माझ्या डॉक्टर मित्राच्या मृत्यूला करोनापेक्षाही आपली निकृष्ट आरोग्य व्यवस्था जास्त जबाबदार आहे!
संकीर्ण - पुनर्वाचन
डॉ. प्रताप विमलबाई केशवराव
  • डॉ. सुनील टेकाम आपल्या सहकारी मित्रांसह
  • Wed , 30 December 2020
  • संकीर्ण पुनर्वाचन कोविड-१९ Covid-19 करोना Corona लॉकडाउन Lckdown सुनील टेकाम Suneel Tekam

माझा मित्र डॉ. सुनील टेकामचा २१ ऑगस्ट रोजी कोविड-१९ या आजाराने मृत्यू झाला. तो वरोरा येथील कोविड केअर सेंटरमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होता. त्याला कोविडची लागण कुठून झाली, हे सांगणे शक्य नाही, कारण सरकारने कितीही नाकारले तरी कोविडचा कम्युनिटी प्रसार झालेला आहे. घराच्या बाहेर पडल्यावर कोविड होतो, अशा फसव्या अफवांचा सर्वत्र प्रचार व प्रसार केला गेला आहे.

सुनीलला ‘शहीद’ मानायला माझे मन तयार होत नाही. कारण एकदा का ‘शहीद’ म्हटले की, आपली नागरिक म्हणून जबाबदारी संपते, असा आतापर्यंतचा माझा अनुभव आहे. व्यवस्था बऱ्याच वेळा व्यक्तीचा जीव घेते आणि त्याला ‘शहीद’ करून टाकते. कारण तसे करणे व्यवस्थेच्या सोयीचे असते. त्यामुळे अनेक प्रश्नांची उत्तरं देण्यातून स्वत:ची सोडवणूक करून घेता येते.

त्यामुळे सुनीलच्या मृत्यूने मला जास्तच अस्वस्थ केले आहे. त्याच्यासोबतच्या अनेक आठवणी आहेत. त्याचे वैद्यकीय शिक्षण अमरावतीमधील विदर्भ आयुर्वेद महाविद्यालयामध्ये झाले. तिथे तो मला दोन वर्षांनी सिनिअर होता.

तेव्हा एकविसाव्या शतकाची सुरुवात होऊन काही वर्षं झाली होती. कम्प्युटर किंवा नेटकॅफेवरील इंटरनेटचा प्रवेश 2Gच्या माध्यमामधून मोबाईलवर येण्यास सुरुवात झाली होती. मेडिकल महाविद्यालयातील शारिरीक रॅगिंग पूर्णपणे बंद झाले होते, पण मानसिक पातळीवरचा रॅगिंगचा आधार लिंग, जात, धर्म व वंश अजूनही शिल्लक होता. खुल्या संवर्गातील सीनियर्सच्या डोक्यात आरक्षणामुळे आपल्याला MBBSला प्रवेश मिळाला नाही, हे खोलवर रुजलेले असायचे. त्याची अस्वस्थता रॅगिंगच्या वेळी व्यक्त होत असे.

.................................................................................................................................................................

एकविसाव्या शतकात ‘आंबेडकरी तत्त्वज्ञाना’त लिहिली जाणारी कविता कशी असेल, याचं उत्तर म्हणजे ‘बीइंग’ हा कवितासंग्रह

बीइंग – विजय अशोक इंदुशोकाई, आऱ्हान मीडियास्मिथस, नाशिक, पाने – २२२ (हार्डबाऊंड), मूल्य - ३६० रुपये

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5250/Being

..................................................................................................................................................................

सुनीलचा प्रवेश अनुसूचित जमातीच्या कोट्यातून झाला होता, पण तो कधीही एकटा पडला नाही किंवा त्याच्यासोबत भेदभाव केला गेला नाही. त्याची माझ्या समजेनुसार दोन कारणे होती. एक- त्याचा स्वभाव अतिशय शांत, मनमिळावू व दिलदार होता. दोन, त्याच्या बॅचमधील सर्व मुले-मुली खूप चांगली होती.

सुनील अतिशय लाजरा-बुजरा पण हसऱ्या चेहऱ्याचा होता. वर्षभर कोणत्याही भांडण-तंट्यामध्ये नसलेला सुनील वार्षिक गॅदरिंगमध्ये डान्समध्ये पहिल्या क्रमांकावर असायचा. त्याची शरीरयष्टी मध्यम होती. त्यामुळे त्याच्याकडे बघून कुणाला वाटायचे नाही की, तो डान्स करत असेल.

प्रत्येक बॅचमध्ये सुनीलचे चाहते होते. राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत दहा दिवसीय शिबिरात सुनील सर्व कामांत पुढे असायाचा. या शिबिरात आठ-दहा दिवस सामूहिक जीवन जगत असताना एकमेकांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू दिसून येत असत. महाविद्यालयातील किंवा एनएसएस शिबिरामधील छायाचित्रे बघितली की, त्यातला सुनीलचा उत्साहित चेहरा स्पष्ट दिसतो.

मुंबईत मेडिकल कॉलेजमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या डॉ. पायल तडवी या आदिवासी मुलीचा इन्स्टिट्यूशनल मर्डर येथील जाती व्यवस्थेने केला. त्याच्या विरोधात फेसबुकवर भूमिका घेणाऱ्यांमध्ये सुनील होता. हे धैर्य माझ्या इतर डॉक्टर मित्र-मैत्रिणींनी दाखवले नव्हते.

मी आठ-नऊ वर्षं आदिवासी भागात आरोग्यविषयक काम केले आहे. त्यामुळे माझा आदिवासी समाज आणि संस्कृती यांच्याशी खूप जवळून संबंध आला आहे. एका आदिवासी कुटुंबातून कोणतीही पार्श्वभूमी नसताना डॉक्टर होणे हे खूप मोठे आव्हान असते, याची प्रचिती सुनीलकडे बघितल्यावर येत असे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

महाविद्यालयीन जीवनात आलेले लिंग, जात किंवा धर्म आधारित भेदभावाचे अनुभव माझ्या अनेक आदिवासी मित्रांना आले आहेत. यशस्वी डॉक्टर होण्यासाठी फक्त उत्तम शिक्षण व ज्ञान असून चालत नाही, त्यासाठी इतर अनेक घटक निर्णायक ठरत असतात, हे आदिवासी कुटुंबांमधून आलेल्या डॉक्टर व्यक्तींना खूप चांगल्या प्रकारे माहीत आहे. हा व्यवस्थेविरुद्धचा संघर्ष सुनीलनेही नक्कीच केला असेल. त्यामुळेच त्याने डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी भूमिका घेण्याचे धैर्य दाखवले. फक्त बायको-मुले-आई-बाबा यापलीकडे विश्व नसणारे फेसबुक मित्र भरपूर भेटतील, पण आजुबाजूला अन्याय होत असताना भूमिका घेणारे सुनीलसारखे मित्र कमीच आहेत.

सुनीलच्या श्रद्धांजलीनिमित्ताने अजून एका दुर्लक्षित विषयावर बोलावेसे वाटते. ते म्हणजे शासन व प्रशासनाचा कोविड योद्ध्यांबाबत होत असलेला भेदभाव. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तालुका स्थरावर शेकडो कोविड केअर सेंटर काढलेली आहेत. तिथे काम करणारे सर्व डॉक्टर BAMS आहेत, मात्र एकाही ठिकाणी MBBS डॉक्टर नाहीत. MBBS डॉक्टर हे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्येच आहेत. त्यांचेही या महामारीमध्ये मोठे योगदान आहे, यात काही वाद नाही. मात्र मुंबईसारख्या ठिकाणी- जिथे कोविडने थैमान घातले आहे, तिथे BAMS डॉक्टरांचाही समावेश केला गेला आहे.

मागच्या १२ वर्षांपेक्षा जास्त काळापासून अनेक RBSK (राष्ट्रीय बाल स्वस्थ कार्यक्रम) मध्ये डॉक्टर, नर्स व फार्मासिस्ट अतिशय कमी पगारावर (१५ हजार ते २५ हजार) काम करत आहेत. काही महिन्यांपूर्वी दै. ‘लोकसत्ता’ने पुराव्यासह एक बातमी दिली होती की, काही रुग्णवाहिकांवर काम करणाऱ्या BAMS डॉक्टरांचे मानधन हे त्या रुग्णवाहिकेवर काम करणाऱ्या वाहन चालकापेक्षा कमी आहे.

आरोग्य व्यवस्थेमध्ये प्रशासकीय पातळीवर काम करणाऱ्या MBBS डॉक्टरांच्या भेदभावपूर्ण व्यवहाराचा फटका ग्राउंड लेवलवर काम करणाऱ्या BAMS डॉक्टरांना नेहमीच बसत आला आहे. नियमित कामासोबत अतिरिक्त कामाचे ओझे BAMS डॉक्टरांच्या खांद्यावर दिले जाते. BAMS हा महाराष्ट्रमध्ये इंटेग्रेटेड पॅथीचा भाग आहे, हे सर्वोच्च न्यायालयाने सांगूनही त्याचे उल्लंघन केले जाते.

MBBS किंवा BAMS डॉक्टरांच्या डिग्रीनुसार कामाचे विभाजन झालेले नाही. आधुनिक औषध पद्धतीचा (मॉडर्न मेडिसिन सिस्टम) वापर करून हजारो लोकांचा जीव BAMS डॉक्टर वाचवत आहेत. गावपातळीवर आरोग्य सुविधा देणारे BAMS डॉक्टरच आहेत. नेहमी क्रॉसपॅथीच्या नावाने विष ओकणारी IMA ही संघटना डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी गरज नसताना तातडीने प्रेस कान्फरन्स घेऊन वैद्यकीय क्षेत्रात जातीवाद नसल्याचे सांगते, पण शासकीय सेवेतील MBBS डॉक्टरांकडून होत असलेल्या भेदभावाबद्दल किंवा जात, लिंग धर्म आधारित भेदभावावर एक शब्द काढत नाही.

.................................................................................................................................................................

या मुलाखती म्हणजे मानवी सांस्कृतिक सौंदर्याचं प्रतिबिंब! आरसाच जणू. तुम्ही वाचकांनी त्यात डोकवावं. स्वतःस न्याहाळावं

सृजन-संवाद (भाग १) - गोपाळ अवटी, भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर, पाने - ३८४, मूल्य - ४२५ रुपये.  

सृजन-संवाद (भाग २) - गोपाळ अवटी, भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर, पाने - ३६२, मूल्य - ४२५ रुपये.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5255/Srujan-Sanwad-bhag-1-ani-bhag-2

..................................................................................................................................................................

BAMS डॉक्टरांसाठी काम करणाऱ्या काही संघटना महाराष्ट्रात आहेत. या संघटनांचे पदाधिकारी खाजगी आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयांकडून मिळणाऱ्या फायद्यावर स्वतःची पोळी भाजून BAMS डॉक्टरांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात. खाजगी आयुर्वेद महाविद्यालये प्राथमिक आरोग्य सेवा मजबूत करण्याचे शिक्षण देत नाहीत. मोठमोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये कमी पगारावर काम करणाऱ्या BAMS डॉक्टरांचा पुरवठा करण्याचे काम ती करतात. त्यामुळे या संघटना व खाजगी महाविद्यालयांचे हे गुपित आयुर्वेद कौन्सिलच्या निवडणुकीत दिसून येते.

सुनीलच्या मृत्युमुळे अशा अनेक पातळीवर लढा देणारे कितीतरी डॉक्टर आपल्यामधून निघून गेले आहेत. सुनील फक्त सार्वजनिक आरोग्य यंत्रणेमधील एक घटक नव्हता, तर आपल्या आजुबाजूला असलेल्या व्यवस्थेचे प्रतिबिंब होता. त्याच्या कामाचे आणि त्याने केलेल्या संघर्षाचे सामाजिक, आर्थिक व राजकीय ऑडिट झाले पाहिजे. त्याच्या मृत्यूबाबत मला प्रश्नचिन्ह उभे करायचे नाही, पण कोविड केअर सेंटर कसे चालते, याच्यावर नागरिकांचे लक्ष असले पाहिजे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये काम करणारे आरोग्य कर्मचारी किती वाईट परिस्थितीत काम करतात, हे जाणून घेतले पाहिजे.

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

कोविड-१९च्या या महामारीत एक चांगला मित्र गमावल्याचे मला दुःख होत आहे. लहान असताना माझी आजी एका बादशहाची गोष्ट सांगत असे. त्या बादशहाला ‘बगैर धागे का कपड़ा’ पाहिजे असतो. बादशहाचा हुकूम म्हणून जनता ‘बगैर धागे का कपड़ा’ शोधायला लागते. आज आपली परिस्थिती या जनतेसारखीच झालेली आहे. आतापर्यंत विश्वशक्ती किंवा महासत्ता होण्याच्या फसव्या जुमलेबाजीत आपण शिक्षण-आरोग्य या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्षित केले. कोविड-१९ सारखे साथीचे आजार येऊ शकतात, त्यासाठी तयार रहावे असे २००८पासून जागतिक आरोग्य संघटना सांगत होती. पण आपल्या देशाच्या सत्ताधारी वर्गाने त्याकडे दुर्लक्ष करून अक्षम्य असा गुन्हा केला आहे. आपला देश आरोग्य यंत्रणेच्याबाबतीत कमकवुत आहे. ज्वाला गुटासारख्या आंतरराष्ट्रीय खेळाडूला या महामारीच्या काळात वांशिक भेदभावाला सामोर जावे लागले. शहरातील श्रमिक वर्गासोबत किती अमानवी व्यवहार झाले, याची तर गणतीच नाही.

लॉकडाउनच्या काळात गावात परत आल्यावर मजदूर वर्गावर जातीच्या भिंतीआडून पुन्हा छळछावण्या बनवल्या गेल्या. या काळात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये झालेली वाढ आपल्या सामाजिक आरोग्याची खालावलेली पातळी दर्शवते.

अशा अगणित उदाहरणांनी आपल्याला नागडे केले आहे. आपण नागरिक म्हणून भारतीय संविधानाचे मूल्य आपल्या वैयक्तिक व सामाजिक आयुष्यात अमलात आणण्यात कमी पडलो आहोत. सुनीलच्या मृत्युचे विश्लेषण करताना या सर्व मुद्द्यांबाबत चूप राहून चालणार नाही.

आज सुनीलचा मुलगा दोन वर्षांचा आहे. उद्या तो मोठा झाल्यावर मला त्याच्या वडलांचा मित्र म्हणून वरच्या प्रश्नांची उत्तरं देता येतील? त्याला सांगता येईल, त्याच्या वडलांसोबत काय झालं होतं?

सुनीलची पत्नी, आई-वडील व मित्र परिवार यांना या दुःखद प्रसंगाचा सामना करण्याचे बळ मिळो…

प्रथम प्रसिद्धी - २७ ऑगस्ट २०२०

..................................................................................................................................................................

लेखक डॉ. प्रताप विमल केशव डॉक्टर आहेत.

pratap20s@yahoo.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......