हा कवी स्वत:ला केवळ दलित कवी म्हणवून घेत नाही. त्याला एकूणच मानवतेचा कवी व्हायचंय. म्हणूनच मनवर यांची कविता हे दलित कवितेतलं ‘युगप्रवर्तन’ आहे
पडघम - साहित्यिक
इंद्रजित भालेराव
  • दिनकर मनवर आणि ‘दृश्य नसलेल्या दृश्यात’ व ‘अजून बरंच काही बाकी’ या कवितासंग्रहांची मुखपृष्ठे
  • Wed , 13 January 2021
  • पडघम साहित्यिक इंद्रजित भालेराव Indrajit Bhalerao दिनकर मनवर Dinkar Manvar दृश्य नसलेल्या दृश्यात Drushya Nasalelya Drushyat अजून बरंच काही बाकी Ajunahi Barach Kahi Baaki

मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात लागलेल्या दिनकर मनवर यांच्या ‘दृश्य नसलेल्या दृश्यात’ या कवितासंग्रहातील ‘पाणी कसं अस्तं’ या कवितेत पाण्याच्या रंगांसाठी वेगवेगळ्या प्रतिमांचा उपयोग केलेला आहे. त्यातील एका प्रतिमेमुळे एका समाजगटाच्या भावना दुखावल्या गेल्या आणि त्यावरून या कवितेविषयी दोनेक वर्षांपूर्वी बराच गदारोळही उठवला गेला. ‘दृश्य नसलेल्या दृश्यात’ या कवितासंग्रहाला २०१६ मध्ये मराठवाड्यातील ‘बाराशिव पुरस्कार’ देण्यात आला होता. त्या वेळी म्हणजे १७ सप्टेंबर २०१६ रोजी या पुरस्कार’ वितरणप्रसंगी प्रमुख पाहुणा म्हणून प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांनी केलेले  हे भाषण…

..................................................................................................................................................................

मित्रहो नमस्कार, बाराशिव साहित्य पुरस्कार २०१६च्या वितरणप्रसंगी इथं उपस्थित राहून तुमच्याशी संवाद साधताना मला खूप आनंद होतो आहे. या वर्षीचा पुरस्कार आपण दिनकर मनवर यांच्या ‘दृश्य नसलेल्या दृश्यात’ या कवितासंग्रहाला देत आहात, याचाही मला आनंद आहे. इतक्या चांगल्या साहित्यकृतीची परीक्षकांनी निवड केली, यासाठी मी त्यांना धन्यवादही देतो. तुमची ती परंपराच आहे की, आतापर्यंत हा पुरस्कार चुकीच्या माणसाला गेलाय असं एकदाही झालेलं नाही. बाराशिव साहित्य पुरस्कार हा श्रेष्ठ साहित्यकृतीलाच दिला जातो आणि निवडही निरपेक्ष असते. त्यामुळे पुरस्कार स्वीकारणारालाही ते आनंददायक वाटतं. म्हणूनच हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी खूप मोठी माणसं आढेवेढे न घेता या आडबाजूच्या आडरानात येऊन गेलेली आहेत. भारत काळे या माझ्या कादंबरीकार मित्राची प्रामाणिक धडपड या पाठीमागं उभी आहे. आणि ‘तू उभा ठाकलासिची पुरे : सिद्धी ते येथौनिच बेइजैत की’ म्हणत के. एस. शिंदे, मुरलीधर मुळे आणि अवघ्या शिक्षकवृंदासह बाराशिव हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ भारतच्या पाठीमागं ठामपणे उभं असतं.

मित्रहो, मला आठवतं पंचवीस वर्षांपूर्वी मी एका कार्यक्रमानिमित्त या शाळेत आलो होतो. तेव्हा एका मुलानं मला त्याची कविता म्हणून दाखवली होती. मी त्याला पाच रुपयाचं बक्षिसही दिलं होतं. तो माझ्या मागं लागून आमच्या कॉलेजला आला आणि वाचायला-लिहायला लागला. वादविवाद स्पर्धांमधून बोलायला लागला. हळूहळू त्यानं कवितेकडं आपलं पूर्ण लक्ष केंद्रित केलं आणि आज तो मराठीतला एक मान्यवर कवी झाला. आज अख्खा महाराष्ट्र त्याला ‘केशव खटींग’ या नावानं ओळखतो.

तेव्हापासून मी इथं येतोच आहे. आपण एक उत्तम साहित्यसंमेलन घेतलं. त्यासाठी शरद जोशी, बाबुराव बागूल, द. पं. जोशी, शेषराव मोरे यांच्यासारखी मान्यवर मंडळी येऊन गेली. शरद जोशी यांनी इथं केलेलं भाषण त्या वर्षीचं सर्वोत्कृष्ट भाषण म्हणून रविंद्र किंबहुने यांनी ‘प्रतिष्ठान’मध्ये प्रकाशित केलं होतं. तेव्हापासूनच या संस्थेत वाङ्मयीन उपक्रम वाढत गेले. भारत तेव्हा नवखा होता. पाडगावकरांच्या कविता वाचून भारावून जायचा. हळूहळू तो झपाटून वाचायला लागला आणि एक दिवस त्यानं भलंमोठं कादंबरीचं हस्तलिखित माझ्या हातात दिलं. ते वाचून मी भारावून गेलो. मी ते ‘देशमुख आणि कंपनी’कडं पाठवलं, तर त्यांनी ते लगेच स्वीकारलं. पुढं यथावकाश ते प्रकाशित झालं. आणि ती पाचशे पानांची कादंबरी गाजली. महत्त्वाची समजली गेली.

ते हस्तलिखित वाचलं तेव्हा मी जवळाबाजारला आलो होतो. मुरलीधरराव मुळे यांचे नेते विलासराव देशमुख तेव्हा नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते. मुरलीधरराव तेव्हा फारच आनंदात होते. तेव्हा मी त्यांना म्हणालो होतो, ‘‘तुमच्यासाठी त्यापेक्षाही जास्त आनंदाची गोष्ट घडली आहे. तुमच्या गावातल्या आणि तुमच्या संस्थेतल्या माणसानं एक अप्रतिम कादंबरी लिहिली आहे.” तेव्हाचं माझं म्हणणं त्या कादंबरीनं आणि तिच्या लेखकानं पुढं खरं ठरवलं.

..................................................................................................................................................................

‘खिंडीत’ : शैक्षणिक जगताच्या अंतरंगाची विरूपता भेदकपणे उलगडणाऱ्या कथा

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5254/Khindit

..................................................................................................................................................................

आठ-दहा वर्षांपूर्वी हा पुरस्कार सुरू करण्याची चर्चा सुरू झाली, तेव्हा या मंडळींनी पहिला पुरस्कार मलाच द्यायचा आणि त्यासाठी केंद्रात माजी गृहमंत्री असलेल्या शंकरराव चव्हाण आणि शरद जोशी यांना बोलवायचं असा सगळा घाट घातला होता. तेव्हाच मी त्यांना म्हणालो होतो की, पुरस्काराची प्रतिमा चांगली निर्माण करायची असेल तर माझ्या दोन सूचना आधी मान्य करा. एक, आपल्या तीन जिल्ह्यातल्या कुणालाही पुरस्कार द्यायचा नाही आणि दोन, परीक्षकही या तीन जिल्ह्याबाहेरचेच असले पाहिजेत. माझ्या अटी मान्य झाल्या आणि मला खूप आनंद वाटला. त्यामुळे आज या पुरस्काराला प्रतिष्ठा प्राप्त झाली.

अदलून-बदलून हा पुरस्कार आपण कथात्म वाङ्मय आणि कवितेसाठी देत असतो. या वर्षी कवितेला द्यायचा होता. त्यासाठी तुम्ही दिनकर मनवर यांच्या कवितेची निवड केली. त्यांच्या कवितेवर बोलण्यासाठी तुम्ही माझी निवड केली. मी तो कवितासंग्रह आधीच वाचलेला असल्यामुळे आणि मनवरांची कविता मलाही आवडली असल्यामुळे मी होकार दिला. नाहीतरी मी नेहमी उपस्थित असतोच. या वेळी व्यासपीठावर बसावं लागलं एवढंच.

तशी आकलनाला फारशी सोपी नसलेली मनवर यांची कविता आणि समोरचा विद्यार्थीवर्ग यांच्या समन्वयाची कसरत करत मला बोलावं लागणार आहे. पण विद्यार्थ्यांशी बोलायची रोजचीच सवय आणि मनवर यांच्या कवितेविषयी मनातून असलेली आवड, यामुळे मला ते फार अवघड जाणार नाही. आकलन सुलभ नसलेली मनवरांची कविता विद्यार्थ्यांच्या आकलन बिंदूवर आणण्याचा मी नक्की प्रयत्न करील.

मित्रहो, या कवितासंग्रहाचं शीर्षकच सामान्य माणसाला बुचकळ्यात टाकणारं, कोड्यात पाडणारं आहे. ‘दृश्य नसलेल्या दृश्यात’ असं या संग्रहाचं नाव आहे. दृश्य म्हणजे जे दिसू शकते ते आणि अदृश्य म्हणजे जे दिसू शकत नाही ते. कवी तर म्हणतो दृश्यात दृश्यच नाही. हे काय गौडबंगाल आहे? असं प्रथमदर्शनी आपणाला वाटतं. थोडा विचार केला की, एकेक गोष्ट कळायला लागते. विचार केल्याशिवाय मनवर यांची कविताही कळत नाही. सहज-सोपं मनवरांच्या कवितेत काही नाही, हे शीर्षकापासूनच सुरू होतं.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

आणखी काही दिवसांनी दिसणारं पृथ्वीवरच्या निसर्गसंहाराचं भयावह दृश्य जे आपणाला दिसत नाही, ते कवीला दिसतं आणि या कवितांतून ती गोष्ट कवी आपल्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करतोय. अर्थात ही कविता असल्यामुळे हा सगळा व्यवहार कवी संवेदनेच्या पातळीवरच करतो आहे. मानवी दु:खाचं, विनाशाचं मूळ सगळ्यांना दिसत नाही. ते एखाद्या बुद्धालाच दिसतं. म्हणूनच कवी म्हणतो –

स्वत:ला सिद्धार्थ समजून

प्रत्येक दृश्यातून बाहेर पडण्यासाठी धडपडतोय

मित्रहो, या संग्रहातल्या सुरुवातीच्या दहा कविता या अशा दृश्याविषयी बोलणाऱ्या आहेत, ज्यातून कवीला बाहेर पडायचंय. वर्तमानाचं भयावह दृश्य नसलेल्या दृश्यात कवीला जायचंय. या सुरुवातीच्या काही कविता म्हणजे भविष्यात होणाऱ्या पाणीटंचाईची भयावह दु:स्वप्नं आहेत. आज भोवती असलेल्या तुटपुंज्या सुखाच्या जागाही भविष्यात दिसणार नाहीत, हे ते भयस्वप्न आहे. जुन्या काळात ज्या काही दु:खासह तरी नैसर्गिक उबेच्या जागा होत्या, त्याही आता राहिल्या नाहीत. बेंबीच्या देठापासून गाव सोडलेल्या माणसाच्या डोळ्यासमोरून संपून गेलेलं दलित वस्तीतल्या घराचं एक दृश्य तरळून जातं. बाहेरच्या जगात कवितेला किंमत नाही असं वाटत असताना कवीला साक्षात्कार होतो की, कवीचे शब्द म्हणजे तहान लागल्यावर ओठाजवळ आपसूक येणारे पाणी. नष्ट होणाऱ्या सगळ्याच चांगल्या गोष्टींसोबत कविताही नष्ट होईल की काय, या भयस्वप्नासोबत सध्यातरी ती बाकी आहे, हे वर्तमान कवीला समाधान देऊन जातं.

मित्रहो, असा हा पहिला दहा कवितांचा समूह दृश्याविषयी बोलतो. तर त्यापुढच्या सोळा कविता पाण्याविषयी बोलतात. कवी प्रोट्रेटच्या प्रतिमेतून निघून जाणाऱ्या पाण्याला थांबायला सांगतो, पाण्याला लागलेल्या विशेषणात ‘बाटलं’ हे विशेष विशेषण असा उपहासात्मक उल्लेख करतो, व्याकरणाच्या परिभाषेत पाण्याची अनिर्बंधता सांगतो, अनिर्बंध पाण्यालाही कुणी बांध घातला तरी ते झिरपतंय हे निरीक्षण नोंदवतो, पाण्याच्या विविध रूपांना जग सुखी-समृद्ध करण्याची प्रार्थना करतो, अंगात पाणी असलेल्या म्हणजे क्रांतीची रग असलेल्या माणसाला आवर घालण्याचा आटोकाट प्रयत्न करणाऱ्या भोवतालाविषयी बोलतो, निर्मळ पाण्याला माणूसच मळ लावतो, निर्वेर पाण्याला माणूस वैर शिकवतो, निरपेक्ष पाण्याला माणूसच सापेक्ष बनवतो, अशी निरीक्षणं नोंदवतो, बहुराष्ट्रीय कंपन्यांनी पाण्यावर मिळवलेल्या ताब्याविषयी बोलतो, पाण्यावर ताबा मिळवून जगावर सत्ता गाजवणाऱ्या प्रवृत्ती आणि सगळ्यांचा श्वास आपण हातात असूनही कायम करुणामय असलेल्या पाण्याविषयी बोलतो, जगावर अधिसत्ता असूनही राजकीय प्रवृत्तींनी पाण्याला कसं भिकारी बनवलं ते सांगतो, वाहत्या पाण्याचं वाहणं बंद करणाऱ्या वर्तमानाविषयी चवदार तळ्याचा संदर्भ घेऊन बोलतो, आता खूप जुन्या झालेल्या ‘पाणी जीवन असतं’ या गोष्टीवर भाष्य करतो, तहानेचा एकेक डोंगर चढणाऱ्या माणसाला पाणी या शब्दाच्या उच्चाराविषयी क्रूरपणा करणाऱ्या संस्कृतीवर भाष्य करतो, आदिम अवस्थेतल्या माणसाला एकेकाळी हात पसरूनच पाण्याकडं जावं लागायचं, ज्याला या गोष्टीचा अपमान वाटला, त्यानं पाण्यावर हात ठेवला आणि आता तर वामनासारखा पायच ठेवला जातोय पाण्यावर असा इतिहास मांडतो. पाण्याबाबत जगावर येऊ घातलेल्या आणीबाणीच्या परिस्थितीचं भयावह दृश्य दाखवतो आणि शेवटी सगळ्याची गोष्टी टोक गाठतील, अतिरेक होईल व पुन्हा एकदा सृष्टी पूर्वस्थितीला येईल असंही सांगून ठेवतो.

.................................................................................................................................................................

विसंगती व सुसंगती समजून घेण्यासाठी उपयुक्त पुस्तक - वासंती दामले

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/4299/Madhyamvarg---ubha-adva-tirpa

.................................................................................................................................................................

असा एकून सोळा कवितेत पाण्याचं आख्खं ब्रह्मांड कवी आपल्यासमोर उभं करतो. एक-दोन ठिकाणी अंतर्विरोधही जाणवतो, पण तो ओघात क्षम्य समजायला हरकत नाही. एके ठिकाणी ज्ञानेश्वरांची ओवीही आठवते. एकूण काय तर कवीच्या चिंतनाचा फार मोठा भाग पाण्यानं व्यापला आहे. प्रतिमा, प्रतीकं, दृष्टान्त अशा पद्धतीने हे पाणी विषयावरचं भाष्य कवी कवितेच्या संपूर्ण अटी सांभाळत करतो. मुळात कविता म्हणून ही कविता अतिशय चांगली आहे.

पृथ्वीवर पाणी असूनही पाण्यासाठी तरसणारे दलित आणि पृथ्वीवरचं पाणी नष्ट होईल, तेव्हा तरसणारा एकूण मानव, अशी दोन्ही दृश्यं कवीला दिसतात. पूर्वार्ध दलित कवितेत आधी आलेलाच होता. उत्तरार्धाची सुरुवात मनवरांपासून होते आहे. दलित कवितेचा हा प्रवास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून बुद्धापर्यंतचा आहे. कवी अरुण काळे यांनी या प्रवासाला सुरुवात केली होती, पण त्यांच्या अकाली निधनानं तिथंच थांबलेला हा प्रवास मनवर यांनी खूप पुढच्या पल्ल्यापर्यंत नेलेला आहे. त्यामुळे दलित कविता आणि एकूण मराठी कविताही पुढं गेलेली आहे. आवर्तात सापडलेल्या दलित कवितेची कोंडी दिनकर मनवर यांनी फार सामर्थ्यानं फोडलेली आहे.

‘उद्याच्या दिवसाची खिडकी’ ही दोन पानांची कविता म्हणजे प्रलयाच्या स्थितीवर आलेल्या मानव समूहाच्या नोंदी आहेत. त्यानंतरच्या चार कविता प्रवासाच्या प्रतिमा घेऊन येतात. मुक्कामाच्या ठाव नसलेल्या माणसाची उपरी अवस्था, गाव हरवलेल्या माणसाची सैरभैर स्थिती, प्रवासाच्या प्रतिमेतून प्रत्येकाच्या मनात ठाण मांडून बसलेल्या असूयेचा बुद्धाच्या मार्गाने जाणारा मानसिक पातळीवरचा शोध, प्रवासात बसायची जागा मिळणं, तीही समोरची आणि खिडकीजवळची या साध्या साध्या गोष्टी हेरून केलेल्या अप्रतिम नोंदी, हे सगळं या प्रवासाच्या कवितांतून येतं. अलिप्त होऊन आपलंच मन पाहण्याचं वरदान असल्याशिवाय असल्या कविता लिहिता येत नाहीत. अभिव्यक्तीच्या नव्या वाटा शोधल्याशिवाय असलं मूलभूत काही लिहिताही येत नाही.

मित्रहो, यानंतरची जी कविता आहे, तिच्यात जमिनीच्या इंचइंच तुकड्यासाठी सुरू असलेला संघर्ष येतो. इथं शेतकरी आहे, भूमाफिया आहे, नोकरदार आहे आणि धर्मगुरूही आहे. या प्रत्येकाला ही जमीन हवी आहे. कवीला वाटतं –

खरं तर पृथ्वी एवढी गोल असूनही माण्सांना

अजूनही शोधता आलेला नाहीये आकार

गोल भाकरीसारखा जो पसरून जमिनीच्या तुकड्यावर

खात बसता येईल प्रत्येकालाच या उभयान्वयी वर्तमानात

मित्रहो, यानंतर येते ती झाडांची गोष्ट. झाडांचंच साम्राज्य असलेल्या पृथ्वीवर माणूस सुरुवातीपासून झाडांना कसा हटवत आलाय ते या चार तुकड्यांच्या, चार पानांच्या कवितेत आलेलं आहे. आदिमानवाच्या अग्नीची गरज असो, पांडवांचं नवं साम्राज्य उभारायची गरज असो, की आजच्या भूमाफियांची हाव असो... प्रत्येक वेळी कुऱ्हाड पडली ती झाडावर. एका बाजूनं सृष्टी वाचवायची करुणा भाकणारा कवी, ही सृष्टी, इथली झाडं, पाणी, जमीन संस्कृतीरक्षकांनीच कशी नष्ट केली ते सांगायला विसरत नाही. त्यासाठी अनेक पुरासंदर्भही तो नोंदवत जातो.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

ई-बुक खरेदीसाठी पहा -

https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/

..................................................................................................................................................................

आजच्या असुरक्षित आणि पराधीन जगण्याची मीमांसा कवी वेळोवेळी करतो. कागदाच्या प्रतिमेतून कोऱ्या मेंदूची ही कहाणी कवी मांडतो. सृष्टीतल्या चराचराला जगण्यासाठी लागणारा आधारच आपण काढून घेतो आहोत, पण सृष्टी चिवट आहे. ती अवकाश निर्माण करते आणि चराचराला अभय देते, असा आशावादही ‘चित्र’सारख्या कवितेतून येतो. ‘सुरुवात’ कवितेतलं झाड वाचताना मला चक्रधरांचा ‘संसारमोचक’ आंबा आठवला. मनवर यांच्या कवितेतला आणि चक्रधरांच्या दृष्टान्तातला आशय अगदी सारखा आहे. या विलक्षण साम्याचं मला खूप आश्चर्य वाटलं.

देहबोलीतून उगवलेल्या चिंतनात, भय संकटाला निखळ सामोरं जाणारी स्त्रीशक्ती उमगत जाते. मरण-दु:खाला आणि नंतर जगण्याला तेवढ्याच समंजसपणे भिडणारं स्त्रीत्वाचं बळ ‘पेशी’ या कवितेत दिसतं. या कवितेच्या शेवटी कवी म्हणतो –

बायांनो अशा कोणत्या पेशी

विभागून गेल्या असतील तुमच्या शरीरात

आमच्यातून विलग होताना

ज्या तुम्हाला कायम बळ देत राहतात

हा दु:खाचा चिरंतन पहाड पार करण्यासाठी

दु:खानं पुरुष कोसळून पडतो, पण स्त्रिया मात्र दु:खातही उभ्या असतात, कोसळत नाहीत. म्हणून शेतकरी आत्महत्यांमध्ये स्त्रियांचं प्रमाण नगण्य आहे.

भूक ही चिरंतन आहे पृथ्वीवर असं कवीला वाटतं. त्यामुळे मनवरांच्या कवितेतून अनेकदा भूकेचं चित्रण येताना दिसतं. या कविता वाचताना मला तुकोबांचा एक अभंग आठवला –

पोट लागले पाठीशी | हिंडवते देशोदेशी

पोटा भेणे जिकडे जावे | तिकडे पोट येते सवे

जपतप अनुष्ठान | पोटासाठी झाले दीन

पोटे सांडियेली चवी | नीचापुढे ते नाचवी

पोट काशियाने भरे | तुका म्हणे झुरूझुरू मरे

पण तुकारामाच्या अभंगातली भूक आणि मनवर यांच्या कवितेतली भूक यांच्यात फरक आहे. तुकारामाच्या अभंगातली भूक ही निसर्गानं माणसाला दिलेली भूक आहे, तर मनवर यांच्या कवितेतली भूक माणसानं माणसावर लादलेली आहे. मनवर आपल्या कवितेत लिहितात –

ज्यानं ज्यानं मला ठेवलंय उपाशी

ज्यानं ज्यानं माझी पळवली भाकर

ज्यानं ज्यानं माझ्या वाट्याचं पळवलं पाणी

पायाखालची हिसकावून घेतली भूमी

त्या सगळ्यांच्या नरडीचा घोट घेतल्यावरही

थोडीच शमणार आहे माझी भूक

ती तर नष्ट करू पाहतेय बेंबीच्या देठापासून

उमललेली ही काळोखाची सृष्टी

काय करू?

पृथ्वीवर न घडलेल्या पण माणसाच्या दूरवर्तनामुळे घडू शकणाऱ्या शक्यतांची, बॉम्बस्फोट घडवणाऱ्या सायकीविषयी, शहरातल्या जातीय, प्रांतीय, धर्मीय दंगलीत झालेल्या विस्थापितांच्या हालाचीही कविता मनवरांनी लिहिली आहे.

.................................................................................................................................................................

या मुलाखती म्हणजे मानवी सांस्कृतिक सौंदर्याचं प्रतिबिंब! आरसाच जणू. तुम्ही वाचकांनी त्यात डोकवावं. स्वतःस न्याहाळावं

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5255/Srujan-Sanwad-bhag-1-ani-bhag-2

..................................................................................................................................................................

नववाङ्मय प्रेमींच्या समूहाच्या पांगण्याचे संदर्भ ‘एकतीळ’ या कवितेत येतात. हे लोक माझ्या फार जवळून परिचयाचे नसल्यामुळे मला फारसे लक्षात आले नाहीत. संदर्भीत लोकांना ते नक्की माहिती असतील. त्यापुढच्या कवितेत हाच विषय येतो. माणसाचं माणसापासून दूर जाण्याचा संदर्भ या कवितेतला आहे. या कवितेतल्या शेवटच्या ओळीतला अरुणकाका कदाचित कवी मित्र अरुण काळेच असावेत. काळे आणि मनवर यांच्या कवितेतल्या नात्याविषयी मी आधी बोललो आहेच.

सकाळी जागण्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि जगण्यापासून मरण्यापर्यंत आजच्या माणसाचं झालेलं यांत्रिकीकरण ‘केव्हातरी उघडेलच या आभाळाचं निद्रिस्त झाकण’ या दीर्घ कवितेत येतं. ‘मी उघडणार नाही ताटी’ ही तेरा पानांची दीर्घ कविता आहे. मला तर हे आपल्या देशाची ज्ञानेश्वरी म्हणजे घटना लिहिणाऱ्या बाबासाहेबांचंच मनोगत वाटतं. ज्ञानेश्वरांच्या प्रतिमेतूनही ही वाळीत समाजाची कैफियत येते.

आणि आता काय म्हणून मी तुम्हाला सांगू

या कोऱ्या पत्रातील मजकुराचा अर्थ

किंवा उलगडून दाखवू एक एक सुक्त दु:खाचं

मी स्वत:च आता या घराला लावून घेतली आहे ताटी

लाख अभंग लिहिले मुक्ताईनं

किंवा लाख विनवलं तिनं

तरीही मी उघडणार नाहीये ताटी या घराची

 

या घरात मी स्वत: होऊन आलेलो नाहीये

तुम्हीच मला टाकलं आहे वाळीत

तुम्ही मला केव्हाच घेतलं नाही उतरंडीत तुमच्या

की शुद्धीपत्रही दिलं नाही भटानं कुण्याही

‘मागील काही युगापासून’ या कवितेत निरपेक्ष समजल्या जाणारा निसर्गही दलित माणसाशी कसा सापेक्ष वागला, हे सूर्याच्या प्रतिमेतून दाखवलंय. त्यापुढच्या ‘मला भूक लागली की’ या कवितेत गोरगरिबांसाठी प्राथमिक गरजाही कशा स्वप्नवत असतात ते आलेलं आहे.

..................................................................................................................................................................

हेही पाहा : मी खरंच दु:खी झालो आहे. थकलो आहे. हतबल आणि अगतिक झालो आहे. माझ्यापुढे दुसरा अन्य कोणताही पर्याय उरलेला नाही. - दिनकर मनवर

..................................................................................................................................................................

ज्याची चूक त्याच्या पदरात घालूनही चूक करणाराविषयी मनातून करुणाच बाळगणारा हा कवी आहे. हे या कवीच्या बुद्धत्वाकडच्या प्रवासाचं लक्षण आहे. दलित कवितेत याआधी हे कधी दिसलं नव्हतं. कवी स्वत:ला केवळ दलित कवी म्हणवून घेत नाही. त्याला एकूणच मानवतेचा कवी व्हायचंय. म्हणूनच मनवर यांची कविता ही दलित कवितेतलं युगप्रवर्तन आहे. हाच दलित कवितेचा आवर्तभंग आहे. भाषेच्या उदरात शिरून तिच्यात दडलेल्या आणि आतापर्यंत कुणीच न सांगितलेल्या अर्थाला मुखर करण्याची प्रतिज्ञा कवी खरी करून दाखवतो. म्हणूनच त्याला जात्याची नव्हे तर आईनं गाईलेल्या गाण्यांची घरघर ऐकू येते.

बारा पानांची अकरा भागातली शेवटची कविता म्हणजे युगानुयुगं उपेक्षित ठेवून पिडल्या गेलेल्यांचं युगायुगाचं आत्मकथन आहे. त्यात सृष्टीच्या आणि साहित्यसृष्टीच्या उगमापासूनच उपेक्षेचाच केवळ धनी झालेला माणूस बोलतोय. प्रत्येक युगात अवतार बदलावा, तशी ही उपेक्षेची रूपंही बदललेली आहेत आणि आज जागतिकीकरणाचा अवतार धारण करून त्याने सामान्य माणसाच्या वाट्याला उपेक्षाच दिलेली आहे… तिथपर्यंत येऊन ही कविता थांबते. या कवितेची सुरुवात दया पवार यांनी ‘हे महाकवे तुला महाकवी कसं म्हणू? तू लिहिला नाहीस एकही श्लोक आमच्या दु:खाविषयी’ असा प्रश्न विचारून केलेली होती. मनवर पुढच्या ओळी लिहून ही कविता परिपूर्ण करतात-

तेव्हा एखाद्या महर्षीनं कितीही ठरवलं मनापासून

माझ्याविषयी किंवा माझ्या कुळाविषयी लिहायचं

तेव्हा कदाचित माझा संबंधही उरला नसेल या भाषेशी

शेवटी एक निरीक्षण नोंदवतो आणि थांबतो. मनवर यांच्या कविता वाचताना मला सतत विनोदकुमार शुक्ल यांची आठवण येत होती. अभिव्यक्तीच्या मनवर यांच्या तऱ्हेवर विनोदकुमार शुक्ल यांचा पुष्कळ प्रभाव जाणवतो.

..................................................................................................................................................................

हेही पाहा : दिनकर मनवरांसारख्या कवीची कविता कुणाला जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणी दुखवू शकत नाही! - नितिन भरत वाघ

..................................................................................................................................................................

मित्रहो, २०१४ साली दिनकर मनवर यांचा हा कवितासंग्रह आला होता. पण प्रथम पुरस्कार रूपात दखल घेतली, ती मात्र बाराशिवनेच याचा मला खूप आनंदही आणि अभिमानही वाटतो. मनवर यांचा नुकताच आणखी एक कवितासंग्रह या वर्षीच्या जानेवारी (२०१६) महिन्यात प्रकाशित झालेला आहे. तोही मी वाचलेला आहे. त्यावरही मी थोडं बोलणार आहे.

मित्रहो, या कवितासंग्रहाचं नाव आहे – ‘अजूनही बरंच काही बाकी’. दृश्य नसलेल्या दृश्यांची मालिका याही संग्रहात पुढं सुरू आहे. कवीच्या कवितेवर एवढा विश्वास आहे की, तो सगळं काही कवितेत शोधतो. कवितेत सगळं काही नसतं, हे कवीला कळतं तरी कवी तसं करतो. कारण त्याच्याजवळ दुसरा पर्याय नाही. म्हणूनच तो सगळ्या गोष्टी कविताकेंद्रित करतो.

या कवीमध्ये विद्रोहाचा प्रचंड कोलाहल भरलेला आहे. तरी त्याची भाषा मात्र अतिशय संयमी आहे. मनवरांच्या कवितेतल्या विद्रोहाची तुलना अरुण काळे, नामदेव ढसाळ यांच्याशी करता येईल. पण त्यांच्या भाषेची तुलना मात्र कुणाशीच करता येणार नाही, इतकी ती त्यांनी स्वतंत्रपणे कमावलेली आहे. अतिशय शांत भाषेत ते अंतरातलं सगळं जहर बाहेर काढतात. कारण त्यांनी खूप काही पचवलेलं आहे.

..................................................................................................................................................................

हेही पाहा : ‘पाणी’ या एका प्रतीकातून घेतलेला समाजव्यवस्थेचा वेध निःसंशय महत्त्वाचा आहे! - वसंत आबाजी डहाके

..................................................................................................................................................................

आपण करत असलेल्या निसर्गाच्या विध्वंसाच्या चिंतनाचा या आधीच्या संग्रहातला धागा याही संग्रहात आपल्याला पाहायला मिळतो. ‘झाड तोडून बनवलेल्या कागदावरची कविता वाचण्याऐवजी सरळ झाडच वाचावं’ हे वसंत आबाजी डहाके यांच्या कवितेतलं विधान मनवरांची कविता वाचताना वेळोवेळी आठवत राहतं.

गावाला पुष्कळ खिडक्या असतात, पण शहराला मात्र एकही खिडकी नसते, हे विधान गावप्रेमी म्हणून मला फार फार आवडलं. कारण गावाकडची माणसं सतत शहराकडं पळतात, पण शहरात गेलेली माणसं काही परत गावाकडं येताना दिसत नाहीत. ‘अपूर्ण गोष्ट’, ‘आई’, ‘वडील’, ‘सशाची गोष्ट’, ‘वही उघडून’, ‘दुरडीत भाकरीचा तुकडा’, या अत्यंत साध्या भाषेत लिहिलेल्या तरी आपलं थोरपण जपून असलेल्या कविता आहेत. आधीच्या तुलनेत या संग्रहात आकलन सुलभ कवितांचं प्रमाण जास्त… जसं अरुण कोलटकर यांचंही झालं होतं.

‘या पृथ्वीवर केवळ एक’ नावाची कविता आहे. त्या कवितेतल्या

तरीही मी माझ्या हिस्स्यातील

भाकरीचा एक तुकडा

ठेवून देतो दुरडीला बाकी

कदाचित पृथ्वीवर कुणीतरी

भुकेने तडफडत असणाराय

या ओळी वाचताना मला एका बाजूला भालचंद्र नेमाडे यांचं एक विधान ‘संध्याकाळी घराकडं निघालेल्या बाया उरलेलं पाणी झाडाबुडीच टाकतात’ आणि अरुण काळेंची ‘यांच्या दारात कुत्रंही उभं राहणार नाही’ ही कविता आठवत गेली. मूलभूत माणुसकीचे कोंभ जपणाऱ्या या गोष्टी आहेत.

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

‘झाडं भयभीत झालीत’ ही शेतकरी आत्महत्येवरची एक विलक्षण वेगळी कविता आहे. मनवरांच्या कोणत्याही कवितेत बीभत्स शब्दांचा वापर नाही, जी अलीकडे एक फॅशन झालेली आहे. उलट करुणा हा शब्द पुन्हा पुन्हा येतो. मला करुण आईकडून मिळाली असं कवी सांगतो. करुणा हे तर बुद्धत्वाचं सार आहे, हे आपणाला माहीत आहेच

मला असा एकच शब्द हवाय

जो न उच्चारता न लिहिता

जाईल आरपार सळसळत कवितेच्या बाहेर

नि टाकेल फोडून दु:खाचा काळाभोर डोंगर

काळाच्या कपाळावर उगवलेला

म्हणजे ही भिंत चालू लागेल आपोआप

किंवा एखाद्या रेड्याच्या तोंडातून

बाहेर पडतील आपोआप सूर सुखाचे

खरंच काही नकोय मला

केवळ एक शब्द हवाय

जो लिहिला की समाधिस्थ होईल मी

मनवरांच्या कवितेतल्या या ओळी वाचताना आपणाला पुन्हा एकदा ‘पसायदान’ उलगडत जाते. आपण इतक्या कविता लिहिल्या त्या कुठं गेल्या, असा प्रश्न मनवरांना पडलेला आहे. आपण त्यांना आनंदानं सांगू शकतो की, त्या इथं बाराशिवेत आल्या. त्यांना इथं पानं फुटली, फुलं आली. त्यांनी हा परिसर सुगंधित केला.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......