकडे मागितलेली नव्हती; माझ्याकडे भेटीचे विशेष कारणही नव्हते; परंतु तत्त्वज्ञान, इतिहास, विज्ञान व मानसशास्त्र... एवढा प्रचंड आवाका असणाऱ्या व त्यातून संपूर्ण वैश्विक विचार लेखणीतून व भाषणातून सूत्रबद्ध व सोप्या शैलीत मांडणाऱ्या या माणसाला भेटण्याची मला तीव्र इच्छा होती.
त्यातून त्यांच्या केबिनबाहेर मी बराच वेळ रेंगाळलो व शेवटी न भेटताच परत जाऊ लागलो, तेव्हा तेथील एका माणसाने मला म्हटले, ‘‘तुला केतकरांना भेटायचे आहे का? जा, ते कोणालाही भेटतात.’’ तरीही मी त्यांच्या केबिनसमोर बराच वेळ रेंगाळलो, तेव्हा काही वेळाने त्यांनीच मला हात दाखवून आत बोलावून घेतले. काय बोलावे व कशासाठी आला आहेस, या औपचारिकतेला माझ्याकडे काही उत्तर नव्हते, तरीही संवाद केतकरांनीच सुरू केला व मी वाचलो! ‘तू कुठून आलास’ या प्रश्नानंतरच्या त्यांच्या विलक्षण मोकळेपणाने जणू आमची वर्षानुवर्षांची ओळख आहे अशा सहजतेत ते बोलले व माझी भीड चेपली. मी त्यानंतर दहाच मिनिटांत बाहेर पडलो, परंतु लक्षात राहिली ती त्यांची सहजता - ‘सहज नीटू जाला’सारखी. ते ‘मैत्र’ जुळले ते आजतागायत.
कुमार केतकर खूप हुशार आहेत. त्यांची ज्ञानलालसा वादातीत आहे, बुद्धिमत्ता पराकोटीची कुशाग्र आहे, स्मरणशक्ती अचाट आहे, त्यांची विश्लेषण शक्ती अफाट आहे, त्यांचे भाषेवरचे प्रभुत्व श्रेष्ठ आहे, अशा विशेषणांनी सरांच्या भोवती पंचारती ओवाळल्या जातात आणि स्तुतिसुमने उधळली जातात. त्यांना आधुनिक ऋषीमुनी म्हणून मांडले जाते. पण सर त्या रूढ अर्थाने स्कॉलर कधीच नव्हते. राजकारणात सर मार्क्सवादी असले तरी शैक्षणिक बाबतीत ते कधीच मार्क्सवादी नव्हते. त्यांचा ‘क्लास’ ठरलेला होता. माझ्यासारख्या अंगभूत नैपुण्य, कौशल्य, हुशारी नसलेल्या नगण्य माणसाशी नाते जोडणे त्यामुळेच सरांना शक्य होते असे मला वाटते.
सर तत्त्वज्ञानाचे अभ्यासक असतील, पत्रकार असतील, विद्वान असतील; पण त्यांची ज्ञाननिष्ठाच त्यांना राजकारणाकडे खेचून घेऊन आली आहे. सर खरेच ऋषीमुनी असतील तर ते निबिड अरण्यात जाऊन किंवा हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरावर जाऊन अज्ञातवासात आणि एकांतवासात साधना आणि तप करत राहिले असते. पण हेच सरांचे वैशिष्ट्य आहे. आपला उपयोग समाजाला होऊ देणे, ही त्यांची प्रेरणा आहे. जी भूमिका पटली ती प्रामाणिकपणे, पूर्णत्वाने पार पाडणे ही सरांची खरी भूमिका आहे.
म्हणूनच तरुण वयात ‘राजकारण’, ‘सत्यचित्रे’ या त्यांनीच सुरू केलेल्या नियतकालिकांचे अंक काढणे, त्यांचे गठ्ठे स्वतःच्या खांद्यावरून वाहणे, भरगर्दीत सभासमारंभात गठ्ठे हातात घेऊन त्याची विक्री करणे, ‘ग्रंथाली’च्या समारंभात, साहित्य संमेलनात स्टेजवर भाषणे ठोकून पुन्हा स्टॉलवर ग्रंथविक्री करणे, यात त्यांना कोणताही संकोच नव्हता.
त्या वेळी मध्यमवर्गाने त्यांचे कौतुक केले. ज्या वेळी निरनिराळी पदे, खुर्च्या पटकावणे मानाचे होते, त्या वेळी त्यांनी त्या पदांच्या ऑफर झिडकारल्या, त्याचेसुद्धा कौतुक झाले. कोणताही निर्णय वैयक्तिक मानमरातब, स्वार्थ यासाठी घ्यायचा नाही, तर समाजाच्या भल्यासाठीच्या आपल्या विचारांशी ठाम राहून घ्यायचा, ही त्यांची भूमिका मला फारच श्रेष्ठ वाटते. म्हणूनच या पदांचा, मानाच्या खुर्च्यांचा त्यांच्या विचारांना, आचारांना अडथळा, अडचण होऊ लागली. त्याक्षणी त्या झुगारून देण्याची झुंजार वृत्ती सरांची आहे.
ती झुंझारता आणि सहजता दोन्ही त्यांना प्राप्त होते, कारण ‘माणूस’ हा त्यांच्या केंद्रस्थानी असतो, त्याचे व्यवहार, त्यांचे वागणे, त्यांचे गुण व दुर्गुण व त्यातील परिस्थिती यांचे त्यांना विलक्षण कुतूहल असते - मग ती ‘सेलेब्रिटी’, ‘ज्ञानी’ वा ‘प्रसिद्ध’ व्यक्ती असावी लागत नाही आणि या सहजतेमुळेच त्यांना अफाट स्मृती प्राप्त झालेली आहे. ते कोणतीही घटना व प्रसंग, व्यक्ती व त्यांचे कार्य हे इतिहास व मानवी सभ्यता-संस्कृतीच्या अफाट परिघात बघू शकतात. त्यातून त्यांचे अचूक मनोवैज्ञानिक विश्लेषण करू शकतात; त्यातून त्यांच्या जीवनाचे असंख्य बिंदू त्यांना जोडणे शक्य होते. म्हणूनच संपादक वा लेखक म्हणून त्यांनी लिहिलेले मृत्युलेख वा व्यक्तिचित्रे यांची शैली वैशिष्ट्यपूर्ण व वेगळी आहे. तो व्यक्तीच्या अनुषंगाने केलेला इतिहास, वर्तमान, मूल्य आणि भविष्याचा आढावा असतोच; पण त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या मनी कायाप्रवेश करून त्याला उलगडलेल्या विश्वाचा आरसासुद्धा!
ही शैली बऱ्याच अंशी युरोपीयन-अमेरिकन पत्रकारितेशी मिळती-जुळती आहे. तेथे वृत्तपत्रे व मासिके यांचे स्वतंत्र "obituaries' डिपार्टमेंट असते. इतिहास, संदर्भ व व्यक्तिविशेष यांचे स्वतंत्र दालन. ती सांभाळणारे व लिहिणारे स्वतंत्र पूर्णवेळ पत्रकार असतात; आणि त्यांचे कामच अशा व्यक्तींचा व इतिहासाचा शोध घेणे हे असते. केतकर यांची लेखनशैली त्यांच्याशी मिळतीजुळती आहे; इतकी की कित्येक वेळा त्यांनी एखाद्या व्यक्तीवर लिहिलेल्या मृत्युलेखातील विचार व मुद्दे काही वेळा अक्षरश: जसेच्या तसे वा भावानुवादाच्या रूपाने ‘लंडन इकॉनॉमिस्ट’ व ‘न्यू यॉर्क टाइम्स’च्या ऑबिच्युअरिजमध्ये काही दिवसांनी छापून आल्याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. लायझॅ कोलोकोवस्की, रोबोर्ट मॅक्नमारा, चार्ली विल्सन, सी.के. प्रल्हाद अशी उदाहरणे देता येतील.
तितक्याच उत्कटतेने त्यांनी महाराष्ट्राच्या व मराठी व्यक्तींवरही लिहिले आहे - फारशा परिचित नसलेल्या परंतु स्वतः गणितज्ञ व रेनेसाँचा गाढा अभ्यास असणाऱ्या जितेंद्र कराडकरांपासून महाराष्ट्राचे आनंदयात्री असणाऱ्या पु.लं.च्या जीवनगाण्याबद्दल आणि भावना, हिंसा विषयकल्लोळाचे अपरिहार्य नाट्य रंगवणाऱ्या विजय तेंडुलकरांच्या ‘शांतता’पर्यंत आणि मुंबईच्या कामगार चळवळीचे संघर्षात्मक व मनोज्ञ वर्णन करणाऱ्या कवी नारायण सुर्वे यांच्यापर्यंत. कारण व्यक्ती, समाज व त्यातून निर्माण होणारे गुंतागुंतीचे प्रश्न त्यांना अधिक महत्त्वाचे वाटतात. ते त्या प्रश्नांचा सतत शोध घेत असतात व सूत्र शोधत असतात, स्रोत शोधत असतात.
‘विश्वामित्राचे जग’ हे त्यांचे पुस्तक त्यांनी जे. कृष्णमूर्तींना अर्पण केले आहे. त्यात ते म्हणतात, ‘जे. कृष्णमूर्ती ज्यांनी मला उत्तरापलीकडल्याही प्रश्नांचा वेध घ्यायला शिकवले. ते कोणत्याही राजकीय विचारसरणी व तत्त्वज्ञानाचा पुरस्कार करत नाहीत. ते गुरू नाहीत वा प्रस्थापित अर्थाने विचारवंत नाहीत. परंतु त्यांना व्यक्ती व त्यांचे अनेकविध प्रभाव आणि संस्कार महत्त्वाचे वाटतात.
धर्म, विज्ञान, तंत्रज्ञान आणि विचारसरणी प्रथम मानवाचे संस्कार मग माध्यम आणि मग मात्र अवजारे आणि कालांतराने हत्यारे बनू लागतात; आणि माणूस त्या सर्व माध्यमांत अडकतो. काही काळातच तो माध्यमसंस्कारांचा गुलाम बनतो व माध्यमे त्यास नाचवू लागतात. तेथून संघर्ष, हिंसा व अतिरेकीपणास सुरुवात होते.’
पत्रकार म्हणून काम करत करताना माध्यमांचा हा वाढवणारा विचार केतकर त्यांच्या विविध लेखांतून व भाषणांमधून मांडतात, किंबहुना माध्यम महर्षी मार्शल मॅक्लुहान यांचा ‘माध्यम हाच संदेश आहे - (medium is the message)’ हा शोधविचार त्यांना त्या तत्त्वज्ञानाशी सुसंगत वाटतो. मानवी इतिहास हा अशा प्रकारच्या विविध माध्यमकथांतून, मिथकांतून व गोष्टी तयार करण्याच्या व सांगण्याच्या तंत्रातून विकसित झालेला आहे याचा शोध, स्वरूप व विचार त्यांनी ‘विश्वामित्राची प्रतिसृष्टी या त्यांच्या निबंधात केलेला आहे. सिग्मंड फ्रॉईड, मार्शल मॅक्लुहान. रॉजर पेनरोज, स्टीफन हॉकिंग, डॉ. जॉनाथन मिलर, बर्ट्रांड रसेल या आणि अशा अनेक शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ आणि स्कॉलरची जागतिक मांदियाळी या त्यांच्या पुस्तकांमधून आपल्याला भेटत राहते. वस्तुत: ती स्वतंत्र पुस्तके नव्हेत. ते संकल्पना, विज्ञान, मिथके, तत्त्वज्ञान, समाजकारण, राजकारण आणि मानसशास्त्र यांचे खंड आहेत; रेनेसाँ आणि नंतर फ्रेंच राज्यक्रांती जी जागतिक स्तरावर पसरवली व त्या वैश्विक मूल्य संस्कृतीचे (स्वातंत्र्य, समता, बंधुता) मराठीतील अभूतपूर्व डॉक्युमेंटेशन आहे. त्या अर्थाने केतकर हे महाराष्ट्राचे रेनेसाँ व्यक्तिमत्त्व आहे - मानवी अस्तित्वाचा जैवउत्क्रांतीपर व पर्यायाने सामाजिक राजकीय वेध घेणारे!
