हा लेख सध्या सोशल मीडिया, व्हॉटसअॅपवर फिरतोय. इंग्रजी लेखावरून हा मराठी अनुवाद कुणी केलाय हे कळू शकलेलं नाही. त्यामुळे लेखासोबत अनुवादकाचं नाव देता आलेलं नाही. संबंधितांनी ते कळवल्यास त्याचा नक्की उल्लेख केला जाईल. - संपादक
..................................................................................................................................................................
जलियाँवाला बागेतील १९१९च्या हत्याकांडानंतर ब्रिटिश सरकारने धर्मांध दंगलींचा खूप प्रचार सुरू केला. त्यामुळे १९२४ला कोहाटमध्ये भयानक हिंदू-मुस्लीम दंगली झाल्या. यानंतरच्या काळात राष्ट्रीय-राजकीय विचारात दंगलीवर प्रदीर्घ चर्चा झाल्या. हे दंगे संपुष्टात आणण्याची गरज सर्वांनाच वाटली; पण काँग्रेस नेत्यांनी हिंदू-मुसलमान नेत्यांमध्ये तह करून त्याद्वारे दंगली थांबवण्याचे प्रयत्न केले. क्रांतिकारी चळवळीने ही समस्या कायमस्वरूपी नष्ट करण्यासाठी आपले विचार पुढे ठेवले. भगतसिंगांनी या संदर्भात जून १९२८ मध्ये लिहिलेला हा लेख...
..................................................................................................................................................................
भारताची स्थिती आज अत्यंत दयनीय बनली आहे. एका धर्माचे अनुयायी दुसऱ्या धर्माच्या अनुयायांचे कट्टर शत्रू बनले आहेत. आता तर एका धर्माचे असणे म्हणजे दुसऱ्या धर्माचे हाडवैरी असणे असेच होऊन बसले आहे. यावर अजून विश्वास बसत नसेल तर लाहोरमधील ताज्या दंगलीकडे पाहा. या दंगलीत कशा प्रकारे मुसलमानांनी निर्दोष शिखांची आणि हिंदूंची हत्या केली आणि शिखांनीही कशा प्रकारे संधी मिळताच कसलीच कसर सोडली नाही ते पाहा. अमूक व्यक्ती दोषी आहे म्हणून ही कापाकापी केली गेली नाही, तर अमूक व्यक्ती हिंदू आहे, शीख आहे वा मुसलमान आहे म्हणून ती केली गेली. एखाद्या व्यक्तीला मारण्यासाठी ती व्यक्ती फक्त शीख अथवा हिंदू असणे हे मुसलमानांना पुरेसे होते. अशाच प्रकारे एखादी व्यक्ती मुसलमान असणे हेच त्याचा जीव घेण्यासाठी पुरेसे कारण होते. स्थिती जर अशी असेल तर हिंदुस्थानला ईश्वरच तारू शकेल.
अशा परिस्थितीत हिंदुस्थानचे भविष्य अत्यंत अंधःकारमय झाले आहे. या ‘धर्मां’नी हिंदुस्थानला संकटाच्या खाईत लोटले आहे. या धर्मांध दंगली भारताची पाठ कधी सोडतील, हे आज सांगता येणे कठीण आहे. जगाच्या नजरेत या दंगलींनी भारताला बदनाम केले आहे. या अंध:विश्वासाच्या प्रवाहात सर्वजण वाहत चालल्याचे चित्रच आपल्याला दिसत आहे. थंड डोक्याने विचार करणारा हिंदू-मुसलमान अथवा शीख आज अपवादानेच दिसतो. बाकी सगळे हातात लाठ्या-काठ्या, तलवारी व सुरे घेऊन परस्परांची डोकी फोडून मरून जात आहेत. यातून वाचणारे काही फासावर जातात, तर बाकीच्यांना तुरुंगात डांबले जाते. एवढा रक्तपात झाल्यानंतर या ‘धार्मिक’ लोकांवर इंग्रज सरकारचा बडगा बसतो आणि मग त्यांच्या डोक्यातील किडा वळवळायचा थांबतो.
..................................................................................................................................................................
‘खिंडीत’ : शैक्षणिक जगताच्या अंतरंगाची विरूपता भेदकपणे उलगडणाऱ्या कथा
हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5254/Khindit
..................................................................................................................................................................
असे दिसते की, या दंगलींच्या पाठीमागे धर्मांध नेते आणि वर्तमानपत्रे यांचा हात आहे. आज हिंदुस्थानामधील नेत्यांनी अशी काही घाण केली आहे की, त्याविषयी न बोललेलेच बरे! ज्या नेत्यांनी भारताला स्वतंत्र करण्याचा विडा उचलला होता आणि जे ‘समान राष्ट्रीयता’ आणि ‘स्वराज्य-स्वराज्य’ म्हणून बढाया मारताना थकत नव्हते; ते एक तर आज घरात तोंड लपवून बसले आहेत किंवा धर्मांधतेच्या प्रवाहात वाहवत चालले आहेत. घरात तोंड लपवून बसणाऱ्यांची संख्यादेखील काय कमी आहे? पण धर्मांध आंदोलनांमध्ये जाऊन सामील झालेल्या नेत्यांसारखे नेते तर जराही जमीन उकरली तरी शेकड्यांनी बाहेर येतात. मनापासून ज्यांना भले व्हावेसे वाटते असे नेते फारच कमी आहेत. असा धर्मांधतेचा महापूर आला आहे की, तेही त्याला थांबवण्यास असमर्थ आहेत. असे वाटू लागले आहे की, भारतात नेतृत्वाचे दिवाळे निघाले आहे.
वृत्तपत्रवाले हे धर्मांध दंगली भडकवण्यात विशेष भाग घेणारे दुसरे सद्गृहस्थ आहेत. एके काळी अत्यंत उच्च व पवित्र समजला जाणारा पत्रकारितेचा व्यवसाय आज अत्यंत किळसवाणा झाला आहे. हे लोक एकमेकांच्या विरोधात मोठे-मोठे मथळे देऊन लोकांच्या भावना भडकवतात आणि परस्परांची डोकी फोडण्याचे काम करवून घेतात. स्थानिक वृत्तपत्रांतून भडक लेख प्रसिद्ध झाल्यामुळे एक-दोनच नाही, तर अनेक ठिकाणी दंगली झाल्या आहेत. अशा काळातही डोके व मन शांत ठेवून लिहिणारे लेखक फार कमी आहेत.
लोकांना शिक्षण देणे, त्यांच्यामधील संकुचित प्रवृत्ती दूर करणे, धर्मांध भावना दूर करणे, परस्पर मिळून-मिसळून राहण्याची वृत्ती वाढवणे आणि भारताची सामूहिक एकता घडवणे हे वृत्तपत्रांचे आद्य कर्तव्य आहे. पण आज त्यांनी अज्ञान वाढवणे, संकुचितता वाढवणे, धर्मांध बनवणे, मारामाऱ्या घडवून आणणे आणि भारताची सामूहिक राष्ट्रीयता नष्ट करणे हेच आपले प्रमुख कर्तव्य मानले आहे. यामुळेच भारताच्या सद्यःस्थितीचा विचार करता डोळ्यांतून रक्ताश्रू वाहू लागतात आणि हृदयात प्रश्न उभा राहतो की, ‘भारताचे होणार तरी काय?’
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
असहकार आंदलेनाच्या दिवसातील जोश व उभारी ज्या लोकांनी अनुभवली आहे, त्यांना ही स्थिती पाहून रडू येते. कुठे ते दिवस, जेव्हा स्वातंत्र्याची झलक समारे दिसत होती, आणि कुठे हे आजचे दिवस जिथे स्वराज्य केवळ एक स्वप्नच बनून गेले आहे. या दंगलींमुळे अत्याचारी शासकांना मिळालेला हाच एक तिसरा फायदा आहे. ज्या नोकरशाहीच्या अस्तित्वाला ती आज जाईल की उद्या जाईल, असा धोका निर्माण झाला होता; ती आज आपले पाय इतके घट्ट रोवून उभी राहिली आहे की, तिला हलवणे हे काही सोपे काम राहिलेले नाही.
या धर्मांध दंगलींचे जर मूळ शोधले तर त्यामागचे कारण आर्थिक आहे असेच दिसून येते. असहकार चळवळीच्या काळात नेत्यांनी व पत्रकारांनी प्रचंड त्याग केले. त्यांची आर्थिक अवस्था विपन्न झाली होती. असहकार आंदोलन शिथिल पडल्यामुळे नेत्यांबद्दल अविश्वास वाटू लागला. त्यामुळे आजकालच्या अनेक धर्मवादी नेत्यांचे धंदे डबघाईस आले. जगात जे काही काम होते, त्याच्या मुळाशी पोटाचा प्रश्न नक्कीच असतो. कार्ल मार्क्सच्या तीन प्रमुख सिद्धान्तांपैकी हा एक मुख्य सिद्धान्त आहे. याच कारणामुळे ‘तबळीग’, ‘तनकीम’, ‘शुद्धी’ इत्यादी संघटना सुरू झाल्या. आणि त्यामुळेच आज आपली सांगू नये, अशी लाजिरवाणी दुर्दशा झाली आहे.
बस्स! सर्व प्रकारच्या दंगलींवर जर काही उपाय केला जाऊ शकत असेल, तर तो भारताची आर्थिक स्थिती सुधारण्यातूनच होऊ शकतो. कारण भारतातील सामान्य लोकांची आर्थिक स्थिती इतकी वाईट आहे की, एक व्यक्ती दुसऱ्याला चवली देऊन तिसऱ्याला अपमानित करायला लावू शकते. भूक आणि दुःख यामुळे व्यथित झालेला मनुष्य सर्व प्रकारची तत्त्वे खुंटीला टांगून ठेवतो. ‘मरता क्या न करता’ हेच खरे!
पण सध्याच्या स्थितीत आर्थिक सुधारणा होणे अत्यंत कठीण आहे. कारण सरकार हे परकीय आहे आणि ते लोकांच्या अवस्थेत सुधारणा होऊ देत नाही. म्हणूनच लोकांनी हात धुऊन त्याच्या पाठीमागे लागले पाहिजे. आणि जोवर सरकार बदलत नाही, तोपर्यंत विसावा घेता कामा नये.
.................................................................................................................................................................
सृजन-संवाद (भाग १) - गोपाळ अवटी, भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर, पाने - ३८४, मूल्य - ४२५ रुपये.
सृजन-संवाद (भाग २) - गोपाळ अवटी, भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर, पाने - ३६२, मूल्य - ४२५ रुपये.
हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5255/Srujan-Sanwad-bhag-1-ani-bhag-2
..................................................................................................................................................................
लोकांचे परस्परांशी होणारे झगडे थांबवण्यासाठी लोकांमध्ये वर्ग भावना रुजणे आवश्यक आहे. गरीब, कष्टकरी व शेतकरी यांना हे स्पष्टपणे समजावून सांगितले पाहिजे की, तुमचे खरे शत्रू भांडवलदार आहेत. म्हणून तुम्ही त्यांच्या हातचलाखीपासून स्वतःला शाबूत ठेवले पाहिजे. त्यांच्या तावडीत सापडून काहीही करता कामा नये. जगातील सर्व गोरगरिबांचे, मग ते कोणत्याही जातीचे, वर्णाचे, धर्माचे वा राष्ट्राचे असोत, अधिकार सारखे आहेत. धर्म, वर्ण, वंश आणि राष्ट्रीयतेचे भेदभाव संपवून तुम्ही एकजूट व्हावे आणि सरकारची शक्ती आपल्या हाती घेण्यासाठी प्रयत्न करावेत, यातच तुमचे भले आहे. या प्रयत्नांमुळे तुमचे काही एक नुकसान होणार नाही. उलट एक ना एक दिवस तुमच्या बेड्या तुटून पडतील आणि तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य मिळेल.
जे लोक रशियाचा इतिहास जाणतात त्यांना हे माहीत आहे की, झारच्या काळात तेथेदेखील अशीच परिस्थिती होती. तेथेही कित्येक समुदाय परस्परांशी भांडत होते. पण जेव्हापासून तेथे श्रमिक शासन अस्तित्वात आले आहे, तेव्हापासून तिथले एकूण चित्र बदलले आहे. तेव्हापासून तिथे कधीही दंगली झालेल्या नाहीत. आता तिथे प्रत्येकाला कुठल्या धर्माचा अनुयायी नव्हे, तर ‘माणूस’ मानले जाते. झारच्या काळात लोकांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यामुळे दंगली-भांडणे होत असत. पण आता रशियाची आर्थिक स्थिती सुधारली आहे आणि त्यांच्यामध्ये वर्गभावना विकसित झाली आहे. त्यामुळे आता तिथून कधी कुठला दंगा झाल्याची बातमी आलेली नाही.
अशा दंगलींमध्ये तशा तर अनेक निराशाजनक बातम्या ऐकायला येतात, पण कलकत्त्यातील दंगलींमध्ये मात्र एक चांगली बातमी ऐकण्यात आली. ती ही की, तेथे झालेल्या दंगलींमध्ये ट्रेड युनियनच्या कामगारांनी भाग घेतला नाही. ते परस्परांशी मारामाऱ्या करण्यात अडकले नाहीत. उलट तेथील कारखान्यांमध्ये सर्व हिंदू-मुसलमान अत्यंत प्रेमाने उठबस करत होते आणि दंगल थांबवण्यासाठीही प्रयत्न करत होते. त्यांच्यामध्ये असलेल्या वर्गभावनेमुळेच हे शक्य झाले. ते आपले वर्गहित चांगल्या प्रकारे समजू शकत होते. म्हणूनच धर्मांध दंगली थांबवण्यासाठी वर्गभावना हा एक उत्तम मार्ग आहे.
अलीकडे एक चांगली बातमी ऐकण्यात आली. ती अशी की, जे धर्म परस्पर संघर्ष करण्यास, घृणा करण्यास शिकवतात; त्यांच्यावर वैतागून भारतातील नवयुवक आता त्यांच्यापासून परावृत्त होत आहेत. त्यांच्यामध्ये आता एवढा खुलेपणा आला आहे की, ते भारतातील लोकांना धर्माच्या चष्म्यातून हिंदू, मुसलमान, शीख या रूपात न पाहता सर्वांना प्रथम माणूस मानतात आणि नंतर भारतवासी. युवकांमध्ये असे विचार निर्माण होत आहेत, यावरून भारताचे भविष्य अत्यंत उज्ज्वल दिसते. म्हणून भारतवासीयांनी या दंगलींमुळे घाबरून जाता कामा नये, तर दंगलीसाठी पोषक वातावरणच निर्माण होणार नाही, यासाठी सज्ज होऊन प्रयत्न केले पाहिजेत.
.................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
१९१४-१९१५च्या हुतात्म्यांनी धर्माला राजकारणापासून वेगळे केले होते. त्यांना हे चांगले कळले होते की, धर्म ही व्यक्तीची वैयक्तिक बाब आहे. त्यामध्ये इतरांनी ढवळाढवळ करण्याचे काहीएक कारण नाही. यामध्ये राजकारण आणता कामा नये. कारण त्यामुळे सर्वांना एकत्र करून एकजुटीने काम करणे अशक्य होते. गदर पार्टीसारखी आंदोलने एकजुटीने व एकजीव राहू शकली ती यामुळेच. यामध्ये अनेक शीख आघाडीवर राहून हसत हसत फासावर चढले व त्यात हिंदु-मुसलमानही मागे राहिले नाहीत.
धर्माला राजकारणापासून वेगळे करण्यासाठी प्रयत्न करणारे काही भारतीय नेते आज रणमैदानात उतरले आहेत. तंटेबखेडे मिटवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे आणि आम्ही त्याला पाठिंबा देतो. धर्माला जर वेगळे ठेवले गेले तर राजकारणाबाबत आपण सर्व एक होऊ शकतो, मग धार्मिकदृष्ट्या भले आपण वेगवेगळे असू.
आम्हांला वाटते की, भारताविषयी खरीखुरी आस्था असणारे लोक आम्ही सांगितलेल्या उपायांवर जरूर विचार करतील. भारताचा आज जो आत्मघात होत आहे, त्यापासून ते आपल्याला वाचवतील.
प्रथम प्रसिद्धी - ४ मार्च २०२०
..................................................................................................................................................................
या लेखाच्या इंग्रजी तजुर्म्यासाठी पहा -
https://leafletldh.wordpress.com/communal-riots-and-their-solutions-%E2%80%A2bhagat-singh/
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment