राजमाता जिजाऊ यांची आज जयंती. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा परिचय करून देणारा हा विशेष लेख...
..................................................................................................................................................................
मध्ययुगीन कालखंडात सर्वत्र जुलुमशाही राजवटी हिंदुस्थानात अधिकाररूढ होत्या. मुघलशाही, निजामशाही, आदिलशाही या मुस्लीम राजवटींनी मराठी जनतेवर प्रचंड जुलूम, अत्याचार करून रयतेला हैराण करून सोडले होते. अशा प्रतिकूल कालखंडात पर्यायाने १७व्या शतकाच्या मध्यात शहाजीराजांच्या मनात ‘स्वराज्य’ निर्माण करण्याची कल्पना आली. त्या दिशेने त्यांनी वाटचाल करून पाहिली. मात्र स्वकियांची अनास्था, बहुजन समाजाची सैरभैरता व अनेक मराठा सरदारांचे सहकार्य न मिळाल्यामुळे शहाजीराजांना स्वराज्याचे स्वप्न साकार करता आले नाही. मात्र पुढे जिजाबार्इंना सोबत घेऊन त्यांनी स्वराज्य निर्मितीचा चंग बांधला. राजमाता जिजाऊंनीदेखील आपल्या पतीला खंबीर साथ देत त्यांचे ‘स्वराज्या’चे स्वप्न पुर्णत्वास जाईल, याची अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आखणी केली.
१६३०-१६४२ या एक तपाच्या कालखंडात जिजाऊंचे जीवन अत्यंत संघर्षात व धावपळीत गेले. खरे पाहता या काळात एखादी स्त्री हताश होऊन बसली असती, मात्र या खंबीर व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असलेल्या मातेने बालशिवाजीला सोबत घेऊन स्वराज्यनिर्मितीचे स्वप्न फुलवले. अत्यंत प्रतिकूल अशा कौटुंबिक, सामाजिक व राजकीय पर्यावरणात बहुजन समाजाच्या उद्धारासाठी हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. खंबीर नेतृत्व, करारी बाणा व धाडसी वृत्ती या गुणवैशिष्ट्यांच्या आधारावर त्या हिंदवी स्वराज्याच्या प्रेरक शक्ती ठरल्या.
जगाच्या इतिहासात अनेक कर्तृत्ववान महापुरुष होऊन गेले. त्यांच्या जडणघडणीत त्यांच्या मातेचा, पत्नीचा मोलाचा वाटा होता, यास इतिहास साक्षी आहे. अगदी पाश्चात्य जगातील गॉर्कीपासून नेपोलियन बोनापार्टपर्यंत, तर भारतात गौतम बुद्धापासून महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंतच्या महापुरुषांच्या कार्य-कर्तृत्वामागे असलेल्या स्त्रियांची आपल्याला नोंद घ्यावी लागते. मात्र आपल्या देशाचा इतिहास अभ्यासता याची जाणीव होते की, वर्णवर्चस्ववादी, पुरुषप्रधान संस्कृतीने अशा स्त्रियांचे कार्य-कर्तृत्व फारसे प्रकाशात येऊ दिले नाही. प्रामुख्याने बहुजन समाजातील स्त्रियांचे कर्तृत्व, त्यांचा पराक्रम याबाबत इतिहासाने फारशी दखल घेतलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे.
मराठ्यांचा इतिहास घडवणारी, स्वराज्य प्रेरिका, राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या चरित्रावरदेखील फारसे लिखाण झालेले नाही. त्यांचा स्वराज्याचा संकल्प, लढाऊ बाणा आणि अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची उर्मी, ज्यांच्यामुळे छत्रपती शिवराय घडले, त्या जिजाऊंना विनम्र अभिवादन!
१७व्या शतकात एक मराठा सरदारांच्या घरात जन्माला आलेली ही मुलगी पुढे स्वराज्याची प्रेरणास्त्रोत ठरते, ही काही साधी गोष्ट नाही. यावर भाष्य करताना ‘शिवाजी द ग्रेट’ या आपल्या ग्रंथात डॉ. बाळकृष्ण म्हणतात, ‘One word, she had the head of a man over the shoulder of a women.’ म्हणजे देहाने स्त्री असलेल्या जिजाऊ मूर्तीमंत पौरुष होत्या!
..................................................................................................................................................................
‘खिंडीत’ : शैक्षणिक जगताच्या अंतरंगाची विरूपता भेदकपणे उलगडणाऱ्या कथा
हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5254/Khindit
..................................................................................................................................................................
बाल शिवरायांना सोबत घेऊन त्यांनी स्वराज्यप्राप्तीचे अत्यंत कठीण व अशक्यप्राय ध्येय साध्य केले. १६४२ ते १६७४ या साडेतीन दशकाच्या कालखंडात बहुजन समाजातील तरुणांना, शेतकऱ्यांना, अठरापगड जाती-जमातींना एकत्र करून शिवरायांसारखा आदर्श राजा घडवला. त्यांचे हे कार्य अत्यंत लाखमोलाचे ठरते.
प्रेरणादायी इतिहास
जिजाऊंनी आपल्या विचार आणि कार्यातून आपल्या कारकिर्दीत महाराष्ट्रात एक नवी सृष्टी निर्माण केली. मराठ्यांचा इतिहास घडवणारी एक स्वराज्यप्रेरिका महिला म्हणून त्यांचे स्थान उच्च दर्जाचे आहे. त्यांची धैर्यशीलता आणि स्वराज्याची उर्मी या गुणवैशिष्ट्यांवर आरूढ होऊन जिजाऊंनी शहाजीराजांनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न फुलवले आणि शिवरायांना सोबत घेऊन ते पूर्णत्वास नेले. आपण जर १६३१-१६४२ या कालखंडातील काही घटना, घडामोडी तपासून पाहिल्या तर आपल्या हे लक्षात येते की, जिजाऊ प्रचंड लढाऊ वृत्तीच्या होत्या. बालशिवरायांना शिवराज्याची प्रेरणा देण्यापासून राज्याभिषेकाचे आयोजन करण्यापर्यंतचा त्यांचा अत्यंत प्रेरणादायी इतिहास आहे.
१५९८ ते १६७४ असा एकूण पाऊणशे वर्षांचा हा इतिहास आहे. मात्र जिजाऊंचा संपूर्ण इतिहास उपलब्ध नाही, पण जेवढा उपलब्ध आहे तो अत्यंत थक्क करणारा आहे. जन्म विदर्भात, सासर मराठवाड्यात, कार्य- कर्तृत्व पश्चिम महाराष्ट्रात आणि मृत्यू कोकणात असा हा जीवनप्रवास फार काही सरळ मार्गाने झालेला नाही. अत्यंत बिकट, संकटांनी वेढलेला व नागमोडी वळणांनी झालेला आहे. मात्र याअगोदर स्पष्ट केल्याप्रमाणे त्यांच्या जीवनकार्यावर फारसा प्रकाश टाकलेला नाही. जिजाऊंनी बालशिवबाला रामायण, महाभारतातील गोष्टी सांगितल्या. त्यातूनच महाराजांनी प्रेरणा घेतली एवढेच बिंबवले जाते. परंतु वस्तुस्थिती वेगळी आहे. केवळ पुराणातील गोष्टी सांगून त्यांनी महाराजांची जडणघडण केली नसून त्यासाठी प्रचंड मेहनत घेतलेली आहे. प्रसिद्ध इतिहासकार श्रीमंत कोकाटे म्हणतात- ‘‘जिजाऊंनी शिवरायांना भाकडकथा सांगितल्या नाहीत, तर त्यांना बहुजनांचा वैभवशाली इतिहास सांगितला. प्रजावत्सल बळीराजाची हत्या करणारा वामन, आपल्या पराक्रमी पूर्वजांचे शिरच्छेद करणारा परशुराम, शन्मुखाला ठार मारणारा राम यामुळेच भारतीय बहुजन समाज उद्ध्वस्त कसा झाला, हा सत्य इतिहास जिजाऊंनी शिवरायांना सांगितला. खरे शत्रू कोण, खरे मित्र कोण यांची ओळख करून दिली. वामन, परशुराम हे बहुजनांचे शत्रू आहेत, पण हिंदू धर्मांनी त्यांना देव केले. तेव्हा आपल्याला बहुजन समाजासाठी स्वराज्य निर्माण करा अशी प्रेरणा दिली.”
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
जिजाऊंनी अनेक संकटांचा धैर्याने मुकाबला केलेला आहे. वानगीदाखल काही उदाहरणे व घटना सांगता येतील. १६३० ते १६४२ या एक तपाच्या कालखंडात त्यांचे जीवन अत्यंत धावपळीत गेले. कधी शिवनेरी, सिधखेड, खेड, बेंगलोर अशी त्यांची भटकंती झाली, चार अपत्य अल्पजीवी ठरली, खंडागळे हत्ती प्रकरणात भोसले-जाधवराव घराण्यात प्रचंड संघर्ष झाला, यात जिजाऊंना प्रचंड मानसिक त्रास झाला. कारण बाजू कोणाची घ्यावी, माहेरची की सासरची, हा यक्ष प्रश्न होता.
दुसरी घटना म्हणजे देवगिरी किल्ल्यावर थोरले बंधू, भाचे यांची एकाच वेळी हत्या झाली. याशिवाय वरील कालखंडात शहाजीराजे कधी मोगलाकडे, तर कधी आदिलशाही व निजामशाहीकडे अशी विचित्र अवस्था होती. पुढे १६४२ नंतर पुण्यात जहागिरी मिळाल्यानंतर तो कारभार पाहण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली. पुणे नव्याने उभे करणे हे एक फार मोठे आव्हान जिजाऊसमोर होते. कारण आदिलशहाचा एक ब्राह्मण सरदार मुरार जगदेवने १६३०मध्ये संपूर्ण पुणे उद्ध्वस्त करून गाढवाचा नांगर फिरवला होता. रस्त्यात लोखंडी पहार रोवून आता हे गाव वस्ती करण्यास शुभ राहिले नाही, जो कुणी इथे वस्ती करेल त्याच्या वंशाचा नाश होईल, असा धार्मिक दहशतवाद त्याने निर्माण केला होता. त्याच्या भीतीने व अत्याचारामुळे कंटाळून प्रजा पुणे सोडून जंगलात वास्तव्यास गेली होती. आदिलशहाने बहुतेक संपत्ती उदध्वस्त केली होती, तर दुसऱ्या बाजूने वैदिक ब्राह्मणांनी बहुजन समाजाचे धैर्य व त्यांचा आत्मविश्वास नष्ट केला होता.
अशा पार्श्वभूमीवर जिजाऊंनी झांबरे पाटलांकडून जमीन विकत घेऊन त्या ठिकाणी लाल महाल उभा केला. धार्मिक दहशतवाद उखडून फेकून दिला. पुण्याची नव्याने उभारणी सुरू केली. जनतेत पुन्हा विश्वासाचे वातावरण निर्माण केले. महाराजांच्या हस्ते सोन्याचा नांगर फिरवून पुन्हा नव्या उमेदीने काम सुरू केले. याच घटनेपासून ‘स्वराज्या’ची पायाभरणी झाली असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. या काळात शहाजीराजे व शिवबा यांच्यातील दुवा म्हणून जिजाऊंनी प्रभावीपणे नेतृत्व केले.
संकटांची मालिका
जिजाऊंचा जीवनप्रवास अत्यंत खडतर व संघर्षाचा राहिला. अगदी विवाह झाल्यापासून पुढे तब्बल तीन दशके ही संकटांची मालिका सुरू होती. मात्र अशाही प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी स्वराज्याचे स्वप्न फुलवले, जोपासले व पूर्ण केले. यावर प्रकाश टाकताना आपल्या ‘राजमाता जिजाबाई’ या छोटेखानी चरित्रग्रंथात मारोतराव कन्नमवार म्हणतात, “मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी अत्यंत कष्टमय मार्ग जिजाऊंनी स्वीकारला. सगळ्या बाजूंनी प्रतिकूल परिस्थिती असूनही त्यांचे धैर्य खचले नाही. तत्कालीन राजकीय परिस्थितीचे स्वतःचे कुशाग्र बुद्धीने मंथन केल्यानंतरच अगदी दूरदृष्टीपणाने राजमाता जिजाबार्इंनी हा स्वराज्याचा निर्णय घेतला होता आणि या आपल्या अंगीकृत ध्येयापासून त्या क्षणभरही विचलीत झाल्या नाहीत. उलट राष्ट्रपुरुष शिवबाला सतत प्रेरणा व प्रोत्साहन दिले.”
स्वराज्याची निर्मिती हाच एकमेव ध्यास घेऊन त्यांनी अखंडपणे वाटचाल केली. या काळात अनेक संकटे स्वराज्यावर चालून आली. शिवबांना व मावळ्यांना सोबत घेऊन जिजाऊंनी सर्व संकटांचा निर्धाराने मुकाबला केला. मात्र आपला स्वराज्यनिर्मितीचा संकल्प जराही डळमळीत होऊ दिला नाही. यावर भाष्य करताना इतिहासाचे एक अभ्यासक वा. सी. बेंद्रे लिहितात, “जिजाबाईंचे पुण्यात आगमन झाल्यानंतर त्यांनी अत्यंत जबाबदारीने कारभार पाहिला. मात्र तो शिवरायांच्या नावाने व हाताने चालवल्याने महाराजांना आपल्या शक्ती सामर्थ्यावर विश्वास अधिक दृढ करता आला.” ते पुढे लिहितात, “शहाजीराजांनी स्वराज्य निर्माण करण्याचे भावी हेतूनेच शिवबांना महाराष्ट्रात पाठवले होते. मात्र ते साधण्याची अपेक्षा जिजाऊंच्या मेहनतीवरच अवलंबून होती. कारण कर्त्या माणसांना आश्वासन देऊन एकत्र आणणे शिवबासारख्या केवळ १२ वर्षाच्या मुलाला कठीण गेले असते.”
.................................................................................................................................................................
हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5255/Srujan-Sanwad-bhag-1-ani-bhag-2
..................................................................................................................................................................
स्वराज्यावर चालून आलेली अनेक संकटे जिजाऊंनी धैर्याने परत फिरवली. शाहिस्तेखान, अफजलखान, दिलेरखान, मिर्झा राजे अशी एकामागून एक चालून आली. प्रत्येक वेळी या मातेने शिवरायांना खंबीरपणे पाठिंबा दिला. शिवरायांचे प्राण धोक्यात आहेत, हे कळूनही या स्वराज्यप्रेरक राष्ट्रमातेने अवघ्या महाराष्ट्राची चिंता वाहिली. स्वराज्याचा संदेश देताना त्या शिवबाला जो उपदेश करतात ते एका वीर मातेचेच स्वभावगुणवैशिष्ट¬ असू शकते. त्यांच्याच शब्दात, “शिवबा, मृत्यू एकदा येणारच, तेव्हा आपले ध्येय साध्य करण्यासाठी लढणे गैर नाही. आपण कधीही आत्मसन्मान गहाण ठेवून जगायचे नाही.” यावरून त्यांचा जाज्वल्य राष्ट्राभिमान दिसून येतो.
छत्रपती शिवरायांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे ‘तोरण’ बांधले असे म्हणतात! हा तोरणा जिंकण्यास जिजाऊंनीच त्यांना प्रेरणा दिली, नव्हे आदेश दिला होता. याच घटनेपासून स्वराज्याचा संकल्प फलद्रूप होण्यास सुरुवात झाली. महाराज बाहेर असताना कोंढाणा किल्ला जिंकण्याचा आदेशही तानाजी मालुसरे यांना जिजाऊंनीच दिला होता.
आदिलशहाचा सरदार अफजलखानाने फार मोठे संकट स्वराज्यावर आणले होते. मात्र महाराजांनी अफजलखानाचा वध करून विजय मिळवला एवढाच इतिहास सांगितला जातो. मात्र या विजयामार्गे जिजाऊंची प्रेरणा, डावपेच कसे यशस्वी ठरले, हेदेखील तेवढेच महत्त्वाचे आहे. मुळात अफजलखानास प्रतापगडाच्या पायथ्याशी निमंत्रित करण्याची योजना जिजाऊंचीच होती. प्रचंड फौजफाटा घेऊन आलेल्या या अफजलखानामुळे प्रजेत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. महाराजांचे प्राण धोक्यात होते, मात्र या प्रसंगीदेखील जिजाऊ मुळीच डगमगल्या नाहीत. त्यांनी दाखवलेला करारी बाणा व ‘पुत्रापेक्षा स्वराज्य महान’ अशी भूमिका घेतली.
इथे आणखी एक प्रसंग नोंदवणे आवश्यक आहे. ज्यातून जिजाऊंचा लढाऊ बाणा व करारीपण व्यक्त होण्यास मदत मिळते. १६६०मध्ये विजापूरच्या सिद्दी जोहरने पन्हाळगडाला वेढा दिला, त्या वेळी जिजामाता राजगडावर होत्या. त्यांनी नेताजी पालकरांना पुढील भाषेत सुनावले होते, “तुम्हास वेढा तोडणे शक्य नसेल तर मी स्वत: जाऊन शिवबाला सोडवून आणते.” पुढे जेव्हा नेताजी पालकर वेढा तोडण्यात यशस्वी झाले नाहीत, तेव्हा जिजाऊंनी स्वत: पन्हाळगडावर जाऊन शिवबाला सोडवण्याचा निर्धार केला होता.
विशेष म्हणजे या वेळी त्यांचे वय ६२ वर्षे होते. एवढ्या उतारवयातदेखील शत्रूविरुद्ध लढण्याची प्रचंड उर्मी त्यांच्या ठायी होती हेच सिद्ध होते. पुढे १६६६मध्ये महाराज आग्रा येथे कैदेत असताना त्या सहा महिन्यांच्या काळात जिजाऊ मुळीच खचल्या नाहीत, तर नेटाने राज्यकारभार करत महाराजांना कसे मुक्त करता येईल, याबद्दल आपल्या सहकाऱ्यांशी सल्ला मसलत करत होत्या.
बहुजनांच्या शक्तीचे एकत्रीकरण
शहाजीराजांनी स्वराज्य स्थापनेची जबाबदारी मोठ्या विश्वासाने जिजाऊंवर सोपवली होती. तेव्हा केवळ रणनीती, डावपेच एवढ्यानेच काम भागणारे नव्हते, तर भरकटलेला, सैरभैर झालेला बहुजन समाज स्वराज्यासाठी तयार करणे, ही फार अवघड अशी जबाबदारी होती. कारण दमनकारी शक्तींनी संपूर्ण बहुजन समाज पिचून गेला होता. शेतकरी नागवला जात होता. त्याला सर्वतोपरी मदत करून उभा करणे अत्यंत आवश्यक झाले होते. या पार्श्वभूमीवर जिजाऊंनी केलेले काम अत्यंत मोलाचे ठरते.
.................................................................................................................................................................
हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5250/Being
.................................................................................................................................................................
शेतकऱ्यांबद्दल तर त्या अत्यंत संवेदनशील होत्या. स्वराज्याचा गाडा हाकत असताना शेतीकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. शेतकऱ्यांना औजारे, धान्य पुरवणे, शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे विवाह अत्यंत कर्तव्यनिष्ठेने लावून देणे, सर्व अठरापगड जातीच्या तरुणांना एकत्र करत शिवरायांचे सवंगडी ते स्वराज्याचे पाईक बनवणे, ही अजोड कामगिरी या मातेने करून दाखवली. सर्व जाती-धर्मातील मावळ्यांना जिजाऊंनी स्वतःच्या हाताने खाऊ घातले. जातीभेद, वर्णभेद नष्ट केला. गरिबांचे संसार सावरले. लालमहाल बांधला, हाच लाल महाल सर्व जातीधर्माच्या मावळ्यांना आपली राजधानी वाटू लागला.
तात्पर्य, जिजाऊंच्या प्रेरणेमुळे बहुजन समाजात प्रचंड चैतन्य निर्माण झाले. स्वराज्यासाठी प्राणाची बाजी लावण्याची जिद्द त्यांच्यात निर्माण होऊ शकली, हे नाकारता येणार नाही. कारण रयतेच्या उदध्वस्त झालेल्या घरादाराच्या, शेतीची जिजाऊंनी पुनर्उभारणी केली. उदध्वस्त झालेल्या पुण्यात शेतकऱ्यांची वस्ती वसवली. त्यांना शेतीसाठी औजारे दिली, धरणे बांधली व जगण्याचा प्रचंड आत्मविश्वास निर्माण केला. या गोरगरिबांच्या मुलांना बिनदिक्कतपणे राजवाड्यावर आणण्याची मुभा देण्यापासून त्यांच्या झोपडीपर्यंत शिवबाला पाठवण्याची किमया त्यांनी करून दाखवली. या सर्व वात्सल्याचा सामाईक परिणाम म्हणूनच स्वराज्यासाठी प्राणपणाने लढा देणारे मावळे तयार झाले, हे कदापिही विसरता येणार नाही. छत्रपती शिवाजीमहाराज ‘जाणते राजे’ झाले, त्यामागे एक ‘जाणती आई’ होती!
जिजाऊंनी शिवरायांवर केलेल्या संस्काराच्या अनुषंगानेदेखील इतिहासात चर्चा आहे. महाराज महिलांचा प्रचंड सन्मान करत असत. त्याबाबत महाराज नेहमी दक्ष असत, असे सांगितले जाते. मात्र जिजाऊंच्या अनुकरणातून महाराजांमध्ये हा गुण ओतप्रोत भरलेला होता, हे मान्य करावे लागेल. जिजाऊ बालशिवरायांना रामायण, महाभारतातील गोष्टी सांगत असत. त्या कोणत्या गोष्टी, कशा सांगत असत हे पाहणे उदबोधक ठरेल. जिजाऊ सांगत- ‘‘शिवबा रामायणात देवाचाही पराभव करणाऱ्या रावणाने सीतेचे अपहरण केले. परिणामी त्याचा शेवट झाला. महाभारतात कौरवांनी द्रौपदीची विटंबना केली, परिणामी कौरव संपले. म्हणजे जे राज्यकर्ते स्त्रियांचा अनादर करतात ते संपतात. म्हणून राजे माझा तुम्हाला संदेश आहे की, महिलांचा आदर करा व इतरांना करायला शिकवा.” जिजाऊंच्या या शिकवणुकीच्या परिणाम स्वरूप महाराजांनी एक आदेशच काढलेला होता. तो पुढीलप्रमाणे – ‘जो महिलेस धरेल त्याचे हातपाय तोडा’. शिवराय यांच्यावर गरळ ओकणारे इतिहासकारदेखील याबाबत महाराजांचे कौतुकच करतात!
सुधारणावादी जिजाऊ
जिजाऊंच्या विचार व कार्यावर प्रकाश टाकताना आणखी एक मुद्दा प्रकर्षाने समोर येतो. तो असा की, १७व्या शतकात वावरतानादेखील त्या किती प्रगल्भ विचारांच्या होत्या. मात्र इतिहासलेखनात या त्यांच्या गुणाकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. १७व्या शतकातील एक महिला परिवर्तनवादी, बंडखोर विचार मांडते, त्यानुसार कृती करते, ही तत्कालीन इतिहासातील एक विलक्षण घटना म्हणावी लागेल. महाराजांनी आपल्या राजकीय आयुष्यात कधीही अंधश्रद्धाळू व प्रतिगामी विचारांना थारा दिला नाही. कधीही वास्तूशांत केली नाही अथवा सत्यनारायण घातला नाही. यामागे जिजाऊंच्या प्रगतशील विचारांची प्रेरणा होती. या संदर्भात दोन-तीन घटनांचा उहापोह करणे संयुक्तिक ठरेल.
पहिली अत्यंत महत्त्वाची घटना म्हणजे १६६४ मध्ये पती शहाजीराजे यांचा मृत्यू झाला. तत्कालीन अनिष्ट प्रथेप्रमाणे नवरा मृत्यू झाल्यानंतर स्त्रीने सती जाण्याची प्रथा होती. मात्र जिजाऊ सती गेल्या नाहीत. या संदर्भात मराठ्यांच्या इतिहासाचे एक अभ्यासक डॉ. एस. ए. बाहेकर लिहितात, “जिजाऊंनी कर्तव्यश्रेष्ठ समजून सती न जाता स्वतःला स्वराज्य निर्मितीच्या कार्यात गुंतवून घेतले.” ते पुढे लिहितात, “जिजाऊ बुद्धीनिष्ठ होत्या. अन्यथा त्यांनी सती प्रथेविरूद्ध बंड केलेच नसते. दुसरी घटना म्हणजे पुण्याचे पुनर्वसन करणारी आहे.”
मात्र जिजाऊंनी ही अंधश्रद्धा झुगारून देत पुण्याची पुनर्रचना केली. एवढेच नाही तर तिथे लाल महाल बांधला व वास्तव्य सुरू केले. तसेच कोणतेही मुहूर्त न पहाता कार्यास गेले पाहिजे, ही शिकवणदेखील त्यांनी महाराजांना दिली होती. तात्पर्य, बुद्धिनिष्ठ वर्तणूक व प्रयत्नवादाचा पुरस्कार ही जिजाऊंनी महाराजांना दिलेली देणगी होती. महाराजदेखील आयुष्यभर या विचाराशी एकनिष्ठ राहिले.
.................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
वडिलांचा आयुष्यात फार कमी संपर्क आलेल्या छत्रपती शिवरायांची मार्गदर्शिका, शिक्षिका व प्रेरणास्त्रोत केवळ आणि केवळ जिजाऊच होत्या, यात तीळमात्र शंका नाही. सेतू माधवराव पगडी म्हणतात, “आपल्या विख्यात पुत्राने आयुष्यभर चालविलेल्या संघर्षात जिजाबाई ही लाख मोलाची स्फूर्ती देणारी स्त्री होती. म्हणजे राजमाता जिजाऊंच्या अंगी काळाबरोबर धावण्याचे भान होते. शिवाय काळाच्या मर्यादा ओलांडून भविष्याचा वेध घेणारी प्रागतिक-परिवर्तनवादी दृष्टी होती हे अनेक घटनांवरून सिद्ध होते.”
आधुनिक युगात आपल्या माता-भगिनी दगडाला शेंदूर फासतात, नारळ, फुले वाहून आपला मेंदू गहाण टाकतात. अगदी सुशिक्षित महिलादेखील यात पुढे असतात. जिजाऊंनी असल्या अंधश्रद्धा कधी जोपासल्या नाहीत. स्वराज्याची खरी प्रेरणा असणाऱ्या जिजाऊंनी दोन छत्रपती घडवले. त्या वैज्ञानिक दृष्टी असणाऱ्या कर्तृत्ववान महिला होत्या. त्यांचा देवा-धर्मावर कधीच विश्वास नव्हता. त्या शिवरायांना नेहमी म्हणत – ‘‘हे बघ शिवबा, तुमच्या मदतीला कोणी देव येणार नाही. तुझी रयतच तुझ्या मदतीला येईल. पर्यायाने तुम्ही रयतेच्या कल्याणासाठीच स्वराज्य निर्माण केले पाहिजे व चालवले पाहिजे.”
एका सरदाराच्या घरात जन्माला आलेल्या १७व्या शतकातील महिलेने स्वराज्यासारखे अशक्यप्राय असलेले स्वप्न उराशी बाळगून त्या दिशेने दमदार वाटचाल करावी, ही थक्क करणारी गोष्ट आहे. एका सामर्थ्यवान सरदाराची पत्नी म्हणून जिजाऊंना अत्यंत विलासात जीवन जगता आले असते. त्या काळात तशी वहिवाटही होती. मात्र जिजाऊ त्याच रुळलेल्या, मळलेल्या वाटेने गेल्या नाहीत, तर स्वराज्यप्राप्तीचा खडतर मार्ग त्यांनी स्वीकारला. शिवरायांना सोबत घेऊन स्वराज्याची उभारणी केली. एवढेच नाही तर त्यांचा राज्याभिषेक झाल्यानंतरच आपली इहलोकाची यात्रा संपवली. अशा धाडसी, कर्तृत्ववान, स्वराज्य संकल्पिका राजमाता जिजाऊंना विनम्र अभिवादन!
..................................................................................................................................................................
लेखक व्ही. एल. एरंडे माजी प्राचार्य व राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत.
vlyerande@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Wed , 13 January 2021
व्ही. एल. एरंडे,
असल्या द्वेषपूर्ण व अनावश्यक वचनांमुळे लेखाची किंमत घसरली आहे.तुमचा लेख तसा ठीकठाक, फक्त ब्राह्मणद्वेष टाळायला हवा होता. तसंच शिवबाच्या बाबतीत महाभारत व रामायण यांच्याविषयी केलेले उल्लेख अनाठायी वाटतात. विशेषत: श्रीमंत कोकाटे यांचं उद्धृत केलेलं हे विधान फारंच तथ्यहीन आहे :
आपला नम्र,
-गामा पैलवान
Dilip Chirmuley
Wed , 13 January 2021
आजकालच्या समजुतीप्रमाणे या लेखात प्रा. एरंड्यांनी दादोजी कोंडदेवांचा उल्लेख कटाक्षाने टाळला आहे. यावरून त्यांचा ब्राह्मणद्वेष उघड होतो. अशा इतिहासकारावर किती विश्वास ठेवावा याचा विचार करणे जरूर ठरते.