टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • अजगर पडणारे भारतीय, वडाळा शिवसेना शाखा, डोनाल्ड ट्रम्प आणि विजय मल्ल्या
  • Fri , 03 February 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या शिवसेना Shivsena डोनाल्ड ट्रम्प Donald Trump विजय मल्ल्या Vijay Mallya

१. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे रण तापलेले असताना शिवसेनेत बंडाळी माजली असून भाजपमध्ये घराणेशाहीमुळे धुसफूस असल्याचे चित्र आहे. शिवसेनेतील तीन मातब्बर नगरसेवकांनी भाजपची वाट धरली असून वडाळा येथे शिवसैनिकांनी आपल्याच शाखेला टाळं ठोकलं. भाजपच्या यादीत मंत्री, आमदार, खासदार यांच्या घरातच उमेदवारी दिल्याने इच्छुकांमध्ये धुसफूस वाढली आहे. त्याच वेळी मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीत मध्यस्थी करण्यासाठी गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीच्या वेळी गुरुदास कामत आणि संजय निरुपम यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची आणि हाणामारीही झाली.

अहाहा, लोकसेवेसाठी जीवन समर्पित केलेल्या या त्यागमूर्तींची जनतेची सेवा करण्यासाठीची ही अहमहमिका पाहून जनता सुखाने डोळे मिटायला तयार झाली असेल (ती तरी दुसरं काय करू शकते म्हणा!). ही सगळी मंडळी एकमेकांमध्ये लढायचं सोडून एकमेकांशी लढायला सज्ज होतील ना निवडणुकीपर्यंत? नाहीतर लढत नेमकी कोणामध्ये आहे, हेच कळायचं नाही पब्लिकला शेवटपर्यंत.

…………………………………………

२. भारतात कसंबसं पोट भरणाऱ्या आणि दुर्लक्षाचा विषय असणाऱ्या गारुड्यांना चक्क अमेरिकेतून मागणी आली आहे. खास अजगरांना पकडण्यासाठी दोन भारतीय गारुडी फ्लोरिडाला बोलावले गेले. या दोघांना फ्लोरिडाच्या वनविभागाने जवळपास ४६ लाख रुपयांइतका मेहनताना देऊ केला आहे.

अरे देवा, आमचे आयटी इंजीनियर म्हणत असतील की, उगाच पैसे खर्च करून, मेहनत घेऊन सुशिक्षित आणि प्रशिक्षित झालो. यापेक्षा अजगर पकडायला शिकलो असतो, तर झटपट अमेरिकावारी घडली असती. शिवाय, फ्लोरिडामध्ये जोवर अजगर आहेत, तोवर ट्रम्पतात्याही यांना निर्वासितांचे कठोर कायदे लावून हुसकावू शकत नाहीत.

…………………………………………

३. हुंडा का घेतात याचे धक्कादायक स्पष्टीकरण महाराष्ट्र सरकारने प्रमाणित केलेल्या एका पाठ्यपुस्तकात देण्यात आले आहे. मुलगी कुरूप असेल किंवा अपंग असेल, तर तिचं लग्न जुळवणं कठीण होतं. त्यामुळे हुंडा द्यावा लागतो, असं महाराष्ट्र पाठ्यपुस्तक मंडळाने प्रमाणित केलेल्या १२वीच्या समाजशास्त्राच्या पुस्तकात म्हटलं आहे. हुंड्याच्या प्रथेच्या अनेक कारणांमध्ये हेही कारण आहे, असं पुस्तकात म्हटलं आहे.

आता यावर असा गदारोळ सुरू झालाय, जणू महाराष्ट्रात अजूनही सतीप्रथा जिवंत आहे, असंच या पुस्तकात म्हटलं असावं! हुंडा हे या समाजातलं भीषण वास्तव आहे. हुशार, सुस्वरूप, अव्यंग मुलींनाही लग्नात हुंडा द्यावाच लागतो अजून. त्यात मुलगी नाकीडोळी डावी असेल आणि तिच्यात काही व्यंग असेल, तर हुंड्याला पर्यायच उरत नाही. हे वास्तव बारावीच्या समाजशास्त्राच्या पुस्तकात मांडलं, तर त्यात चूक काय? धडा बदलून समाजातली कुप्रथा संपणार आहे का?

…………………………………………

४. भारतातील बँकांचे हजारो कोटी रुपये थकवून परदेशात पळालेला मद्यसम्राट विजय मल्ल्या म्हणतो की, प्रसारमाध्यमांच्या खेळपट्टीवर यूपीए आणि एनडीए यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात माझा फुटबॉल झाला आहे.

परदेशात ऐषोआरामात राहात असल्यामुळे मल्याभाऊंची साहित्यिक प्रतिभा अजूनही शाबूत आहे तर. विजयराव, आयुष्याच्या सामन्यात फक्त चीअरगर्ल्सबरोबर गुड टाइम्स व्यतीत करायला मिळत नाही, ज्यांना आपण खेळवतो असा आपल्याला भास होत असतो, ते आपल्याला खेळवत असतात, हे नंतर कळतं. लवकरच तुम्हाला हवा गेलेला फुटबॉल कसा असतो, तेही कळणार आहे.

…………………………………………

५. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी ऑस्ट्रेलियाशी केलेल्या निर्वासितांबाबतच्या करारावरून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांच्यात फोनवरून संभाषण सुरू असताना खटका उडाला आणि ट्रम्प यांनी चक्क फोन अर्ध्यातच ठेवून दिला.

जगाचं नेतृत्व करण्याची कुवत असलेले नेते अमेरिकेने असेही अपवादानेच निवडले आहेत, पण अमेरिकेला काहीही परवडतं म्हणून त्यांनी केस पिकलेलं एक शिशुवर्गातलं बाळ जगातल्या सर्वशक्तिमान पदाच्या खुर्चीत बसवावं, हे जरा जास्तच झालं. आता डायपर बदलत राहावे लागणार सतत.

…………………………………

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......