गणेश मतकरींचं कथात्म लेखन जुनाट संकल्पना आणि जुनाट मांडणीला छेद देणारं आहे, मुख्य म्हणजे ते ‘उत्तरआधुनिक’ आहे!
पडघम - साहित्यिक
अक्षय शेलार
  • गणेश मतकरी आणि त्यांच्या तीन पुस्तकांची मुखपृष्ठे
  • Thu , 07 January 2021
  • पडघम साहित्यिक गणेश मतकरी Ganesh Matkari खिडक्या अर्ध्या उघड्या Khidkya Ardhya Ughdya इन्स्टॉलेशन्स Installations (कदाचित) इमॅजिनरी Kadachit Imaginary

प्रख्यात नाटककार विजय तेंडुलकरांनी नाटककार व कथाकार मनस्विनी लता रवींद्रच्या ‘सिगारेट्स-अलविदा’ या नाटकांच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली होती. ज्यात ते समकालीन लेखनाबाबत तक्रार करत म्हणतात, “नावं काही पाहायला जावं तर, माझ्या अतिपरिचयाचे आयुष्य, त्याचे तेच तसेच नाटकीकारण, त्याच रचलेल्या नाट्यपूर्ण घटना, तीच इतर नाटकांतून नको तेव्ही पाहिलेली तकलादू पात्रे, तसाच एक क्लायमॅक्स आणि पूर्वी ऐकलेले वाटावे असे नाटकी संवाद पाहायला मिळतात.”

ही तक्रार तशी मराठी नाटकांबाबत असली तरी थोड्याफार फरकानं मराठी साहित्यालाही लागू पडेल अशी आहे. कारण अनेकदा समकालीन मराठी साहित्यातही जुनाट संकल्पना आणि त्यांची तितकीच जुनाट तऱ्हेची मांडणी पाहायला मिळते. त्यामुळे नवं काहीतरी वाचण्याच्या इच्छेची पूर्ती होत नाही. त्यासाठी इंग्रजी साहित्याकडे वळावं लागतं. मनस्विनीसारखे लेखक मात्र या गोष्टीला छेद देत नवं आणि प्रभावी असं लेखन करताना दिसतात. गणेश मतकरीदेखील अशाच काही लेखकांपैकी एक. 

मतकरींच्या पहिल्या कथात्म पुस्तकाच्या, ‘खिडक्या अर्ध्या उघड्या’च्या मनोगताची सुरुवातच मुळी होते ती अशी – “ ‘खिडक्या अर्ध्या उघड्या’ हा एक प्रयत्न आहे, आजूबाजूला पाहण्याचा. माझ्या काळातला, मी राहतो त्या वातावरणातला.” ही वाक्यं कमी-अधिक फरकाने मतकरींच्या आजवर प्रकाशित झालेल्या तिन्ही कथात्म पुस्तकांतील आशयाला लागू पडतात. ‘खिडक्या अर्ध्या उघड्या’, ‘इन्स्टॉलेशन्स’ आणि ‘(कदाचित) इमॅजिनरी’ ही ती पुस्तकं. 

यापैकी ‘खिडक्या अर्ध्या उघड्या’ हे आशय आणि आकृतिबंधाच्या स्वरूपात ठळकपणे वेगळं आहे. यात ज्यांच्याकडे स्वतंत्र कथा म्हणून पाहता येतं, अशा दहा कथा आहेत. मात्र या कथांचे नऊ वेगवेगळे निवेदक (नऊ यासाठी की, पहिल्या आणि शेवटच्या कथेचा निवेदक एकच आहे) असले तरी त्या सर्वांची आयुष्यं ही परस्परांशी जोडलेली आहेत. ज्यामुळे याकडे एक कादंबरी म्हणून पाहणंदेखील शक्य होतं. 

.................................................................................................................................................................

एकविसाव्या शतकात ‘आंबेडकरी तत्त्वज्ञाना’त लिहिली जाणारी कविता कशी असेल, याचं उत्तर म्हणजे ‘बीइंग’ हा कवितासंग्रह

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5250/Being

.................................................................................................................................................................

अर्थात वेगवेगळ्या लोकांचं निवेदन इतकंच ‘खिडक्या अर्ध्या उघड्या’चं वेगळेपण नाही. कारण, ते मराठी साहित्यात रत्नाकर मतकरींच्या ‘जौळ’सारख्या कादंबरीमध्येही घडलेलं आहे. किंवा ‘खिडक्या अर्ध्या उघड्या’नंतर आलेल्या ‘उद्या’ या नंदा खरेंच्या कादंबरीतही अशी मांडणी आहे. ज्यात वेगवेगळ्या लोकांच्या निवेदनातून एकसंध कथानक निर्माण होतं, पण ती निवेदनं स्वतंत्र कथा बनत नाहीत. इथे मात्र निरनिराळी निवेदनं स्वतंत्रपणे कथा म्हणून उभी राहतात, आणि त्याच वेळी त्यांच्या एकत्र येण्यातून एक गोष्टही तयार होते. आता हा फॉर्म आला कुठून, तर तो ‘हायपरलिंक सिनेमा’ या चित्रपट प्रकारातून येतो. ज्यामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींवर लक्ष केंद्रित करणारी वेगवेगळी कथानकं (चित्रपट जसजसा पुढे सरकतो तशी) एकत्र येतात. क्वेंटिन टॅरेंटिनो, अलेहान्द्रो गोन्झालेझ इनारितु, पॉल थॉमस अँडरसन इत्यादी दिग्दर्शकांचे चित्रपट या प्रकारच्या चित्रपटांची गाजलेली उदाहरणं आहेत. 

तर ‘इन्स्टॉलेशन्स’ आणि ‘(कदाचित) इमॅजिनरी’ हे सर्वस्वी स्वतंत्र कथांचा समावेश असलेले कथासंग्रह आहेत. त्यामुळे या दोन्हींचा विशिष्ट असा आकृतिबंध नसला तरी त्या स्वतंत्र कथा म्हणून तितक्याच प्रशंसनीय ठरतात. या दोन्ही संग्रहांतील काही कथा वेगवेगळ्या निवेदकांच्या अनुभवावर आधारित कथनातून साकारल्या जातात. त्यामुळे आकृतिबंधाचा विचार करता ही तिन्ही भिन्न असणं स्वाभाविक वाटत असलं तरी तिन्हींमध्ये काही साम्यस्थळं आहेत. ती लेखनशैली, निवेदन, पात्रांचं रेखाटन, समकालीन भोवतालाचं चित्रण अशा अनेक पातळ्यांवर दिसतात. 

समकालीन माध्यमं आणि समाजमाध्यमांमधील कथनव्यवस्था ही भूतकाळातील जीवन आणि त्यात रममाण होण्यात गुंतलेली आहे. असं असताना जे काही मोजके लेखक समकालीन समाजव्यवस्थेचं प्रभावी रेखाटन आपल्या लेखनात करताना दिसतात, त्यात मतकरी अग्रगण्य स्थानावर आहेत.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

आता हा ‘समकाल’ कुठला हे इथं महत्त्वाचं ठरतं. इथला समकाल आहे तो महानगरांतील. इथली कथानकं घडतात ती शहरी पार्श्वभूमीवर, उच्च मध्यमवर्गीय आणि उच्चवर्गीय वर्तुळांत. त्यात एकल आयुष्य जगणाऱ्या लोकांची, स्वतःच्या अवकाशात रममाण असणाऱ्या व्यक्तींची संख्या जरा अधिक आहे. आपण एखाद्या सोसायटीत एक किंवा दोन बीएचके फ्लॅटमध्ये राहत असू तर आपल्या शेजारच्या घरात काय घडतंय याची जशी आपल्याला माहिती/चिंता नसते, अगदी तशीच पात्रं इथं दिसतात. त्यामुळे त्यांच्याकडे स्वार्थी म्हणून पाहता येत नाही. ती काही असतीलच तर ती ‘उत्तरआधुनिक’ आहेत. 

‘फ्रॅग्मेंटेशन’ (विखंडन) आणि ‘ऑथरियल सेल्फ-रेफरन्स’ (लेखकाने त्याच्या स्वतःच्या अशा अस्तित्त्वाचा काही भाग लिखाणात प्रतिबिंबित होऊ देणं) ही उत्तरआधुनिक साहित्याची वैशिष्ट्यं आहेत. जी या लेखनाला लागू पडतात. इथं जे काही घडतंय ते पूर्णत्वाला नेण्याचा अट्टाहास नाही किंवा जे काही घडतंय/दिसतंय त्याकडे पाहण्याचा विस्तृत दृष्टिकोन अपेक्षित नाही. आपण जगत असताना आपल्या मर्यादित अवकाशात, मर्यादित नजरेनं सभोवतालच्या घटनांचा अर्थ ज्या पद्धतीने लावतो, तसंच त्यांची पात्रं करतात. आणि त्यांना त्यांच्या अवकाशाला साजेसं असंच लेखन इथं आहे. असं विखंडन असणं हा इथला सर्जनशील निर्णय असल्याने तो कुठल्याही अर्थानं इथली मर्यादा ठरत नाही. 

याखेरीज त्यांचं बरंचसं लेखन हे काहीसं सेल्फ-रेफरन्शियल, काहीसं आत्मचरित्रात्मक आहे. आता लेखकाला पुनःपुन्हा उदधृत करण्याचा धोका पत्करत या लेखकाच्या स्वतःच्या लेखनासंबंधित विधानांचा उल्लेख करतो. ती म्हणजे ‘‘कोणतंही लिखाण हे ऑटोबायग्राफिकल असतं. काही इतर लिखाणापेक्षा थोडं अधिक. याचा अर्थ अर्थातच कथा जशी घडली तशी लिहिली जाते असा नाही, पण आपला अनुभव, काही तपशील, विशिष्ट वेळी डोक्यात फिरणारे विचार यांची आपली आधी गाठ पडलेली असते’’.

हे ‘खिडक्या...’मध्ये जरा अधिक जाणवतं. पुस्तकाच्या सुरुवातीला येणाऱ्या ‘ऑल धिस हॅपन्ड, मोर ऑर लेस’ या कर्ट वानेगटच्या ‘स्लॉटरहाऊस-फाइव्ह’मधील वाक्याच्या इथल्या संदर्भाला बऱ्याच छटा आहेत. या पुस्तकाचं कथानक सुश्रुत आणि सानिका हे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणारं तिशीतील जोडपं आणि सानिकाने अनंत व निरंजन या तिच्या मित्रांसोबत सुरू केलेली आर्किटेक्चरल फर्म या दोन मुख्य घटकांभोवती फिरतं. ज्यात या पाचही पात्रांसोबत जोशीकाकू ही सुश्रुतच्या सोसायटीत राहणारी वृद्ध स्त्री, अनंतचा पौगंडावस्थेतील मुलगा रोहन, अनंतची सहाय्यक नीता अशा निरनिराळ्या वयोगटातील भिन्नलिंगी पात्रांच्या निवेदनातून सगळा पट समोर मांडला जातो. 

इथल्या अर्ध्याअधिक पात्रांचा संबंध या ना त्या कारणाने आर्किटेक्चर (स्थापत्यविशारदशास्त्र) या क्षेत्राशी येतो. जे मतकरींच्या स्वतः एक आर्किटेक्ट असण्यातून येतं. आणि जरी इतर काही पात्रं स्वतः आर्किटेक्ट नसली तरी त्यांच्या निरीक्षणांतून, त्यांच्या निवेदनातून आसपासच्या अवकाशाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन दिसतो.

याचा थेट संबंध हा एकुणातच तिन्ही पुस्तकांमध्ये मतकरी ज्या पद्धतीने अवकाशनिर्मिती करतात त्याच्याशी येतो. केवळ पारंपरिक साहित्यिक जाणिवांच्या पलीकडे जाणारी ठळक अशी चित्रं निर्माण करणारी सौंदर्यदृष्टी त्यांच्या तिन्ही कथासंग्रहांतील कथांमध्ये जाणवते. इथल्या कथांमध्ये या सभोवतालच्या आर्किटेक्चरबाबतची मतं किंवा इतर सांस्कृतिक, सामाजिक संदर्भ येण्यात कुठेही कृत्रिमपणा नाही. 

.................................................................................................................................................................

या मुलाखती म्हणजे मानवी सांस्कृतिक सौंदर्याचं प्रतिबिंब! आरसाच जणू. तुम्ही वाचकांनी त्यात डोकवावं. स्वतःस न्याहाळावं

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5255/Srujan-Sanwad-bhag-1-ani-bhag-2

..................................................................................................................................................................

उदाहरणार्थ, जोशीकाकू जेव्हा देश सोडून जात असताना आपला राहता फ्लॅट आणि जुन्या चाळीतील घराची तुलना करते, तेव्हा त्यात एक भावनिक संवेदना असते. तर, सानिका ही आर्किटेक्ट हॉटेलमधील लॉबीबाबत विचार करते, तेव्हा त्यात तिच्या व्यावसायिक जीवनाचा विचार केलेला असतो. (‘खिडक्या...’) हेच ‘इन्स्टॉलेशन्स’ आणि ‘(कदाचित) इमॅजिनरी’बाबत. इथं निरनिराळ्या पेशातील पात्रांचा त्यांच्या सभोवतालाकडे पाहण्याचा दृष्टिकोन एकमेकांहून किती भिन्न आहे, हे पहावं. 

सांगायचा मुद्दा असा की, मतकरी त्यांच्या लेखनात भौतिक आणि अभौतिक असा दोन्ही तऱ्हेचा अवकाश निर्माण करतात. भौतिक अवकाश स्थळकाळाच्या वर्णनांतून निर्माण केला जातो, तर अभौतिक अवकाश हा पात्रं आणि त्यांच्या विचारांतून.

आणखी एक म्हणजे - पौगंडावस्थेत असणाऱ्या पात्रांना एकांताची गरज वाटते आणि ही गरज कुठून येते, हे पालकांच्या लक्षात येत नाही. परिणामी या समज-गैरसमजातून वाढणारा विसंवाद आणि वाद इथं दिसतो. आपल्या सभोवतालातील कुटुंबांमध्ये सहजपणे आढळतील असे हे मुद्दे आहेत. मतकरी ही निरीक्षणं अगदी अचूकपणे मांडतात. बहुतांशी वेळा ते दोन्ही बाजू समोर मांडून सभोवतालाकडे एका सर्वसमावेशक दृष्टिकोनातून पाहतात. 

वर उल्लेख केल्याप्रमाणे, मतकरींच्या लेखनात पात्रांमधील विसंवाद हा एक महत्त्वाचा घटक आहे. जोशीकाकू आणि त्यांच्या मुलातील संवाद खुंटलेला आहे. रोहन आणि त्याच्या आई-वडिलांतील विसंवाददेखील अशाच प्रकारचा आहे. आई-वडील आणि मुलं यांच्यासोबतच पती-पत्नी, प्रियकर-प्रेयसी या इतर नात्यांतील विसंवादही इथं दिसतो. पात्रं कुठल्याही वयोगटातील असोत, ती या ना त्या कारणाने एकल आयुष्य जगणारी असल्याचं दिसतं. त्यामुळे अलीकडील काळात एक समाज म्हणून आपण कशा प्रकारे अधिकाधिक व्यक्तीकेंद्रित बनत गेल्याचं निरीक्षण इथं नोंदवलं जातं. 

