अंधाराची पैंजणे घालून
येते ही काळरात्र
आजीच्या गोष्टीतून डोकावते
टोकदार दातांच्या चेटकिणीसारखी
ती मरात राहते चाबूक
माझ्या झोपेच्या पाठीवर
त्यावेळी थरथर कापतात माझी स्वप्न.
ती येते एखाद्या जादुगारीणीसारखी
केस पिंजारून
आपल्या डोळ्यांच्या पेटाऱ्यातून
अजगर आणि साप घेऊन
माझ्या बुबुळांच्या व्हरांड्यात
करते मरणनृत्य
भूतकाळाच्या पानांवर
लिहिते काजळीने
आणि वर्तमानाच्या नसांमध्ये
भीती भरते
भविष्याच्या दृष्टीला
बनवते अंध.
माझे सगळे दिव्यमंत्र
आंधळे होऊन जातात
ती खुपसते खंजीर
माझ्या छातीत
रडू लागतात डोंगर रांगा
थरकाप होतो चिनार वृक्षांचा
माझ्या आत जमतो बर्फ
एकसारखा.
ही कविता आहे निदा नवाज़ या काश्मिरी कवीची. ज्या काश्मीरला अनेकांनी या धरतीवरील स्वर्ग म्हटले, ज्या काश्मीरला आपण एकदा तरी भेट देऊ इच्छितो, तेथील हे भयानक वास्तव हा कवी आपल्या कवितांमधून आपल्या समोर मांडतो आहे.
काश्मीरमधील प्रत्येक रात्र ही काळरात्र बनून येते आणि तिच्या पायातील पैंजणाचा आवाज या कवीला ऐकू येतो आहे. तो आवाज हा कवी आपल्यापर्यंत त्याच्या कवितेतून पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. पण मला या कवितासंग्रहापर्यंत पोहोचवले ते त्याच्या अर्पणपत्रिकेने.
निदा नवाज़ यांनी ‘अँधेरे की पाज़ेब’ हा कवितासंग्रह नरेंद्र दाभोलकर, गौरी लंकेश, एम.एम. कलबुर्गी, गोविंद पानसरे आणि रोहित वेमुला यांना आणि जे कट्टरवाद्यांच्या विरुद्ध क्रांतीची मशाल नव्या पिढीच्या हातात सोपवून गेले त्या सगळ्या शहिदांना अर्पण केलेला आहे. त्यामुळे मला हा कवी आपल्या जातकुळीचा वाटला. या कवितासंग्रहातील कवितांची शीर्षके जरी वाचली तरी या कवीच्या भूमिकेची आपल्याला कल्पना येईल. उदा. - ‘क्रांतीपुष्प’, ‘मानवरक्त का चस्का’, ‘बंकरबस्ती’, ‘आदमखोर’, ‘कानून की आड में’, ‘देशद्रोही’वगैरे. यावरून तो कोणत्या जातकुळीचा कवी आहे, याची आपल्याला कल्पना यायला हरकत नाही.
.................................................................................................................................................................
हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5255/Srujan-Sanwad-bhag-1-ani-bhag-2
..................................................................................................................................................................
काश्मीरबद्दलची आपली समज टीव्हीवरील निरुद्देश चर्चांमधून किंवा वर्तमानपत्रांतील उथळ रिपोर्ट्समधून तयार झालेली असते. पण प्रत्यक्ष काश्मीरमधील सामान्य माणूस कशा प्रकारच्या नरकयातना भोगत असतो, याची जाणीवच आपल्याला नसते. ती जाणीव वृद्धिंगत व्हायची असेल तर आपल्याला आजच्या काळातील काश्मिरी लेखकांचे साहित्यच वाचावे लागेल. तेथील कवींच्या कवितेतून पडलेले वर्तमान जीवनाचे प्रतिबिंबच न्याहाळावे लागेल.
निदा नवाज़ यांची याच संग्रहातील आणखी एक कविता बॉम्बस्फोटात मेलेल्या शाळकरी मुलांना बघून लिहिलेली आहे. त्या कवितेचे शीर्षक आहे - ‘झोपेतून जागे करू नका माझ्या मुलांना...’
त्यांना झोपू द्या पऱ्यांच्या मांडीवर
त्यांना ऐकू द्या सनातन स्वर्गीय अंगाई
ही पुस्तके भरलेली दप्तरे असू द्या त्यांच्या उशाशी
हे पेन, पेन्सिली आणि रंगीबेरंगी स्केच पेन्स
त्यांच्या खिशात राहू द्या तसेच सुरक्षित
ते निघाले होते शाळेच्या दिशेने
ह्या ब्रम्हांडाचा शोध घेण्यासाठी
आपल्या जीवनाबरोबरच हे निघाले होते
सगळ्या समाजाच्या डोळ्यात सोनेरी स्वप्न पेरण्यासाठी
अजून त्यांचा कॅनव्हास कोराच पडलेला होता.
ते करीत होते विचार
त्यावर जगाचे आनंदी रंग भरण्याचा
पण हुकूमशहाच्या लोकांनी यांनाच
रक्तरंगात माखून टाकले.
नका कोंबू यांच्या टिफिनमध्ये
चॉकलेट कँडीज् आणि केशरी रंगाची बदामी मिठाई
हे ललचावणारे पदार्थ व्यर्थ आहेत त्यांच्यासाठी
विखरून पडलेले त्यांच्या टिफिन पडू द्या तसेच
आता जगातील भुकेच्या समस्येपासून कायमची सुटका झालीय त्यांची
नकोय त्यांना गाजराचा हलवा
छोले भटुरे किंवा
मनपसंत सँडविच
जेव्हा भाकरी आणि रक्त एकत्र मिसळते
तेव्हा सुरू होतो साम्राजाचा विनाश
हातातील वाळू प्रामाणे
गळून पडतो मोठमोठ्या हुकूमशहांचा अहंकार
.................................................................................................................................................................
हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5250/Being
.................................................................................................................................................................
निदा नवाज़ यांनी कवितेव्यतिरिक्त ‘सिसकियाँ लेता स्वर्ग’ हे पुस्तकदेखील लिहिले आहे. ते डायरीच्या आकृतीबंधात लिहिलेले आहे. त्यात त्यांनी काश्मीरमध्ये सामान्य माणसाला दररोज कशा यातनांना सामोरे जावे लागते, हे नोंदवले आहे. ते पुस्तक प्रयत्न करूनही माझ्यापर्यंत पोहोचलेले नाही. पण यातील एक भाग ‘पहल’ या नियतकालिकात प्रकाशित झाला होता. तो भाग मी अनुवादित स्वरूपात तुमच्या समोर ठेवतो. त्यावरून काश्मीरमधील वास्तवाची जाणीव आपल्याला होऊ शकेल. हे डायरीचे पान १२ जानेवारी १९९२ रोजी लिहिलेले आहे -
“ ....भय हे आमच्याबरोबरच जन्म घेते आणि जन्मभरच आमच्याबरोबर लपाछपीचा खेळ खेळते. कालच्या भीतीदायक रात्रीतील एकेक प्रसंग माझ्या नजरेसमोर येऊन मला भयभीत करू लागला. काल रात्री साधारण साडेबारा वाजले होते. त्याआधीच काही क्षण मी झोपेची शिडी उतरू लागलो होतो. त्या वेळी अचानक दरवाजावर जोरजोरात थापा पडू लागल्या. माझ्या हृदयाची गती वाढली. काही क्षण मला वाटले की, मी घरच्याना उठवावे. पण प्रयत्न करूनही माझ्या गळ्यातून आवाज बाहेर पडला नाही. जणू मला कुणाचा तरी शाप भोवत होता. बाहेर घुबडाचा आवाज रात्रीच्या शांततेला चिरत होता. मला बाहेर कुणाच्या तरी पावलांचा आवाज आला. मी घामाने चिंब भिजलो.