मार्क्सने ‘‘प्रश्न फक्त इतिहास व वर्तमान समजून घेण्याचा नाही तर तो बदलण्याचाही आहे, जर्मनीने फक्त क्रांतीचा विचार केला, तर फ्रान्सने ती प्रत्यक्षात आणली,’’ असे नमूद केले होते. म्हणूनच प्रश्न अंतिम मुक्तीचासुद्धा आहेच. मार्क्सवर दिलेल्या मुलाखतीत केतकर म्हणतात, ‘‘मार्क्स त्याच्या मांडणीतून काय सांगू पाहत होता? भांडवलशाही व्यवस्थेने निर्माण केलेली आपली जी सर्वोच्च रचना आहे, आपली जी स्वप्ने आहेत, मूल्ये आहेत, कल्पना आहेत, ते सारे बाजूला सारा. त्यातून व्यापक रितेपण अनुभवास येईल. नात्यांबद्दलची आसक्ती संपेल आणि त्याला आपण विशुद्ध प्रेम म्हणतो ते शिल्लक राहील. ...अँटि कम्युनिस्ट होणे खूप सोपे आहे, परंतु कम्युनिस्ट होण्यासाठी तुमच्या अंतर्मनात परिवर्तन गरजेचे असते. तुमच्या आतला सततचा संघर्ष गरजेचा असतो.’’
अर्थातच त्यामुळे त्यांना फ्रान्सिस फुकोयामाचा ‘end of history' मान्य नाहीच; तसेच सॅम्युअल हटिंग्टन यांचा संस्कृतिसंघर्षाचा सिद्धांत. त्यांना इतिहासाच्या क्रमातून येणारी सांस्कृतिक सरमिसळ व सांस्कृतिक मीलन अभिप्रेत आहे. पंडित बिरजू महाराज यांनी ‘रोमिओ आणि ज्युलिएट’ या शेक्सपीयरच्या अमर नाट्यकृतीचा कथक-आविष्कार सादर केल्यावर केतकरांनी त्यांचे ‘रोमांचकारी’ असे वर्णन केले होते आणि अशा दृष्टिकोनापासून आपण अजून खूप मागे आहोत, अशी खंत व्यक्त केली होती.
खरे म्हणजे अशा मीलनातून व फ्रेंच/अमेरिकन राज्यक्रांतीच्या प्रेरणेने आपला भारतीय स्वातंत्र्यलढा उभा राहिला होता. ते सर्व प्रयत्न पुसण्याचे किंबहुना इतिहास संपवण्याचे अश्लाघ्य प्रयत्न अस्मिता, धर्म व प्रच्छन्न सांस्कृतिक राजकारणाद्वारे सुरू आहेत. आश्चर्य म्हणजे अनेक सुज्ञ, सुशिक्षित व सुजाण लोकांचा त्याला पाठिंबा आहे, व त्या साथीने आता उग्र रूप धारण केले आहे. ती अमूर्त असली, तरी त्याला लोकशाही राजकारणाचा वैधानिक मुलामा आहे, कोणत्याही संस्कृतीशी, आदर्शवाद व विचारसरणीशी त्याचा तीळमात्र संबंध नाही, ते एक कृष्णविवर आहे. परंतु त्याच्याशी संघर्ष करण्याचा मार्ग केवळ प्रस्थापित राजकारण आहे. व केतकर संघर्षात उतरले आहेत.
‘बोली अरूपाचे रूप दाखवीन’ याप्रमाणे त्यांनी वेळोवेळी त्याबाबत सांगितले आहे व त्यासाठी प्रचंड टीका व अवहेलनेला सामोरे गेले आहेत; आता संघर्षाची निर्णायक वेळ आहे. जे. कृष्णमूर्तींनी म्हटल्याप्रमाणे कोणताही निश्चित रस्ता नसलेला सत्याचा प्रकाशच त्यातून मार्ग काढू शकतो. त्यासाठी ज्ञानेश्वर आणि बुद्ध, टिळक आणि लेनिन, फ्रॉईड आणि जे. कृष्णमूर्ती, नेहरू आणि मार्क्स यांना एकत्र यावे लागेल. ते केतकरसरच करू शकतात!
..................................................................................................................................................................
हा मूळ लेख ‘शब्द रुची’च्या जानेवारी २०२१च्या अंकात ‘सहज नीटू जाला...’ या नावाने प्रकाशित झाला आहे.
..................................................................................................................................................................
चिन्मय बोरकर
chinmay.borkar@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Sat , 16 January 2021
चिन्मय बोरकर,
भारताच्या मानसिक फाळणीवरनं एक प्रश्न उद्भवतो. तुम्ही डाव्या विचारांचे पाईक आहात, बरोबर? तर मार्क्सच्या मते भारत हा एकसंघ देश नाहीच. ती एक बहुप्रदेशी, बहुलोकी, बहुसांस्कृतिक गोधडी आहे. मग या गोधडीच्या चिंध्या झाल्या काय अथवा ती एकसंध राहिली काय, मार्क्सवाद्याला कशाला पाहिजे नसत्या पंचायती? तुम्ही जी हिंदूंनी केलेली मानसिक फाळणी म्हणता ना, ती शुद्ध बंडलबाजी आहे. आम्ही हिंदू असल्या नाटकांच्या आरपार पाहतो.
आपला नम्र,
-गामा पैलवान
Gamma Pailvan
Sat , 16 January 2021
चिन्मय बोरकर,
वयाच्या अठराव्या वर्षी तुम्ही कोणत्या प्रश्नाने एव्हढे गांजून गेलेलं होतात की केतकर हे तुमचं एकमेव आशास्थान उरलं होतं? १९९३ साली ७ वीत होतात म्हणजे १९९८ साली १२ वीत असणार. म्हणजे तुमचं वय १७ ते १८ असणार. या नवथर तरुण वयात तुम्हांस नेमक्या कसल्या नैराश्याने घेरलं होतं की तुम्ही स्वत:स गांजलेला म्हंटलं आहे? खरोखरंच गांजले होतात की टाळ्या मिळवायला उगीच दिलखेचक वाक्य टाकताहात? आजूनेक सांगायचं म्हणजे केतकर हे आशास्थान वाटणे याला अवतारभजन म्हणजे हिरो वर्शिप म्हणतात. जमल्यास ती सोडा म्हणून सुचवेन. तसेही तुम्ही आता चाळीशीला आलेला असाल. एव्हाना हिरो वर्शिप मधून बाहेर पडला असाल तर उत्तम. अन्यथा, ताबडतोब बाहेर पडा. कारण याच वयात हिरो वर्शिप मधून बाहेर पडण्याची अंतिम संधी असते. चाळीशीनंतर सवयी घट्ट होऊ लागतात. तुम्ही मार्क्सवादी दिसतंय. याचा अर्थ तुम्ही नास्तिक आहात. मग हे अवतारभजन कशासाठी? असो.
बाकी, १९९२ साली हिंदूंनी बाबरी पडून भारताची मानसिक फाळणी केली वगैरे वाचून जाम हसलो. १९९० साली काश्मिरी हिंदूंना नेसत्या कपड्यांनिशी रातोरात हाकलून दिलं होतं तेव्हा बरी नाय झाली मानसिक फाळणी ! एकंदरीत हिंदूंच्या जीवाला तुमच्या लेखी शून्य मूल्य आहे. जमलं तर हिंदूंचा विचार करायला शिका. पुढचं पुढे.
आपला नम्र,
-गामा पैलवान