२०२० हे वर्ष आपल्यासाठी ‘Annus Horribilis’ होते, पण २०२१ हे वर्ष ‘Annus Mirabilis’ ठरावे!
पडघम - सांस्कृतिक
हर्षवर्धन निमखेडकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 11 January 2021
  • पडघम सांस्कृतिक हर्षवर्धन निमखेडकर Harshawardhan Nimkhedkar शब्दांचे वेध Annus Mirabilis स्मरणीय Annus Horribilis भयावह

शब्दांचे वेध : पुष्प एकविसावे

वाचकहो, नमस्कार. २०२१ या नूतन आंग्ल वर्षात आपले स्वागत. गेले सबंध वर्ष संपूर्ण मानवतेसाठी अत्यंत त्रासदायक आणि एखाद्या वाईट स्वप्नासारखे ठरले, हे नव्याने सांगायला नकोच. त्यामुळे हे नवीन वर्ष सर्वांसाठी आनंददायी ठरो, या शुभचिंतनाला खरोखरच अर्थ प्राप्त झाला आहे.

ही प्रार्थना म्हणजे निव्वळ तोंडदेखली, कोरडी औपचारिकता नसून आपण एकमेकांना मनापासून दिलेल्या सदिच्छा आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजीतून ‘Happy new year’ म्हणून झाल्यावर तुम्हाला हीच गोष्ट जर लॅटिन भाषेतही सांगायची असेल तर तुम्ही ‘२०२१ हे वर्ष सर्वांसाठी ‘अ‌ॅनस मरॅबलस’ ठरो’ असेही म्हणू शकता.

‘अ‌ॅनस मरॅबलस’ (annus mirabilis) याचा अर्थ एक अत्यंत चांगले, स्मरणीय, उत्तमोत्तम घटनांनी गाजलेले वर्ष. लॅटिनमध्ये ‘annus’ म्हणजे वर्ष, तर ‘mirabilis’ म्हणजे wonderful, miraculous, amazing. इंग्रजीत ‘अ‌ॅनस मरॅबलस’ या शब्दप्रयोगाचा वापर Thomas Dekker टॉमस डेकर याने १६०३ साली लिहिलेल्या आपल्या ‘The Wonderful Year’ या पत्रकात सर्वप्रथम केला असे मानले जाते. त्यानंतर १६६६ मध्ये २३वर्षीय आयझॅक न्यूटन यांनी लावलेल्या अनेक महत्त्वपूर्ण आणि क्रांतिकारी वैज्ञानिक शोधांमुळे त्या वर्षाला ‘annus mirabilis’ असे संबोधले जाऊ लागले. १६६५-६६ ही दोन वर्षे इंग्रजांसाठी फार महत्त्वाची ठरली. डच नेव्हीला हरवून त्यांनी मिळवलेला सागरी विजय आणि न्यूटनचे विलक्षण संशोधन हे त्यातले आनंदाचे क्षण होते, तर देशभर पसरलेली भयानक प्लेगची साथ आणि त्यातच लंडन शहरात लागलेल्या महाभयंकर आगीमुळे झालेला विध्वंस हे दुःखाचे प्रसंग होते. जॉन ड्रायडेन या कवीने या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर १६६७ मध्ये ‘Annus Mirabilis’ ही कविता लिहून त्यात त्या सुखद क्षणांसाठी आणि प्लेग येऊनही आणि आग लागूनही त्यांत सारे लंडन शहर किंवा इंग्लंड नष्ट झाले नाही, यासाठीसुद्धा देवाचे आभार मानले. पुढे हळूहळू ‘Annus Mirabilis’ हा वाक्प्रचार इंग्रजी भाषेत रूढ होत गेला. २०२१ हे वर्ष सर्वांसाठी असेच ‘Annus Mirabilis’ ठरावे अशी आपण आशा करू या.

‘Annus Mirabilis’ म्हणजे उत्तम वर्ष --तर वाईट वर्ष म्हणजे काय? २०२०चे वर्णन तुम्ही कसे कराल? त्यासाठी आणखी एक लॅटिन वाक्प्रचार आहे – ‘अ‌ॅनस हॉरिबलस’ (annus horribilis). ‘Horribilis’ म्हणजे भयंकर, वाईट, भयावह. यातूनच पुढे १३००च्या आसपास लॅटिनमधून फ्रेंच भाषेमार्गे इंग्रजीत हॉरिबल या शब्दाचा प्रवेश झाला. इंग्रजीत ‘annus horribilis’ (Terrible/horrible Year)चा पहिला वापर करण्याचे श्रेय जाते तिथल्या अँग्लिकन (प्रोटेस्टंट) चर्चकडे. रोमन कॅथलिक पंथाचे जगदगुरू म्हणजे सर्वोच्च धर्माधिकारी पोप हे ‘infallible’ आहेत, म्हणजे ते कधीच चूक करू शकत नाहीत, अशा अर्थाचा एक ‘dogma’ (म्हणजे विशिष्ठ शिकवण, ठाम, आग्रही स्वरूपाचा धार्मिक मतप्रवाह) रोमन कॅथलिक चर्चने १८७० मध्ये प्रचारात आणला. याला ‘the dogma of papal infallibility’ असे म्हटले जाते.

हे मान्य नसल्यामुळे याला १८९१ मध्ये प्रत्युत्तर देताना रोमन कॅथलिक चर्चची विरोधी असलेल्या अँग्लिकन चर्चने १८७० हे वर्ष धार्मिकदृष्ट्या ‘अ‌ॅनस हॉरिबलस’ असल्याचे प्रतिपादन केले. त्यानंतर २४ नोव्हेंबर १९९२ रोजी आपल्या राज्याभिषेकाच्या ४०व्या वर्धापनदिनी केलेल्या भाषणात ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी १९९२ हे वर्ष त्यांच्या राजघराण्यासाठी ‘अ‌ॅनस हॉरिबलस’ ठरले असल्याचे जाहीर केले.

या एकाच वर्षात राणीच्या परिवारात एकानंतर एक आठ अप्रिय घटना घडल्या होत्या, त्या संदर्भात हे वक्तव्य होते. (हे भाषण झाल्यावर पुढच्याच महिन्यात म्हणजे डिसेंबर १९९२ मध्ये आणखी एक (नववी) अप्रिय घटनादेखील तिथे घडली. ती म्हणजे युवराज चार्ल्स आणि युवराज्ञी डायाना या दोघांचा विवाह मोडकळीस निघाला - ते वेगवेगळे राहू लागले.) त्यामुळे ते वर्ष राणीसाठी ‘annus horribilis’ होते, हे अगदी खरे. राणीच्या भाषणामुळे ‘annus horribilis’ हा शब्दप्रयोग पुन्हा प्रकाशात आला.

‘Annus’ या शब्दाचे स्पेलिंग आणि उच्चार नीट लक्षात ठेवायला हवा. नाहीतर प्रचंड घोटाळा होऊ शकतो. वर्ष या अर्थाने वापरला जाणारा शब्द ‘Annus’ असून त्यात दोन n आहेत आणि त्याचा उच्चार होतो ‘अ‌ॅनस’. दोन ऐवजी जर एकच n वापरला तर शब्दाचा अर्थ आणि उच्चारही बदलतो. ‘एनस’ (Anus) म्हणजे गुदद्वार. मलविसर्जनासाठी सजीव प्राण्यांच्या शरीरांत निसर्गाने जे छिद्र करून ठेवलेले आहे त्याला इंग्रजीत ‘Anus’ म्हणतात. Anus हाही एक लॅटिन शब्द असून तो फ्रेंच भाषेच्या माध्यमातून १६५८च्या आसपास इंग्रजीत शिरला. मात्र त्याचे मूळ ‘Proto-Indo-European’ या प्राचीन भाषेतल्या ‘hehno’ या धातूत सापडते. याचा अर्थ रिंग (ring) किंवा वलयाकार असलेली कडी. यातूनच पुढे गेंडूळ आणि जळू यासारख्या सजीवांची (वलयांकृत कृमींची) गणना प्राणीशास्त्रज्ञ ज्या विभागात किंवा ‘phylum’मध्ये करतात. त्याचे नाव ‘Annelida’ असे ठेवण्यात आले. या नावात मात्र दोन n आहेत.

या आधीच्या परिच्छेदात मी युवराज्ञी डायानाचा उल्लेख ‘डायाना’ असा केला, हे तुमच्या लक्षात आले असेलच. कारण तोच खरा उच्चार आहे. भारतीय लोक उगीचच ‘डायना डायना’ करतात. या ‘डायना’मुळे मग मला हिंदीतले ‘डायन’ नावाचे स्त्री पिशाच्च आठवते. त्यामुळे मी आवर्जून ‘डायाना’ असेच म्हणतो, लिहितो. युवराज्ञी डायाना एक अतिशय चांगली आणि देखणी महिला होती. सासू आणि नवऱ्याशी तिचे पटले नाही म्हणून लगेच काही ती ‘डायन’ नाही होऊ शकत.

कोणत्याही भाषेतल्या शब्दांचे उच्चार शक्यतो बिनचूक आणि तंतोतंत करता आले पाहिजेत. भाषाप्रेमींनी तर ही काळजी घ्यायलाच हवी. अगदीच नाही जमले तर बात वेगळी. पण ‘डायाना’ हा काही खूप कठिण उच्चार आहे, असे मला वाटत नाही. ‘डायाना’ हा शब्द मूळचा जुन्या लॅटिनमधला असून तिथे त्याचा शिरकाव प्रोटो इंडो युरोपिअन या अती प्राचीन भाषेतून झाला. या शब्दाचा अर्थ आहे ‘स्वर्गीय’ किंवा ‘दैवी शक्ती असलेली व्यक्ती’. 

आपल्या संस्कृत भाषेत याच्याशी मिळताजुळता एक शब्द आहे, तो म्हणजे ‘दिव्य’. थोडक्यात ‘डायाना’ म्हणजे ‘दिव्या’. ग्रीक आणि रोमन पुराणांमध्ये ‘डायाना’ हे एका देवीचे नाव होते आणि ती वन, जंगल, शिकार, आणि अपत्यजन्म यांची अधिष्ठात्री देवता होती. युरोपातल्या अनेक देशांत आणि अमेरिकेसह अन्यत्र मुलीचे नाव ‘डायाना’ ठेवण्याची फॅशन अजूनही आहे. फ्रेंच लोक तिला ‘Diane’ म्हणतात. अगदी फारसी किंवा पर्शियन भाषेतही ‘डायाना’चा उल्लेख सापडतो. भरभरून सहाय्य करणारा/री आणि उत्तम आरोग्याची ग्वाही देणारा/री (देव)दूत असा तिथे या शब्दाचा अर्थ होतो.

तर २०२१मध्ये अशा या देवदूत डायानाने आपल्या सर्वांना भरभरून सुख आणि उत्तम आरोग्य द्यावे अशी तिला आपण विनंती करू या. आपण काही ग्रीक, रोमन, किंवा पर्शियन नाही आहोत, हे मला माहीत आहे, पण त्याने काय फरक पडतो?

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

शब्दांचे काय होते?

शब्दांना जीवन असते का? तोंडी शब्द अल्प काळाने हवेत विरून जातो. (त्याचे रेकॉर्डिंग केले तरी ते त्या मूळ ध्वनीची प्रतिमा बनते; रेकॉर्ड केलेला शब्द मूळ ध्वनी नसतो.) लेखी शब्दाला तो ज्याच्यावर लिहिला आहे ते साधन अस्तित्वात असेपर्यंत जीवन असते - जे कैक शतकांचेही असू शकते. पण एकदा का ते साधन (पुस्तक, भूर्जपत्र, साधा कागद, काही पण) नष्ट झाले की त्याच्यावर लिहिलेला शब्दही नाहिसा होऊन जातो. पण हे खरेच खरे आहे का?

 Emily Dickinson (एमिली डिकिन्सन) म्हणते -

A word is dead when it is said

Some say –

I say it just begins to live

That day.                                           

या महाविलक्षण अमेरिकन कवयित्रीच्या सर्वच कविता मला आवडतात. त्यातल्या काही खूप आवडतात, काही खूप खूप तर काही खूप खूप खूपच्याही पलीकडे आवडतात. १८६२ साली लिहिलेली तिची ही लघुकविता या तिसऱ्या प्रकारातली आहे. फक्त १९ शब्दांच्या या कवितेत तिने शेवटच्या सात शब्दांत शब्दांवर जे सखोल, आशयघन वक्तव्य केले आहे, त्याला तोड नाही. अत्यंत उच्च प्रतीचे, अनुपमेय असे हे लिखाण आहे. शब्द आणि भाषांवर आजवर अनेकांनी अनेकदा अनेक प्रकारे लिहिले आहे. त्यातल्या सार्वकालिक सर्वोत्तम अशा पाच भाष्यांमध्ये या कवितेचा समावेश व्हायला हवा, असे माझे वैयक्तिक मत आहे.

शब्दांचे काय होते, हा तात्त्विक प्रश्न अनेकांना पडला असतो. आपापल्या वकुबानुसार लोकांनी त्याचे उत्तरही दिलेले आहे. या सर्व उत्तरांतले सर्वश्रेष्ठ उत्तर आमच्या एमिलीचे आहे. “शब्द उच्चारला/कागदावर उमटला की तो मरण पावतो, असे काही जण म्हणतात. पण मला तर असे वाटते की त्याचे जीवन त्या क्षणी सुरू होते...” म्हणजेच मौखिक अथवा लेखी शब्दांना एक प्रकारचे अमरत्व त्यावेळी मिळते. विलय पावतो, नष्ट होतो, मरतो तो ध्वनी. पण त्या ध्वनीतून व्यक्त झालेला शब्द हा ऐकणाऱ्याच्या कानांतून त्याच्या मेंदूत शिरतो आणि तिथे तो कायमची वस्ती करून राहतो. ऐकणारा मरण पावला तरी त्याच्यासोबत तो शब्द संपून जात नाही.

‘एमिली’ या नावाचा अर्थ उद्यमशील असा होतो. मुळात लॅटिनमधल्या ‘Aemilia’ या नावाचे हे आंग्ल रूप आहे. बोलीभाषेतल्या इंग्रजीत एमिली म्हणजे एक अत्यंत गुणी, सभ्य, शांत, भिडस्त, लाजाळू, हसरी अशी मुलगी. एमिली डिकिन्सन‌्मध्ये यातले जवळपास सगळेच गुण होते. ती इतकी कमालीची भिडस्त आणि एकांतप्रिय होती की तिच्या मृत्यूनंतरच जगाला तिच्या काव्याचा परिचय झाला. कवितालेखन आणि काही निवडक मित्र-मैत्रिणींशी पत्रव्यवहार हेच तिचे आयुष्य होते.

हिगिनसन् नावाच्या मित्राला ऑगस्ट १८७६ मध्ये लिहिलेल्या एका पत्रात ती म्हणते, “A Pen has so many inflections and a Voice but one”. मौखिक शब्दांपेक्षा लेखी शब्दांना जास्त आयाम, कंगोरे, पैलू असतात, असे तिला यातून सुचवायचे आहे.

खरे म्हणजे कोणतीही भाषा नेहमीकरता कधीच स्थिर नसते. ती ना वृद्धिंगत होते, ना तिचा ऱ्हास होतो. भाषांचे स्वरूप समुद्राच्या भरतीसारखे असते, असे प्रसिद्ध भाषाविद डेविड क्रिस्टल म्हणतो. सागरी भरती रोज फक्त रूप आणि जागा बदलते. आज ती कालच्या भरतीपेक्षा वाईटही नसते आणि उद्याच्या भरतीपेक्षा चांगलीही नसते. मंगळवारी भरतीने समुद्रकिनाऱ्याच्या एका भागाला जास्त ओले केले, बुधवारी ती हेच दुसऱ्या कोपऱ्यात करेल, एवढेच. शब्द येतात आणि जातात; त्यांचे अर्थ बदलतात; आज प्रचारात असलेले शब्द उद्या अडगळीत फेकले जातात तर परवा ते विस्मृतीत जातात; व्याकरणाचे नियम बदलतात; शब्दांचे उच्चारही आजच्यापेक्षा वेगळ्या प्रकारे केले जाऊ शकतात; शुद्धलेखनाचे किंवा स्पेलिंगचे निकषही बदलतात. यामुळे जगबुडी झाली असे होत नाही. सनातनी कट्टर भाषाविदांना यामुळे दुःख होणे स्वाभाविक आहे, पण हा निसर्गाचा नियम आहे.

माणसाप्रमाणेच त्याची भाषाही गतीमान, प्रवाही असते, तिने तसे असायलाच हवे. अन्यथा ती डोडो पक्षासारखी अस्तंगत होऊन जाईल. हा static विरुद्ध dynamic असा लढा आहे. भाषेने नदीसारखे प्रवाही असावे लागते. तरच ती अनंत काळापर्यंत जिवंत राहू शकते. इंग्रजीभाषिकांनी हे ‘गुह्यतमम् शात्रम्’ केव्हाचेच जाणले होते

त्यामुळेच आज जगातल्या सर्व भाषांमध्ये ती पहिल्या क्रमांकावर आहे. कवी चॉसरची इंग्रजी, शेक्सपिअरची इंग्रजी, गेल्या शतकातली फाऊलर बंधूंची इंग्रजी, आणि आज मोबाईल फोनवर संदेश पाठवण्यासाठी वापरली जाणारी इंग्रजी, यात प्रचंड प्रमाणात तफावत आहे. मूळ ‘ढाचा’ किंवा स्ट्रक्चर/सांगाडा तोच आहे, पण बाकी बरेच काही बदलले आहे. भारतीय राज्यघटनेविषयी बोलताना आपल्या सर्वोच्च न्यायालयाने सरकारला जसे खडे बोल सुनावले होते की, राज्यघटनेच्या अंतर्गत स्वरूपात तुम्ही काय हवा तो बदल करा, पण तुम्हाला तिच्या मूळ सांगाड्याला हात लावता येणार नाही, हे अगदी तसेच आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

इंग्रजी भाषेचा मूळ सांगाडा कसा आहे, माहीत आहे? त्यात आहेत फक्त ४४ प्रकारचे वेगवेगळे ध्वनी, फक्त २६ अक्षरे, फक्त २४ विविध विरामचिन्हे, शब्द तयार करण्यासाठी असलेले एक हजारापेक्षा कमी मूळ धातू, आणि वाक्यरचना करण्यासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या सुमारे तीन हजार पद्धती; झाले! That's all. आणि या सर्वांच्या मदतीला येतात इंग्रजी भाषेत आजच्या घटकेला असलेले किमान दहा ते अकरा लाख शब्द. उपरोक्त मूळ सांगाड्याच्या वरती आणि आतही या दशलक्ष शब्दांचा गिलावा करून, सजावट करून आपण इंग्रजी भाषेचे आजचे वैभवी स्वरूप बघत असतो.

त्यामुळे व्यथित होऊ नका. एखादा शब्द अडगळीत गेला आहे असे वाटले तरी आणि मोबाईल फोनवरच्या आधुनिक ‘टेक्स्टिज्’ इंग्रजीलेखन पद्धतीमुळे भाषेची वाट लागली आहे किंवा तिची वाताहत झाली आहे असे वाटत असले तरीही घाबरू नका. समर्थ रामदास स्वामींचे शब्द नेहमी ध्यानात ठेवा -

धीरधरा धीरधरा तकवा।

हडबडू गडबडू नका।

काळ देखोनि वर्तावे।

सांडावे भय पोटिचे॥

त्यामुळे उपरोक्त सर्व मर्यादांच्या परिघात राहून पुन्हा एकदा एमिलीचे शब्द उदधृत करावेसे वाटतात -

A word is dead when it is said

Some say –

I say it just begins to live

That day.

..................................................................................................................................................................

लेखक हर्षवर्धन निमखेडकर वकील आहेत. वुडहाऊसचे अभ्यासकही.

the.blitheringest.idiot@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......