नोबेल पारितोषिक विजेते चिनी कादंबरी-कथाकार च्याव शिंज्यान (गाओ झिंगझियान, Gao Xingjian) यांना नॅशनल तैवान युनिव्हर्सिटीने साहित्य, रंगभूमी व सौंदर्यशास्त्र या विषयांवर व्याख्यानमालेसाठी आमंत्रित केले होते, परंतु त्यांच्या आजारपणातून ते पूर्णपणे बरे न झाल्यामुळे त्यांना लांबचा प्रवास करत नॅशनल तैवान युनिव्हर्सिटीमध्ये व्याख्यान देणे शक्य झाले नाही म्हणून त्यांचे व्याख्यान त्यांनी एकूण ११ प्रकरण असलेल्या ‘Aesthetics and Creation’ या पुस्तकरूपात प्रकाशित केले. हा अनुवादित लेख त्या पुस्तकाले पहिले प्रकरण ‘The Position of Writer’ (२०१२) होय. या प्रकरणाच्या पूर्वार्धाचा हा मराठी अनुवाद...
अनुवाद : विजय अशोक इंदुशोकाई
..................................................................................................................................................................
लेखकाच्या स्थानाचा विचार करता, आपल्याला समकालीन समाजात साहित्याचे स्थान आणि लेखकाचा त्या समाजाशी आणि त्या काळाशी असलेला संबंध लक्षात घ्यावा लागेल. खरं तर हा विषय खूप मोठा आहे. जसा प्रत्येक लेखकाचा साहित्याकडे बघण्याचा आपापला एक दृष्टीकोन असतो, तसा माझा याकडे बघण्याचा दृष्टीकोन अगदी साधा आणि सरळ आहे. तो निव्वळ माझा वैयक्तिक दृष्टीकोन आहे. वेगवेगळा दृष्टीकोन असण्याचे वेगवेगळे पर्याय असतात आणि असं असणं हा हे बरोबर किंवा हे चुकीचे या द्वंद्वाकडे नेणारा मुद्दा नाही.
मागच्या दशकादरम्यान साहित्यक्षेत्रात राजकीय हस्तक्षेप वाढला. या हस्तक्षेपाने साहित्य व्यवहारातील मुक्त विचारांना रणभूमीत रूपांतरीत केले आणि हा निर्दयी वाद-विवाद सर्वत्र पसरला, अगदी पाश्चिमात्य देशांपासून तर पूर्वीय देशांपर्यंत आणि युरोप व अमेरिकेपासून तर तिसऱ्या जगतापर्यंत. असे एकही ठिकाण शिल्लक उरले नाही जेथे या गोष्टी पसरल्या नाहीत.
विसाव्या शतकादरम्यान साहित्याने व लेखकांनी ज्या वेदना आणि यातना अनुभवल्या, या गोष्टींच्या तपशिलाची गरज नाही. कारण सध्याच्या वास्तविकतेत, राजकारणाने जे थैमान घातलेले आहे, त्याची तीव्रता कमी होत नाही. उलट प्रसारमाध्यमांद्वारे (media) सांस्कृतिक जीवनाचे सगळेच घटक गुंतागुंतीचे होत चालले आहेत. सरकारच्या सांस्कृतिक धोरणात व शैक्षणिक संस्थांमध्येही राजकीय हस्तक्षेप पाहावयास मिळतो. एवढेच नव्हे तर सर्वसामान्य सांस्कृतिक घडामोडीतसुद्धा राजकीय गटबाजी दिसतेच.
लेखक हा विशिष्ट वर्गाचा आहे, असे त्याच्याजवळ आभासी ओळखपत्रच असायला हवे, याला राजकीय अचूकपणा किंवा राजकीय शुद्धता समजली जाते. या गोष्टी त्यावर लादल्या जातात आणि हे असं विसाव्या शतकाच्या विचारधारेचे ओझं त्याच्या विद्वत्तेवर आहे. शिवाय तथाकथित लिटररी ट्रेंड्स (literary trends), खरं तर ते पॅालिटीकल ट्रेंड्स आहेत, जे साहित्यनिर्मिती आणि साहित्य समीक्षा या दोन्ही गोष्टींना अडचण निर्माण करत प्रतिबंधित (मर्यादित) करतात. अशाने साहित्य हे राजकारणात समाविष्ट आहे असं समजलं जातं, परंतु वास्तवात राजकारणाने साहित्यावर घातलेला हा घाला आहे. यावरून निश्चितच असं म्हणता येईल की, लेखक हे राजकारणी बनलेत आणि त्यांनी साहित्याचा वापर सामाजिक समीक्षेसाठी हत्यार म्हणून केला. त्यांनी त्यांच्या राजकीय जाहिरातीसाठीसुद्धा साहित्याचा हत्यार म्हणूनच वापर केला. एवढेच नाही तर असंही म्हणता येईल की, त्यांनी साहित्याचा वापर राजकारणाची सेवा करण्यासाठी केला. पण नाण्याच्या जशा दोन बाजू असतात, तसे या नाण्याकडे जर कोणत्याही बाजूने बघितले तरी साहित्यावर राजकारणाचे आक्रमण किंवा साहित्याचा राजकारणात समावेश, हे विसाव्या शतकापूर्वीचे एक पूर्वस्मृतीहीन दृश्य आहे, हे दिसेल.
.................................................................................................................................................................
