“त्या दिवसांत माझं कुटुंब भीतीने ग्रासलं गेलं होतं आणि मला त्यांची चिंता वाटत होती. सतत फोनवर मला शिवीगाळ होत होती, जीवे मारण्याची धमकी येत होती. पाच वर्षं होऊन गेली त्या घटनेला, पण त्या दिवसांची आठवण आणि त्याचे व्रण माझ्या मनात आजही ताजे आहेत,” ३९ वर्षांचे सांगली तालुक्यातल्या विटा या शहरातले तरुण पत्रकार दत्ता खंडागळे तो प्रसंग आठवतात. त्यांना दोन लहानगी मुलं असल्याची पर्वा न करता शिव्यांची लाखोली वाहणारे फोन कॉल्स २१ दिवस तिन्ही त्रिकाळ येत राहिले.
२०१५च्या पूर्वार्धात सांगलीमध्ये एक उजवा गट आगळ्यावेगळ्या अशा मोहिमेवर निघू पाहत होता. छत्रपती शिवाजीमहाराजांची देवळे बांधण्याची ती मोहीम! शिवाजीमहाराज म्हणजे अखंड महाराष्ट्राचा आणि मुख्यत्वेकरून सांगली, पश्चिम महाराष्ट्राचा अत्युच्च आदर्श. खंडागळेंनी त्या कल्पनेचा विरोध करणारा एक संपादकीय लेख ‘वज्रधारी’ या साप्ताहिकात लिहिला होता. त्याविषयी खंडागळे सांगतात, “माझं म्हणणं मूलतः हे होतं की, शिवाजीमहाराज थोर होते, यात यत्किंचितही वाद नाही, पण त्यांना देव बनवू नका, त्यांना एक माणूसच राहू द्या. पण तो लेख त्या उजव्या गटाच्या पचनी पडला नाही.”
त्या लेखानंतर पुढचे तीन आठवडे खंडागळेंचा फोन वाजायचा थांबेना. त्यांना धमकी देणाऱ्या आणि शिव्यांची लाखोली वाहणाऱ्या असंख्य फोनमधला एक आवाज होता २० वर्षीय रोहित पाटील याचा. तो म्हणतो, “माझ्या त्या कृत्याचा मला अभिमान वाटत नाही. त्या संघटनेच्या प्रचार तंत्राने मला तेव्हा भुरळ घातली होती. माझ्यासारखे काही जण चिथवले गेले होते. माझं रूपांतर एका कट्टर, धर्मांध माणसात कधी झालं माझं मलाच कळलं नाही.”
खंडागळेंवर हल्ला करणारी ही संघटना आहे - ‘शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान’. ती दावा करते शिवाजीमहाराजांच्या तंत्राच्या प्रसाराचा. तिची स्थापना मनोहर उर्फ संभाजी भिडे (वय ८७) यांनी केली आहे. त्यांचा अनिष्ट प्रभाव राज्यभर आहे. शिवाय त्यांच्यावर भीमा कोरेगाव दंगल पेटवण्याचाही आरोप आहे. १ जानेवारी २०२१ रोजी या हिंसाचाराला तीन वर्षं झाली.
भीमा कोरेगाव संदर्भ
दर वर्षी १ जानेवारी रोजी पुण्यापासून ४० किमीवरील भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाजवळ ‘विजय दिवस’ साजरा करण्यासाठी दलित समाजाचे लोक हजारोंच्या संख्येने जमा होतात. १ जानेवारी १८१८ रोजी दुसरे बाजीराव पेशव्यांविरुद्ध झालेल्या युद्धात ब्रिटिश सैन्याच्या बाजूने मोठ्या प्रमाणात महार समाजाचे सैनिक लढले होते. ब्रिटिशांनी या युद्धात विजय मिळवला होता. ही घटना अस्पृश्यतेविरुद्ध लढणाऱ्या दलित चळवळीच्या इतिहासातला महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे दलित कार्यकर्ते मानतात. ब्रिटिशांच्या विजयाचा जल्लोश दलित समाज साजरा करतो. त्यामुळे २०१८ मध्ये द्विशताब्दीपूर्तीच्या निमित्ताने भीमा कोरेगावमध्ये हजारो नागरिक जमले होते. परंतु त्या वर्षी या जमावावर उच्चवर्णीय हिंदुत्ववादी गटांनी हिंसा माजवली, असा आरोप आहे.
दंगलीच्या दुसऱ्या दिवशी पुणेस्थित सामाजिक कार्यकर्त्या अनिता सावळे यांनी हिंसाचाराचे ‘सूत्रधार’ म्हणून मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्याविरोधात तक्रार नोंदवली. त्यांनी ‘firstpost’ला सांगितलं, “त्यांना तिथे प्रत्यक्ष असण्याची गरज नव्हती. हल्ला करणारा जमाव उघड उघड या दोघांच्या नावे घोषणा देत होता. मी तो हिंसाचार जवळून बघितला. आणि त्या सगळ्याची इत्तंभूत माहिती मी माझ्या तक्रारीत नोंदवली आहे.”
पुणे ग्रामीण पोलिसांनी एकबोटेंना अटक केली, पण काही महिन्यांत त्यांना जामीन मिळाला. मात्र भिडेंचे नाव एफआयआरमध्ये असूनही त्यांना आजतागायत चौकशीसाठी बोलावलेले नाही. फेब्रुवारी २०१८मध्ये पुणे पोलीस गुन्हे अन्वेषण विभागाची एक तुकडी सांगलीत येऊन धडकली. शिव प्रतिष्ठानचे सचिव आणि भिडे यांचा उजवा हात असलेले नितीन चौघुले सांगतात की, “ती तुकडी भिडेंना न भेटताच परतली. दंगलीच्या वेळी जयंत पाटील (राष्ट्रवादी नेते आणि विद्यमान कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र) यांच्या मातोश्रींच्या निधनानंतर त्यांची भेट घेत गुरुजी त्यांच्याबरोबर होते. पोलिसांनी गुरुजींना तसदी दिली नाही. ते मला भेटले आणि गुरुजींच्या सुरक्षारक्षकांची साक्ष घेतली.”
दलित कार्यकर्ते राहुल दंबळे म्हणतात, “कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या प्रतिनिधींकडून भिडे यांना ‘गुरुजी’ असं आदरयुक्त संबोधलं जातं, ही काही आश्चर्याची बाब नाही. त्यांचा राजकीय प्रभाव विविध पक्षांमध्ये पसरला आहे. विरोधी पक्षांत असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी भिडे यांच्याबद्दल आवाज उठवायचे. आज हे पक्ष गप्प का? विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी भिडे यांची जवळीक बहुज्ञात आहेच. खरी वस्तुस्थिती अशी आहे की, त्यांना अफाट समर्थन आहे. सांगली व काही प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रातील राजकारण आणि राज्यकर्ते त्यांच्या आज्ञेत आहेत. त्यांचा बचाव करण्यासाठी संपूर्ण तपासयंत्रणा रचली गेली आहे.”
महदाश्चर्य म्हणजे पुणेस्थित एक व्यावसायिक आणि भिडे यांचे दृढ चाहते तुषार दमगुडे यांनी नोंदवलेल्या एकमेव एफआयआरच्या अनुषंगाने भीमा कोरेगाव दंगलीचा तपास घडून आला आहे. दंगलीच्या आदल्या दिवशी दोन सेवानिवृत्त न्यायाधीश - बी. जी. कोळसे पाटील आणि पी. बी. सावंत यांनी ‘एल्गार परिषदे’च्या जाहीर सभेत भाषण केले होते. या सभेत हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्यांनी ‘आम्ही धर्मांध शक्तींना कधीही मत देणार नाही’ अशी शपथ घेतली होती. ही सभाच भीमा कोरेगाव दंगलीला जबाबदार असल्याचा दावा दमगुडेंच्या एफआयआरमध्ये आहे. पुणे शहर पोलीस आणि एनआयए यांनी या एफआयआरवर तातडीने कारवाई केली. मानवी हक्कासाठी लढणारे नामांकित वकील, विद्वान आणि कार्यकर्ते यांच्या घरांवर धाडी घालून त्यांना अटक केली. आत्तापर्यंत त्यांची संख्या १६वर गेली आहे. त्यांच्यावर हिंसाचाराचा, ‘अर्बन नक्षलवादी’ असल्याचा आणि थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप ठेवला.
भिडेंचा आजचा बेदरकारपणा हा राजकीय पक्षांनी सुरुवातीच्या काळात आपापल्या राजकीय फायद्यापोटी त्यांच्याकडे कानाडोळा केल्याचा परिणाम आहे. सांगली विभागात पूर्वी नेमणूक झालेल्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गोपनीयतेची हमी घेऊन मला सांगितले की, “अनेक ज्येष्ठ नेत्यांचे ‘भिडेंशी कठोर वागू नका’ अशा आशयाचे फोन यायचे. हा माणूस उपद्रवी आहे. ‘धर्मवेडा माथेफिरू’ असं त्यांचं वर्णन पोलिसांच्या गुप्त डायरीमध्ये नोंदलं गेलंय. पण त्यांना कायम राजकीय छत्रछाया लाभली आहे. मजेदार बाब अशी की, जे लोक ‘भिडेंशी मऊ वागा’ म्हणून सांगतात, ते बहुतांशी काँग्रेस-राष्ट्रवादीचे आहेत. त्यांना भिडे यांच्या बरोबरीने मंचावर वावरताना आम्ही पाहिलं आहे.”
भिडे यांच्या माथ्यावर राजकीय आश्रयाचा हात असल्याने नि:पक्षपणे कायद्याची अंमलबजावणी करणे कठीण झाले आहे. २००८मध्ये भिडे यांच्या कार्यकर्त्यांनी बळजबरीने ‘जोधा अकबर’ या चित्रपटाचं प्रदर्शन बंद पाडलं होतं. भिडे यांनी तिथे जमलेल्या जमावाला ‘हा चित्रपट म्हणजे इतिहासाचा विपर्यास आहे’ असं सांगून चिथवलं होतं. सध्याचे पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश हे त्या वेळेस सांगलीत पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहत होते. ते सांगतात, “जेव्हा आम्ही भिडे यांच्या काही अनुयायांना अटक केली, तेव्हा त्यांचे अंगरक्षक पोलीस ठाण्यात घुसले, तिथे नासधूस करत त्यांनी काही पोलीस अधिकाऱ्यांशी धक्काबुक्कीही केली. भिडे यांना अटक केल्यास शांतता आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होईल, असं माझ्या अधिकाऱ्यांनी मला तेव्हा सांगितलं होतं.”
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
सर्वसाधारणपणे उपलब्ध माहितीवर जोर दिल्यास भिडेंच्या प्रभावाची अतिशयोक्ती झाली आहे, असे म्हणता येणार नाही. २०१४ लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदींनी त्यांना ‘सर्वांत आदरणीय असे भिडे गुरुजी’ असे संबोधले होते. २०१६मध्ये देवेंद्र फडणवीस सत्तेत असताना महाराष्ट्र राज्य सरकारने भिडे यांची ‘पद्मश्री’साठी शिफारस केली होती, तर २०१८मध्ये त्यांच्या विरोधातल्या दंगलीच्या तीन केसेस रद्दबादल केल्या गेल्या. विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही २०१४च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आशीर्वादासाठी भिडे यांना पाचारण केलं होतं. चौघुले सांगतात, “प्रसारमाध्यमांतील सुरेश चव्हाणके (ज्यांच्यावर त्यांच्या अलीकडच्या ‘UPSC जिहाद’ या शो साठी सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले!) आमच्या अनेक कार्यक्रमांत प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी देत आले आहेत. भिडे यांची राजकीय जवळीक उजव्या पुराणमतवादी पक्षांपर्यंत सीमित नाही. आमच्या सभांना स्व.आर.आर.पाटील, पतंगराव कदम, प्रतीक पाटील असे अनेक नेते प्रमुख पाहुणे म्हणून आलेत. राज ठाकरेही आमच्याकडे येऊन गेलेत. शिवाजी आणि गुरुजींबद्दल प्रेम आणि आदरापोटी या सर्व नेत्यांनी नि:स्वार्थी भावाने आमच्या कार्यक्रमांना हजेरी लावली आहे.”
भिडे यांच्या उदयाचा जवळून अभ्यास केलेले सांगलीतील वरिष्ठ पत्रकार शिवराज काटकर सांगतात, “विरोधाभास असा की, भिडे यांनी सुरुवातीच्या काळात स्वत:ला शिवभक्त भासवून काँग्रेस-राष्ट्रवादीची छत्रछाया मिळवत भाजपच्या विचारसरणीचा प्रसार केला. १९९२ साली सांगलीत शिवाजीमहाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली. त्याचं रूपांतर एका गंभीर दंगलीमध्ये झालं. मुसलमानांची दुकानं पेटवून दिली गेली. एका मशिदीची मोडतोड झाली. पण बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की, सांगलीतले मुसलमान तसं काही करतील असं वाटत नाही. दंगल घडवून आणण्याची ही भिडे यांची योजना होती, अशा अफवा आहेत. तेव्हापासून शिव प्रतिष्ठानने सांगलीत जातीय तणावाच्या आगीची धग जिवंत ठेवली आहे. परंतु, २००९च्या विधानसभा निवडणुकीच्या सुमारास एक निर्णायक आघात बसला.”
खेळ सत्तेचा
सांगलीपासून १० किमीवरील मिरजमध्ये शिवसेना शहर प्रमुखाने एका चौकात शिवाजीमहाराजांनी अफझलखानाचा कोथळा काढतानाचे एक कमानी पोस्टर लावले होते. ते शहर प्रमुख विकास सूर्यवंशी आजही शिव प्रतिष्ठानसोबत आहेत. काटकर सांगतात, “तेव्हा सार्वजनिक गणेशोत्सव होता आणि काही लोकांनी रस्त्यावर उतरून त्या कमानीचा विरोध केला. दोन गटांमध्ये वातावरण तापलं होतं. तेवढ्यात एका मुस्लीम तरुणाने दगड फेकला, जो एका गणपतीच्या मूर्तीवर जाऊन धडकला. तिथून दंगलीचा भडका उडाला.”
मिरज दंगल घडवणाऱ्या यादीमध्ये राष्ट्रवादीचा पाठिंबा असलेल्या त्या वेळच्या महापौरांचा समावेश होता. पण असे म्हटले जाते की, आगीत तेल ओतण्याचे काम ज्यांनी केले त्यात भिडे होते. २००९ मध्ये शिव प्रतिष्ठानशी संलग्न असलेला एक कार्यकर्ता सांगतो, “माझ्या बऱ्याच सहकाऱ्यांना त्याने त्या दंगलीत भाग घेताना बघितलं होतं. त्या जमावाने मुसलमानांची पानपट्टीची दुकानं उदध्वस्त केली. मुस्लीम घरांवर दगडफेक केली. त्यांच्या गाड्यांची नासधूस केली. या हिंसाचारात भिडे यांच्या माणसांनी पुढाकार घेतला होता. त्या भागातील वातावरण तंग झालं होतं.”
या जातीय तणावाचा भाजपला आयताच लाभ झाला. त्याविषयी काटकर सांगतात, “२००९मध्ये सांगली, सातारा आणि कोल्हापूरमध्ये पक्षाला सात जागा मिळाल्या. तोपर्यंत त्या भागात भाजपच्या कुठल्याही पाऊलखुणा नव्हत्या. स्वत:च्या संघटनेचा पसारा वाढवताना, भिडे यांनी सांगली आणि पश्चिम महाराष्ट्रात भाजपला हातपाय पसरायला सुपीक पाया तयार करून दिला. आणि हे सर्व राज्यात बहुतांश काळ सत्तारूढ असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या डोळ्यांदेखत झालं. भिडे यांची वट इतक्या प्रमाणात वाढेल याचा त्यांना अंदाज आला नसावा. भिडे यांना पाठिंबा देणारे भाजपचेच मतदार आहेत हे आज सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ झालेलं आहे आणि भिडे त्यांच्याच विचारधारेला खतपाणी घालत आहेत.”
२०१९च्या अंती नागरिकत्व संशोधन कायदा आणि नागरिकत्व दुरुस्ती विधेयक यांच्या विरोधात जेव्हा देशव्यापी आंदोलनं पेटली (समीक्षकांच्या मते हा कायदा भारतातल्या मुस्लीम समाजाबद्दल दुजाभाव दाखवणारा आहे), तेव्हा भिडेंच्या संघटनेने या दोन कायद्यांच्या समर्थनार्थ एक भलीमोठी जाहीर सभा आयोजित केली होती. चौघुले सांगतात, “जेव्हा तुम्ही हॉटेलमध्ये जाता, तेव्हा तुम्हांला ओळखपत्र विचारलं जातं. मग नागरिकांना ओळखपत्र दाखवायला सांगायचा अधिकार देशाला का असू नये? देशात आलेल्या घुसखोरांना बाहेर फेकून दिलं पाहिजे. जे लोक या कायद्यांच्या विरोधात आंदोलनं करत आहेत, ते मुस्लीम समाजाला चिथवून या देशात असंतोष निर्माण करायचा कट रचत आहेत.”
शिव प्रतिष्ठानच्या समाजकार्याचा आढावा देत चौघुले सांगतात की, “संघटना ‘लव जिहाद’ प्रतिबंध कार्यातही अग्रगण्य आहे.” उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या दोन भाजपशासित राज्यांनी ‘लव्ह जिहाद’ अध्यादेश लागू केला. त्याला घटनात्मक वैधतेवरून अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिले गेले आहे. अभ्यासकांच्या मते भारतात कायदेशीररीत्या संपूर्ण वैध असणाऱ्या आंतरधर्मीय विवाहांवर हा अध्यादेश अंकुश घालतो. पण चौघुले ठाम दावा करत म्हणतात, ‘‘ही संकल्पना वास्तवात आहे, आम्ही बऱ्याच हिंदू मुलींची सुटका केली आहे.’’
शिव प्रतिष्ठानची जी ठोस विचारसरणी आज दिसते, ती पूर्वी निश्चितच नव्हती. भिडेंची प्राथमिक संकल्पना ही शिवाजीमहाराजांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार असल्यामुळे, प्रथमतः त्यांचे अनुयायी मराठा समाजातून होते. २००९ पर्यंत त्यातले बरेच काँग्रेस-राष्ट्रवादीचे मतदार होत. जेव्हा २००९च्या लोकसभा निवणुकीत काँग्रेसच्या जागेवर प्रतीक पाटील जिंकले, तेव्हा भिडेंच्या चाहत्यांनी त्यांचा प्रचार केला होता, जेणेकरून त्यांची निवडून येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात वाढली. सांगलीहून दोनदा खासदार म्हणून निवडून आलेले पाटील म्हणतात, “भिडेंवर निष्ठा असलेल्या जनसमुदायापायी कुठलाही राजकीय नेता त्यांना हात लावायचे धाडस करत नाही. त्यांचे भक्तगण आमचे संभाव्य मतदार होते. त्यांच्याशी वैर का घ्या?”
रचलं जनमानसाचं पाठबळ
शिव प्रतिष्ठानच्या लोकप्रियतेचे विचारल्यावर चौघुलेंनी स्वत:चा मोबाईल काढून फोटो गॅलरीमध्ये वरखाली सरकवत फोटो आणि व्हिडिओ दाखवण्यास सुरुवात केली. भिडेंच्या अलीकडच्या सभांमध्ये रस्त्यारस्त्यांतून अथांग जनसमुदाय लोटलेला दिसला. “सांगली आणि पश्चिम महाराष्ट्र जरी आमचा बालेकिल्ला असला तरी राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात आमचे लाखोंनी संपर्क आहेत. आमच्या अनुयायांपैकी ९० टक्के हे १४-४० या वयोगटातील आहेत. त्यात बहुतांश पुरुष आहेत. १९८५ साली गुरुजींनी ही संघटना स्थापल्यानंतरचा प्रवास खूप मोठा आहे.”
तत्पूर्वी उस्मानाबादमधील तुळजापूरच्या एका साधारण वकिलाच्या घरी जन्मलेले भिडे भाजपची पालक संस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. कृष्णप्रकाश सांगतात, “तत्कालीन आरएसएस मुख्य बाळासाहेब देवरस यांच्याशी शाब्दिक चकमक झाल्यानंतर भिडे तिथून बाहेर पडले, आणि त्याहीपेक्षा मोठी संस्था उभारण्याचा निर्धार त्यांनी केला.”
नवीन संस्था स्थापण्यास हिंदुत्ववादी नेत्यांचा वारसा लाभलेले सांगली शहर अत्युत्तम होते. ८०च्या दशकाच्या उत्तरार्धात वादग्रस्त ग्रंथकार बाबासाहेब पुरंदरे (यांनी अनेक वेळा शिवाजीमहाराजांचं चित्रण मुसलमानांचा विरोध करणारा राजा म्हणून केलं आहे) यांच्या ‘जाणता राजा’च्या खेळानंतर त्या सभेत भिडेंनी सर्वप्रथम हजेरी लावली.
पश्चिम महाराष्ट्रात शिवाजीमहाराजांचा लढवय्या राजा म्हणून लौकीक असल्यामुळे साहजिकच त्यांचा आधार घेत भिडेंनी त्यांच्या संघटनेचा तळ इथेच ठोकला. शिवाजीमहाराजांनी काबीज केलेल्या अनेक गड-किल्ल्यांवर भिडेंनी ९०च्या दशकातल्या पूर्वार्धात ट्रेक्सचं आयोजन करून, उत्साही मंडळींच्या झुंबडी नेण्यास सुरुवात केली. भिडेंशी एकनिष्ठ असणाऱ्या अनुयायांपैकी बहुतांश जणांची शिव प्रतिष्ठानच्या प्रवासाची सुरुवात या ट्रेक्समध्ये झाली आहे. चौघुले सांगतात, करोना महामारी सुरू व्हायच्या आधी आयोजलेल्या ट्रेकमध्ये १०,०००च्यावर समूह सहभागी झाला होता.
शिव प्रतिष्ठान सोबत १९९८-२००० या काळात असणारे विटा शहरातील वकील तानाजी जाधव सांगतात, “जेव्हा तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात वाढता, शिवाजीची गाणी-पोवाडे, कथा ऐकत ऐकत तुम्ही मोठे होता, तेव्हा प्रत्येक मुलाला शिवाजीने सर केलेले गड-किल्ले बघायचे असतात. या दृष्टीने ट्रेक्स ही एक भन्नाट कल्पना होती. वरवर बघता निर्धोक वाटणाऱ्या या ट्रेक्सना पालकमंडळी आपल्या मुलांना खुशीने पाठवत. आमची शारीरीक उठ-बैठक तर व्हायचीच, त्याबरोबर आम्हांला शिवाजीच्या गोष्टी ऐकायला मिळायच्या. ती एकप्रकारे सहलच असायची.”
प्रतीक पाटील म्हणाले, “पण त्यामागचा विस्तृत प्रकल्प हिदूंना एकत्रित करणं हा होता. सुरुवातीला ज्या लोकांची गर्दी जमवण्यात त्यांना यश मिळालं, ते मराठा समाजाचे होते. पण जेव्हा तुम्ही तरुण मुलांना गोळा करता, तेव्हा वेगवेगळ्या जातींमधला त्यांचा मित्रपरिवार सामील होत जातो. अशा प्रकारे त्यांनी त्यांचा पसारा हळूहळू वाढवला.”
हिंदूंना एकसंध करण्यास भिडेंना एका सर्वमान्य शत्रूची गरज होती. निवड सोपी होती. जे लोक भिडेंच्या ट्रेक्सना गेले आहेत ते सांगतात की, अनेकदा भिडे एका प्रमुख पाहुण्यास निमंत्रण द्यायचे, जे ट्रेकच्या शेवटी न चुकता घृणायुक्त भाषण ठोकायचे. इतिहास सांगण्याच्या निमित्ताने भिडे स्वत: बेधडकपणे मुस्लीमविरोधी वक्तव्य करायचे.
१९९५-२००२ या कालाधीत भिडेंबरोबर काम करणारे दत्ता खंडागळे सांगतात, “शिवाजीमहाराजांच्या जीवनातील तीन कथा वारंवार सांगण्यात एकच गुप्त योजना असू शकते. भिडे पुन्हा पुन्हा हे सांगत की, शिवाजीने अफझलखानाचा वध कसा केला, त्यांनी शाहिस्तेखानाची बोटं कशी छाटली, आणि औरंगजेबाने शिवाजीचा पुत्र, संभाजीला कसे छळले. या सर्वांमध्ये एक सुप्त लपलेलं कथानक असं की, मुघल हे मुसलमान होते आणि तेच खलनायक होय. संस्करणीय वयात याची मात्रा अचूक लागू पडते.”
विचारधारेचं शक्तिप्रदर्शन
दर वर्षी शिव प्रतिष्ठान सांगलीमध्ये मार्च महिन्याच्या सुमारास ‘बलिदान मास’ पाळते. खंडागळे सांगतात, “या काळात भिडेंची धर्मांध भाषणं नेहमीच्या मानाने वरच्या स्तरातली असतात. औरंगजेबाने संभाजीवर पाशवी अत्याचार करून शेवटी जीवे मारलं, तो हा महिना आणि त्याचं स्मरण करणारा हा कालावधी होय. भिडेंचे समर्थक या काळात सुतक पाळतात. साधं अन्न प्राशन करतात. संपूर्ण महिनाभर कोणीही गोडधोड किंवा मांस-मच्छी खात नाहीत. या महिन्यात भिडे अनेक भाषणांमधून संभाजीने तब्बल ४० दिवस औरंगजेबाने केलेले अत्याचार सहन केल्याचं वर्णन करत, हिंदू धर्माच्या रक्षणासाठी संभाजीने कशी आपल्या प्राणांची आहुती दिली असे सांगून त्यांना श्रद्धांजली वाहतात. औरंगजेब म्हणजे मुस्लीम आणि आपण शिवभक्त, म्हणून तोच आज आपला शत्रू आहे - या सर्व कथेचा हा एकमेव मतितार्थ असतो.”
शिव प्रतिष्ठानने आयोजलेल्या अशाच एका कार्यक्रमात प्रकाशना निमंत्रण आलं, त्या वेळेस ते सांगलीचे पोलीस अधीक्षक होते. ते आपला स्वानुभव सांगतात, “मी त्यांच्या आमंत्रणाचा स्वीकार केला. त्या जिल्ह्यात मी तेव्हा नवीन होतो. काही क्षणांतच त्या कायक्रमाचं रूपांतर इतिहासाचं विरुपण करून धार्मिक विसंवाद पसरवण्यात झालं. हे असलं मी चालून देणार नाही असं म्हणत मी लागलीच हस्तक्षेप घेतला. पण मंचावर भिडेगुरुजींव्यतिरिक्त कोणालाही बोलायची परवानगी नसून, मोठमोठ्या राजकीय नेत्यांपासून कुठल्याच प्रमुख पाहुण्याने आत्तापर्यंत आमच्या भाषणांमध्ये ढवळाढवळ केलेली नाही असं मला सांगितलं गेलं. मी दुसऱ्या दिवशी त्यांना नोटीस पाठवली. त्यानंतर मी देवळात चप्पल घालून प्रवेश केला, असा त्यांनी माझ्याबद्दल खोटा प्रचार करवला. जिथं जिथं मी काम केलंय, तिथं तिथं जातीय एकोपा वाढावा म्हणून मी झटलो आहे. जो वैरभाव मी सांगलीमध्ये अनुभवला, तो इतर कुठेही नाही.”
वरकरणी भिडेंनी जरी मोठ्या प्रमाणात हिंदूंना एकसंध करायचे काम केले असले, तरी ज्यांनी त्यांचे जवळून निरीक्षण केले आहे ते सांगतात, संस्थेच्या अंतर्गत कार्यपद्धतीत जातीयवाद पुरेपूर ठासून भरला आहे. तरुणपणी प्रतीक पाटीलही भिडेंच्या गटाने आयोजलेल्या अनेक ट्रेक्सना गेले होते. ते सांगतात, “भिडेंचा व्यवहार एका ब्राह्मणाच्या पोराशी आणि मराठ्याशी भिन्न असतो. परीक्षा जवळ असली तर ते मराठ्याच्या पोराला अभ्यास बुडवून ट्रेकमध्ये सामील व्हायला भाग पाडत, परंतु ब्राह्मणाला ही सक्ती नसायची. ब्राह्मण विद्वान, तर मराठे लढवय्ये समजले जायचे.”
शिव प्रतिष्ठानचा दलित कार्यकर्ता एकदा आजारी पडला, तेव्हा भिडे त्याला भेटायला गेले होते. रोहीत पाटील त्यांच्याबरोबरच होता. तो सांगतो, “भिडेंनी त्या कार्यकर्त्याच्या घरी ‘उपास’ आहे, असं सांगून अन्नाला हात लावला नाही. मात्र त्यानंतर काही तासांत त्यांना एका ब्राह्मण कार्यकर्त्याच्या घरी सहभोजन घेताना मी पाहिलं.”
त्याच घटनेनंतर रोहीतच्या मनात भिडेंबद्दल अस्वस्थता निर्माण झाली. “मी १७ वर्षांचा होतो, तेव्हा शिवाजीमहाराजांचं आकर्षण मला शिव प्रतिष्ठानमध्ये घेऊन आलं. व्यक्तिमत्त्व घडण्याचं वय ते माझं. पण जेव्हा भिडेंचा कट्टर जातीय भेदभाव बघितला, तेव्हा विचार केला की, काहीतरी चुकतंय. नंतर जेव्हा मी खंडागळेना फोनवर धमक्या दिल्या, ते माझ्यासाठी एक वरदानच ठरलं.”
खंडागळेंनी रोहीत विरुद्ध पोलिसांत तक्रार नोंदवली होती. जेव्हा रोहीतने माफी मागितली, तेव्हा खंडागळेंनी तक्रार मागे घेऊन तो शिवभक्तीचा मुखवटा घालून कुठलं दुष्कृत्य करत होता, याची समज दिली. रोहीत म्हणतो, “त्यांनी माझे डोळे उघडले आणि मी त्या सभांना जाणं बंदच करून टाकलं.”
तानाजी जाधवसाठी प्रचितीचा क्षण तेव्हा आला, जेव्हा भिडेंनी महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणीवर टीका केली. त्याविषयी ते सांगतात, “भिडे आम्हांला म्हणायचे, ‘ते थोर आहेत. पण त्यांना विसरा आणि फक्त शिवाजी स्मरणात ठेवा.’ माझ्या मनात विचार आला ‘हे नाहीतर ते’ असं का बरं? आमच्यापैकी जे कुणी त्यांच्या कचाट्यातून बाहेर पडले ते नशीबवान. आम्हाला शहाणी समजूतदार माणसं भेटली, ज्यांनी भिडेंचा अंतस्थ हेतू ओळखण्यास आम्हांला मदत केली. पण आमची संख्या नगण्य आहे. बहुतांश लोक भिडेंच्या साध्या राहणीमानाने त्यांच्या खेचले जातात.”
एक प्रयत्नपूर्वक घडवलेली प्रतिमा
सांगलीत गावभाग परिसरात एका शांत गल्लीमध्ये असलेल्या दोन मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर एका छोट्या खोलीवजा घरात भिडे राहतात. त्या खोलीत ना कुठलं फर्निचर, ना पलंग… साधा पंखाही नाही. जमिनीवर एक पातळ चादर पसरलेली असते, आजूबाजूला पुस्तकं आणि वर्तमानपत्रांचा ढीग रचलेला असतो. तळमजल्यावर भिंतीला टेकवून ठेवलेली त्यांच्या संस्थेइतकीच जुनी दिसणारी सायकल भिडे बाजारात जाण्यासाठी वापरतात.
मार्च २०२०मध्ये चौघुले बरोबर असताना मी जेव्हा भिडेंना भेटलो, तेव्हा ते बाजारात निघाले होते. पांढरा कुडता आणि धोतर अशा वेशात, माझ्या प्रश्नांना अगदी मोजक्या शब्दांत उत्तरं देत भिडे म्हणाले, “चौघुलेचा शब्द माझाच धरून चाला. माझं जीवन मी शिवाजीमहाराजांना समर्पित केलं आहे.” असं म्हणत ते सायकलवर स्वार झाले. त्यांच्या पाठोपाठ त्यांचे काही अंगरक्षक होते.
चौघुले सांगू लागले, “गुरुजी मांस-मच्छी तर सोडाच, चहा-कॉफी, बिस्किटही घेत नाहीत. बाहेरगावी प्रवास करण्यास ते सार्वजनिक वाहतूक वापरतात. ते कधी चप्पल घालत नाहीत.”
‘मातृभूमीला लाथ लागू द्यायची नाही म्हणून ते चप्पल घालायचं नाकारतात’ अशी कथा भिडेंच्या अनुयायांमध्ये प्रचलित आहे. सांगलीत त्यांच्याबद्दल अशा अनेक कहाण्या ऐकायला मिळतात, जाणीपूर्वक साकारलेल्या प्रतिमेचाच हा एक भाग. ते आण्विक भौतिकशास्त्राचे सुवर्णपदक विजेते आहेत किंवा थोर व इष्ट प्राध्यापक होते, या असंख्य आख्यायकांपैकी काही.
पाटकर सांगतात, “यातल्या कुठल्याच कथेला ठोस पुरावा नाही. पण याच गोष्टी भोळ्या लोकांना भुरळ पाडून त्यांना आकर्षित करतात. या वयातही भिडे बैठका, सूर्यनमस्कार इत्यादी व्यायाम करतात, ट्रेक्समध्ये सहभागी होतात. दरवर्षी दुर्गामाता दौड काढण्यात येते. त्यात ते स्वत: हजेरी लावतात. हजारो तरुण या दौडीमध्ये शिवरायांचे नामस्मरण करत सहभागी होतात. बलिदानाची उत्तुंग भावना निर्माण व्हावी, हे या उपक्रमाचं प्रयोजन. त्यात भिडे अग्रणी राहून लोकांचं चित्त वेधण्यात यश मिळवतात.”
प्रकाश सांगतात, ‘‘हे सर्व जरी खरं असलं तरीही, साधेपणाचे जीवन त्यांना ‘संत’ बनवू शकत नाही. जेव्हा लोक त्यांच्या सानिध्यात राहतात, तेव्हा त्यांच्यावर भिडेंचा प्रभाव पडतोच!”
विध्वंसक ताकद
सुमारे २५ वर्षांपूवी प्रतीक पाटील भिडेंच्या एका ट्रेकमध्ये सहभागी झाले होते. “आम्ही गगनगड, कोल्हापूरला गेलो होतो. गडाच्या कड्यावर एक मशिदीसारखं दिसणारं देऊळ होतं, हिरव्या रंगाचं. लागलीच त्यांचे काही धारकरी म्हणाले की, हे पाडलं पाहिजे. मी त्यांना थांबवायचा प्रयत्न केला, पण त्यांनी देवळावर दगडफेक सुरू केली. आमच्यातल्या काहीजणांनी ती वास्तु पुनःस्थापित करण्यास प्रयत्न केला. पण मी तो ट्रक अर्ध्यावर सोडून परतलो.”
रोहित म्हणतो, “त्या ट्रेकमध्ये काय घडलं असेल याची मी कल्पना करू शकतो. शिव प्रतिष्ठान सोबत घालवलेल्या तीन वर्षांच्या काळात मी कायम उत्तेजित अन् संतप्त असायचो. भिडे त्यांच्या भाषणांमध्ये हिदूंना वारंवार नपुंसक, गुलाम आणि कुचकामी म्हणायचे. जर हिंदू खऱ्या अर्थाने एकसंध होतील, तर त्या मशिदीवरचा भोगा दिसणार नाही, असं ते सांगायचे. आमच्यातली बरीच पोरं शेतकरी, कामगार कुटुंबातील होती, गरिबीशी संघर्ष करणारी. आम्हांला मदतीचा हात देण्याचं ढोंग ते वठवायचे. पण आम्हां सर्व तरुण मुलांना त्यांनी घृणास्पद बनवलं. आमच्या आयुष्यांचा सत्यानाश केला.”
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
एक कार्यकर्ता २० वर्षांपूर्वी शिव प्रतिष्ठानचा मध्ये होता. तो आजही पस्तावतो. त्याने रागाच्या भरात सांगलीतील इदगाह भगव्यात रंगवला होता. गोपनीयतेची ग्वाही घेत तो मला स्पष्टीकरण देतो, “भिडेंनी मला तसं करायला सांगितलं नव्हतं. पण जेव्हा तुम्ही धर्मांध लोकांबरोबर राहता, तुम्ही ही धमापिसाट होता.”
हा कार्यकर्ता त्या वेळेस पकडला गेला, त्याच्यावर केस ठोकली गेली. त्या दिवसांची आठवण काढत गहिरवरतो. अनावर झालेले अश्रू सावरत तो पुढे सांगतो, “माझं घराणं शेतकरी वर्गातलं. कुटुंबाने माझ्यावर बहिष्कार टाकला. तेव्हा सांगलीतील एका मुस्लीम कुटुंबाने - जेव्हा त्यांना कळलं की, मला माझ्या कृत्याचा खरोखर पश्चाताप झालाय - मला पुन्हा पायांवर उभं राहायला मदत केली.”
खंडागळे म्हणतात, “भिडेंचा हाच अचूक प्रभाव लोकांवर आहे. मलाही मुसलमान अतिरेकीच वाटायचे. एकदा मी भिडेंना विचारलं होतं की, हिंदूंवरचा संभाव्य धोका पाहता आम्हांला शस्त्र शिक्षण मिळू शकेल का. त्यांनी उत्तर दिलं, तुला खरंच हवं असेल तर आम्ही त्याची व्यवस्था करू शकतो.”
सांगलीमध्ये काम केलेले एक वरिष्ठ पोलीस अधिकारी शिव प्रतिष्ठानची कार्यप्रणाली सनातन संस्थेशी समांतर असल्याचे सांगतात. डॉ. नरेंद्र दाभोलकर, एम.एम. कलबुर्गी, कॉ. गोविंद पानसरे आणि गौरी लंकेश यांच्या हत्यांचा आरोप या संस्थेवर आहे. सनातनप्रमाणेच इथल्या सामान्य कार्यकर्त्यांना, अगदी वरच्या पातळीवर काय कारस्थाने शिजतात, याची सुतरामही कल्पना नसते. गोपनीयतेची ग्वाही घेत त्यांनी पुढे सांगायला सुरुवात केली, “सांगलीत भिडे सनातन संस्थेच्या नेत्यांना अनेक वेळा भेटले होते. त्यांचा माग काढत आम्ही त्यांच्या कामांवर लक्ष ठेवून होतो.”
एवढ्या मोठ्या प्रमाणावर अनेक कार्यक्रम राबवण्याकरता संस्थेला साधनसंपत्ती लागत असणारच. यावर चौघुले सांगतात, “भिडेंच्या ‘अत्यल्प गरजांची’ काळजी त्यांचे शिवपाईक आणि धारकरी घेतात, पण सांगलीतल्या पत्रकारांच्या मते त्या भागातील व्यापारी आणि व्यावसायिक त्यांना निधी पुरवतात.” गुप्ततेची ग्वाही घेत एक समालोचक माहिती देतात, “सांगलीमध्ये मोठा प्रमाणात हळदीचा व्यापार आहे. इकडचे व्यापारी गर्भश्रीमंत आहेत. ते नियमितपणे त्यांना देणग्या देतात. भिडे जे करतात त्याला हिंदूंमध्ये बऱ्याच प्रमाणात मान्यता आहे.”
या सर्वांचा आढावा घेता खंडागळे म्हणाले, “अखंड कार्यशीलता, निष्ठा आणि समर्पित वृत्ती यांसाठी खचितच भिडे कौतुकास पात्र ठरतात. त्यांची विचारधारा पुढे नेण्यात त्यांनी जीवन समर्पित केलं आहे. समस्या अशी की, ती विचारधाराच विनाशकारी आहे.”
मराठी अनुवाद - कीर्ती देवळेकर
..................................................................................................................................................................
हा मूळ इंग्रजी वृत्तलेख ‘Firstpost’ या पोर्टलवर २६ डिसेंबर २०२० रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा -
..................................................................................................................................................................
लेखक पार्थ एम. एन. मुक्त पत्रकार आहेत.
parth.mn13@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Mon , 11 January 2021
पार्थ एम एन यांना पूज्य संभाजी भिडे यांच्यावर दाखल नसलेले गुन्हे दिसतात. न्यायालयाने सनातन संस्थेला आरोपी मानायला नकार दिलेला असूनही पार्थ एम एन यांना तिच्यावर कुठल्याशा हत्यांचे आरोप दिसतात. पण सांगलीत दंगल भडकावणारा आणि पोलिसी वॉरंट निघालेला रावाकाँग्रेस नेता मैनुद्दीन बागवान दिसंत नाही. पोलिसांच्या जीपवर पाकिस्तानी झेंडा फडकावून थयथया नाचणारा शहीद बेपारी दिसंत नाही. कृष्णप्रकाश वरनं आठवलं की २०१२ साली ऑगस्ट महिन्यात मुंबईत रझा अकादमीने मुस्लिमांची दंगल घडवली होती तेव्हा हाच कृष्णप्रकाश नावाचा पोलीस अधिकारी दंगलपूर्व सभेत व्यासपीठावर होता.
एकंदरीत पार्थ एम एन या माणसाला चोर सोडून संन्याशाला फासावर लटकवण्यात जास्त रस आहे. सामान्य लोकांच्या भाषेत अशांना दहशतवादी म्हणतात.
-गामा पैलवान