‘इंटलेक्चुअल अ‍ॅक्टिव्हिझम’ ही कुमारनं आमच्या पिढीला दिलेली देणगी आहे!
पडघम - माध्यमनामा
धनंजय गांगल
  • कुमार केतकर यांचं पोट्रेट - निलेश जाधव
  • Fri , 15 January 2021
  • पडघम माध्यमनामा कुमार केतकर Kumar Ketkar

‘महाराष्ट्र टाईम्स’, ‘लोकमत’, ‘लोकसत्ता’ आणि ‘दिव्य मराठी’ या मराठीतील चार आघाडीच्या वर्तमानपत्रांचे संपादकपद भूषवलेल्या कुमार केतकर यांनी ७ जानेवारी २०२१ रोजी वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली. त्यानिमित्ताने त्यांच्याविषयीचा हा पुनर्मुद्रित लेख...

..................................................................................................................................................................

लहानपणीच्या ‘कुमारकाका’मधलं काकापण त्याच्या लोभस स्वभावामुळे आपसूकच कधी विरघळून गेलं ते नीटसं आठवतही नाही. वय, प्रज्ञा, अनुभव, पद या सगळ्याच अंगानी कोसो मैल ज्येष्ठ असलेल्या कुमार केतकर यांचा उल्लेख मी ‘कुमार’ म्हणूनच करतो, कारण त्याशिवाय त्याच्याविषयी लिहिणं मला शक्य होणार नाही. मला त्याच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधीही कधी आली नाही. मला त्याच्याशी कुठल्या विषयावर मोठा वाद-चर्चा केल्याचंही आठवत नाही. जसं अपघाताच्या दोन-चार क्षणांत जीवनाची खोली समजते, तसंच एखाद्या नाट्यमय घटनेतून माणूस पटकन उमजतो. पण तसे काही नाट्यमय प्रसंगाना आम्ही सह-सामोरे गेलोय असंही नाही. माझ्याकडे कुमारबद्दल सांगण्यासारखे किस्से किंवा ड्रॅमॅटिक असं काही नाही. Kumar has an uncanny knack of acknowledging existance of everyone around him and I was always one among the blessed ones, of course, in silence.

आता मागे वळून पाहताना वाटतं, माझ्या घडण्याच्या वयात कुमारनं वेळोवेळी व्यक्त केलेल्या विचारांचा, त्याच्या लेखांचा, भाषणांचा खूप खोलवर प्रभाव आहे. मला कुमार उमगतो तो एकसंध नाही, तर एखाद्या कोलाजसारखा बहुविध इम्प्रेशन्सनी भरलेला. त्यातील जुनी काही इम्प्रेशन्स त्या पिढीतील त्याच्या सुहृदांशी मी ताडून पाहण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्यांनाही आता पुरेसं स्मरण होत नाही. त्यामुळे तो नाद मी सोडून दिला. असो. कुमारचं बहुपेडी व्यक्तिमत्त्व खरं तर एका लेखात मावणं शक्यच नाही. तरीही एक प्रयत्न करून बघूया.   

माझ्या वैचारिक परिप्रेक्ष्यांत कुमारच्या विचारांचा, लिखाणाचा मोठा वाटा आहे. त्यानं आमच्या पिढीला मध्यमवर्गीय एकरेषीय जाणिवेतून बाहेर पडून अनेक अंगांनी विचार करायला भाग पाडलं. दोन-तीन उदाहरणं देतो. इंदिरा गांधींविरुद्ध देशभर वातावरण असताना ‘ज्वालामुखीच्या तोंडावर’ हे आणीबाणीचं चक्क समर्थन करणारं पुस्तक! त्यानं आणीबाणीआधीचा आंतरराष्ट्रीय पट असा काही उलगडून दाखवला की, त्यात आणीबाणी अपरिहार्य वाटावी. मान्य असो-नसो पण आणीबाणीकडे असंही बघता येतं! हे काहीतरी वेगळच बौद्धिक खाद्य होतं!

दुसरं उदाहरण आळेकरांच्या महानिर्वाण नाटकाचं. कुमारनं अ‍ॅब्स्ट्रॅक्ट पठडीतल्या त्या नाटकाचे अनेक पदर विलक्षण पद्धतीनं उलगडून दाखवले आहेत, हे त्यानं नाटकावर लिहिलेल्या एका पुस्तिकेतून कळलं.

