लेखक म्हणून असलेलं कर्तेपण गळून पडावं, माझ्या कथा निनावी व्हाव्यात...
पडघम - साहित्य संमेलन विशेष
हंसराज जाधव
  • हंसराज जाधव कथा-कादंबरीकार राजन गवस यांच्यासोबत
  • Fri , 03 February 2017
  • हंसराज जाधव Hansraj Jadhav म्होरम Muharram नवलेखन - मराठी कथा Navlekhan - Marathi Katha राजन गवस Rajan Gawas

साहित्य संमेलन ही मराठी साहित्यविश्वातली एक सर्वाधिक मोठी घडामोड आहे. अनेक लेखक-कवी-कथा\कादंबरीकारांना तिथं व्यासपीठ मिळतं. उद्या त्या व्यासपीठाचे हक्कदार असलेले आणि नुकतेच लिहून लागलेले मराठीमध्ये नवे दमदार कथाकार उदयाला येत आहेत. यातील काहींचं एखाद-दुसरं पुस्तक प्रकाशित झालं आहे, तर काहींच्या अवघा पाच-सातच कथा प्रकाशित झाल्या आहेत. पण त्यातून त्यांच्याविषयीच्या अपेक्षा वाढीला लागल्या आहेत. या वर्षीच्या संमेलनात कदाचित या कथाकारांचा नामोल्लेखही होणार नाही, पण यंदाचा साहित्य अकादमीचा पुरस्कार ज्या आसाराम लोमटे यांना कथालेखनासाठी मिळाला आहे, त्यांच्या प्रदेशातील म्हणजेच मराठवाड्यातील हे कथाकार आहेत. त्यांची दखल भविष्यात मराठी साहित्यविश्वाला भविष्यात घ्यावी लागेल. त्यातील एका कथाकाराचं हे मनोगत…

-----------------------------------------------------------------------------

तसा मी अपघातानेच कथाकार झालो. मार्च २०१२मध्ये औरंगाबादला एका महाविद्यालयात ‘अल्पसंख्याकांचे विचारविश्व’ या विषयावर एक आंतरराष्ट्रीय चर्चासत्र झालं. या चर्चासत्रात मी ‘मोहरम आणि माझं बालपण’ हा रिसर्च पेपर सादर केला. (खरं तर त्याचं शीर्षक मी ‘मोहरम – एक हिंदू सण’ असं दिलं होतं, पण संयोजकांच्या विनंतीमुळे ते नंतर शीर्षक बदललं.) लहानपणी गावात आणि परिसरात साजरा होणारा मोहरम सण, त्यातल्या सवाऱ्या, सुलेमान देवकर, त्यातला हिंदूंचा सहभाग, त्यांचा उत्साह, हिंदू-मुस्लीम ऐक्य या साऱ्या गोष्टी त्यात आलेल्या आहेत. परंतु जेव्हा मी तो पेपर सादर केला, तेव्हा त्यातली कथनशैली, देवकराचे संवाद वगैरे गोष्टी ऐकून चार-दोन सुज्ञ श्रोत्यांनी यावर कथा लिहिण्याची सूचना केली आणि पुढे माझी ‘म्होरम’ कथा प्रत्यक्षात आली.

‘म्होरम’नंतर मी ‘देवानंद’, ‘चौताई’, ‘मडं’ असा दोन-तीन कथा लिहिल्या, पण ‘म्होरम’नं मला कथाकार केलं. एखादी चांगली गोष्ट पारख असलेल्या माणसाच्या हाती लागली तर त्याचं काय चीज होऊ शकतं, याचं ‘म्होरम’ उत्तम उदाहरण आहे. नॅशनल बुक ट्रस्टनं चाळीशीच्या आतील कथाकारांच्या कथा मागवून त्यातील निवडक कथांचा संग्रह करण्याचा प्रकल्प हाती घेतला. या प्रकल्पात हाती आलेल्या दोनशे साठ कथांपैकी पंधरा कथांची निवड करत प्रसिद्ध लेखक राजन गवस यांच्या साक्षेपी संपादनाखाली ‘नवलेखन - मराठी कथा’ हे पुस्तक प्रसिद्ध झालं.

या संग्रहातील प्रणव सखदेव आणि मनस्विनी लता रवींद्र ही दोन नावं सोडली तर बाकी बहुतेक लेखकांच्या कथा पहिल्याच आहेत. पण त्यातलं सामर्थ्य लक्षात घेऊन गवस सरांनी या कथांची निवड केली आणि जिथं जातील तिथं नव्यानं लिहिणाऱ्या या कथांचं कौतुक केलं. बऱ्याच ठिकाणी मेनका धुमाळे यांची ‘कोरडा पाऊस’ आणि माझी ‘म्होरम’ या कथा चर्चेच्या विषय झाल्या.

मराठी कथेची आजची स्थिती फारशी समाधानकारक नाही. दर्जेदार कथा आजकाल येत नाहीत. कथाकथनामुळे कथेचं वाटोळं झालं आहे. रा.रं. बोराडे, भास्कर चंदनशिव यांच्यानंतर जयंत पवार, आसाराम लोमटे, पण त्यांच्यानंतर कोण, या प्रश्नाचं उत्तर एकूणच उपरोक्त चर्चा करणाऱ्या अभ्यासकांना, समीक्षकांना मिळत नाही. अशा काळात आजच्या कथेची चर्चा होतेय, म्हणजे नवतीचं नवंपण सोडून आम्हाला अधिक जबाबदार व्हावं लागेल.

आमच्या पिढीच्या बहुतेक कथा या आसाराम लोमटेंच्या कथेशी नातं सांगणाऱ्या आहेत. ‘ ‘आलोक’ला मिळालेला साहित्य अकादमी म्हणजे माझ्या संपूर्ण पिढीच्या कथेचा सन्मान आहे’, असं जे आसाराम लोमटेंनी म्हटलंय, त्याअर्थी आमची जबाबदारी निश्चितच वाढली आहे. आमचं हे नातं आणखी घट्ट करावं लागेल आणि लोमटेंसोबत किंवा लोमटेनंतर कोण, या प्रश्नाच्या उत्तरासाठी पर्याय द्यायचा असेल तर आम्हाला कथेकडे गंभीरपणे पहावं लागेल.

औरंगाबादमधील मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात कोणीतरी मला प्रश्न विचारला की, ‘मंचावरच्या बहुतेकांनी कथेबरोबर कविताही लिहिल्या आहेत, तशा तुम्हीही कविता लिहिल्या आहेत का?’ मी स्पष्टपणे सांगितलं की, ‘नाही, मी फक्त कथाच लिहिल्या!’ कथा माझ्या आवडीचा वाङ्मयप्रकार आहे. त्याचं कारण असं की, त्यातला मोकळेपणा आणि कथेत लेखकाला व्यक्त होण्यासाठी असलेला वाव सोयीचा ठरतो. कथनात्मकता आणि संवादात्मकता यामुळे वाचकांनाही रस निर्माण होतो.

माझ्या कथेविषयीची माझी अपेक्षा मोठी निराळी आहे. बालपण गेलेल्या परिसरातील आणि नोकरीनिमित्त राहत असलेल्या परिसरातील अनेक कथाविषय मला आजही आठवतात. पैठणच्या परिसरातलं खुलं कारागृह, त्यातील कैद्याच्या एक ना अनेक कहाण्या मला आकर्षित करतात. जायकवाडीच्या धरणाकाठी सायंकाळी बसल्यानंतर जलाशयावरून मुक्त विहार करणाऱ्या परदेशी पक्ष्यांच्या थव्याकडं पाहून मला नेहमी वाटतं की, या पक्ष्यांच्या पायाला चिकटून आलेल्या मातीचे काही कण माझ्या पदरात पडावेत आणि माझ्या कथेतली काही बीजं त्यांच्या पायाला चिकटून त्यांच्यासोबत दूरदूर जावीत.

मला नेहमी वाटत आलं की, माझी कथा, त्यातले कथाविषय हे सार्वत्रिक, वैश्विक व्हावेत. ‘पंचतंत्र’, ‘अरेबियन नाइटस’, भारतीय लोककथा इतक्या सार्वत्रिक, सार्वकालिक कशा झाल्या? श्रीचक्रधरांच्या निरुपणातली रुमण्याची कथा विसाव्या शतकातल्या युरोपियन आइन्स्टाईनच्या चरित्रात कशी? तिथं ती कशी पोहोचली? हजारो वर्षांपूर्वीच्या बुद्धचरित्रातील हत्ती आणि आंधळ्याची कथी श्रीचक्रधरांच्या निरुपणात कशी? याचं मला अप्रूप वाटतं. या कथा कोणी लिहिल्या असतील?

अनेक लोककथा हजारो वर्षांपासून टिकून आहेत. त्या कुणीतरी लिहिल्या असतील. पण त्यातलं कथाबीजच इतकं ताकदीचं नि सकस की काळाच्या ओघात त्या लेखकाचं नाव नाहीस झालं, पण पिढ्यानपिढ्या त्या कथा तशाच जिवंत राहिल्या. त्या ‘लोक’कथा झाल्या. त्यांचं कर्तेपण व्यापक-सामूहिक झालं.

मला सारखं वाटतं, माझंही लेखक म्हणून असलेलं कर्तेपण गळून पडावं, नाव मिटून जावं, माझ्या कथा निनावी, पण सार्वत्रिक, सार्वकालिक ठराव्यात. त्या लोककथा व्हाव्यात. बस्स!

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......