अजूनकाही
विदर्भातील लेखिका अरुणा सबाने यांची ‘मुन्नी’ ही कादंबरी २०१०मध्ये प्रथम प्रकाशित झाली. बहुचर्चित ठरलेल्या या कादंबरीला नुकतीच १० वर्षं पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने तिच्याविषयीचा हा लेख...
..................................................................................................................................................................
‘मुन्नी’ या अरुणा सबाने यांच्या कादंबरीची ‘इथल्या शोषणव्यवस्थेला बळी पडावं लागून मनाच्या इच्छेविरुद्ध नको त्या व्यवसायात पडणाऱ्या माझ्या समस्त मैत्रिणींना’ ही अर्पणपत्रिका आहे. नको त्या व्यवसायात पडलेल्या मैत्रिणी- रुढार्थाने वेश्याव्यवसायातील नाडल्या गेलेल्या शोषित, पीडित, गांजलेल्या समाजात अस्तित्वाची लढाई लढणाऱ्या, स्वत:च्या ‘मादी’ असण्याच्या ओळखीने अत्याचाराला बळी पडलेल्या आणि त्याच ‘मादी’पणाच्या आसऱ्याने स्वत:चं जगणं, असणं टिकवू पाहणाऱ्या महिलांचा संघर्ष सबाने यांनी या कादंबरीतून मांडला आहे.
अत्यंत मोजक्या पात्रांभोवती ही कादंबरी फिरते. नागपूरमधील ‘गंगा जमुना’ ही वेश्यावस्ती, तेथील वेश्या, त्यांचे दलाल, तिथे येणारे ग्राहक, त्या वेश्यांचे प्रश्न सोडवणारी कार्यकर्ती- वैदेही, तिचा परिवार, तिला साथ देणारी तिची माणसं या सर्वांचं चित्रण लेखिकेनं अतिशय नेमकेपणाने केलं आहे. एकीकडे सोफिस्टिकेटेड आयुष्य, त्यातील समस्या-प्रश्न आणि दुसरीकडे ‘गंगा जमुना’तील वेश्या आणि त्यांचं आयुष्य, या दोन टोकाच्या जीवनानुभवाचे दर्शन या कादंबरीत घडतं.
वैदेही ही वेश्यांसाठी काम करणारी कार्यकर्ती. त्यांना शारीरिक स्वच्छेतचं महत्त्व पटवून देणं, त्यांच्या आरोग्यविषयक समस्या दूर करणं, झालंच तर त्यांच्या मर्जीनं त्यांचं पुनर्वसन करणं, या कामांसाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करणं यात ती स्वत:ला झोकून देते.
लहाणपणीच आई गेल्यानं सावत्रपणाचा जाच आणि पोरकेपणा अनुभवल्यानं अकाली प्रौढत्व आलेली वैदेही लग्नानंतर तरी सुख मिळेल ही आशा बाळगून असते. मात्र दहावीच्या मुलीच्या प्रेमात आकंठ बुडालेला मास्तर तिच्याशी पाच-सहा वर्षं लग्न करता येणार नाही म्हणून, तात्पुरती सोय भागवण्यासाठी वैदेहीशी लग्न करतो. पहिल्याच दिवशी त्याचा लग्नामागचा हेतू सांगतो. पुढे तिच्या पदरी दोन आणि गर्भात एक मूल टाकून पाच वर्षांनी त्या विद्यार्थिनीसोबत पळून जातो. जाता जाता तिला थोडे शिक्षणरूपी उपकार देऊन जातो. त्याच्या जोरावर वैदेही खंबीरपणे उभी राहते आणि स्वत:चं जगणं सांभाळून इतरांनाही दलदलीतून बाहेर यायला मदत करते.
..................................................................................................................................................................
‘खिंडीत’ : शैक्षणिक जगताच्या अंतरंगाची विरूपता भेदकपणे उलगडणाऱ्या कथा
हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5254/Khindit
..................................................................................................................................................................
या वेश्यांचे प्रश्न सोडवताना वैदेहीची नजर ११-१२ वर्षांच्या मुन्नीवर जाते आणि तिला तिथून सोडवायचंच हा निर्धार करून तिची ‘मैत्रेयी’ करून केवळ तिची सुटकाच नाही, तर तिच्या जगण्याला आकार देऊन, तिला आत्मभान मिळवून देण्याचं मोलाचं काम करते.
फक्त मुन्नीच नाही तर या व्यवसायाच्या दलदलीतून बाहेर येऊ पाहणाऱ्या प्रत्येकीसाठी वैदेही एक सुटकेचा मार्ग आखते आणि सन्मानानं जगण्याचे पर्याय खुले करते. मात्र मुन्नीइतकं नशीबवान कोणी ठरत नाही.
या कादंबरीतून मुन्नी, सायना, लक्ष्मी यांसारख्या अनेक जणी आपल्या समोर येतात. यातल्या बहुतेक सर्वच जणी हलाखीच्या परिस्थितीतून आलेल्या. बाईपणामुळे अगदी घरांतल्यांकडून, सख्ख्यांकडून नागवल्या गेलेल्या, भूतकाळ न लपवता येणाऱ्या आणि क्वचित संधी मिळालीच तर तिथेही ‘जुनी’ ओळख मिटवता न आलेल्या…
वैदेहीमुळे मुन्नीची ‘मैत्रेयी’ होते. शिक्षणाची संधी मिळून तिचं सोनं करूनही, तिच्यावर प्रेम करणाऱ्या प्राध्यापकाचे तिच्या भूतकाळासंबंधीचे प्रश्न ऐकून दु:खी होते.
असंच काहीसं सायनाचंदेखील. घरची गरिबी, धुण्याभांड्यांची कामं, त्यातून आलेले परपुरुषांचे अनुभव, त्यांनी तिचा घेतलेला फायदा, त्यामुळे या व्यवसायात फेकलं जाणं आणि चक्रव्यूहासारखं त्यातच अडकत जाणं, हे सर्व अनुभव अतिशय क्लेशदायक आहेत. ते वाचताना नेमकं काय वाटतं, हे सांगता येत नाही. क्षणाक्षणाला भावनांचे कल्लोळ माजतात. अस्वस्थता, उलघाल, विवशता, संताप, विदारकता, अपरिहार्यता, व्यवस्थेबद्दलची उद्विग्नता, नाराजी, हतबलता या भावना क्रमाक्रमाने कादंबरी वाचताना उफाळून येतात.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
एकंदरीतच बाईचं आयुष्य हा केव्हाही लोकांच्या चर्चेचा विषय असतो. त्यातही एकटी बाई, प्रवाहाविरुद्ध जाणारी बाई, यशस्वी बाई, वेगळं काहीतरी करणारी बाई असली की, तिच्या ‘बाई’पणाबद्दल शंका उपस्थित केली जाते. या कादंबरीतही अशा बायका आहेत. मात्र बहुसंख्य या चौकटीत बसत नाहीत. परिस्थितीला शरण गेलेल्या, अन्याय-अत्याचार पचवणाऱ्या, आहे तेच नशीब मानणाऱ्या, वेदना सहन करणाऱ्या, आपण माणूस नसून ‘बाई’ आहोत आणि ‘बाई’पणाचे भोग भोगल्याशिवाय आपली सुटका नाही, अशा समजूत असणाऱ्या अनेक जणींचं दर्शन या कादंबरीत घडतं.
वैदेहीचा एकूण प्रवास स्वत:पासून सुरू होऊन त्यामध्ये या बायकाही सामावतात. स्त्रीचा संघर्ष पुरुषी व्यवस्थेमुळे जितका होतो, तितकाच तो स्त्रीच्या मनोवृत्तीमुळेही होतो, हे इथं अधोरेखित होतं. कोणत्याही संघर्षात केवळ पुरुष अथवा केवळ स्त्रिया विरोध करणारे नाहीत. त्या विरोधामागे त्यांची काहीएक भूमिका, विचार असतो. आणि या विचारामागे त्या त्या व्यक्तीचे हितसंबंध असतात. हे हितसंबंध त्या व्यवस्थेचा भाग बनून जातात आणि त्यासाठी एखाद्याला ओरबाडणं ही त्यांची गरज बनते.
या सगळ्यात तुमची सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी खूप महत्त्वाची ठरते. फक्त चंगळवाद किंवा उपभोग एवढीच तुमची भूमिका ठरते, तेव्हा नकळतपणे शोषितांच्या रांगेतून लोक शोषकाच्या रांगेत जातात. या सर्व बायकांवर अन्याय करणारे लोक परग्रहावरून आलेले नाहीत. तेदेखील या समाजाचा घटक आहेत. तेही याच मातीतून आले आहेत. त्यांच्यावरही इथलेच संस्कार झालेत. तरीही संधी मिळाल्यास त्यांना शोषकवर्ग जास्त जवळचा वाटतो.
वैदेहीचा मित्र सुहास याचं उत्तम उदाहरण आहे. हा सुहास काय किंवा डॉक्टर काय, सोयीनुसार वैदेहीशी अत्यंत सोफिस्टिकेटेडली वागतात. मात्र दुसरीकडे वैदेहीने सुटका केलेल्या मुलींचं शोषण करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. फक्त ते हे सभ्यपणाच्या पडद्याआडून करतात. हे जेव्हा वैदेहीला कळतं, तेव्हा ती कोसळते.
या व्यतिरिक्त आणखी एक महत्त्वाचा मुद्दा लेखिकेने मांडला आहे. तो म्हणजे स्त्री-पुरुष संबंधांचा. आजही या विषयावर आपण उघडपणे बोलणं टाळतो. ही नैसर्गिक गरज अथवा ऊर्मी दाबून टाकणं वा लपवणं या दोनच गोष्टींना आपल्या समाजात प्राधान्य मिळालेलं दिसतं. लग्न ही संस्था शारीरिक गरजांची समाजमान्य मार्गानं पूर्तता करण्यासाठी निर्माण झाली आहे. मात्र काही कारणानं या गरजा पूर्ण झाल्या नाहीत, तर पुरुषानं वेश्यावस्तीत जाणं फारसं गैर मानलं जात नाही. मात्र त्याचबरोबर स्त्री उपभोगायची वस्तू आहे, त्यासाठी तिला परवानगीची गरज नाही, अशी मनोवृत्तीही नवीन नाही. असं असूनही केवळ मन मोकळं करण्यासाठी, स्वत:चा आत्मसन्मान जपण्यासाठी आपल्याला समजून घेणारी एक सखी मैत्रीण असावी, जिच्याकडे आपण व्यक्त व्हावं, असा विचार करणारा प्राध्यापक आदर्श ठरतो. स्त्री-पुरुष शरीराच्या व्यतिरिक्तही एकत्र येऊ शकतात. एकमेकांच्या मनाचा विचार करून एकमेकांना साथ देऊ शकतात, ही आधुनिक विचारसरणी अंतर्मुख करण्याबरोबरच सुखावूनही जाते.
.................................................................................................................................................................
सृजन-संवाद (भाग १) - गोपाळ अवटी, भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर, पाने - ३८४, मूल्य - ४२५ रुपये.
सृजन-संवाद (भाग २) - गोपाळ अवटी, भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर, पाने - ३६२, मूल्य - ४२५ रुपये.
हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5255/Srujan-Sanwad-bhag-1-ani-bhag-2
..................................................................................................................................................................
एकंदरीतच हे प्रश्न कोणा एका समूहाचे, व्यक्तीचे, वर्गाचे नाहीत. जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी हे प्रश्न दिसतात. या प्रश्नांकडे केवळ स्त्रियांचे प्रश्न म्हणून न बघता त्यांच्याशी संबंधित सर्वच घटकांचे प्रश्न म्हणून ते समजून घेण्याची गरज आहे. त्यांच्या मुळांशी जाऊन त्यांचा वेध घेऊन उपाययोजना केल्यास एक नवीन समाज निर्माण करणं अशक्य नाही, याची जाणीव होते. प्रत्येक काळ्या ढगाला एक सोनेरी किनार असते. त्याप्रमाणे समाजातील काही घटक या सोनेरी किनारीप्रमाणे आहेत आणि समाजातील काळं वास्तव दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे या कादंबरीच्या अनुषंगानं जाणवतं.
स्त्री-पुरुष समानता हा विषय हाताळणाऱ्यांना सर्वच घटकांतील स्त्रियांच्या प्रश्नांची जाणीव आहे, असं नाही. आजही वेश्यावस्ती म्हणजे काहीतरी घाण, गलिच्छ, पाप वगैरे संकल्पना अनेकांच्या मनात असतात. पुरुषांची वासना, हवस, शारीरिक गरज भागवण्याचं काम हा घटक करतो. त्या बदल्यात त्यांना काय मिळतं? शोषण, अत्याचार, ओंगळपणा, अस्वच्छता, आजार.
आपल्याकडे सार्वजनिक वस्तूंची वाटेल तेव्हा, वाटेल तिथं आणि वाटेल तशी नासधूस करण्याची मनोवृत्ती दिसते. कोणत्याही दंगलीत, चळवळीत डोळ्यांदेखत या वस्तूंची राख होताना आपण बघतो. दुर्दैवानं वेश्यांचीदेखील वेगळी अवस्था नाही. कोणीही, कुठेही, कधीही, केव्हाही आणि कसेही अत्याचार करतो. या अत्याचारांची दादही मागता येत नाही. कारण दाद ज्यांच्याकडे मागायची तेही शोषकच! म्हणून वेश्यांचे मूलभूत अधिकार, मूलभूत गरजा कायम दुर्लक्षित राहिल्या आहेत. काही मोजक्या व्यक्ती किंवा संस्था याविरुद्ध लढायला उभ्या आहेत. पण एकूण प्रश्न आणि ते सोडवण्याची उमेद बाळगणाऱ्यांची संख्या यातील व्यस्त प्रमाण कधीही न संपणारं आहे.
.................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
या कादंबरीतील वेश्यांच्या तोंडी येणारे संवाद अक्षरक्ष: अंगावर येतात. माणुसकीवरचा विश्वास डळमळीत करतात. मेंदू सुन्न आणि जाणिवा बधीर करतात. आपण जे वाचतोय ते काल्पनिक नाही, तर कुणीतरी भोगलंय, भोगतंय आणि भोगणार आहे, हे दाहक वास्तव बेचैन करतं. एकेक प्रसंग, संवाद आपल्यावर आदळत राहतात.
लेखिकेचं लेखनकौशल्य ही कादंबरी डोक्यातून जाऊ देत नाही. माणूस वाईट नसतो, तर तो घडवणारी परिस्थिती वाईट असते, हा विचार करायला ही कादंबरी भाग पाडते.
ही कादंबरी वाचून मतपरिवर्तन होतं, हेच लेखिकेचं यश आहे, असं वाटतं.
..................................................................................................................................................................
लेखिका प्रिया काळे एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे येथे सहाय्यक प्राध्यापक आहेत.
kaprish226@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment