प्रा. कसबे यांनी संशोधनपद्धतीच्या नियमांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यांचे अनेक निष्कर्ष निराधार आहेत. या पुस्तकात परस्परविरोधी विधानांची उधळण आहे
ग्रंथनामा - बुक ऑफ द वीक
श्याम पाखरे
  • ‘गांधी : पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा’ या ग्रंथाचे मुखपृष्ठ
  • Sat , 02 January 2021
  • ग्रंथनामा बुक ऑफ द वीक गांधी : पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा Gandhi - Parabhut Rajkarni aani Vijayi Mahatma रावसाहेब कसबे Raosaheb Kasabe

रावसाहेब कसबे यांचे ‘गांधी : पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा’ हे बहुप्रतीक्षित पुस्तक अखेर ऑक्टोबर महिन्यात प्रकाशित झाले. गेली दोन-तीन वर्षे रावसाहेब गांधींवर पुस्तक लिहीत असल्याची चर्चा सुरू होती. त्यामुळे उत्सुकतेने ८०७ पानांची या पुस्तकाची जाडजूड प्रत हातात घेतली. शीर्षक जरा मेलोड्रॅमॅटिक वाटले. पुस्तकाच्या शीर्षकाखाली लेखकाचे नाव वाचायची सवय असलेली नजर या पुस्तकाच्या शीर्षकावर छापलेल्या लेखकाच्या नावापाशी जरा रेंगाळली. ‘पराभूत राजकारणी’ या गांधींना दिलेल्या बिरुदाशी मन सहमत होईना. पुस्तक वाचल्यानंतर कदाचित मन बदलेल, असा विचार करून पूर्वग्रहरहित मनाने पुस्तक वाचण्याचा संकल्प केला.

सर्वप्रथम लक्ष वेधून घेतले ते मुखपृष्ठावरील गांधींच्या चित्राने. हे चित्र प्रसिद्ध चित्रकार गुलाम मोहोम्मद शेख यांच्या २०१४ साली काढलेल्या ‘ट्रीपटीक’ चित्राचा एक भाग आहे. मूळ चित्राचे शीर्षक आहे – ‘गांधी आणि गामा’. त्यात मधल्या पॅनलमध्ये मध्ययुगीन जगाचा नकाशा आहे, उजव्या पॅनलमध्ये समुद्र ओलांडून येत असलेला, डाव्या हातात तलवार धरलेला वास्को द गामा, जगाच्या नकाशाकडे पाहत आहे. डाव्या पॅनलमध्ये जमिनीवर बसलेले गांधी जगाच्या आध्यात्मिक वारशाच्या पार्श्वभूमीवर त्या नकाशाकडे आणि वसाहतवादाचा प्रतिनिधी म्हणून चालून येणाऱ्या वास्को द गामाकडे आत्मचिंतनात्मक दृष्टीने शांतपणे पाहत आहेत. गांधींनी ‘हिंद स्वराज’ या पुस्तकात अधोरेखित केलेला प्राचीन, मध्ययुगीन जीवनदृष्टी आणि अन्याय, पिळवणुकीवर आधारित भांडवलशाहीवादी आधुनिक जीवनदृष्टीमधील संघर्ष, चित्रकाराने फार मार्मिकपणे व्यक्त केला आहे. मूळ चित्र ‘ट्रीपटीक’ असल्याने त्याचा गर्भितार्थ समजण्यासाठी ते तीनही पॅनल एका दृष्टीक्षेपात पाहणे आवश्यक आहे. त्यामुळे मुखपृष्ठ सजावटीसाठी वापरलेला चित्राचा केवळ एक भाग आणि त्यातील गांधी वाचकाला पूर्ण समजत नाहीत. चित्रातील गांधी १९१५चे गांधी आहेत. मुखपृष्ठावरील चित्रामधील त्यांची देहबोली आणि त्यांच्या डोळ्यांतील भाव यामुळे, ते भोळसट, व्यवहारशून्य असल्याचा गैरसमज पाहणाऱ्याला होऊ शकतो. गांधी भोळसट नक्कीच नव्हते. ते मानवी स्वभावाचे विविध कंगोरे चांगल्या प्रकारे समजून होते. ते व्यवहारशून्यदेखील नव्हते. ते स्वतःला ‘प्रॅक्टिकल आयडीआलिस्ट’ म्हणायचे. त्यात बरेच तथ्य होते.

पुस्तकाची बांधणी, सजावट, आतील छायाचित्रे उत्तम आहेत. पुस्तकाच्या मलपृष्ठावरील मजकूर वाचू लागलो आणि पहिल्याच घासाला खडा लागावा तसे वाटले. मजकुरातील पहिल्याच वाक्यात काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनाचे वर्ष चुकीचे दिले आहे. छपाईमध्ये चूक झाली असावी, अशी मनाची समजूत घालून मी पुस्तकाचे मुखपृष्ठ उलटून अनुक्रमणिकेकडे वळलो. अनुक्रमणिकेशेजारी गांधींचे टागोरांसोबतचे एक छायाचित्र छापले आहे. छायाचित्रात कस्तुरबा नाहीत तर एक अनोळखी महिला आहे. कॅप्शनमध्ये त्या महिलेचा उल्लेख ‘कस्तुरबा’ असा केला आहे. ही चूक म्हणजे जणू, पुढे पुस्तकात नजरेस पडू शकणाऱ्या अनेक तथ्यात्मक चुकांची नांदी तर नव्हे, अशी शंका मनात आली.

.................................................................................................................................................................

एकविसाव्या शतकात ‘आंबेडकरी तत्त्वज्ञाना’त लिहिली जाणारी कविता कशी असेल, याचं उत्तर म्हणजे ‘बीइंग’ हा कवितासंग्रह

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5250/Being

.................................................................................................................................................................

पुस्तकाचे एकूण तीन विभाग आहेत. पहिला विभाग ‘सत्यशोधक राजकारणी’, दुसरा ‘गांधी आणि आंबेडकर’ आणि तिसरा ‘रक्तज्वालात अंतहीन प्रवास’. प्रत्येक विभागात तीन प्रकरणे आहेत. अनुक्रमणिका वाचून मी पुढील पानांकडे वळलो. तेव्हा पानाच्या चारी बाजूंना एक इंच मार्जिन ठेवल्याचे जाणवले. इतकी मार्जिन का ठेवली, असा प्रश्न पडला. त्यामुळे विनाकारण पानांची संख्या वाढली. गांधींवरील पुस्तकाची मांडणी करताना काटकसरीचा विचार करायला हवा होता. मार्जिन कमी ठेवली असती तर निदान ५० ते ७५ पाने वाचली असती, त्या प्रमाणात पर्यावरणाचा ऱ्हासदेखील टाळता आला असता आणि कदाचित पुस्तकाची किंमतदेखील कमी करता आली असती, असा विचार मनात आल्याशिवाय राहिला नाही.

रावसाहेबांनी विस्तृत प्रस्तावना लिहिली आहे. प्रस्तावनेतील पृ. २८ वरील एका वाक्याजवळ येऊन थबकलो- ‘गांधी मुसोलिनीला भेटू शकत होते, पण लेनिनला नाही, कारण गांधी भारतातील ज्या प्रस्थापित शक्तीवर स्वार झाले होते, तिचे लेनिन हे सर्वांत मोठे शत्रू होते...’ प्रस्तावनेतच केलेल्या या भडक निष्कर्षात्मक विधानामुळे कपाळावर आठी उमटल्याशिवाय राहिली नाही. गांधी १९३१ साली गोलमेज परिषदेसाठी इंग्लंडला गेले होते. तेथून परतताना ते वाटेत इटलीला थांबले. तेव्हा मुसोलिनीच्या विनंतीवरून इच्छा नसतानाही केवळ शिष्टाचार म्हणून गांधी त्याला भेटले. वाट वाकडी करून ते मुसोलिनीला भेटण्यासाठी गेले नव्हते. लेनिनचा मृत्यू १९२४ साली झाला होता. १९३१ साली गांधी त्यांना कसे भेटू शकले असते आणि सोव्हिएत रशिया कोठे त्यांच्या मार्गात होता, असा प्रश्न वाचकाला पडू शकतो. हिंदू महासभेच्या विचारसरणीवर ‘फॅसिस्ट’ म्हणून टीका करणारे टीकाकार, महासभेचे नेते डॉ. मुंजे कसे मुसोलिनीला जाऊन भेटले, याचा दाखला देतात. असे असताना लेखक तथ्यांचा विचार न करता वरील गैरसमज निर्माण करणारे विधान का करतो, असा प्रश्न निर्माण होतो.

पृ. ३४वर ‘१९४६ साली इंग्रज भारत सोडून जाणार हे निश्चित, असे त्यांनी त्यांचे चरित्रकार लुई फिशर यांना सांगितले होते. त्यामुळे आता भारतीय भांडवलदारांची मर्जी संपादन करण्याचे कोणतेही कारण उरले नव्हते. गांधी स्वतंत्र बनले होते.’ हे वाचल्यानंतर गांधींच्या आयुष्यातील एक प्रसंग आठवला. साबरमती आश्रमाची स्थापना नुकतीच झाली होती. गांधींनी आश्रमवासियांच्या आणि खुद्द कस्तुरबांच्या विरोधाला डावलून एका अस्पृश्य कुटुंबाला आश्रमात प्रवेश दिला. नाराज होऊन उद्योगपतींनीदेखील आश्रमाला देणग्या देणे बंद केले. आश्रमाचे व्यवस्थापक आणि गांधींचे पुतणे मगनलाल गांधींना येऊन म्हणाले की, पुढील महिन्यासाठी आश्रमाचा खर्च चालवण्यास आपल्यापाशी पैसे शिल्लक नाहीत. त्यावर गांधी शांतपणे म्हणाले, ‘तर मग आपण अंत्यज वस्तीत जाऊन राहू.’

गांधींचे अहमदाबादमधील उद्योगपतींशी चांगले संबंध होते, तरीही गिरणी कामगारांच्या मागण्या न्याय्य होत्या म्हणून गांधींनी गिरणी मालकांविरुद्ध कामगारांनी पुकारलेल्या सत्याग्रहाचे नेतृत्व का केले? गांधींनी भांडवलदारांना खुश करण्यासाठी कधी आपल्या तत्त्वांशी प्रतारणा केल्याचे दिसत नाही. कोणत्याही अमिषापायी कोणी त्यांना बंधनात अडकवू शकत नव्हते. ते या गोष्टींच्या फार पलीकडे गेले होते. मग गांधींना भांडवलदारांची मर्जी संपादन करायची होती की, भांडवलदारांना गांधींची, असा प्रश्न मला पडला. प्रस्तावनेत एकामागून एक अशी रामशास्त्री बाण्याचा आव आणून केलेली भडक विधाने येतच राहिली आणि पुस्तकात पुढे काय वाढून ठेवले आहे, याची कल्पना येऊ लागली.

रावसाहेब पुस्तकात अनेक ठिकाणी परस्परविरोधी विधाने करतात. त्याची झलकदेखील प्रस्तावनेतच मिळाली. पृ. ३५वर ‘परंतु ते राजकारणात पराभूत झाले. या विषयाला अनेक कंगोरे आहेत. गांधी १९४५ नंतर एका पेचात सापडले होते. तो पेच त्यांना त्यांच्या खुनापर्यंत सोडविता आला नाही. तो पेचच त्यांच्या खुनाच्या कारणांपैकी एक कारण ठरला. तो पेच होता गांधी ज्या भारतीय प्रस्थापित शक्तीवर स्वार झाले होते, तिथेच थांबायचे की, त्या शक्तीला आव्हान देणाऱ्या नव्या समाजशक्तीवर स्वार व्हायचे? ही नवीन समाजशक्ती पं. जवाहरलाल नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत परिश्रमपूर्वक निर्माण केली होती.’

.................................................................................................................................................................

या मुलाखती म्हणजे मानवी सांस्कृतिक सौंदर्याचं प्रतिबिंब! आरसाच जणू. तुम्ही वाचकांनी त्यात डोकवावं. स्वतःस न्याहाळावं

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5255/Srujan-Sanwad-bhag-1-ani-bhag-2

..................................................................................................................................................................

गांधींच्या हत्येच्या कारणाचे वर्गीय विश्लेषण नवीन परंतु असमाधानकारक वाटले. गांधींनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला स्वतःच्या कर्तृत्वाने नवीन दिशा दिली होती. गांधींचे कार्य हे प्रस्थापित राजकीय, सामाजिक आणि आर्थिक शक्तींच्या विरोधात होते. परिस्थितीचा प्रभाव असतो, परंतु रावसाहेब गांधींच्या कर्तृत्वाकडे वरील विधानाद्वारे पूर्णतः दुर्लक्ष करतात. पृ. ५०वर ते लिहितात, ‘महापुरुष हा एकाच वेळी ऐतिहासिक प्रक्रियेचे अपत्य असतो आणि तो तिचा कर्ताही असतो. तो एकाच वेळी जगाचे स्वरूप आणि माणसांचे विचार यांच्यात बदल घडवून आणणाऱ्या सामाजिक शक्तींचा प्रतिनिधी आणि निर्माताही असतो.’ मग गांधीजींमध्ये काही कर्तृत्व नव्हते, ते केवळ चलाखीने इतरांनी निर्माण केलेल्या शक्तींवर स्वार होत असत, अशा अर्थाचे विधान ते का करतात हे समजेना.

प्रस्तावनेत पुढे पृ. ३६वर रावसाहेब लिहितात, ‘जे गांधी भारताला स्वातंत्र्य मिळवून देऊ शकतात, तेच जर नेहरू आणि जयप्रकाश, नरेंद्र देव यांच्या पाठीशी उभे राहिले तर ते भारत समाजवादीही घडवू शकतात, याची जाणीव भांडवलदार, जमीनदार आणि संस्थानिकांना होती. गांधींच्या खुनासाठी कोणी द्रव्यसाहाय्य केले आणि कोणी साधने पुरविली, हे गुपित राहिलेले नाही... तो खून म्हणजे सामंतशाही, भांडवलशाही आणि तिच्या कुशीतून जन्मलेल्या फॅसिस्ट हिंदू राष्ट्रवादी शक्तींनी एकत्र येऊन अतिशय सावधपूर्वक नियोजित पद्धतीने केलेला कट होता.’

आपल्या या विधानाचा प्रतिवाद रावसाहेब स्वतःच पृ. ५६४वर करतात, ‘गांधीजींच्या अहिंसेच्या अतिरेकामुळे जमीनदार आणि भांडवलदार भयमुक्त झाले. जनतेत त्यांच्याविषयी कितीही रोष होता तरी, जनता त्यांच्याशी दोन हात करण्यास सज्ज होणे शक्य नव्हते.’  असे असेल तर मग भांडवलदार आदी प्रस्थापित वर्ग गांधीजींच्या हत्येचा कट कसे करतील, असा प्रश्न वाचकाला पडू शकतो. गांधीजींच्या हत्येला ब्राह्मण्यवादी प्रवृत्ती कारणीभूत होती. लेखकाने भारतीय संदर्भाकडे दुर्लक्ष करून केवळ मार्क्सवादी वर्गीय दृष्टिकोनातून गांधीहत्येची कारणमीमांसा करणे, हे घोड्यापुढे गाडी ठेवण्यासारखे नव्हे काय?

उपरोक्त विचारांमुळे प्रस्तावना वाचता वाचता चित्तवृत्ती गंभीर झाली असताना लेखकाच्या एका विधानाने हसू आल्याशिवाय राहत नाही आणि मनावरील ताण जरा हलका होतो. पृ. ३७वर ‘गांधी ज्या प्रस्थापित समाजशक्तीच्या वाघावर १९२० सालापासून स्वार झाले होते, तो वाघ नरभक्षक होता. त्याला श्रमिकांच्या घामाची आणि माणसांच्या रक्ताची चटक लागलेली होती. ते त्याच्या पाठीवरून उतरण्याच्या प्रयत्नात खाली कोसळताच त्या वाघाने त्यांना गिळंकृत केले.’ तथ्यहीन नाट्यपूर्ण विधान केल्यामुळे वाचकाच्या मनावर लेखकाला अपेक्षित परिणापेक्षा उलट परिणाम होऊ शकतो, याचे हे एक चांगले उदाहरण होऊ शकते.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

‘गांधीपूर्व भारत : ऐतिहासिक पार्श्वभूमी’ या पहिल्या प्रकरणात साठ सत्तर पानांमध्ये लेखकाने पार सिंधू संस्कृतीपासून आधुनिक काळापर्यंतचा ऐतिहासिक आढावा घेण्याचा प्रयत्न केला. परंतु हा प्रयत्न फार वरवरचा वाटतो. सिंधू संस्कृतीपासून सुरुवात करण्याऐवजी रावसाहेबांनी आधुनिक काळावर लक्ष केंद्रित केले असते, तर बरे झाले असते! कारण ते गांधींपूर्व आधुनिक काळातील विविध राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रवाहांबद्दल वाचकाला अंतर्दृष्टी देऊ शकले नाहीत. या प्रकरणात काही तथ्यात्मक आणि विश्लेषणात्मक चुका आढळतात. पृ. ६८वर ‘...या संतांच्या काळातील मुसलमानी राजवटीचा काळ हा जाळपोळ, लुटालुटीचा काळ होता. मध्ययुगीन मुसलमानांनी हिंदू पुरोहित आणि बौद्ध भिक्खू यांच्या सर्रास कत्तली केल्या. मंदिरे आणि बौद्धविहाराची राखरांगोळी करून टाकली.’ 

येथे रावसाहेबांनी जणू सर्व मध्ययुगीन मुसलमान राज्यकर्ते हे अत्याचारी होते, अशा अर्थाची बेजबाबदार विधाने केली आहेत. निदान अकबरचा तरी अपवाद म्हणून उल्लेख करायला हवा होता. सुफी संतांनी समाजात हिंदू-मुस्लीम सौहार्द निर्माण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचादेखील उल्लेख या प्रकरणात केलेला नाही. मुसलमान राज्यकर्त्यांच्या हिंदूंपेक्षा मुसलमान प्रतिस्पर्ध्यांशीच अधिक लढाया झाल्या, असे मध्ययुगीन इतिहास वाचताना लक्षात येते. त्यामुळे गैर मुसलमान जनतेवर अत्याचार करणे हा नव्हे, तर सत्ता टिकवून ठेवणे हा मुसलमान राज्यकर्त्यांचा मुख्य हेतू होता, असे म्हणता येईल. हिंदू-मुस्लीम सौहार्दाचे काही ऐतिहासिक दाखले रावसाहेब पुढे आठव्या प्रकरणात वेगळ्या संदर्भात देतात. बौद्ध धर्माच्या ऱ्हासाला केवळ मुसलमान राज्यकर्ते जबाबदार होते, असे म्हणणे योग्य नाही. बौद्ध धर्माच्या पतनाला तुर्कांच्या आक्रमणापूर्वीच सुरुवात झाली होती.

दुसरे प्रकरण ‘सफाई कामगार ते संत’ ६२ पानांचे आहे. त्यात मुख्यतः गांधीजींच्या द. अफ्रिकेतील आयुष्याची चर्चा केली आहे. या प्रकरणातदेखील काही तथ्यात्मक चुका आहेत. हा संपूर्ण कालखंड गांधींच्या आयुष्याला कलाटणी देणारा होता, असे अनेकांना वाटते. आज या कालखंडामधे संशोधक अधिक रुची दाखवत आहेत. रावसाहेब पृ. १२२ वर लिहितात, ‘गांधीजींच्या वयाच्या चाळीस वर्षांपर्यंतच्या आयुष्यात विशेष दखल घ्यावी, असे त्यात फारसे काही घडले नाही.'  पुढे पृ. १२९वर म्हटले आहे, 'द. आफ्रिकेत गांधींनी सुख आणि चैनीचे दिवस भोगले. त्यात ते काही काळ रमलेही.'  वास्तविक पाहता गांधींच्या द. आफ्रिकेतील संघर्षाची सुरुवात ते तेथे गेल्यानंतर आठवडाभरात सुरू झाली. गांधी २५ मे रोजी द. आफ्रिकेला पोहोचले आणि ३१ मे रोजी त्यांना मारिट्झबर्ग रेल्वेस्थानकावर ट्रेनच्या पहिल्या वर्गाच्या डब्यातून बाहेर काढण्यात आले. एकूणच लेखकाने द. आफ्रिकेतील घडामोडींची फार उथळ चर्चा केली आहे. त्यामुळे रावसाहेबांनी गांधींच्या द. अफ्रिकेतील कालखंडाचा पूर्ण अभ्यास केला आहे की नाही, असा प्रश्न पडतो.

या प्रकरणात पुढे पृ. १२७ वर ते लिहितात, 'गांधीजींचा हा भारतातील प्रवास बघता एक गोष्ट सहज ध्यानात येते की, त्या वेळी भारतात असलेल्या सर्व महत्त्वाच्या नेत्यांना गांधी भेटलेले दिसतात. त्यामागे केवळ दक्षिण आफ्रिकेतील हिंदी लोकांची दुर्दशा त्यांच्या कानावर घालायची होती की, त्यांच्या भारतातील पुढील वास्तव्याची तयारी करावयाची होती?’ हे विधान गांधींच्या १८९६ सालच्या भारत भेटीसंदर्भात केले आहे. द. आफ्रिकेत बराच काळ राहावे लागणार असा विचार करून भारतातील आपल्या कुटुंबालादेखील तेथे घेऊन जावे, तसेच द. आफ्रिकेतील समस्येसंदर्भात भारतातील जनमत जागृत करावे, या उद्देशाने गांधी भारतात आले होते. रावसाहेब काही पुरावा नसताना गांधींच्या प्रामाणिक हेतूविषयी शंका उपस्थित करतात. अशी अनेक निराधार विधाने या पुस्तकात डोळे झाकून ठोकून दिली आहेत.

या प्रकरणात पृ. १३३वर रावसाहेब लिहितात,'गांधींच्या 'हिंद स्वराज' या पुस्तकाचा निष्कर्ष असा की, हिंदुस्थानी संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे. ती इतकी महान आहे की, तिला इतर कोणाकडूनही नवे असे काहीही शिकण्यासारखे नाही.’ रावसाहेबांनी ‘हिंद स्वराज’ची केलेली समीक्षा आणि त्यासंदर्भात काढलेला निष्कर्ष अत्यंत उथळ आहे. सु. श्री. पांढरीपांडेंनी ‘हिंद स्वराज आणि नवे मन्वंतर’ या पुस्तकात ‘हिंद स्वराज’मधील विचारांची एकविसाव्या शतकातील प्रासंगिकता स्पष्ट करून सांगितली आहे. जागतिकीकरण, नवउदारमतवादाने सृष्टीच्या अस्तित्वासमोर उभ्या केलेल्या संकटातून मार्ग केवळ आपली जीवनदृष्टी बदलल्यानेच निघू शकतो आणि त्यासंदर्भात ‘हिंद स्वराज’मधील विचार मौलिक आहेत, याचे मार्मिक विश्लेषण पांढरीपांडेंनी केले आहे. केवळ हिंदू संस्कृतीचे श्रेष्ठत्व सिद्ध करणे, असा संकुचित हेतू हे पुस्तक लिहिण्यामागे नक्कीच नव्हता. अन्याय, पिळवणूक, अत्याचार, विलासिता, वसाहतवाद, साम्राज्यवाद असे विविध पैलू असणाऱ्या आणि माणुसकीला पायदळी तुडवणाऱ्या तथाकथित आधुनिक संस्कृतीपेक्षा मानवी मूल्ये, नैतिकता, संयम केंद्रस्थानी असणाऱ्या प्राचीन, मध्ययुगीन संस्कृतीचे श्रेष्ठत्व सिद्ध करणे, हा गांधीजींचा हेतू होता. ती प्राचीन, मध्ययुगीन संस्कृती- मग ती युरोपिअन, आफ्रिकन किंवा भारतीय असो, तिचे श्रेष्ठत्व गांधींना अभिप्रेत होते.

पृ.१४४ वर रावसाहेब एक विधान करतात, 'सत्याग्रहाच्या प्रभावाने राष्ट्रभक्तीची मक्तेदारी क्षणात नष्ट झाली. ज्यांनी राष्ट्रभक्तीचे दरवाजे इतरांना जाणीवपूर्वक बंद करून ठेवले होते, ते राष्ट्रभक्तीचे बंद दरवाजे असंख्य स्त्री-पुरुषांनी त्यांच्यातील आत्मबळाच्या धडकेने फोडून उघडे केले...त्यामुळे ब्रिटिश शासन हादरले...’ हे वाचल्यानंतर गांधी पराभूत राजकारणी कसे, असा प्रश्न पडतो. हा प्रश्न पुढे अनेक वेळा पुस्तक वाचताना पडतो.

..................................................................................................................................................................

‘खिंडीत’ : शैक्षणिक जगताच्या अंतरंगाची विरूपता भेदकपणे उलगडणाऱ्या कथा

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5254/Khindit

..................................................................................................................................................................

तिसरे प्रकरण ‘शेतकरी-कामगार नेते ते महात्मा’, हे ७३ पानांचे आहे. यात लेखक गांधींच्या भारतातील आगमनापासून असहकार आंदोलनाच्या समारोपापर्यंतच्या कालखंडाची चर्चा करतो. तथ्यात्मक चुकांची मालिका या प्रकरणातदेखील खंडित होत नाही. या प्रकरणातील, म. फुल्यांचा ‘सत्यधर्म’ आणि गांधींचे ‘सत्याचे प्रयोग’, ही चर्चा चांगली झाली आहे. हा अपवाद वगळता, या प्रकरणात काही नवीन विचार मांडलेला दिसत नाही. लेखकाने या प्रकरणात निराधार विधाने केलेली नाहीत. परंतु ती वादळापूर्वीची शांतता आहे. पुढील प्रकरणामध्ये लेखकाने गांधींवर निराधार निष्कर्षांचा भडीमार केलेला दिसतो.

चौथे प्रकरण ‘अंतर्विरोधाच्या भोवऱ्यात महात्मा’ हे ८८ पानांचे आहे. त्यापैकी बरीचशी पाने डॉ. आंबेडकरांसंबंधी माहितीने व्यापली आहेत. ‘सत्याग्रह-आंबेडकर आणि गांधी’ या मथळ्याखाली रावसाहेबांनी गांधी आणि आंबेडकर यांच्या सत्याग्रहासंबंधी भूमिकेची चांगली चर्चा केली आहे. सत्याग्रह या संकल्पनेचे जनक गांधी. अहिंसा, साधनशुचिता ही सत्याग्रहाची पायाभूत तत्त्वे आहेत. परंतु आंबेडकरांचा अहिंसा आणि साधनशुचितेवर विश्वास नसल्याचे रावसाहेबांनी केलेल्या चर्चेतून दिसते. त्यामुळे आंबेडकरांना अभिप्रेत सत्याग्रह, हा सत्याग्रह कसा असू शकतो, असा प्रश्न पडतो (पृ. ३१४). या प्रकरणात रावसाहेबांनी गांधींना आरोपीच्या कठड्यात उभे केले आहे. परंतु ते आरोपीला आपली बाजू मांडण्याची संधी देत नाहीत. त्यामुळे त्या आरोपांचा सविस्तर आढावा घेणे आवश्यक ठरते:

(पृ.२५८) 'गांधी हे अतिशय महत्त्वाकांक्षी गृहस्थ होते.' (पृ.२५९) 'गांधीजींचे जीवन हे एकीकडून इतरांना खुरटे करून स्वतः राजकीय चळवळीचे नेतृत्व करण्याची प्रबळ इच्छा तर दुसरीकडून अध्यात्मिक क्षेत्रातून स्वर्गाचे राज्य मोक्ष मिळविण्याची महत्त्वाकांक्षा यात गुंतलेले होते. त्यांची हीच अवस्था १९४६च्या अंतापर्यंत होती. त्यामुळे त्यांच्या निर्णयक्षमतेवर आणि चळवळीवर निश्चितच काही चांगले वाईट परिणाम झाले.'

लेखकाचे हे विधान मान्य होण्यासारखे नाही. गांधींनी कधीही आपल्या सहकाऱ्यांना खुजे करण्याचा प्रयत्न केला नाही. उलट त्यांना त्यांचे कर्तृत्व सिद्ध करण्यास सतत प्रोत्साहन आणि स्वातंत्र्यदेखील दिले. सहकाऱ्यांना त्यांची आवड आणि क्षमतेनुसार विविध कार्यक्षेत्र उपलब्ध करून दिले. यासंदर्भात एक उदाहरण देता येईल. गांधींनी बार्डोली सत्याग्रहाचे नेतृत्व वल्लभभाई पटेलांना करण्यास सांगितले. सत्याग्रहाला देशविदेशात चांगली प्रसिद्धी मिळाली. त्या वेळी गांधींनी पटेलांच्या कार्यात कोणताही हस्तक्षेप केला नाही. पटेलांना अटक झाल्यानंतरच ते बार्डोलीला गेले. गांधींमुळे काँग्रेसचे नेते दबले जातात, अशी टीका जेव्हा करण्यात आली, तेव्हा त्यांनी १९३४ साली काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. १९४६ नंतर जेव्हा त्यांना जाणवले की, त्यांच्या मार्गदर्शनाची आता नेहरू-पटेल आदी सहकाऱ्यांना आवश्यकता नाही, तेव्हा ते स्वतःहून सत्तांतराच्या वाटाघाटीपासून दूर झाले. गांधींनी माणसे घडवली. गांधींच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सहकाऱ्यांच्या कर्तुत्वाला बहर आला. त्यामुळेच गांधींनंतर देशाला कर्तृत्ववान नेतृत्वाची कमतरता जाणवली नाही. ही वस्तुस्थिती असताना, रावसाहेब वरील विधान का करतात, हे समजत नाही.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

ई-बुक खरेदीसाठी पहा -

https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/

..................................................................................................................................................................

पृ.२५९ 'गांधीजी त्यांच्या आयुष्यात शेतकरी आणि कामगार यांच्या दुःखामागील कारणांचा शोध घेत होते. पण तो त्यांचा शोध फसवा होता. त्यांनी वरवरची करणे शोधली आणि त्यावर मलमपट्टी केल्यासारख्या चळवळी करून ती सोडविली. परंतु त्यांच्या मूळ कारणांपर्यंत ते कधीच पोहोचू शकले नाहीत. कारण त्यांचा तेवढा राजकारणाचा अभ्यास नसावा आणि अर्थशास्त्राच्या दृष्टीने त्यांची पाटी कोरी असावी. त्यांच्या काळात जागतिक स्तरावर ज्या राजकीय उलथापालथी होत होत्या, त्याकडेही त्यांनी फारसे गांभीर्याने पाहिलेले दिसत नाही. त्यांना 'व्यवस्था' - system - नावाची काही गोष्ट असते आणि ती माणसाच्या जीवनात एक सर्वस्पर्शी भूमिका पार पाडीत असते याचे व्यावहारिक भान कधीच आले नव्हते. त्याचे एक कारण त्यांनी स्वतःला अध्यात्मात घेरून ठेवले, हे असू शकते... त्यांनी कार्ल मार्क्स यांचे कॅपिटल वाचले असल्याचा आणि त्यांनी त्यापेक्षा 'भांडवला'वर अधिक चांगला ग्रंथ लिहिला असता, असा दावा केला असला, तरी ते त्यांना शक्य नव्हते.’

रावसाहेबांचे गांधींच्या क्षमतेबद्दलचे हे निष्कर्ष अत्यंत निराधार आहेत. संशोधन पद्धतीचे ज्ञान असलेली व्यक्ती अशी बेजबाबदार विधाने कशी करू शकते, याचे आश्चर्य वाटते. त्यांनी या विधानांचे स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्नदेखील केलेला नाही. या विधानाचा प्रतिवाद करताना, नोआखली पदयात्रेदरम्यान नबग्राम येथील प्रार्थना सभेत गांधींनी तेभागा आंदोलनाला पाठिंबा देताना केलेल्या भाषणातील एक परिच्छेद आठवला,

'ते भागा आंदोलनाद्वारे बरगादार शेतकऱ्यांनी जमीनमालकांना अर्ध्या उत्पन्नाऐवजी एक तृतीआंश भाग देण्याची जी मागणी केली आहे, ती अगदी योग्य आहे. मी त्यापुढे जाऊन म्हणेन की, जमीन प्रत्यक्ष कसणाऱ्यालाच जमिनीचे संपूर्ण उत्पन्न मिळाले पाहिजे. सर्व जमीनीचा स्वामी परमेश्वर आहे. त्यावर कोणीही मालकी हक्क सांगू नये. मला विश्वास आहे की, जो जमीन कसत नाही, त्याचा जमिनीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर कोणताही अधिकार नसतो. पण हे आंदोलन चालवताना आंदोलकांनी कोणत्याही परिस्थितीत जोरजबरदस्ती किंवा हिंसा करू नये. मी आणखी एक मुद्दा येथे मांडू इच्छितो. माझे असे ठाम मत आहे की, जर भारताला खरेखुरे स्वातंत्र्य अनुभवायचे असेल,  तर भंगी, डॉक्टर, वकील, शिक्षक किंवा व्यापारी आदी सर्व कामगार, व्यावसायिकांना समान वेतन मिळायला हवे. भारतीयांना हे उद्दिष्ट पूर्णपणे वास्तवात उतरवणे कदाचित शक्य होणार नाही. तरीदेखील आपल्यापैकी सर्वांनी हा आदर्श दृष्टीसमोर ठेवून त्यादिशेने कृती करावी. तसे केल्यानेच ही माती सर्वांगीण सुखी समाधानी होईल.’

पृ.२६१ ‘...गांधीजींच्या समकालीन असलेल्या लेनिन, माओ-त्से-तुंग यांच्या मार्गाने जायचे की येशू आणि बुद्ध यांच्या, याबद्दल त्यांच्या मनात सतत संभ्रम होता. शेवटी त्यांनी व्यवस्थेच्या समर्थनाचा मार्ग स्वीकारला. परंतु त्यांच्या प्रत्यक्ष चळवळीत एक खुबी अशी होती की, अनेक प्रागतिक चळवळींचा जन्म त्यांच्याच कुशीत झाला. त्यांची काँग्रेस सर्वसमावेशक बनली.’

राजकारणात गांधींनी केवळ लेनिन आणि माओ-त्से-तुंग यांचाच पर्याय ठेवायला हवा होता, असे रावसाहेबांना सतत वाटते. या दोन पर्यायांशिवाय इतर पर्याय नव्हतेच आणि ते गांधींनी इतर पर्यायांचा शोधदेखील घ्यायला नको होता, असा रावसाहेबांच्या मनात एक पूर्वलक्षी सुप्त अट्टाहास तर नाही, असा प्रश्न पडतो.

गांधींनी टॉल्स्टॉय, रस्किन, थोरो यांनी उभ्या केलेल्या पर्यायाचा स्वीकार केला होता. धार्मिक क्षेत्रात केवळ ख्रिस्ती, बौद्धच नव्हे तर जगातील सर्व धर्मांमधील चांगल्या विचारांचा त्यांनी स्वीकार केला होता. त्यासोबत राजकारणाच्या आध्यात्मिकरणाचा प्रयोगदेखील यशस्वीपणे करून दाखवला होता. शिवाय जर सर्व प्रागतिक चळवळींचा जन्म त्यांच्या कुशीत झाला आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे काँग्रेस एक हिंदू संगटना न बनता सर्वसमावेशक बनली, असे रावसाहेबांना वाटते तर त्यांना ‘पराभूत राजकारणी’ कसे म्हणता येईल?

पृ. २६९ ‘... एकच गोष्ट खरी आहे ती म्हणजे बायको आणि मुलांना आपल्या तालावर नाचविणे, त्यांना नियंत्रणात ठेवणे, त्यांना आपल्या आज्ञेप्रमाणे, जीवन जगायला भाग पाडणे ही  त्यांच्यात असलेली पराकोटीची परपीडन प्रवृत्ती होती... सत्याच्या शोधाच्या आणि राष्ट्रप्रेमाच्या  नशेमुळे गांधी ना कर्तव्यदक्ष बाप बानू शकले ना प्रेमळ पती.' 

हे वाचून गांधींच्या आत्मकथेतील एक प्रसंग आठवला. द. आफ्रिकेत असताना एकदा कस्तुरबांची तब्येत फार बिघडली होती. डॉक्टरांनी त्यांना मीठ आणि कडधान्ये आहारातून वर्ज्य करण्यास सांगितले होते. कस्तुरबांना ते जमेना. तेव्हा पत्नीला साथ देण्यासाठी गांधींनी मीठ आणि कडधान्ये खाणे सोडून दिले. त्या वेळी त्यांनी आपली सर्व कामे बाजूला ठेवून कस्तुरबांची सेवा केली आणि त्यांना बरे केले.

असे अनेक प्रसंग गांधीचरित्रात आढळतात. एक हरीलालचा अपवाद सोडता गांधींची इतर तीन मुले त्यांच्या आयुष्यात यशस्वी झाली, त्यांनी स्वतःची ओळखदेखील निर्माण केली. हरिलाल कसाही असला तरी कस्तुरबा निवर्तल्यानंतरदेखील शेवटपर्यंत गांधींनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले नाही. नोआखलीच्या कठीण काळातदेखील त्यांचे हरीलालकडे लक्ष होते. त्यांनी नोआखलीहून हरीलालला लिहिलेले पत्र उपलब्ध आहे. त्यामुळे रावसाहेबांचा वरील निष्कर्ष गांधींवर अन्याय करणारा नाही का, असे वाटत राहते.

पृ. २६९ 'बॅ. महम्मद अली जिनांना गुजराती भाषा बोलता येत नव्हती आणि लोकमान्य टिळकांना हिंदुस्थानी भाषा. गांधी जाहीर सभेत त्यांनी गुजरातीत आणि हिंदुस्थानित बोलावे, अशी जाहीर सूचना करून त्यांचा पाणउतारा करीत होते आणि त्यांची नाचक्की झाल्याचा आनंद उपभोगत होते... या प्रवृत्तीला परपीडनाशिवाय दुसरा कोणता शब्द वापरायचा?’ 

..................................................................................................................................................................

हेही पाहा : सत्तर वर्षांनंतरही सात आव्हाने कायम! आणि सात पापकर्मांमुळेच सात आव्हाने कठीण!

..................................................................................................................................................................

रावसाहेब अनेकदा मनोवैज्ञानिकाच्या भूमिकेत शिरून हास्यास्पद विधाने करत असल्याचे दिसते. गुजराथी कुटुंबात जन्मलेल्या जिनांना गुजराती भाषेत आणि राष्ट्रीय राजकारणात आयुष्य वेचलेल्या लोकमान्यांना हिंदुस्थानी भाषेत बोलायला सांगण्यामागे कोणती परपीडनाची वृत्ती लेखकाला जाणवते, हा प्रश्न पडतो.

पृ.२७० '१९४२च्या 'चले जाव' आंदोलनास अनेक काँग्रेसजनांचा विरोध होता. तरीही त्यापैकी अनेकांना काही वर्षे तुरुंगात सडावे लागले. शेवटी त्याची फलनिष्पत्ती काहीही नव्हती. जे घडले ते चर्चेने आणि संविधानिक मार्गानेच.’ 

‘चले जाव’ चळवळीचे नेतृत्व गांधींनी करावे, अशी विनंती काँग्रेसने त्यांना केली होती. चळवळीचा ठराव अखिल भारतीय काँग्रेस समितीने आपल्या मुंबई येथील अधिवेशनात बहुमताने पारित केला होता. मग आंदोलनाला विरॊध असणारे ‘अनेक’ काँग्रेसजन कोणते, हे रावसाहेबांनी स्पष्ट करून का सांगितले नाही? भारताला १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य हे चर्चेमुळे किंवा संविधानिक मार्गाने नव्हे तर १८५७पासून सुरू झालेल्या, विविध स्तरांवर केलेल्या संघर्षामुळे मिळाला, त्यामध्ये ‘चले जाव’ चळवळीचादेखील समावेश होतो. ज्यांनी ‘चले जाव’ चळवळीत भाग घेतला नाही, त्यांची त्यावर टीका करण्याची एक वृत्ती दिसून येते, मग ते कम्युनिस्ट, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा हिंदू महासभावाले असोत. ‘चले जाव’ चळवळीच्या काळात आपण जी भूमिका घेतली, त्यात काही चुका होत्या, याची कबुली निदान CPI(M)ने तरी दिली आहे.

पृ. २७० - 'गांधीजी हे सतत विकास पावणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्याइतकी आत्मचिकित्सेची शक्ती त्यांच्या समकालीनांपैकी कोणतही नव्हती. ते एक असे महापुरुष होते की, त्यांच्यात स्वतःत बदल करण्याची आणि भोवतालच्या परिस्थितीत हस्तक्षेप करून तिला इच्छित वळण लावण्याची अमोघ शक्ती त्यांनी कमावलेली होती.’ (पराभूत राजकारणी?)

पृ.३३० - 'नेहरू अतिशय अल्पमतात असूनही लाहोर काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून गांधींनी जवाहरलाल नेहरूंच्या नावावर शिक्कामोर्तब केले. गांधी आपल्या राजकीय आयुष्यातील सर्वात मोठी आणि प्रभावी खेळी खेळले होते. तिचे दूरगामी परिणाम होणार होते. गांधींनी जवाहरलाल नेहरूंकडे काँग्रेसची सूत्रे देऊन आणि आपला वारसदार जवाहरलाल आहेत, हे घोषित करून एका दगडात दोन पक्षी मारले, पहिले कम्युनिझमचे आणि दुसरे फॅसिझमचे भारतात येणारे रस्ते कायमसाठी बंद करून टाकले.’

हे विधान वाचून दोन प्रश्न मनात उभे राहतात. गांधी पराभूत राजकारणी कसे? साम्यवादी क्रांती केवळ एका नेत्यावर अवलंबून असते की ऐतिहासिक भौतिकवादाच्या सिद्धांतानुसार भौतिक परिस्थितीवर?

पृ.३३१ - ‘...गांधीजी इतक्या सहजासहजी गांधीयुगाचा अंत होऊ देणार होते? त्यांच्याजवळ इतके हातखंडे प्रयोग होते की, त्यांची कल्पनाही कोणी करू शकत नव्हता.’ (पराभूत राजकारणी?)

या प्रकरणात आणि संपूर्ण पुस्तकात जी काही थोडी संतुलित विधाने सापडतात त्यापैकी एक म्हणजे पृ. २९५ वरील हे विधान, ‘... आंबेडकरांची गांधींबद्दल एकच तक्रार होती. ती म्हणजे गांधीजी हिंदू-मुस्लिम प्रश्न आणि खादीचा प्रचार जितका तळमळीने करतात तितका अस्पृश्यता निर्मूलनासाठी करीत नाहीत. त्यांची ही तक्रार खरी होती आणि तिला दोन्ही बाजूंकडून काही कारणेही होती. गांधीजींना ज्या स्पृश्य हिंदूंचे मतपरिवर्तन करावयाचे होते, ते मन धार्मिक अंधश्रद्धांनी ओसंडून वाहत होते आणि त्याच्यावर हजारो वर्षांच्या रूढींची पुटे चढलेली होती. ती खरवडून काढण्यासाठी त्यांना अधिक वेळ लागत होता...गांधीजींचे सवर्ण हिंदू समाजात अस्पृश्यतेविरोधी जाणीव निर्माण करणे, हे तुलनेने अवघड काम होते. डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्य वर्गात अस्पृश्यतेविरोधी जाणीव निर्माण करणे, हे सोपे काम होते.’

..................................................................................................................................................................

हेही पाहा : अर्वाचीन काळात कोट्यवधी भारतीयांच्या मनात ‘रामा’चे नाव कोणी रुजवले असेल तर, ते म. गांधीजींनी!

..................................................................................................................................................................

पाचवे प्रकरण ‘डॉ. आंबेडकरांची राजकीय भूमिका’ १५० पानांचे आणि पुस्तकातील सर्वांत दीर्घ आणि महत्त्वाचे प्रकरण आहे. यात लेखक साऊथबरो कमिशनपासूनची आंबेडकरांची राजकीय भूमिका, त्यात कालानुरूप आलेले बदल विशद करून सांगतो. आंबेडकरांचा स्वतंत्र मतदारसंघांना असलेला तत्त्वतः विरोध परंतु सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या हक्काअभावी केलेली स्वतंत्र मतदारसंघाची मागणी, गांधी आणि आंबेडकर यांची पहिली भेट, संवाद, आंबेडकरांनी दुःखी अंतःकरणाने केलेले 'आम्हाला राष्ट्र नाही' हे मनाला चटका लावणारे विधान, दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या वेळी झालेला गांधी-आंबेडकर वादविवाद, सांप्रदायिक निवाडा, त्याविरोधात गांधींचे प्राणांतिक उपवास आणि पुणे करार, हा सारा ऐतिहासिक पट रावसाहेबांनी फार सुरसपणे मांडला आहे. हे प्रकरण डॉ. आंबेडकरांवर असल्याने त्यात गांधींच्या भूमिकेबद्दल जास्त माहिती मिळत नाही. उलट हे प्रकरण वाचताना गांधींबद्दल वाचकांच्या मनात गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. रावसाहेब सवयीप्रमाणे भडक, निराधार अशी काही विधाने करून त्यात भरदेखील घालतात.

पृ.४५९ वर ते लिहितात, ‘...कारण गांधींचे उपोषण उदात्तही नव्हते आणि श्रेष्ठ दर्जाचेही नव्हते. गांधींनी ते केवळ एक डावपेचाचा भाग म्हणून वापरायचे ठरविले होते. गांधींना या उपोषणात मरायचे नव्हते तर अधिक जगायचे होते.’ हे विधान गांधींवर अन्याय करणारे आहे. त्यांनी येरवडा कारागृहात केलेला उपवास, हा अस्पृश्यांच्या प्रश्नाविषयी त्यांना प्रामाणिकपणे वाटणाऱ्या आस्थेपायी होता. या उपवासादरम्यान गांधींची प्रकृती किती खालावली होती आणि तरीही करार झाल्यानंतरदेखील त्यास ब्रिटिश शासनाने मान्यता दिल्यानंतरच त्यांनी उपवास सोडला, याचे दाखले उपलब्ध आहेत. वरील विधानाचा प्रतिवाद रावसाहेब स्वतःच शेवटच्या काही पानांमधे करतात. तो भाग खरोखर वाचनीय आहे. ‘पुणे करार’ आणि गांधींच्या भूमिकेविषयी सर्वसामान्य माणसाच्या विशेषतः आंबेडकरी अनुयायांच्या मनात प्रचंड गैरसमज आहेत. ते दूर होण्यास त्यामुळे मदत होईल. असे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणे हेदेखील आजच्या काळात फार हिमतीचे काम आहे. प्रकरणाच्या शेवटी रावसाहेबांनी ती हिंमत दाखवल्याचे कबूल करावे लागेल -

पृ.४८२ 'मुळात प्रश्न असा आहे, गांधीजींचे उपोषण कोणाविरुद्ध होते?... गांधींनी उपोषणाला सुरुवात करण्यापूर्वीच दि. १५ सप्टेंबरला एक निवेदन प्रसिद्धीला दिले होते. त्यात गांधींनी त्यांच्या जीवाची संपूर्ण जबाबदारी प्रत्येक हिंदूंवर व्यक्तिशः टाकलेली होती. ‘...जर भारतातील हिंदू समुदाय अस्पृश्यतेच्या सर्व फांद्या कापून काढून तिला मुळासकट उपटून काढणार नसतील तर त्यांनी कोणतेही आढेवेढे न घेता माझ्या प्राणांचा बळी घ्यावा.’

पृ.४८४ 'अस्पृश्यतेच्या विरोधात भारताच्या इतिहासात पहिल्यांदा घडलेली एक मानसिक क्रांती होती. ती करण्याचा चंग गांधींनी अबोल राहून बांधला होता. उपोषणामुळे ती क्रांती काही प्रमाणात का होईना, परंतु यशस्वी झाली होती आणि गांधींतील 'गूढ' उघड झाले.’

पृ. ४८४ 'समजा बाबासाहेब म्हणाले होते, त्याप्रमाणे पुणे करारातील अटी गांधींनी लंडनध्येच मान्य केल्या असत्या किंवा गांधींनी उपोषण न धरताच त्या भारतात मान्य झाल्या असत्या तर त्याची एक राजकीय समझोता म्हणून फारतर नोंद झाली असती. इतर राजकीय समझोत्यांपैकी तो एक समझोता ठरला असता एवढेच. परंतु गांधींच्या उपोषणामुळे भारतात जी सवर्ण हिंदूंच्या मनात अस्पृश्यतेविरोधी मानसिक क्रांती झाली तिला भारत कायमचा मुकला असता... आंबेडकरांनी अस्पृश्यांना जागृत केले म्हणून हा प्रश्न ऐरणीवर आला. गांधीजींनी स्पृश्यवर्गात अस्पृश्यतेविरोधी भावना निर्माण केली. त्यामुळे हा प्रश्न कायमचा मिटण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यासाठी आंबेडकरांची विद्वत्ता पणाला लागली आणि गांधींचे अध्यात्म.’

परंतु या प्रकरणात डॉ. आंबेडकरांच्या राजकीय भूमिकेची समग्र चर्चा केलेली नाही. त्यांनी आदिवासींना राखीव मतदारसंघ देण्यास एके काळी विरोध का केला होता? तसेच ‘पुणे करारा’नंतर गांधींचे मनापासून आभार मानणारे आंबेडकर काही वर्षांनंतर ‘पुणे करारा’वर टीका का करू लागले? त्यांनी ‘काँग्रेस आणि गांधींनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या १९४५ साली प्रकाशित पुस्तकातून गांधींवर कठोर टीका का केली? १९५५ साली बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी गांधींची निर्भत्सना का केली? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत राहतात. रावसाहेब त्याकडे दुर्लक्ष का करतात, असा प्रश्न मनात उभा राहतो.

..................................................................................................................................................................

हेही पाहा : ‘जाहीर प्रदर्शन मांडलं नाही तर ती भावना तुमच्यात नाही’, अशी वृत्ती असणाऱ्या मंडळींना ‘महात्मा गांधी’ कळणं अशक्य आहे!

..................................................................................................................................................................

सहावे प्रकरण ‘आंबेडकरांशी केलेल्या संघर्षातून गांधींत आरपार बदल’ हे जवळजवळ १०० पानांचे आहे. गांधींचा समताधिष्ठित वर्ण आणि जातिव्यवस्थेवर विश्वास होता. परंतु तो स्वप्नाळू विचार होता. आधुनिक काळात वर्णजातिव्यवस्था कालबाह्य ठरली होती. वर्ण आणि जाती व्यवस्थेतूनच अस्पृश्यतेचा जन्म झाला या वास्तवाची जाणीव आंबेडकरांनी गांधींना करून दिली. गांधींनी या वास्तवाचा स्वीकार केला. त्यांनी जातीव्यवस्था नष्ट झाली पाहिजे, आंतरजातीय विवाह व्हायला हवेत, अशी भूमिका घेतली. ज्या विवाहात वधू-वरापैकी एक जण दलित समाजातील नसेल, त्या विवाहाला गांधी उपस्थिती लावत नसत. पुढे १९४७पर्यंत गांधींचा वर्णव्यवस्थेवरील विश्वासदेखील उडाला. गांधींच्या विचारांतील हे स्थित्यंतर लेखकाने स्पष्ट करून सांगितले आहे. आंबेडकरांनी धर्मांतर करण्याचा उद्देश जाहीर केल्यानंतर गांधी-आंबेडकरांमध्ये वृत्तपत्रीय लेखांच्या माध्यमातून झालेली चर्चादेखील वाचनीय आहे. अस्पृश्यतेच्या प्रश्नावर घेतलेल्या भूमिकेमुळे कट्टर हिंदूंकडून गांधींना सहन करावा लागलेला प्रचंड विरोध, १९३१ नंतर त्यांची हत्या करण्यासाठी झालेले विविध प्रयत्न, यांची चांगली चर्चा लेखकाने केली आहे. १९९७ साली ‘ईपीडब्ल्यू’मध्ये सुहास पळशीकरांचा गांधी आणि आंबेडकरांवर एक लेख प्रसिद्ध झाला होता. त्यात पळशीकर दोघांमधील वादाचा मूळ मुद्दा ‘परंपरा’ होती, असे मार्मिकपणे नमूद करतात. गांधी परंपरेचा समाजसुधारणेसाठी अत्यंत सर्जनशीलपणे उपयोग करून घेत होते, तर अस्पृश्यतेचा उगम परंपरेतून झाला, असे आंबडकरांचे मत होते, त्यामुळे त्यांनी ती उदध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, असे पळशीकर नमूद करतात.

या प्रकरणाच्या उत्तार्धात रावसाहेबांनी अचानक मार्क्सला गांधींसमोर उभे केले. ‘कार्ल मार्क्स आणि गांधी’ या मथळ्याखाली  पृ. ५५८ वर ते लिहितात, 'गांधी जसे ईश्वराच्या शोधात होते, तसे मार्क्स माणसाच्या शोधात होते.’ पुढे पृ. ५९८ वर ते लिहितात, ‘...ईश्वर परप्रेमरूप आहे; त्याच्यावर प्रेम केल्याशिवाय त्याच्या इच्छेप्रमाणे वागल्याशिवाय त्याची प्राप्ती अशक्य असते. परंतु गांधींना तो कधी भेटलाच नाही. गांधींचा शोध सुरूच होता.' 

रावसाहेबांना गांधींचा ईश्वर आणि अध्यात्म समजलेले दिसत नाही. गांधींचा ईश्वराचा शोध संपलेला होता. त्यांना मनुष्य आणि चराचर सृष्टीमध्ये वसणारा ईश्वर केव्हाच सापडला होता. आयुष्याच्या अखेरपर्यंत ‘दरिद्रनारायणा’ची तर ते सेवा करत होते. येथे तुलना करताना कार्ल मार्क्सच्या सिद्धान्तामधील त्रुटींकडे रावसाहेब पूर्णपणे दुर्लक्ष का करतात आणि गांधींची बोळवण केवळ एक व्यवहारशून्य अध्यात्मिक पुरुष या अर्थाने का करतो, असा प्रश्न पडतो.

पुढे पृ.५६४ वर रावसाहेब सवयीप्रमाणे पुन्हा एका निराधार निष्कर्षाप्रत पोहोचतात, 'गांधीजींनी देश जागृत केला, परंतु कशासाठी? हा प्रश्न शेवटपर्यंत अनुत्तरित राहिला. तो जागृत होऊनही भारतीय व्यवस्थेवर त्याचा साधा ओरखडाही उमटला नाही...' आज गांधींचे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि कम्युनिस्टांसारखे विरोधक देखील रावसाहेबांच्या या विधानाशी सहमत होणार नाहीत. ते पुढे लिहितात, (पृ.५६४/५६५) ‘...गांधीजींनी फक्त १९२० साली सुरू केलेली असहकाराची चळवळ चौरीचौऱ्याचे निमित्त करून थांबविली नसती आणि तिला तिच्या नैसर्गिक पद्धतीने पुढे जाऊ दिले असते, तर क्रांती होऊ शकली असती… तिच्यात हिंसा झाली असती. ती टाळणे कोणालाही शक्य झाले नसते... समाजवादी क्रांती ही त्या वेळी हिंदू आणि मुस्लिम शेतकऱ्यांची आणि कामगारांची गरज होती. ती जर गांधीजींच्या नेतृत्वाखाली पूर्ण झाली असती, तर संपूर्ण जगाला क्रांतीचा एक नवीन धडा मिळाला असता आणि कॉ. लेनिनच्या अगोदर जगाने गांधीजींचे नाव उच्चारले असते.’ 

हे वाचून रावसाहेब लेनिनचे अंधभक्त तर नव्हे असे वाटायला लागते, कारण लेनिनच्या विचारसरणीतील त्रुटी, त्याच्या कारकिर्दीत रशियन जनतेच्या विचारस्वातंत्र्याचे पंख छाटण्याचे धोरण, चेकाच्या माध्यमातून निर्माण केलेला दहशतवाद, प्रचंड हिंसा, त्याच्यानंतर स्टॅलिनने अधिक विक्राळपणे पुढे चालवलेले धोरण, या मुद्द्यांकडे रावसाहेब दुर्लक्ष करतात. मार्क्सवाद हा परिपूर्ण सिद्धान्त आहे, त्यात कोणताही दोष नाही, असे रावसाहेबांना वाटत असल्याचे हे पुस्तक वाचताना अनेक ठिकाणी जाणवते.

मार्क्सवादाचे रशियात काय झाले, माओच्या चीनमधे आज कामगारांचे शोषण कसे होते, मानवी हक्कांची निघृण पायमल्ली कशी केली जाते, या वास्तवाकडे रावसाहेब कानाडोळा करतात. आज रशियन लोक लेनिनला विसरले आहेत. परंतु केवळ भारतात नव्हे तर जगभरातील दीनदलितांनी गांधींची आठवण ठेवली आहे. ते आजही अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा जनसामान्यांना देतात. '... तो सामान्य माणूस आपल्या मानवी हक्कासाठी लढणार हे निश्चित. गांधीजींचे नथुरामच्या पिस्तुलातील गोळ्यांनी सांडलेले रक्त फुकट वाया जाईल असे वाटत नाही.' या वाक्याने आपण पुस्तकाच्या स्वलिखित प्रस्तावनेचा शेवट केला आहे, हे रावसाहेब वरील विधान करताना विसरल्याचे दिसते.

..................................................................................................................................................................

हेही पाहा : गांधी हा काहींच्या टवाळीचा विषय असतो. आपण सर्वज्ञ आहोत अशी समजूत करून घेतली की, हे ओघाने येतेच. - रावसाहेब कसबे

..................................................................................................................................................................

सातवे प्रकरण ‘स्त्रियांच्या सहवासात’ हे आहे. गांधींचे स्त्री सहकाऱ्यांशी असलेले संबंध हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. या मुद्द्यावर गांधींचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न आजही जाणीवपूर्वक केला जातो. या विषयावर एरीक एरिक्सन, गिरीजा कुमार यांनी अभ्यासपूर्ण पुस्तके लिहिली आहेत. रावसाहेबांनी त्यांचा संदर्भ दिला आहे. त्यांनी या विषयावर एक प्रकरण लिहिण्याचा प्रयत्न केला, हे चांगले झाले. विषय फार व्यापक आहे आणि त्याला अनेक पैलू आहे. परंतु रावसाहेबांनी मुख्यतः लैंगिक वासनेला केंद्रस्थानी ठेवून गांधी आणि त्यांच्या स्त्रीसहकाऱ्यांमधील संबंधांबाबत चर्चा केली आहे. त्यासाठी फ्रॉइडच्या मनोविश्लेषणाचा मुख्यतः आधार घेतला आहे.

रावसाहेबांनी ‘सेलिबसी’ आणि ‘ब्रह्मचर्य’ या शब्दांना समानार्थी समजल्यामुळे गल्लत झाली आहे. भारतीय संस्कृतीत ‘ब्रह्मचर्य’ ही फार व्यापक संकल्पना आहे. ‘ब्रह्मचर्य’ म्हणजे पूर्णतः वासनारहित होणे. त्याचा संबंध केवळ लैंगिक वासनेशी नव्हे तर इतर वासनांशीदेखील आहे. राग, लोभ, असत्य, हिंसा इत्यादी विकारांचा लैंगिक वासनेशी आंतरसंबंध असतो. गांधी या दृष्टिकोनातून ब्रह्मचर्याचे पालन करत होते. ‘लैंगिकतेचा इतिहास’ (Gender History) हे एक नवीन संशोधनक्षेत्र म्हणून पुढे आले आहे. मृणालिनी सिन्हा, जोसेफ ऑल्टर यांनी वासाहतिक लैंगिकतेच्या (पुरुषत्व आणि स्त्रीत्व) पार्श्वभूमीवर गांधींच्या विचारांचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे. रावसाहेबांनी यासंदर्भात ओझरता उल्लेख पुस्तकात केला आहे. हे प्रकरण अधिक व्यापक दृष्टीने लिहिण्याची आवश्यकता होती.

स्वातंत्र्यलढ्याच्या काळात गांधींच्या प्रयत्नांमुळे महिलांनी घरभिंती ओलांडून सार्वजनिक जीवनात प्रवेश केला. गांधींनी सार्वजनिक ब्रह्मचार्याला महत्त्व दिल्यामुळे रुढीप्रिय समाजात स्त्रियांना सार्वजनिक क्षेत्रात परपुरुषांसोबत काम करता आले. गांधींनी महिलांचा त्यांच्या शरीरावरील अधिकार मान्य केला. विवाहित स्त्रीलादेखील ब्रह्मचर्य पालन करण्याचा अधिकार आहे, असे गांधी म्हणाले. ही क्रांतिकारक भूमिका होती. यासंदर्भात जयप्रकाश नारायण आणि त्यांची पत्नी प्रभावतींचे उदाहरण सर्वश्रुत आहे. महिला स्वातंत्र्यलढ्यात सामील झाल्यामुळे, लढ्याला एक वेगळे परिमाण प्राप्त झाले. अशा अनेक मुद्द्यांचा विचार या प्रकरणात करता आला असता.

आठवे प्रकरण ‘अखंड वेदनादायी स्वातंत्र्य’ आणि नववे प्रकरण ‘वन मॅन आर्मी’, या दोन प्रकरणांनी पुस्तकाची जवळजवळ ८० पाने व्यापली आहे. गांधींच्या कारकिर्दीच्या शेवटच्या दोन वर्षांचा आढावा रावसाहेबांनी या प्रकरणांत घेतला आहे. तसे पाहता हा काळ गांधींच्या आयुष्यातील परमोच्च बिंदू. त्याची विस्तृत चर्चा करणे अपेक्षित होते. रावसाहेबांनी भारतात सांप्रदायिकतेचा उदय, एक सेक्युलर राजकारणी ते पाकिस्तानचे जनक असा जिन्नांचा प्रवास, सावरकर आणि संघप्रणीत हिंदू सांप्रदायिकता यांची चर्चा आठव्या प्रकरणात केली आहे. हिंदू महासभा आणि संघ यांचे गांधींशी शत्रुत्व का होते, याचे समर्पक विश्लेषण रावसाहेबांनी केले आहे. गांधींची हत्या करण्याचा कट कसा रचण्यात आला, याचीदेखील चर्चा केली आहे. परंतु गांधींची नोआखलीमधील पदयात्रा, कलकत्यामधील दंगली थांबवण्यासाठी केलेला उपवास, या महत्त्वपूर्ण घटनांची चर्चा केवळ एक दोन पानांत उरकली आहे. दिल्लीमधील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचीही फारच त्रोटक माहिती दिली आहे. गांधी हत्येच्या प्रसंगाने पुस्तकाचा समारोप होतो.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

रावसाहेब एक नावाजलेले विचारवंत आणि राज्यशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक आहेत. तरीदेखील सखेद असे नमूद करावे लागते की, त्यांनी इतके महत्त्वाकांक्षी पुस्तक लिहिताना संशोधनपद्धतीच्या नियमांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यांचे अनेक निष्कर्ष निराधार आहेत. परस्परविरोधी विधानांची उधळण पुस्तकात झाली आहे. त्यांनी या पुस्तकाचे हस्तलिखित एखाद्या तज्ज्ञाकडून तपासून घेतले होते की नाही, याचा उल्लेख प्रस्तावनेत नाही.

रावसाहेबांचा गांधींवरील अभ्यास अत्यंत अपुरा आहे. त्यामुळे गांधीविचारांचा ज्यांचा अभ्यास आहे, त्यांच्याकडून हस्तलिखित तपासून घेणे आवश्यक होते. जागतिक कीर्तीचे लेखकदेखील ही प्रक्रिया पूर्ण करतात.

या पुस्तकाचा सर्वांत मोठा दोष म्हणजे रावसाहेब स्वतःशीच प्रामाणिक नाहीत. ते कम्युनिस्ट, आंबेडकरवादी आणि गांधीवादी अशा सर्वांना आपल्या लिखाणाने खूष करण्याची कसरत करताना दिसतात. परंतु अशी कसरत करणे हे राजकारण्यांचे काम असते, संशोधकाचे नव्हे.

रावसाहेबांनी स्वतःशी प्रामाणिक राहून त्यांना जे वाटते, ते लिहावे. सत्य कितीही कटू असले तरी ते सत्य असते. त्यामुळे काही वाचक नाराज होऊ शकतील, परंतु निदान त्यांच्या संशोधक म्हणून सचोटीवर तरी कोणी शंका उपस्थित करणार नाही.

रावसाहेबांनी प्रस्तावनेत लिहिले आहे की, हे त्यांचे शेवटचे पुस्तक आहे. मी त्यांना विनंती करू इच्छितो की, लेखक म्हणून आपल्या कारकिर्दीची अखेर त्यांनी या पुस्तकाने करू नये. मुखपृष्ठावरील अपूर्ण चित्रामधील गांधी ज्याप्रमाणे पाहणाऱ्याला समजत नाहीत, त्याचप्रमाणे हे पुस्तक वाचून वाचकाला गांधी पूर्णतः समजत नाहीत, ते फार थोडे समजतात.

‘गांधी : पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा’ - रावसाहेब कसबे, 

लोकवाङ्मय गृह, मुंबई, पाने - ८१०, मूल्य - १००० रुपये.

..................................................................................................................................................................

लेखक श्याम पाखरे के. सी. महाविद्यालयामध्ये (चर्चगेट, मुंबई) इतिहास विभागात सहायक प्राध्यापक आहेत.

shyam.pakhare111@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Pralhad Mistri

Thu , 14 January 2021

पुस्तकाचे शीर्षक जाहीर झाल्यापासूनच मला ते योग्य वाटले नाही. कारण शतकानुशतकांचा राजकीय पट ज्यांच्या राजकीय प्रवेशामुळे पार बदलून गेला त्या व्यक्तीचे ‘पराभूत राजकारणी’ असे मूल्यमापन पटत नाही. ब्रिटिशांकडून या देशाचे सत्तांतर अयोग्य हातांकडे झाले असते तर जेवढी लोकशाही दृष्टीस पडते आहे तेवढी सुद्धा दिसलीच नसती. ते तसे झाले नाही यास केवळ गांधी नावाच्या व्यक्तीचा राजकारणातील प्रवेश हेच कारण आहे. पुस्तकाच्या शीर्षकाचा प्रतिवाद करणारे पुस्तकातीलच संदर्भ श्री. श्याम पाखरे यांनी दिलेले आहेत. सत्तांतर आपल्या हाती झाली नाही म्हणून ज्यांनी शेवटी चिडून हत्या केली त्यांना आजही गांधी मिटवता येत नाही. गांधीजींविषयी व अनुषंगाने जे अनेक गैरसमज मुद्दाम रुजवले गेले आहेत, जसे – गांधी हे भांडवलदारांची मर्जी साभाळून असत. मुस्लीम राजांनी हिंदू पुरोहितांच्या आणि बौद्ध भिक्षूंच्या कत्तली केल्या. अहिंसा व सत्याग्रह कुचकामी ठरलेत. इत्यादी. या गैरसमजांचे बळी पुस्तक लेखक सुद्धा ठरले आहेत ते पुस्तकपरीक्षक दाखवून देतात. या उणीवा दाखवतांना श्री. श्याम पाखरे स्वतःची मते न लादता ते पुरावे देऊन ‘हा सूर्य हा जयद्रथ’ अशी कृतीच करतात. पण मला एक कॉमेंट करावी वाटते. ‘....गांधी जाहीर सभेत त्यांनी गुजरातीत आणि हिंदुस्थानीत बोलावे, अशी जाहीर सूचना करून त्यांचा पाणउतारा करीत होते.....’ हे रावसाहेबांचे विधान. पण असत्य, हिंसा, चोरी यांच्याप्रमाणेच गांधींच्या शब्दकोशात सूड, बदला, पाणउतारा, वचपा, कटकारस्थान, निंदा-नालस्ती, अपमान या शब्दांना देखील स्थान नव्हते आणि या भावना गांधींच्या चित्ताला स्वप्नात देखील शिवत नसाव्यात. गांधीजीचे मूल्यमापन करण्यासाठी गांधींचे हृदय कळले पाहिजे. गांधींचे हृदय कळले की गांधींचे विचार आणि कार्य कळते. अशा अनेक चुका पुस्तक परीक्षण लिहिणाऱ्या श्री. श्याम पाखरे या तरुण प्राध्यापकांनी दाखवून दिल्या आहेत. त्यामुळे हे पुस्तक वाचतांना वाचकास सावध राहावे लागणार आहे. श्री. श्याम पाखरे यांना एकदा भेटलो आहे. त्यावेळी त्यांचा गांधी या विषयावरील अभ्यास किती आहे याची काही कल्पना नव्हती. मात्र या पुस्तक परीक्षणाच्या निमित्ताने त्यांचा अभ्यास लक्षात येतो. - प्रल्हाद मिस्त्री


Bhagyashree Bhagwat

Thu , 07 January 2021

अतिशय समतोल, संयत आणि नेमकं परीक्षण आहे! अशी परीक्षणे हल्ली फारशी वाचायला मिळत नाहीत! धन्यवाद!!


Gamma Pailvan

Mon , 04 January 2021

श्याम पाखरे,

रावसाहेब कसब्यांचं लेखन वाचणं हा एक घोर अत्याचार आहे. तुम्ही त्यांची आठशे पान वाचली असतील, तर या नरकयातना सहन केल्याबद्दल तुमचा जाहीर सत्कार व्हायला हवा.

कसबे या माणसाचं आकलन एखाद्या लिंबूटिंबू भिडूसारखं आहे. त्यांच्या झोत या पुस्तकाची दोन पानं वाचून मी मायबोली संकेतस्थळावर 'आगाऊ' नामे सदस्यास उद्देशून माझा अभिप्राय लिहिला होता. तो मायबोलीच्या प्रशासकांना आवडला नाही, म्हणून त्यांनी तो तिथनं उडवून लावला. त्याचा जालनिर्देश असा आहे : https://www.maayboli.com/node/40926?page=3#comment-2566136

तर तो प्रतिसाद मी इथे डकवतो. त्यावरनं रावसाहेब कसबे यांचं लेखन ही काय चीज आहे ते छानपैकी कळून येईल.

------------------------- अभिप्राय सुरू -------------------------

आगाऊ,

१.
>> तशा चर्चेत उघडपणे येण्याची संघाची तयारी नाही, हे छुपे राजकारण सोडून मैदानात यायला काय हरकत >> आहे?

संघ उघडपणे का येत नाही याची संगती लावण्याचा एक अल्पसा प्रयत्न करतो. इब्लिस यांनी एका पुस्तकाचा दुवा दिला आहे. झोत असं त्या पुस्तकाचं नाव आहे. लेखक रावसाहेब कसबे आहेत. त्यातल्या ४२ व्या पानावर लेखकाने एक निरीक्षण नोंदवलं आहे.

या देशात पुरोगामी चळवळी सुरू होऊन शंभर-सव्वाशे वर्षे लोटूनही समाजवाद व लोकशाही मूल्यांवर श्रद्धा ठेवणाऱ्यांनी भारतीय तरुणांना जडवाद म्हणजे काय, भारतीय तत्त्वज्ञानाच्या जडवादी परंपरा समर्थ असूनही तिला जाणीवपूर्वक बदनाम का केले गेले, चैतन्यवाद व जडवाद यांतील मूलभूत फरक कोणते, या प्रश्नांची खोलात जाऊन चर्चा केली नाही. भारतीय समाजवादी आणि साम्यवादी यांनी जडवाद स्वीकारला असला तरीही त्यांच्यात भारतीय इतिहासाची भौतिकवादी मीमांसा कशी करता येईल याबद्दल भरपूर गोंधळ आहे. हे जिकीरीचे काम समाजवाद्यांकडून न झाल्याने व जे थोडेफार झाले ते तरुणांच्यापर्यंत न पोचल्याने गोळवलकरांनी मांडलेला विकृत इतिहास तरुणांना आकर्षित करू लागला. यात दोष गोळवलकरांचा नसून समाजवादी व साम्यवादी यांच्या या क्षेत्रातील कर्तृत्वशून्यतेचा आहे.

स्वतःला पुरोगामी, बुद्धीजीवी वगैरे विशेषणांनी सजवणार्‍या डाव्या विचारसरणीच्या लोकांना समाजवादी विचारवंत असलेल्या रावसाहेब कसब्यांनी घरचाच आहेर दिलाय. आपल्याच बुडाचा ठिकाणा नसतांना समाजवादी लोकं दुसर्‍याच्या धुडाच्या नसत्या पंचायती करताहेत!
आता मला सांगा की, ज्या लोकांची वैचारिक बैठक पक्की नाही त्यांच्यासमवेत कसली डोंबलाची चर्चा करायची?
२.
पुढे कसबे म्हणतात (पान ४३) की :
>> गोळवलकर गुरुजींनी त्यांच्या विचारधनात भारतीय इतिहास अतिशय आकर्षकपणे मांडला असला तरी ती >> भारतीय इतिहासाची वस्तुनिष्ठ आणि शास्त्रीय मीमांसा नाही.
कसबे कसल्या आधारे गोळवलकरांची मीमांसा वस्तुनिष्ठ व शास्त्रीय नसल्याचा दावा करताहेत? इथे समाजवादी (म्हणजे डाव्या) वैचारिक चौकटीचा पत्ता नाही. मात्र शास्त्रीय काय आणि वस्तुनिष्ठ काय हे कसब्यांना कुठूनतरी ठाऊक झालं!! धन्य आहे!!!
सामान्य जनतेच्या भाषेत याला बेअकलीपणा म्हणतात.
३.
कसब्यांच्या कल्पनेचा वारू आता चौखूर उधळला आहे. पुढे म्हणतात :
>> समाजवादी विचारसरणीजवळ इतिहासाच्या वस्तुनिष्ठ मीमांसेचे एक शास्त्र आहे. गोळवलकरांना हे शास्त्र >> मान्य नाही. कारण समाजवादी तत्त्वज्ञानातील आर्थिक समतेच्या तत्त्वांवर त्यांचा विश्वास नाही.
काय म्हणावं असल्या पढतमूर्खपणाला! गेल्या शंभर सव्वाशे वर्षांत त्यांच्यासारख्या समाजवाद्यांनी हे शास्त्र का विकसित केलं नाही? स्वत:चा कुठला अवयव हलवीत बसले होते हे थोरथोर बुद्धिमंत? (नंदीबैलासारखी मुंडी हलवीत होते का, असा अर्थ अभिप्रेत आहे. आमच्या पठडीत तय्यार झालेले मायबोलीचे वाचक नेमका भलताच अर्थ काढतील यांत आम्हांस तिळमात्र संदेह नाही! )
४.
पुढे कसब्यांनी बेजबाबदारपणाचा कळस गाठला आहे. ते म्हणतात :
>> भारतीय इतिहासाची वस्तुनिष्ठ मीमांसा शक्य असूनही त्यांनी जाणीवपूर्वक नाकारली, कारण त्या पद्धतीतून >> लोकशाही समाजवादाची बीजे जनतेत रुजण्याचा त्यांना धोका वाटत होता.
हा काय बकवास लावलाय! त्यांनी आधी म्हंटलंय की गेल्या शंभर सव्वाशे वर्षांत कर्तृत्वशून्य समाजवाद्यांमुळे इतिहासमीमांसेचं समाजवादी शास्त्र विकसित झालं नाही. तर मग गोळवलकरांना ते मीमांसाशास्त्र कसंकाय अवगत होणारे? अपेक्षा काय आहे कसब्यांची? गोळवलकरांनी स्वत:चे विचार आणि परिश्रम घालून समाजवादी विचार पुष्ट करीत बसायचं?
मग समाजवादी विचारवंत काय करणार? नुसतं ढुढ्ढाचार्यांसारखं बसून हुकूम सोडणार की समाजवाद ह्यंव आणि समाजवाद त्यंव म्हणून? गावावरून ओवाळून टाकावं अशी आळशी पैदास आहे ही!!
आळसयुक्त बेजबाबदारपणा म्हणतात तो हाच!
५.
पण थांबा. या सर्वांवर कडी यायचीये. पुढे कसबे म्हणतात :
>> ... इतिहासाचे मूल्यमापन न करता फक्त ऐतिहासिक घटनांवरच त्यांना (=गोळवलकरांना) जास्त भर देणे >> भाग पडले.
इतिहासाचे दोन भाग पडतात. पहिला घटना (facts) आणि दुसरा दृष्टीकोन (perspective). घटनांबद्दल मतभेद नसतात, तर दृष्टीकोन मात्र प्रत्येकाचा वेगळा असतो. इतिहासाचे मूल्यमापन करतांना घटनांना प्राधान्य दिले पाहिजे. जर दृष्टीकोनास प्राधान्य दिलं तर ते मूल्यमापन वस्तुनिष्ठ न होता प्रचारकी थाटाचं होतं. इथे कसबे घटनांना (म्हणजे वस्तुस्थितीला) दुय्यम ठरवीत आहेत. समाजवादी विचारवंतांची नेहमी वास्तवाशी फारकत का झालेली असते ते छानपैकी कळून येतं.
ज्या इतिहासात वास्तवाला कमी लेखलं जातं तो इतिहास नसून बकवास असतो.
असो.
या पुस्तकाला सरकारी अनुदान लाभले पाहिजे. भारतीय समाजवाद्यांचा मूर्खपणा, भंपकपणा, बेअकलीपणा, बेजबाबदारपणा, आळशीपणा, वास्तवाशी असलेली फारकत, इत्यादि तमाम सद्गुणांची सरकारी खर्चाने जाहिरात झाली तर जनतेचा पैसा सत्कारणी लागेल, नाहीका?
------------------------- अभिप्राय समाप्त -------------------------

आपला नम्र,
-गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......