‘खिडक्या...’मधील सर्वच कथांमध्ये पात्रांमधलं दुरावलेपण दिसत असलं तरी ‘जत्रा’, ‘जम्प’सारख्या कथांमध्ये हे मुद्दे अधिकच ठळकपणे समोर येतात. ‘जत्रा’मध्ये पालक आणि मुलांमधील अंतर, दोन पिढ्यांमधील अंतर अशा पद्धतीने ते दिसतं. तर, ‘जम्प’मध्ये हे एकूण सर्वच पात्रांमधील दुराव्याच्या निमित्ताने घडतं. प्रत्येक जण स्वतःच्या विचारांमध्ये इतका गुंतलेला असतो की, अगदी जवळच्या व्यक्तीजवळही स्वतःच्या समस्या बोलून दाखवल्या जात नाहीत.

‘(कदाचित) इमॅजिनरी’मधील ‘कपाट’ या कथेतही हाच मुद्दा असला तरी ती कथा काहीएक प्रमाणात सकारात्मक आहे. साहित्यिक असलेल्या वडिलांकडून वारश्यात मिळालेल्या कपाटाचं करायचं काय, हा प्रश्न इथल्या नायकाला पडलेला असतो. या प्रश्नात म्हटल्यास एक रुक्षपणा आहे, जो मतकरींच्या इतरही कथांमध्ये अस्तित्त्वात आहे. म्हटलं तर हा प्रश्न वेगवान शहरी जगण्यातील (अति)व्यावहारिकतेचं उदाहरण आहे. हा रुक्षपणा, ही अतिव्यावहारिकता त्यांच्या इतरही कथांमध्ये अस्तित्वात आहे. जिचा उगम हा त्या-त्या कथांच्या सभोवतालात आहे. 

त्यांची बहुतांशी पात्रं आशावादी दृष्टिकोन बाळगणारी असली तरी ती आदर्शवादी नाहीत, ती फ्लॉड (सदोष) आहेत. ती व्यावहारिकदृष्ट्या विचार करणारी आहेत. ‘ग्रेटर गुड’करिता, जगाच्या भल्याकरिता काहीतरी करणं त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरत नाही. त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक, व्यावसायिक, भावनिक, आर्थिक अशा नाना तऱ्हेच्या समस्या आहेत. आणि सध्यापुरत्या तितक्या मिटल्या तरी पुरेसं आहे, इतका साधा दृष्टिकोन ती बाळगतात.

आधी उल्लेख केल्याप्रमाणे स्वतःच्या मर्यादित अवकाशापुरता विचार करणारी, अलिप्त दृष्टिकोन बाळगणारी अशी ही पात्रं आहेत. त्यांची सभोवतालाकडे पाहण्याची आणि जगण्याची अशी काही फिलॉसॉफी आहे. ती दुसऱ्याला पटायला हवी असा त्यांचा अट्टाहास नाही. ते आपापल्या परीने आपल्या मर्यादित आयुष्याचा विचार करत त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत राहतात. त्यांच्या आयुष्याला जो वेग आहे, तो त्यांच्या सभोवतालातून आलेला आहे. प्रत्येक शहरात किंवा शहरातील एखाद्या भागात सगळं काही घडण्याची काहीतरी एक विशिष्ट गती असते, असं मला नेहमी वाटत आलेलं आहे.

इथल्या पात्रांच्या भोवतालाची अगदी अशीच गती आहे, आणि त्यानुसार पुढे जात राहणं हे त्यांच्यासाठी अपरिहार्य आहे. त्यामुळे इथली कथासूत्रं ही अगदी सहजतेनं, आपलं जग जसं एका अर्थी स्वयंचलित आहे, अगदी तशा रीतीने पुढे सरकत राहतात. आणि इथल्या घडामोडींचा एक भाग असलेली पात्रं आपापल्या परीने त्या घटनांना प्रतिसाद देत राहतात. त्यांच्या लेखनात कथानकाशी निगडीत बऱ्याचशा घटकांचा संदिग्धपणा अबाधित राखला जातो. किंवा कथांमध्ये गूढतेचं वलय असतं. मात्र, पुढे जाऊन लेखन या गूढतेत न गुरफटता, ही गूढता लेखनाचं ठळक वैशिष्ट्य न बनता त्याला पूरक असलेलं त्याचं एक अंग बनते. 

..................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

ई-बुक खरेदीसाठी पहा -

https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/

..................................................................................................................................................................

मतकरींच्या कथांमधील पात्रांचं ‘जेंडर न्यूट्रल’ असणं हे या लिखाणाचं आणखी एक वैशिष्ट्य. मग हे जेंडर न्यूट्रल असणं भाषिक आणि व्यावहारिक अशा दोन्ही स्तरांवर दिसून येतं. पात्रांचं लिंग हे - अपवाद वगळता - कुठल्याही पात्रांच्या महत्त्वाकांक्षा आणि व्यावसायिक, वैयक्तिक जीवनाच्या आड येत नाही. उलट झालंच तर काही वेळा इथं स्त्री पुरुषांच्या पारंपरिक भूमिकांची अदलाबदल घडते. या गोष्टी मतकरींच्या लिखाणाला अधिक प्रभावी बनवतात. कुठल्याही वयोगटातील स्त्री-पुरुषांचं रेखाटन ते विश्वासार्ह पद्धतीने करतात. त्या पात्रांची भाषा, त्यांचा सभोवतालाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अशा अनेक छटा त्याला प्राप्त होतात. 

पात्रं उभी करत असताना साहजिकच त्यांची भाषा हा एक महत्त्वाचा घटक असतो. वेगवेगळ्या वयोगटातील विभिन्नलिंगी पात्रांच्या तोंडी असलेली भाषादेखील मतकरींच्या लेखनात कशा प्रकारे येते हे पाहणं इथे महत्त्वाचं ठरतं. तिन्ही पुस्तकांतील बहुतांशी कथा या महानगरांत घडत असल्याने कथांमधील पात्रं ही इंग्रजीमिश्रित मराठी बोलतात. (अपवाद ‘इन्स्टॉलेशन्स’मधील ‘क्रांती’सारख्या कथांचा.) त्यांचा समकालीन माध्यमांशी, पॉप कल्चरशी संबंध आहे. हा संबंध आणि याचे संदर्भ इथं अगदी सहजतेनं येतात. या लेखनात एक उपजत सहजता आहे.

मतकरींच्या लिखाणात चित्र, साहित्य, चित्रपट, लेखक इत्यादींचे उल्लेख येतात. निरनिराळ्या माध्यमांचा परस्परसंबंध निर्माण होतो. मतकरींच्या लेखनात हे अगदीच सूक्ष्म स्वरूपात येतं. हे संदर्भ अथवा उल्लेख केवळ सजावट किंवा माझं किती वाचन किंवा पाहणं आहे, म्हणून घडत नाहीत. 

‘खिडक्या अर्ध्या उघड्या’च्या सुरुवातीला येणारं ‘ऑल धिस हॅपन्ड, मोर ऑर लेस’ हे वाक्य; ‘इन्स्टॉलेशन्स’च्या सुरुवातीला येणारं ‘आय डोन्ट एक्झॅक्टली नो व्हॉट आय मीन बाय दॅट, बट मीन इट’ हे जे. डी. सॅलिन्जरचं ‘कॅचर इन द राय’मधील वाक्य आणि ‘(कदाचित) इमॅजिनरी’च्या सुरुवातीला येणारं ‘रिअॅलिटी एक्झिस्ट्स इन द ह्यूमन माईन्ड, अँड नोव्हेअर एल्स’ हे जॉर्ज ऑरवेलच्या ‘1984’मधील वाक्य - ही तिन्ही वाक्यं संबंधित पुस्तकातील लेखनाच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. सोबतच कथाबीजं पाहिल्यास ही वाक्यं जे मांडू पाहतात त्याचा अंश आलटून-पालटून मतकरींच्या तिन्ही संग्रहांमधील कथांमध्ये आढळू शकतो. समोर मांडल्या जाणाऱ्या (वरकरणी) वास्तवाचे स्वरूप, आणि सत्यासत्यता; जे काही घडतंय किंवा सांगितलं जातंय ते का सांगितलं जातंय आणि त्यामागील कारणं काय याबाबतच्या अस्पष्टतेचे अंतःप्रवाह ही वाक्यं बाळगून आहेत. आठवणी आणि त्यांचे फ्रॅग्मेंटेड स्वरूप, प्राक्तन आणि योगायोग यांचं मानवी आयुष्यातील स्थान, मृत्यू या संकल्पनेला आपण कशा पद्धतीने प्रतिसाद देतो, वगैरे मानवी स्वभावाशी निगडीत संकल्पना या कथांमध्ये दिसून येतात. 

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

हेच त्या-त्या कथांमध्ये येणाऱ्या संदर्भांबद्दल. उदाहरणार्थ, ‘इन्स्टॉलेशन्स’मधील एका कथेत काफ्का या लेखकाचा उल्लेख आहे. ‘(कदाचित) इमॅजिनरी’मधील एका कथेच्या ‘व्हिसलर्स मदर’ या नावाला साहजिकच जेम्स व्हिसलरच्या प्रख्यात चित्राचा संदर्भ आहे. कथेत या चित्राच्या दृश्य संदर्भालाही महत्त्व आहे. ‘खिडक्या अर्ध्या उघड्या’तील ‘भारद्वाज’मध्ये अनंत हे पात्र त्याला पुसटशा आठवणाऱ्या कवितेबाबत बोलत असतं. सांगायचा मुद्दा असा की, इथले संदर्भ खचितच कृत्रिम किंवा दिखाऊ भासत नाहीत. ते त्या पात्रांविषयी, त्यांच्या सभोवतालाविषयी काही ना काही माहिती पुरवतात तसेच एकूण कथेच्या पातळीवरही महत्त्वाचे ठरतात. 

‘खिडक्या…’मधील कथा या पूर्णतः वास्तव प्रतलावर सुरू होतात. ‘इन्स्टॉलेशन्स’मध्ये या कथांमध्ये वास्तवासोबतच गूढता आणि कल्पिताचं मिश्रण व्हायला सुरुवात होते. तर, ‘(कदाचित) इमॅजिनरी’पर्यंत जाताना हे मिश्रण अधिक घट्ट होत जातं. ‘इन्स्टॉलेशन्स’मध्ये ते घडतं, पण ‘(कदाचित) इमॅजिनरी’मध्ये त्याचं प्रमाण अधिक आहे. हे काहीसं मॅजिक रिअॅलिझमकडे झुकतं असं मानायला जागा आहे. शिवाय, हा फरक जाणवण्यासारखा आहे. 

या साहित्यकृती महत्त्वाच्या यासाठी ठरतात की, मराठी साहित्यात ‘समकालीन नोंदी’ म्हणावं असं लेखन करणारे काही मोजकेच लेखक आहेत. (त्यातही पुन्हा नंदा खरेंसारखे ज्येष्ठ लेखक यात दिसतात.) मनस्विनी लता रवींद्रचं ‘ब्लॉगच्या आरशापल्याड’, प्रणव सखदेवच्या कथा अशा उल्लेखनीय लेखनात मोडतात. अशा वेळी कालबाह्य जाणिवा आणि लेखनपद्धतींपेक्षा वेगळं आणि आधुनिक, समकालीन म्हणावंसं काहीतरी मांडणाऱ्या लेखनावर बोलत राहणं महत्त्वाचं ठरतं. गणेश मतकरींचं कथात्म लेखन हे त्यात मोडतं, हे वेगळं सांगायला नको! 

..................................................................................................................................................................

गणेश मतकरी यांच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

..................................................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार  चित्रपट अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......