अजूनकाही
आजपासून डोंबिवलीमध्ये ९०वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. डोंबिवलीला गमतीनं ‘मुंबईची सदाशिव पेठ’ असं मानलं जातं. ते काही अंशी खरं आहे. या शहरानं आपलं परंपरागतपण काही प्रमाणात अजूनही टिकवून ठेवलं आहे. मात्र आपला सांस्कृतिक-साहित्यिक वारसा अलीकडच्या काळात या शहराला राखता आलेला नाही.
कै. पु. भा. भावे, शं. ना. नवरे, डॉ. वसुंधरा पटवर्धन ही डोंबिवलीतील काही साहित्यिक मंडळी. विंदा दा. करंदीकर, विजय तेंडुलकर, गोविंदराव तळवलकर, वा. य. गाडगीळ, प्रवीण दवणे, मिलिंद बोकील या नामवंतांनी डोंबवलीमध्ये काही काळ वास्तव्य केलं होतं. मात्र ‘पुण्याची मिनी आवृत्ती’ मानल्या जाणाऱ्या डोंबिवलीमध्ये होणारं हे पहिलंच अ.भा.मराठी साहित्य संमेलन आहे. पुण्यामध्ये मात्र आतापर्यंत तब्बल दहा संमेलनं झाली आहेत. त्यामुळे तुलनाच करायची झाली तर हे प्रमाण दहास एक असं निघतं. असो.
गेली १३९ वर्षं हे संमेलन अव्याहतपणे सुरू आहे. शिवाय अलीकडच्या काळात ते अतिशय भव्यदिव्य प्रमाणात होत आहे. (या वर्षीच्या संमेलनासाठी हा शब्दप्रयोग वापरता येणार नाही, पण असा एखाद-दुसरा अपवाद जमेस धरायचा नसतो.) साहित्यरसिकांचाही त्याला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. हे सर्व स्वागतार्हच आहे. पण हे अखिल भारतीय म्हणवलं जाणारं ‘साहित्य संमेलन ही संस्था आहे, संघटना आहे, चळवळ आहे, की वाऱ्यावरची वरात आहे? तिचे स्वरूप तरी काय आहे?’ असा प्रश्न तीसेक वर्षांपूर्वी ‘साठ संमेलनाध्यक्ष’ या पुस्तकात रा. प्र. कानिटकर यांनी उपस्थित केला होता. हा सवाल तेव्हाही बिनतोड होता आणि आजही तितकाच बिनतोड आहे. आजही या प्रश्नाचं फारसं समाधानकारक उत्तर देता येण्यासारखी स्थिती नाही.
कारण हे संमेलन ज्या उद्देशानं न्या. रानडे यांनी सुरू केलं होतं, तो उद्देश काही वर्षं पाळला गेलाही. महाराष्ट्राबाहेरही ग्वाल्हेर, इंदूर, बडोदे, हैदराबाद, दिल्ली, पंजाब या ठिकाणीही ही संमेलनं ‘मराठी साहित्याची’ आणि नावाप्रमाणे ‘अखिल भारतीय’ झाली, पण नंतरच्या काळात त्याचा परिघ आक्रसत गेला. आता तर ती त्याच त्याच परिघात होताना दिसतात. दोन वर्षांपूर्वीचा पंजाबचा अपवाद वगळता गेल्या १६ वर्षांत हे संमेलन महाराष्ट्राच्या बाहेरही गेलेले नाही. २००१ साली इंदूरला विजया राजाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली भरलेले साहित्य संमेलन आणि २०१५ साली पंजाबधील घुमानला डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली भरलेले साहित्य संमेलन, यांचा अपवाद वगळता हे अखिल भारतीय संमेलन महाराष्ट्राबाहेर जायला तयार नाही आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातही जायला तयार नाही. राजकारण्यांच्या पैशाशिवाय संमेलन करण्याचे मनसुबे तर महाराष्ट्रातील साहित्यरसिकांनी गेल्या अनेक वर्षांपासून उधळून लावले आहेत. सध्या तर महानगरपालिकांच्या निवडणुकांचा हंगाम चालू आहे. त्यामुळे डोंबिवलीतील संमेलनात आयोजकांकडून राजकारण्यांची मोठी भाऊगर्दी जमवली गेली आहे. इतकी राजकीय गर्दी जमवणाऱ्या आयोजक संस्थेला संमेलनासाठी लागणारा निधी दीडकोटीच्या पुढे जमवता आलेला नाही. त्यामुळे हे संमेलन गेल्या वर्षी पिंपरी-चिंचवडला झालेल्या संमेलनाच्या तुलनेत ‘गरीब’ म्हणावं लागेल. पैशाअभावी काही गोष्टींना काट मारली गेली आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे या वर्षीच्या संमेलनातील नियोजित कार्यक्रम सुमार म्हणावेत इतके वाईट आहेत. अर्थात आयोजक संस्थेचा अनुभव आगरी महोत्सव भरवण्याचा आणि साहित्य महामंडळाचा म्हणजे त्याच्या पदाधिकाऱ्यांचा अनुभव आपली वितभर विद्वता पाजळून हातभर करण्याचा. अशा परिस्थितीत संमेलनात फार काही घडू शकत नाही. तसं ते यंदाच नाही तर गेली काही वर्षं घडत नाही. दरवर्षी संमेलन वेगळ्या ठिकाणी होतं, पण त्याचं वेगळेपण सांगायचं झालं तर ते त्याच्या भव्य-दिव्यतेतल्या कमी-जास्तपणावरूनच सांगावं लागेल. कारण त्याव्यतिरिक्त संमेलनात बाकी काही फारसं घडत नाही. अलीकडच्या काळात पुस्तकांची विक्री मात्र चांगली होते. त्यामुळे प्रकाशक मंडळींचा फारसा काही तोटा होत नाही. पण साहित्यरसिकांना संमेलनात येऊन फारसं काही मिळत नाही. त्यामुळेही तीही मित्र परिवाराच्या गाठीभेटी घेण्यासाठी आणि चार-दोन तास कमरणुकीसाठी संमेलनाला येतात.
कारण संमेलनाच्या कार्यक्रमांमध्ये कल्पकता येण्याऐवजी कल्पनाशून्य पद्धतीने कार्यक्रमांची कशी आखणी करावी, याचा वस्तुपाठ संमेलनाच्या कार्यक्रमपत्रिकेवरून घेता येतो. त्यामुळे सुरुवातीला सर्व कार्यक्रमांना गर्दी होते आणि जसजसा कार्यक्रम पुढे जातो, तसतसा तिथला मंडप रिकामा होऊ लागतो. कवी संमेलन, कथाकथन यासारखे कार्यक्रमही साहित्यरसिकांना शेवटपर्यंत रोखून ठेवू शकत नाहीत. कारण त्यांची आखणी व नियोजन दयनीय पद्धतीने केलेली असते. कथाकारांना कुठली कथा वाचावी आणि किती वेळ वाचावी, वेळ नावाची गोष्ट पाळावी की नाही याच्याशी सोयरसुतक नसतं आणि कवींना तर श्रोते मिळाले की, त्यांना पिळता येईल तितकं पिळून घेण्यातच धन्यता वाटते.
मात्र असं असलं तरी अ.भा.मराठी साहित्य संमेलन दिवसेंदिवस पॉप्युलर होत चाललं आहे. अर्थात काही टीकाकारांच्या मते सवंग होत आहे. मात्र तरी त्याचं महत्त्व नाकारता येणार नाही. या संमेलनाच्या निमित्ताने मराठी साहित्यविश्वाला काहीएक जाग येते. प्रकाशनव्यवसायात उत्साह संचारतो. आणि महाराष्ट्रातील वातावरण काहीएक प्रमाणात साहित्यिक होतं. हीसुद्धा मोठीच गोष्ट आहे. ज्यांना या संमेलनाशी देणंघेणं नसतं ते साहित्यिक इतर छोट्या-मोठ्या संमेलनाला हजेरी लावतात. या केवळ नावानेच अखिल भारतीय असलेल्या संमेलनाची गुणवत्ता किमान चांगल्या साहित्याकडून सवंग साहित्याकडे तरी घसरत जाऊ नये. कारण या वर्षीची निमंत्रणपत्रिका पाहिल्यानंतर तो काजळीधोका प्रकर्षानं जाणवतो.
अ.भा. संमेलन कितीही मोठं असलं तरी ते सर्व थरातल्या लोकांना आणि साहित्याच्या सर्व विषयांना सामावून घेऊ शकत नाही, हेही तितकेच खरं आहे. किंबहुना त्यामुळेच वर्षभर महाराष्ट्रात इतर विविध साहित्य संमेलनं होत असतात. अर्थात ती छोटी संमेलनं असल्याने ती कल्पक, दर्जात्मक आणि गांभीर्यपूर्ण रीतीनं करणं शक्यही असतं. तसं अ.भा. संमेलनाचं होऊ शकत नाही. त्यामुळे किरकोळ गैरसोयींबद्दल उगाचच गळा काढण्याची गरज नसते. या संमेलनाच्या मोठ्या स्वरूपामुळे त्याचा दर्जा काही प्रमाणात लोकानुनयीच ठेवावा लागतो. पण लोकानुनयी म्हणजे सवंग नाही, हेही नीटपणे समजून घेण्याची गरज आहे. नाहीतर मग डोंबिवलीक संमेलन झाला, पण काय मजा नाय आला, असा प्रकार व्हायचा!
सर्वांत महत्त्वाचं म्हणजे अ.भा.संमेलनाचं नैमित्तिक वार्षिक कर्मकांड होऊ नये. कारण तसं झालं तर तो संमेलन संस्थापक न्या. रानडे यांचा पराभव नसेल, तर आपल्या नतद्रष्टपणाचा पुरावा असेल.
editor@aksharnama.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment