अजूनकाही
पत्रकार संतोष शिंत्रे यांचा ‘बायोस्कोप’ हा ललितलेखसंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. सर्जनशीलतेचा शोध घेताना गवसलेले गुणिजन, पुस्तके, तंत्रज्ञान, इतिहास, पर्यावरण, साहित्य या विषयांवरील लेखांचा समावेश या पुस्तकात आहे.
.................................................................................................................................................................
तो दिवस होता २१ ऑक्टोबर १९२९. मिशिगनमधलं एक छोटंसं खेडं... ग्रीनफिल्ड. तिथल्या एका छोट्या लाकडी खोपटामध्ये चार अमेरिकन इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी जमले होते. थॉमस अल्वा एडिसन, त्याचा जुना सहायक फ्रान्सिस जेझेल, उद्योगपती हेन्री फोर्ड आणि चक्क अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हर्बर्ट हूव्हर. ‘विद्युत बल्ब’ ते पुन्हा एकदा लावणार होते.
पावसाळी हवा असूनही डेट्रॉईटमध्ये ३० मैल लांबीचे रस्तेही गर्दीनं, उत्साहानं भरून गेले होते. लोक त्या खोपटातल्या इतिहासाच्या पुनर्निर्माणाची, त्यानंतरच्या समारंभाची वाट पाहत होते.
एडिसननं विद्युतदिव्याचा शोध लावला, त्या घटनेचं ते पन्नासावं वर्ष होतं. ऑक्टोबर १८७९मध्ये, पन्नास वर्षांपूर्वी याच लाकडी खोपटात विद्युतशास्त्राचं आपलं ज्ञान पणाला लावून, जगभरातून सहा हजारांहून जास्त वनस्पतिजन्य तंतूंची ‘फिलॅमेंट’ म्हणून चाचणी घेऊन एडिसननं आपला हा शोध लोकांपुढे मांडला होता.
या शोधाची १२५वी जयंती तर जगभर साजरी झालीच, पण या शोधाबरोबरच दोन फार मोठ्या प्रतिभावंत व्यक्तींच्या सर्जनशील, निरपेक्ष मैत्रीची, स्नेहाची विज्ञानाच्या इतिहासाला या निमित्तानं आठवण व्हायला हरकत नाही.
‘मॉडर्न कार’चा जनक हेन्री फोर्ड आणि एडिसन, हे ते दोन प्रतिभावंत. एकमेकांच्या चांगल्या गुणांना, शास्त्रीय संकल्पनांना सतत उत्तेजन देत, ३५ वर्षं फुलत गेलेल्या एका स्नेहबंधाची ही कहाणी आहे. आम जनतेचं आयुष्य, थोडंसं जास्त सुखी, आरामदायी व्हावं, ही इच्छाच या मैत्रीमधला समान दुवा राहिली.
१७-१८ वर्षांचा असल्यापासून हेन्री फोर्ड कुतूहलानं एडिसनच्या नवनवीन शोधांकडे पाहत आला होता. त्याच्या वडिलांची शेतीही एडिसनच्या ग्रीनफील्ड प्रयोगशाळेच्या जवळच होती. हेन्रीची पहिली नोकरीच खरं तर ‘एडिसन इल्युमिनेटिंग कंपनी’तली. तिथं काही वर्षांतच, तो ‘चीफ इंजिनिअर’ या पदाला पोचला होता.
.................................................................................................................................................................
हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5255/Srujan-Sanwad-bhag-1-ani-bhag-2
..................................................................................................................................................................
पुढे त्यांची भेट झाली ती १८९६ मध्ये एका समारंभात. तोवर फोर्डनं आपली पहिली ‘ऑटोमोबिल’ बनवली होती. ॲलेक्स डो यानं त्यांची ओळख करून दिली. “या तरुण माणसानं ‘गॅस’ (इंधन या अर्थी)वर चालणारी एक छान कार बनवली आहे.” त्यानं एडिसनला सांगितलं. उत्सुकता वाटून, एडिसननं फोर्डला काही प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांची त्याला नक्कीच समाधानकारक उत्तरं मिळाली असणार. कारण आपलं समाधान प्रकट करण्यासाठीच की काय, त्यानं टेबलावर हात आपटला आणि आश्वासक सुरात फोर्डला त्यानं सांगितलं, “यंग मॅन, हेच ते! जमलंय तुला! तुझी कार स्वयंपूर्ण तर आहेच, वर स्वतःचं इंधनही ती स्वतःबरोबर ठेवतेय! छान!”
नंतर खूप वर्षांनी फोर्डनं एका मुलाखतीत सांगितलं, “टेबलावर आपटलेला तो हात, हे माझ्यासाठी फार मोठं पारितोषिक होतं. इतकं प्रोत्साहन तोपर्यंत मला कुणी दिलंच नव्हतं. मला माझ्या शोधाबद्दल मधूनच शंका यायच्या... याचा काही ‘वर्थ’ आहे की नाही, काही उपयोग आहे की नाही? पण जगातल्या निःसंशय मोठ्या प्रतिभावंताची ती थेट शाबासकी. त्यामुळं संशयाचे सगळे ढग विरून आकाश एकदम मोकळं झालं. विजेविषयी सर्वांत जास्त माहिती असणाऱ्या माणसानं माझी इंधनावरची मोटार ही कोणत्याही ‘वीजे’वरच्या मोटारपेक्षा चांगली असल्याचं सांगितलं होतं.”
ही शाबासकी फोर्ड कधीच विसरला नाही. पुढे मोठा उद्योगपती झाल्यावर आणि त्याआधीही बराच काळ तो एडिसनचा निकटचा मित्र म्हणूनच राहिला. रबराला पर्याय शोधून काढण्यासाठी एडिसनला त्यानंच उद्युक्त केलं. शेवटची काही वर्षं एडिसननं त्यावर कामही चालू केलं होतं. अनेक तांत्रिक, शास्त्रीय संकल्पना ते एकमेकांजवळ मोकळेपणानं बोलत.
‘इंधनासाठी लागणारी ऊर्जा’ हा विषय दोघांच्या समान आवडीचा, जिव्हाळ्याचा. जुन्या मिल्सचा खरा, नक्की ‘पॉवर आऊटपुट’ किती असतो, हे विविध मिल्सच्या ठिकाणी जाऊन पारखणं आणि छोटी धरणं बांधून त्यापासून मिळणारी ऊर्जा तपासणं, हा त्यांचा छंदच झाला होता.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
कधी कधी ते दोघं आणि वनस्पतिशास्त्रज्ञ ल्यूथर बरबँक, टायर्सचा शोध लावणारा हार्वे फायरस्टोन असे सगळे मिळून निसर्गात भटकायला जायचे. “हे सारखं ‘ऊर्जा आणि इंधन’ याच भाषेत बोलतात!” असं निरीक्षण फायरस्टोननं नोंदवून ठेवलं आहे. या ‘कॅम्पिंग ट्रिप्स’चा सुगावा लागल्यावर वेळ मिळेल तेव्हा तत्कालीन अमेरिकेन राष्ट्राध्यक्ष हार्डिंग हेही अधूनमधून त्यांच्याबरोबर जायला लागले. यातही एक गंमत झालीच.
हे मिळून एकदा असेच लांब ‘कंट्री साईड’ला गेले होते. भरपूर फिरून झाल्यावर विश्रांतीसाठी सहजच ते एका खेडूत शेतकऱ्याच्या शेतीवाडीवर थोडा वेळ थांबले. उठताना सहजच फोर्डनं हात मिळवत त्या शेतकऱ्याला सांगितलं, “ती आत तुमची गाडी उभी आहे, ती मी बनवली आहे.” फायरस्टोन त्यानंतर हात मिळवत म्हणाला, “आणि त्याचे टायर्स मी बनवलेत.” एडिसननं आत बोट दाखवत सांगितलं, “तुमच्या घरातले हे दिवे शोधणारा मी माणूस आहे.” प्रेसिडेंट हार्डिंगनीही आपली ओळख करून दिली. संपूर्ण अवाक् आणि त्याहूनही संशयानं पछाडला गेलेला शेतकरी ल्यूथर बरबँकवर ओरडला, ‘आणि तू? तू तर साक्षात सँटाक्लॉजच असशील, नाही का? चला, फुटा सगळे इथून! खोटारडे लेकाचे!’
पुढे उतारवयात वैद्यकीय सल्ल्यावरून एडिसननं न्यू जर्सीतलं ‘मेनलो पार्क’मधलं घर आणि प्रयोगशाळा चांगल्या हवेसाठी फ्लोरिडात फोर्ट मायर्सला हलवली. एक हजारहून जास्त पेटंट्स असणाऱ्या माणसाचं घर जसं असावं, तसंच एडिसनचं हे नवीन घर होतं. पाहुण्यांना गोंधळात टाकणारी एक ‘इंटरकॉम सिस्टिम’ त्यात होती. दरवाजा उघडला रे उघडला की, दर्शनी भागातल्या कपाटांवर उघडझाप होणारे दिवे होते.
या घरीही फोर्ड सतत येऊन-जाऊन असायचाच. १९१६ मध्ये शेजारचं मोठं, प्रशस्त घर उपलब्ध होताच फोर्डनं ते विकत घेऊन टाकलं. या दोन घरांमध्ये निव्वळ पद्धत म्हणून एक लाकडी कुंपणवजा भिंत होती खरी, पण त्याला असलेलं फाटक कायम उघडंच असायचं. त्यातून ये-जा इतकी झाली की, त्याला स्थानिक मंडळींनी ‘फ्रेंडशिप गेट’ हे नाव पक्कं करून टाकलं. एडिसनची संपूर्ण प्रयोगशाळाही फोर्डनं स्व-खर्चानं इथं हलवली. हुबेहूब वातावरण निर्माण व्हावं, यासाठी रेल्वेचे सात डबे भरून न्यू जर्सीतली माती त्यानं मागवून ती बाहेर पसरवली. आधीच्या प्रयोगशाळेतलं एल्मचं झाडही तिकडे हलवण्याचा त्याचा मानस होता, ते मात्र जमलं नाही. त्याऐवजी आणखी एक साधारण तसंच दिसणारं झाड मात्र त्यानं लावलंच. स्वतःच्या खास शैलीत एडिसननं या सगळ्या खटाटोपासाठी त्याला शाबासकी दिली, ती या शब्दांत... “९९.९९ टक्के काम अगदी परिपूर्ण झालंय. एकच गोष्ट चुकलीय. माझ्या मूळ लॅबमधली फरसबंदी इतकी चकचकीत आणि स्वच्छ कधीच नसायची!”
फोर्डच्या अफाट दूरदृष्टीबद्दल आणि कल्पकतेबद्दल एडिसन म्हणाला होता, “या माणसाची कल्पनाशक्ती इतकी विस्तृत, लांबवर पसरलेली आहे, की तिला मधूनमधून झोळ येण्याची शक्यता आहे.”
.................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
शेजारी असणाऱ्या या दोन घरांमधून अनेक संकल्पनांची देवाणघेवाण अनेक वर्षं चालू राहिली. श्री.-सौ.फोर्ड जवळपास प्रत्येक हिवाळ्यात या घरी राहायला यायचे. फोर्ड आणि एडिसनचं स्थानिक मित्रमंडळ बरंच जमलं होतं.
२१ ऑक्टोबर १९२९ ला, बल्बच्या पुनर्निर्माणाचा प्रयोग आपल्या खास मित्रांबरोबर पुन्हा पार पाडल्यावर झालेल्या समारंभात एडिसननं हा स्नेहबंध अगदी मोजक्या शब्दांत उलगडून दाखवला. तो समारंभ राष्ट्रीय पातळीवर साजरा झाला होता. प्रेसिडेंट हूव्हरसमवेत एडिसनच्या सत्कारासाठी, ३००हून अधिक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरची मंडळी उपस्थित होती. ज्ञानवृद्ध, पांढरा केशसंभार वाऱ्यानं हलणारा एडिसन उत्तरादाखल बोलायला उभा राहिला तेव्हा त्याचा आवाज किंचित कातर झाला होता.
“माझा सत्कार मी माझा एकट्याचा मानत नाही. मनुष्यमात्राच्या भल्यासाठी अनेक विचारवंत, शास्त्रज्ञ झटत असतात, त्या सगळ्यांचा हा सत्कार आहे.” भाषणाचा शेवट त्यानं “सच्चा मित्र या शब्दांच्या अगदी व्याख्येतसुद्धा तंतोतंत बसेल, असा हा एक माणूस आहे,” या शब्दांनी केला. अर्थात, ते शब्द हेन्री फोर्डला उद्देशून होते.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Sat , 02 January 2021
अरे वा!
सो स्वीट!
निकोला टेस्लाचे शोध दाबल्यावर एडिसनच्या बापाचं काय जात होतं गुलफाम गप्पेबाजी करायला !
-गामा पैलवान