बीइंग – विजय अशोक इंदुशोकाई, आऱ्हान मीडियास्मिथस, नाशिक, पाने – २२२ (हार्डबाऊंड), मूल्य - ३६० रुपये
हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5250/Being
..................................................................................................................................................................
यावेळेपर्यंत जे लेखक होऊन गेलेत, ते राजकारणाच्या संपर्कात होते, राजकीय हुकुमतीच्याही संपर्कात होते, परंतु त्यांनी कधीही त्यांच्या साहित्यनिर्मितीचा राजकारणासाठी वापर केला नाही. तथापि विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून मार्क्सवादाचा व साम्यवादी क्रांतीचा उदय या गोष्टींचा प्रचंड प्रसार झाला, ज्याचा बुद्धिजीवी पिढ्यांवर आणि स्वाभाविकच त्यांच्यातील लेखकांवर गहन प्रभाव निर्माण झाला. साहित्यात मानवता असते आणि साहित्याचा हेतू मानवजातीच्या जन्मजात सामाजिक संबंधाचा आदर करण्याशी संबंधित असतो. परंतु सामाजिक संबंध हे सर्वांत जास्त राजकारणाच्या ठळक पद्धतींवर अवलंबून दिसतात. प्रत्येक जण राजकारणात ओढला जातो, शिवाय त्याची राजकारणातून सुटकादेखील होत नसते. साहित्यिक कार्याची राजकीय भूमिका साहित्यिक समीक्षेसाठी प्राथमिक निकष बनून बसलाय. साहित्याचा आणि इतिहासाच्या मार्क्सवादाचा भौतिकवादी दृष्टिकोन साहित्याला आणि कलेला सामाजिक समीक्षेच्या हत्यारात परावर्तित करतो. ही काय साधारण सामाजिक समीक्षा नव्हे. ही गोष्ट जर काटेकोरपणे स्पष्ट करायचे म्हटले तर हा एक भांडवलशाही विरुद्ध युद्धसंघर्ष आहे, ज्याचा वापर भांडवलदारांची पोलखोल करण्यासाठी आणि कामगार वर्गाच्या क्रांतीला प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात आला.
या प्रकारच्या विचारधारेमुळे बर्लिनची भिंत पाडण्यात आली नव्हती, परंतु या प्रकारच्या विचारधारेला आजपर्यंत अविरत वाहती ठेवण्यास बर्लिनची भिंत पडणे, हे कारण नक्कीच पोषक होते.
अलीकडेच माझी इंग्लंडला ट्रिप झाली. तेथे माझी एका पत्रकाराशी भेट झाली. तो माझे हे बोलणे ऐकून आश्चर्यचकित झाला की, साहित्य हे राजकारणापासून अलग झालेय, ते राजकारणापासून स्वतंत्र झालेय आणि ते राजकारणाच्या पलीकडेही गेलेले आहे. त्याचे असे आश्चर्यचकित होणे हे सिद्ध करते की, साहित्य राजकारणापासून वेगळे होऊ शकत नाही, हा कल बुद्धिजीवांमध्ये अजूनही बराच लोकप्रिय आहे.
विसाव्या शतकाचे पान उलटले. पूर्वयुरोप आणि यूएसएसआर (Union Of Soviet Socialist Republics) येथील निरंकुश एकपक्षीय राज्यकारभाराचे (Totalitarianism) विघटन झाले, परंतु चीनमध्ये ते तसेच राहिले. बाजारी अर्थव्यवस्था (market economy) पूर्णपणे खुली झाली म्हणून साम्यवादी आदर्श राज्याची कल्पना (Communist Utopia) धुळीस मिळाली असे म्हणता येऊ शकते. शतकापेक्षाही जास्त चाललेला भांडवलशाही विरुद्ध असलेला युद्धसंघर्ष भांडवलशाहीचा प्रसार करण्यास अपयशी ठरला. परंतु बोकाळलेल्या जागतिकीकरणाने भांडवलशाहीच्या स्थैर्य विजयाचे संकेत दिलेत आणि या अपरिवर्तनीय सत्याला नैतिक न्यायही नाही आणि राजकीय समीक्षाही (ethical judgement and political criticism) बाजूला सारू शकत नाही किंवा त्याला अडथळा निर्माण करू शकत नाही. मार्क्सवादाने पुढे आणलेली साम्यवादी आदर्शराज्याची कल्पना समाजाची पुनर्रचना करण्यास समर्थ नव्हती, शिवाय ती तिच्या वेळेपूर्वीच इतिहास जमा झाली.
साहित्य सार त्याच्या उपयुक्ततेपासून विभक्त झालेला दिसतो, परंतु निरंकुश एकपक्षीय राज्यकारभारात राजकारणाचे साहित्यावर आणि लेखकांवर वर्चस्व असते. या शासनव्यवस्थेत लेखकाला राजकारणाविषयी आदर बाळगावाच लागतो, नाहीतर तो लिहू शकत नाही. त्याला उपजीविकेचे साधन मिळू शकत नाही, किंबहुना त्यांच्या जीवावरही बेतू शकते. या मानाने पाश्चिमात्य लोकशाहीत लेखकांची स्थिती बऱ्यापैकी चांगली आहे. जेथे लेखक पाहिजे ते पुस्तक लिहू शकतो, पाहिजे ती पुस्तके स्वतःजवळ बाळगू शकतो आणि उपजीविकेसाठी त्याला पुस्तकांवर अवलंबून रहायचीही गरज नसते. तो या गोष्टींसाठी पूर्ण स्वतंत्र असतो, परंतु अडचण अशी आहे की, या प्रकारचे स्वातंत्र्य खूपच कमी लेखक उपभोगतात, कारण भांडवलशाही फायद्याचे कायदे सारखेचपणाने साहित्यालाही लागू होतात. जर काही लेखक बाजाराच्या दबावाला शरण जात नसतील, बाजारात टिकून राहण्यासाठी फॅशन पाळत नसतील आणि वाचकांच्या रुचीचाही विचार करत नसतील, तर अशा लेखकांना या व्यवस्थेत टिकून राहणेसुद्धा खूप जड जाईल.
गंभीर साहित्य (Serious Literature) निर्मितीवर जागतिकीकरणाचा दबाव जोमाने वाढत चाललाय. लोकशाही व्यवस्थेत राजकारणसुद्धा साहित्यात हस्तक्षेप करते, म्हणून एखाद्या लेखकाला जो डाव्या किंवा उजव्या कोणत्याही पक्षाचा नसतो, त्याला प्रसारमाध्यमांतून आपला आवाज प्रसारित करण्यास खूप अडचण येते. पाश्चिमात्य देशात लेखकाला अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आहे, साहित्य नवनिर्मितीचेदेखील स्वातंत्र्य आहे, परंतु साहित्य प्रकाशनाचे काय? कारण त्याला प्रकाशनाकरता राजकीय स्वातंत्र्याच्या मर्यादा येतात.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
साहित्यनिर्मितीच्या स्वातंत्र्याच्या शोधात लेखकांनी निरंकुश एकपक्षीय राज्यकारभार असलेल्या देशातून तर पार पाश्चिमात्य देशांत प्रवास केला, तेथे राहिलेसुद्धा, परंतु तेथील हुकूमशाहीने केलेली विषण्णता लक्षात येताच त्यांनी या अडचणीतून सुटका करण्याच्या अगोदरच त्यांना वेगळ्याच राजकारणाने ग्रासून घेतले. ‘राजकीय बहुवाद’ (political pluralism) देखील संकुचित विचार धारेचे एक रूप आहे. जेव्हा या प्रकारचे दृष्टीकोन (perspective) साहित्याच्या मूल्यांकनाकरता वापरले जातात, तेव्हा साहित्याचे समृद्ध अर्थ (Rich Connotations) दुसऱ्या राजकीय भाषेत पुरले जातात. लेखकांनी जाणीवपूर्वक अशी राजकीय लेबल्स टाळायला हवीत, परंतु याचा वापर विक्री वाढवण्याकरता केला जातोय. हे सगळे एका प्रकारच्या राजकारणातून सुटका करून घेऊन दुसऱ्या प्रकारच्या राजकारणात बाद होऊनही लेखकांच्या साहित्याचे मरण होण्यापर्यंत चालतेय.
सार्वजनिक प्रसारमाध्यमांतून प्रत्येक पातळीवरील सामाजिक जीवन छेदत राजकारणाने विसाव्या शतकाच्या साहित्याला भयावह करून सोडलेय आणि याचा लोकांच्या विचार करण्यावर अविरत परिणाम झालाय. नैतिकदृष्ट्या संतप्त साहित्याने, साहित्यातून राजकारण केव्हाच संपुष्टात आले, हे उदघोषित केले, मात्र साहित्याला राजकारणातून सुटका करून शुद्ध करणे एवढे सोपे नाही. लेखक आज कसा राजकीय लाभाच्या पलीकडे जाऊ शकतो, तो बाजारपेठेच्या पलीकडे कसा जाऊ शकतो आणि कसा विचलित न होता स्वतंत्र राहत स्वत:चा आवाज उठवण्यास समर्थ राहू शकतो, या मुद्द्यांवर संबोधित करायला मला केव्हाही आवडेल.
लेखकाने जर स्वत:च्या वैयक्तिक स्वातंत्र्य संरक्षित करण्याकरता काही (delusions & Fantasies) भ्रम आणि कल्पना त्यागल्या तर मला खात्री आहे की, लेखकाची प्रगती ही अजिबात अशक्य नाही. उदाहरण घ्यायचे म्हटले तर ‘लेखक हा लोकांचा प्रवक्ता (spokesperson) असतो’ ही गोष्ट राजकारणाने तयार केलेला एक भ्रम (illusion) आहे. ‘लोक’ ही जुनी संज्ञा (old term) इतिहासात राज्यकर्त्यांकडून साद्यंत वापरण्यात आलीय आणि विसाव्या शतकात तर या संज्ञेचा आधीच ठसा उमटलेला दिसतो. सगळ्या राजकीय हुकूमत, लोकांच्या नावानेच बोलतात, साम्यवादी निरंकुश एकपक्षीय राज्यकारभार करणारे राज्यकर्ते आणि जवळपास सर्व हुकूमशहांनीसुद्धा लोकांच्या नावाने बोलणेच अवलंबले. पण ‘लोक’ या शून्य जागेचे स्थान नेमके कुठे सापडू शकते? खऱ्या समाजात अगणित लोकांना निकडीच्या गरजा असतात. त्यात विचारस्वातंत्र्याचाही समावेश आहे. तरीही ‘लोक’ या वरकरणी देखावा असलेल्या अमूर्त गोष्टीमध्ये सगळे नष्ट होऊन जाते. जर लेखकांना राजकीय हुकूमतीशी आणि राजकारणाशी जुळवून घ्यायचे नसेल किंवा राजकीय पक्षाला व्यासपीठावरून मदत करायची नसेल, तर त्या राजकीय इसमांना लोकांचे प्रवक्ता म्हणून स्वत:ला मिरवू द्यायची किंवा त्यांना लोकांमध्ये फडकू द्यायची गरज नाही. जर असे केले नाही तर खरा वैयक्तिक आवाज हा राजकीय शब्दावडंबरामध्ये हरवून जाईल आणि लेखक हा राजकीय आवाज बनून जाईल. जेव्हा जेव्हा राजकारणाचा युद्धरथ फसलाय, तेव्हा तेव्हा साहित्याचे बलिदान घेतले गेलेय.
लेखक हा प्रेषित नसतो आणि सुंदर परीकथा घडवून आणणे त्याला बंधनकारक किंवा लोकांना किंवा निवडक लोकांना तो त्यांच्या भविष्याकरता वचन देईल यासाठीही तो बांधील नसतो. आणि निश्चितपणे लेखक आदर्शराज्याच्या कल्पनेचा भ्रम निर्माण करून जनतेला जगाच्या युद्धात उतरविण्यासाठी वचनबद्ध नसतो. शिवाय या ज्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या या शतकात जे नुकतच संपलंय, खूप वेळेस घडलेल्या आहेत. लेखक हा जगाचा रक्षणकर्ता नसतो आणि तरीही नीत्शेच्या सुपरमॅन इमेजेस या विसाव्या शतकात सर्वसामान्य होत्या. लेखक हा ख्रिस्ताच्या मिशनला खांद्यावर घेण्यास सक्षम नाही, कारण देव मेला होता. त्याला खांद्यावर घेणे त्याच अगणित लोकांना शक्य आहे ज्या लोकांचा ‘स्व’ फुगलेला असतो आणि जे त्याला जगाचा रक्षणकर्ता मानतात. नीत्शेच्या तत्त्वज्ञानापेक्षा त्याच्या रोमॅन्टिसिझमला (Romanticism) साहित्य म्हणून बघणं जास्त चित्तभेदक (interesting) आहे. कारण अतिशयोक्तीपूर्ण सुपरमॅन इमेजेस या पारंपरिक हुतात्मा ख्रिस्ताची जागा घेतात, या गोष्टीला विलक्षण निर्मिती म्हणता येईल. तरीही या इमेजेस सच्चेपणाने लोकांना चित्रीत करत नाहीत आणि हा केवळ तत्त्ववेत्त्यांचा भ्रम (hallucination) आहे. आधुनिक समाजात लोकांची खरी परिस्थिती ती नाही जे नीत्शे दावा करतो, परंतु ती आहे जी दुसऱ्या लेखकांनी रेखाटली ते लेखक ज्यांनी जर्मनमध्येही लिहिलं.
.................................................................................................................................................................
सृजन-संवाद (भाग १) - गोपाळ अवटी, भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर, पाने - ३८४, मूल्य - ४२५ रुपये.
सृजन-संवाद (भाग २) - गोपाळ अवटी, भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर, पाने - ३६२, मूल्य - ४२५ रुपये.
हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5255/Srujan-Sanwad-bhag-1-ani-bhag-2
..................................................................................................................................................................
काफ्काच्या साहित्याची वाचा त्याच्या काळात फुटली नाही, कारण तो स्वत:चे साहित्य प्रकाशित करण्यासाठी तो जीवनभर सक्षम नव्हता, परंतु विसाव्या शतकाच्या आधुनिक औद्योगिक समाजातील असलेल्या मानवजातीच्या दुर्दैवाची त्याला गहन समज होती. आजचा लोकप्रिय इतिहास सर्वसाधारणपणे असं समजतो की, विसाव्या शतकाच्या आधुनिकवादाची सुरुवात नीत्शेने केली, हे असं आहे, जणू काही आधुनिक साहित्याची सुरुवात नीत्शेपासूनच झाली. खरं तर एकोणाविसाव्या शतकाच्या शेवटी रोमँटिक साहित्यासाठी नीत्शेचे नाव घेणे जास्त सोयीस्कर ठरेल. आधुनिक साहित्याच्या जन्मासाठी काफ्काला अधिकृतरीत्या आधुनिक साहित्याची सुरुवात करणारा म्हणून घोषित करायला हवे. काफ्काने आधुनिक समाजातील माणुसकीच्या खऱ्या दुर्दैवाचे अचूक चित्रण केलेय. मनुष्य हा सामाजिक किंबहुना कौटुंबिक नाती जपण्यासही असमर्थ होता, तो तिरस्करणीय आणि क्षुल्लक होता, या आधुनिक समाजात त्याच्या अस्तित्वाचं महत्त्व एका किटकापेक्षा जास्त नव्हतं. व्यक्ती स्वत:च्या दैवाला (नियतीला) नियंत्रित करण्यास अपात्र असतात आणि जगावर वर्चस्व राखण्यास तर अपात्र पेक्षाही जास्त अपात्र असतात. तरीही गूढतेने हे सगळे हलक्यात घेतले जाते. या काळातील सबबी (दिखाऊ) आदर्शराज्याच्या कल्पना या काफ्काच्या कादंबऱ्यांच्या किल्ल्यांसारख्या होत्या, जेथे प्रवेश करणे अशक्य होते. अशा या प्रचंड स्पष्टतेसाठी काफ्का ओळखला जातो.
आधुनिक समाजातील मानवजातीच्या स्थितीचे भाकीत काफ्काने मागच्या शतकाच्या सुरुवातीलाच केले होते, तरीही सद्यस्थितीत मानवता त्याच दुर्दैवी स्थितीत आहे. या समाजात व्यक्ती जरा जास्तच कमजोर झालेत, त्यांची स्वायत्तता क्रमशः झिजत गेलेली दिसते आणि व्यक्तींचे व्यक्तिस्तत्त्व हे वेगवेगळ्या समूह-ओळख (group identity)मध्ये नाहीसे झालेले दिसते. या प्रचंड सामाजिक यंत्रणेच्या आत संस्कृती सर्वत्र वेढलेल्या या बाजारपेठेतील एक वस्तू (commodity) बनलेली दिसते. आणि प्रसारमाध्यमांना राजकीय वर्गीकरणामुळे खरे स्वातंत्र्य राहिलेले दिसत नाही. आज प्रत्येकासाठी कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाकडून बोलण्याशिवाय, त्यांच्या शब्दांखेरीज बोलण्याशिवाय एक व्यक्ती म्हणून स्वत:चे काही बोलणे, आवाज उठवणे खूप कठीण झालेय. फक्त गंभीर साहित्यनिर्मितीतच हा आवाज शक्य आहे, जे साहित्य नफा-तोट्याच्या पलीकडे बघते, जे साहित्य राजकारण्याच्याही पलीकडे असते, ज्या साहित्यात कोणत्याच प्रकारच्या फॅशनचे अनुकरण नसते आणि ज्याच्यात व्यक्तीविशिष्ट स्वातंत्र्य आणि एकता टिकवून ठेवण्यास समर्थ असतो. असा आवाज अपवादात्मकरीतीने भलेही कमजोर असतो, परंतु तो प्रचाराची अवहेलना (विरोध) करतो आणि हा एका व्यक्तीचा खरा आवाज असतो.
आजच्या या सामाजिक यंत्रणेत जर एखादा व्यक्ती कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्नित नसेल किंवा राजकारणात समाविष्ट नसेल तर त्याच्याकडे सत्ता आणि भांडवल नसते. तो सामाजिकरीत्या कमजोर समजला जातो आणि जवळपास या प्रचंड सामाजिक यंत्रणेत एक किटकासारखाच असतो. परंतु तरीही लोक किटकांपेक्षा वेगळे असतात, कारण लोकांमध्ये विचार करण्याची क्षमता असते. परंतु स्वतंत्र विचार आणि त्याची प्रतिकृती या गोष्टी जन्मजातच संपन्न नसतात, त्या हळूहळू जागरूकतेने जागरूकतेची जाणीव ठेवून येतात.
मानवतावाद (Humanism) साहित्यात युरोपीय पुनरुत्थानानंतर अवतरला आणि कलेने तर्कशक्तीचा वापर करून मध्ययुगीन काळ व धार्मिक मर्यादा यामधून मार्ग काढत वैयक्तिकरीत्या जो निरोगी आणि नैतिकरित्या जो परिपूर्ण ‘मनुष्य’ आहे, त्याला पुढे आणले. परंतु आपण जर अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकातील रोमॅन्टिसिझम पाहिला, तर तेथेही ‘मनुष्य’ जो निसर्गाकडे परत जाण्याच्या शोध घेत होता, त्याने आधुनिक औद्योगिक समाजात प्रवेश केला आणि त्यात त्याच्या आदर्शवत व्यक्तीचा शोध फक्त एक अमूर्त कल्पना ठरली.
विसाव्या शतकापर्यंत मूलभूत मानवाधिकारासाठी आवाज उठवायला लागला होता, तो एकतर क्रांतीसाठी होता किंवा फक्त पोकळ शब्दांसारखा होता. परंतु तो राजकीय सत्ता आणि बाजारपेठेला सामोरे गेला आणि हा मुक्त आणि स्वतंत्र व्यक्तिगत आवाज अशक्त आणि दुर्बल झाला. समाजाने कधीही मानवाधिकार, स्वाभिमान, विचारस्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य या गोष्टी दिल्या नाहीत या मिळवण्याकरिता किंमत मोजावी लागली आणि शेवटी हा मानवतावादाचा तर्कशुद्ध आवाज व्यावसायिक व्यवहार आणि राजकीय प्राप्ती यांच्यात पूर्णपणे बुडून गेला.
..................................................................................................................................................................
‘खिंडीत’ : शैक्षणिक जगताच्या अंतरंगाची विरूपता भेदकपणे उलगडणाऱ्या कथा
हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5254/Khindit
..................................................................................................................................................................
लोकांचे अस्सल आवाज कुठे सापडू शकतात? तर साहजिकच ते साहित्यात सापडतात, फक्त साहित्यच मानवाच्या अस्तित्वाविषयीचे सत्य सांगू शकते. राजकारण त्याला संबोधित करण्यास असमर्थ असते किंवा त्याविषयी बोलण्यास नाखूश असते. एकोणिसाव्या शतकाच्या वास्तववादी लेखक बाल्झाक (Balzac) आणि दोस्तोव्हस्की (Dostoevsky) हे जगाचे रक्षण करते ठरले नाहीत किंवा त्यांनी लोकांचे प्रवक्ता म्हणूनही स्वत:कडे बघितले नाही किंवा ते नैतिक तत्त्वे जपणारे वा सदाचाराचे अवतार (righteousness) म्हणूनही स्वत:कडे बघत नाहीत. खरे तर सदाचार वा नैतिक तत्त्वे जपणे म्हणजे नेमके असते तरी काय? या वास्तववादी लेखकांनी फक्त वास्तवाचे कथन केले. त्यांनी समीक्षेसाठीची विचारधाराही पुढे आणली नाही किंवा त्यांनी समाजाविषयीचे त्यांचे विशिष्ट मतही दिले नाही आणि आदर्श समाजाची बनावटी रूपरेषाही पुढे आणली नाही. त्यांचे लेखन हे अगदी तंतोतंत लेखन होते, जे राजकारणाच्या पलीकडचे होते, ज्याची विचारधारा सच्ची माणुसकी आणि सच्चा समाजाचे चित्रण करणारी होती. त्यांचे हे लिखाण पूर्णपणे दोन्ही, मानवाच्या अस्तित्वाचे द्वंद्व आणि मानवी स्वभावाची गुंतागुंत उघडकीस आणते. त्यांचे हे लिखाण बौद्धिकदृष्टीने किंवा सौंदर्यशास्त्रीयदृष्टीने काळाच्या कसोटीवर उभे राहते.
या व्यतिरिक्त विसाव्या शतकातील क्रांतिकारी साहित्याने विद्वान लेखक व कवींना आकर्षित केले विशेष उल्लेख करायचा म्हटला तर गॉर्की आणि मायाकोव्हस्की (Gorky & Mayakovsky) यांची नावे घ्यावी लागतील. परंतु साम्यवादी क्रांतीच्या पतनाने लोकांचा या लेखक आणि कवी यांच्या साम्यवादी क्रांतीच्या स्तुतीगीतातला रस निघून गेला. त्यांच्या लिखाणाचे अशी नियती होती असे म्हणावे लागेल आणि हे लेखक आणि कवी खरे म्हणजे त्यांच्या लेखनाच्या दुर्बोधतेमुळे संपलेत. नवा समाज जो विळा-हातोड्याने आकाराला आला होता, तो जुन्या समाजापेक्षा जास्त अमानुष आणि दुर्बल ठरला. आजचा चीन आणि रशिया या देशांत विचारधारेची आवड पैशांच्या जोरावर सर केली गेली आणि यावरून ही स्पष्ट गोष्ट आहे की, कशा प्रकारे इतिहास लोकांची चेष्टा करतो.
लेखकाला योद्धा म्हणण्याची मुळीच गरज नाही किंवा साहित्याचा उद्देश समाजाची समीक्षा आणि समाजसुधारणा पाहणे आहे, असा लेखकांना विचार करण्याची गरज नाही. लेखकांच्या निश्चितपणे राजकारणाविषयीच्या त्यांच्या वैयक्तिक कल्पना असतील, परंतु ते त्यांच्या त्या कल्पना साहित्यात मांडत नाहीत. वर्तमान समाजात जर लेखक त्यांचे स्थान स्पष्टपणे व व्यवस्थितपणे समजू शकले, तर ते व्यक्तिगताचा कमजोर असलेला आवाजाला परत आवाज देऊ शकतील, कारण हा आवाज एका व्यक्तिगताचा कोणत्याही कावा नसलेला सच्चा आवाज असेल. हा आवाज इतरांना ऐकू येईल का असा विचार करण्याऐवजी कमीत कमी हा आवाज स्वत:ला ऐकवण्याची जास्त गरज आहे. आणि ही आंतरिक गरज लिखाणासाठी मूलभूत प्रेरणा असते, ही प्रेरणा व्यक्तीच्या खऱ्या भावना, अनुभव आणि त्याची समज यातून उत्पन्न होते.
आज अशी स्थिती निश्चितच नाही, जिथे एखाद्या व्यक्तीगतावर समाजाकडून खूप मर्यादा लादल्या गेल्या असतील. व्यक्ती हा कोणत्या न् कोणत्या सामूहिकतेअंतर्गत सामाजिक परिस्थितीशी बांधील असतो. एखाद्या व्यक्तीसाठी बोलणे किंवा आवाज उठवणे, हे अनेक लोकांच्या एका सुरात असलेल्या आवाजात नष्ट नाही किंवा हुकूमतने केलेले कथन जे अपरिहार्य आव्हान असते, तेथेही हा आवाज नष्ट होत नाही. तरीही हे एखाद्याच्या सत्यतेला केलेले आव्हान व्यक्तिगताच्या अस्तित्वाचा दावा करते.
एकंदरीत या गोष्टी साहित्यातून स्पष्टपणे प्रकट व्हायला हव्यात. या अर्थाने साहित्य हे समीक्षेचे हत्यार नसून फक्त साहित्याची साक्ष असते. लेखक हा त्याच्या काळाचा केवळ साक्षी असतो. राजकीय हुकूमतने सांगितलेले आणि इतिहासात सापडणाऱ्या गोष्टींपेक्षा साहित्याने मानवतेसाठी चालवलेला आजीवन वारसा जास्त विश्वसनीय असतो कारण राजकीय हुकूमत इतिहासाला त्यांच्या राजकीय गरजेनुरूप संपादित आणि सुधारित करतात, म्हणून प्रत्येक राजकीय हुकूमत अधिकृत इतिहासाचा चेहरामोहरा बदलून टाकते. एखाद्या लेखकाने पुस्तक प्रकाशित केले तर त्याच्यात बदल करणे त्याला शक्य नसते, म्हणून मानवतेप्रती लेखकांची हमी स्वाभाविकपणे अधिकृत इतिहासापेक्षा जास्त विश्वसनीय असते. अधिकृत इतिहास हा नेहमी राष्ट्रीय सत्ताधाऱ्यांच्या फायद्यांशी संबंधित असतो.
..................................................................................................................................................................
हेही पाहा : छापील पुस्तके विरुद्ध किंडल : जुना रोमान्स विरुद्ध नवा रोमान्स!
..................................................................................................................................................................
साहित्य हे राजकीय हुकूमत आणि (political authorities & popular taste) लोकप्रिय रुचीपेक्षा वेगळे असते. लोकप्रिय रुची आणि फॅशनने प्रभावित बाजारपेठ उपभोगाच्या नियमांवर चालते. या व्यतिरिक्त गंभीर साहित्य आज जनतेसाठी नाही आणि त्याची बाजारात मागणीही नसते, म्हणून त्याचा प्रसार अडचणीचा असतो. गंभीर साहित्य हे प्रकाशकांसाठीही फायदेशीर नसते, म्हणून त्याचे प्रकाशनही अवघड असते. सर्वाधिक खपणारी पुस्तके (Best seller) व्यावसायिक प्रचाराचा आधारानेच बेस्टसेलर पुस्तके बनतात, हे काय बेस्टसेलर पुस्तक होण्याचे गुपित नाही. तर लोकप्रिय सांस्कृतिक वापरात साहित्यकृतीचा समावेश असतो आणि कोणताही कालखंड बघितला तर त्यात लोकप्रिय साहित्य आणि गंभीर साहित्य (popular literature &serious literature) असा फरक हा दिसतोच. वर्तमान समाज काही यापेक्षा वेगळा नाही, शिवाय व्यावसायिक प्रचार या गोष्टींना अगदी भव्यतेने करतो आणि जागतिक पातळीवर घेऊन जातो.
सध्या एखादे पुस्तक बेस्टसेलर बनवणे सिनेमा प्रदर्शित करण्यासारखे झाले आहे. यात फक्त स्थानिक श्रोता किंवा वाचकाचा विचार केला जात नाही, तर सामान्यत: सध्या पुस्तके देशाच्या सीमा ओलांडत खूप साऱ्या भाषेत प्रकाशित केले जाते. या सगळ्या गोष्टींसाठी आपण अशा भव्य सांस्कृतिक उत्पादक एंटरप्रायजेसला दोष देऊ शकत नाही, कारण वाचकांची रुची ही वेगवेगळी असते आणि त्यांच्या गरजा अशा लिखाणाला बढावा देत असतात. राग आणि दोषारोप साहित्याला काय वाचवू शकत नाही.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात लेखक संघटना बनवत होते, स्वत: भांडवल उभारत होते, स्वत:च्या प्रकाशनाकरता पैसे खर्च करत होते आणि स्वत:च्या नफा-तोट्यासाठी तयार होते. अशा तऱ्हेने लिखाणावर उपजीविकाही भागवत होते. आपण जर आजचा विचार केला, तर ‘अरेबियन नाइट्स’ (Arabian Nights)पासून तर दंतकथांपर्यंत सगळे व्हर्च्युअल होतेय. लेखकांना जर बाजाराच्या हालचाली समजल्या नाहीत किंवा चालू फॅशन अनुसरल्या नाहीत आणि लोकप्रिय रुची दुर्लक्षित केल्या तर त्यांचे खायचे वांदे होतील, म्हणून एखाद्याने जर स्वत:ला अशा प्रकारच्या गंभीर साहित्यासाठी वाहून घेतलेले असेल, तर त्याला आज हौशीचे म्हणता येईल. तरीही या प्रकारच्या गंभीर साहित्याचे मूल्य म्हणजे हे साहित्य खोटेपणापासून खूप लांब असते, या गोष्टीत स्थित आहे. या साहित्यात कल्पनेला (fantasy) वाव नसतो. या साहित्यात मानवजातीच्या दुर्दैवाचा खरा साक्षात्कार व खरे प्रगटीकरण असते, तसेच त्यांच्या अडचणींचा चेहरा या साहित्यात दिसतो. निश्चितच हे साहित्य लोकांना अस्वस्थ करते, परंतु हे त्यांना विचार करायलाही भाग पाडत असते.
काही विद्वान किंवा बुद्धिजीवी आदर्शराज्याच्या कल्पनेच्या पुनर्रचनेसाठी पुन्हा ओरडतील, त्यासाठी मार्क्सच्या भूतालाही ते पुढे आणतील. कारण त्यांना हे दिसत नाही हे की, आदर्श किंवा आदर्शराज्याची कल्पना नसणे ही चांगली गोष्ट आहे आणि ती नसली तर लोक जास्त स्पष्टपणे विचार करतील. वर्तमान समाजाला सामोरे जाता जेथे मानवजातीच्या विवेकशून्यतेची (absurdity) भीती आहे, याची जर व्यक्तिगताला अचानकपणे जाणीव झाली आणि त्याला जर माणूस म्हणून प्रतिष्ठा आणि स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर तो असहाय्यपणे एकटाच असेल. या सध्याच्या युगात राजकारण आणि प्रसारमाध्यमे जास्तीत जास्त गोंगाट करायला लागले आहेत, परंतु लोक या युगात मागच्या कोणत्याच युगात जेवढे एकटे नसतील, तेवढे एकटे पडलेले आहेत आणि हीसुद्धा मानवजातीची सत्य परिस्थिती आहे. एकाकी व्यक्ती जिला स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव आहे, ती समाजाच्या अडचणींना न जुमानता तिचा तोडका-मोडका किंवा कमजोर आवाज उठवेलच आणि हा आवाज उठवण्यासाठी लागेल शक्ती. जी शक्ती प्रामुख्याने लेखकांच्या आत्मविश्वासातून येते. त्या आत्मविश्वासासाठी अशा गंभीर साहित्याची समाजात असण्याची नितांत गरज आहे. हा विश्वास असलाच पाहिजे, नाहीतर अशा प्रकारच्या गंभीर साहित्याला जपणे व वाचवणे अशक्य असेल.
साहित्य फक्त साचलेल्या संतापाला काढण्यासाठी वापरता येत नाही म्हणून हे पूर्वनिश्चित केले गेले की, हे साहित्य ‘कोल्ड लिटरेचर’ (Cold Literature) आहे. लेखकाने क्षणिक उत्तेजना किंवा नैराश्याची भावना जगाकडे आपले कटाक्ष टाकण्याअगोदरच सोडून द्यायला हवी. अशा प्रकारच्या साहित्याला टिकविण्यासाठी वचनबद्धता आणि जबाबदारपणा लागतो, त्याकरता लेखकाकडे सम्यक व तटस्थदृष्टी (a pair of cold eye) असायला हवी, जेणेकरून या अमर्याद विश्वात असणाऱ्या ‘जगणे’ /‘जीवन’ या गोष्टींचे निरीक्षण लेखकाला नि:पक्षपातीपणे करता येईल.
अशा प्रकारचा लेखक जो गंभीर साहित्य लिहितो, तो कधीही त्याच्या काळातला ख्यातनाम व्यक्ती (celebrity) नसतो, तो त्या समाजातला उपेक्षित असतो. ही या प्रकारच्या लिखाणाची पूर्वअट म्हणता येईल. या आधुनिकतेत फक्त एकांतवासी व्यक्तीच समाजापासून थोडे अंतर ठेवू शकतो, ज्यामुळे तो सभोवतालच्या जगाचे निरीक्षण करण्यास स्पष्टता आणू शकतो आणि मानवजातीची चिंता आणि भ्रम (dellusion) याकरता अंतर्मुख होण्यास त्याला मानसिक ऊर्जा मिळू शकते.
.................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
निरंकुश एकपक्षीय राज्यकारभार चालणाऱ्या देशात अशा पर्यायांना मुभा नसते, तरी या शासन व्यवस्थेत तसे करायचे झाल्यास खूप मालमत्ता खर्ची पडते, शिवाय जीवाचाही धोका असतो. हा पर्याय लोकशाही व्यवस्थेतही जपणे अवघड असतेच, कारण तेथे डावे-उजवे असे पक्षीय राजकारण, हे तो पर्याय निवडू देण्यास अडचण निर्माण करते.
महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, लेखक नफा-तोटा या गोष्टींच्या पलीकडे खरेच जातो आणि तसाच अबाधित राहत एकटेपण झेलतो. जेव्हा राजकारणाचे वादळ समाजाला गिळंकृत करतं, तेव्हा एकटा व्यक्ती हा त्या वादळात वाळूच्या कणासारखाच असतो. या परिस्थितीत जरी त्याच्याकडे स्वतंत्र विचारांची क्षमता ओतप्रोत असली तरी त्याच्यासाठी हा परीक्षेचाच काळ असतो. जसे विसाव्या शतकात दोन विश्व युद्धे आणि जागतिक साम्यवादी क्रांती यांच्या रूपाने आले होते, ज्यामुळे अराजकता पसरली होती, यादवी युद्ध सुरू झाली होती आणि फॅसिस्टांच्या कट्टरतेने (fascist fanaticism) आपल्या अधिसत्तेचा डंका वाजवला होता.
या नव्या शतकात मानवतेने युद्ध आणि हिंसा या दोन्ही गोष्टी नाहीसे झाले नाहीत. मानवाधिकार व सामाजिक न्याय हे जरी शाबूत राहिले तरी त्यांचे अस्तित्व पोकळ शब्दांव्यतिरिक्त नव्हते. मानवतेसाठी लोकशाही हा एकमेव पर्याय आहे, कारण याशिवाय कोणताच दुसरा चांगला पर्याय नाही. लोकशाहीत सामाजिक तक्रारी फक्त संबोधित केल्या जातात, त्यांच्या निराकरण्याची वाट पाहत हळूहळू पंचवार्षिक उलटते व सरकार बदलून जाते. ‘सामाजिक समता’ हा शब्द फक्त राजकीय पक्षाच्या निवडणुकीतील आश्वासन देण्यासाठी प्रचाराचे घोषवाक्य म्हणून उरतो, तो शब्द कधीही त्या बाहेर येत नाही की, त्याला सन्मान मिळत नाही. राजकीय नेत्यांसोबत त्यांचे झेंडे हलवत, त्यांच्या फुशारक्या मारत, त्यांच्यासोबत प्रचारात ‘जगाच्या उद्धारक’ म्हणून बोंबा मारण्याची लेखकांना अजिबात गरज नाही, कारण तशी त्याची आणि राष्ट्रीय नेत्यांचीही क्षमता नसते. लेखक जर समाजाच्या या अशा राजकीय सद्सदविवेकबुद्धीने चालला तर याच्याने फक्त साहित्याचीच गळचेपी होऊ शकते.
..................................................................................................................................................................
विजय अशोक इंदुशोकाई
vijayindushokai@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment