११२ वर्षांची परंपरा असलेल्या मराठी दिवाळी अंकांवर यंदा प्रथमच कोविडभयामुळे साशंकतेचे सावट होते. पण अर्थकारण, वितरण यातल्या अडचणींवर मात करत बहुतेक दिवाळी अंक वाचनीय ऐवज घेऊन आले. त्यातल्या उपलब्ध झालेल्या अंकांतल्या महत्त्वाच्या लेखनाचा हा धावता परिचय.
गेल्या आठ-नऊ महिन्यात आपण अनुभवलेला कोविडकाळ हा अनेकार्थांनी अभूतपूर्व आहे. आज हयात असलेल्या पिढीने असा सक्तीचा बंदिवास याआधी अनुभवला नव्हता. त्यामुळे या वर्षातल्या सर्व क्षेत्रातल्या अभिव्यक्तीला त्याचा संदर्भ असणे अपरिहार्य होते. दिवाळी अंक त्याला कसे अपवाद असतील? कोविडकाळ वेगवेगळ्या अंकात वेगवेगळ्या संदर्भात उमटला आहे, त्यातल्या महत्त्वाच्या ऐवजाची नोंद...
‘अक्षर’मधला पार्थ एम.एन. यांचा ‘कोरोनाच्या छायेत जगताना’ या मालेतला लेख हा या काळाचा अस्वस्थ करणारा दस्तावेज आहे. रस्त्यावरून घराच्या ओढीनं निघालेले मजुरांचे तांडे हे दृश्य आपण या काळात अनेकवार पाहिले ऐकले आहे. पार्थ या तांड्यातल्या अनेकांशी संवाद करत, या संदर्भातली माहिती देत काही निष्कर्षात्मक लिहितात, तेव्हा त्यातली आकडेवारीही रूक्ष न वाटता बोलू लागते. त्यातली कमालीची मानवी हतबलता, घरात सुरक्षित राहू शकणाऱ्या आपल्यासारख्यांनी त्यांच्याशी पाळलेलं काटेकोर सोशल डिस्टसिंग, त्यातून एवढ्या वर्षांत प्रत्यक्षात असूनही न जाणवलेली परात्मता अंगावर येते तेव्हा काय होतं असेल? असे वाटत राहते.
‘अक्षर’मध्येच श्रुती गणपत्ये यांचा वेगळा लेख आहे- ‘त्यांचा अर्थिक संघर्ष’. कोविडकाळात सर्वाधिक हाल झाले ते सर्वार्थाने हातावर पोट असलेल्यांचे. या वर्गातही तळाला असलेल्या देहविक्रयात असलेल्या स्रियांचे या काळात काय झाले असेल? बंदिवास लांबत गेला तशी बाहेरून मिळणारी मुळातच काहींपर्यंतच पोचणारी तुटपुंजी मदतही थांबली, तेव्हा कसे जगवले असेल त्यांनी स्वतःला आणि आपल्यावर अवलंबून असलेल्यांना? स्वतःला टिकवण्याचे मार्ग याही काळात त्यातल्या काहींनी हिंमतीनं शोधले, त्याच्या काही नोंदी या लेखात आहेत. त्या वाचाव्यात अशा आहेत.
.................................................................................................................................................................
सृजन-संवाद (भाग १) - गोपाळ अवटी, भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर, पाने - ३८४, मूल्य - ४२५ रुपये.
सृजन-संवाद (भाग २) - गोपाळ अवटी, भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर, पाने - ३६२, मूल्य - ४२५ रुपये.
हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5255/Srujan-Sanwad-bhag-1-ani-bhag-2
..................................................................................................................................................................
या अस्वस्थ काळाचे समाजमाध्यमांवर उमटलेले पडसाद हाही नंतर महत्त्वाचा दस्तावेज ठरावा यासंदर्भात अभ्यासासाठी. पायी चालणारे मजुरांचे तांडे प्रामुख्यानं ज्या दिशेनं गेले त्या उत्तर प्रदेश-बिहारात हे पडसाद कसे उमटलेत, यांचा शोध घेत या प्रदेशातून फेसबुकवर आलेल्या काही पोस्ट्सचे अनुवाद ‘अक्षरधारा’मध्ये आहेत- ‘भयपर्वाच्या नोंदी’ या शीर्षकाने. हे विविधरंगी पडसादांचं कोलाजही वाचनीय आहे.
संसर्गांवरचे काही लेख ‘ऐसी अक्षरे’ या ऑनलाइन अंकात आहेत. उज्ज्वला यांच्या लेखात थेट सहा-सात दशकांपूर्वीची १३४७ फ्रान्समधली प्लेगची भयंकर साथ येते. युरोपात तिचा फैलाव होऊन तिथली एक तृतीयांश लोकसंख्या त्याला बळी पडली. त्याचे भयानक तपशील वाचताना आजही अस्वस्थ व्हायला होते. तर अवंती कुलकर्णी यांच्या लेखात कोल्हापूरमधल्या १८९७ मधल्या प्लेगच्या आठवणी आहेत. त्या वेळी नुकत्याच राज्यावर आलेल्या शाहू छत्रपतींनी केलेल्या कामाची कृतज्ञ आठवण या लेखात आहे. शैलेश यांच्या ‘संसर्गाख्यान’ या वेगळ्याच लेखात हा विषय रोगराई, धर्म आणि दैवतशास्त्र अशा ऐतिहासिक अंगाने येतो.
एका अत्यंत वेगळ्या संदर्भात हा विषय ‘लोकमत दीपोत्सव’मध्ये आलाय. या काळातल्या घेरून आलेल्या आतल्या अस्वस्थतेची व्यवस्था कशी लावली चित्रकारांनी? याआधीच्या काळातही विध्वंस, भयंकर अस्थिरता, मृत्यूचं थैमान कसं पेललं जगातल्या विविध भागातल्या चित्रकारांनी? कलेतून कशी वाट मिळाली त्याला? असा मोठा कॅनव्हास असलेल्या या वेगळ्याच विषयावर समकालीन कलाभ्यासक, समीक्षक शर्मिला फडकेनी दृश्य उदाहरणांसह लिहिलेला दीर्घलेख ‘शोक’ वाचणं मस्ट आहे .
याच अंकात मृदुला बेळे यांचा लेख आहे, ‘व्हायरस’. कोरोना व्हायरसनं सगळं जग हादरलेलं असताना कुठलाही व्हायरस हा काय प्रकार आहे? व्हायरसचं हे विविधरंगी अचाट जग, त्यासंदर्भात सामान्यांना पडणारे प्रश्न, त्यासंदर्भात चालू असलेली संशोधनं असा रंजक, माहितीपर आलेख या लेखात आहे तोही वाचावा असा.
या सगळ्यांमध्ये वेगळा उठून दिसावा असा लेख आहे कादंबरीकार, भविष्यवेधी लेखक नंदा खरेंचा, ‘मैत्र’ दिवाळी अंकात. ‘अस्वस्थ वर्तमान’ या परिसंवादातल्या ‘शब्दांत न पकडता येणारे प्रश्न’ या लेखात खरे यावर तात्कालिक वा माहितीपरकाही न लिहिता प्रश्नाची, त्यातल्या अस्वस्थतेची वैश्विक पाळंमुळं शोधू पाहतात. रिचर्ड प्रेस्टन या लेखकाला उद्धृत करतात, म्हणतात, ‘कदाचित जीवसृष्टीला नुसती अब्जावधी माणसं ही कल्पना आवडत नसेल. पृथ्वीच्या प्रतिरक्षाव्यवस्थेला माणूस हा परजीवी जाणवून ती त्याला नष्ट करायला धडपडत असेल... एड्स हा या सफाईचा पहिला टप्पा, पण कोरोना हा शेवटचा नसेल! कोरोना १९ नंतर २० येईल...’ खरे याचे मूळ अफाट गतीनं वाढत जाणारी लोकसंख्या, माणसाची उर्जावापराची बकासुरी भूक, त्यामुळे अडखळणारे ऋतुचक्र यात शोधतात. आपण सगळे या प्रकारात भीतीनं मूढ झालेले, स्वतःचं हित नेमकं कशात याबाबत गोंधळलेले आहोत असे त्यांना वाटते. हा सगळाच लेख लाईटमोडवरचा तरी वाचून स्वतःलाच प्रश्न विचारावेत इतका महत्त्वाचा आहे.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
समकालीन विचारविश्वात चर्चा होत असलेले वा व्हावी अशी अपेक्षा असलेले विषय हे ‘ऐसी अक्षरे’ या ऑनलाइन अंकाचे वैशिष्ट्य आहे. ‘भाषासंसर्ग’ या अशाच विषयावरचा तिथला चार्वी यांचा लेख भाषेच्या बदलत चाललेल्या स्वरूपाविषयी काही मौलिक सांगतो. सध्याच्या भाषिक सरमिसळीच्या संदर्भात, भाषा शुद्ध असणं म्हणजे काय, परभाषेचा तिला संसर्ग होणं म्हणजे काय? का खटकतं ते काहींना? आपल्याच भाषेतल्या बोलींचाही संसर्ग होतो असेही वाटते काहींना, त्यांचे काय करायचे मग? अशा प्रश्नांची चर्चा करताना विष्णूशास्री चिपळूणकरांपासून सावरकरांपर्यंत भाषाशुद्धीच्या प्रयत्नांचा आढावा घेत तसेच भाषा आणि लिपी यातले संबंध, शेजारी भाषांमधले संघर्ष, लिहायची भाषा, घरात आणि बाहेर बोलायची बोली अशा अनेकांगांनी भारतातल्या विविधभाषी उदाहरणांसह या विषयाची चर्चा येते. भाषेचा इतिहास आणि विकास हा त्यामागं उभ्या लोकव्यवहाराचा, संस्कृतीचा इतिहास असतो, या गृहितकाचं स्पष्टीकरण विविध उदाहरणांसह देत आपलं भाषाभान व्यापक करण्याचा प्रयत्न लेखात दिसतो तो मोलाचा आहे. सगळे संसर्ग, संघर्ष पचवून भाषा पुढे चालत राहते, निरंतर वाहात राहते कारण माणसं निरंतर बोलत-लिहित-गात-विचार करीत राहतात हे लेखाचं भरतवाक्य आहे.
‘सिनेमाची भाषा’ हा प्रा. समर नखाते यांचा ‘ऐसी अक्षरे’मधला दोन भागातला दीर्घलेख यंदाच्या दिवाळी अंकामधला मस्ट रीड ऐवज आहे. निव्वळ मनोरंजनापलिकडचा एखादा सिनेमा येतो तेव्हा त्यामागे चित्र-शिल्पकला, वास्तुकला, साहित्य, संगीत, नृत्य, नाट्य आदि कला आणि त्याशी निगडित अनेक संस्कृती, रिती, परंपरा हे सगळं असतं. चित्रपट समजून घ्यायचा तर हे सगळं समजून घेण्याची सवय लावून घ्यावी लागते. अन्यथा ‘दिसतंय म्हणजे समजतंय’ अशा भ्रमात राहतो आपण. या सर्व कलानुभवांनी माझी जाणीव, संवेदना समृद्ध झालेली असेल तर त्याआधारे चित्रपटाच्या भाषेतून उलगडत जाणारी संवेदना मला जाणून घेता येते, हे व्हिडिओ क्लिप्समधून विविध उदाहरणं देत नखाते सर समजावून सांगतात. चित्रपट पाहण्याचं शिक्षण हे केवळ आस्वादाचं प्रशिक्षण नाही तर ते आपल्यातलं माणूसपण समृद्ध करणारं शिक्षण आहे, हे लेखाचं भरतवाक्य मुद्दाम सांगावं लागत नाही मग.
‘चूल ते मूल : माझं गरजेपुरते जगणं’ हा युवालेखक हृषिकेश पाळंदे याचा ‘मिळून साऱ्याजणी’मधला वेगळा आत्मपर लेख आहे. आपला कंफर्टझोन त्यागून जगणं कमीत कमी गरजांसह निसर्गसंवादी होण्याकडं झालेल्या आपल्या वाटचालीतले अनुभव हृषिकेश यात सांगतो. चंगळवादाच्या अतिरेकाच्या, आधुनिकतेच्या नावाखाली हव्यासी जीवनशैलीच्या उदात्तीकरणाच्या उत्सवी काळातला हा वेगळा आवाज. आधुनिक बाबींशी फटकून न राहता त्यांना आयुष्यावर कुरघोडी न करता परिघावर ठेवणं... यातले सगळेच तपशील वा त्यामागचे युक्तिवाद पटतील, असे नाही पण विचार करायला लावतील एवढं नक्की.
‘शब्दमल्हार’ या नाशिक मधल्या दिवाळी अंकातली डोगरी भाषेतल्या प्रख्यात कवयित्री पद्मा सचदेव यांची संपादक स्वानंद बेदरकर यांनी घेतलेली मुलाखत वाचनीय आहेच, पण दस्तऐवज म्हणूनही ती महत्त्वाची ठरावी. डोगरी ही काश्मीरमधली पुरातन लोकभाषा. मुख्यतः मौखिक लोकगीतं, महाकाव्य, खंडकाव्य याच प्रकारातून तीत अभिव्यक्ती झाली. ही भाषा, तिचा इतिहास, काश्मीरच्या निसर्गसौंदर्याचा त्यावरचा प्रभाव, महत्त्वाचे डोगरी कवी इथपासून कवितेशी नातं, साहित्यातलं सौंदर्य, स्त्रीवाद, इस्मत चुगताईंशी असलेलं निकट मैत्र, लताबाईंशी असलेलं बहिणीच्या जिव्हाळ्याचं नातं अशा अनेकांगांनी पद्माताई संवाद करतात. बेदरकर त्यांना समांतर जनाबाईंपासून तुकोबांपर्यंत मराठी संदर्भ पुरवतात. त्यामुळे हा जिव्हाळ संवाद औपचारिक मुलाखतीपुढे जातो...
.................................................................................................................................................................
बीइंग – विजय अशोक इंदुशोकाई, आऱ्हान मीडियास्मिथस, नाशिक, पाने – २२२ (हार्डबाऊंड), मूल्य - ३६० रुपये
हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5250/Being
.................................................................................................................................................................
सोशल मीडियाचा प्रभाव निर्माण झाल्यापासून दृष्यकलांविषयी सजगता सामान्य रसिकांमध्ये वाढत चालली आहे. चित्रकलेतल्या वास्तववादी आकारांच्या पलीकडे असलेलं सृजनाचं भान समजून घ्यावं असं त्याला वाटू लागलेलं आहे. ‘अक्षरधारा’मध्ये चित्रा राजेंद्र जोशी यांचा लेख आहे- ‘सजग रेषांचा सर्जक प्रवास’. यात त्यांनी आभा भागवत, सुचिता तरडे, स्मिता राजे-देशपांडे, शुभा गोखले, नीलिमा कढे आणि सुवर्णा ढेरिंगे या सहा समकालीन चित्रकर्तींना बोलते करत त्यांच्याशी विविध संदर्भात बातचीत करत त्यांचा चित्रप्रवास जाणून घेतला आहे, तो पाहावा, वाचवा असाच आहे.
चित्रकलेसंदर्भातलाच एक महत्त्वाचा लेख ‘शब्दमल्हार’मध्ये आहे. युवा चित्रकार चारुदत्त पांडे जितिश कल्लाट या महत्त्वाच्या चित्रकाराचा, त्याच्या चित्रांचा, इन्स्टॉलेशन्सचा त्यामागच्या वेगळ्याच दृष्टीचा परिचय करून देताना त्यांच्या चित्रांना ‘१९९०-२००० या वेगवान घटितांनी गजबजलेल्या दशकानंतर बदलेल्या भारतीय मनोवृत्तीचे चित्र’ म्हणतात तेव्हा उत्सुकता वाटते...
मराठीतले महत्वाचे लेखक रंगनाथ पठारे यांच्या ‘सातपाटील कुलवृत्तान्त’ या महाकादंबरीचे मागील वर्षी झालेले प्रकाशन हे मराठी साहित्यातले महत्त्वाचे घटित आहे. ७९६ पानांमधून सातशे वर्षांतला सात पिढ्यांचा प्रवास रेखाटणारी ही कादंबरी वाचल्यावर एखादा प्रचंड पर्वत चढून श्रान्त क्लान्त होत पठारावर आल्यासारखे वाटते. या कादंबरीशी संबंधित गेल्या वर्षभरातले सर्व संदर्भ ‘शब्दालय’ या अंकात एकत्र केले आहेत, हेही तसे अपूर्व. कादंबरीच्या अनेकांनी केलेल्या विविधांगी समीक्षेपासून, तिच्या प्रकाशन समारंभातली मान्यवरांची भाषणं ते समाजमाध्यमांवर उमटलेल्या उस्फुर्त प्रतिक्रिया असा हा विशाल पट म्हणजे मराठी वाचकांनी सामूहिकपणे केलेली अश्वासक कृती आहे असे संपादकांनी म्हटलेय. ‘शब्दालय’ने या कादंबरीच्या आकलनासाठी एक समृद्ध पृष्ठभूमी उपलब्ध केली आहे, ती आवर्जून अनुभवावी.
..................................................................................................................................................................
हेही पाहा : दिवाळी अंक २०२० : मराठी विज्ञानकथा अजून ठराविक साच्यातून बाहेर का पडत नाही?
..................................................................................................................................................................
‘साहित्य’ हा मुंबई मराठी साहित्य संघाचा दिवाळी अंक. या वर्षारंभी संघाचे चार-पाच दशकांचे अध्वर्यू डॉ.बाळ भालेराव यांचे निधन झाले. त्यामुळे यंदाचा ‘साहित्य’चा दिवाळी अंक हा डॉ.बाळ भालेराव विशेषांक आहे. साहित्य संघासाठी डॉ.भालेराव यांनी केलेल्या कामांची कृतज्ञ नोंद करण्याबरोबरच या दीर्घ वाटचालीतल्या त्यांच्या आठवणीही अनेकांनी सांगितल्या आहेत. संघाच्या साहित्यविषयक उपक्रमांबरोबरच संघाचे प्रायोगिक हौशी रंगभूमीविषयक उपक्रम, ‘मुंबई ड्रामा स्कूल’च्या उभारणीतला सहभाग असा मुंबई बाहेर फार ज्ञात नसलेल्या कर्तृत्त्वाचा पटही अनेकांनी उलगडला आहे, तो वाचनीय आहे.
‘अक्षरधारा’मध्ये सानियांनी सांगितलेले समुपदेशनातले अनुभव, जॉर्ज ऑरवेल आणि त्याचा प्रकाशक गोलान्झ यांच्या संबंधातला जयप्रकाश सावंत यांचा ‘ललित’मधला लेख, ‘ललित’मध्येच जुन्या जमान्यातील नाटककार मो.ग. रांगणेकर यांचे अंबरिश मिश्र यांनी रेखाटलेले शब्दचित्र, ‘जेव्हा माणूस जागा होतो’ या गोदावरी परुळेकर यांच्या आत्मकथनाच्या पन्नाशीनिमित्ताने हेरंब कुलकर्णी यांनी 'मौजे'त आयोजलेला परिसंवाद, ‘ललित’मधला जॉर्ज ऑरवेलच्या ‘नाईंटीन एटीफोर’ या सार्वकालिक कादंबरीसंदर्भातला वसंत आबाजी डहाकेंचा लेख, ‘मौजे’तली हरी नरके (भाऊ) , बालमोहन लिमये (आई-वडील), वीणा देव (पती), अनिल अवचट (सुमित्रा भावे) यांनी रेखाटलेली व्यक्तिचित्रं, तर जयंत पवार यांचा ‘पुढारी दीपस्तंभ’मधला ‘तुझ्या नावानं पाहिली तुझीच रे पंढरी’ हा वडिलांवरचा लेख, ‘अक्षर'मध्ये सुप्रिया विनोद यांनी लिहिलेला कोविडकाळात गेलेल्या आपल्या वडिलांवरचा (सुप्रसिद्ध साहित्यिक, रंगकर्मी रत्नाकर मतकरी) त्यांच्या रंगसंस्कारांची उजळणी करणारा दीर्घलेख- ‘माझा दिग्दर्शक मित्र’ हाही यंदाचा वाचनीय ऐवज आहे.
.................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
कथा हा दिवाळी अंकांचा युएसपी राहिला आहे नेहमीच. यंदा ‘मौजे’तली सानियांची ‘मी टू’चळवळीचा संदर्भ असलेली दीर्घकथा ‘आपणही यात’, ‘मौजे’तलीच निखिलेश चित्रेंची ‘सममितीचा अन्वयार्थ’ ही वेगळीच कथा, ‘वसा’मधली विजय मुकुंद तांबे यांची कोविडकाळाचा संदर्भ असलेली ‘वुहानचा फवारा’, सूरज कोल्हापुरे या नव्या लेखकाच्या ‘वसा’मधली ‘एका हस्तलिखिताचं नष्टचर्य आणि अमरत्व’ तर ‘अक्षर’मधली ‘बांगडा’ अशा दोन कथा, ‘अक्षरधारा’मधल्या गणेश मतकरींची ‘सिक्रेट’ आणि प्रणव सखदेव यांची ‘खचणारे बहर माथी घेऊन’, ‘ऐसी अक्षरे’वरची मृण्मयी रानडे यांची ‘परीक्षा’ या वाचायला हव्यात अशा कथा आहेत.
एकुण पुढेही कोविडसारखी संकटं येतील, परीक्षा पाहतील पण त्यावर मात करत दिवाळी अंक येतील, जगणं अर्थपूर्ण करण्यात आपल्याला मौलिक साथ देतील, एवढे आश्वासन देणारा हा ऐवज नक्की आहे.
हाच लेख ऐकायचा असेल तर क्लिक करा -
............................................................................................................................................
लेखक नीतीन वैद्य पुस्तकप्रेमी आहेत.
vaidyaneeteen@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment