आकाशवाणी पुणे केंद्राचे विद्यमान संचालक गोपाळ अवटी यांनी आजवर विविध क्षेत्रांतील मान्यवर मंडळींच्या मुलाखती घेतल्या आहेत. त्या मुलाखतींपैकी निवडक ५० मुलाखतींचं ‘सृजन-संवाद (भाग १ व २)’ हे पुस्तक भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर यांनी नुकतंच प्रकाशित केलं आहे. या पुस्तकाला प्रसिद्ध साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश...
.................................................................................................................................................................
आकाशवाणी पुणे केंद्राचे विद्यमान संचालक गोपाळ अवटी हे आकाशवाणीत १९८४पासून कार्यरत आहेत. वेगवेगळ्या पदांवर कार्य करत, पदोन्नती प्राप्त करत ते या पदापर्यंत पोहोचले आहेत. यापूर्वी त्यांनी रत्नागिरी, जळगाव, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर, मुंबई इ. केंद्रांवर काम केले आहे. कार्यक्रम अधिकारी ते केंद्र संचालक अशा सुमारे तीन दशकांच्या प्रवासात त्यांनी आकाशवाणीवर अनेक प्रयोग, उपक्रम केलेत.
आकाशवाणी लोकप्रसारण माध्यम आहे. या माध्यमात तुम्हास रोज नवं द्यायचा ध्यास असल्याशिवाय हे माध्यम लोकाभिमुख होत नाही, करताही येत नाही. त्यासाठी तुमचा लोकसंपर्कही मोठा असावा लागतो.
भारतातील आकाशवाणी आपल्या स्थापनेची शताब्दी येत्या दोन-तीन वर्षांतच साजरी करणार आहे. ब्रिटिश साम्राज्य काळात भारतीय रेडिओचे प्रसारण सुरू झाले. ‘बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लब’च्या स्थापनेतून हे कार्य सुरू झाले. १९२७ मध्ये या हौशी नि खासगी प्रसारणाचे रूपांतर पुढे ‘इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी लिमिटेड’मध्ये झाले. या कंपनीने मुंबई केंद्र सुरू केले; पण ही कंपनी दोन-तीन वर्षेच तग धरू शकली. १९३०मध्ये ‘इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस’ सुरू झाली. ८ जून १९३६ला सुरू झालेल्या ‘ऑल इंडिया रेडिओ’चे वर्तमान रूप म्हणजेच आकाशवाणी. ‘आकाशवाणी’ हे भारतीय भाषी नावही रवींद्रनाथ टागोरांची देणगी! ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे पुरातन ब्रीद धारण करणाऱ्या आकाशवाणीने आपल्या गेल्या शतकभराच्या प्रवासात भारतीय संस्कृतीच्या सर्वांगांना स्पर्श करत तिला संस्कृतीवाहक व समृद्धीचे समर्थ नि सार्थक साधन, माध्यम बनवले.
संगीत, साहित्य, कला, भाषा, समाजसेवा, राजकारण, सहकार, योग, अध्यात्म, पर्यावरण, विज्ञान, अर्थशास्त्र इ. जीवन क्षेत्रे आपली संस्कृती साकारत असते. आकाशवाणी सुगम संगीत, शास्त्रीय संगीत, लोकसंगीत, वाद्यवादन, वाद्यवृंद, वृत्तांत, वृत्तांकन, बातमीपत्र, भाषणे, मुलाखती, संवाद, नाट्यछटा (श्रुतिका), चर्चा, पत्र प्रतिसाद इ. माध्यमातून जनसंपर्क व जनसंवादाचे कार्य करत असते. यातील मुलाखती सामान्यांच्या असतात, तशाच असामान्यांच्यासुद्धा! जमीन आणि आकाश सांधणारा मुलाखतींचा कार्यक्रम हा आकाशवाणी श्रोत्यांचा स्थापनेपासूनच आकर्षणाचा भाग राहिला आहे.
अशीच एक वाचलेली आकाशवाणीवरील भारतीय स्वातंत्र्याच्या उद्घोषणेसंबंधीची पूर्णम् विश्ववनाथन यांची अंगावर शहारे आणणारी मुलाखत माझ्या जशीच्या तशी लक्षात आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी सकाळी ५.३० वाजताच पहिलं वार्तापत्र आशियाई देशांसाठीच सादर करायचा मान त्यांना मिळालेला. ते अत्यंत भावूक झालेले त्या वेळी. गळा दाटून आलेला! त्यांनी आपलं सारं बळ एकवटून साऱ्या जगाला भारत स्वतंत्र झाल्याची बातमी दिली. बातमी संपताच आपले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंचं ते ऐतिहासिक भाषण ‘नियतीशी करार’ (Tryst with destiny) जे मध्यरात्री झालं होतं, ते पुनःप्रक्षेपित करण्यात आलं होतं.
.................................................................................................................................................................
सृजन-संवाद (भाग १)मध्ये पुढील मान्यवरांच्या मुलाखतींचा समावेश आहे - संगीतकार अनिल मोहिले, डॉ. अरुणा ढेरे, अच्युत गोडबोले, दिलीप माजगावकर, ‘सर्कस’कार शिवाजी कार्लेकर, वसंत पलुस्कर, गंगाधर महाम्बरे, प्राचार्य राम शेवाळकर, डॉ. सुनीलकुमार लवटे, द. भि. कुलकर्णी, वंदना अत्रे आणि भारती ठाकूर, आचार्य किशोरजी व्यास, बाबा आमटे, मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. रजनीकांत आरोळे, बाळासाहेब विखे पाटील, संगीतकार स्नेहल भाटकर, प्राचार्य शिवाजीराव भोसले, डॉ. अनिल अवचट, गणेश देवी, न्या. नरेंद्र चपळगावकर, मेधा पाटकर, मारुती चितमपल्ली, अशोक पत्की, निळू फुले आणि रामदास भटकळ
.................................................................................................................................................................
बातमीपत्र संपून नेहरूंचं भाषण लावलं नि त्यांच्या डोळ्यांतून घळाघळा आनंदाश्रू वाहू लागले, ते दोन कारणांसाठी. एक, भारतीय स्वातंत्र्याची उद्घोषणा करणारं ते वाक्य, ‘India is a free country’ उच्चारण्याचा सन्मान त्यांना मिळालेला! दुसरं हे बातमीपत्र सादर करण्यासाठी नियतीनं त्यांची निवड केली होती!
यापूर्वी ते नियमित नवी दिल्लीतील बिर्ला हाऊसवर जाऊन महात्मा गांधींच्या सायंप्रार्थना आकाशवाणीसाठी ध्वनिमुद्रित करून प्रसारित करत असत. मुलाखतकारांनी त्यांना प्रश्न केला होता, ‘महात्मा गांधींशी कधी हस्तांदोलन करण्याचं भाग्य लाभलं?’ त्यांचं उत्तर अधिक भावस्पर्शी होतं. ‘त्या वेळी सर्वजण बापूंना चरणस्पर्शच करत’. रेडिओच्या मुलाखतींची सर्व शक्ती जर कशात असेल, तर तो काळ, कार्य, व्यक्तिमत्त्व, विचार, दृष्टिकोन ध्वनिमुद्रित करून निसटणारा काळ भविष्यासाठी आकाशवाणीच्या कुपीत बंदिस्त व सुरक्षित ठेवत असतात. नव्या पिढीस इतिहासाचं विस्मरण होऊ नये म्हणून नि नव्या पिढीस प्रेरणा मिळावी म्हणूनही!
आकाशवाणीवरील मुलाखतींचं हे ऐतिहासिकपण, ही रोचकता नि रोमांचकता अनुभवायची असेल तर गोपाळ अवटी यांच्या निवडक ५० मुलाखतींचा संग्रह ‘सृजन संवाद’ (भाग १ आणि भाग २) वाचण्यास पर्याय नाही. गोपाळ अवटी व्यक्ती म्हणून ऋजु, मितभाषी, मधाळ व मनुष्यसंग्रही गृहस्थ आहेत.
त्यांची नि माझी पहिली भेट साधारणपणे २००५-०६च्या दरम्यानची असावी. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र संचालकांची बैठक होती. तीनएक दिवस चालणाऱ्या या सहविचारासाठी उपस्थित सर्व केंद्र संचालक उद्घाटन सत्रानंतर विद्यापीठातील ‘वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालय पाहायला येणार आहेत नि तुम्ही व्यक्तिशः उपस्थित राहून सर्वांना संग्रहालय दाखवा,’ असा कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांचा प्रेमाचा नि आग्रहाचा फोन मिळाला नि मी हजर झालो. तेव्हा मी त्या संग्रहालयाचा मानद संचालक होतो. निर्मिती मी केल्याने बारीक-सारिक तपशीलासह निवेदन करत सर्व संग्रहालय या मंडळींना दाखवलं. सोबत आकाशवाणी मुंबईच्या रुस्तुम भारती गोखले होत्या. संग्रहालय पाहून त्यांनी मला विचारलं की, ‘आकाशवाणीची तुम्हास काय मदत हवीय?’ लगेच ‘वि. स. खांडेकरांची ध्वनिमुद्रित भाषणं हवी आहेत. आपल्याकडे मागणी केलीय; पण अद्याप मिळालेली नाहीत,’ असं सांगितलं. समोर गोपाळ अवटी होते. ते या सहविचार उपक्रमाचे संयोजक होते. रुस्तुमजी गोखले त्यांना म्हणाल्या, ‘आपल्या येथील समारोप समारंभात यांना हवं ते सर्व सुपूर्द करा.’
मला आठवतं, गोपाळ अवटी यांनी फोनाफोनी, माणसं, गाडी सर्व ते करून समारोपात मला सहाएक कॅसेटस् समारंभपूर्वक दिल्या. गोपाळ अवटी हे कार्यक्षम, आज्ञाधारक; पण त्याहीपेक्षा साहित्य, संस्कृतीप्रेमी अधिकारी असल्याची खात्री पटली होती त्या दिवशी. माणसं पदांनी नाही, तर कर्तृत्वाने मोठी होतात, हेच खरं!
त्यानंतर त्यांच्या-माझ्या भेटी नाशिकला होत राहिल्या. तिथे मी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचं स्मृती संग्रहालय उभारत होतो. हा काळ २०१०-११चा असावा. यातून या गृहस्थाचं मनुष्यवेल्हाळपण लक्षात आलं. गोपाळ अवटींमध्ये एक सांस्कृतिक निरीक्षक, संग्राहक वसलेला नि बसलेला आहे. संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाचं हुनर (कौशल्य) नि हुन्नरीपण (बहुआयामीपण, अष्टपैलुत्व) या माणसास माहीत असतं. त्यासाठी गोपाळ अवटी आपली पंचेंद्रिये सतत जागी ठेवत काया, वाचा, मने, वाचन, संगीत, साहित्य, संस्कृती, कला, क्रीडा, राजकारण, समाजकारण इ. सर्व क्षेत्रांत रोज काय नवं घडतं आहे, हे टिपत, वाचत, ऐकत, शोधत राहतात. तो त्यांचा रोजचा रियाजच त्यांना अष्टावधानी मुलाखतकार बनवत आला आहे.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
‘सृजन संवाद’ (भाग १ आणि भाग २)मध्ये गोपाळ अवटी, अभिनय, संगीत, समाजसेवा, राजकारण, सहकार, कला, साहित्य इत्यादी क्षेत्रांतील एक-दोन नव्हे चक्क ५० दिग्गज भेटून संवाद करतात. बाबा आमटे, मेधा पाटकर, राजेंद्रसिंह, डॉ. गणेश देवी, नरेंद्र चपळगावकर, निळू फुले, इंद्राणी मुखर्जी, डॉ. रजनीकांत आरोळे, प्राचार्य शिवाजीराव भोसले, ‘सर्कस’कार कार्लेकर, मधु मंगेश कर्णिक, जफर आबिद, आचार्य किशोरजी व्यास, शैलेश भागवत ही नावं वाचली तरी वाचकांच्या मनात मुलाखती वाचण्याची जिज्ञासा निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, याची मला खात्री आहे.
पन्नासच्या पन्नास व्यक्ती म्हणजे आपापल्या क्षेत्रातली उंच शिखरंच! ‘बस नाम ही काफी’ अशी ही मंडळी. ते निवडण्याचं, हेरण्याचं, त्यांना बोलतं करण्याचं, त्यांचं सर्वस्व काढून घेण्याचं कसब गोपाळ अवटींमध्ये पूर्ण भरलेलं असल्याचं या मुलाखती वाचताना लक्षात येतं. गोपाळ अवटींना या व्यक्तींची बलस्थानं माहीत असतात नि हळवे कोपरे-कंगोरेही.
या पुस्तकाची रचना मोठी कुतूहलवर्धक आहे. लेखकीय मनोगत मोठं ललितमधूर झालं आहे. ते लेखकाचं शब्दसामर्थ्य स्पष्ट करत लेखकाची लेखनअसोशी अधोरेखित करतं. प्रत्येक मुलाखतदाराच्या छायाचित्र भेटीतून हे पुस्तक मुलाखतदार नि वाचक यांच्यात ऋणानुबंधांचं नातं निर्माण करतं. मुलाखतपूर्व दिल्या गेलेल्या आठवणीने लेखक ते नातं दृढ करतो. प्रत्यक्ष मुलाखत वाचणे हा वाचकांसाठी ‘ब्रह्मानंद’ नाही ठरला तरच आश्चर्य! शेवटच्या परिशिष्टात लेखकाने मुलाखत प्रक्षेपण दिनांक, प्रक्षेपण केंद्र इ. माहिती पुरवून या मुलाखतींचं संदर्भमूल्य वाढवलं आहे. सर्वच मुलाखती वाचनीय झाल्या आहेत आणि प्रेरकही!
आकाशवाणीवरील मुलाखती श्राव्य असतात. त्यांना पुस्तकरूप देताना त्या औपचारिक रूप धारण करतात. बोलणं आणि ऐकणं यात चार बोटांचं अंतर असलं तरी बोलणं नि लिहिणं यात मात्र हातभर अंतर असतं. मुलाखतकार नि मुलाखतदार यांची बोलीरूपात स्वतःची म्हणून एक शैली, लकब असते. बोलताना माणूस भाषेबद्दल फारसा सजग असतोच असे नाही. मुलाखत मूलतः एक सहृदय संवाद असल्याने त्यात सहजता, हितगुज, गप्पांचं अनौपचारिकपण असतं. तीच लिहून काढताना कर्ता, कर्म, क्रियापद, व्याकरण, परिभाषा, प्रतिशब्द इ. अंगांनी औपचारिक होत जाते. लेखकापुढे आव्हान असतं ते लिखित भाषेचा बाज सांभाळत मूळ मुलाखतीचा साज (सौंदर्य) जपायचं! हे येऱ्यागबाळ्याचं काम नाही, ‘तिथे पाहिजे जातीचे’. ते या लिखित मुलाखतींमधून सिद्ध झाले आहे.
‘सृजन संवाद’ (भाग १ आणि भाग २)मधील मुलाखती काही दीर्घ, तर काही संक्षिप्त आहेत. काहींच्या तर दोन दोन मुलाखती आहेत. अर्थात त्यांचे विषय, संदर्भ, आशय भिन्न भिन्न आहेत. गोपाळ अवटींना सर्व विषयांचे बारकावे माहीत असतात. ते सर्व विषयांचे सर्वज्ञ कसे? असा या मुलाखती वाचताना पडलेला प्रश्न; पण त्याचं उत्तर एकच. ती त्यांची जीवनसाधना आहे नि कर्मपूजाही!
.................................................................................................................................................................
सृजन-संवाद (भाग २)मध्ये पुढील मान्यवरांच्या मुलाखतींचा समावेश आहे - देवकिसन सारडा, डॉ. जयंत नारळीकर, न्या. नरेंद्र चपळगावकर, राजेंद्रसिंह, वासंती सोर, मधु मंगेश कर्णिक, पं. नाथ नेरळकर, भालचंद्र पेंढारकर-गोविंदराव पटवर्धन, अर्चना गोडबोले, बाळ देशपांडे, मेधा पाटकर, बबनराव पाचपुते, अवधूत हर्डीकर, चारुदत्त आफळे, विलास देवळे, इंद्राणी मुखर्जी, राजेंद्र देसाई, निखिल गुप्ता, हेमंत टकले, शैलेश भागवत, जफर आबिद, विजय पाडळकर, ज्ञानेश्वर मुळे, डॉ. अरुणा ढेरे, दत्तप्रसाद दाभोळकर
.................................................................................................................................................................
शासकीय सेवेत माणसं पाट्या टाकतात, असा आरोप केला जातो. तो सार्वत्रिक नाही लागू करता येणार. ‘उडदामाजी काळे-गोरे’ या न्यायाने म्हणायचं झालं तर बगळ्यांच्या थव्यात एखादा राजहंसही असतो, हे आपणास नाही विसरता येणार. या मुलाखतींची शीर्षकं मनमोहक, मनोहारी आहेत, तशीच ती आशयसूचकही आहेत. त्यात वाचनीय करणं, वाचकाला मुलाखती वाचायला भाग पाडण्याची विलक्षण ताकद आहे.
लेखक सलामीलाच अर्धं युद्ध जिंकतो, उर्वरित अर्धं तपशीलानं जिंकलं जातं. यातील एक-दोन मुलाखती हिंदी भाषिक दिग्गजांच्या आहेत. अर्थातच हिंदीत! त्या वाचत असताना हिंदी भाषेचं मधूरपण काळजास भिडतं. भारताचे तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव. तेलगू भाषिक गृहस्थ. ते मराठीचे चांगले जाणकार होते. कराड येथे २००३मध्ये संपन्न अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक होते. आपल्या भाषणात मराठीचं त्यांचं निरीक्षण व्यक्त करणारं एक वाक्य आहे. खरं तर मराठी भाषिकांना भाषा वाचवण्याचा तो इशाराच आहे. विधान आहे, ‘मराठी इज ए मोस्ट अँग्लिसाईज्ड लँग्वेज इन इंडिया’. ते या मुलाखती वाचताना असे प्रत्ययास येतं. काही ठिकाणी मराठी मातृभाषिकच आहेत. अशा अनावश्यक इंग्रजी शब्द वापरण्याच्या मोहातून जितके लवकर मुक्त होऊ, तितकी मराठी भाषा लवकर इंग्रजी प्रदूषित व्हायची थांबेल. ती काळाची गरज आहे, अन्यथा काळ एक वास्तव कठोरपणे नोंदवेल. मराठी भाषा उच्चशिक्षितांनी प्रदूषित करून मृतप्राय, नष्ट केली.
या सर्वच मुलाखती आपलं सांस्कृतिक संचित आहे. आपण दोन मिनिटाचं गाणं ऐकतो; पण त्यामागे गीतकार, संगीतकार, दिग्दर्शक, निर्माते जीवाचं रान करतात, तेव्हा आपले कान सुखावतात.
जलरक्षक डॉ. राजेंद्रसिंह यांची मुलाखत वाचू तर लक्षात येतं की, ते ‘जल ही सर्वस्वम’ का म्हणतात?
मेधा पाटकर यांनी जगाला विकासाचा चेहरा मानवीयच हवा, हे परोपरीनं समजावलं. मोठी धरणं पर्यावरणाचा नि मनुष्य जीवनाचा मोठा विनाश करतात, हे त्यांची मुलाखत वाचली की लक्षात येतं.
बाबा आमटे त्यांच्या समर्थनार्थ उभे ठाकतात. कारण त्यांनी भग्न माणसात सौंदर्य स्थापनेचा वसा घेतला आहे. ‘माणसं सौंदर्य पाहायला अजंठा, वेरुळ, हळेबिड, खजुराहोला जातात. पाहतात काय तर पत्थरांच्या भग्न मूर्ती! त्यांना कुष्ठरोग्यांचे झडलेले हात, पाय, बोटे कधीच सुंदर करण्यासाठी खुणावत का नाही?
मधु मंगेश कर्णिक यांच्यासारखे साहित्यिक ‘माहिमची खाडी’सारखी कादंबरी लिहून गरीब कोळी, मुंबईच्या झोपडपट्टी नि किनारपट्टीचं क्रौर्य जागवतात.
अच्युत गोडबोले बहुपेडी लेखन करत नव्या काळाचं कौशल्य वाचकात निर्माण करतात. प्राचार्य शिवाजीराव भोसले आणि प्राचार्य राम शेवाळकर यांनी महाराष्ट्र पिंजून केलेला प्रबोधनयज्ञ म्हणजे महाराष्ट्राचे प्रबोधनपर्वच!
.................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
सामाजिक सुरक्षा, जतन साक्षरता, योग, अध्यात्म, संगीत, गीत, आरोग्यसेवा या सर्व गोष्टी जीवनावश्यकच! माणसं एक-एक विषय आपलं जीवनध्येय म्हणून निवडतात नि त्यासाठी आयुष्य पणाला लावतात.
हे सर्व चित्रित, शब्दबद्ध करणाऱ्या या मुलाखती म्हणजे मानवी सांस्कृतिक सौंदर्याचं प्रतिबिंब! आरसाच जणू. तुम्ही वाचकांनी त्यात डोकवावं. स्वतःस न्याहाळावं. मग लक्षात येईल ते सुभाषित, ‘स्वतःसाठी जगलास तर जगून मेल्यासारखाच. देशासाठी, दुसऱ्यासाठी जगलास तर जगात येऊन काही केल्याचं समाधान!’
महात्मा गांधी म्हणत, “माणसानं रोज झोपण्यापूर्वी स्वतःस एक छोटा प्रश्न करून निजावं. ‘आज मी काय (सार्थक) केलं?” या मुलाखती वाचकांत जी जीवन सजगता जागवतात, तेच या मुलाखतीचं श्रेय नि प्रेयही!
गोपाळ अवटी यांचे त्यासाठी आभार नि अभिनंदनही!
.................................................................................................................................................................
सृजन-संवाद (भाग १) - गोपाळ अवटी, भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर, पाने - ३८४, मूल्य - ४२५ रुपये.
सृजन-संवाद (भाग २) - गोपाळ अवटी, भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर, पाने - ३६२, मूल्य - ४२५ रुपये.
हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5255/Srujan-Sanwad-bhag-1-ani-bhag-2
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment