सध्या करोनाकाळात आपण सगळेच ‘अस्तित्वाची लढाई’ लढतोय. प्रत्येकाच्या लढाईची तीव्रता कमी-जास्त असली तरी ती टिकवणं हे आव्हान आहे…
पडघम - विज्ञाननामा
डॉ. वृषाली रामदास राऊत
  • प्रातिनिधिक चित्र
  • Tue , 22 December 2020
  • पडघम विज्ञाननामा विक्टर फ्रंकल Viktor Frankl रोलो मे Rollo May मी कोण आहे? Mi Kon Ahe? करोना Corona

“Ever more people today have the means to live, but no meaning to live for.” - Victor Frankal

डॉ. विक्टर फ्रंकल हे ज्यू डॉक्टर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलर व नाझीच्या छळछावणीतून सुखरूप बाहेर पडले. त्यांनी या महायुद्धात सर्वस्व आणि संपूर्ण कुटुंब गमावूनदेखील परत नव्यानं आयुष्य सुरू करून अत्यंत प्रेरणादायी असं ‘Man’s Search for Meaning’ या नावाचं पुस्तक केवळ नऊ दिवसांत लिहून काढलं. ‘अस्तित्वाचं मानसशास्त्र’ या विषयात पुढे डॉ. फ्रंकल यांचं काम खूप महत्त्वाचं ठरलं.

‘अस्तित्वाचा शोध’ हा मानवी समाजाचा सगळ्यात क्लिष्ट पण दुर्लक्षित असा विषय आहे. ‘मी कोण?’ हा प्रश्न विचारला तर? बहुतेक जण मी अमुक-तमुक जातीचा, धर्माचा, वंशाचा, राज्याचा, शहराचा, देशाचा असं उत्तर देतील. जात, धर्म, वंश, शहर, राज्य, राजकीय पक्ष एवढ्यापुरतंच आपलं अस्तित्व मर्यादित आहे का, हा प्रश्न अनेकांच्या मनातही येत नाही. अलीकडच्या औद्योगिकीकरणाच्या काळात इंजिनीअर, डॉक्टर, शिक्षक, खेळाडू, राजकारणी असं आपलं संपूर्ण अस्तित्व कामाला वाहून घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

‘मी’चा शोध घेत सिद्धार्थ ‘गौतम बुद्ध’ झाला, तर ‘मी’च्या शोधत वाल्याचा ‘वाल्मिकी’ झाला! ‘असा मी कसा मी’ हा प्रश्न ‘लक्ष्य’ या हिंदी सिनेमातील नायक हृतिक रोशन स्वत:ला विचारत आपल्यालाही आपल्या आयुष्याबद्दल विचार करायला लावतो. याउलट झुंडशाहीमध्ये ‘स्व’ची जाणीव न होऊ देण्याची पूर्ण काळजी घेण्यात येते, कारण ‘स्व’ची जाणीव नसलेल्यांना आपल्या मनमर्जीनं हाकणं सोपं असतं.

..................................................................................................................................................................

‘खिंडीत’ : शैक्षणिक जगताच्या अंतरंगाची विरूपता भेदकपणे उलगडणाऱ्या कथा

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5254/Khindit

..................................................................................................................................................................

रोलो मे या मानसशास्त्रज्ञाने मानवी अस्तित्वाचा अर्थ सांगताना आपलं अस्तित्व हे स्थिर नसून ते वेगवेगळ्या अनुभवानं आकार घेतं, असं म्हटलं आहे. सध्याच्या परिस्थितीत मात्र अस्तित्वाचा संबंध थेट व केवळ व्यवसाय/कामाशी जोडून ‘उरलो फक्त कामगार वा ग्राहक’ किंवा पैसे कमावले नाहीत तर कोणी विचारणार नाही असं वाटायला लागतं. अशा व्यावसायिक, गळेकापू स्पर्धेत आपलं अस्तित्व आपल्या ‘स्किल सेट’ किंवा आपल्या ‘खर्च करण्याच्या क्षमते’पुरतं मर्यादित आहे, मात्र भावना व विचार याला व्यवहार व वही-खात्यात शून्य किंमत आहे.

त्यामुळेच प्रामुख्याने निराशा, चिंता व व्यसन असे मानसिक आजार वाढीस लागले आहेत. अपयशी व्यक्तीला कोणीच विचारात नाही, त्याला जगण्याच्या अधिकार नाही, अशा भावना वाढीस लागल्याने आत्महत्येसारखे प्रकार वाढले आहेत. 

रोल्लो मे यांच्या मते वाढलेला एकटेपणा व रितेपण यांची प्रमुख कारणं ही आपली चुकीची मूल्यं, व्यक्ती-स्वातंत्र्यवादाचा अट्टाहास, सतत दुसऱ्या व्यक्तीशी तुलना व स्पर्धा करणं यांत आहेत. त्यामुळे वैर व चीड वाढून द्वेष वाढीस लागतो. पैसे कमवणं, ते स्वत:च्या ‘अ-नैसर्गिक’ गरजा पूर्ण करण्यासाठी वापरणं आणि ते करताना निसर्ग व आपल्या आजूबाजूच्या वातावरणावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत राहणं, या चक्रव्यूहात आपण अडकलो आहोत.

‘हिटलर’ ही वृत्ती आहे आणि ती आपल्यापैकी बऱ्याच जणांत दडलेली असते. निसर्ग त्याचं काम करणार, हे आपण विसरत चाललोय. जगाला माहीत असलेला क्रूर हिटलर हा अमली पदार्थांच्या आहारी गेलेला एक भित्रा व खोटारडा माणूस होता, पण जगभरातील वेगवेगळ्या धार्मिक संघटनांचा त्याच्या नाझी मूल्यांवर अजूनही असलेला विश्वास कशाचं चिन्ह आहे? आधी अहंकारी वृतीनं वागणं, कामापुरती नाती ठेवणं आणि त्यातून आलेला एकटेपणा घालवण्यासाठी चुकीचे मार्ग निवडणं, यातून विविध प्रकारची व्यसनं लागतात.

हे बघा -

रोल्लो मे यांच्या मते आपण सगळेच वेगवेगळ्या, कुठल्यातरी समूहाशी बांधीलकी ठेवून, चार-चौघांप्रमाणे वागण्याच्या नादात स्वत:चं अस्तित्व आकाराला येऊ देत नाही. ‘Majority wins’ या उक्तीला जागून अगदी शाळा-महाविद्यालयापासून जे लोक करतील, त्याप्रमाणे करणं, यात फॅशनचे ट्रेंड, दारू-सिगरेट-नाती-कमी मार्क मिळवणं किंवा अगदीच जास्त मार्क मिळाले तर हुशार म्हणून हिणवले जाऊ या भीतीनं मत न मांडणं किंवा प्रश्न न विचारता गोष्टी सहन करत राहणं, असं करत बहुसंख्य ‘स्व’ला दाबून टाकतात.

सध्या तर बुद्धी वापरून समूह, कळप जे करतो त्याला प्रश्न विचारले तर त्या बुद्धी वापरणाऱ्याच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उभं केलं जात आहे. त्यामुळे अस्तित्वाचे प्रश्न मानसिक आजाराच्या रूपानं बाहेर पडत आहेत. सोशल मीडियाने आणखी प्रश्न निर्माण केले आहेत. ‘डिजिटल अस्तित्व’ नसेल तर आपल्या अस्तित्वाला काहीच अर्थ नाही, असं एक नवीन समीकरण तयार झालंय.

आपलं अस्तित्व बनवण्याच्या व टिकवण्याच्या नादात आपण मेंढरं बनत चाललोय, हे आपल्या ध्यानात येत नाही. मनात चालू असलेलं द्वंद्व चिंतेला व ताणाला जन्म देतं. आपण किती गोष्टींसाठी ‘स्व’ची आहुती देत असतो, याचा एकदा विचार करून पहा. आपलं अस्तित्व केवळ धर्म, जात, नोकरी, कुटुंब यापुरतं मर्यादित आहे का, की त्याच्या पलीकडेही आपण काही आहोत? म्हणजे या गोष्टी नसल्या तर आपलं अस्तित्व काय राहील? हे सर्व आजूबाजूला घडताना टागोरांच्या ‘एकला चोलो रे’ची सतत आठवण येते.

.................................................................................................................................................................

या मुलाखती म्हणजे मानवी सांस्कृतिक सौंदर्याचं प्रतिबिंब! आरसाच जणू. तुम्ही वाचकांनी त्यात डोकवावं. स्वतःस न्याहाळावं

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5255/Srujan-Sanwad-bhag-1-ani-bhag-2

..................................................................................................................................................................

‘The Shawshank Redemption’ या हॉलिवुडच्या एका दर्जेदार सिनेमात एक निष्पाप व्यक्ती न केलेल्या गुन्ह्यासाठी १९ वर्षं शिक्षा भोगते, मात्र त्या शारीरिक व मानसिक तुरुंगातून स्वत:ची सुटका करून स्वत:चं स्वप्न कसं पूर्ण करते, याचं अत्यंत सुंदर चित्रण आहे. या सिनेमाने अनेकांना निराशेच्या गर्तेतून बाहेर येण्यास मदत केली आहे. त्यात एक सुंदर वाक्य आहे, जे मुख्य पात्र त्याच्या जवळच्या मित्राला समजावताना म्हणतं -

“Remember, Red, hope is a good thing, maybe the best of things, and no good thing ever dies.”

सध्या करोनाकाळात आपण सगळेच अस्तित्वाची लढाई लढतोय. प्रत्येकाच्या लढाईची तीव्रता कमी-जास्त असली तरी ती टिकवणं हे आव्हान आहे. त्यातही जे निराशा व इतर मानसिक आजार, शारीरिक व्याधी आणि आर्थिक अडचण झेलत आहेत, त्यांच्यासाठी विक्टर फ्रंकल यांचा सल्ला मोलाचा ठरेल. त्यांच्या मते ज्यासाठी आपल्याला जगायला आवडेल (आजूबाजूला कोणी नसताना) असा एक उद्देश असणं आणि नसेल तर तो शोधणं आयुष्याला दिशा देतं. ध्येयहीन आयुष्य ओझ्याशिवाय दुसरं काही नाही.

हे बघा -

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

लेखिका डॉ. वृषाली रामदास राऊत विश्वकर्मा विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक आहेत.

vrushali31@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......