‘स्कॅम १९९२’ : डोकं भंजाळून टाकणाऱ्या घोटाळ्याची रंजक कथा
कला-संस्कृती - चलत्-चित्र
संदेश कुडतरकर
  • ‘स्कॅम १९९२ - द हर्षद मेहता स्टोरी’ या वेबसिरीजचे एक पोस्टर
  • Thu , 14 January 2021
  • कला-संस्कृती चलत्-चित्र स्कॅम १९९२ - द हर्षद मेहता स्टोरी Scam 1992 : The Harshad Mehta Story हर्षद मेहता Harshad Mehta सुचेता दलाल Sucheta Dalal

नुकतीच ‘स्कॅम १९९२’ ही सोनी लिव्हवरची वेबसीरिज पाहिली. अनेकांनी तोंड फाटेस्तोवर स्तुती केली होती, त्याप्रमाणे सीरिज खरोखरच चांगली आहे. त्यामुळे वेळ सत्कारणी लागल्यासारखं वाटलं. ‘सेक्रेड गेम्स’, ‘मेड इन हेवन’सारख्या डोकं भंजाळून टाकणाऱ्या मालिकांच्या प्रेक्षकवर्गात मी मोडतो. ज्या सीरिज संपत आल्या की, निरोपाची हुरहूर अस्वस्थ करू लागते. एखाद्या व्यक्तीच्या हातचा तिला उत्तम बनवता येत असणारा पदार्थ खाल्ला की, त्या पदार्थाची चव, त्या व्यक्तीने त्यात ओतलेल्या प्रेमाच्या आठवणींसकट जिभेवर रेंगाळत राहावी, त्याप्रमाणे ज्या सीरिज मनावर आपला अमीट ठसा उमटवून जातात, अशा उत्तम निर्मितीमूल्यं असलेल्या मोजक्या सीरिजपैकी ही एक आहे.

प्रत्येक प्रेक्षकासाठी एखादी मालिका किंवा चित्रपट आवडण्याचे निकष वेगवेगळे असले, तरी प्रेक्षकाला पडद्यावर जे दिसतं, त्यात गुंतवून ठेवणं आलंच. माझ्यासाठी हे एखादा कठीण विषय रंजक भाषेत समजावण्यासारखं असतं. उत्तम दिग्दर्शक केवळ आपल्या कथाविषयाची जाण असणाऱ्या प्रेक्षकवर्गाला लक्ष्य करत नाही, तर त्यात काडीचाही रस नसणाऱ्या माणसालाही प्रेमाने आंजारून-गोंजारून तो विषय सोपा करून सांगतो आणि त्याला आपलंसं करून घेतो. अलीकडच्या काळातल्या काही उत्तम दिग्दर्शकांपैकी हंसल मेहतांकडे ही हातोटी असल्याचं त्यांनी वारंवार दाखवून दिलं आहे.

..................................................................................................................................................................

हेही पाहा : ‘हर्षद मेहता स्कॅम १९९२’ : या वेबसिरीजमध्ये हर्षद स्वत:ला ‘मार्केटचा अमिताभ बच्चन’ म्हणवतो! तो होताच!! त्याचा प्रभाव जबरदस्त होता...

..................................................................................................................................................................

हर्षद मेहता घोटाळा प्रकरण ऐकून तर जवळपास सर्वांनाच माहीत आहे. मात्र काही हजार कोटींचा घोटाळा असं म्हटलं जातं, तेव्हा आपल्या डोक्यात आधी ती संख्या मांडणं सुरू होतं. तिथेच आमच्यासारखे लोक रणांगण सोडून पळायला लागतात. तेव्हा हा घोटाळा करणाऱ्या माणसाच्या आयुष्याचा पट मांडणं म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखंच. मात्र हंसल मेहता हे नाव चित्रपटसृष्टीसाठी ‘बिग बुल’सारखंच आहे. आधीच्या सर्वच चित्रपटांतून, मग विषय कोणताही असो, हंसल मेहतांनी तक्रार करण्यासाठी किंचितही वाव दिलेला नाही. या प्रचंड मोठा आवाका असणाऱ्या सीरिजमध्येही त्यांनी कमाल केली आहे.

देबाशिष बसू आणि सुचेता दलाल लिखित ‘द स्कॅम’ या पुस्तकावर आधारित या सीरिजमध्ये व्यवस्थेतली ‘भगदाडं’ शोधून १९९२ साली देशातला सर्वांत मोठा घोटाळा करणाऱ्या हर्षद मेहताची कथा आहे. शेअर बाजाराशी संबंधित सगळ्या संज्ञा नीट उलगडून सांगत, योग्य तितका वेळ घेत ही मालिका शेवटपर्यंत खिळवून ठेवते. छोट्या गुंतवणुकींतून मिळणाऱ्या नफ्यावर समाधान न मानता पुढे ‘मनी मार्केट’मध्ये खेळत त्याने खोऱ्याने पैसा कमावला. अनेकांना नफाही मिळवून दिला. मात्र पुढे खात्यातले पैसे वरचेवर वळवून बँक रिसीट देण्याच्या बोलीवर कोटींच्या घरातल्या रकमांची अफरातफर केली.

ही बातमी ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या सुचेता दलाल यांना एका व्यक्तीकडून मिळाली आणि त्यांनी त्या तिचा पाठपुरावा करत यात ज्यांचे ज्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत, त्या सगळ्यांची नावं शोधून काढण्याचं ठरवलं. हर्षद मेहताने घोटाळा केल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर सेन्सेक्सचा भाव कोसळायला सुरुवात झाली आणि हर्षदवर विश्वास ठेवून ज्यांनी ज्यांनी गुंतवणूक केली होती, त्यांचे प्रचंड नुकसान झाले. असंख्य आरोपांतून स्वत:ची सोडवणूक करून घेता घेता हर्षदच्या आयुष्याची अखेर शेवटी तुरुंगात झाली.

..................................................................................................................................................................

हेही पाहा : ‘स्कॅम १९९२ - द हर्षद मेहता स्टोरी’ : ही वेबसिरीज पहाच, पण आपली सद्सदविवेकबुद्धी जागृत ठेवत....

..................................................................................................................................................................

ही सगळी माहिती तसं पाहता इंटरनेटवर सहज उपलब्ध होण्यासारखी आहे. मात्र तिचं नाटकीय रूपांतर ज्या रंजक पद्धतीने हंसल मेहता यांनी पेश केलं आहे, ते कौतुकास्पद आहे. ऐंशीच्या दशकातली मुंबई, बँकांची कार्यालयं, इतर शासकीय कार्यालयं, त्या काळातील गाड्या, लोकांचे विशिष्ट पेहराव, वृत्तपत्राच्या कार्यालयीन कामकाजाची पद्धत, बँकांचं कामकाज, कारागृहं या सगळ्यातले बारकावे पाहण्यासारखे आहेत. विशेषत: वाढत्या पैशागणिक हर्षदच्या राहणीमानात होणारा बदल स्पष्ट दिसतो. त्याच्या प्रगतीसोबत सेन्सेक्सने गाठलेले उच्चांक, अधोगतीसोबत सेन्सेक्सच्या निर्देशांकाची झालेली अभूतपूर्व घसरण हा आलेख समांतर असल्यामुळे आणि प्रत्येक घटनेसोबत दिसणाऱ्या स्थलकालांच्या संदर्भांमुळे प्रेक्षकांचा कुठेही गोंधळ होत नाही. ‘रिस्क है तो इश्क है’ हे वारंवार येणारं वाक्य काही वेळेस वैताग आणतं खरं, पण त्यामुळे मालिकेचं रंजनमूल्य मात्र कमी होत नाही.

सेन्सेक्सच्या निर्देशांकाच्या आलेखासारखे हर्षदच्या आयुष्यातले प्रगती-अधोगतीचे विशिष्ट बिंदूही इथं प्लॉट करता येतात. मधुर भांडारकरच्या ‘फॅशन’ चित्रपटात ज्याप्रमाणे मेघना माथुरच्या आयुष्याची घसरण होण्याचा क्षण तिने पहिली सिगारेट शिलगावताच दिसतो, त्याप्रमाणे इथंही जेव्हा अजय केडियाने दुर्लक्षित केल्याचा राग येऊन हर्षद दारूचा ग्लास रिकामा करतो, तेव्हा तो मोह आणि मत्सराने यापुढे आंधळा होणार आहे, हे स्पष्ट होतं. त्याची आई देवापुढे बसलेली असताना ‘निदान हात तरी जोड देवापुढे’ असं म्हणते आणि तो आपल्याच गुर्मीत आईला आता आपली प्रगती होणार असल्याचं सांगतो, तेव्हा त्याला गर्व झाल्याचं स्पष्ट होतं. सुचेता दलालचं तडफदार व्यक्तिमत्त्व रंगवतानाही तिच्या माणूसपणाच्या हळव्या छटा काही लहानसहान प्रसंगांतून सहज दिसतात. फेरवानीही घोटाळ्यात सहभागी असल्याची बातमी छापल्यानंतरही त्याच्या मृत्यूची वार्ता ऐकून तिला अश्रू अनावर होतात.

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

उत्तम दिग्दर्शनासोबतच या मालिकेची जमेची बाजू म्हणजे यातील कलाकार. प्रतीक गांधीने हर्षद मेहता साकारताना कसलीही उणीव ठेवलेली नाही. श्रेया धन्वंतरीने साकारलेली सुचेता दलाल अलीकडच्या नायिकांमधील सर्वोत्तम नायिका म्हणायला हरकत नाही. इतर सर्व दिग्गज कलाकारांचाही अभिनय देखणा. सतिश कौशिक, रजत कपूर, चिराग वोहरा, अनंत महादेवन, के. के. रैना, जय उपाध्याय, शरीब हाश्मी, जैमिनी पाठक या सर्व कलाकारांची कामगिरी उत्तम. मालिकेच्या शीर्षकगीताचं अॅनिमेशन आणि पार्श्वसंगीत पाठलाग करत राहतं. त्याशिवाय या मालिकेत प्रसंगानुरूप येणारी जुनी गाणी म्हणजे नॉस्टॅल्जियाची सुखद झुळूकच. विशेषत: ‘एक चिड़िया, अनेक चिड़ियाँ’ हे गाणं.

केवळ हर्षद मेहताची कथा सांगणं हा उद्देश इथं दिसत नाही, तर मोहापायी भरकटलेला नायक दिसतो. त्याचं अनुकरण करणारी भोळसट जनता, भ्रष्ट व्यवस्था दिसते. त्याचप्रमाणे त्या व्यवस्थेविरुद्ध, खोटारडेपणाविरुद्ध आवाज उठवणारी प्रामाणिक पत्रकारही दिसते. बरेच दिवस डोक्यात ठाण मांडून बसणारं काही पाहायचं असेल, तर या मालिकेकडे एकदा फिरकायलाच हवं.

..................................................................................................................................................................

लेखक संदेश कुडतरकर मुंबईस्थित 'अक्सेंचर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीत टीम लीडर म्हणून कार्यरत आहेत.

msgsandesa@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......