संत गाडगेमहाराज उर्फ गाडगेबाबा यांची २० डिसेंबर रोजी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा परिचय करून देणारा हा विशेष लेख...
..................................................................................................................................................................
संत गाडगेबाबा म्हणजे विसाव्या शतकात महाराष्ट्राच्या भूमीने पाहिलेले व अनुभवलेले एक आश्चर्य आहे! वैराग्याचा एक मूर्तीमंत आविष्कार या संताच्या रूपाने उभ्या महाराष्ट्राला अनुभवयास मिळाला. ‘गोपाला गोपाला, देवकीनंदन गोपाला’ असे भजन-कीर्तन करत अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन जनजागृतीचे विलक्षण कार्य करणारे गाडगेबाबा महाराष्ट्रातील लोकशिक्षणाचे चालते-बोलते विद्यापीठ होते. विज्ञानावर आधारित समाजप्रबोधन करणारे ते एक लोकोत्तर महापुरुष होते.
समाजप्रबोधनाची व परिवर्तनाची प्रचंड उर्मी घेऊन पाच दशके महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या उद्धारासाठी आपले संपूर्ण जीवन व्यतित करणारे गाडगेबाबा विसाव्या शतकातील हा एक महान क्रांतिकारक अवलिया फकीर होते. सर्वसामान्य जनतेला निर्मळ माणुसकीचा एक नवा आचारधर्म शिकवणारे ते एक विलक्षण लोकसेवक होते. स्वतः निरक्षर असूनही शिक्षणाचे महत्त्व प्रतिपादन करणारे आणि दांभिक पिसाटपणावर सडेतोड हल्ला करणारे महान क्रांतिकारक विचारवंत होते. गाडगेबाबांनी स्वतःच्या संसाराची आयुष्यात कधीही चिंता केली नाही. मात्र अवघ्या जगाच्या संसाराची काळजी वाहिली.
विसाव्या शतकात महाराष्ट्रात अनेक संत-महात्मे होऊन गेले. गाडगेबाबा त्यापैकी एक असामान्य असे युगपुरुष होते. त्यांचे विचार एवढे दाहक व क्रांतिकारी होते की, त्यांच्या रूपाने उभ्या महाराष्ट्राला एक खरा ‘समाजवादी सत्यशोधक’ लाभला, हे सत्य कुणालाही नाकारता येणार नाही. समाजप्रबोधनाचे विचार सर्वसामान्य जनतेला पटवून सांगण्याची त्यांची शैली, लोकांच्या आचार-विचारांना धक्का देण्याचे सामर्थ्य आणि त्यांच्या सामाजिक कार्याची दृष्टी लक्षात घेता गाडगेबाबा निरक्षर होते, यावर विश्वास बसत नाही. हे पुढील पिढ्यांना सांगूनही पटणार नाही. एक निरक्षर संत विज्ञानावर आधारित समाजप्रबोधन करतो, ही गोष्टच जगाच्या इतिहासात अभूतपूर्व अशी आहे.
खऱ्या मानवधर्माच्या शोधात
२३ फेब्रुवारी १८७६ रोजी गाडगेबाबांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर असे होते. वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर छोटा डेबूजी मामाकडे वास्तव्यास आला. तब्बल २० वर्षे मामाची शेती केली, काबाडकष्ट केले. मात्र जगाच्या संसाराची चिंता करण्याऱ्या अवलिया फकिराचे मन संसारात रमेना. त्यांच्यात वैराग्य निर्माण झाले आणि एक दिवस हे डेबूजी हातात एक गाडगे घेऊन बाहेर पडले, ते कधीही न परतण्यासाठी.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
या साधक अवस्थेत तब्बल १२ वर्षे संपूर्ण महाराष्ट्रात भ्रमंती केली. देहाची आसक्ती कसोटीवर घासून घासून बोथट केली. आणि या विलक्षण संताने खऱ्या मानवर्धमाचा शोध सुरू केला. १९०५ ते १९५६ अशी तब्बल ५० वर्षे बहुजन समाजाच्या उद्धारासाठी आपली हयात खर्ची घातली. बहुजन समाजात पसरलेले सर्व सामाजिक रोग, कर्मकांड, धर्ममार्तंडाचे वर्तन याचे चिंतन केले. सर्व सामाजिक, धार्मिक समस्यांची अगदी शास्त्रीय पद्धतीने चिकित्सा केली आणि एक नवा मानवधर्म, नवा प्रगत समाज निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
या ५० वर्षांत गाडगेबाबांनी संपूर्ण महाराष्ट्रभर भ्रमंती केली. लोकांच्या सर्व समस्यांचे निरीक्षण केले. हा बहुजन समाज किती नागवला जातो, का नागवला जातो, याची अनुभवनिष्ठ चिकित्सा केली. या काळात सर्वच स्तरातील लोक त्यांनी पाहिले, अनुभवले. प्रचंड दारिद्र्य, निरक्षरता, अंधश्रद्धा, इत्यादी समस्यांचे कसे निराकरण करता येईल, याचा त्यांनी जणू-ध्यासच घेतला. ‘माणसेच माणसांना का दुःख देतात?, माणसेच माणसांचे एवढे शोषण का करतात?, माणसा-माणसात शिवाशिव का पाळली जाते? लक्षावधी लोक भुकेकंगाल का आहेत? अशा अनंत प्रश्नांचे गाडगेबाबांभोवती काहूर उभे ठाकले. या सर्व समस्यांची सोडवणूक करून एका शोषणमुक्त समाजाच्या उभारणीचा त्यांनी संकल्प केला. आपल्या कीर्तनातून वरील समस्यांना हात घालून जनजागृतीचे महान कार्य केले. शोषित, वंचित, दुःखी बहुजन समाजाला हिंमत देणारे विचार मांडले आणि लोकशिक्षणाची एक चळवळ उभी केली.
अंधश्रद्धांविरोधी समाजजागृती
गाडगेबाबांच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात कर्मकांड, अंधश्रद्धा यांचा अतिरेक झाला होता. बहुजन समाज भरडून निघत होता, तेव्हा या समाजवादी सत्यशोधकाने एकेश्वरवादी तत्त्वज्ञान मांडले. ग्रंथप्रामाण्य, पोथिनिष्ठता, सण, श्राद्ध, मूर्तीपूजा यावर कठोर प्रहार करून ज्ञानप्रसाराचे आगळेवेगळे आंदोलन उभे केले. गावोगाव भजन-कीर्तन करून समाजप्रबोधनाचा नवा आविष्कार प्रस्थापित केला. गाडगेबाबा आपल्या कीर्तनात अध्यात्म सांगण्याऐवजी भौतिक समस्यांवर बोट ठेवून विज्ञान सांगत. ते म्हणत, ‘बाबांनो परमेश्वर एक आहे, तो निर्विकार आहे. ही ‘धर्माची देवळे व देवळांचा धर्म’ थोतांड आहे. या दगडी देवाचे पाय रगडू नका.’ यासाठी आपल्या कीर्तनातून संत कबीराचा दोहा सांगत-
जत्रामे फत्रा बिठाया तीर्थे बनाया पाणी
भई दुनिया बडी दिवानी ये तो पौसे की धुलधानी
या यात्रा-जत्रा म्हणजे भोळ्या बहुजन जनतेची लूट करण्याची ठिकाणी आहेत. मग पुढे म्हणत, ‘अरे, देव मंदिरात नाही की मूर्तीत नाही, तर माणसांत आहे. भुकेल्यांना अन्न द्या, अडाण्यांना ज्ञान द्या, इथेच परमेश्वर आहे.’
गाडगेबाबा एकेश्वरवादी असल्यामुळे नवस-सायस यावरदेखील कडाडून हल्ला चढवत. या कोंबड्या-बकऱ्यांच्या नवसापोटीच त्यांच्या वडिलांचे घर उदध्वस्त झाले होते. त्यामुळे स्वतःच्या दाहक अनुभवातून नवसाबाबत पोटतिडकीने बोलत. आपल्या कीर्तनात ते म्हणत, ‘बापहो मुक्या प्राण्याचे बळी देऊन माणूस कधी सुखी झाला आहे काय? परमेश्वर प्रसन्न झाला आहे काय? अरे, शेळीच्या लेकराचा जीव घेऊन तुम्हाला लेकरू कसे होईल? माय-माऊल्यांनो हा अधर्म आहे.’ गाडगेबाबा धर्माची चिकित्सा करत लोकांना अगदी पोटतीडकीने सांगत की, ‘बळीप्रथा कोणत्याही धर्मग्रंथात सांगितलेली नाही.’ लोकांना सोप्या भाषेत पटवून देण्यासाठी ते तुकोबाचा अंभग म्हणत,
नवसे कन्यापुत्र होती।
मग का करणे लागे पती ।।
पुन्हा कबीरांचा दोहा सांगत,
मांस-मांस सब एकही है।
'मुर्गा-बकरा-गाय, ऐसा मानव चुतिया बडा प्रेमसे खाए,
आपने बेटे का सिर मुंडावे देख सुरा लग जाए,
दुसरोंकि तो गर्दन काटे जरा शरम न आए'
या पद्धतीने गाडगेबाबांनी ‘नवस’ या अंधश्रद्धेविरुद्ध प्रचंड जनजागृती करून महाराष्ट्रातील ६७ खेड्यांत ही बळीची प्रथा बंद केली. संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या कुटुंबांना उपयोगी येणाऱ्या प्राणीमात्राची रक्षणाची मोहीम राबवली, अनेक यात्रेतील हिंसा बंद करण्यासाठी प्रसंगी प्राण पणाला लावले.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
अंधश्रद्धेवर कडाडून हल्ला हे गाडगेबाबांच्या समाजप्रबोधनाचे मुख्य अंग होते. मूर्तीपूजा हे थोतांड आहे. याबरोबरच भट-ब्राह्मणांनी सुरू केलेल्या सत्यनारायण, दशक्रियाविधी याचाही सडेतोड समाचार घेतला. गाडगेबाबा आपल्या कीर्तनातून म्हणत, ‘बापहो, ही सत्यनारायणाची पूजा थोतांड आहे. भटांचा पोट भरण्याचा तो एक धंदा आहे.’ ते पोटतिडकीने म्हणत, ‘अरे, जरा इचार करा पाण्यात बुडालेली बोट कधी वर येईल का? अरे, तसं असतं तर त्या महायुद्धात इंग्लंडच्या बोटी ज्या समुद्रात बुडाल्या त्या इंग्रजांनी सत्यनारायण घालून वर नसत्या का आणल्या? सव्वा रुपयात पावणाऱ्या या सत्यनारायण घालणाऱ्यांना आम्ही आव्हान करतो की, सव्वा कोटी रुपये घ्या, सत्यनारायण घाला व पण त्या बुडालेल्या बोटी वर आणा.’
या पद्धतीने गाडगेबाबा आपल्या कीर्तनातून सडेतोड सवाल निर्माण करून लोकांच्या हृदयावर राज्य करत. गाडगेबाबांच्या कीर्तनाला फार मोठा जनसागर लोटत असे. एवढेच काय डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब खेर, कर्मवीर भाऊराव पाटील, आचार्य अत्रे, पंजाबराव देशमुख अशा महान व्यक्ती जमिनीवर बसून तासन तास कीर्तन ऐकत असत. काय विलक्षण जादू होती, या निरक्षर (अक्षरशून्य) माणसाच्या वाणीत!
सत्यनारायणाच्या पोथीवरच गाडगेबाबा दशक्रियाविधीचाही समाचार घेत. म्हणत, ‘अरे, बापहो मेल्यावर कसले पिंडदान करता, आई-वडिलांची जिवंतपणीच सेवा करा, त्यांची पूजा करा. अरे स्वर्ग-नरक या गैरसमजुती आहेत.’ लोकांना पटवून देण्यासाठी मध्येच तुकोबाच्या अभंगातील ओवी म्हणत, तर कधी कबीराचा दोहा सांगत
'जित्या नाही अन्न मेल्यावर पिंडदान',
'जिते बापको रोटी ना दे वो मरेबाद पछताए।
मुठभर चावल लेकर कव्वोंको बाप बनाए'
अंधश्रद्धांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी गाडगेबाबांनी तब्बल अर्धशतक अथक परिश्रम घेतले. सर्वसामान्य, अडाणी, निरक्षर बहुजन समाजाला, समजेल-उमजेल अशा लोकांच्या भाषेत प्रबोधन केले. ग्रंथप्रामाण्यवाद, पोथीनिष्ठता, कर्मकांड, मूर्तीपूजा यावर सडेतोड टीका करून एका विज्ञाननिष्ठा समाजाचा आग्रह धरला. समाजात वर्षानुवर्षं घर करून बसलेल्या धर्मकल्पनांना तिलांजली दिली. सर्व बहुजन समाज अंधश्रद्धा मुक्त व्हावा यासाठी तब्बल पन्नास ५० वर्षं प्रबोधन केले. आपल्या कीर्तनातून अंधश्रद्धेवर कोरडे ओढले. यासाठी संत तुकाराम, महात्मा कबीराचे अभंग दोहे सांगितले,
शेंदूर माखोनीया धोंडा, पाया पडते पोरे रांडा।
सोडोनिया ख-या देवा करती म्हसोबाची सेवा.
मूर्तीपूजा हे कसे थोतांड आहे, देवळात देव नाही तर देव माणसात आहे, त्याला तिथेच पाहा, असा संदेश गाडगेबाबा देत असत.
एक जाणते लोकशिक्षक
शिक्षणातून समाजपरिर्तन हे गाडगेबाबांच्या कीर्तनातील एक मुख्य विषय होता. अडाणी, निरक्षर माणूस सर्वत्र नागवला जातो, त्याची प्रचंड पिळवणूक होते, हे गाडगेबाबांनी स्वतः अनुभवले होते. निरक्षर माणूस हा पशूसमान आहे, असे ते म्हणत असत. ‘गोरगरिबांच्या लेकराले शिक्षण घ्या’ असे ते प्रत्येक कीर्तनात सांगत. ‘आपल्या लेकराले शाळेत घाला’, असे कळकळीचे आवाहान करत. तर ‘गरिबांचे लेकराला शिक्षणाला मदत करा’ असे श्रीमंतांना आवाहन करत.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
एवढेच नाहीतर कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख या शिक्षणमहर्षींना त्यांच्या शिक्षणाच्या कार्यात गाडगेबाबांनी प्रचंड मदत केली. शिक्षणाने माणूस किती मोठा होतो, याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे उदाहरण देत असत. ज्ञानाची एक चळवळच त्यांनी आपल्या वाणीतून उभारली होती. म्हणूनच त्यांना समाजप्रबोधनाचे, शिक्षणाचे चालते, बोलते, फिरते विद्यापीठ म्हटले जाते. शोषणमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी बहुजन समाज शिकून शहाणा झाला पाहिजे, हा ध्यास त्यांनी घेतला होता. वाईट रूढी, प्रथा, अंधश्रद्धा, शोषण, धार्मिक दांभिकपणा, या सर्व सामाजिक रोगावर शिक्षण हा जालीम उपाय आहे, असे त्यांचे ठाम प्रतिपादन होते. आपल्या संपूर्ण हयातीत त्यांनी ज्ञानप्रसाराचे हे व्रत अगदी अखंडपणे चालवले, याबद्दल कुणाचेही दुमत असणार नाही. एका निरक्षर माणसाने शिक्षणाचे महत्त्व पटवून द्यावे, नव्हे त्यासाठी अनेक कृती कार्यक्रम हाती घ्यावेत, ही गोष्टच महाराष्ट्राच्या इतिहासात अभूतपूर्व अशी होती. संपूर्ण समाज विज्ञाननिष्ठ झाला पाहिजे, यासाठी त्यांनी केलेले कार्य अतुलनीय असेच आहे.
अंधश्रद्धा, कर्मकांड यांबरोबर त्यांच्या कीर्तनातील मुख्य विषय शिक्षण, जातीभेद हा होता. कधीही शाळेत न गेलेल्या माणसाने समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून द्यावे, ही अफलातून किमया होती. ते म्हणत, ‘बाबांनो, विद्या हे फार मोठे धन आहे. शिक्षण घ्या, शिक्षण अडाणी माणूस आणि पशू यात काहीच फरक नाही.’ ते पुढे म्हणत, ‘मायबापांनो, एक वेळ उपाशी राहा, बापांनो एका धोतराचे दोन धोतर करून नेसा, पण लेकराले शाळेत घाला. शिक्षणाविना माणूस धोंडा.’
‘सर्व अनर्थ एका अविद्येने केले’ ही शिकवण एका निरक्षर माणसाने समाजाच्या मनावर बिंबवली. यातून त्यांच्या विचारांची महती लक्षात येते. जातीप्रथेविरुद्ध आवाज उठवताना गाडगेबाबा सांगत, ‘बापहो माणसामाणसात फरक कराले तुम्हासले कोणी सांगितले, तुम्हाला कुणी जात विचारली तर माणूस हिच जात सांगा. आपण सर्व एकाच परमेश्वराचे लेकरे आहोत. मग ही शिवाशिव कशाला? बाबाहो, या जगात स्त्री आणि पुरुष अशा दोनच जाती आहेत. हा जातीभेद आपल्या समाजाला देशाला लागलेला एक डाग आहे, कलंक आहे.’
याशिवाय गाडगेबाबांनी हुंडापद्धतीवरदेखील जोरकस हल्ला केला होता. ते म्हणत, ‘हुंडा देऊ नका, घेऊ नका, हुंडा घेणाऱ्यांच्या विवाहसमारंभाला जाऊ नका, कर्जरूपी उकीरड्यावर नव-जोडप्यांचा संसार थाटू नका. अगदी झुणका-भाकरीने लग्न समारंभ साजरा करा.’
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
बाबांनी फक्त कीर्तनातूनच शिक्षणाचे महत्त्व सांगितले असे नाही आणि केवळ जातीप्रथेविरुद्ध बोलले नाहीत, तर पंजाबराव देशमुख, कर्मवीर भाऊराव पाटीलांसारख्या शिक्षणप्रेमींना फार मोठी मदत केली. मुलींची चार व मुलांची नऊ वस्तीगृहे बांधली. जातिभेद नष्ट करण्यासाठी सामूहिक पंक्तीचे कार्यक्रम घडवून आणले. पंढरपूर येथे खास अस्पृश्यांसाठी धर्मशाळा बांधली. मंदिर मात्र कुठेही उभारले नाही. त्या धर्मशाळा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण केल्या.
मानवी मूल्यांची रुजवणूक
गाडगेबाबा एक मानवनिष्ठ संत होते. दुसऱ्यासाठी कसे जगावे, हा महान संदेश देत नवसमाजनिर्मितीचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. ‘खराटा’ हा श्रमप्रतिष्ठेचा फार मोठा मूल्यसंस्कार आहे, हे त्यांनी समाजमनावर बिंबवले. महात्मा गांधीजींच्या अगोदर श्रमप्रतिष्ठा हा मूल्यविचार मांडला. काम केल्याशिवाय कुठेही फुकट खाऊ नये, असा त्यांचा कटाक्ष होता. म्हणूनच आपल्या कीर्तनातून ते ऐतखाऊ समाजावर अगदी तुटून पडत.
वयाची पंचाहत्तरी ओलांडल्यानंतरदेखील श्रम करूनच भाकरी खावी, ही अफलातून किमया त्यांनी साध्य करून दाखवली. अंधश्रद्धा, व्यसनाधिनता, कर्मकांड, नवस या थोतांड कल्पनांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या ऐतखाऊ बुआबाजींचा त्यांनी अनेक वेळा पर्दाफाश केला. त्यांना ‘चपातीचोर’ ही उपाधी देऊन समाजासमोर नागडे केले.
गरिबांना शिक्षण, भुकेल्यांना अन्न, नागड्यांना वस्त्र, रोग्यांना औषध, असा रोकडा मानवधर्म जोपासला. अनेक गरिबांची लग्ने लावून दिली, बेघरांसाठी ठिकठिकाणी धर्मशाळा बांधल्या, गरीब विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहे सुरू केली, वृद्धांसाठी आश्रम उघडले, हुंड्यासारख्या प्रथेला कडाडून विरोध केला. वाणी आणि कृती अशा दोन्ही आघाड्यांवर गाडगेबाबांनी मानवी मूल्यांची व्यवस्था प्रस्थापित करण्याचा अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न केला.
एका माणसानं अंगाला चिंध्या गुंडाळून व हातात फुटके गाडगे घेऊन लोकशिक्षणाचा पाया घातला. त्या अवलिया फकिराला विनम्र अभिवादन!
..................................................................................................................................................................
लेखक व्ही. एल. एरंडे माजी प्राचार्य व राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत.
vlyerande@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment