नैतिक निवाडा करायची जेव्हा पाळी येते, तेव्हा मी बहुधा ‘क्युरेटजवळची अंडी’ खातो! तुम्ही खाता?
पडघम - सांस्कृतिक
हर्षवर्धन निमखेडकर
  • छायाचित्र सौजन्य - https://allsense.com.au/tag/a-curates-egg/
  • Mon , 21 December 2020
  • पडघम सांस्कृतिक हर्षवर्धन निमखेडकर Harshawardhan Nimkhedkar शब्दांचे वेध क्युरेटजवळची अंडी Curate's egg अ‌ॅगाथोकॅकॉलॉजिकल Agathokakological नाताळ Naataal

शब्दांचे वेध : पुष्प एकोणिसावे

हैदराबादचे सालारजंग वस्तू संग्रहालय आपल्यापैकी बहुतेकांनी पाहिलेच असेल. त्यातल्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण कलाकृतींपैकी एक आहे – ‘मेफिस्टोफिलिस आणि मार्गारेटा’चा दुहेरी पुतळा. एकोणिसाव्या शतकात फ्रान्स देशात एका अज्ञात शिल्पकाराने तयार केलेल्या या अप्रतिम काष्ठशिल्पाचा विषय आहे- चांगले (Good) आणि वाईट (Evil) यांच्यातला सनातन झगडा. Goethe (गटे) किंवा खऱ्या उच्चारानुसार ग(र)टा या जर्मन लेखकाने १८०८ च्या आपल्या ‘Dr. Faust’ या सुविख्यात नाटकात मुळात हे द्वंद्व मेफिस्टोफिलिस आणि मार्गारेटा या दोन पात्रांमार्फत रंगवले होते.

याच संकल्पनेचा मूर्त आविष्कार म्हणजे हा लाकडी पुतळा. या पुतळ्याच्या एका बाजूला मेफिस्टोफिलिस कोरलेला आहे, तर त्याच्या विरुद्ध बाजूला आहे मार्गारेटा. या पुतळ्याच्या समोर उभे राहून तुम्ही जेव्हा मेफिस्टोफिलिसला बघता तेव्हा समोरच ठेवलेल्या एका मोठ्या आरशात तुम्हाला मार्गारेटाचा चेहरा दिसतो. अतिशय कौशल्यपूर्ण असे हे कोरीव काम आहे. मेफिस्टोफिलिसच्या अंगावर त्याचे पूर्ण शरीर आणि डोक्याचा मागचा भाग झाकणारे एक झग्यासारखे पायघोळ वस्त्र आहे. त्याचा फक्त चेहरा दिसतो. पायात जाड टाचा असलेले बूट आहेत. त्याच्या लांब, आंबट चेहऱ्यावर उपरोधिक, किंचित कपटी, छद्मी असे स्मितहास्य आहे.

मार्गारेटा मात्र एक शालीन, शांत, सभ्य, लाजरी, अबोल, पापभिरू मुलगी आहे. ती प्रेमात आकंठ बुडलेली आहे. ती अधोमुख उभी असल्याने तिचे सोज्वळ डोळे खाली जमिनीकडे बघत आहेत आणि तिच्या एका हातात प्रार्थनेचे पुस्तक आहे. दोघांच्याही देहबोलीतून त्यांची व्यक्तिमत्त्वे ठळकपणे प्रगट होतात. मार्गारेटा गुड म्हणजे चांगुलपणाचे प्रतिनिधित्व करते, तर मेफिस्टोफिलिस हा वाईट म्हणजे इव्हिलचे दर्शन घडवतो.

सालरजंग येथील काष्ठशिल्प

मेफिस्टोफिलिस किंवा मेफिस्टो हा जर्मन दंतकथांमध्ये आढळणारा एक दैत्य किंवा असुर आहे. तो सैतानाचा दलाल आहे, असे मानले जाते. तो गोड गोड बोलून आणि खोटी आश्वासने देऊन सज्जन माणसांना भुरळ घालतो आणि वाईट मार्गाला लावतो. शेवटी या बिचाऱ्यांना सैतानाला शरण जावे लागते.

‘Dr. Faust’ (डॉ. फाउस्ट) या नाटकाचा हाच विषय आहे. याच लबाड, लफंग्या मेफिस्टोचे आणखी एक मनोहारी दर्शन दिवंगत वसंतराव वरखेडकर यांच्या ‘प्रतिनिधी’ या विख्यात मराठी कादंबरीतही घेता येते. (तुम्ही ही कादंबरी वाचली नसेल तर अवश्य वाचा. मराठीतल्या अत्युत्कृष्ट कलाकृतींमध्ये तिची गणना व्हायला हवी, असे माझे मत आहे.)

तसे पाहिले तर चांगले-वाईट या स्थल-काल-परिस्थितीसापेक्ष संकल्पना आहेत. Absolute  म्हणजे ‘केवल’ अशा पद्धतीची त्यांची व्याख्या करता येत नाही. काल जे चांगले समजले जात होते, ते आज नसू शकते आणि आजचे वाईट उद्याही वाईटच असेल असेही नाही. पण तरीही समाजाच्या व्यापक हिताच्या दृष्टीने आपण चांगल्या आणि वाईटाची नैतिक परिमाणे ठरवली आहेत आणि आज जगभरात एकंदरीतच या सभ्य संकेतांना सार्वकालिक आदर्श मानून मते ठरवली जातात, न्यायनिवाडे केले जातात. आणि मानवी स्वभावाचे, वर्तणुकीचे, कृतींचे वर्गीकरण केले जाते. म्हणून ढोबळ मानाने मेफिस्टोफिलिस हा वाईट तर मार्गारेटा ही चांगली, सद्गुणी व्यक्ती मानली जाते.

आता प्रश्न असा आहे की उपरोक्त काष्टशिल्पात दाखवल्याप्रमाणे एकाच मनुष्यात या दोघांचाही निवास असू शकतो का? सात्त्विक, राजसिक, आणि तामसिक असे मानवी स्वभावाचे तीन प्रकार कल्पिले गेले आहेत. प्रत्येकातच हे त्रिभाव असतात, फक्त त्यांचे प्रमाण अनिश्चित असते. तुम्ही कसे वागता, काय खाता, पिता, किंवा काय विचार करता, यानुसार तुम्ही कोण आहात हे ठरवले जाते. तामसिक व्यक्ती कनिष्ठ दर्जाची तर सात्त्विक व्यक्ती श्रेष्ठ मानली जाते. सात्त्विक व्यक्तीतही तामसिक भाव असतोच, पण तिने प्रयत्नपूर्वक, निर्धारपूर्वक साधना करून आपल्यातल्या या तमोगुणाचा बिमोड केला असतो आणि त्याला कायमचे लपवून ठेवले असते. तामसिक व्यक्तीचे वर्तन याच्या अगदी उलट असते. बाकीची माणसे मात्र सर्वसाधारणपणे रजोगुणी असतात. एखादी व्यक्ती पूर्णपणे चांगली किंवा पू्र्णपणे वाईट आहे असे ठरवायची निदान माझी तरी आज मानसिकता नाही. अगदीच एखादी अपवादात्मक परिस्थिती वगळता इतर वेळी असा नैतिक निवाडा करायची जेव्हा पाळी येते, तेव्हा मी बहुधा अशा लोकांना संशयाचा फायदा देऊन ‘क्युरेटजवळची अंडी’ खातो!

.................................................................................................................................................................

या मुलाखती म्हणजे मानवी सांस्कृतिक सौंदर्याचं प्रतिबिंब! आरसाच जणू. तुम्ही वाचकांनी त्यात डोकवावं. स्वतःस न्याहाळावं

सृजन-संवाद (भाग १) - गोपाळ अवटी, भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर, पाने - ३८४, मूल्य - ४२५ रुपये.  

सृजन-संवाद (भाग २) - गोपाळ अवटी, भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर, पाने - ३६२, मूल्य - ४२५ रुपये.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5255/Srujan-Sanwad-bhag-1-ani-bhag-2

..................................................................................................................................................................

‘क्युरेटजवळची अंडी?’ म्हणजे काय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. हे ‘curate's egg’ या इंग्रजी वाक्प्रचाराचे शब्दशः भाषांतर आहे. याचा अर्थ (एखादी गोष्ट) काही प्रमाणात चांगली आणि काही प्रमाणात खराब असणे. तसे पाहिले तर या वाक्प्रचाराच्या मूळ अर्थानुसार, ती गोष्ट पूर्णपणे खराबच असते, फक्त सौजन्य किंवा भिती, संकोच वाटतो म्हणून तुम्ही तसे स्पष्टपणे न सांगता गुळमुळीत बोलता आणि त्या गोष्टीची (खोटी)  तारीफही करता. म्हणजे ती बाब ‘पूर्णपणे वाईट’ असे न म्हणता ‘ती काही प्रमाणात चांगलीही असू शकते’, असे म्हणता.

हे झाले क्युरेटजवळचे अंडे. हा मूळ अर्थ आता बऱ्यापैकी बदलला गेला असून त्यातला उपरोध जवळपास नाहीसा झाला आहे. त्यामुळे एखादी बाब, गोष्ट एकाच वेळी काही प्रमाणात वाईट आणि काही प्रमाणात चांगली देखील असू शकते, हे आता ‘curate's egg’ या वाक्प्रचारातून ध्वनित होते. त्यातही, टक्केवारीच काढायची असेल तर वाईटाचे प्रमाण जरा जास्त आहे, हे तुम्ही यातून सुचवता. पण त्यात चांगला भागही असण्याच्या शक्यतेला तुम्ही नाकारत नाही.

‘Curate's egg’ या वाक्प्रचाराचे मूळ एका व्यंगचित्रात आहे. इंग्लंडमधल्या अँग्लिकन चर्चमध्ये अनुभव, सेवा-ज्येष्ठता, आणि गुणवत्ता या अर्हता-निकषांनुसार धर्मोपदेशकांची श्रेणीनिहाय वर्गवारी केली जाते. या यादीत बऱ्याच कनिष्ठ पातळीवर असतो तो क्युरेट. हा रेक्टर किंवा विकरचा मदतनीस असतो. याउलट बिशपसाहेब हे फार वरच्या दर्जाचे अधिकारी असतात. साहजिकच एखाद्या क्युरेटला जर कधी एखाद्या बिशपला सामोरे जावे लागले, तर तो बिचारा घाबरून गेला असतो. बिशपसमोर त्याची त-त-प-प होते. बिशप नाराज होतील असे काहीही तो करू इच्छित नाही. त्यामुळे स्पष्ट काही सांगायची वेळ आली तरी तो गुळमुळीत काही तरी बोलून मोकळा होऊन जातो.

क्युरेटच्या या मानसिकतेचे फार छान चित्रण दोन व्यंगचित्रांत केले गेले आहे. पहिले व्यंगचित्र ‘Judy’ नावाच्या मासिकात मे १८९५ मध्ये प्रसिद्ध झाले होते. चित्रकार होता कोणी विल्करसन. यात एका कडक, कठोर दिसणाऱ्या, रागीट चर्येच्या बिशपकडे एक नवखा, घाबरट क्युरेट ब्रेकफस्टसाठी आला आहे असे दाखवले आहे. खाता खाता अचानक बिशप म्हणतात, “Dear me, I'm afraid your egg's not good!” (तुला मिळालेले अंडे चांगले नाही, असे मला वाटते.) आता त्या क्युरेटला खरे बोलायची धास्ती वाटते - न जाणो, त्यामुळे बिशपला आपला राग आला तर? तो बिचारा घाईघाईत म्हणतो, “Oh, yes, my Lord, really -- er -- some parts of it are very good.” (नाही, नाही, अंड्याचे काही भाग खरंच चांगले आहेत.)

‘ज्युडी’तले व्यंगचित्र

नंतर अगदी याच प्रकारचे आणखी एक व्यंगचित्र नोव्हेंबर १८९५ च्या ‘Punch’ या सुप्रसिद्ध (आणि जास्त खपाच्या) विनोदी मासिकात प्रकाशित झाले. त्याचा चित्रकार होता जॉर्ज द्यु मॉरिअर. चित्राचे शीर्षक आहे, ‘True Humility’. मुख्य सेट-अप जवळपास तोच आहे, बिशपच्या घरी ब्रेकफस्ट करणारा क्युरेट. या वेळी बिशप म्हणतात, “ ‘I’m afraid you've got a bad egg, Mr. Jones.” त्यावर घाबरलेला क्युरेट म्हणतो, “Oh, no, my Lord, I assure you! Parts of it are excellent!”

माॅरिअरचे ‘पंच’मधले व्यंगचित्र

ज्युडीतल्या चित्रापेक्षा ‘पंच’मधले हे चित्र जास्त गाजले आणि त्यावरूनच पुढे ‘Curate's egg’ हा नवा वाक्प्रचार वापरात आला. (George du Maurier (जॉर्ज द्यु मॉरिअर) हा एक प्रख्यात लेखक आणि चित्रकार होता. इंग्रजी भाषेतली पहिली बेस्ट सेलर कादंबरी लिहिण्याचा बहुमान त्याच्याकडे जातो. ‘Trilby’ हे त्या कादंबरीचे नाव आहे. या कादंबरीमुळे पुढे दोन नवे शब्द इंग्रजी भाषेत रूढ झाले, ते म्हणजे ‘Trilby’ आणि ‘Svengali’. पण या शब्दांबद्दल अधिक माहिती पुढे केव्हा तरी. जॉर्जचा मुलगा जेरल्ड फार मोठा नट होता, आणि जेरल्डची मुलगी ‘Dame Daphne du Maurier’ (डॅफ्नी द्यु मॉरिअर) ही तर आधुनिक इंग्रजीतली एक फार थोर आणि नावाजलेली कादंबरी आणि नाट्यलेखिका होती.)

‘Curate's egg’ या वाक्प्रचाराचे मूळ १८७५ मध्ये रेव्ह. एफ्. आर्नल्ड यांनी लिहिलेल्या ‘Our Bishops and Deans’ या पुस्तकात उदधृत केलेल्या याच अर्थाच्या एका आख्यायिकेमध्ये आहे, असेही मानले जाते. ते जाऊ द्या, पण घाबरलेल्या या विक्टोरियन क्युरेटचा बदललेला आधुनिक अवतार बघूनच आपण त्याचा निरोप घेऊ या. ‘पंच’ मासिकाच्या शेवटच्या अंकात १९९२मध्ये एका चित्रकाराने जॉर्ज द्यु मॉरिअरच्या त्या जुन्या चित्राचे नविनीकरण केले. त्याचा हा नवा क्युरेट ‘angry young man’ आहे. आणि चांगला आडदांड पण आहे. सीन तोच आहे, पण या खेपेला बिशपच्या पृच्छेला क्युरेट न घाबरता उत्तर देतो, “This ***ing egg's bad!” हे उत्तर ऐकून बिशपसाहेबांना चक्कर आली असणार. कालाय तस्मै नमः!, दुसरे काय?

१९९२मधले ‘पंच’मधले व्यंगचित्र

‘क्युरेट्स एग’ यातून काही चांगले, काही वाईट ही जी संमिश्र भावना व्यक्त होते, तिच्यात आणि मेफिस्टोफिलिस - मार्गारेटा यांच्या त्या लाकडी पुतळ्यातून व्यक्त होणाऱ्या संकल्पनेत काही साम्य आहे का? ‘क्युरेट्स एग’चा संबंध संभाषण कलेशी आहे. मेफिस्टोफिलिस - मार्गारिटा यांचे अद्वैत मात्र मूळ मानवी प्रकृती, प्रवृत्तीत आढळते. संभाषणे कृतक असू शकतात, दिखाव्यापुरती असू शकतात. त्यातून व्यक्त होणारी बऱ्या-वाईटाची तुलना ही लौकिक, व्यावहारिक पातळीवरची असते. मानवी स्वभावातल्या बऱ्या-वाईटाची चिकित्सा ही या उलट विचारांच्या अमूर्त पातळीवर जाऊन केलेली असते.

माणसाचा मूळ स्वभाव जन्मजात असतो. तो अगदीच अपरिवर्तनीय असतो असे नाही, पण त्या बदलासाठी लागणारी साधना, ध्यास, मेहेनत, चिकाटी, आणि मुख्य म्हणजे तशी तीव्र इच्छा असणे हे काही येऱ्या गबाळ्याचे काम नव्हे. मेफिस्टोफिलिस - मार्गारेटा यांच्या त्या पाठीला पाठ लावलेल्या, परस्पर विरोधी दिशांना बघणाऱ्या युग्मातून मला तरी ‘agathokakological’ संकेत मिळतात. म्हणजे मनुष्य एकाच वेळी चांगले आणि वाईट यांचे मिश्रण असू शकतो, हे सांगणाऱ्या तत्त्वज्ञानाची झलक.

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

‘Agathokakological’ (अ‌ॅगाथोकॅकॉलॉजिकल’) या शब्दाचे तीन भाग आहेत. Agathology म्हणजे सत किंवा चांगले यांचा अभ्यास करणारे शास्त्र. प्राचीन ग्रीक भाषेतल्या ἀγαθός (agathós “good”) या शब्दापासून ही अ‌ॅगाथॉलॉजी जन्माला आली. ‘Kako’ (किंवा caco) म्हणजे वाईट, सैतानी, दुष्ट, अनिष्ट. आणि तिसरा भाग म्हणजे लॉजिकल. त्यामुळे मनुष्य स्वभावातल्या सत आणि असत, सुष्ट आणि दुष्ट अशा ज्या संमिश्र सहज प्रेरणा, प्रवृत्ती आहेत, त्यांचा तर्कशुद्ध विचार हा अ‌ॅगाथोकॅकॉलॉजिकल विचार आहे. तसे पाहिले तर हा थिऑलॉजी किंवा ईश्वरविद्याशास्त्राचा विषय आहे. तत्त्ववेत्ते आणि धर्मशास्त्राच्या अभ्यासकांसाठी तो बौद्धिक खुराक आहे. मी यापैकी काहीही नसल्याने मी यावर अधिक काही बोलू इच्छित नाही. पण सत आणि असत यांच्यातले हे अंतर्द्वंद्व दाखवणारे हे काष्ठशिल्प तुम्ही एकदा तरी जरूर पहा, एवढे मात्र मी सांगू शकतो. रॉबर्ट लुई स्टिवन्सनची १८८६ची ‘The Strange Case of Jekyll Hyde’ ही विख्यात कादंबरी अगदी याच विषयाला हात घालते. ती वाचकांपैकी बहुतेकांनी वाचली असेलच असे वाटते.

‘अ‌ॅगाथा’ या ग्रीक शब्दाचा अर्थ ‘Virtuous, Good’ असा होतो. पी. जी. वुडहाऊसच्या बर्टी वूस्टरला मात्र त्याची अ‌ॅगाथा आत्या दुष्टात्मा वाटत असते. तो म्हणतो की ती जेवताना काचेचे तुकडे खाते, काटेरी तारांची अंतर्वस्त्रे नेसते, पोर्णिमेच्या रात्री नरबळी देते, इतकी ती वाईट आहे. हे अर्थातच बर्टीने केलेले अतिशयोक्तीपूर्ण वर्णन आहे. मुळात आळशी, चैनी, आणि सुखलोलुप बर्टीला तिची कडक शिस्त आणि काटेकोरपणा, तिखट स्वभाव, स्पष्टवक्तेपणा आवडत नाही, म्हणून तो तिची अशी बदनामी करतो. हे सांगायचे कारण एवढेच की आन्ट अ‌ॅगाथाचे त्याने रंगवलेले चित्र बघून तुम्ही अ‌ॅगाथा या शब्दाला गैर मानू नका.

१९१६मध्ये चित्रकाराला आंट अ‌ॅगाथा अशी दिसली

येत्या चार-पाच दिवसांनी म्हणजे पंचवीस डिसेंबरला येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव ख्रिसमस जगभरात साजरा केला जाईल. सत्प्रवृत्तीची, सदाचाराची, चांगुलपणाची म्हणजेच ‘agathós’ (अ‌ॅगाथॉस)ची शिकवण जगातले सर्वच धर्म देतात. ख्रिस्ताने तर त्याच्या आचरणातून या शिकवणीचा वस्तूपाठच जगासमोर ठेवला. भारतात अनेक ठिकाणी (विशेषतः महाराष्ट्र, गोवा, आणि गुजराथ येथे) ख्रिसमसला ‘नाताळ’ असे म्हणतात. याचे कारण माहीत आहे? ‘नाताळ’ हा शब्द मूळचा पोर्तुगिज भाषेतला असून त्यांनी तो लॅटिन भाषेतून उसना घेतला. लॅटिनमधला  ‘nātālis’ (nātāle) पुढे ‘natal’ बनला. नेटल म्हणजे जन्मासंबंधी. इंग्रजी, पोर्तुगिज, आणि फ्रेंचसह अनेक भाषांत तो तसाच वापरला जातो. पोर्च्युगिजांनी याच ‘natal’चा नंतर ख्रिस्तजन्माशी संबंध जोडला. भारतात गोवा, वसई, दीव अशा ठिकाणी पुढे पोर्तुगिजांनी वस्ती केली. त्यांच्या प्रभावामुळे स्थानिक लोकही ख्रिसमसला ‘natal’ म्हणू लागले. आणि लवकरच या ‘नेटल’चे आपल्याकडे ‘नाताळ’ असे नामकरण झाले.

‘अक्षरनामा’च्या सर्व वाचकांना नाताळाच्या आणि येणाऱ्या नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. २०२१ मध्येदेखील तुमचे स्वास्थ्य उत्तम राहो, यासाठी ‘sláinte mhaith’ (good health) असे आयरिश गेलिक भाषेतून अभिष्टचिंतन करतो. न्यूझीलंड देशातले माओरी आदिवासी ‘Kia ora’ या शब्दांनी अगदी हीच भावना व्यक्त करतात. आपण आपल्या देसी इस्टाईलमध्ये म्हणू- ‘नया साल मुबारक. चिअर्स!’

.................................................................................................................................................................

एकविसाव्या शतकात ‘आंबेडकरी तत्त्वज्ञाना’त लिहिली जाणारी कविता कशी असेल, याचं उत्तर म्हणजे ‘बीइंग’ हा कवितासंग्रह

बीइंग – विजय अशोक इंदुशोकाई, आऱ्हान मीडियास्मिथस, नाशिक, पाने – २२२ (हार्डबाऊंड), मूल्य - ३६० रुपये

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5250/Being

..................................................................................................................................................................

लेखक हर्षवर्धन निमखेडकर वकील आहेत. वुडहाऊसचे अभ्यासकही.

the.blitheringest.idiot@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......