काही वेळानंतर माझी भीती थोडी कमी झाली. मी विचार करू लागलो की, आपला टेलिफोन सकाळपासून बंदच आहे. मग हे एखादे कटकारस्थान तर नाही ना? मी एक मजली घरात राहत होतो. ज्यात बाहेरचा दरवाजा उघडला नाही तरी शिडीवरून घरात घुसणे कुणालाही शक्य होते. मी सावकाश अंथरुणातून उठलो आणि अंधारात भिंतीच्या आधाराने दरवाजा शोधू लागलो... दरवाजाची कडी व्यवस्थित लावून मी जेव्हा परतत होतो, तेव्हा माझा पाय अचानक छोटूच्या अंगावर पडला. तो किंचाळला आणि त्या खोलीत झोपलेले सगळे जण जागे झाले. प्रत्येक जण हळू आवाजात विचारू लागला, “काय झालेय?” मी हळू आवाजात उत्तर दिले, “दिवा लावू नका. बाहेर कुणीतरी आहे. काही वेळापूर्वी कुणीतरी दरवाजा ठोकला होता. काही झाले तरी दरवाजा उघडू नका.”
छोटूने रडायला सुरुवात केली. “मम्मी, सु सु!”
“मला पॉट कुठे ठेवलाय ते आठवत नाहीये. अंधारात मी तो कसा शोधू?”
माझी बायको पुटपुटत म्हणाली. मी विचार करू लागलो. कॉटच्या खाली आधीच खूप वस्तू ठेवलेल्या आहेत. स्टील लॉकरमध्ये मी लपू शकत नाही. मला खोलीत एकही जागा अशी दिसत नव्हती की, तिथे मी लपू शकेन. मी विचार केला की, मी लढेन....
माझा घसा सुकला होता. माझ्या पलंगाजवळच एका छोट्याश्या टीपॉयवर पाण्याने भरलेला ग्लास ठेवलेला होता. त्याच्यापर्यंत माझा हात सहज पोहोचू शकत होता. पण माझा आणि विचारांचा संबंधच तुटला होता. मी विचार तर करू शकत होतो. पण मी कृती करू शकत नव्हतो. कदाचित ही भयाची शेवटची पायरी होती.
माझी पत्नी अंधारात पॉट शोधण्याचा प्रयत्न करत होती. मग ती अचानक स्टील लॉकरला धडकली. पण ती किंचाळली नाही. हळू आवाजात म्हणाली, “माझ्या डोक्यातून रक्त ओघळते आहे. पण मी पॉट शोधूनच काढला.” तिने छोटूला लाघवी करायला मदत केली. मला पुन्हा बाहेरून कुणाच्या तरी पावालांचा आवाज आला. आता कुत्रीदेखील जोराने भुंकू लागली होती. घुबडाचा आवाज मंद पडला होता. पण माझ्या विचारांचा घोडा जोरात दौडत होता. माझ्या विचारांच्या कॅनव्हासवर खूपशा शंका उमटत होत्या. जेव्हा बाहेरची परिस्थिती वाईट झाली, तेव्हा मी सगळ्या खिडक्यांना लोखंडी ग्रील बसवून घेतले होते. पण बाहेरचा दरवाजा भावाच्या घराबरोबर सामायिक होता, म्हणून बिना ग्रीलचा राहिला होता. खरं म्हणजे या लोखंडी ग्रील देखील माझ्या मनातील भीती कमी करू शकल्या नव्हत्या.
मी विचार करत होतो की, जर कुणी रात्रीच्या वेळी ग्रीलला टाईम बॉम्ब बांधला तर?... माझ्या मनात हा विचार वारंवार येत होता. छोटू आणि त्याची आई कदाचित झोपी गेले असावेत. कारण घरात शांतता होती. खोलीतील या शांततेत मी माझ्या हृदयाचे ठोके स्पष्टपणे ऐकू शकत होतो. बाहेर कशाचीही चाहूल लागली तरी मला माझे हृदय कुणीतरी मुठीत आवळते आहे असेच वाटत होते.
“तुम्ही अजून झोपला नाहीत?... बाहेर कुणी नाहीये... तुम्हाला उगीच संशय येतोय... तुम्ही दुसऱ्यांची झोप देखील घालवताय... छोटू झोपेतही थरथरतोय.” कूस बदलताना पत्नी मला म्हणाली. मी हळू आवाजात उत्तर दिले, “तू गप्प बसू शकत नाहीस का? परिस्थिती किती बिघडली आहे, याची तुला कल्पना नाहीये. दरवाजावर कुणीतरी धक्का दिल्याचा आवाज मी ऐकला होता. तो धक्का कुणी भुताने तर दिला नाही ना?... बाहेर कुणीतरी बोलतेय असे मला वाटतेय.”
“मी म्हणाले ना की, तुमच्या मनात संशय उत्पन्न झालाय म्हणून. तुम्ही इतके घाबरताय का? तुमचे कुणाशी वैर आहे का?” ती हळू आवाजात म्हणाली. मी पुन्हा उत्तर दिले,
“मी म्हणतोय ना की तू गप्प रहा म्हणून. माझं कुणाशीही वैर नाहीये. पण इथे आपला मित्र तरी कुणी आहे का? त्यांना तर केवळ बातमी हवीय. ते वर्तमानपत्रात नाव झळकण्यासाठी दुसऱ्याला मारतात. ही गोष्ट तुझ्या लक्षात का येत नाहीये? तू गप्प रहा.”
माझ्या मनात पुन्हा अद्भुत विचार येऊ लागले.... मी जीवन विम्याचा शेवटचा हप्ता भरलेला आहे किंवा नाही... मागचा हप्ता तर मी मित्राकडून पैसे उधार घेऊन भरला होता. मला आठवले की, रिस्क कव्हर मला आत्तादेखील आहे. काही क्षण मला आनंद झाला... मी काही दुर्घटना घडली तर माझ्या कुटुंबाला विम्याचा किती लाभ मिळेल याचाच विचार करू लागलो. मी विचार केला की, माझ्या बाबतीत काहीही घडले तरी माझ्या कुटुंबाला फारसा त्रास होणार नाही. दोन-तीन लाख तरी नक्कीच मिळतील. एक्सग्रशियाच्या एक लाखाव्यतिरिक्त मोठ्या मुलाला एसआरओच्या अंतर्गत सरकारी नोकरी मिळेल...
काही काळासाठी मला वाटले की, माझे मरण हेच माझ्यापुढील अनेक समस्यांचे उत्तर आहे. मरणाविषयीची माझी धारणा बदलली. मी विचार कला की, आतंकवादाच्या या वातावरणात कणाकणाने गुदमरून मरण्यापेक्षा एकदाच मरणे कितीतरी चांगले आहे. इकडे मासिक वेतनात झालेली वाढ आपल्या आवश्यकता पूर्ण करू शकत नाहीये. १५ तारखेलाच कर्जदारांची यादी बनवावी लागतेय. पगार हातात पडेपर्यंत यात अनेक वेळा बदल करावे लागताहेत. छोटू मागच्या आठवड्यापासून औषधदेखील घेऊ शकलेला नाही. त्याला आता अधिक वेदना होताहेत. माझ्या मनात एक वेगळीच इच्छा उत्पन्न झाली... हो... मरण्याची इच्छा... माझी भीती एकदम गायब झाली. माझ्यात धैर्य उत्पन्न झाले. बाहेर सकाळचा प्रकाश अंधाराला पराजित करीत होता. मी शेजारच्यांचा दरवाजा उघडतानाचा आवाज ऐकला. बाहेर पडताच मी चकित झालो. दरवाजाच्या बाहेर एक कुत्रा झोपला होता आणि जवळच एक चामड्याचा फाटका बूट पडला होता. त्याची अशी अवस्था कुत्र्याने रात्रभर चावल्याने झाली होती.”
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
अशा भीतीच्या सावटाखाली काश्मीरची सामान्य जनता गेली कित्येक वर्षं जगते आहे. निदा नवाज़ या कवीचे तीनदा अपहरण झाले होते. काश्मीरच्या परिस्थितीवर त्यांचे काय मत आहे, हे जाणून घेण्यासाठी त्यांच्या एका मुलाखतीतला छोटासा तुकडा तुमच्यासमोर ठेवतो.
प्रश्न : काश्मीरची जी आजची स्थिती आहे, त्याची मुळं कुठे आहेत असं आपल्याला वाटतं?
निदा नवाज़ : काश्मीरमधील आतंकवादाचे मूळ येथील निवडणुकांमध्ये होणाऱ्या घोटाळ्यांमध्ये आहे. आजपर्यंत तिथे जितक्या निवडणुका झाल्या, तितक्या सगळ्या निवडणुकांत घोटाळे झाले आहेत. केंद्र आपल्या मर्जीतील सरकार तिथे बनवत राहिले. १९८७च्या निवडणुकीत तर हद्दच झाली. त्यावेळी बहुमताने जिंकलेल्या मुस्लीम युनायटेड फ्रंटला पराजित घोषित करून जी पार्टी निवडणूक हारली होती, तिला विजयी घोषित केले गेले. या बरोबरच काश्मीरमध्ये १९८९ पासून आतंकवाद सुरू झाला. काश्मिरी जनता दिल्लीविषयी नाराज कधी होते आणि त्यांचा वापर आपल्या हितासाठी कधी करता येईल, याचीच वाट सीमेपलीकडील पाकिस्तान पहात होते. केंद्राने याकडे कधी लक्षच दिले नाही. हे मूठभर उपद्रवी लोकांचे काम आहे, असे समजून केंद्राने त्यांना दडपण्याचा प्रयत्न केला.
प्रश्न : आज सामान्य काश्मिरी जनतेची सगळ्यात मोठी समस्या काय आहे?
निदा नवाज़ : सामान्य काश्मिरी माणसाची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे त्याची सुरक्षितता. काश्मिरी जनता दोन्हीकडून पिसली जातेय. त्यांच्याकडे सुरक्षा बल आणि आतंकी संघटना दोन्ही देखील शंकेने बघतात. सैन्य प्रत्येकाकडे आतंकी किंवा आतंकींना मदत करणारा म्हणून पाहतात. तर आतंकी त्यांच्याकडे पोलिसांचे खबरे म्हणून पाहतात.
प्रश्न : आतंक आणि भय याच्या सावटाखाली आज येथी मुलं कशी विकसित होत आहेत?
निदा नवाज़ : ज्या समाजात गोळीबाराचे आवाज, बॉम्बचे धमाके, हातबॉम्बचे स्फोट, प्रत्येक क्षणी होत असतील, प्रत्येक दिवशी गोळीबारात किंवा बॉम्ब वर्षावात कुणीतरी मारला जात असेल, त्या समाजातील मुलांची मनोवस्था कशी असेल याची आपण कल्पना करू शकतो. भीती, दहशत आणि अनिश्चितता प्रत्येक क्षणी त्यांच्या मनात घोळत असते. घरातून निघालेल्या माणसाला घरी परत येण्याची खात्री नसते. काश्मीर घाटीमध्ये आज जो युवावर्ग आहे, जे दगड फेकणारे (पत्थरबाज) आहेत, ते तर या बंदुकांच्या गोळीबारात जन्मलेले आणि वाढलेले आहेत. त्यांच्या समोर सामान्य समाजाचे चित्र नाहीच. ज्या समाजात तुमच्या प्राणांची खात्री नाही, त्या समाजातील तरुण प्रोफेशनल करिअरची स्वप्न कशी पाहू शकणार? येथील नवी पिढीदेखील सर्वसामान्य काश्मिरी जनतेप्रमाणे गोंधळलेली आहे.
प्रश्न : जम्मू-काश्मीरमधील सांप्रदायिकतेकडे तुम्ही कसे पाहता?
निदा नवाज़ : खरं म्हणजे काश्मीरमध्ये सांप्रदायिकता बिलकूल नाही. धार्मिक कट्टरतावाद तर आहे, पण असहिष्णूता नाहीये. तिथे बंगाली, बिहारी, नेपाळी मजूर हजारोंच्या संख्येने आहेत. त्यांच्या त्यांच्या जातीबद्दल, धर्माबद्दल कधीही विचारले जात नाही. त्यांच्याबरोबर कोणताही भेदभाव न करता सन्मानजनक व्यवहार केले जातात. मागील ३० वर्षातील आकडे पाहिले तर या अवधीमध्ये आत्तापर्यंत ६० हजार लोक मारले गेले आहेत. मेलेल्या लोकांमध्ये काश्मिरी हिंदूंची संख्या फक्त २१९ आहे.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
प्रश्न : काश्मीर समस्येकडे आपण कसे पाहता?
निदा नवाज़ : काश्मीर एक भौगोलिक, ऐतिहासिक, आणि राजकीय समस्या आहे. धार्मिक तर अजिबात नाही. याला धार्मिक रंग देण्याचे काम पाकिस्तान करतो आहे. जेव्हा या विषयी बोलले जाते, त्यावेळी स्वातंत्र्याविषयी न बोलता धर्माविषयी बोलले जाते. त्या लोकांना विचारता येऊ शकते की, जेव्हा तुम्ही जम्मू-काश्मीरमध्ये इस्लामी शासन असावे असे म्हणता त्या वेळी जम्मू, लडाख किंवा कारगीलचा शिया समुदाय तुमच्या बरोबर का नसतो? ते भारताच्या बाजूने असतात. आज जगात धर्माच्या नावावर कोणत्याही देशात शासनव्यवस्था चालवली जाऊ शकत नाही.
प्रश्न : तुमच्या मते या समस्येचे समाधान कसे शक्य आहे?
निदा नवाज़ : केंद्र सरकारने काश्मिरी जनतेत जाऊन त्यांच्या मूलभूत समस्या काय आहेत, हे समजून घ्यायला हवे. त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरच काश्मीर समस्येचे समाधान होऊ शकते. जम्मू-काश्मीरच्या बाहेर देशभरात मागील काही वर्षात जो कट्टरतावाद पसरवला जातोय, विभाजन करण्याची जी चाल खेळी जातेय, त्याचा सरळ परिणाम काश्मीर घाटीवर होतोय. माझ्या मते काश्मीरसाठी भारताशिवाय कोणताही पर्याय नाही. अट एकच आहे की, भारत खरंच धर्मनिरपेक्ष आणि लोकतांत्रिक पद्धतीने या समस्येचे निराकरण करेल.
या सगळ्या विवेचनावरून निदा नवाज़ या कवीची मते अगदी स्पष्ट आहेत. आणि ते जनसामान्यांचे प्रतिनिधित्व करतात. जरी त्यांची सगळी मते आपल्याला पटली नाहीत तरी त्यांना जो काळरात्रीच्या पायातील अंधाराच्या पैंजणांचा आवाज येतो आहे, तो तरी खरा मानायला हरकत नाही.
..................................................................................................................................................................
लेखक चंद्रकांत भोंजाळ प्रसिद्ध अनुवादक, लेखक आहेत.
bhonjalck@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Vividh Vachak
Mon , 04 January 2021
काश्मीरमधील परिस्थितीचा पूर्वीच्या सरकारांनी स्वत:च्या स्वार्थासाठी फायदा करून घेतला व केवळ मूठभर उच्चभ्रू राजकारण्यांचाच फायदा झाला हे निर्विवाद. मला तर या मुलाखतीत पूर्वीच्या सरकारच्या नाकर्तेपणावर टीका केली आहे असे दिसते. सध्याच्या काळात, माझ्या सायकलचे टायर पंक्चर झाले तरी मोदी-शहांच्या नावाने शंख करण्याच्या वातावरणात हा लेख जरा उठून दिसतो कारण ३७० कलम व ३५अ वगैरे बद्दलचे उल्लेख लेखकाने किंवा कवीने टाळले आहेत असे वाटते. असो. असे असतानाही जनतेचे जीवन खडतर आहे यात वाद नाही आणि ते तवकरात लवकर सुधारावे ही सदिच्छा. एकच संख्या जरा हास्यास्पद वाटते ती म्हणजे ‘फक्त’ २८९ हिंदूंचा बळी गेला आहे, हे विधान. हे वाचून बळी जायला तिथे कितीसे हिंदू शिल्लक राहिलेत हा प्रश्न मनात उभा राहिला. तसेच कुठल्या निकषावर ही संख्या काढली गेली, व कुठल्या भौगोलिक क्षेत्रात, हा प्रश्नदेखील आपसूकच उभा राहतो. थोडक्यात, जेव्हा सांख्यिकी माहिती ही संपूर्ण स्वरुपात दिली जात नाही तेव्हा ती जाणून बुजून चुकीच्या स्वरुपात दिली जात असल्याचा संशय बळावतो त्यामुळे ती संपूर्ण स्वरुपात द्यावी अशी नम्र सूचना.