अजूनकाही
पं. जगन्नाथ हे एक तैलंगी विद्वान होते. स्व-प्रांतात आपल्या विद्वत्तेचे चीज होत नाही म्हणून त्यांनी जयपूरच्या राजाकडे आश्रय घेतला. तिथे त्यांना प्रतिष्ठा मिळाली, मान-सन्मान मिळाला, त्यांच्या कवित्वाची प्रशंसा झाली. पण ते राज्य त्यांच्या आकांक्षेच्या दृष्टीने छोटे होते; म्हणून त्यांना त्या वेळच्या मुघल-दिल्ली दरबारी बोलावणे येताच ते तिकडे गेले. कलाप्रेमी बादशाह शाहजहाँने धार्मिक तत्त्वज्ञानावर आधारित वाद-विवादाचा मोठा निवडा घेण्याचे ठरवले. हिंदू व मुस्लीम गुरूंचा धर्मांचे श्रेष्ठत्व प्रतिपादित करण्यासाठी वाद झडवावा व त्यात विजयी होणाऱ्याचा सत्कार करावा, हा हेतू.
याचे आमंत्रण जेव्हा दोन्ही धर्मातील विद्वानांना धाडले, तेव्हा वैदिक हिंदू धर्माची पताका विद्वानांनी आपला प्रतिनिधी म्हणून पं. जगन्नाथांच्या खांद्यावर ठेवली. मौलवींनी आपला प्रतिनिधी निवडला. पण मुस्लीम धर्मग्रंथ समजून घेण्यासाठी जगन्नाथांना फ़ारसी भाषा समजून घेणे आणि त्यात पारंगत होणे अपरिहार्य होते, अन्यथा ते वाद-विवादात कमी पडला असते. त्यासाठी त्यांनी एक वर्षाची मुदत मागून घेतली, ती बादशाहने दिली. त्यामुळे जनतेच्या आणि विद्वानांच्या मनांत पं. जगन्नाथांबद्दल कुतूहल निर्माण झाले.
दारा शुकोह यांना या स्पर्धेचे न्यायाधीश बनवले गेले, कारण दोन्ही धर्मांचा त्यांचा अभ्यास आणि संतुलित दृष्टीवर संदेह घेण्यास जागा नव्हती. ही वादविवाद स्पर्धा फ़ारसी भाषेचे ज्ञान ग्रहण करून पं. जगन्नाथांनी आपल्या बुद्धिसामर्थ्यावर आणि ज्ञानोपासनेच्या व कवित्व शक्तीच्या बळावर जिंकली. त्यांना ‘पंडितराज’ हा ख़िताब बहाल करण्यात आला. मानमरातब मिळाला.
..................................................................................................................................................................
‘खिंडीत’ : शैक्षणिक जगताच्या अंतरंगाची विरूपता भेदकपणे उलगडणाऱ्या कथा
हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5254/Khindit
..................................................................................................................................................................
थोड्या कालावधीनंतर त्यांचा लवंगी या बादशाहच्या औरस मुलीसोबत विवाह लावण्यात आला, यात बादशाहने पुढाकार घेतला. मुघल दरबारात पं. जगन्नाथांचे महत्त्व वाढले. मात्र वैदिक विद्वान त्यांच्यावर टीका करू लागले. शाहजहाँनंतर औरंगजेब बादशाह होताच त्याने जगन्नाथांचे इनाम बरखास्त केले, त्या वेळी त्याच्या नशिबी केवळ टोचण्या उरल्या. त्याने आपले इनाम मिळालेले गाव सोडले आणि तो वाराणसीत आला.
अशाच एका टोकाच्या प्रसंगी जननिंदेस कंटाळून त्यांनी गंगेस आपला देह अर्पण केला आणि त्याआधी एकेका श्लोकांतून देवी गंगेची स्तुती केली. एकेका श्लोकापाठी गंगा नदी एकेक पायरी चढत वर येई. बावन्नाव्या श्लोकाच्या शेवटी तिने पं. जगन्नाथांना आपल्यात सामावून घेतले, अशा आशयाची ही कथा कविमनांचा विषय ठरली.
‘पीयूषलहरी’ वा ‘गङ्गालहरी’ ही पं. जगन्नाथाची मूळ संस्कृत रचना. त्यांच्या अद्भुत चरित्राचे आणि ‘गंगालहरी’ या रचनेचे गारुड कवीमनावर कायम राहिले.
‘श्री जगन्नाथ पंडित’ या नावाने संतकवी दासगणूंनी चरित्ररूपी कीर्तनोपयोगी आख्यान रचले. त्यात ते शाहजहाँचे दरबारी होते, असा वरील कथेप्रमाणे उल्लेख आहे. एका भगवत् भक्ताला व कीर्तनकाराला हा विषय भावण्याचे कारण जगन्नाथांनी वादविवादात केलेला यवन-दरबाराचा पराभव, हे जसे आहे, तसेच ‘गङ्गालहरी’तील उच्च कोटीचा भक्तीरसपरिपोष, हेही आहे. या घटनेला त्यांनी आपल्या प्रतिभेने अध्यात्मविषयाचे कोंदण घडवले आहे. पुढे मो. बा. रवंदे यांनी या आख्यानाचे संस्कृत रूपांतरण केले.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
मराठीत ‘गङ्गालहरी’चे संपादन याच नावाने ल. गो. विंझे यांनी केले. अभ्यासकांसाठी हे पुस्तक माहितीजालावर विनामूल्य उपलब्ध आहे-
https://epustakalay.com/book/183770-ganga-lahari
जगन्नाथांचा मूळ संस्कृत श्लोक, वामनपंडितांची समवृत्त समश्लोकी, ल. गो. विंझे यांची मराठी पद्यरचना आणि शेवटी श्लोकाचा गद्य-अर्थ, असा या पुस्तकाचा क्रम आहे. संस्कृत रचनेचा प्रासादिक मराठी भावानुवाद या संपादनातून अनुभवता येतो.
याच्या प्रास्ताविकात जगन्नाथ पंडित मूळ अकबराच्या दरबारातील कवी होते. त्यांचा जन्म १५५० चा असा उल्लेख आहे. त्यामुळे या घटनेचा ऐतिहासिक कालखंड ८० वर्षे मागे सरकतो. जगन्नाथांच्या आयुष्यातील घटनाक्रम तोच असला तरी कालखंडाबाबत आणि मुघल व्यक्तींबाबत वरील कथेशी एकवाक्यता नाही. मात्र पं. जगन्नाथ हे मूळ तैलंगण प्रदेशातील एक संस्कृत कवी, विद्वान, वेदवेत्ते होते, ते मुघल बादशहाचे दरबारी होते, त्यांनी लवंगी नावाच्या बादशाहच्या औरस मुलीशी लग्न केले. त्यांना यवन-संबंधामुळे जनक्षोभाला सामोरे जावे लागले. त्यांनी ५२ श्लोकांचे ‘गंगालहरी’ हे उत्कृष्ट काव्य लिहिले, या घटनांबाबत मात्र एकवाक्यता आहे.
पुढे १९६० मध्ये विद्याधर गोखलेंनी ‘संगीत पंडितराज जगन्नाथ’ हे नाटक मराठी रंगभूमीवर आणले, ते जगन्नाथांच्या चरित्रातील नाट्य त्यांना भावले म्हणून.
या ‘गङ्गालहरी’ स्तोत्रावर ‘श्रीगंगातीरविहारिणी’ नावाची ओवीरूपी मराठी टीका स्वामी वरदानंद भारतींनी केली आहे. त्यांनी पूर्वरंगासहित प्रस्तुत केलेले ‘श्री जगन्नाथ पंडित’ हे श्री दासगणू विरचित आख्यान ‘Varad-Vani’ नावाच्या ‘यू-ट्यूब’ चॅनल वर पाहायला मिळते-
तसेच ‘गंगालहरी’वरील अर्थपूर्ण मराठी विवेचन आठ भागांत ऐकायला मिळते-
पुढे राम पिंगळीकर यांनीही ‘गंगालहरी’च्या मूळ संस्कृत संहितेचा वृत्तबद्ध मराठी अनुवाद केला, हे दोन्ही अनुवाद मराठी वाचकांत प्रिय आहेत.
उपरोल्लेखित कवींनी जगन्नाथ पंडितांच्या मूळ श्लोकाचा कसा व्यक्तिसापेक्ष प्रतिभासंपन्न आविष्कार केला आहे, ते फक्त पहिला प्रातिनिधिक श्लोक निवडून पाहू-
पं. जगन्नाथ -
समृद्धं सौभाग्यं सकलवसुधायाः किमपि तन्
महैश्वर्यं लीलाजनितजगतः खंडपरशोः।
श्रुतीनां सर्वस्वं सुकृतमथ मूर्त सुमनसां
सुधासोदर्यं ते सलिलमशिवं ननः शमयतु ।।१।।
।। शा. वि. ।।
वामन पंडित -
अशेषाभूतींचें विपुलतर सौभाग्य मिरवी
जगातें लीलेनें करि शिव तया भूतिपद वी ॥
श्रुतींची तत्त्वोक्ती, सुकृत विबुधांचेंच अथवा
सुधा-बंधू तूझें सलिल अमुच्या नासु आशिवा ॥ १ ॥
ल. गो. विंझे -
उभ्या या पृथ्वीचें जणुं विपुल सौभाग्य विलसे
रची जो लीलेनें जग, शिव, तया भूषण असे ॥
श्रुतींचे जे सार, त्रिदशसुकृतें मूर्त जणुं जें
हरो अस्मत्-पापें, मधु जल, सुधाबांधव तुझें॥ १ ॥
राम पिंगळीकर -
ही संपन्न वसुंधरा तव जला सौभाग्य मानी स्वयें।
ऐश्वर्य त्रिपुरारिचें करि भवा निर्माण जो लीलये।।
सर्वस्व श्रुतिचे तसें सुकृतहि देवादिकांचेहि ते।
जे प्रत्यक्ष सुधासहोदर असे पापा हरो तोय ते।।
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
स्वामी वरदानंद भारती -
हे वत्सले गंगामाय। तुझे पावन असे तोय। त्याची महती कशी काय । गाऊं माझ्या शब्दानें।।॥२७।। अनेक प्रकारची संपत्ति। धारण करिते जी का क्षिती। तिचेहि सौभाग्य निश्चिती। समृद्ध झालें ज्यारूपें।।२८।।सहज लीलेने विश्वासी। निर्माण करी जो व्योमकेशी। तोहि तुझिया जलासी। निज वैभव थोर मानी।।२९ ।। सार सर्वस्व वेदांतले। तव जलरूपे प्रगटले। किंवा वाटे साकारले । पुण्य देवांच्या तपाचे ।। ३० ।। अमृताचा सहोदर। ऐसे अंबे तुझे नीर। ते गे करो परिहार। आमुच्या साऱ्या अशुभाचा।।३१।।
अर्थ - हे गंगानदि ! जें हें तुझे जल, साऱ्या पृथ्वीचें जणूं महासौभाग्यच आहे, लीलेनें जगाची निर्मिति करणाऱ्या शंकराला जें मोठ्या भूषणाप्रमाणे आहे, वेदांचे सारच, किंवा देवांच्या पुण्यांचे साकार स्वरूपच आहे आणि अमृताचे बंधु असें तुझे जल, आमचे पाप नष्ट करो.
एकूण, पंडित जगन्नाथांच्या आयुष्यातील नाट्य कोणी नाकारले नाही. त्यामुळे लेखक, कवी, कीर्तनकार, नाटककार यांनी पंडितराज जगन्नाथ हा आपला प्रतिपाद्य विषय म्हणून निवडला, त्याला तेवढेच कारण कवीमनाला भुरळ घालणारी त्यांची ‘गङ्गालहरी’ ही प्रासादिक साहित्य रचना आहे.
..................................................................................................................................................................
लेखक जीवन तळेगावकर व्यवस्थापन तज्ज्ञ म्हणून काम करतात.
jeevan.talegaonkar@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment