सत्ता डोक्यात गेली अथवा सत्ताधीश उन्मत्त झाला की, त्याच्या सत्तेला सुरुंग लागलाच म्हणून समजा! सत्तेचा उन्माद हा जसा त्या सत्ताधीशासाठी मारक असतो, तसाच तो या सत्ताधीशाकडे सत्ता सोपवलेल्या जनतेसाठीही दिशादर्शक ठरत असतो. आक्रमक प्रतिस्पर्ध्यांच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी म्हणून अंगीकारलेला आक्रमकपणा/आक्रस्ताळेपणा आपण सत्ताधारी झाल्यावरही कायम राखला तर जनतेचा अपेक्षाभंग होतो. एखाद्या निर्दयी, क्रूर सत्ताधीशास नामोहरम करण्यासाठी घेतलेले रौद्ररूप हेतू सिद्ध झाल्यानंतर सोडून द्यावे लागते, अन्यथा आपलीही गणती अशा निर्दयी, क्रूर लोकांत केली जाते. कारण जनतेला आपले रडे, गाऱ्हाणे ऐकून घेणारे मायबाप सरकार हवे असते, आपत्तीच्या प्रसंगी पाठीवर हात ठेवत दिलासा देणारे मृदू, प्रेमळ, समंजस नेतृत्व जनतेला अधिक प्रिय असते.
जशास तसे उत्तर देण्यासाठी वापरलेली आयुधे कालांतराने जपून ठेवावी लागतात अन कधीतरीच त्याचा वापर करण्याची संधी उपलब्ध होत असते. मात्र क्रूर, निर्दयी, आक्रमकपणा हाच तुमचा स्थायीभाव असेल तर जनतेला तुमच्या निवडीबद्दल पश्चाताप, निराशा, वैफल्य येऊ शकते.
नेमकी हीच गत बंगालच्या ममतादीदींची झालेली दिसून येते. अपेक्षाभंग झालेली जनता, दिग्गज नेत्यांकडून पक्षाला दिली जाणारी सोडचिठ्ठी, समोर भाजपसारखा केडरबेस्ड प्रतिस्पर्धी, या पार्श्वभूमीवर ममतादीदींचा पक्ष केवळ आपल्या गुंडगिरीच्या वा जोरजबरदस्तीच्या जोरावर सत्तेची हॅट्ट्रिक कशी करू शकतील?
पश्चिम बंगालमधील डाव्यांच्या ३४ वर्षांच्या प्रभुत्वाला आव्हान देत असतानाही स्वतःच्या स्वभावातील मृदूता, विनम्रता अथवा बंगालच्या मातीत उपजत असणारा मोकळेपणा, समूह सौजन्य हरवू न देणाऱ्या ममतादीदी स्वतः सत्ताधीश झाल्यानंतर या सर्वच गोष्टी विसरल्या. परिणामी त्यांच्या स्वभावातील मूळच्या या गुणधर्माचा आठव त्यांच्या आजवरच्या वाटचालीचे साक्षीदार, सहकाऱ्यांना नसेल तर बंगालच्या जनतेला तरी तो कसा राहील?
.................................................................................................................................................................
बीइंग – विजय अशोक इंदुशोकाई, आऱ्हान मीडियास्मिथस, नाशिक, पाने – २२२ (हार्डबाऊंड), मूल्य - ३६० रुपये
हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5250/Being
.................................................................................................................................................................
पहिल्यांदा सत्तेवर आलेल्या ममतादीदींनी राज्यकारभार कसा केला? अथवा दुसऱ्या वेळी सत्तेवर आल्यानंतर सर्वसामान्य जनतेला नेमके काय दिले? याची स्वतंत्र चर्चा होऊ शकते. मात्र पहिल्यांदा त्यांच्याकडे राज्याचा सत्ताशकट सोपवत असतानाचा जनसामान्यांचा आवेश, आनंद, उत्साह दुसऱ्यांदा सत्ता सोपवताना दुणावला तर नाहीच, मात्र प्रचंड वेगाने घसरला, यातच त्यांच्या कारभाराची लक्षणे स्पष्ट होताहेत.
राज्यातले राजकारण वा राज्यकारभार आपल्या सहकाऱ्यांच्या भरवशावर सोपवून निर्धास्तपणे राष्ट्रीय राजकारणात हुकूमी एक्का अशी ओळख निर्माण करणाऱ्या ममतादीदींना आता राज्यातली सत्ता गमावली जाण्याचे वास्तव जाणवायला लागलेले आहे, शिवाय एकेकाळचे निकटवर्तीय, निष्ठावंत सहकारीच आपल्या उद्याच्या पतनास हातभार लावत असल्याचे कटू सत्यही त्यांना पचवावे लागणार आहे.
गांधी कुटुंबियांची घराणेशाही, निर्णयप्रक्रियेतील एकाधिकारशाही अथवा शीर्षस्थ नेत्यांचा निर्णयप्रक्रियेतील निष्कारण असलेला हस्तक्षेप, या कारणांमुळे ममतादीदींनी काँग्रेस सोडून तृणमूलची स्थापना केली अन आता नेमकी त्यांच्या निकटवर्तियांनी रुजवलेली हीच कार्यपद्धती/कार्यसंस्कृती त्यांच्या खंद्या समर्थकांना तृणमूलमधून बाहेर पडण्यास भाग पाडत आहे.
तृणमूल काँग्रेसला आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात अनेक आघाड्यांवर लढावे लागणार आहे. १० वर्षांपासून सत्तेवर असल्यामुळे या निवडणुकीत प्रस्थापितविरोधी लाट थोपवावी लागेल, भाजपने आखलेल्या हिंदू समाजाच्या ध्रुवीकरणाच्या रणनीतीस तोंड द्यावे लागेल अन त्याचवेळी मुस्लीम समुदायातील पक्षाचा जनाधार घटणार नाही, याचीही काळजी घ्यावी लागेल.
बरे, ही सर्व आव्हाने ममतादीदींना बहुदा एकट्यालाच पेलावी लागणार आहेत, कारण प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईपर्यंत त्यांचे किती सोबती त्यांना सोडून गेलेले असतील, हे आताच सांगता येणार नाही. त्यामुळे फारसा जनाधार नसलेल्या, होता तो जनाधार घटलेल्या अन बोलघेवड्या, खुशामतखोर नेत्यांना सोबत घेऊन त्यांना येत्या विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरावे लागणार आहे.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
ज्या मुस्लीम समाजातील एकगठ्ठा मतांच्या जोरावर ममतादीदींनी स्वतःची प्रतिमा ‘ममता ते मुमताज’ अशी रंगवण्याची संधी साधली त्या मुस्लीम मतांच्या विभागणीचे वास्तव त्यांना पचवावे लागणार आहे. मुस्लीम समाजाची मते ही त्यांची एकाधिकारशाही असू शकत नसल्याचे सांगत एमआयएमच्या ओवैसी यांनी बंगालमध्ये हातपाय मारायला सुरुवात केली आहे.
मुस्लीम समुदायाचा अनुनय करण्याच्या नादात ममतादीदींच्या सरकारने राज्यातील हिंदू समाजाच्या भावनांकडे दुर्लक्ष केले का? या प्रश्नाचे उत्तर कदाचित नाही असेही असू शकेल. मात्र मुस्लीम समुदायाचे लांगुलचालन करण्याच्या नादात त्यांनी भाजपला त्या हिंदूविरोधी असल्याचे जनतेच्या मनात ठसवण्याची संधी जरूर दिलेली आहे.
ज्या दुर्गा वा कालिमातेचा दाखला देत ममतादीदी सत्तेवर आल्या, ती दुर्गापूजा हा जसा सत्ता संपादनाचा मार्ग असू शकतो, तसाच तो सत्ता गमावण्यास कारणीभूत ठरू शकतो, ही बाब त्या विसरल्या! दुर्गापूजेची बंगाली अस्मिता गोंजारत डाव्यांवर मात केलेल्या ममतादीदींनी दुर्गापूजेला वा मिरवणुकीस मनाई करून हा अस्मितेचा विषय भाजपच्या हाती सुपूर्त केला. आर्थिक मुद्द्यांना बगल देत केवळ अस्मितेवर राजकारण करणाऱ्या भाजपला आपला हिंदू ध्रुवीकरणाचा कार्यक्रम राबवण्यासाठीची ही सुसंधी ठरली.
दुर्गापूजा वा मिरवणुकीस विरोध करणाऱ्या ममतादीदी या हिंदूविरोधी असल्याचा डंका पिटत भाजपने बंगालमध्ये हातपाय पसरण्यास सुरुवात केली. इमामांना मानधन देणे आणि सीएए /एनआरसीला विरोध करणाऱ्या ममतादीदी या केवळ मुस्लीम समाजाचा कैवार घेणाऱ्या नेत्या असल्याचे चित्र स्पष्ट करण्यातही भाजप यशस्वी झाली आहे.
त्यापुढे जात त्यांच्या यशासाठी/ नेतृत्व बहरण्यासाठी मुस्लीम समुदायाचे त्यांनी केलेला एककलमी अनुनय कसा कारणीभूत आहे, हे ठसवण्याचा भाजपचा प्रत्येक प्रयत्न ममतादीदींनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या आक्रस्ताळ्या विधानांमुळे/ कृतीमुळे सफल झालेला आहे.
..................................................................................................................................................................
हेही पाहा : प. बंगाल : तिरंगा ते भगवा व्हाया लाल
..................................................................................................................................................................
त्यांचे राजकीय यश हे केवळ बांग्लादेशी घुसखोरांच्या जोरावर पोसले गेले असल्याचा मुद्दा जनसमूहात चर्चिला जाणे, हे याच रणनीतीचे निदर्शक मानावे लागते. अर्थात आपल्या विरोधकांनी उठवलेल्या या वावड्या आपल्याला किती व कोणत्या वेळी लाभदायक ठरतील अन किती व कोणत्या वेळी हानीकारक ठरतील, याबाबतचा त्यांचा अंदाजही सपशेल फसलेला दिसतो आहे.
त्यांच्या सरकारने केलेल्या बऱ्या-वाईट कामाची अथवा लोककल्याणकारी निर्णयांची चर्चा न होता त्यांच्या कार्यकाळात झालेले भ्रष्टाचार (शारदा चिटफंड, रोझ व्हॅली) विशेष प्रकाशोतात असतील, याची काळजी केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपने घेतली अन ममतादीदींनीही आपल्या सरकारच्या भ्रष्टाचाराची निष्पक्ष चौकशी होऊ देण्यापेक्षा या प्रकरणांचा तपास रोखण्यातच आपली सगळी शक्ती खर्च केली.
इथे ममतादीदी भाजपसोबतचे पहिले धोरणात्मक डावपेच ओळखण्यात वा त्यावर मात करण्यात कमी पडल्या. आपल्या कारकिर्दीत झालेला भ्रष्टाचार आपण खपवून घेणार नाही, हे स्पष्ट करण्याची संधी त्यांनी या प्रकरणांचा तपास करण्यासाठी आलेल्या केंद्रीय तपास यंत्रणेची अडवणूक करून घालवली. नपेक्षा त्यांचे सरकार भ्रष्ट असून ते भ्रष्टाचार करणाऱ्या प्रत्येकास अगदी आपल्या मंत्र्यांनाही कसे पाठीशी घालते, हे सर्वसामान्य जनतेला दाखवण्याची संधी भाजपने साधली. यात आपले मोठे नुकसान झाल्याचे ममतादीदींनाही कळून चुकले, मात्र खूप उशिरा.
..................................................................................................................................................................
हेही पाहा : कोलकात्यातील कांगावा
..................................................................................................................................................................
आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारमोहिमेतील वक्तव्यांचा रोख ममतादीदींच्या कारभारावर, कामांवर येईल, त्या वेळी माध्यमांचा /सर्वांचा भर त्यांच्या भ्रष्टाचारावरच राहील, या भाजपच्या डावपेचात भडक माथ्याच्या ममतादीदी अलगदपणे सापडल्या. आपण आता सरकारने केलेली लोककल्याणकारी कामे सर्वसामान्य जनतेला सांगण्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांचे विधान डावपेचात पराभूत झाल्याचे मान्य केलेल्या खेळाडूची उपरती मानावे लागले.
प्रारंभीची काही वर्षे काँग्रेसमध्ये व्यतीत केलेल्या आणि तृणमूलच्या स्थापनेनंतर वेळेनुरूप राष्ट्रीय स्तरावर मैत्र जोडणाऱ्या ममतादीदींना राष्ट्रीय राजकारणाचा पोतही व्यवस्थितरीत्या समजलेला आहे. या कौशल्याच्या जोरावर कधी काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी तर कधी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीशी सहकार्य करत केंद्रात मंत्रीपदे मिळवणाऱ्या ममतादीदी भाजपच्या बदलत्या नेतृत्वाचे, कार्यपद्धतीची स्वरूप ओळखण्यात कमी पडल्या, इथेच त्यांच्या धोरणीपणा, मुत्सद्देगिरीच्या मर्यादा उघड झालेल्या दिसतात.
साम, दाम, दंड, भेद या चाणक्यनीतीचा वापर करत डाव्यांचा गड उदध्वस्त करत पश्चिम बंगालवर एकहाती हुकूमत गाजवणाऱ्या ममतादीदींना भाजपकडून याच नीतीचा वापर केला जाणार, याची कल्पना आली नाही का? अथवा भाजपची ही रणनीती आपल्या आक्रमक आक्रस्ताळ्या अवतारासमोर तग धरणार नाही, या गैरसमजात त्या राहिल्या का? हे त्याच स्पष्ट करू शकतील. पण मोदी-शहा यांच्या कार्यपद्धतीबाबत ममतादीदींचा अंदाज सपशेल चुकला, हे कटू सत्य आहे.
.................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
जेव्हा समोर भाजपसारखा प्रतिस्पर्धी असतो, त्या वेळी (भाजपकडे राज्यात स्वतःचे नेतृत्व नाही) किमान आपल्या पक्षातले बिभीषण काळजीपूर्वक सांभाळावे/ हाताळावे लागतात, हे ममतादीदी विसरल्या. भाजपकडून तृणमूल काँग्रेसच्या नेत्या, कार्यकर्त्यांवर पक्ष सोडण्यासाठी दबावतंत्राचा वापर करण्यात येत असल्याचा त्यांचा दावा त्यांच्या स्वतःच्या विधानांशी किती विसंगत आहे, हे स्पष्ट होते आहे. पक्षात आपल्या वारसदाराचीच चलती असेल तर जनाधार असणारे सक्षम नेते कितीकाळ निष्ठावंत राहणार? आणि ममतादीदी म्हणताहेत त्यानुसार पक्षाबाहेर जाणारे लोक संधीसाधू असतील तर अशा संधीसाधू लोकांना घेऊनच त्यांनी त्यांच्या राजकीय आयुष्यातील महत्त्वाचे लढे, संघर्ष सिद्धीस नेलेले आहेत.
डाव्यांशी दोन हात करताना हे संधीसाधू नेतेच सोबत घेऊन ममतादीदींनी सत्ता स्थापनेप्रत वाटचाल केली होती, त्या वेळीच या नेत्यांच्या संधीसाधूपणाबाबत त्यांना खात्री असणार! हे नेते संधीसाधू असल्याचे माहीत असूनही त्यांनी त्यांना सोबत घेतले. आता जेव्हा या नेत्यांना भाजपकडून संधी उपलब्ध होत असेल अशा वेळी ममतादीदींनी आक्षेप घेण्याचे कारण काय?
हिंदू समाज भाजपच्या पाठीमागे, पक्षाला मिळणारी मुस्लीम समाजातील मते आता एमआयएमकडून विभागल्या जाणार, पक्षाची हक्काची मतपेढी उभारणारे दिग्गज नेते भाजपच्या गळाला लागलेले, ही आव्हाने ममतादीदी कशी पेलणार, हा औत्सुक्यवर्धक विषय आहे.
..................................................................................................................................................................
लेखक देवेंद्र शिरुरकर मुक्त पत्रकार आहेत.
shirurkard@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment