‘माणूस ते मशीन’ असा उलटा प्रवास टाळायचा असेल तर ‘भावना’ समजून घ्या...
पडघम - तंत्रनामा
डॉ. वृषाली रामदास राऊत
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 11 January 2021
  • पडघम तंत्रनामा डोनाल्ड ट्रम्प Donald Trump एआय Al कृत्रिम बुद्धिमत्ता Artificial intelligence Amygdala भीती Anxiety भावना Emotion

८ जानेवारी २०२१ची सकाळ अवघ्या जगाला २०२१चा सगळ्यात पहिला व मोठा धक्का देऊन गेली. जगातील सगळ्यात बलाढ्य लोकशाही असलेल्या अमेरिकेत ४५वे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी अमेरिकी संसदेत घातलेला हिंसक धुडगूस बघून जगातील लोकांची जी प्रतिक्रिया होती, त्यात धक्का, आश्चर्य, सुप्त मत्सर व आनंद अशा सगळ्या भावना होत्या. ट्रम्प समर्थकांनी जे केले, त्याला ‘Amygdala Hijack’ असे वैज्ञानिक नाव आहे. या प्रकारात (Amygdala, Insula) भावनिक मेंदू संपूर्ण मेंदूचा ताबा घेतो आणि neocortex म्हणजे तार्किक मेंदूचे काही चालत नाही. त्यातून जी कृती घडते, ती पूर्णत: survival instinct म्हणजे अस्तित्वाची लढाई असते... जी कुठल्याही प्रकारची असू शकते (भावनिक, शारीरिक, राजकीय किंवा सामाजिक).

आपण आपला श्वास रोखू शकतो, पण भावना रोखू शकत नाही, कारण त्या अनैच्छिक असतात. भावनिक मेंदू ही उत्क्रांतीची देणगी असून मानवी मेंदूतील हा भाग केवळ जंगल, पर्वत व पाण्यात मानवी अस्तित्व टिकवण्यासाठी विकसित झाला आहे. आपला तार्किक मेंदू हा फार नंतर तयार झाला. म्हणजे सुरुवातीला पक्षी व प्राणी यांच्यासारखे आपणसुद्धा ‘भक्ष्य शोधणे व स्वत: भक्ष्य न बनणे’ यासाठी भावनिक मेंदूचा वापर करायचो, मात्र तार्किक मेंदूच्या विकासानंतर आपण सगळ्या प्राणी-जगतात श्रेष्ठ ठरलो, जगावर राज्य करायला लागलो.

भावनिक मेंदूचे कार्य समजून घेताना आपल्याला भीती ही मूलभूत भावना समजून घ्यावी लागेल, कारण भीतीची शरीराला जाणीव करून देणे, हे amygdalaचे सगळ्यात महत्त्वाचे कार्य आहे. Amygdala हे शरीराचे panic button आहे, जे आजूबाजूच्या वातावरणात असलेले सर्व प्रकारचे धोके (शारीरिक व मानसिक) स्कॅन करत असते आणि कुठला धोका आढळल्यास ते लगेच शरीरातील वेगवेगळ्या अवयवांना सिग्नल देते की, धोका आहे, लढायला सज्ज रहा. त्यामुळे शरीर सतर्क होऊन fight/flight/freeze स्थितीत जाते. त्यात रक्तदाब तसेच रक्तातील साखर वाढते, रक्तपुरवठा पाय व खांदे अशा मोठ्या स्नायूंकडे जातो आणि इतर अवयवांना जसे पचन-क्रिया, प्रजनन, लैंगिक अवयव, झोप या गोष्टी कमी महत्त्वाच्या होऊन फक्त समोर असलेला धोका टाळून परिस्थिती पूर्ववत करणे, हा एकच उद्देश उरतो.

मानवी शरीर हे वाघ पाठीमागे लागल्यास किंवा एखादी भीतीदायक आठवण आल्यास सारख्याच पद्धतीने वागते. भावनिक मेंदूला शारीरिक व मानसिक भीती यातील फरक कळत नाही. आपण असा ताण केवळ भीतीदायक गोष्टीच्या कल्पना करूनसुद्धा अनुभवू शकतो, म्हणून चिंता ही चितेपर्यंत नेऊ शकते. याच कारणाने वर्षानुवर्षे कुठल्याही प्रकारचा ताण अनुभवलेले लोक हे रक्तदाब, रक्तातील साखर, प्रजनन संस्थेचे विकार अनुभवतात.

Neocortex म्हणजेच तार्किक मेंदू हा मानवी मेंदूत मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO/Chief Executive officer) आहे, जो विवेकाने काम करतो. त्यात आलेल्या सिग्नलची शहानिशा करून शांतपणे योग्य निर्णय घेणे आणि भावनेच्या लाटेवर स्वार न होता तर्क वापरून काम करणे, या गोष्टी येतात.

आता हे सिग्नल कुठून येतात? आपल्या पंचेद्रियांद्वारे येणारी माहिती वि‍जेच्या वेगाने मेंदूत शिरते, पण उत्क्रांतीच्या रचनेनुसार ही माहिती आधी भावनिक मेंदूकडे जाते आणि तिथे धोक्याची तीव्रता तपासली जाते. त्यानुसार आपली तत्काळ प्रतिक्रिया येते. ही माहिती अगदी काही वेळाने तार्किक मेंदूकडे जाते आणि तिथे साप की दोरी हे मेंदूला कळते.

ही प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट, गुंतागुंतीची असून वि‍जेच्या वेगाने ती होते. यात Hippocampus हे स्मरणशक्तीचे केंद्रही तेवढ्याच वेगाने कार्य करते. एखादी घटना घडताना भावनिक मेंदू व hippocampus त्याची आठवण जतन करतात. त्यामुळे आपल्यासमोर एखादे जुने छायाचित्र आले तर ते आपल्या मावसबहि‍णीचे आहे, हे hippocampus सांगते आणि ती आपल्याला आवडत नाही, हे Amygdalaला भावनिक आठवण करून देते. त्यामुळेच आवडत्या व्यक्तीचा आवाज/चेहरा आपल्या भावनिक मेंदूला प्रकाशित करतो आणि आपली कळी खुलते. हे सगळे अत्यंत वेगाने आपल्या नकळत सतत घडत असते.

हे बघा

आपल्या आयुष्यातील असंख्य आठवणी व त्यांची भावनिक किमत यावर ग्राहकाचे मानसशास्त्र खुबीने काम करून आपल्याला नको असलेल्या अनेक गोष्टी विनाकारण गरजा निर्माण करून विकत असते.

उदा., मला ९०च्या दशकातील हिंदी गाणी फार प्रिय आहेत, कारण ती गाणी मा‍झ्या टीनएजच्या आठवणी परत जाग्या करतात. त्यामुळे कुठलेही ऑनलाइन संगीताचे अॅप मला ९०ची गाणी सतत समोर दाखवते. कारण ती गाणी मी आधी वारंवार ऐकलेली असतात, तसेच मा‍झ्या वयाची व इतर माहिती त्यांच्याकडे उपलब्ध असते.

१०० भावनांपेक्षा जास्त भावना मानवी मन अनुभवते, ज्या तीव्रतेनुसार बदलतात, पण आनंद, भीती, राग, घृणा, दुख व आश्चर्य या मूलभूत सहा भावना आहेत. कूरकूरमध्ये रागाची सगळ्यात कमी तीव्रता असते व हिंसेत रागाची तीव्रता सगळ्यात जास्त असते. काही भावना ज्या पूर्वी अस्तित्वात होत्या, ज्या आता नाहीत, तसेच बर्‍यापैकी संपूर्ण जगात मूलभूत भावनांचे हावभाव सारखेच आहेत.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

प्रेम ही मानवी जीवनातील सगळ्यात महत्त्वाची भावना आहे. ती प्रत्येक नात्यात वेगवेगळी व्यक्त होते. प्रेम ही भावना एकटी नसून त्यात लोभ, माया, आकर्षण, लैंगिक सुख, आनंद, असूया, ईर्ष्या, हक्क, काळजी, सुरक्षितपणा, जबाबदारी, करुणा, दया, सहसंवेदना, त्याग, निष्ठा, संशय, राग व अगदी सूड या भावनासुद्धा येतात.

संशोधन सांगते की, दोन प्रेमात असणाऱ्या व्यक्तीच्या हृदयाचे ठोके हे synchronizationमध्ये असतात. त्यांच्यात सुसंवाद असतो. सहसंवेदना असलेले प्रेम भावनिक सुरक्षितता देते, ज्यात वासना सर्वस्व नसते, ताण व चिंता कमी होऊन झोप चांगली लागते. Dopamine, Serotonin व endorphin ही रसायने मेंदूत स्त्रवल्याने मेंदू शांतता अनुभवतो. प्रेमाचा स्पर्श हा ‘जादू की झप्पी’ असते. आईची मिठी/प्रेमाचा स्पर्श लहान बाळाची प्रतिकार शक्ती वाढवतात, तर आईचा रक्तदाब या स्पर्शाने कंट्रोलमध्ये राहतो.

डॉ. फहाद बशीर (Fahad Basheer) यांच्या मते- “well-meaning kiss can cause vasodilatation, it drops blood pressure, headache stops as it acts as a booster due to release of serotonin & oxytocin peptides.”

आपल्या भावनिक मेंदूत असलेल्या आदिम भावना- ज्यात हिंसा, भीती व लैंगिक सुख ज्याचा सिग्मंड फ्राइड या मानसशास्त्रज्ञाने मानवी वर्तणुकीचे कारण सांगण्यासाठी उपयोग केला होता, त्या फ्राइडच्या भाच्याने म्हणजे एरिक बरनेजने ‘प्रोपगंडा’ची रचना करून अगदी युद्ध, देशभक्ती, स्त्रियांना सिगरेट किंवा सकाळची न्याहारीचे महत्त्व आणि अशा अनेक गोष्टी जगाला विकण्यासाठी बखुबीने केला.

याच आदिम भावनांचा वापर इंटरनेटवर असंख्य वस्तू व अनुभव विकण्यासाठी केला जात आहे. मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. उत्क्रांतीच्या सिद्धान्तानुसार आपला मेंदू प्रत्यक्ष समोर दिसत असलेल्या व्यक्तीच्या हालचाली, हावभाव व आवाज अशा अशाब्दिक संकेतानुसारच संवाद साधू शकतो, कारण आपल्या मेंदूला याच गोष्टी कळतात, असेच प्रोग्रॅमिंग आपल्या मेंदूत आहे. मनुष्य/प्राणी यांच्याशी आपण जेव्हा प्रत्यक्ष संवाद साधतो, तेव्हा आपल्यात एक भावनिक सर्किट तयार होते, आपण एकमेकांचे अशाब्दिक संकेत स्मरणात ठेवून त्यानुसार नाते पुढे न्यायचे/नाही, कसे न्यायचे हे ठरवतो.

हीच मेंदूची सवय गेली शेकडो वर्षे आहे, पण गेल्या काही वर्षांत आलेल्या समाजमाध्यमांनी आपल्या मेंदूतील मूळ साच्याला पूर्णपणे धक्का लावलेला आहे. त्याचा परिणाम आपल्याला वाढलेला मानसिक ताण, दुभंगलेली नाती, गुन्हे, जात/धर्मद्वेष व एकटेपणा यात दिसतोय. 

समाजमाध्यमांवर संवाद साधताना आपले मेंदूतील नैसर्गिक social circuit active नसते. त्यामुळेच जे काही बंध निर्माण होतात, ते कुचकामी, भावनेचा ओलावा नसणारे असतात. समाजमाध्यमांमुळे लोक आत्मकेंद्री झाले आहेत. आपला तार्किक मेंदू हा आभासी जगात काम करत नाही, म्हणजे आपला तार्किक मेंदू हा आपण ‘ऑनलाइन’ असताना ‘ऑफलाइन’ असतो. मेंदूतील Executive function/neocortex cortex कुठल्याही भावनिक लाटेला - जी amygdala या आपल्या भावनेचे केंद्र असलेल्या भागातून येते - तात्पुरते थोपवून risk vs reward जोखून त्यावर कृती करायची की नाही, हे ठरवते.

Neocortex cortex हा भाग आपल्या साधारणपणे २५ वर्षे वयापर्यंत विकसित होत नाही. हा भाग विकसित होणे हे बऱ्यापैकी जडणघडणीवर अवलंबून असते. गुन्हेगारीकडे वळलेल्या व्यक्तीमध्ये impulse control नसल्याने ‘आली लहर केला कहर’ अशा स्वरूपाचे तीव्र बदल होतात. त्यांचा मेंदू त्यांच्या कृतीतून होणाऱ्या परिणामाची जाणीव करून देण्यात अयशस्वी असतो. सगळे मोहात टाकणारे खोटे असूनही आपण तर्कात कमीच पडतो आणि त्याचे हळूहळू व्यसन लागते.

जोसेफ लेदौक्स (Joseph LeDoux) यांचे नाव भावनांच्या संशोधनासाठी मोठ्या आदराने घेतले जाते. न्यू यॉर्क विद्यापीठात काम करताना त्यांनी पहिल्यांदा भावेनचे केंद्र Amygdalaचे अनन्यसाधारण महत्त्व शास्त्रीयदृष्ट्‍या पट‍वून दिले. भावनिक मेंदू हा तार्किक मेंदूवर कसा कुरघोडी करतो आणि ही जरी मानवाचा जीव वाचवण्याची व्यवस्था असली तरी सध्याच्या काळात जेव्हा आजूबाजूला वाघ-सिंह नसतात, त्या वेळेस अशा व्यवस्थेचे दुष्परिणामसुद्धा आहेत, कारण अश्मयुग/पाषाण युगाप्रमाणे आपल्याला शारीरिक धोके अत्यंत कमी असून मानसिक धोके जास्त आहेत.

Amygdala हा किती महत्त्वाचा आहे, हे समजण्यासाठी हे एक उदाहरण पुरेसे आहे. एका तरुण व्यक्तीचा amygdala हा भाग फेफरे कमी व्हावेत म्हणून शस्त्रक्रियेने काढल्यावर त्याने जवळच्या लोकांना ओळखले नाही आणि त्याच्या भावना, संवेदना संपूर्णपणे नाहीशा झाल्या, म्हणजे तो यंत्रवत मनुष्य झाला!

भावना चेहर्‍यावरील हावभाव व शारीरिक हालचाली यातून व्यक्त होतात, म्हणूनच शारीरिक बोलीला सामाजिक वीण विण्यात व ती घट्ट करण्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. पॉल एकमन यांचे ‘चेहर्‍यावरील हावभाव’ या विषयातील काम जगभर विख्यात आहे. आपल्या शास्त्रीय नृत्य-प्रकारात नवरस शिकवले जातात. त्यात प्रमुख नऊ मानवी भावनांना चेहरा व मुद्रा यांचा वापर करून कसे व्यक्त करावे - ज्याला भरतमुनींच्या नाट्यशास्त्रात अभिनय असे म्हणतात म्हणजे योग्य भावना या हावभाव व शब्द ज्यात गाण्यातील हरकती, चढ-उतार येतात वापरून कशा व्यक्त करायच्या - ही ६४ कलांपैकी एक कला आहे. तिचा वापर करून ‘ध’चा ‘मा’ कसा करता येतो, हे आपण सगळेच अनुभवत आहोत.

डॅनियल गोलेमन यांनी भावनिक बुद्ध्यांक हा तार्किकबुद्धी इतकाच, किंबहुना त्याहून किंचित सरस कसा आहे, हे त्यांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या थेअरीनुसार भावनिक साक्षर असणारी व्यक्ती स्वत:च्या भावना नीट ओळखते आणि तिच्या आजूबाजूच्या व्यक्तींच्या भावनासुद्धा नीट समजून त्यानुसार वागते. अशी व्यक्ती खूप हुशार नसली तरी भावनिकदृष्ट्‍या सक्षम असते.

हे बघा -

Self-awarenessमध्ये स्वत:च्या भावना ओळखून त्याला नाव देणे, त्या नीट पद्धतीने व्यक्त करणे, त्यांची कारणे समजून घेणे, कठीण व नकारात्मक भावना नीट हाताळणे, स्वत: त्रास न करून घेणे, जबाबदारी घेणे इत्यादि आणि सामाजिक बुद्धी (social intelligence)मध्ये नाती तयार करणे व त्या योग्यरित्या निभावणे येते. दिलेला शब्द व वेळ पाळणे, दुसर्‍याचे ऐकून घेणे, दुसरी बाजू समजून फक्त हेकेखोरपणा न करणे, प्रेरणा, दुसर्‍याला मदत करणे, सहसंवेदना जागृत ठेवणे, कारण त्याशिवाय कनेक्ट शक्यच नाही, या काही गोष्टी येतात.

भावनिक साक्षर पण सहसंवेदनेचा अभाव असणारी व्यक्ती अनेक वेळा चतुरपणे या साक्षरतेचा वापर स्वत:च्या फायद्यासाठी करून घेते. विकृत, खूनी, हुकूमशहा, अति-यशस्वी व्यावसायिक, धूर्त राजकारणी, मार्केटिंग, सेल्स, जाहिरात या सगळ्या प्रकारचे लोक या सदरात मोडतात. यांना लोकांचा स्वत:च्या फायद्यासाठी वापर कसा करायचा याचा अचूक अंदाज असतो. काही समाजात विशेषकरून व्यावसायिक समाजात भावनांना अगदीच कमी महत्त्व असते आणि लोकांचा वापर वस्तू म्हणून केला जातो. कारण भावना उपयोगाच्या नाहीत, असा समज असतो, याउलट शेतकरी व क्षत्रिय समाजातील लोक भावनांना महत्त्व देतात.

‘Cambridge Analytica’ या कंपनीने अशाच प्रकारे लोकभावनेचा वापर करून डोनाल्ड ट्रम्प यांना जिंकून आणले होते. चित्र, शब्द व आवाज यांचा बेमालूम वापर करून भावनिक मेंदूला आव्हान द्यायचे, सतत तीच माहिती स्क्रीनवर आपल्या समोर येईल याची सोय करायची, जेणेकरून तार्किक मेंदूला विचार करायला वेळ मिळणार नाही आणि एक प्रकारे आभासी जगात मेंदू गुंग होऊन विचार शक्ती संपते. अशा मेंदूला मग काहीही विकणे सोपे जाते.

व्यसन हेसुद्धा भावना नीट न हाताळल्याचे लक्षण आहे. दारू/सिगरेटच्या आहारी गेलेल्या व्यक्तींमध्ये चिंता व ताण सहन करण्याची क्षमता कमी प्रमाणात आढळून येते. त्यांना सुरुवातीच्या जडणघडणीच्या काळात योग्य त्या सकारात्मक भावना अनुभवायला न मिळाल्याने व्यसने सुरू होतात. व्यसन ही सवय नसून एक भावनिक आजार आहे, ज्यात नात्यातून आधार मिळाली नाही तर व्यसनाची ओढ लागते. ‘उडता पंजाब’, ‘शराबी’ या सिनेमांतील गाणी जरा आठवून बघा.

सध्या सोशल मीडियाच्या आहारी गेल्याने सामाजिक वीण फाटण्याच्या मार्गावर आहे, कारण त्याच्या वापराने स्पर्धा व ईर्ष्या निर्माण होऊन इतरांबद्दल सहानुभूती, करुणा व माया कमी होते. अशा लोकांमध्ये टोकाचा आत्मकेंद्रितपणा वाढला आहे. टीव्हीवर येणारी स्प्लिटविला, रोडीस, बिग बॉस व अशा असंख्य मालिकांमध्ये केवळ भडक व नकारार्थी भावनाचे उदात्तीकरण होत आहे.

24X7 दाखवल्या जाणाऱ्या बातम्या आणि समाजमाध्यमे ही anxiety disorder असणाऱ्या व्यक्तींसाठी कर्दनकाळ आहे. माध्यमांद्वारे दाखवली जाणारी हिंसा व विकृती बघून अनेकांना चिंतेचा आजार (anxiety) होतो. जग ही भयानक जागा असून सगळीकडे धोकादायक वातावरण पसरले आहे, असा समज व्हायला लागतो. यातून आपल्या मेंदूचे जे काही प्रोग्रामिंग केले जाते, त्यामुळे भीतीची भावना वाढीस लागून समाजात अविश्वास तयार होतोय. खासकरून आपल्या जातीची/धर्माची नसणारी व्यक्ती ही वाईट, धोकादायक आहे, हे आपल्या मनात रुजवण्याचा काही लोक आटोकाट प्रयत्न करत आहेत.

कुठल्यातरी घटनेचा व्हिडिओ किंवा विश्लेषण अशा पद्धतीने करायचे की, त्यातून भीती निर्माण होईल, लोक चिंता करत बसतील आणि त्याच वेळेस दुसरी बातमी आधीच्या बातमीशी सुसंगत अशी आणून भीतीचा बागुलबुवा निर्माण करण्यात येत आहे. यात तार्किक मेंदूचा वापर कुठेच दिसत नाही, बातमी/घटना जशी समोर आणली गेली, तशीच ती आहे का, याचा तार्किक विचार करण्याचा अवधी न मिळाल्याने चिंतेचे प्रमाण वाढले आहे. करोनाने त्यात मोठी भर घातली आहे.

समाजमाध्यमे व चिंता यांचा जवळचा संबंध आहे. समाजमाध्यमांच्या वापरामुळे चिंता आणखीनच वाढते, हे संशोधनात आढळून आले आहे.

हा लेख बघा - Anxiety and Social Media Use

स्त्री-पुरुष यांच्या भावनिक क्षमतेत विशेष फरक नसल्याचे संशोधन सांगते, मात्र पुरुष केवळ आपण कमी पडू म्हणून भावना व्यक्त करत नाहीत, याउलट स्त्रियांनी भावनिक होणे हे चांगले मानतात. म्हणूनच स्त्रियांमध्ये हृदयविकारचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत कमी आढळून येते, कारण रडून मन मोकळे होते.

आपण सगळे inner focus व outer focus अशा दोन पद्धतींचा वापर करतो. Inner focus मनातील भावना, आयुष्यातील मूल्ये व चांगली निर्णयक्षमता या कामी येतो, तर outer focus बाहेरच्या जगाशी संबंध जोडण्यास व टिकवण्यास कामी येतो. मात्र इंटरनेटच्या अतिवापराने inner focus खूपच खालावतो. सतत ऑनलाईन राहिल्याने आपल्या शरीर व मनातून येणारी स्पंदने लक्षात येत नाहीत. भूक व झोप यांसारख्या शारीरिक क्रियांवर परिणाम होऊन अति व नको ते खाणे, अपुरी झोप अशा गोष्टी वजन वाढण्यास कारणीभूत ठरतात. डोळ्यांवर ताण, सतत बैठक, बोट/मनगट दुखणे, हे आजार जडतात. चिडचिड, अधिरपणा, चंचलता वाढीस लागून एकाग्रचित होणे कमी/बंद होते. सतत नवीन बघण्याची (novelty seeking)ची सवय लागून मेंदूवर cognitive load वाढतो, ज्याचा थेट परिणाम कार्यक्षमतेवर होतो. त्यामुळे कामात/अभ्यासात लक्ष न लागणे, हिंसक/गुन्हेगारी वृत्ती वाढते. सतत आभासी जगात राहिल्याने ‘अशाब्दिक भाषा’ (non-verbal clues) -  जो मानवी संवादाचा गाभा आहे  – विसरली जाते व नाती तुटतात.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

अशा सर्वव्यापी भावनांना कसे हाताळावे?

भावनिक साक्षरता वाढवता येते. त्यात भावनिक रोजनिशी लिहिणे, भावनांना नाव देणे, त्या जाणवताना शरीरात काय बदल होतात, हे लक्षपूर्वक नोंद करणे आणि वर सांगितल्याप्रमाणे नाती हाताळताना काही गोष्टी जाणीवपूर्वक करणे फायद्याचे ठरते. Amygdalaला शांत ठेवण्यासाठी व्यायाम हा शास्त्रीय व स्वस्त असा उपाय आहे. तो नियमित केल्यास फरक जाणवतो. झोप भावनेवर थेट प्रभाव टाकते. स्वप्ने थेरपीसारखे काम करतात. याउलट झोप नीट नसल्यास वर सांगितल्याप्रमाणे भावनांची लय बिघडते.

‘AI’ नावाच्या एका चित्रपटात एका रोबोटमध्ये भावना कशा निर्माण होतात, याचे सुंदर चित्रण आहे. म्हणजे भावना ही आपल्यातल्या माणूसकीची खूण आहे. त्यामुळे माणूस ते मशीन असा उलटा प्रवास टाळायचा असेल तर भावना समजून घ्या.

..................................................................................................................................................................

लेखिका डॉ. वृषाली रामदास राऊत विश्वकर्मा विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक आहेत.

vrushali31@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......