छापील पुस्तके विरुद्ध किंडल : जुना रोमान्स विरुद्ध नवा रोमान्स!
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
श्रीनिवास जोशी
  • प्रातिनिधिक चित्र
  • Sat , 19 December 2020
  • ग्रंथनामा वाचणारा लिहितो पुस्तक Book ई-बुक E-book किंडल Kindle छापील पुस्तक Printed Book वाचन Reading पुनर्वाचन Re-reading

“If you would tell me the heart of a man, tell me not what he reads, but what he rereads.” – Francois Mauriac

प्रसिद्ध कवी, नट आणि अजून बरेच काही असलेले किशोर कदम यांची पुस्तकांच्या दुकानांवरची एक पोस्ट सध्या व्हायरल झालेली आहे. त्यात त्यांनी मुंबईमधील ‘लोटस’ आणि ‘स्ट्रॅन्ड’ या सारखी दुकाने बंद झाली, याबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

आपण शाळेच्या पुस्तकांच्या सहवासात येतो, त्या काळापासूनच आपले आणि छापील पुस्तकांचे नाते तयार झालेले असते. पुस्तके, त्यांच्या नव्या पानांचा वास आणि त्यांच्यातील शाईचा वास यांच्या प्रेमात आपण पडलेलो असतो. पुढे मोठेपणी, एखाद्या शांत रात्री पाने पालटत एखाद्या सुंदर पुस्तकात गुंग होऊन जाण्याच्या अनुभवातली मोहिनी सगळ्यांनीच अनुभवलेली असते.

या शिवाय पुस्तकांचे दुकान आणि त्यातला माहोल हीसुद्धा एक वेगळीच मजा असते. पण दुर्दैवाने म्हणावे लागते आहे की, छापील पुस्तके आणि त्यांची दुकाने हे सारे जग आता संपत चालले आहे. पण याचा अर्थ पुस्तकांचे जग संपत चालले आहे असा होत नाही. पुस्तकांची दुकाने संपली म्हणजे पुस्तकांचे जग संपले असे होत नाही.

किंडल आणि ई-बुकसारख्या गोष्टी आता पुढे आल्या आहेत. त्यांनी पुस्तकांचे जग बदलून आणि फार मोठे करून टाकले आहे. या नव्या विश्वाचीही स्वतःची अशी एक जादू आहे, मोहिनी आहे. या नव्या जगातली सगळ्यात मोठी मजा म्हणजे, जगातली बहुतेक पुस्तके तुमच्या मनात येताक्षणी तुमच्या फोनमध्ये अलिबाबाच्या राक्षसासारखी तुमच्यासाठी हजर होतात.

इथे माझा एक अनुभव मला सांगावासा वाटतो आहे. मला विन्स्टन चर्चिलचे दुसऱ्या महायुद्धावरचे सहा खंड अनेक वर्षे हवे होते. पुण्या-मुंबईमधील अनेक पुस्तक विक्रेत्यांचे उंबरे मी अनेक वेळा झिजवले. तेरा हजारांच्या आसपास त्यांची किंमत होती, ती आगाऊ देण्याची तयारी दाखवली, परंतु मला ते खंड नाही म्हणजे नाही मिळाले. पुढे किंडल आल्यावर सहा वर्षांपूर्वी हे खंड मला प्रत्येकी चारशे ते साडेचारशे रुपयात मिळाले. तेरा हजारांचे काम तीन हजारांच्या आत झाले. तेसुद्धा काही सेकंदात! म्हणजे सांगायचा विषय काय तर, किंडलमुळे जगभरची पुस्तके वाचकाच्या खूप खूप जवळ आली आहेत. शिवाय कागद, प्रिंटिंग, बाइंडिंग आणि विक्रेत्याचे कमिशन असा खर्च नसल्याने पुस्तकांच्या किमतीसुद्धा खूप कमी झाल्या आहेत.

.................................................................................................................................................................

सृजन-संवाद (भाग १) - गोपाळ अवटी, भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर, पाने - ३८४, मूल्य - ४२५ रुपये.  

सृजन-संवाद (भाग २) - गोपाळ अवटी, भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर, पाने - ३६२, मूल्य - ४२५ रुपये.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5255/Srujan-Sanwad-bhag-1-ani-bhag-2

..................................................................................................................................................................

ई-बुक्सची अजून एक मोठ्ठी धमाल आहे. ती म्हणजे - तुमची सगळी पुस्तके तुमच्याबरोबर सतत असतात. सगळी पुस्तके क्लाउडवर असतात. त्यामुळे किंडल किंवा ई-बुक अॅप उघडले की, तुमचे सगळे ग्रंथालय तुमच्या साठी उघडले जाते. 

तुम्ही कोचावर किंवा बेडवर पडलेले असता. डोक्यात एखाद्या पुस्तकाचा विचार येतो. एरवी तो तसाच मावळून जातो. कोण उठणार बेडवरून कोण जाणार कपाटापर्यंत? किंडल असेल तर फोन हाताशीच असतो. मनातले पुस्तक एका क्षणात उघडले जाते.

किंडलने पुस्तके हाताशीच नाही तर आर्थिकदृष्ट्यासुद्धा आपल्या फार जवळ आणली आहेत. ‘एकनाथी भागवत’ मला किंडलवर ४० रुपयांत मिळाले. असाच प्रकार ‘तुकारामाच्या गाथा’चा. ‘समग्र टॉलस्टॉय’ ४९ रुपयांत मिळाला आणि ‘समग्र डोस्टोव्हस्की’ १५० रूपयांत. अगदी प्रथितयश एडिशन्ससुद्धा दोन-तीनशे रूपयांत मिळतात. आज सगळ्या मोठ्या साहित्यिकांच्या साहित्यकृती किंडलवर अत्यंत स्वस्तात उपलब्ध आहेत.

डच तत्त्वज्ञ इरॅस्मस म्हणाला होता की, ‘मी माझे सगळे पैसे पुस्तकांवर घालवतो आणि पुस्तक खरेदी करून जे पैसे उरतील ते अन्नासाठी आणि वस्त्रांसाठी वापरतो.’ आज या किमती बघून इरॅस्मसला किती आनंद झाला असता!

किंडलमुळे माझा एक अगदी अनपेक्षित असा फायदा झाला. माझी मित्रांशी होणारी भांडणे कमी झाली. मित्राने सांगितलेले असते की, ‘अमुक अमुक हॉटेलमध्ये अमुक अमुक वाजता ये.’ आपण वेळे वर जातो पण तासभर झाला तरी त्याचा पत्ता नसतो. किंडल असेल तर आपण शांतपणे आपल्याला आवडेल ते पुस्तक वाचत बसतो. थोड्या वेळाने पुस्तकात इतके रमायला होते की, आता हा नाही आला तर बरे होईल, असे वाटू लागते. नाही तर एरवी एवढी वाट पाहायला लागणे हा भांडणाचा विषय आहे, हे कोणीही मान्य करेल.

पूर्वी मी माझ्या हॅवर सॅकमध्ये पुस्तके ठेवत असे, पण तो चॉइस दोन-तीन पुस्तकांपर्यंतच मर्यादित होता. आता किंडलमुळे सगळी पुस्तके प्रत्येक क्षणी आपल्याबरोबर असतात!

जगातली सगळी महत्त्वाची पुस्तके परत परत वाचावी लागतात. त्यातला आशय इतका महत्त्वपूर्ण आणि त्यातली शैली इतकी मनोहारी असते की, अशी पुस्तके परत परत उघडावीशी वाटतात. परत परत वाचावेसे वाटले नाही तर ते पुस्तकच नाही! फ्रान्स्वा मॉरिअॅकचेवर उदधृत केलेले वाक्य हेच सत्य प्रतीत करत राहते.

पुनर्वाचनात आशयाचे नवे स्तर लक्षात येतात, शैलीची नवी सौंदर्यस्थळे लक्षात येतात. नव्या इनसाईटस् प्राप्त होतात. डोस्टोव्हस्कीच्या ‘ब्रदर्स कारामाझोव्ह’ या कादंबरीची प्रत आईन्सटाईनच्या उशाशी कायम असायची. ‘ब्रदर्स कारामाझोव्ह’ म्हणजे डोस्टोव्हस्कीची सर्वोच्च निर्मिती! छोट्या प्रिंटमधील १२०० पानांमध्ये रेखाटले गेलेले मानवी जीवनाचे विराट चित्र. १२०० पानांमधली प्युअर पॅशन आणि त्यामधून जन्मलेले प्युअर तत्त्वज्ञान म्हणजे ब्रदर्स कारामाझोव्ह! डोस्टोव्हस्कीच्या निर्मितीचा हा विराट आविष्कार आईन्सटाईनलासुद्धा परत परत वाचावासा वाटला नसता तरच आश्चर्य होते. 

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

पुस्तकांच्या पुनर्वाचनाची ही गरज लक्षात घेतली तर किंडल किंवा ई-बुक फार महत्त्वाची भूमिका बजावतात. ई-बुक्समध्ये पुस्तकातील मजकूर लगेच हायलाइट करता येतो. चार-चार रंगांचे हायलायटर्स दिलेले असतात. शिवाय नोट्स काढायची सोय असते. जिथल्या तिथे नोट्स काढता येतात. त्या नोट्सची जंत्री आपोआप तयार होते.

या सगळ्या सोयींमुळे दुसरे वाचन फक्त हायलायटेड मजकुरापर्यंत मर्यादित करता येते. हायलेटेड मजकूर वाचला की, संपूर्ण पुस्तकातील मजकूर आपल्या मनामध्ये पुन्हा एकदा जागृत होतो. पुनर्वाचन सहज आणि सोपे होऊन जाते.

ई-बुक्समध्ये जिथल्या तिथे डिक्शनरी उपलब्ध असते. अडलेल्या शब्दावर बोट ठेवले की, त्या शब्दाचा अर्थ पुढे येतो. पूर्वी अनेक शब्दांचे अर्थ गृहीत धरून पुढे जायला लागायचे. दर वेळी जाडे जाडे शब्दकोश कसे उपलब्ध असणार? आता ही गोष्ट उरलेली नाही. अडलेला शब्द माहीत करून घेतल्याशिवाय पुढे जाणार नाही, अशी शपथ घेता येते.

विकीपिडियावरचे रेफरन्सेससुद्धा जिथल्या तिथे उपलब्ध असतात. म्हणजे पुस्तक वाचताना शब्द कोश तर जवळ असतोच, पण ज्ञानकोशसुद्धा जवळ असतो! पुस्तकाचे सर्वंकष आणि सखोल वाचन अशा सोई जिथल्या तिथे उपलब्ध असल्याने शक्य होते.

टॉलस्टॉयच्या ‘वॉर अँड पीस’ आणि ‘अॅना कॅरेनिना’ या कादंबऱ्या, मार्गरेट मिचेलची ‘गॉन विथ द विंड’, जेन ऑस्टिनची ‘एमा’ यांसारख्या अनेक विराट कादंबऱ्या मी पूर्वी वाचल्या. पंधरा-पंधरा दिवस सुट्टी काढून वाचल्या. पण आज माझ्या हातात काय आहे, असे मी मला विचारले तर फारसे काही नाही, असेच उत्तर हाताशी येते.

पुनर्वाचनाशिवाय फारसे काही कायमस्वरूपी हाती लागत नाही. एखादे पात्र, कादंबरीतील एकूण वातावरण, एखादा मन हेलावून टाकणारा प्रसंग इतकेच हाती उरते. मी या कादंबऱ्या वाचल्या तेव्हा किंडल हाताशी असते तर माझ्या हातून कालाच्या ओघात जे निसटून गेले ते निसटून जाऊ शकले  नसते. असो.

किंडलमुळे खराखुरा व्यासंग करणे पूर्वी कधीही नव्हते एवढे सुखाचे आणि सोपे झालेले आहे. पुस्तकाची बिब्लिऑग्राफी आणि त्याच्या नोट्स आपल्याला पान न पलटता उपलब्ध होतात. निळ्या फॉन्टमध्ये बिब्लिऑग्राफीचे संदर्भ दिलेले असतात. त्यांच्यावर बोट ठेवले की तो संदर्भ पुढे येतो.

ई-बुक्समध्ये उपलब्ध होणारी अजून ग्रेट सोय म्हणजे, फॉन्ट अॅडजस्ट करता येतो. त्यामुळे चष्मा विसरला किंवा जवळ नसला तरी वाचन बंद पडत नाही.

किंडल आणि ई-बुकने पुस्तके खूप रीडर फ्रेंडली केलेली आहेत. काही लोकांनी, काही पुस्तकांच्या पीडीएफ मोबाईलवर वाचायचा प्रयत्न केलेला असतो आणि - किंडलसुद्धा असेच असेल असा विचार करून त्यांनी एकूणच मोबाईलवरच्या वाचनाची भीती घेतलेली असते. मोबाईलवर पीडीएफ वाचणे हा प्रकार खरंच वेदनादायक असतो. पण एक लक्षात घ्यायला हवे - पुस्तकाची पीडीएफ वाचणे हा छकड्यातला पाठ सोलवटून टाकणारा प्रवास असेल तर किंडलवरचे पुस्तक वाचणे हा विमानाच्या बिझनेस क्लासमधील प्रवास आहे.

.................................................................................................................................................................

बीइंग – विजय अशोक इंदुशोकाई, आऱ्हान मीडियास्मिथस, नाशिक, पाने – २२२ (हार्डबाऊंड), मूल्य - ३६० रुपये

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5250/Being

.................................................................................................................................................................

पुस्तके आणताना आपल्याला फार बरे वाटते. पुस्तके वाचतानाही मजा येते, पण पुस्तके सांभाळणे हे महाकर्मकठीण काम. पुस्तके जागा अडवतात. त्यांच्यावर धूळ बसते. त्यांना वाळवी लागते.  ज्यांनी खूप पुस्तके साठवली आहेत त्यांना धुळीची अॅलर्जी म्हणजे काय ते नक्की माहीत असेल. म्हणूनच, य. दि. फडके म्हणत की, ‘जो माणूस धुळीच्या अॅलर्जीवर विजय मिळवू शकतो, तोच या जगात विद्वान आणि व्यासंगी बनू शकतो!’

चांगली पुस्तके जीर्ण होऊन फाटणे हा अजून एक मनस्तापाचा विषय! ई-बुक्सनी या सगळ्या त्रासाचा प्रश्न सोडवला आहे.

आतापर्यंत आपण वाचकाच्या बाजूने या प्रश्नाचा विचार केला, आता लेखकाची बाजूसुद्धा बघितली पाहिजे. लेखकांच्या दृष्टीने किंडलवरची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे किंडलवर पुस्तके अत्यंत कमी किमतीत प्रसिद्ध करता येतात.

विक्षिप्त प्रकाशक आणि विक्षिप्त संपादक यांचा संपर्क किंडलमुळे कमी होतो. लेखकांना होणारा मनस्ताप कमी होतो. लेखकांच्या जिवावर आणि टॅलेंटवर मस्तवाल झालेले प्रकाशक आणि संपादक पुढे पुढे लेखकांचाच उपमर्द करू लागलेले महाराष्ट्राने अनेक वेळा पाहिलेले आहेत. ‘पॉप्युलर प्रकाशन’चे रामदास भटकळ आणि ‘मौज प्रकाशन गृहा’चे श्री. पु. भागवत असे काही उमदे आणि गुणग्राही प्रकाशक सोडले तर बाकी सगळा मराठी प्रकाशनाचा इतिहास अत्यंत दारुण अशा स्वरूपाचा आहे.

इतर प्रकाशक डामरट आहेत म्हणून भटकळ किंवा इतर चांगल्या प्रकाशकांकडे जावे, तर त्यांच्याकडे पुस्तक प्रकाशित व्हायला तीन वर्षेपर्यंत काळ लागतो! म्हणजे ‘चांगल्या’ प्रकाशकाकडे जाण्याचा हा प्रकार लेखकाला केवढ्याला पडला? मौजेतर्फे पुस्तक प्रकाशित व्हावे म्हणून काही लेखक आठ-आठ वर्षे थांबल्याची उदाहरणे आहेत! काय बोलावे या लेखक-प्रकाशक यांच्यामधल्या रोमान्सबद्दल!

किंडलने हासुद्धा मुद्दा सोडवला आहे. मायक्रोसॉफ्ट ऑफिसवर A4 साईझवर पुस्तक टाइप करा, त्यांच्या साइटवर जाऊन त्यांच्या फॉन्टमध्ये अपलोड करा, त्यांनी पाठवलेले करारपत्र साईन करा, तुमचे पुस्तक लिहून झाल्यावर आठवड्याभरात प्रसिद्ध होते.

पुस्तक A4मध्ये टाईप करण्याचाच खर्च! टायपिंग तुम्हाला येत असेल त्या खर्चाचाही प्रश्न नाही.  पुस्तक प्रकाशित झाल्यावर जसे जसे विकले गेले तसा तसा चोख हिशोब मेलवर येत राहतो. तुमच्या हक्काचे जे काही पैसे असतील ते तुमच्या खात्यात जमा होत राहतात! शिवाय जगभरची बाजारपेठ उपलब्ध! अमेरिका म्हणू नका, ऑस्ट्रेलिया म्हणू नका, जिथे जिथे तुमची भाषा जाणणारा रसिक आहे तिथे तिथे तुमचे पुस्तक उपलब्ध होते! हे सर्व बघता, इथून पुढे कोण पडेल छापील पुस्तकांच्या भानगडीत?

पुस्तक-शॉपिंगचा विलक्षण अनुभव किंडल तुम्हाला देते. पाहिजे त्या विषयांची किंवा पाहिजे त्या लेखकांची पुस्तके शोधता येतातच, पण तुम्हाला अनेक समांतर लेखकांची नावेसुद्धा सुचवली जातात. पुस्तकांची सॅम्पल्स डाऊनलोड करता येतात.

नव्या कोऱ्या पुस्तकांची लायब्ररीसुद्धा किंडलद्वारे उपलब्ध केली जाते. उदा. ‘किंडल अनलिमिटेड’ अशी एक सोय आहे. प्रत्येक महिन्याचे १६९ रुपये भरले की, एका वेळी १० पुस्तके डाऊनलोड करता येतात. एक पुस्तक वाचून झाले की, ते पुस्तक परत करायचे आणि नवे डाऊनलोड करायचे. म्हणजे तुमच्या फोनमध्ये जागतिक दर्जाची लायब्ररीसुद्धा उपलब्ध! तीसुद्धा एका वेळी १० पुस्तके उपलब्ध करून देणारी! दर वर्षी दोन हजार रुपयात जितकी पुस्तके वाचू शकत आहात तेवढी वाचा!  करा मजा! करा रिसर्च! वाढवा तुमचा व्यासंग वाढवू शकाल तेवढा!

हे सर्व पाहिले तर, किंडलने आणि ई-बुकने साहित्यनिष्ठांची विराट अशी मांदियाळी जमवण्याचा घाट घातला आहे, असेच म्हणावे लागेल. या वारीमध्ये आपण जितक्या लवकर पावले टाकायला सुरुवात करू तेवढे चांगले. पुस्तकांची दुकाने आता हळूहळू बंद होतच राहणार आहेत. मराठी पुस्तकेदेखील हळूहळू किंडलवर येत आहेत. थोडा वेळ लागेल पण लवकरच महत्त्वाची अशी सर्व मराठी पुस्तके किंडलवर येतीलच.

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

ज्यांना पाने उलटायला आवडतात त्यांना ई-बुकने पाने उलटण्याची सोय करून दिली आहे. स्क्रीनवरून बोट फिरवले की पान उलटले जाते आणि पान उलटल्याचा आवाजदेखील येतो. राहता राहिला पानांच्या आणि शाईच्या वासाचा प्रश्न! त्यासाठी दर महिन्याला एक छोटेसे नवे पुस्तक आणून त्याचा वास एन्जॉय करणे चांगले. छापील पुस्तक वाचनात रोमान्स नक्कीच आहे, पण त्यासाठी आपल्या व्यासंगाचे नुकसान का करून घ्यायचे? पुस्तकातील आशय राहिला बाजूला, पुस्तकांच्या वासाचेच कौतुक असलेले खूप आहेत. हा एक सुंदर असा जुना रोमान्स आहे.

या जुन्या रोमान्समधे अडकलेल्या प्रजेमध्ये पन्नासच्या वरची प्रजा खूप आहे. ज्यांना जुनापाना रोमान्स ताणायचा आहे, त्यांनी जरूर ताणावा, त्यांचा तो हक्क आहे. बाकीच्या लोकांनी या नव्या रोमान्समध्ये स्वतःला झोकून देणे चांगले!

केशवसुतांनी फार पूर्वी सांगितलेले आहे -

जुने जाऊ द्या मरणालागुनी

जाळुनी किंवा पुरुनी टाका

सडत न एक्या ठायी ठाका

सावध!ऐका पुढल्या हाका

खांद्यास चला खांदा भिडवूनी

साहित्यनिष्ठांच्या मांदियाळीने नवे वळण घेतलेले आहे. साहित्यनिष्ठांना सांगावेसे वाटते आहे - ज्ञानाच्या या नव्या हाय-वेवर, खांद्यास चला खांदा भिडवुनी!

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Sachin Shinde

Sat , 19 December 2020

अप्रतिम


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......