अजूनकाही
डिसेंबरात पाऊस म्हणजे फार होते. आणि डिसेंबरात ऑक्टोबरसारखे उकडायला लागले तर काय करायचे माणसाने? सकाळी उठालो तर आकाश ढगांनी गच्च भरलेले. जुलैमध्ये ढग खाली उतरतात तसे उतरलेले. सगळे क्रेझी वातावरण. स्वेटर घातला तर थोड्या वेळाने उकडत होते. म्हणून स्वेटर काढला तर थोडा वेळ बरे वाटून परत थंडी वाजू लागली होती. सगळे क्रेझी! वर्तमानपत्र तरी कसे वाचावे माणसाने या वातावरणात? मी नुसतेच वर्तमानपत्र चाळत बसलो. स्वेटर काढला असल्याने आता थंडी नक्की कधी वाजेल याची वाट पाहत होतो.
ऋतुचक्राच्या एकंदर कॅनव्हासच्या बाहेरचा दिवस हा! काय करावे कळत नाही! सगळा ऱ्हिदम बिघडून जातो मनाचा अशा दिवशी! इतक्यात फोन वाजला. फोनवर नाव दिसले – ‘सुभाष अवचट’. हा एक सतत कॅनव्हासच्या बाहेर राहणारा माणूस. मी फोन उचलला.
‘जोश्याऽऽऽ कसा आहेस?’ अवचट नेहमीप्रमाणे ओरडले.
‘बरा आहे.’
‘चहा किती झाले?’
‘चार!’
‘क्रेझी आहेस!’
‘काय करायचं मग? डिसेंबरमध्ये ऑक्टोबरसारखी हवा आहे आणि जुलैमधल्यासारखे काळे ढग खाली लोंबकळत आहेत.’
‘अरे, सगळं जगच क्रेझी आहे! वेडxx दुनिया आहे सगळी.”
अवचट भयंकर ग्रेट मूडमध्ये.
‘मुंबईत पाऊस नाहिये का?’
‘आहे की! मस्त मजा आहे!’
‘आता काय बोलावे मी?’
‘कसली मजा? सगळं क्रेझी आहे.’
अवचट हसले. म्हणाले – ‘अरे, सगळी दुनियाच क्रेझी आहे. तुला रॉय किणीकरांची एक मजा सांगतो. रॉय किणीकर खजिना विहिरीजवळ राहायचे. एवढा मोठा कवी, पण ते भाड्याच्या घरात राहायचे. त्यांच्या तीन खोल्या होत्या भाड्याच्या. त्यांचा मालकसुद्धा त्यांच्यासारखाच क्रेझी होता. त्याचं आडनाव- डोळे. त्याला गाई आवडायच्या. गाईंचा अत्यंत प्रेमी.
किणीकर क्रेझी असल्यामुळे वेळेवर भाडे देऊ शकायचे नाहीत. मग हा डोळे त्यांना त्रास द्यायच्या एक एक भयंकर अशा आयडिया काढायचा. एके दिवशी किणीकरांची अडवणूक करायची म्हणून त्या वेडxxने लाकडी जिन्याने एक गाय दुसऱ्या मजल्यावर चढवली. कशी चढवली देव जाणे, पण चढवली. किणीकरांच्या घरासमोर, जिन्यात टप्पा असतो त्यावर बांधली. आता ये-जा कशी करायची? किणीकर पण वल्ली. ते गाईच्या खालून ये-जा करू लागले.”
माझ्या डोळ्यासमोर दुसऱ्या मजल्यावर बांधलेल्या गाईच्या खालून ये-जा करणारे महाकवी किणीकर आणि त्यांचे कुटुंबीय आले. स्वतः अवचट यांनीसुद्धा त्या काळात त्या गाईच्या खालून ये-जा केली होती.
काय हे जग आणि काय त्यातील प्रसंग! मला भयंकर हसू आले.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki
ई-बुक खरेदीसाठी पहा -
https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/
..................................................................................................................................................................
अवचट पुढे सांगू लागले – ‘‘किणीकर असले चिकट, इतका त्रास होता तरी शेवटपर्यंत त्यांनी ती जागा सोडली नाही. त्या डोळ्याने त्यांना कितीही त्रास दिला तरी किणीकर शेवटपर्यंत तिथंच राहिले. त्याच जागेमध्ये गेले ते शेवटी.”
मला हसावे की रडावे ते कळेना.
तो डोळेसुद्धा कसला भन्नाट इसम असणार. दुसऱ्या मजल्यावर गाय चढवायची आयडिया सुचणं काय सोपी गोष्ट आहे का? बरं सुचली तर सुचली, याने ती आयडिया प्रत्यक्षातसुद्धा आणली. काय म्हणावे या माणसाला!
अवचट खुश झाले होते. अत्यंत मूडमध्ये येऊन ते ती सगळी मजा सांगत होते, “गाईमुळे किणीकर कुटुंबाला खूप त्रास झाला, पण पुढे गाईमुळेच मालक डोळे त्या जागेची केस हरला. त्या जागेची केस न्यायालयात गेली. तोपर्यंत रॉय किणीकर यांचा मुलगा अनिल नोकरीला लागला होता. त्याने भाडे वेळच्या वेळी द्यायला सुरुवात केली. थकलेले भाडेही दिले, त्याचे व्याजसुद्धा दिले.
न्यायालयामध्ये मात्र व्याज मिळाल्याचे मालक कबूलच करेना. आता काय करावे? रॉय किणीकर यांच्या पत्नी एकदम खमक्या. त्यांची साक्ष सुरू असताना त्या एकदम म्हणाल्या, ‘मला व्याज मिळाले नाही’ असे गाईची शपथ घेऊन सांगायला सांगा मालकांना.
मालक डोळे एकदम गोत्यात आला. गाईची खोटी शपथ कशी घ्यायची? इतर कुठल्याही गोष्टीची खोटी शपथ त्याने घेतली असती. गाईची खोटी शपथ कशी घ्यायची? शेवटी - मला व्याज मिळाले आहे, असे त्याने कोर्टापुढे कबूल केले.”
मला परत एकदा भयंकर हसू आलं.
माणसांना त्रास देण्यासाठी, गाईला दुसऱ्या मजल्यावर चढण्याचा त्रास देणारा माणूस, गाईला शपथ लागेल म्हणून खोटी शपथ घ्यायला तयार नव्हता.
पूर्ण विक्षिप्त.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
अवचट पुढे सांगू लागले, “या डोळ्यांचाच एक शेजारी होता. कानिटकर. तोसुद्धा विक्षिप्त. त्याला क्राईम थ्रिलर खूप आवडत. क्राईम थ्रिलर आवडण्यात काही प्रॉब्लेम नाही. माणसाने क्राईम थ्रिलर वाचाव्यात आणि शांत राहावे. पण झाले असे की, खूप क्राईम थ्रिलर वाचून झाल्यावर याला शांत राहवेना. त्याने मग स्वतःच एक क्राइम थ्रिलर लिहिली. ते बाड घेऊन तो अवचटांकडे आला. म्हणाला – ‘मी एक क्राईम थ्रिलर कादंबरी लिहिली आहे. तू वाच आणि कव्हर कर.’ ”
अवचट ती कादंबरी वाचू लागले.
कादंबरीतील पहिला प्रसंग असा - सदाशिव पेठेत एका डॉनच्या पाठीमागे पोलीस लागतात. (लेखक सदाशिव पेठेतला म्हणजे डॉनलासुद्धा सदाशिव पेठेत यायला लागले. त्याला खूप बोअर होत असणार, पण तरीसुद्धा त्याला सदाशिव पेठेतच यायला लागले!). पोलीससुद्धा कसले भारी, ते सदाशिव पेठेतच त्याच्या मागे लागले. तो डॉन पळत पळत शिवाजीनगर रेल्वे स्टेशनपर्यंत गेला. पोलिससुद्धा सदाशिव पेठेतलेच असल्याने त्यांनीसुद्धा शिवाजीनगरपर्यंत त्याचा पिच्छा सोडला नाही.
डॉन शिवाजीनगर स्टेशनमध्ये गेला. तिथे एक रेल्वे उभी होती. डॉनने ती गाडी पोलिसांची नजर चुकवून पकडली. त्याने ती गाडी पकडली, तेव्हा गंमत अशी झाली की, हा समोर उभ्या असलेल्या गाडीत बसला असेल, हे सदाशिव पेठेतल्या पोलिसांच्या लक्षात आले नाही.
गाडी सुटली. डॉनची सुटका झाली. पुढे ती गाडी नेरळला थांबली, तेव्हा डॉन गाडीतून उतरला. पाहतो तर काय, तिथे बाहेर त्याची मोटरगाडी उभी असते. त्या गाडीमध्ये तो शानमध्ये बसतो. त्याचे लोक त्याला नेरळ हिलमधल्या त्याच्या बंगल्यात घेऊन जातात. तो आला म्हणून त्या आनंदात त्याचे साथीदार बंगल्यातली सगळी झुंबरे आणि हंड्या लावतात.
तो आरामात सोफ्यावर बसतो. त्याला ग्लासातून व्हिस्की आणून देतात. त्याबरोबर चकणा म्हणून काजू कतली, बुंदीचे लाडू आणि जिलबी आणून देतात.
१९७०च्या दशकातील सदाशिव पेठेतील लेखक. त्याला दारूबरोबर चकणा म्हणून काय खातात हे कसे माहीत असावे? दारूबरोबर काहीतरी खायचे असते, हे माहीत होते हेच खूप झाले!
दारूविषयी त्या काळात महाराष्ट्रात इतकं अज्ञान होतं की, बोलायची सोय नाही! साक्षात वि. स. खांडेकर यांनी आपला हीरो ‘बीर’ पीत असल्याचे वर्णन केले आहे. ‘Beer’ असे स्पेलिंग असल्याने त्याचा उच्चार ‘बीर’ असाच होणार, ‘बिअर’ असा कसा होईल?
स्वतः खांडेकरांची ही अवस्था, बिचाऱ्या कानिटकराला कुणी काय बोलावे या परिस्थितीत? त्याला अवचटांनी हाकलून दिले.
सगळंच क्रेझी!
गाईचं दुसऱ्या मजल्यावर चढणं, तिच्या खालून किणीकरांनी ये-जा करणं. गाईची खोटी शपथ घ्यायला लागू नये म्हणून डोळ्यांनी केस हरणं. कानिटकरांच्या डॉनने प्रज्वलित हंड्या-झुंबरांच्या मंद प्रकाशात व्हिस्कीबरोबर काजू कतली, बुंदीचे लाडू आणि जिलबी खाणं…
मी बाहेर बघितलं. डिसेंबर महिन्याचा ‘आऊट ऑफ कॅनव्हास’ भाग तसाच होता. ऑक्टोबर महिन्यात असावी तशी हवा, जुलैमध्ये असावे असे खाली लोंबकळणारे ढग. थोडे उकडावे आणि थोडी थंडी वाजावी अशी हवा…
माझ्या मनाच्या वैतागलेल्या कॅनव्हासवर अवचटांनी विक्षिप्त आणि विचित्र लोकांचे किस्से सांगून एक अॅब्सर्ड विनोदाचा सूर्य रंगवला.
आम्ही भयंकर हसलो. मी अवचटांना म्हणालो – ‘तुम्हालाच कसे भेटतात असे सगळे लोक?’
अवचट म्हणले – ‘सगळ्यांनाच भेटत असतात असे लोक. सगळ्यांच्या लक्षात राहत नाहीत एवढंच.’
मी फोन ठेवला.
चहा पीत पीत विचार करू लागलो. फक्त फुललेल्या पळसावर का लिहायचे?
आजचा हा विचित्र निसर्गसुद्धा ‘निसर्ग’च आहे. या सगळ्या विक्षिप्त माणसांमधूनसुद्धा मानवी जीवनच वाहते आहे.
कुठून येत असेल हा विक्षिप्तपणा? कुठून येत असेल हा क्रेझी विनोद?
.................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
लोक बोअर झाले की, विक्षिप्तपणे वागू लागत असतील की, केवळ वैविध्यासाठी! लोक आयुष्यात विविधता यावी म्हणून डेस्परेट होत असतील का? या वैविध्याने त्यांच्या आयुष्यात काही फरक पडत असेल का?
मला ‘वेटिंग फॉर गोदो’ या नाटकातील सॅम्युएल बेकेटचे एक वाक्य आठवते - “...we are bored to death, there’s no denying it... A diversion comes along and what do we do? We let it go to waste… In an instant all will vanish and we’ll be alone once more, in the midst of nothingness!”
(“आपल्या सगळ्यांनाच कंटाळा आलेला असतो. नाकारूच शकत नाही हे आपण. अचानक एक डायव्हर्जन येते, आणि काय करतो आपण? आपण वाया घालवतो ते डायव्हर्जन. एका क्षणात सगळं निघून जातं. आणि आपण आपल्या आयुष्यातल्या शून्याच्या मिठीत परत एकदा सापडतो.”)
मी लिहायला बसलो.
सुभाष अवचटांनी त्या मलूल सकाळी माझ्या मनावर रंगवलेला अॅब्सर्ड विनोदाचा सूर्य मला कागदावर रंगवता येतो का ते पाहू लागलो. या असल्या दिवशी मी तरी दुसरं काय करणार?
..................................................................................................................................................................
लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.
sjshriniwasjoshi@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Thu , 14 January 2021
गाय जिन्यावरून चढवण्यावरनं आठवलेला एक ऐकीव प्रसंग : https://www.maayboli.com/comment/2379203#comment-2379203
-गामा पैलवान
Yogesh Koleshwar
Wed , 13 January 2021
Great..........
Vishnu Date
Wed , 13 January 2021
एकदम झक्कास!