कुमारनं सुर्वे, प्रमोद महाजन, तेंडुलकर आणि बाळ ठाकरे यांच्यावर लिहिलेले मृत्युलेखही मुळातून वाचायला हवेत. तितक्याच ताकदीचं कुमारनं विजय तेंडुलकरांच्या हिंसेच्या तत्त्वज्ञानावर केलेलं भाष्य! तो लेख ‘वीकली’त आला होता. This apparently created a rift between Tendulkar and Kumar. अर्थात नक्की काय घडलं याबाबत त्याच्या समकालीनांचं मत ‘राशोमान’प्रमाणे वेगवेगळं आहे.      

त्यानं ‘डेली ऑब्झर्व्हर’, ‘इकॉनॉमिक टाइम्स’, ‘महाराष्ट्र टाइम्स’, ‘लोकसत्ता’, ‘लोकमत’ अशा अनेक वृत्तपत्रांत उच्च पदं भूषवली आहेत. तो काही वृत्त-वाहिन्यांचा सल्लागार संपादक होता. ‘बदलते विश्‍व’, ‘त्रिकालवेध’, ‘ओसरलेले वादळ’, ‘एडिटर्स चॉईस’, ‘विश्‍वामित्राचे जग’, ‘शिलंगणाचे सोने’, ‘मोनालिसाचे स्मित’, ‘कथा स्वातंत्र्याची’, ‘ज्वालामुखीच्या तोंडावर’ - हा कुमारलिखित विपुल पुस्तकसंग्रह आहे. आजही, तो अनेक डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर विविध विषयांवर लिहीत असतो. त्यानं अनेक परीक्षक आणि अभ्यासक समित्यांवर पदं भूषवली आहेत. हे राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर संगीत, नाटक, सिनेमा, विज्ञान, तंत्रज्ञान, तत्त्वज्ञान, अध्यात्म, राजकारण, समाजकारण, अर्थकारण अक्षरसाहित्य - अभिजात कलांपासून जीनोम-मॉलिक्युलर बायॉलॉजीपर्यंत अशी अनेक विषयक्षेत्रं. कला आणि ज्ञानाची अशी एखादीच शाखा असेल ज्यावर तो व्यक्त झाला नसेल.

सखोल विचार, परखड विवेचन आणि ठोस भूमिका हे त्याच्या विचारांचे वैशिष्ट्य आहे व तेच लेखनाचे उतरते. तो एकाच विषयावर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळी मांडणी करतो. त्यात वरवर विसंगती वाटली तरी तशी अजिबात नसते. तो टार्गेट ऑडियन्स बघून विषयाच्या बौद्धिक खोलीत शिरतो. अनेकदा तो युरोपीय रेनेसाँपासून सुरुवात करतो आणि टप्प्याटप्प्यानं वर्तमानात येतो. तो तात्कालिकतेच्या पलीकडे जाऊन काळाचा पूर्ण पैस मांडतो.

कुतूहल, जिज्ञासा, ज्ञान, विवेक, संवेदना, चांगुलपणा, सुसंस्कृतपणा या सगळ्यांना कवेत घेणारा एक छान शब्द आहे - जाणिवा! कुमार वाचक-श्रोत्यांच्या या जाणिवा रुंदावण्याचं काम सातत्यानं करत असतो. विषय कुठलाही आणि कितीही गुंतागुंतीचा असो कुमारची मांडणी सहसा सोप्या शब्दांत, सुस्पष्ट असते आणि उथळ शेरेबाजीपासून मुक्त असते. हे त्याचे विरोधकही मान्य करतील. त्याचा लेख समजला नाही, त्याला टोक आलं नाही असं कधी होत नाही. तो ज्यांच्यापर्यंत पोचायचं आहे त्यांच्यापर्यंत व्यवस्थित पोचतो, हे त्यावर आलेल्या प्रतिक्रियांमधून लक्षात येतं.

तो संपादकीय प्रकृती म्हणून म्हणून तळवलकर आणि गडकरी यांच्या कुठेतरी मध्ये होता. त्याची पत्रकारिता ही मुख्यतः अत्यंत बौद्धिक, स्वच्छ-मोकळी आणि नागरी राहिली आहे. एखादा प्रश्‍न वरवर तात्कालिक वाटला तरी त्याला ऐतिहासिक परिमाण असते. त्यांच्या लेखनात त्या प्रश्‍नाची ची उत्तरे नसली तरी तात्कालिकतेच्या पलीकडे जाऊन ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक पूर्ण पैस ते मांडतात. राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण, विज्ञानकारण या सगळ्याच परिप्रेक्षात घडणार्‍या लहानशा घटनांबद्दल जाणून घेण्यास तो सतत उत्सुक असतो. पण त्या घटनांचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न तो पूर्णपणे राजकारणातून तेही विशेषतः सत्तेच्या राजकारणातून लावण्याचा त्याचा प्रयत्न असतो. तो कुठल्याही संवादात शांतपणे आधी समोरच्याचं ऐकून घेतो आणि मग आपला विचार अत्यंत मुद्देसूद, सुसंगतपणे मांडतो. केवढे संदर्भ तेही तारखेसकट त्याच्या जिभेवर असतात! ‘इंटलेक्चुअल अ‍ॅक्टिव्हिझम’ हा शब्द त्याच्या पत्रकारितेला चपखल बसतो. ‘इंटलेक्चुअल अ‍ॅक्टिव्हिझम’ ही त्यानं आमच्या पिढीला दिलेली देणगी आहे! आणि तो ठेवा सांभाळायला आम्ही चांगलेच कमी पडतोय!

चांगल्या नेतृत्वानं जोखीम घेणं टाळायचं नसतं. चुका, त्रुटी टाळण्याचा किती प्रयत्न करायचा याला मर्यादा आहेत आणि झाल्या तर नंतर दुरुस्त करणं हे स्वस्त असतं. नेतृत्वानं वातावरण असं निर्माण करायचं की सहकार्‍यांना जोखीम घेताना त्या नेतृत्वाची भीती नाही, तर आदर आणि आधार वाटेल.

दुसरं म्हणजे - कुठल्याही संस्थेत अधिकाराची श्रेणीबद्ध उतरंड (हायराकिकल) असलेली रचना असते. सर्वांत कनिष्ठ अधिकारावर असलेल्या व्यक्तीला अत्यंत वरिष्ठ व्यक्तीशी काही संभाषण करायचं असेल तर त्याला वरिष्ठांशी आणि खुद्द स्वतःशी थेट बोलण्याचं स्वातंत्र्य चांगल्या नेतृत्वानं दिलं पाहिजे. कुमारबरोबर काम केलेल्या त्याच्या सहकार्‍यांकडून ऐकलंय त्यावरून हे कुमारला तंतोतंत लागू होतं. कुमारची वृत्ती एखाद्याला पत्रकारितेत एका ठिकाणी एका विशिष्ट टप्प्यापुढे जाण्याची संधी नसल्यानं, त्याच्या गुणवत्तेला इतरत्र वाव देण्याची, त्याला नव्या कोंदणात पाठवण्याची होती. एखादा अग्रलेख आवडल्याचं कुणी सांगितलं तर तो ज्याने लिहिला असेल त्या सहकार्‍याचं नाव अभिमानानं सांगणारा असा संपादकही अपवादानंच आढळेल.

आत्ममग्न मध्यमवर्ग आणि लोहियावादी या कुमारच्या आवडीच्या पंचिंग बॅग्ज! ८०-९०च्या दशकात जसजसं आर्थिक स्थैर्य येऊ लागलं, तसतसा आपल्या कोशात गेलेला मध्यमवर्ग! जेव्हा मध्यमवर्ग फक्त आत्ममग्नच होता तेव्हा वाटायचं, कुमार उगाचच अति टीका करतोय. पण आता भाजप आयटी-सेलच्या पौष्टिक खुराकावर पोसून त्याच मध्यमवर्गाला चढलेला मद बघितला तर शहारून येतं. ज्या वर्गाकडून देशाच्या बौद्धिक नेतृत्वाची अपेक्षा करायची त्याची अशी अवनत अवस्था पाहून दुःख आणि भीती वाटते.

त्याच वेळेस आश्‍चर्य वाटतं की, कुमारला त्या वेळेसच याची foresight होती! तीच गोष्ट लोहियावाद्यांची. केवळ इंदिराजींना टोकाचा विरोध केला म्हणून कुमारचा त्यांच्यावरचा राग त्यावेळी अनाठायी वाटायचा! पण एकच उदाहरण म्हणून नितीशकुमारच्या कोलांट्याउड्या बघितल्या तरी कुमारचं त्यांच्याबाबतचे विश्‍लेषण त्या वेळी काळाच्या खूप पुढे होतं हे लक्षात येतं.

२००९चा लोकसभा निवडणूक निकाल आणि त्यानंतरच्या शक्यता यावर त्यावेळच्या ‘स्टार माझा’नं ‘केतकरांचे सात ऑप्शन्स’ असा कार्यक्रम केला होता. तेव्हा काँग्रेसचा पूर्ण पराभव होऊ शकतो, हीही शक्यता धरून कुमारनं मांडणी केली होती. हे एक लहानसं उदाहरण. कुमार हे विश्‍लेषण कुठलाही अभिनिवेश किंवा पूर्वग्रहदूषितता न बाळगता करत असतो. पण गेल्या काही वर्षांतलं याला छेद जाईल असं कुमारबाबत माझं एक निरीक्षण आहे. मारिओ पुझोच्या क्लासिक ‘गॉडफादर’मध्ये मायकेल कोरेलिओनीच्या तोंडी एक वाक्य आहे- Never hate your enemies. It affects your judgement. सध्या कुमारची निवडणुकीच्या संदर्भातील भाकितं वारंवार off -the-track असतात.    

मला अंधुकसं आठवतंय त्याप्रमाणे बहुतेक ‘सांस्कृतिक आव्हान’ किंवा अशाच एका लेखात पसायदानाचा उल्लेख कुमार ‘ज्ञानेश्‍वरांचा मॅनिफेस्टो’ असा करतो आणि पुढे त्याचं समर्थनही  करतो, की ‘‘ ‘ज्ञानेश्‍वरांचा मॅनिफेस्टो’ असा शब्दप्रयोग करणंच मराठी शुचिर्भूतांना खटकेल, पण त्यांना तो खटकावा म्हणूनच केला आहे.’’ असा खट्याळपणा कुमार करणार! एकीकडे त्याच्या वृत्तपत्रात त्याच्या मताचा प्रतिवाद करणारा लेख अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आदर करत छापणार. दुसरीकडे तो आणीबाणी आणि पर्यायानं येणार्‍या अभिव्यक्तिसंकोचाचं समर्थन करणार.

सर्वसामान्यपणे संकेत असा आहे, की विरोधी विचारसरणींच्या लोकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात पुरोगाम्यांनी सहभागी होऊ नये. तो औचित्यभंग आहे असं अनेकांना वाटतं. पण ‘हीच ती वेळ, हाच तो क्षण’ मानून अचूक वेध घेत ब्राह्मणसभेच्या महाअधिवेशनात जाऊन ब्राह्मण आणि ब्राह्मण्य या शब्दांची-संकल्पनांची चिरफाड करून त्याची रोखठोक भूमिका मांडणारा, सर्वसाधारण डाव्या विचारांचा असूनही ग्लासनोस्त, पेरेस्त्रोइका आणि जागतिकीकरण यांचं स्वागत करणाराही कुमारच.

तो नेहरू-गांधी घराण्याची पाठराखण करतो, पण काँग्रेस पक्ष म्हणून आणि एकूणच डाव्यांवर टीकाही करतो. संघपरिवार हा त्याच्या टीकेचं बर्‍याचदा लक्ष असलं तरी त्याला ‘पद्मश्री’ मिळाली ती वाजपेयी-सरकारच्या काळात. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पूर्णवेळ इंग्रजी पत्रकारिता करण्याचे पर्याय उपलब्ध असूनही तो हिरिरीनं मराठीत व्यक्त होत राहिला. तेही कुठला अभिनिवेश न बाळगता.

शिवसेनेविरुद्ध सतत एडिटोरिअल-लाइन धरणारा कुमार, ‘टाइम्स’नं आर.के. लक्ष्मण यांच्यावर केलेल्या पुस्तक प्रकाशनासाठी कुठलाही पूर्वग्रह न ठेवता बाळ ठाकरेंना बोलावणारा कुमारच! त्या कार्यक्रमात ‘युअर हॅन्ड इज शेकिंग, माय हॅन्ड इज शेकिंग - इट्स अ रियल शेकहॅण्ड!’ ही दोघांची आठवण आवर्जून सांगणाराही कुमारच. मार्क्स, लेनिन, स्टॅलिन यांच्याविषयी लिहिणारा कुमारच आणि व्हाया लोकमान्य टिळक - आयन रँडविषयी कुतूहल असणारा कुमारच. इंदिराजींच्या समाजवादाचे समर्थन करणारा आणि मनमोहनसिंगांच्या आर्थिक सुधारणांवर भरभरून लिहिणारा कुमारच.

कुमारला चॅनेलवर संबित पात्रासारख्या गृहस्थाशी वाद घालायला लागावा याचा आम्हाला त्रास होतो. पण कुमार त्याचा हट्ट सोडत नाही. तो भिडतो. तो राज्यसभेवर जाईल जाईल वाटतं होतं, तेव्हा तो गेला नाही. आता, राज्यसभेच्या नशिबात कुमार नाही असं वाटत असताना तो अचानक राज्यसभेत दाखल झाला. तेही एवढी वर्षं टाळलेला काँग्रेसप्रवेश करून. आणि अशा वेळी, की काँग्रेस पक्ष इतिहासात सर्वात दयनीय अवस्थेत आहे! खरं तर भरलेलं आपल्या सगळ्यांचंच जगणं अशा थोड्याफार विसंगतीनं असतं. पण कुमारच्या बाबतीत ते उठून दिसतं.

मला नेहमी जाणवतं - Kumar is a very consummate person, hampered by his love for Nehru-Gandhi Family. ‘भक्त’ या शब्दाला सध्या वेगळा अर्थ प्राप्त झाला आहे. आपल्या विरोधकांचा टोकाचा विद्वेष हे एकक त्याला प्राप्त झालं आहे. त्यामुळे मी कुमारला ‘चाहता’ असा शब्द वापरीन. कुमार नेहरू-गांधी कुटुंबाचा निस्सीम ‘चाहता’ आहे आणि ते सर्वश्रुत आहे. त्याचा दृढविश्‍वास ते कधीही चुकत नाहीत हा आहे. राजकीय अपरिहार्यता म्हणून एकवेळ जेपींनी संघाला मुख्य धारेत आणलं आणि इंदिराजींनी आणीबाणी लादली या दोन्ही निर्णयांचं समर्थन होऊ शकेल, पण आपल्याला एकविसाव्या शतकात नेणार्‍या पंतप्रधानांचं शाहबानोबाबतचं वर्तन? त्याचे कुठल्याच प्रकारे समर्थन होऊ शकत नाही. किंबहुना नव-हिंदुत्ववादाला खतपाणी घालण्यात अप्रत्यक्षपणे, अजाणता त्या घटनेचा मोठा हात आहे. त्याबाबत कुमारनं राजीव गांधींच्या निर्णयाविरुद्ध भूमिका घ्यायला पाहिजे होती. It was his moral obligation. पण आठवतंय त्याप्रमाणे त्यानं संदिग्ध भूमिका घेतली. त्याचं बहुआयामी, बहुपेडी अत्यंत प्रज्ञावान व्यक्तिमत्त्व नेहरू-गांधी घराण्याच्या या प्रेमामुळे बर्‍याचदा  झाकोळलं जातं, याचं दुःख होतं.  

अरुण साधू हे कुमारच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग होते. कुठल्याशा मुलाखतीहून परत येताना गाडीत साधूकाका अस्वस्थ दिसले. मुलाखतीत वारंवार तुम्ही ‘सिंहासन’ कादंबरीत राजकारण्यांची parody - थट्टा - छान उडवली आहे असे उल्लेख होत होते. साधूकाका म्हणाले की मी राजकारण समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे - अत्यंत गंभीरपणे आपण त्याकडे बघितलं पाहिजे. ‘सिंहासन’ म्हणजे राजकारणाचे विडंबन आहे असं वाटत असेल तर माझी ती कादंबरी फसली आहे असं म्हणावे लागेल!

या नव-मध्यमवर्गाचा एकूणच जीवनाकडे आणि विशेषतः राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा असा उथळ आहे. या प्रचंड लोकसंख्येच्या लोकशाहीत, होणार्‍या विकासात, जास्तीत जास्त वाटा आपल्याला मिळावा आणि कमीत कमी कर्तव्यं करायला लागावीत यासाठी प्रत्येक जण कार्यरत असतो. मग कधी जात तर कधी धर्म, कधी भाषा तर कधी प्रदेश अशा वेगवेगळ्या अस्मितांच्या आधारावर एकत्र येत तो दबावगट बनवून फायदे आपल्याला आणि तोटे दुसर्‍याला हे ईप्सित साध्य करण्याच्या प्रयत्नात असतो.

त्याचाच एक भाग म्हणजे सतत आपल्यावर अन्याय होतोय हे इतरांना पटवून द्यावं लागतं. One campaigns in poetry but one has to govern in prose. पक्ष, शासन, सरकार, नोकरशाही आणि त्यांच्यामधील व्यवहारातील गुंतागुंत. हे सगळं मध्यमवर्ग बौद्धिक क्षमता असूनही समजून घ्यायला तयार नाही. त्याचं मन खेळाडू क्रीडामंत्री, डॉक्टर आरोग्यमंत्री आणि जनरल संरक्षणमंत्री झाला की प्रश्‍न सुटतात असं बाळबोध आहे. पक्ष चालवणं, निवडणुका लढवणं यासाठी प्रचंड पैसे लागतात, ते आपण देत नाही. सामान्य लोकांनी पक्षाला आर्थिक साहाय्य्य केलं ते आणीबाणीनंतर जनता पक्षासाठी आणि आता काही प्रमाणात दिल्लीत ‘आप’साठी. त्यानंतर नाही. तेव्हा हा वर्ग Vajpayee and Dr MMS have a luxury to project clean image as Bangarus and Kalmadis do that inconvenient work for them - ho nuances हे समजून घ्यायला तयार नसतो. त्यात शीर्ष नेतृत्व जर अविवाहित पुरुष असेल तर तो त्यांना अत्युच्च नि:स्वार्थ वाटतो! कारण शेवटी स्त्रियाच पुरुषाच्या अधःपतनाला कारणीभूत असतात हा खोल रुजलेला दृष्टिकोन.

कोपर्‍यात लपून बसून वळणावर सिग्नल तोडल्याबदल्यात ५०/१००/२०० रुपये घेणारा पोलीस हा भ्रष्टाचारी पण कायद्यात लहानशी पळवाट ठेवून किंवा शासकीय धोरणात लहानसा बदल करून कित्येक शेकडो कोटींचा फायदा करून देणारा भ्रष्टाचार त्यांच्या गावीही नसतो. आर्थिक आणि दृश्य असेल तोच फक्त भ्रष्टाचार अशी मध्यमवर्गाची सुटसुटीत कल्पना आहे. भ्रष्टाचार हे एक केवळ उदाहरण म्हणून! पण राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, एकूण सगळ्याच बाबतीत मध्यमवर्गीय जाणिवा ह्या अशा mediocre होत चालल्या आहेत. अण्णा आंदोलनानं अजाणता या mediocrityला बळ दिलं!

"The media is willing to crawl when nobody is even asking it to bend' अडवाणींच्या आणीबाणी संदर्भातील एका निरीक्षणाचा संदर्भ देणारी कुमारचे ‘इंडियन एक्स्प्रेस’मधील सहकारी शेखर गुप्ता यांचीही मुलाखत डिसेंबर २०१४मधली. त्यानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. माध्यमांपासून देशातल्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत सर्वच लोकशाही संरचनांना हे लागू होतं की, काय अशी शंका येऊ लागली आहे. अशा वैचारिक पोकळीत Making india great again through redemptive fantasies of past purity या विचारांचं फावतं. वर्तमानकाळ जेव्हा गोंधळलेला असतो, त्यामुळे भविष्यकाळ संदिग्ध होण्याची शक्यता असते आणि ठाम बौद्धिक नेतृत्वाचा अभाव काल्पनिक भव्य इतिहासात उत्तरं शोधण्यास भाग पडतो. नव्या हिंदुत्ववादाच्या उन्माद हा त्यातून आलाय! हे विवेकानंदप्रणीत अनुकंपा असलेलं हिंदुत्व नाही. बहुसंख्य असूनही victimhoodमध्ये रमलेलं आणि सतत कल्पित शत्रूच्या द्वेषानं पछाडलेलं हे नव-हिंदुत्व आहे. एकीकडे West is anxious visioning the future आणि दुसरीकडे We are busy reconstructing the past.

गो बॅक अंकल सॅम -आहा! बट टेक माय सन विथ यू! ही पाश्‍चात्त्यांबरोबरच्या संबंधातील  ‘हिपोक्रसी’ही याच वैचारिक पोकळीतून जन्माला येते. आमची हजारो वर्षांची संस्कृती, परंपरा, सगळं महान आहे! तुझ्या त्या भ्रष्ट विचारांची सावलीही आमच्यावर नको. तेव्हा Uncle Sam तू चालता हो. हा पण जाताना माझ्या मुलाला  मात्र घेऊन जा - शेवटी भविष्य तिथेच आहे - इथे काही खरं नाही.

सध्याचे राजकीय नेतृत्व हे या वैचारिक पोकळीचं कारण नाही तर ते लक्षण आहे. लोकसभेच्या डोक्यावर राज्यसभा आणि विधानसभेच्या डोक्यावर विधान परिषद यांचे प्रयोजनच हे आहे की, अन्य शाह्यांप्रमाणे लोकशाही हीदेखील स्खलनशील आहे. लोकनियुक्त आहोत आणि बहुमतात आहोत हा दावा करत हुकूमशाहीकडे वाटचाल होण्याचा सतत धोका असतो. राजसत्तेवर सद्सदविवेकाचा अंकुश असलाच पाहिजे अगदी a tyranny of the unelected अशी या विवेकाची-अंकुशाची हेटाळणी झाली तरी. हे सर्व विस्तारानं लिहिण्याचं कारण, कुमारचं त्याच्या विचारांचं आणि लेखनाचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी. तो बौद्धिक आयुधं वापरत, जाणिवा रुंदावत या विवेकाचा अंकुश परजायला त्यांना सतत उद्युक्त करत असतो. 

कुमार कितीतरी विशालपटाचा आणि त्रिकालाचा वेध सतत घेत असतो. कुमारचा विषय निघाला की थोरोचं एक वाक्य मला नेहमी आठवतं- ''If a soldier marches out of sync with his companions, perhaps he hears a different drummer.'' This probably explains Kumar in absolute. कुमार हा असा सतत त्याची वैचारिक आयुधं परजत जीवनाच्या, समाजाच्या, राजकारणाच्या सर्वांगांना भिडत असतो आणि आपल्याला भिडायचं आवाहन करत असतो. His body of work - त्याच्या योगदानाची, कार्याची, कर्तृत्वाची मीमांसा करण्याचं कार्य तो आपल्यावर सोपवतो.

..................................................................................................................................................................

हा मूळ लेख ‘शब्द रुची’च्या जानेवारी २०२१च्या अंकात ‘कुमार केतकर आणि इंटलेक्च्युअल अ‍ॅक्टिव्हिझम’ या नावाने प्रकाशित झाला आहे.

..................................................................................................................................................................

धनंजय गांगल

dhananjay.gangal@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Gamma Pailvan

Sat , 16 January 2021

धनंजय गांगल, धनंजय गांगल,

कुमार केतकर कितीही व्यासंगी असले तरी हिंदूंना त्यांच्या व्यासंगाचा व ज्ञानाचा काडीमात्र फायदा नाही. हे व्यासंगी ज्ञान नेहरूगांधी घराण्याच्या दावणीला बांधलं गेलेलं आहे. एक हिंदू म्हणून माझी ही खंत आहे. मग मोदी काय वाईट आहे? मोदी कुणाच्या घरी पाणी भरीत नाहीत. केतकरांनी जन्मभर सांभाळलेल्या आदर्शांना मोदी मोडीत काढताहेत. त्यामुळे त्यांचा जळफळाट होतो. त्यामुळे ते मोदींना नव्या हिंदुत्ववादाच्या उन्माद वगैरे अशी नावं ठेवतात. चालायचंच.

आपला नम्र,
-गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......