पानिपतोत्तर भाऊसाहेब पेशवे – खरे की तोतया? खरे ते तोतया नि खोटे ते खरे!
पडघम - सांस्कृतिक
सर्जेराव देशमुख
  • पानिपत युद्धाचे एक पेंटिंग आणि भाऊसाहेब पेशवे यांचे एक पेंटिंग - दोन्ही विकीपीडियावरून साभार
  • Thu , 14 January 2021
  • पडघम सांस्कृतिक पानिपत विश्वासराव पेशवे भाऊसाहेब पेशवे सदाशिवरावभाऊ

आज १४ जानेवारी २०२१ रोजी पानिपतच्या तिसऱ्या युद्धाला २६० वर्षं पूर्ण झाली. सदाशिवरावभाऊ अथवा भाऊसाहेब पेशवे त्या युद्धांत मराठ्यांचे सेनापती होते. पानिपतच्या युद्धांत मराठ्यांचे काय झाले, हे सर्वांनाच माहीत आहे.

पानिपत-पूर्व घटना व पानिपतचे युद्ध या विषयांवर सखोल अभ्यास झाला आहे. परंतु पानिपतनंतरच्या घटनांकडे दुर्लक्ष झाल्याचे सातत्याने नजरेस येते, खासकरून भाऊसाहेब पेशव्यांचे काय झाले, याविषयी अनास्थेचा अंधकार सर्वत्र दाटलाय. नास्तिक हे ईश्वरास अमान्य करणारे, तर पानिपतोत्तर भाऊसाहेब नामकाचे अस्तित्व नाकारणाऱ्या नास्तिक कारभाऱ्यांनी व नंतर नास्तिक अभ्यासकांनी भाऊंबद्दलचे अंकूर मुळासकट उपटून काढले. नास्तिक बळावले, लोकमत लोप पावले. ना.स. इनामदार व पांडुरंग गोपाळ रानडे यांची मते सत्यशोधक म्हणवऱ्यांना पण बाधली. भाऊसाहेब पानिपतच्या संग्रामांत मारले गेले, हे बहुतांना मान्य आहे. अशा पूर्वग्रहदूषित वातावरणात पानिपतनंतरचे भाऊसाहेब म्हणजेच तोतया हे प्रकरण सर्वमुखी झाले. माझ्या प्रस्तुत अभ्यासात असे लक्षात आले की, खऱ्या भाऊंचा तोतया केला गेला नि तोतया तो भाऊ झाला!

पेशवे दफ्तरातील पत्रांतून असे लक्षात येते की, १७६१च्या अखेरीस भाऊसाहेब खानदेशात आले असता त्यांना तेथून पुढे पुण्यास येऊ दिले नाही. याच सुमारास पुणे सरकारने बुंदेलखंडातून सुखलाल (अथवा सुखनिधान) नावाच्या कानोज्या ब्राह्मणास (खरे) भाऊसाहेब म्हणून जाहीर केले गेले. म्हणजेच तोतया निर्माण केला. १२ फेब्रुवारी १७६५च्या पत्रानुसार माझ्या मते खऱ्या भाऊसाहेबांना अटक झाली नि ऑगस्टमध्ये खोट्याला पण अटक झाली. त्यानंतर १७६५ ते १७७६पर्यंत दोघांना एका किल्ल्यातून दुसऱ्या किल्ल्यांवर कैदी म्हणून हलवण्यात आले. जून १७७५ला कैद्यास मिरजेस पटवर्धनांकडे पाठवले असता त्यांनी कैदी भाऊसाहेब असल्याचे वांचित केले नि ऑक्टोबर १७७५ला कैद्यास रत्नागिरीला नाईक-परांजप्यांकडे पाठवले. परांजप्यांनी पण त्यांना फेब्रुवारी १७७६ला भाऊसाहेब म्हणून जाहीर केले आणि त्यांची सुटका केली. भाऊंच्या पाठीशी पाच-सात सरदार व २० हजार सैन्य गोळा झाले. सैन्यानिशी भाऊ सिंहगडला आले, तेव्हा त्यांच्यावर शिंदे, होळकर व पाणस्यांचा तोफखाना रवाना केला गेला. भाऊंना कोकणात माघार घ्यावी लागली व समुद्रमार्गे इंग्रजांकडे मदतीस जात असता ऑक्टोबर १७७६मध्ये रघोजी आंग्रे यांच्याकरवी त्यांना अटक करण्यात आली. हा फेब्रुवारी ते ऑक्टोबर १७७६चा कालावधी म्हणजेच न.चिं. केळकरांनी चुकीने प्रज्वलित केलेल्या ‘तोतयाचे बंड’ या नाटकातील कालखंड होय. बुदेलखंडातील भाऊनामक सुखलाल पण या वेळी महाराष्ट्रातच असणार आणि डिसेंबर १७७६ला खऱ्या आणि खोट्याची सुटका झाली असणार असे दिसते. त्यानंतर भाऊसाहेब अज्ञातवासात गुजरातेत राहिले असल्याचा परिस्थितीजन्य पुरावा आढ‌ळतो.

पानिपतोत्तर भाऊसाहेबांचे अस्तित्व हे सत्य की मिथ्य हा विषय हाताळत असताना लक्षात येते की, त्याबाबतीत आज जवळजवळ २६० वर्षे जिज्ञासू व सर्वसामान्य माणसांची दिशाभूल झाली आहे. पानिपतनंतरच्या भाऊसाहेबांवर लक्ष केंद्रित करणेचे गरजेचे आहे. परंतु पूर्वग्रहदूषित वातावरणात त्यांच्या अस्तित्वाचा शोध घेणे हा एक अवघड विषय होऊन बसलाय. या विषयावर सत्य उघडकीस आल्यास पानिपतोत्तर मराठ्यांचा इतिहास बदलण्याची केवळ शक्यता नव्हे, तर शाश्वतीही वाटते.

 

आता मुख्य विषयाकडे वळूया. पानिपतनंतरचे भाऊसाहेब हे एक न सुटलेले कोडे नसून ते एक न सोडवलेले कोडे आहे. या कोड्यासंबंधी विचारात न घेतलेले प्रश्न अनेक आहेत. मुळात हे प्रश्नच बोलके आहेत. त्यांची वाच्यता करताच ते बोलू लागतील. आणि या प्रश्नातूनच आपण उत्तरांचा शोध घेणार आहोत. पानिपतनंतरच्या भाऊसाहेबांचा शोध ‘नेति नेति’च्या न्यायाने सुटेल – जे ज्ञात आहे ते खोडल्याशिवाय उत्तर सापडणे शक्य नाही – सर्व प्रश्न नव्याने बघावे लागतील. पानिपतोत्तर भाऊसाहेबांच्या अस्तित्वाविषयी उत्तरांपेक्षा प्रश्नच अधिक उदभवतात व हे सर्व प्रश्नच भाऊसाहेबांच्या अस्तित्वास आधारभूत ठरतील –

 

१) पानिपतचे युद्ध व त्यानंतरच्या घटनांशी संबंधित उपलब्ध साधने कोणती?

मुख्य साधने आहेत- पेशवे दफ्तर, भाऊसाहेबांची बखर, भाऊसाहेबांची कैफियत, खरेकृत नाना फडणीसांचे आत्मचरित्र, आप्टे-उत्तूरकर व य. न. केळकर पत्रसंग्रह इत्यादी. महाराष्ट्रातील अभ्यासकांस या व्यतिरिक्त इतर दुर्मीळ साधने म्हणजे पुरंदरे-इचलकरंजी-पटवर्धन दफ्तर, शिवाय गायकवाड-शिंदे दफ्तर, होळकर थैली. जर ही मराठी साधने सहज उपलब्ध नाहीत, किंबहुना मिळवणे अशक्य आहेत, तर हिंदुस्थानातील मोगल-फारशी साधनांपर्यंत मजल गाठणे म्हणजे एव्हरेस्टचे शिखर गाठणे ठरेल.

 

२) पानिपतानंतर भाऊसाहेबांच्या अस्तित्वाबद्दल तज्ज्ञांची मते काय आहेत? मृत्युस मान्यता देणारी, मृत्यु अनिश्चित असूनसुद्धा त्यास मान्यता देणारी की मृत्यु विरोधी?

पानिपतानंतर भाऊसाहेबांचे अस्तित्व अमान्य करणारा गट खूपच मोठा आहे. मृत्युविरोधी गटाची संख्या अति अल्पसंख्येत आहे. त्यात नानासाहेब पेशवे पण येतात. इतिहासकारांत ग्रँट डफ ही एकच व्यक्ती आहे की, ज्यांस भाऊंचा मृत्यु मान्य नाही. शिवाय ‘शिकस्त’ या कादंबरीत ना. स. इनामदारांना भाऊंचा मृत्यु मान्य नसावा असे दिसते. १९४०च्या दशकातल्या संशोधनात बेळगावचे औषधी कारखानदार पांडुरंग गोपाळ रानडे म्हणतात की, सदाशिवरावभाऊ यांच्यावर पुणे दरबारने केलेला अमानुष जुलूम म्हणजेच ‘तोतयाचे बंड’. या विषयावर स्वत: संशोधन न करताच वटवट करणाऱ्या व इतिहासरूपी मद्याच्या धुंदीत डुंबलेल्या इतिहासकारांनी ठरवले की, इनामदार कादंबरीकार आहेत व रानडे इतिहासकार नव्हेत. त्यांच्या मतांना अधिकारित्व नाही. परिणामी लोकमत उघड्यावर पडले!

 

३) भाऊसाहेबांचा मृत्यु सर्वांना मान्य झाला, यासाठीचा मुख्य पुरावा कोणता?

काशीराजचे २४ फेब्रुवारी १७६१चे पत्र आणि त्याने १७८०ला लिहिलेली ‘पानिपतची बखर’.

 

४) काशीराजचे २४ फेब्रुवारी १७६१चे पत्र त्याने कोणत्या अधिकाराने लिहिले असावे? भाऊंच्या मृत्युबद्दल हा एकमेव पुरावा सर्वांनीच मान्य केलेला आहे. त्यात त्रुटी आहेत का?

या प्रश्नाचे उत्तर शोधण्यापूर्वी एक महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे. सरदेसाई लिहितात की, युद्धानंतर आठ हजार मराठी सैन्य व अधिकारी शुजा यांच्या छावणीत आले. त्यांना आरक्षण मिळाले व ते वाचले. पुढे त्या सर्वांना स्वखर्चाने शुजांनी संरक्षण देऊन भरतपूरला पाठवले.

आता काशीराजच्या २४ फेब्रुवारी १७६१च्या पत्रात काही त्रुटीत आहेत का, ते बघूया.

काशीराज हा अवधचे नवाब शुजा-उद्-धौला यांचा कारभारी. शेजवलकर लिहितात की, हा तेलंगणातील दक्षिणी-ब्राह्मण होता. यावरून असे लक्षात येते की, तो मराठी असून त्यास मराठी येत असल्याने पेशव्यांना पत्र लिहिण्याचे काम त्याजवर आले असणार. या २४ फेब्रुवारी १७६१च्या पत्राशिवाय भाऊसाहेबांचा मृत्यु मान्य करण्यास अजून एक चुकीचे साधन आहे. काशीराज लिहितो की, त्याच्या मालकांनी म्हणजे शुजा-उद्-धौलांनी युद्धाच्या दुसऱ्या दिवशी रणांगणावर फिरून (अंतिम संस्कारासाठी) मराठा अधिकाऱ्यांची शवे ओळखण्याचा प्रयत्न केला. त्यात शिराशिवायच्या एका धडाखाली चार मोठे मोती सापडले व ते शव कोणा मातब्बर व्यक्तीचे असणार असे गृहित धरून ते आपल्या छावणीत आणले. ते शव शुजांनी आपल्या छावणीतील पेशव्यांचे दिल्लीतील वकील बापूजी हिंगणे, भाऊंचा हुजऱ्या बाळाजी व इतर मराठा अधिकाऱ्यांना दाखवले. ते भाऊंचे शव आहे का म्हणून विचारले असता सर्वांनीच त्यास मान्यता दिली.

माझ्या मते भाऊसाहेबसुद्धा या आठ हजार मराठी सैन्यांतूनच शुजांच्या छावणीत आले असणार व त्यांच्यावर लक्ष केंद्रित होऊ नये म्हणूनच हिंगणे वगैरेंनी त्या शवास भाऊसाहेबांचे शव म्हणून मान्यता दिली असणार आणि शुजांची दिशाभूत केली असणार. कारण याच हिंगण्यांच्या भावाने – दामोदर महादेव हिंगणे – चिरंजीव राजश्री गणपतरावजीच्या वैशाख वद्य पंचमीच्या म्हणजे एप्रिल-मेच्या लग्नासाठी भाऊसाहेबांना आमंत्रित केल्याचे १७६१चे पेशवे दफ्तरात पत्र आहे. हे लग्न पानिपतानंतर तीन ते चार महिन्यांनंतरचे होते.

बापू महादेव हे पेशव्यांचे दिल्लीतील वकील व खोबरेकर लिहितात की, दामोदर महादेव हिंगणे (बापूजींचे भाऊ) दिल्ली भागात मामलतदार होते. तेव्हा पानिपत संग्रामामंतर हिंगणे बंधू निश्चितच भेटले असणार व जीवित-मृतासंबंधित त्यांची चर्चा पण नक्कीच झाली असणार. त्याशिवाय दामोदर हिंगणे भाऊसाहेबांना गणपतरावजीच्या लग्नास आमंत्रित करणे शक्य नाही. आमंत्रण जीवित भाऊसाहेबांना लिहिले असणार, मृत व्यक्तीस नव्हे. तेव्हा त्यांच्या छावणीतील मराठ्यांच्या ग्वाहीने काशीराज व शुजांची दिशाभूत झाली असणार व त्यांनी विश्वासरावांच्या बरोबर भाऊंचा मृत्यु निश्चितात्मक म्हणून सहा आठवड्यांनी का होईना पेशव्यांना कळवले, परंतु पेशव्यांनी विश्वासरावांचा मृत्यु मान्य केला होता, पण भाऊंचा नव्हे.

काशीराजने विश्वासराव व भाऊसाहेबांच्या मृत्युविषयी लिहिलेल्या पत्राबद्दल अजून एक प्रश्न उदभवतो. तो असा की, १४ जानेवारीला झालेल्या मृत्युबद्दल काशीराजने हे पत्र लिहिण्यास सहा आठवड्यांचा कालावधी का घेतला? या प्रश्नास एकच उत्तर असू शकते की, शुजांना पण भाऊंच्या मृत्युविषयी खात्री नसावी.

 

५) पानिपतासंबंधी काशीराजच्या बखरीतील तपशील कितपत विश्वसनीय आहे?

त्र्यं.शं. शेजवलकर व इकबाल हुसेन या दोघांचे मत आहे की, काशीराज विश्वसनीय साधन नाही. शेजवलकर लिहितात की, काशीराजची बखर त्याने १७८०ला म्हणजे युद्धानंतर १९ वर्षांनी लिहिली व ती पण मूळ साधनांवर आधारित नाही, पण आठवणींच्या माध्यमातून. हुसेन यांना नजीब-उद्-धौलाच्या २८ पत्रांतून दिसले की, काशीराजचा तपशील विश्वसनीय नाही.

 

६) काशीराजच्या २४ फेब्रवारी १७६१च्या पत्रास मराठी साधनांत विरोधी पुरावे आहेत का?

अनेक पुराव्यांतील एक पुरावा म्हणजे महादेव दामोदर हिंगणे यांचे भाऊंना युद्धानंतर तीन ते चार महिन्यांनी झालेल्या लग्नाला आमंत्रित करणारे पेशवे दफ्तरातील पत्र होय. त्याशिवाय पेशवे दफ्तरातील २३ फेब्रुवारी १७६१च्या जमा-खर्चाच्या तपशिलात - जो एका मराठा अधिकाऱ्याने लिहिलाय, त्यात विश्वासरावांच्या अंतिम संस्काराचा खर्च नमूद केला आहे - भाऊंचे नावसुद्धा नाही. मूळ तपशील –

१९२६० – छ १७ रजब (२३-२-१७६१) राजश्री विश्वासराव याचे उत्तरकार्यास प्रारंभ केला होता. त्यास, वि. ना. त्रिंबक देशमुख (खर्चाचा तपशील)

 

७) मूळ मराठी साहित्यात भाऊसाहेबांचा मृत्यु नमूद केला आहे का?

भाऊसाहेबांचा मृत्यु दर्शवणारे पेशवे दफ्तरात काशीराजचे फेब्रुवारी १७६१चे पत्र, ज्यात अनेक त्रुटी असतानासुद्धा हा एकच पुरावा सर्वांनी मान्य केला आहे. परंतु त्या व्यतिरिक्त इतर कोठेही पेशवे दफ्तरात किंवा भाऊसाहेबांची बखर, भाऊसाहेबांची कैफियत, खरेकृत नाना फडणीसांचे आत्मचरित्र, आप्टे-उत्तूरकर पत्रसंग्रह, य. न. केळकर पत्रसंग्रह इत्यादी मूळ साधनांत मृत्युचा उल्लेख नाही. असे असताना काशीराजच्या पत्रावर व त्याच्या बखरीवर विश्वास किती व का ठेवावा? य. न. केळकरांच्या पत्रसंग्रहात पान ६३वर पेशवीण रमाबाई व पार्वतीबाई यांनी १७६९ला गणपती पुळ्याला भेट दिल्याचे पत्र आहे नि या पत्रात पार्वतीबाईंचा उल्लेख ‘सौभाग्यदीसंप मातुश्री पार्वतीबाई’ असा आहे. या पत्रातील थोडक्यात मजकूर खालील प्रमाणे –

“…श्रीमंत सौभाग्यदिसंप मातुश्री पार्वतीबाई व रमाबाई श्री गणपती पुले येथे येणार…”

टीप – पार्वतीबाई व रमाबाई यांच्या गणपती पुळे भेटीबद्दलचे हे पत्र केळकरांना मनोरंजक वाटले, कारण त्यात पार्वतीबाईंचा उल्लेख ‘सौभाग्यदिसंप’ केला आहे. असे विचार भाऊसाहेबांचा मृत्युबद्दल पूर्वग्रहदूषित वातावरणाचे लक्षण आहे.

 

८) नानासाहेब पेशवे १८ जानेवारी ते २० मार्च १७६१पर्यंत माळव्यांत भीलसा-सिरोंज मुक्कामी होते. त्याबद्दल सरदेसाई लिहितात की, भाऊंच्या शोधार्थ त्यांनी दोन महिन्यांचा कालावधी घालवला. विश्वासरावांचा शोध पेशव्यांनी केला नाही व त्यांचा मृत्यु त्यांनी मान्य केला, मग भाऊंच्या शोधात त्यांनी दोन महिने का घालवले. भाऊंच्या मृत्यु त्यांना मान्य नव्हता का?

माझ्या मते भाऊंचा मृत्यु पेशव्यांना मान्य नसावा, परंतु शेजवलकर लिहितात की, विश्वासरावांचा मृत्यु जरी पेशव्यांना मान्य असला तरी भाऊंच्या मृत्युने त्यांच्या जीवितास धक्का बसू नये म्हणून त्यांच्या कारभाऱ्यांनी भाऊंच्या अस्तित्वाच्या सूचना पेशव्यांना दिल्या, म्हणूनच पेशव्यांनी भाऊंचा शोध चालू ठवेला. शेजवलकरांचे मत हे एक अनुमान आहे. त्यास विरोधी पुरावे या लेखांत अनेक आहेत.

 

९) पानिपतानंतर भाऊसाहेबांच्या अस्तित्वाचे ठोस पुरावे आहेत का?

भाऊंच्या अस्तित्वाचा असा लेखी पुरावा जरी नसला तरीसुद्धा त्यांच्याविरुद्ध पुणे कारभाऱ्यांनी रचलेल्या कटाची जाणीव पेशवे दफ्तरांतील एकाहून अधिक पत्रांतून दिसते. नोव्हेंबर-डिसेंबर १७६१च्या सुमारास (खरे) भाऊसाहेब खानदेशात आले असता पुण्यातील कारभाऱ्यांनी त्यांना खोटे म्हणून जाहीर केले व त्यांच्या अटकेकरता दोन मराठी अधिकारी पाठवले. त्यातील काहींनी ते खरे असल्याचे मनोगत व्यक्त केले. तर हे भाऊसाहेब खरे होते की खोटे?

पेशवे दफ्तरांतील नोव्हेंबर-डिसेंबर १७६१च्या पत्रानुसार खानदेशात आल्याचे नमूद झाले आहे. त्यास पूरक पण पुणे कारभाऱ्यांनी भाऊसाहेबांच्या विरुद्ध रचलेल्या षडयंत्राची जाणीव सरदेसाई यांच्या लिखाणातून उघडकीस येते. ती घटना सरदेसाई पुणे दरबारने रचलेले कारस्थान म्हणून नमूद करत नसले तरी सुद्धा एकाच वेळी घडणाऱ्या दोन घटना निव्वळ योगायोग नसून एक षडयंत्र होते, हे दिसून येते. या दोन घटना आहेत –

अ) पेशवे दफ्तरातील नोव्हेंबर-डिसेंबर १७६१च्या पत्रात भाऊसाहेब खानदेशात आल्याचे नमूद झाले आहे, पण ते तोतया असल्याचे पुण्याच्या कारभाऱ्यांनी जाहीर केले.

ब) सरदेसाई लिहितात की, १७६१च्या अखेरीस (म्हणजेच नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान) बुंदेलखंडातील मराठा अधिकाऱ्यांनी सुखलाल नावाच्या कानोज्या ब्राह्मणास खरे भाऊसाहेब म्हणून जाहीर केले. (हे अधिकारी होते – गणेश संभाजी, विश्वासराव लक्ष्मण इ.)

तेव्हा या दोन घटनांबद्दल अनेक प्रश्न उदभवतात –

(१) बुंदेलखंडातील मराठा अधिकाऱ्यांनी सुखलाल नावाच्या कानोज्या ब्राह्मणास खरे भाऊसाहेब म्हणून जाहीर का केले व कोणत्या अधिकाराने? ज्याचे नावच सुखलाल ती व्यक्ती भाऊसाहेब नक्कीच नव्हती, मग हा तोतया नव्हता का?

उत्तर – सुखलाल हा नक्कीच तोतया होता.

(२) बुंदेलखंडातील दुय्यम दर्जाचे अधिकारी यांना पुण्याच्या कारभाऱ्यांच्या सल्ल्याशिवाय स्वत:च्या अधिकारांत एका कानोज्या ब्राह्मणास खरे भाऊसाहेब म्हणून जाहीर करणे शक्य होते का? तसे केले असता त्या अधिकाऱ्यांची मालमत्ता व सरंजाम जप्त का केले नाहीत? त्यांना कैदेत का टाकले नाही? एक गोष्ट लक्षात घेणे योग्य होईल की, पानिपतच्या युद्धात दिरंगाई केल्याने मल्हारराव होळकरांसारख्या सरदाराचे सरंजाम सहा महिने जप्त झाले होते. तर मग गणेश संभाजी, राजा बहाद्दर, विश्वासराव लक्ष्मण इत्यादींना शिक्षा का झाली नाही? त्यांच्या संरजामावर जप्ती का आली नाही?

उत्तर – पुण्याहूनच त्यांना भाऊंचा तोतया निर्माण करण्याची सूचना असणार नि त्यांना राजकीय संरक्षण पण असणार.

(३) पेशवे दफ्तरातील नोव्हेंबर-डिसेंबर १७६१च्या पत्रांनुसार (खरे?) भाऊसाहेब खानदेशात आले असताना पुण्यातील कारभाऱ्यांनी त्यांना खोटे म्हणून जाहीर केले आणि सरदेसाई लिहितात त्याप्रमाणे १७६१च्या अखेरीस (म्हणजेच नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान) बुंदेलखंडातील मराठा अधिकाऱ्यांनी सुखलाल नावाच्या कानोज्या ब्राह्मणास खरे भाऊसाहेब म्हणून जाहीर केले, ते का?

(४) (खरे) भाऊसाहेब खानदेशात आले असताना त्यांच्या अस्तित्वावर आवरण घालून लोकांची दिशाभूल करण्यासाठी सुखलालचा तोतया पुणे दरबारने निर्माण केला होता का? सुखलाल नि त्यास भाऊसाहेब जाहीर करणाऱ्यांना राजकीय संरक्षण होते का? संरक्षण असले तर ते का दिले गेले?

(५) मुख्य प्रश्न असा उदभवतो की, जर का भाऊसाहेब खरोखर पानिपत संग्रामात मारले गेले होते, तर सुखलाल यास भाऊसाहेब म्हणून जाहीर केले तेसुद्धा भाऊनामक व्यक्ती खानदेशात आल्यावरच, ती का? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. यातच पानिपतोत्तर भाऊसाहेबांच्या अस्तित्वाचे उत्तर सापडेल.

 

१०)  पेशवे दफ्तरातील ऑगस्ट १७६४च्या पत्रानुसार जे पार्वतीबाईंनी मोरोपंत (फडणीस) यांना लिहिले आहे. मूळ पत्रातील मजकूर –

“सहाश्रायु चिरंजीव विजईभव राजमान्य राजश्री मोरोपंत यांस प्रति पार्वतीबाई का पाटस आसीर्वाद. उपरी : ल्याहावया कारणे जे खटावांकडून भाऊची पत्रे आली आहेती ती आपल्याकडे सिदोजी जखताप याजबराबर पाठविली आहेत, तर त्याचा मजकूर ध्यानास आणून तेथून कागदपत्र काढून सत्वर देणे म्हणजे त्याचा बच्याव होईल. तर सिदोजीस कागदपत्र याजपासी देऊन याजला पत्रदर्शनी वाटे लावावें. अम्हीच ल्याहावे असा अर्थ नाही. आपल्यास कालजी आम्हापेक्षा अधिक आहे. बहुत काय लिहिणे हे आसीर्वाद.”

ना.स. इनामदार ‘शिकस्त’ या कादंबरीत लिहितात की, भाऊंची पत्रे श्रीमंत (माधवराव) कर्नाटकच्या मोहिमेवर असताना त्यांच्याकडे पाठवली गेली नि सांडणीस्वार वाटेत लुटला गेला. तर, ही भाऊंची पत्रे खरी की खोटी? या पत्रांच्या लेखकाबद्दल दोन शक्यता असू शकतात – अ) भाऊंच्या चिटणीसाच्या हस्ताक्षरात, अथवा ब) भाऊंच्या स्वत:च्या हस्ताक्षरात. त्या धकाधकीच्या दिवसांत भाऊसाहेबांच्या पदरी मराठी चिटणीस असण्यास शक्यता कमीच, तेव्हा ही पत्रे भाऊंनी स्वत:च लिहिली असावीत. तसे असता, पार्वतीबाई आपल्या नवऱ्याचे हस्ताक्षर ओळखू शकतात की नाही? या पत्रांचे पुढे काय झाले? गहाळ झाली की, गहाळ केली गेली? गहाळ केली गेली तर का व कोणी गहाळ केली? त्यात माधवरावसुद्धा सामील होते का?

 

११) पेशवे दफ्तरातील १२ फेब्रुवारी १७६५च्या पत्रानुसार खोटे म्हणून जाहीर केलेल्या भाऊसाहेबांना अटक झाली. “त्यांना तेथे लोक खरे म्हणतात तेव्हा त्यांना शिक्षा अथवा मुक्ती पुण्यास गोपिकाबाई व पार्वतीबाईंनी करावी” असे पत्रकार लिहितो. अटकेबद्दल पत्रकाराचे मूळ शब्द – “याजउपरी तोतया पुरुषाचे कर्मानुसार अळंकार देउन माफजतीने तिकडे रवानगी होईल. तेथील तेथे सिक्षा करावी तर कितेकांनी भाऊ म्हटले होते, याचकरिता श्रीमत मातुश्री गोपिकाबाई व पार्वतीबाई पाहातील. त्यानंतर त्याज योग्य सिक्षा अथवा मुक्तता करतील.”

(१२ फेब्रुवारी १७६५च्या अटकेच्या पत्रानंतर) भाऊ म्हणून खानदेशात बंड करणाऱ्यास मल्हाररावांनी अटक केली, असे सरदेसाई नमूद करतात व ते पुढे लिहितात की, १२ ऑगस्ट १७६५ला मल्हाररावांनी सुलतानपूरला त्याची शहानिशा करून त्यास खोटा ठरवला.

तेव्हा या दोघांतील एक नक्कीच खरी व दुसरी खोटी व्यक्ती असणार. तर मग यातील खरे भाऊ कोण व खोटा कोण?

 

१२) पेशवे दफ्तरातील अनेक पत्रांतून भाऊसाहेबांच्या बरोबर शस्त्रधारी गोसाव्यांचे पथक असल्याचे लिहिले आहे. १२ फेब्रुवारी १७६५च्या पत्रांत तीन ते चार हजार गोसाव्यांचा उल्लेख आहे. तो असा – “गोसावी तीन च्यार सहश्र समागमे वरकड कितेक ब्राह्मण समागमे भाऊ म्हणतात, याजला येकीकडे काढावे याच मजकुराची आम्ही मसलत देऊन गोसावी यास साडे पंचवीस हजार रुपये द्यावे, यैसे करार सर्वानुमते करून त्याची निशा पत्री पाहून गोसावी फोडले, आणि भाऊ नामे पुरुष कैद केला.”

या गोसाव्यांबद्दल अनेक प्रश्न उदभवतात – (१) हे हिंदस्थानचे गोसावी खऱ्या की खोट्या भाऊसाहेबांच्या बरोबर खानदेशात आले होते? (२) भाऊ खोटे असते तर हे गोसावी खोट्या व्यक्तीबरोबर महाराष्ट्रात आले असते का? (३) खोट्यांबरोबर महाराष्ट्रात यायला हे गोसावी परमुलखात आत्मघात करायला आले होते? हाच प्रश्न दुसऱ्या प्रकारे मांडता येईल. भाऊसाहेब खरे असल्याची शाश्वती असल्याशिवाय हे गोसावी परमुलखात – मराठ्यांच्या जबड्यांत – शिरले असते का?

माझ्या मते हे तीन-चार सशस्त्र गोसावी भरतपूरहून भाऊंसोबत निघाले असणार. तेथून निघतेसमयी भाऊ खरे की खोटे हा विषय त्यांना किंवा इतरांना शिवला पण नसणार. शुजांनी आठ हजार मराठ्यांना स्वखर्चाने भरतपूरला पाठवले व त्यातच भाऊसाहेब असल्याचे अनुमान वर मांडले आहे. भरतपूरला आल्यावर भाऊसाहेबांचे अस्तित्व जाहीर अथवा उघड केले असणार नि गोसाव्यांना सांगितले असणार की, त्यांनी पुण्यापर्यंत भाऊंची सोबत करणे आहे. तेथे सुरक्षित नेल्यास त्यांना बक्षिस मिळेल. नंतर त्यांनी परत यायचे. परंतु परिस्थिती विपरीत झाली आणि भाऊंना खानदेशातून पुढे पुण्यास येऊ दिले नाही.

(४) या तीन-चार हजार गोसाव्यांना महाराष्ट्रात म्हणजेच स्वमुलखात साडेपंचवीस हजार रुपये न देता अटक करणे मराठ्यांना अशक्य होते का (५) या तीन-चार हजार गोसाव्यांचे पारिपत्य करणे ही गोष्ट मराठ्यांना स्वमुलखात अथवा परमुलखातही अशक्य नव्हती. तर मग नोव्हेंबर-डिसेंबर १७६१लाच गोसाव्यांसकट भाऊंना अटक का झाली नाही? (६) पेशवे दफ्तरातील १२ फेब्रुवारी १७६५च्या पत्रानुसार तीन-चार हजार गोसाव्यांना खोटे म्हणून जाहीर केलेल्या (खऱ्या) भाऊसाहेबांपासून दूर केल्यावर भाऊंची अटक झाली. त्यांच्या अटकेसाठी या गोसाव्यांचे पारिपत्य न करता पुणे दरबारने त्यांना साडेपंचवीस हजार रुपयाची लाच (देणगी?) देऊन भाऊसाहेबांपासून दूर का केले? (७) खानदेशात आलेली भाऊनामक व्यक्ती जर का खोटी होती, तर त्यास नोव्हेंबर-डिसेंबर १७६१पासून ते १२ फेब्रुवारी १७६५मधील अटकेपर्यंत म्हणजे सलग तीन वर्ष तीन महिने या कालावधीत कैद का केले नाही? अटकेस इतका वेळ का लावला?

 

१३) पेशवे दफ्तरातील १२ फेब्रुवारी १७६५च्या पत्रानुसार अटक झालेल्या भाऊसाहेबांना व त्यानंतर मल्हाररावांनी १२ ऑगस्ट १७६५ ला खोटे ठरवलेल्या व्यक्तीस पण पुण्यास पाठवले होते, हे गृहीत धरून आता पेशवे दफ्तरातील ऑक्टोबर १७६५च्या पत्रातील खालील घटनासंबंधी उत्तरे शोधणे आवश्यक आहे.

“रा भाऊसाहेब खरे आहेत म्हणून अनुबाई घोरपडी भाऊसाहेबांची आत (आत्या) म्हणत होती. त्यावरून तोतियासी किल्ल्यावरून तेथे आणून अनुबाईचे घरीच ठेविला. त्याजला सांगीतले की, तुम्ही वलखा. त्यावरून पंधरा दिवस त्याचे घरात ठेवून त्यांनी चौकशी बहुत केली. क्रित्रीम (खोटा) प्रकार त्याचे ध्यानास आला.”

येथील मुख्य मुद्दा असा आहे की, ज्या अनुबाई भाऊसाहेब खरे आहेत म्हणत होत्या, त्यांनी भाऊंना ओळखायला पंधरा दिवस लावले, हे मान्य होण्यासारखे नाही. कारण भाऊसाहेबांच्या आई ते एक महिन्याचे पण नव्हते तेव्हा निवर्तल्या. त्यांना पेशवे घराण्यातील स्त्रियांनी वाढवले. त्यात त्यांच्या आत्या अनुबाई घोरपडे पण होत्या. १७५९ला गारपीरावर गारद्यांनी केलेल्या हल्ल्यातील जखमा अनुबाई, त्रिंबकराव पेठे (भाऊंचे सख्खे मामा व अनुबाईंचे जावई) व इतर अनेकांना माहीत होत्या. असे असताना दहा मिनिटांतच भाऊसाहेबांची शहानिशा करणे त्यांना सहज शक्य होते, पंधरा दिवसांची गरजच नव्हती. (१) तर मग अनुबाईंनी त्यांच्याकडे पाठवलेल्या भाऊंना खोटे ठरवण्यास पंधरा दिवस का लावले? (२) तीनहून अधिक वर्षे खानदेशात अडकवून ठेवल्यामुळे भाऊंना पुण्याचे डावपेच असह्य झाले होते का? की भाऊंच्या जिविताला धोका होता? (३) प्रमोद ओक लिहितात की, भाऊंची बाजू घेतल्यामुळे अनुबाईंवर माधवरावांची इतराजी झाली, याचे कारण काय असावे? माधवरावांना पण भाऊ नको होते का? (४) की पुण्यातील त्यांच्या विरोधकांना (गोपिकाबाई, राघोबा, बापू, नाना वगैरेंना) ते पुण्यात नको होते का? माधवराव पण त्यात सामील होते का? नंतर लोकांकडून शहानिशा करवून घेण्यास कैद्याला बुधवार पेठेच्या हवदापासी उभा केला. तो कैदी कोण होता. १२ फेब्रुवारी १७६५च्या पत्रातील की नंतर मल्हाररावांनी १२ ऑगस्ट १७६५ला खोटा ठरवलेला?

उत्तर – नक्कीच बुधवार पेठेत उभा केलेला सुखलाल होता, म्हणूनच लोकांनी त्यास खोटा ठरवला.

याच ऑक्टोबर १७६५च्या पत्रात कैद्यांबद्दल उल्लेख आहे की, “श्रीमताचे (श्रीमंताचे) चितात एक अंग हक करून सोडून द्यावा.” म्हणजेच श्रीमंतांचे (माधवरांवांच्या) चित्तात आले की, एक अंग हक करून (एक अवयव तोडून) कैद्यास सोडून द्यावा. परंतु तसे केले नाही. ते का? या कैद्यास राजकीय संरक्षण होते का?

 

१४) पेशवे दफ्तरातील १२ मे १६६५च्या राघोबादादांना लिहिलेल्या पत्रांत रघुनाथ हरी नेवाळकर लिहितात की, तोतयास (की खऱ्या भाऊसाहेबांना) अटक केल्यावर त्यांच्या वडिलांनी ‘अनशनव्रत संपादून’ तापी काठी आपले आत्मसर्पण केले (‘समाधिस्त जाहले’)

आत्मसर्पण का केले? ही माणसे खूप कर्मठ व निष्ठावंत होती. तेव्हा खऱ्या भाऊसाहेबांना अटक केल्याचे प्रायश्चित्त म्हणून त्यांनी आपला देह सोडला असेल का?

 

१५) ऑक्टोबर १७६५च्या पत्रांत तसा उल्लेख नाही, पण या कैद्याबद्दल सरदेसाई लिहितात की, १५ ऑक्टोबर १७६५ला त्यास पर्वतीवर रामशास्त्रींच्या पंचायतीपुढे उभा केला व तो खोटा ठरला आणि त्यास आजन्म कैदेची शिक्षा दिली.

ज्याने पेशव्यांच्या इभ्रतीला हात लावला त्यास देहान्ताऐवजी आजन्म कैद ही क्षुल्लक शिक्षा का? पुन्हा वरील प्रश्न – या कैद्यास राजकीय संरक्षण होते का? ब्रह्महत्येचे पातक लागू नये हेच जर कारण असेल तर याच रामशास्त्रींनी नारायणरावांच्या मृत्युनंतर राघोबादादांना मृत्युदंडाची शिक्षा का सूचित केली. दादा ब्राह्मण नव्हते का? नोव्हेंबर-डिसेंबर १७६१ ते १२ फेब्रुवारी १७६५च्या दरम्यान (भाऊसाहेब खानदेशात असताना) ज्या ब्राह्मणांनी ते खरे असल्याची वाच्यता केली त्यांस चंद्रग्रासाची शिक्षा व इतर शिक्षा दिल्या. त्यातील काही ब्राह्मण मृत्युमुखी पडले. ते ब्राह्मणच होते, तर त्यांचा मृत्यु ब्रह्महत्येचे पातक नव्हते का?

पुढे डिसेंबर १७७६ला ‘तोतयाच्या बंडा’तील सुखनिधान अथवा सुखलाल नामक कानोज्या ब्राह्मण-कैद्यास ब्राह्मण असूनसुद्धा मेखसूने मेंदू फोडण्याची शिक्षा दिली. ती का? ते ब्रह्महत्येचे पातक नव्हते का? (मेखसूने मेंदू फोडण्याची शिक्षा दिली याचा संदर्भ सापडतो, परंतु ती शिक्षा अमलात आणल्याचा संदर्भ सापडत नाही. सुखलाल यास राजकीय संरक्षण असल्यास ही शिक्षा न करता त्याची व खऱ्या भाऊसाहेबांची मुक्तता केली असणार. त्यानंतर सुखलाल हा मायदेशी परतला असेल व भाऊसाहेबांना महाराष्ट्राबाहेर अज्ञातवासात पाठवले असणार.)

 

१६) ‘तोतया’ या शब्दाचे मूळ व अर्थ काय आहे? हा शब्द मूळचा मराठी नाही. हा हिंदी भाषिक शब्द ‘तोता’ म्हणजे ‘पोपट’ या वरून आला आहे.

तोता – पोपट

तोतया – तोते समान अथवा पोपटासम अनुकरण करणारा

तेव्हा तोतया हा शब्द बुंदेलखंडातून सुखलाल यास भाऊ म्हणून जाहीर केल्यानंतर बुंदेलखंडातूनच अस्तित्वात अथवा वाक्प्रचारात आला असणार नि महाराष्ट्रात पसरला. हा शब्द त्या पूर्वी महाराष्ट्रात सापडत नाही. नारायणरावांच्या मृत्युनंतर (१७७४-७५च्या सुमारास) त्यांच्या पत्नी यशोदाबाईंच्या तोतयाबद्दल संदर्भ उपलब्ध आहे, पण पानिपताआधी हा शब्द महाराष्ट्रात दिसत नाही.

 

१७) ‘तोतयाचे बंड’ हे प्रकरण काय आहे?

न.चिं. केळकरांनी ‘तोतयाचे बंड’ हे नाटक १९११-१२च्या सुमारास लिहिले. तोतयाच्या बंडातील कैद्यासंबंधी अधिकृत माहिती खोबरेकारांच्या लेखनात आढळते. खोबरेकार लिहितात – “जून १७७५ला कैदी दौलताबादच्या किल्ल्यावर होता. तो किल्ला निजामास द्यायचे ठरल्यावर पुण्याच्या कारभाऱ्यांनी कैद्यास मिरजेस आपल्या विश्वासातल्या अधिकाऱ्यांकडे पाठवले. त्याबद्दल (काही) पटवर्धन मंडळींना संभ्रम पडला की, हे खरे भाऊसाहेब आहेत, तेव्हा त्यांनी पुण्यास ससेमीरा लावला की कैद्यास येथून हलवा. ऑक्टोबर १७७५ला कैद्यास रत्नागीरीस रामचंद्रपंत नाईक-परांजप्याकडे पाठविले. नाईकांनी पण ते खरे असल्याचे जाहीर केले व फेब्रुवारी १७७६ला त्यांची सुटका केली.”

त्यानंतर पाच ते सात मराठा सरदार भाऊंना येऊन मिळाले नि २० हजार फौज जमा झाली. एप्रिल १७७६ला या फौजेनिशी भाऊसाहेब सिंहगडाजवळ आले. शिंदे-होळकर-पाणसे यांना भाऊसाहेबांच्या पारिपत्यासाठी पाठवले गेले. भाऊसाहेब पुन्हा कोकणात माघारी फिरले नि समुद्रमार्गे इंग्रजांकडे मदतीस जात असता ऑक्टोबर १७७६ला कान्होजी आंग्रे यांच्याकरवी त्यांची अटक झाली. हा एप्रिल ते ऑक्टोबर १७७६चा काळ म्हणजेच ‘तोतयाचे बंड’ होय.

 

१८) तर या बंडातील भाऊसाहेब खरे की खोटे?

जून १७७५ पूर्वी ते फेब्रुवारी १७७६च्या काळात मिरजेचे अथवा रत्नागिरीचे भाऊसाहेब खरे की खोटे ठरवताना खालील प्रश्नांचा आढावा घेणे गरजेचे आहे – पटवर्धन ही मंडळी गोपाळराव पटवर्धनांपासून (१७३५पासून) थोरल्या बाजीरावांच्या बरोबर असताना भाऊसाहेबांबद्दल त्यांना संभ्रम असणे शक्य आहे का? जर का पटवर्धन पुण्याच्या कारभाऱ्यांच्या विश्वासातली मंडळी होती, तर त्यांना संभ्रमाचे कारण काय? नाईक-परांजपे हे एकेकाळी सावकार होते व भाऊसाहेब हे पेशव्यांचे दिवाण होते. असे असताना नाईकांची व भाऊसाहेबांची व्यक्तिगत ओळख असणार. त्याशिवाय नाईक कैद्यास खरे भाऊसाहेब म्हणून जाहीर करू शकले असते का?

मुळात जाऊन शोध घेतल्यास या सर्व प्रश्नांची उत्तरेच पानिपतनंतरचे भाऊसाहेबांचे अस्तित्व सिद्ध करतील.

 

समालोचन

पराभवाची कारणे

पानिपतच्या पराभवासाठी भाऊंना एकट्यांना जबाबदार धरणे योग्य नव्हे. आपल्या बचावाचा अथवा संरक्षणाचा विचार न करता ऑक्टोबर १७६०मध्ये दिल्लीहून कुंजपुऱ्यास जाणे ही मराठ्याची मोठी चूक असू शकते. परंतु असे निर्णय एकट्याचे नसतात. कर्म आणि कर्म-फल यांच्यामध्ये कारक असतात. तेव्हा अनेक कारकांचा विचार करूनच असे निर्णय घेतले जातात व तेसुद्धा चुकीचे ठरू शकतात. परमुलखात कुंजपुऱ्यास जाण्याचा निर्णय एकट्या भाऊंचा मुळीच नसणार. स्थानिक लोकांच्या सल्ल्याशिवाय हा निर्णय होणे शक्य वाटत नाही. यमुनेला पूर आला असताना दिल्लीहून उत्तरेस कुंजपुऱ्यास जाणे योग्य वाटले असणार. त्यानंतर अब्दालीने मराठ्यांची दिल्लीला परतण्याची वाट अडवली, तेव्हा तिथे संरक्षणासाठी ठेवलेले नारो शंकर, गोविंदपंत बुंदेले यांसारखे सेनाधिकारी मदतीस का सरसावले नाहीत?

पानिपतच्या रणसंग्रामात भाऊसाहेबांना दोषी ठरवून त्यांची अवहेलना करणारे अनेक असतील. त्यांच्याकडे निरपेक्ष दृष्टीने पाहणारे आज तरी दिसत नाहीत. अब्दालीच्या पेचांत अडकलेले मराठी सैन्य एका असामान्य वादळात अडकलेले जहाज होते. निसर्ग व लोक त्यांना प्रतिकूल झाले. पानिपत येथील धर्मांध मुसलमान समाज अब्दालीस मराठ्यांच्या छावणीतील सर्व वृत्तांत कळवत होते, हे खरे, परंतु आपली स्वत:ची माणसेच वैरी ठरली तर परक्यांबद्दल काय बोलावे? पुण्याहून ऑक्टोबर १७६०मध्ये उत्तरेस निघालेले खुद्द पेशवे नाशकाला जवळ जवळ महिनाभर स्वत:च्या लग्नात गुंतले. दादा व बापू भाऊंच्या अपयशाकडे डोळे लावून होते. मदत पाठवण्याऐवजी उत्तरेत वसुली करून त्यांनी मोहीम जारी ठेवावी हा सल्ला त्यांनी पेशव्यांना दिला. गोविंदपंत बुंदेल्यांनी पेशव्यांना कळवले की, भाऊ पैसे मागतायत व भाऊंना सांगितले की पेशव्यांनी मागणी केली आहे, तेव्हा त्यांनी भाऊंना आर्थिक साहाय्य नाकारले. आम्हीच आमचे शत्रू झालो नि आमच्याच लोकांची वाताहात केली. तेव्हा पानिपतचे अपयश एकट्या भाऊंचे नव्हते, तर पुण्याचे होते, महाराष्ट्राचे होते. त्यात महाराष्ट्राची सव्वालाख बांगडी पिचली.

भाऊसाहेबांचा मृत्यु – एक विरोधाभास

शुजा-उद्-धौला यांचा कारभारी काशीराजने २४ फेब्रुवारी १७६१च्या पत्रांत भाऊसाहेब आणि विश्वासरावांचे अंतिम संस्कार झाल्याचे पेशव्यांना लिहिले नि आम्ही मान्य केले. सरदेसाई लिहितात की, (पानिपतनंतर) पेशव्यांनी भाऊंच्या शोधार्थ दोन महिने वेळ घालवला. तेव्हा पेशव्यांनी विश्वासरावांचा मृत्यु मान्य केला, परंतु भाऊंचा नाही. शेजवलकर भाऊंचा मृत्यु मान्य करत असले तरी ते असे पण जाहीर करतात की, मराठ्यांपैकी भाऊंचा मृत्यु कोणीही पाहिलेला नाही. समकालीन अशा कोणत्याही मराठी साधनांत (पेशवे दफ्तर, भाऊसाहेबांची बखर, भाऊसाहेबांची कैफियत, खरेकृत नाना फडणीसांचे आत्मचरित्र इत्यादी) भाऊंचा मृत्यु नमूद केलेला नाही. ‘क्षात्रधर्माची शर्थ केली’, ‘गयफ (गायब) झाले’, ‘दिसेनासे झाले’ असेच उल्लेख आहेत. ऊमरावगीर गोसाव्याने विश्वासराव, तुकोजी शिंदे, यशवंतराव पवार व संताजी वाघ यांची शवे मिळवली नि अंतिम संस्कार केले. त्यात भाऊसाहेबांचे नाव नाही. पेशवे दफ्तरातील २३ फेब्रुवारी १७६१च्या जमा-खर्चाच्या तपशिलात विश्वासरावांच्या अंतिम संस्काराचा खर्च नमूद केला आहे, त्यात भाऊंचे नाव नाही. असे असतानाही सर्वांनी भाऊंचा मृत्यु मान्य केला, हीच मराठी इतिहासाची झालेली फसवणूक आहे.

मृत्युस मान्यता कशी मिळाली?

मुळात नोव्हेंबर-डिसेंबर १७६१मध्ये खानदेशात आलेल्या भाऊंना गोपिकाबाई व त्यांच्या कारभाऱ्यांनी खोटे म्हणून जाहीर केले आणि बुंदेलखंडातून तोतया निर्माण केला व भाऊसाहेबांच्या अस्तित्वावर आवरण घातले. त्यानंतर भाऊंचा मृत्यु हा एकाने प्रस्तुत केला नि सर्वांनी मान्य केला, असेच दिसून येते. न.चिं. केळकरांनी १९११-१२च्या सुमारास त्या काळी त्यांना उपलब्ध असलेल्या साधनांच्या आधारे ‘तोतयाचे बंड’ या नाटकाची निर्मिती केली. केळकरांना सर्व साधने उपलब्ध असती तर त्यांनी निराळेच मत मांडले असते, परंतु त्या काळी पेशवे दफ्तर सर्वत्र विखुरलेले होते. तेव्हा त्यांना दोष देणे योग्य नव्हे. नंतर १९३०च्या दशकात सरदेसाईंच्या संपादकत्वाखाली ‘पेशवे दफ्तरातील निवडक पत्रे’चे ४५ खंड प्रसिद्ध प्रकाशित झाले. त्या काळात पेशवे दफ्तर मोठ्या प्रमाणात एकत्रित झाले असतानाही सरदेसाईंनी निष्काळजीपणाने केळकरांचीच री ओढली. सर्वच मूळ मराठी पत्रांत तसे नमूद झालेले नाही व कित्येक मराठा अधिकाऱ्यांनी भाऊंना खानदेशात पाहिल्यावर ‘खरे’ म्हणून उल्लेख केलेला आहे. असे असतानाही पेशवे दफ्तरातील पत्रांतील भाऊसाहेबांना सरदेसाईंनी तोतया म्हणूनच जाहीर केले. अभ्यासकाच्या भूमिकेतून त्यांनी तशी मांडणी केली असती तर मान्य होते, पण संपादकास तो अधिकार नसतो. त्याने जसेच्या तसे मांडायचे असते. पुढे द. वा. पोतदारांनी पण तीच री ओढली. १९४०च्या दशकात पांडुरंग गोपाळ रानड्यांची भाऊसाहेबांबद्दलची मते दडपशाहीने हाणून पाडली.

पानिपतनंतरच्या भाऊसाहेबांचा शोध घेणे हे एका व्यक्तीचे काम नाही, त्यासाठी अनेक संशोधकांनी एकत्र येऊन संशोधन करण्याची आवश्यकता आहे, तरच भाऊसाहेबांना न्याय मिळेल.

एक शोकांतिका

‘खऱ्यास खोटे व खोट्यास खरे’ जाहीर करून दोहोंना कैदेत ठेवले. नंतर तोतयाचे बंड झाले. हीच पानिपतनंतरच्या भाऊसाहेबांची दु:खद कथा होय! या सर्व घटनांकडे दुर्लक्ष करून इतिहासकारांनी त्यांच्या जीवघेण्या दु:खाची जाणीव न ठेवता, शेवटपर्यंत सौभाग्याची लेणी न सोडल्याबद्दल पार्वतीबाईंना भ्रमिष्ट जाहीर केले, ही दुर्दैवाची गोष्ट आहे.

आजसुद्धा भाऊसाहेबांचे पानिपतनंतरचे अस्तित्व नाकारणारे लेख लोकांपुढे मांडले जातात. अलीकडे म्हणजे एप्रिल-मे २०१९मध्ये ‘रविवार सकाळ’मध्ये एक लेख आला होता. त्यात पार्वतीबाईंनी तोतयास चिकाच्या पडद्यामागून पानिपतला जाण्याआधीच्या त्यांच्या व भाऊंच्या रात्रभर झालेल्या संभाषणाबद्दल प्रश्न विचारला की, आपले संभाषण उशिरापर्यंत चालू असताना अत्तरात (अत्तराच्या तेलांत) प्रज्वलित असणारा दिवा विझला नि त्यानंतर काय झाले? भाऊ म्हणवणाऱ्याने उत्तर दिले की, ‘आपण झोपलो’. त्यावरून पार्वतीबाईंनी त्यास खोटे जाहीर केले. कारण त्यांनी स्वत:कडील अत्तराच्या कुपीतील अत्तर ओतून दीप प्रज्वलित केला नि संभाषण चालू राहिले.

यावरून ‘रविवार सकाळ’मधील त्या लेखकाने भाऊंचा मृत्यु निश्चित केला. या संभाषणातून भाऊंचा मृत्यु सिद्ध होत नाही, कारण हे संभाषण तोतयाबरोबरचेच – म्हणजे सुखलालबरोबरचे होते. तोतयाचे प्रकरण डिसेंबर १७७६लाच संपले होते. त्यानंतर भाऊसाहेब अज्ञातवासात गेले. हे वरील दिव्याचे संभाषणच जर का भाऊसाहेबांच्या मृत्युचा पुरावा होता, तर मग पार्वतीबाईंनी सौभाग्याची लेणी स्वत:च्या मृत्युपर्यंत म्हणजे १७८३पर्यंत का ठेवली? असले लेखक आजसुद्धा लोकांची दिशाभूत करत आहेत. अज्ञान प्रज्वलित करणारे असे लेखच भाऊसाहेब व पार्वतीबाईंच्या आयुष्याची क्रूर शोकांतिका दर्शवतात. ही आमच्या सात्त्विक स्त्री आणि वीर पुरुषांची एक प्रकारे थट्टाच होय.

..................................................................................................................................................................

लेखक सर्जेराव देशमुख मूळचे बडोद्याचे असून गेली ५०हून अधिक वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्यास आहेत. Electrical and Instrumentation and Controls Engineer म्हणून त्यांनी ३० वर्षं अमेरिकेत नोकरी केल्यानंतर नुकतेच ते निवृत्त झाले आहेत. प्राचीन व मध्ययुगीन भारतीय इतिहासावर आजवर त्यांची तीन इंग्रजी पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

sirjrao@aol.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Gamma Pailvan

Fri , 15 January 2021

सर्जेराव देशमुख,

अतिशय माहितीपूर्ण लेख आहे. त्याबद्दल आभार.

मला वाटतं की, जर भाऊ पुण्यात आले असते तर पराभवाचं शल्य उराशी घेऊन जगावं लागलं असतं. परिणामी पेशवाईचा दरारा कमी झाला असता. त्यामुळे नानासाहेब पेशव्यांनी भाऊंना पुण्यास येऊ नये असं म्हंटलं असावं. मात्र पानिपतानंतर सहाएक महिन्यांत नानासाहेब वारल्यावर ( जून १७६१ ) भाऊंच्या महत्वाकांक्षेने म्हणा किंवा कर्तव्यभावनेने म्हणा उचल खाल्लेली दिसतेय.

माधवराव नवे पेशवे होते. त्यांनी गुंतागुंत वाढू नये म्हणून भाऊंना पुण्यापासून दूर ठेवलं गेलेलं असावं. राघोबादादांना नानासाहेब सापत्न वृत्तीने वागवीत. भाऊंना दिलेली वागणूक पाहून राघोबादादा अस्वस्थ झाले असावेत. त्यांनी कदाचित नंतर वातावरण जरा स्थिर झाल्यावर १७६५ साली भाऊंना प्रकट व्हायचा आग्रह केलेला असू शकतो. राघोबादादांचे या काळातले व्यवहार व हालचाली तपासून पाहिल्या पाहिजेत.

बाकी, तुमच्या लेखावरनं प्रबोधनकार ठाकरे यांच्या एका पुस्तकातल्या एका रोचक उल्लेखाची आठवण झाली. उल्लेख येथे आहे : http://www.prabodhankar.org/node/245/page/0/40 यानुसार सखाराम हरींनी भाऊंच्या सोबत पानिपतावर जाने नाकारले. तेव्हा भाऊंनी त्यांना पाहून घ्यायची धमकी दिली. त्यावर सखाराम हरी म्हणाले की "हिंदुस्थानांतून श्रीमंतांनीं आधीं सुखरूप परत यावें; मग आमची डोचकीं आणि आपलें मेखसूं आहेच." यावरून भाऊंच्या पानिपतच्या मोहिमेस पुण्यातनंच विरोध असावासं दिसतंय.

असो.

पानिपता व उत्तरकालीन घडामोडींवर अधिक संशोधन व्हायला हवं हे मात्र नक्की.

आपला नम्र,
-गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......