प्रा. गणेश मोहिते यांचा ‘वर्तनाचे वर्तमान’ हा लेखसंग्रह या आठवड्यात प्रकाशित होत आहे. या संग्रहाला प्रसिद्ध कथा-कादंबरीकार राजन गवस यांनी लिहिलेली ही प्रस्तावना....
.................................................................................................................................................................
गणेश मोहिते हे आजच्या काळातील महत्त्वाचे अभ्यासक आहेत. त्यांचे स्फूटलेखन व एक संशोधन प्रकल्प प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या नियतकालिकांतून त्यांनी गंभीरपणे समीक्षाही केलेली आहे. वेगवेगळ्या सामाजिक चळवळींमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग असतो. त्यांची स्वतःची अशी स्वतंत्र राजकीय भूमिका आहे. आजच्या काळात स्वतंत्र राजकीय विचार करणाऱ्या व्यक्तींची वानवा असताना गणेश मोहितेसारखा एखादा तरुण प्राध्यापक आपली सामाजिक व राजकीय भूमिका ठोसपणे मांडतो आहे, हे निश्चितच आश्वासक आणि उमेद वाढवणारे आहे. त्यांच्या ‘वर्तनाचे वर्तमान’ या ग्रंथाचे हस्तलिखित माझ्या हातात पडले आणि आजचा शिक्षक आपल्या भोवतालाविषयी काय विचार करतो, याचे वर्तमान माझ्यासमोर आले.
उच्चशिक्षणाच्या क्षेत्रात आजच्या काळात चांगली अभ्यासू माणसे येणे दुरापास्त झाले आहे. विनाअनुदान संस्थांचा धुमाकूळ आणि शिक्षण सम्राटांनी घातलेला हैदोस संपूर्ण शिक्षण क्षेत्र दूषित करण्यास कारण ठरलेला आहे. महाविद्यालयात शिक्षक होणे हे आता गोरगरीब मुलांचे काम राहिलेले नाही. त्यामुळे गोरगरीब बुद्धिमान मुले या क्षेत्रापासून दूर पळत आहेत. ज्यांची आर्थिक स्थिती बक्कळ आहे, पाच-पन्नास लाख देण्याची क्षमता ज्याच्याकडे आहे, अशा सुमार लोकांनी हे क्षेत्र काबीज केले आहे. त्यामुळे संशोधन, अध्यापन या गोष्टी आपोआपच परिघावर फेकल्या गेल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी मध्यम मार्ग शोधण्याच्या वृत्तीला बळ मिळाले आहे.
याचा परिणाम म्हणून विद्यापीठीय शिक्षणाला, संशोधनाला वैचारिक दिवाळखोरीने ग्रासले आहे. भरभक्कम पगार आणि प्रत्येक ठिकाणी उपलब्ध मध्यम मार्ग, यामुळे या क्षेत्रात काम करणारे लोक नवे काही निर्माण करतील, अशी आशा बाळगायला किंचितही जागा उरलेली नाही. अशा काळात एखाद्या संवेदनाशील शिक्षकाचे स्वतंत्र दृष्टी दर्शवणारे हस्तलिखित आपल्या हाती पडले तर जी स्थिती एखाद्याची होईल, तीच स्थिती गणेश मोहिते यांच्या या हस्तलिखितामुळे माझी झाली आहे.
.................................................................................................................................................................
बीइंग – विजय अशोक इंदुशोकाई, आऱ्हान मीडियास्मिथस, नाशिक, पाने – २२२ (हार्डबाऊंड), मूल्य - ३६० रुपये
हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5250/Being
.................................................................................................................................................................
गणेश मोहिते यांनी हे लेख एका वर्तमानपत्रात सदरलेखनासाठी वेळोवेळी लिहिलेले आहेत. कोणत्याही वर्तमानपत्रात दर आठवड्याला सदर चालवणे ही अत्यंत जिकिरीचे गोष्ट असते. त्यासाठी आवश्यक असणारे सातत्य आणि चिंतन सर्वांच्या जवळ असतेच असे नाही. त्यामुळे असे सदरलेखन जास्तीत जास्त वेळा सामान्य निपजण्याची शक्यता अधिक असते. पण स्वतःची स्वतंत्र वैचारिक बैठक आणि मूलभूत चिंतन ज्याच्याकडे असते, त्याचे सदरलेखन कधीकधी यशस्वी होऊन जाते. अशा सदरातून त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व संपूर्णपणे आपोआपच झिरपत असते. व्यक्तीची विचार करण्याची पद्धती जीवनविषयक दृष्टिकोन आणि व्यासंग याचे दर्शन अशा सदरातून घडते. व्यक्तीने स्वतःला कितीही लपवायचे ठरवले तरी अशा सदरातील शब्द त्याला उघडे पाडत असतात. त्यामुळे सदलेखन ही जोखीम असते.
मराठीत उत्तम सदरलेखनाची परंपरा अस्तित्वात आहे. अनेक महत्त्वाच्या लेखकांनी वेगवेगळ्या नियतकालिकांत, वर्तमानपत्रांत सदरलेखन करून मराठीला उत्तम ग्रंथांचे योगदान दिले आहे. तेंडुलकरांची ‘कोवळी उन्हे’, दि.पु. चित्रे यांच्या ‘चाव्या’, महेश एलकुंचवार यांचे ‘विनाशवेळा’, कवी ग्रेस यांचे ‘मितवा’ अशी अलीकडच्या काळातील सहज आठवणारी ग्रंथांची नावे. या लेखकांनी सदर लेखनाद्वारे मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे.
सदर लेखनाच्या वाटचालीचा स्वतंत्र इतिहास सांगणारा एखादा निबंध आपल्याकडे उपलब्ध नाही, यातून सदर लेखनाकडे दुय्यम पद्धतीने पाहिले जाते का, असे म्हणायला जागा आहे. पण माझ्या मते लेखकाला कलाकृतीतून शोधताना ज्या मर्यादा येतात, त्या मर्यादा सदरलेखनातून त्याला तपासताना बाजूस होतात. सदर लेखनात लेखकाला स्वतःला जपणे, झाकून ठेवणे शक्य होत नाही. नकळत त्याचे शब्द त्याचे चरित्र घेऊन येतात. त्यामुळे लेखकाचा मूळ चेहरा शोधायला सदर उपयुक्त ठरते. सदरलेखनातून एखाद्या लेखकाची जीवनदृष्टी जितक्या सहजपणे अभिव्यक्त होते, तितक्या सहजपणे अन्य कलाकृतींमधून अभिव्यक्त होईलच असे सांगता येत नाही. त्यामुळे सदर लेखन हेही उपयुक्त लेखन आहे आणि त्याकडे गंभीरपणे पाहिले पाहिजे असे, माझे मत आहे.
सदरलेखनाबाबत आणखीन एक गोष्ट गंभीरपणे ध्यानात घेतली पाहिजे, ती म्हणजे सदरलेखन कोण करते आहे. त्या लेखनकर्त्याचे वर्तमान महत्त्वाचे असते. वर्तमानपत्रात नोकरी करणाऱ्या लोकांना नेहमीच वेगळी सदरे लिहावी लागतात. ती त्यांची व्यावसायिक गरज असते. अशा लेखकांना सदरलेखन हा सरावाने साध्य झालेला लेखनयोग असतो. व्यावसायिक जबाबदारी म्हणून त्यांना ते लेखन नित्यनियमाने करावे लागते.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
या बरोबरच मुक्त पत्रकारिता करणारे लोकही वेगवेगळ्या वर्तमानपत्रांतून वेगवेगळी सदरे लिहीत असतात. अशा काही लेखकांचे वेगवेगळ्या वर्तमानपत्रांतून नित्यनियमाने लेखन येत असते. वृत्तपत्रांतील पगारी सदरलेखक आणि मुक्त पत्रकारिता करणाऱ्या लेखकांचे सदरलेखन हे व्यावसायिक पद्धतीचे असण्याची शक्यता अधिक असते. गरज म्हणून त्यांना विषयाचा शोध घ्यावा लागतो आणि त्यावर सदर लिहावे लागत असते. गरजेतून उत्पन्न होणारे सदर हे नित्य नुतन, सुंदरच असेल असे म्हणणे तितकेसे धाडसाचेच होईल. दररोज काहीतरी लिहिले पाहिजे, या न्यायाने हे सदर लेखन चाललेले असते. परंतु एखादा सर्जनशील लेखक जेव्हा सदरलेखन करतो, तेव्हा ती त्याची गरज असण्याची शक्यता कमी असते. कधीकधी बळजबरीने त्याला सदरलेखन करण्यास भाग पाडले जात असते. कधीकधी स्वतःच्या गरजेतूनही लेखक असे सदरलेखन करण्यास प्रवृत्त होत असतात.
सर्जनशील लेखकाचे सदरलेखन आणि व्यावसायिक पत्रकाराचे सदरलेखन याचा विचार स्वतंत्रपणे केला पाहिजे. सर्जनशील लेखक जेव्हा सदर लिहितो, तेव्हा त्याला व्यक्त व्हायचे असते. काहीतरी गंभीर मांडायचे असते आणि त्या गरजेतून तो सदरलेखनाकडे वळलेला असतो. अर्थप्राप्ती अथवा व्यवसायिक जबाबदारी असे त्यामध्ये काहीही नसते. फक्त त्याच्या लेखनगुणामुळे त्याला सदरलेखनासाठी निमंत्रित केलेले असते. अशा लेखकाचे सदर काहीतरी ठोस निर्मितीकडे वळण्याची शक्यता अधिक असते. कधीकधी अशा सर्जनशील लेखकाचे सदर अत्यंत निकृष्ट दर्जाचे होण्याची शक्यताही गृहीत धरली पाहिजे. काही लेखकांना शब्द मर्यादित लिहिणे शक्य नसते किंवा मागणी तसा पुरवठा करणे हा त्यांचा स्वभाव नसतो. अशा वेळी बिनधास्तपणे लेखनाकडे न वळता सक्ती म्हणून सदरलेखनाकडे वळतो, तेव्हा त्याचे सदर योग्य त्या दर्जाला उतरण्याची शक्यता कमी असते. अशी फसलेली सदरेही मराठीमध्ये आपल्याला वाचावयास मिळतात.
लेखकाला व्यक्त होत असताना त्याच्या अभिव्यक्तीसाठी आवश्यक असा रूपबंध सापडला नाही, तर तो नीट व्यक्त होण्याची शक्यता कमी होत जाते. ही गोष्ट आपण सदरलेखनामध्ये गृहीत धरली पाहिजे. मराठीतले बरेच गंभीर लेखक वर्तमानपत्रात लिहिणे हेच मुळात कमीपणाचे मानतात. त्यांच्या दृष्टीने दीर्घ चिंतनाने एखादी कलाकृती निर्माण होते. वर्तमानपत्री लेखनातून चिंतन ऐवज वाया जाण्याची शक्यता असते, असे त्यांनी आयुष्यभर मांडलेले असते. ते त्यांच्या व्रतांशी कायमपणे चिकटून राहतात. मराठीत वर्तमानपत्रात एकही शब्द न लिहिलेल्या लेखकांची नावेही आपल्याला सहज सांगता येतात. त्यांना सदरलेखन हा फालतू उद्योग वाटत असतो. ते त्यांच्या दृष्टीने खरेही असते. परंतु सर्वच सदरलेखन या दृष्टीने तपासता येत नाही.
नामदेव ढसाळांचे ‘आंधळे शतक’ हे सदरलेखन होते. चित्रे-एलकुंचवार यांनीही सदरलेखनातून गंभीर कलाकृती दिली आहे. त्यामुळे सदर लेखनाचा विचार करत असताना सावधपणा बाळगणे अत्यंत गरजेचे असते.
गणेश मोहिते यांनी ‘वर्तनाचे वर्तमान’ हे सदरलेखन अत्यंत गंभीरपणे केलेले आहे. ते ज्या मराठवाड्यामध्ये जन्मास आले आणि बीड-उस्मानाबाद भागात नोकरी करू लागले, त्या वेळी त्यांना जाणवलेल्या भोवतालच्या सर्व समस्या त्यांनी आपल्या सदरामध्ये गंभीरपणे लिहिल्या आहेत. वर्तमानाला तपासत असताना एकाच एका दृष्टिकोनातून न तपासता समग्रपणे तपासण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे. मराठवाड्याचा संपूर्ण प्रदेश हा सतत दुष्काळाने ग्रासलेला आणि प्रचंड बेरोजगारीच्या समस्येने वेढलेला. पाण्याचे दुर्भिक्ष आणि उत्पन्नाची कोणतीही शक्यता नाही, अशी जगणारी हजारो कुटुंबं… अशा वेळी शिक्षणाने आपल्या घरात सुबत्ता येईल अशी राबणाऱ्या आई-वडिलांची अपेक्षा. पण तेथेही येणारी निराशा माणसाची जगण्याची इच्छा संपून कशी टाकते, याचे भान या सदलेखकाला आहे.
..................................................................................................................................................................
हेही पाहा : ‘खिंडीत’ : शैक्षणिक जगताच्या अंतरंगाची विरूपता भेदकपणे उलगडणाऱ्या कथा
..................................................................................................................................................................
त्याचबरोबर सरकारी व्यवस्था आणि अवर्षण स्थितीवर केले जाणारे उपाय यामध्ये होणारी अनागोंदी या लेखकाने जवळून पाहिलेली आहे. याबरोबरच शेती व्यवसायात निर्माण झालेल्या नवनव्या समस्या या लेखकाने जवळून अनुभवल्या आहेत. गावगाड्यातल्या बदलत्या स्थितीचे यथायोग्य आकलन करण्याची क्षमता लेखकांमध्ये आहे. त्यामुळे कोणत्याही प्रश्नाच्या गाभ्यापर्यंत पोहोचण्याची त्यांची आकांक्षा या प्रत्येक लेखातून दिसते.
मराठवाड्यात मुलींच्या लग्नाची झालेली गंभीर समस्या, त्यावर सामुदायिक विवाह हा शोधलेला उपाय याबाबत लिहिताना त्यांनी स्त्रीच्या वाट्याला येणारे दुःख आणि आपले सामाजिक वास्तव याचा नेमका वेध घेतलेला आहे. शिक्षणक्षेत्रातील भ्रष्टाचार यावर त्यांना नेमकेपणाने बोट ठेवता येते. शेतकऱ्यांची होणारी चेष्टा आणि त्याच्या दुःखाचा मांडलेला बाजार या लेखकाला अस्वस्थ करून जातो. यामुळे हा लेखनऐवज चिंतनशील वाचकाला विचारप्रवृत्त करतो.
या ग्रंथातील ‘कर्जमाफीचे कवित्व’, ‘शेतकरी संपावर जातोय’, ‘लग्न आनंदसोहळा की यातनोत्सव?’, ‘मराठीची उपासमारी इंग्रजीची दुकानदारी’, ‘बखाड’, ‘उपेक्षांचा प्रदेश मराठवाडा’ यांसारखे लेख मुळातूनच वाचले पाहिजेत.
वर्तमानात सजग असणे, वर्तमानाला शोधण्याची इच्छा असणे आणि वर्तमानाला समग्र दृष्टीने तपासणे, अशी आकांक्षा बाळगून गणेश मोहिते या ग्रंथातील प्रत्येक लेख लिहितात. त्यांच्यात असणारा सजग, संवेदनशील शेतकरी अजूनही जिवंत आहे, याची साक्ष यातील अनेक लेख देतात. वरवर सामान्य वाटणाऱ्या आवाजात किती खोल वेदना दडलेली आहे, याचे नेमके दर्शन मोहिते आपल्या लेखनातून देतात. त्यांच्या लेखनामध्ये आढळणारी सहज स्वाभाविकता आणि चिंतनशीलता जशी महत्त्वाची आहे, तशीच शब्दबंबाळ शैलीशरणता न बाळगता मुळाकडे सरकण्याची आकांक्षाही उठून दिसणारी आहे. यामुळे यातील कोणताही लेख वाचत असताना आपण मराठवाड्यातील खेड्याला समजून घेतो आहोत, तेथील समस्येने आपणच पोळतो आहोत, असे सतत वाटत राहते.
यामधून त्यांच्या अष्टावधानी स्वभावाचे आपल्याला प्रत्यंतर येते. कोणताही विषय हाताळताना त्या विषयाची आपल्याला नेमकी जाण असली पाहिजे, हा त्यांच्यामध्ये असलेला आग्रहीपणा या लेखनातही झिरपलेला आहे. उगाच शब्दांची उधळण करावी आणि सदर रंजक करावे, असे त्यांना बिलकूल वाटत नाही. जे लिहायचे ते अत्यंत सावधपणे, समग्रपणे आणि विश्लेषक पद्धतीने लिहायचे, हा त्यांचा मनोधर्म आहे.
खेड्यापाड्यातील राजकारण, समाजकारण, धर्मकारण, शिक्षण या सगळ्याचा वेध घेता घेता, शेतीकारणाकडे मात्र त्यांचे मन अधिक झुकलेले दिसते. शेतीविषयीची असणारी ही त्यांची अवस्था त्यांच्या पिढीजात शेतकरी असण्याचे साक्ष देते. ‘एक साकडे विठ्ठलाला’, ‘प्रश्न भुकेचा आहे हो’, ‘पुन्हा नवी चाल कर’ यासारखे लेख मुळातूनच वाचले पाहिजेत.
.................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
काही लेख वाचत असताना मोहितेंनी हे दीर्घ स्वरूपात लिहायला हवे होते, असे वाटून जाते, पण सदरलेखनात शब्दमर्यादा नावाची जाचक अट नकळत अशा लेखनावर अन्याय करून जाते. मोहिते यांच्या काही लेखांवर या शब्दमर्यादा प्रकरणाने भलताच अन्याय केलेला आहे. असे असले तरी उपलब्ध अवकाशाचा वापर करून अल्पाक्षरी होऊन नेमका आशय वाचकांपर्यंत पोहचवला पाहिजे, या जिद्दीने त्यांनी अनेक विषय अत्यंत सखोलपणे हाताळण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुळात मोहिते यांचा मनःपिंड गंभीर विचारकाचा असल्यामुळे त्यांनी या संपूर्ण लेखांमध्ये आपल्या प्रतिभेला सत्त्वपरीक्षेला बसवलेले आहे. काही ठिकाणी ते सत्त्वपरीक्षेत यशस्वी होतात, तर काही ठिकाणे काठावर पास होण्याचे प्रयत्नही करतात
माझ्या दृष्टीने गणेश मोहितेसारखा आजचा प्राध्यापक आजच्या ‘वर्तनाचे वर्तमान’ शोधतो, ही आश्वासक गोष्ट आहे. त्यांच्यातील संशोधकाच्या व्यासंगी खुणा या संपूर्ण लेखनात आपल्याला आढळतात. पुढच्या आयुष्यात गंभीरपणे संशोधनात स्वतःला गुंतवून घेतले तर महाराष्ट्राच्या गावगाड्याला एक नवा विचारक भेटणार आहे, याची खात्री हे लेख वाचत असताना पटत जाते. भाषेची समज, शैली घडवण्याचे प्रयत्न, प्रश्नांची निवड, प्रश्नांच्या मुळाशी जाण्याची आकांक्षा, संयत भाषा, फारसे शब्दबंबाळ न होता नेमकेपणाने आशयाला अभिव्यक्त करण्याचे कसब आणि वाचकाला तसूभर वाढवण्याची बाळगलेली आकांक्षा, यामुळे ‘वर्तनाचे वर्तमान’ हे लेखन वाचकाच्या पसंती निश्चितच उतरेल, अशी आशा वाटते.
‘वर्तनाचे वर्तमान’ - गणेश मोहिते, अक्षरवाड्मय प्रकाशन, पुणे, पाने - १६८, मूल्य - २०० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Kishor Gorde
Fri , 18 December 2020
डॉ. गणेश मोहिते सरांच्या या ग्रंथातून 'वर्तमान' समस्यांकडे पाहण्याची उत्सुकता लागली आहे, स्वागत आहे. येथे अक्षरनामा ने उत्तम रीतीने 'सदर' ग्रंथाचा परिचय करून दिला आहे.