‘खिंडीत’ : शैक्षणिक जगताच्या अंतरंगाची विरूपता भेदकपणे उलगडणाऱ्या कथा
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
आशुतोष पाटील
  • ‘खिंडीत’ या कथासंग्रहाचे मुखपृष्ठ
  • Wed , 16 December 2020
  • ग्रंथनामा शिफारस खिंडीत Khindit निम्बाकृष्ण ठाकरे Nimbakrushna Thakare

एकोणिसाव्या शतकातील प्रबोधनयुगाने आपल्याकडील आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेला चालना दिली. त्यात ब्रिटिश सत्ताधाऱ्यांनी रुजुवात केलेल्या शिक्षणव्यवस्थेची भूमिका महत्त्वाची होती. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे अशी संस्थात्मक उभारणी करून आपल्या देशातील शिक्षणव्यवस्थेचे प्रारूप साकार होण्यास याच काळात सुरुवात झाली. इंग्रजी शिक्षण प्राप्त केलेल्या येथील तरुणांनी आधुनिक जीवनदृष्टी अंगीकारून स्व-समाज, संस्कृती यांची चिकित्सा करण्यास प्रारंभ केला. त्यातूनच धर्म-समाजसुधारणा चळवळींचे पर्व साकार झाले. आधुनिक शिक्षणामुळे भावनिक आणि वैचारिक स्तरांवरून विकसित होण्यासाठी उपलब्ध झालेल्या अवकाशामुळे आपल्या समाजाच्या आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेला गती मिळेल, असा आशावाद तत्कालीन समाजसुधारकांना होता.

उच्चवर्णीयांपुरत्या मर्यादित असलेल्या शिक्षणातून उन्नत होण्याचा अवकाश महात्मा जोतीबा व सावित्रीबाई फुले यांच्या कठोर परिश्रमांमुळे शूद्रातिशूद्रांसाठी खुला झाला. एकंदर, समाजाच्या निरनिराळ्या स्तरांमधील जीवनावकाशांचे भान घेऊन आलेले आगरकर असू देत किंवा ‍फुले, सगळ्याच समाजसुधारकांनी शिक्षणाला वैयक्तिक आणि सामाजिक उन्नतीचे एक लक्षणीय साधन म्हणून सर्वोपरी प्राधान्य दिले.

जसजसा शिक्षणाच्या प्रक्रियेचा विस्तार होईल, तसतसा आपला समाज ‘आधुनिक’ होईल, माणसे भावनिक-वैचारिकदृष्ट्या अधिकाधिक नीतिमान, प्रगल्भ, संवेदनशील, मानुषतापूर्ण होत जातील, असा प्रगाढ आशावाद प्रबोधनाच्या प्रक्रियेने आपल्या उराशी बाळगला होता. त्याला आज शतकभराहून अधिक कालावधी लोटला आहे.

.................................................................................................................................................................

बीइंग – विजय अशोक इंदुशोकाई, आऱ्हान मीडियास्मिथस, नाशिक, पाने – २२२ (हार्डबाऊंड), मूल्य - ३६० रुपये

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5250/Being

.................................................................................................................................................................

शिक्षणव्यवस्थेचा आडवा-उभा विस्तार झाला आहे. शिक्षणाच्या सर्वसमावेशकतेचा प्रश्न शिल्लक असला तरी समाजाच्या सगळ्याच स्तरांमधून शिक्षणाच्या प्रवाहात आलेल्या घटकांची संख्या आज वाढती आहे. संख्यात्मकदृष्ट्या विस्तारलेल्या शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे यांचे जाळे आज आपल्यासमोर आहे. परंतु आधुनिक शिक्षणप्रक्रियेने गतिमान केलेल्या वैयक्तिक आणि सामाजिक स्तरावरील ‘माणूस’ म्हणून उन्नत होण्याच्या प्रवासाचे नेमके काय झाले, हा प्रश्न अद्याप शिल्लक आहेच.

शिक्षणव्यवस्थेचे सगळे लाभ घेऊन उच्चविद्याविभूषित झालेल्या, प्रतिष्ठित झालेल्या माणसांचा (सुशिक्षित?) केवळ वर्तनव्यवहार नव्हे, तर त्यांची भावनिक व वैचारिक गुंतवणूकदेखील शिक्षणाच्या मूल्यात्म गाभ्याच्या विपरिततेचा प्रत्यय देणारी आहे. याचा प्रत्यय देणारी असंख्य उदाहरणे आपल्या भोवतालात आज बेछूटपणे वावरत आहेत. याच वास्तवाने अस्वस्थ झालेल्या एका संवेदनशील माणसाच्या लेखणीतून आकारास आलेल्या कथा ‘खिंडीत’ या कथासंग्रहातून आपल्याला वाचायला मिळतात.

निम्बाकृष्ण ठाकरे यांचा हा नवीन कथासंग्रह हर्मिस प्रकाशनाने अलीकडेच प्रकाशित केला आहे. या लेखकाचा पहिला कथासंग्रह ‘निम्बोळ’ १९८४ साली प्रकाशित झाला होता. त्यानंतर ३६ वर्षांनंतर हा दुसरा कथासंग्रह आला आहे. लक्षणीय बाब म्हणजे ‘अनुष्टुभ’ मासिकाने आयोजित केलेल्या ‘रेऊ कथालेखन स्पर्धे’त पारितोषिक मिळवणाऱ्या कथाकाराचा हा संग्रह आहे. याशिवाय ‘शून्य आणि इन्फिनिटी’ (१९९६) हा कवितासंग्रह या लेखकाच्या नावावर आहे.

मोराणे (ता. जि. धुळे) या एका लहानशा गावात जन्माला आलेल्या निम्बाकृष्ण ठाकरे यांच्या वाट्याला शिक्षणक्षेत्रातील विविध आघाड्यांवरील अनेक घटना-प्रसंग-व्यक्ती-तपशील यांनी समृद्ध असे आयुष्य आले. प्राध्यापक, विद्यापीठातील एका प्रतिष्ठित अध्यासनाचे प्रमुख, प्राचार्य, कुलगुरू असा चौफर शैक्षणिक प्रवास त्यांनी केला. आताही गेल्या दशकभराहून अधिक काळापासून प्राथमिक-माध्यमिक शिक्षणाच्या प्रक्रियेत ते सक्रियेतेने गुंतलेले आहेत.

याचा अर्थ निम्बाकृष्ण ठाकरे यांच्या आयुष्याचा निम्म्याहून अधिक कालखंडाचा अवकाश शिक्षणव्यवस्थेच्या निरनिराळ्या अवस्थांनी व्यापलेला आहे, अजूनही त्यांचे आयुष्य त्याच अवकाशात विहरत आहे. त्यामुळे त्यांच्या कथालेखनाचे आशयकेंद्र शिक्षणव्यवस्था आणि त्यातील विविध अनुभवांचे जग हे असणे स्वाभाविक आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

शेतीमातीच्या जगण्यातून जीवनाकडे बघण्याची भूमीनिष्ठ, मानुषतापूर्ण, संवेदनसंपन्न आणि मूल्ययुक्त दृष्टी व्यक्तित्वात मुरवून वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात वावरणाऱ्या या लेखकाने कल्पनेच्या जगात रममाण होऊन कृतक वास्तववादी जीवनचित्रे आपल्या कथांमधून रेखाटणे शक्यच नव्हते. म्हणूनच त्यांच्या कथांना त्यांच्या जगण्यातील वास्तवाची धार आहे. दीर्घकाळ शिक्षणक्षेत्रात काम करताना स्वकर्तृत्वाच्या मूल्यात्मकतेने प्रकाशमय केलेला विस्तृत शैक्षणिक पट त्यांच्या कथांचा प्रधान आशयस्वर आहे.

‘खिंडीत’ या कथासंग्रहात चार कथा आहेत. त्यापैकी ‘पाडवा’ ही एक कथा वगळता अन्य तीन कथांमधून हाच प्रधानस्वर तीक्ष्णपणे ऐकायला येतो. (तसे पाहता, ‘पाडवा’ या कथेत दारू ‍पिऊन झिंगणाऱ्या, एसटीत गोंधळ घालणाऱ्या दोन व्यक्तींपैकी एकजण प्राथमिक शिक्षक असणे, हा उल्लेख आहेच. पण या कथेचा उर्वरित संदर्भ निराळा आहे.)

‘जूला’ (‘रेऊ पारितोषिक’ प्राप्त कथा) ही शेवटची कथा बैलगाडीच्या जुला जुंपलेल्या बैलासारखं चाकोरीबद्ध आयुष्य वाट्यास आल्याच्या जाणीवेने अस्वस्थ झालेल्या प्राचार्यांच्या एका अनुभवाचे तृतीयपुरुषी कथन करणारी कहाणी आहे. प्राचार्यांचा हंगेरीहून आलेला मित्र जूला याची धुळ्याला भेट, त्याचे मस्त-कलंदर जगणे, टोयाटो गाडीला दामटवणे आणि त्यातूनच एका संकटाला आमंत्रण देणे, या सगळ्याचे चित्रण करताना ‘बैलांनाच कदाचित अशी जू झुगारता येईल... माणसांना नाही!’ असा प्राचार्यांच्या मनातील विचाराचा भुंगा कथनकार अधोरेखित करत जातो. शिक्षणव्यवस्थेच्या ठराविक दिनक्रमात कोमेजून जाणारे नवनिर्मितीचे कोंब काहीही करून फुलवता यायला हवेत, आपल्यामधील माणूसपणाचा अंश जपता यायला हवा, म्हणून बेचैन असणाऱ्या या कथेतील प्राचार्यांसारख्या व्यक्ती या कथासंग्रहातील कथांच्या केंद्रस्थानी आहेत.

‘खिंडीत’ ही शीर्षककथा अशाच एका नरसोबा कोंडिबा गोरे नावाच्या प्राध्यापकाने विद्यापीठीय शिक्षणव्यवस्थेशी केलेल्या कठोर संघर्षाची कहाणी प्रस्तुत करते. गावाकडून आलेला, गणित या आपल्या विषयात पारंगत असलेला, महत्त्वाचे म्हणजे अध्ययन-अध्यापन-संशोधन यात सतत क्रियाशील कार्यरत राहून नव्या दिशा धुंडाळणारा, संवेदना व विचार यांच्या प्रगल्भतेतून माणसांशी संवादी राहणारा असा हा प्राध्यापक.

विद्यापीठातील टिळक चेअरवरील निवड, विभागप्रमुख म्हणून नियुक्ती, विभागातील वरिष्ठ प्राध्यापकांचा अनुभव, नवीन पदभरती, कुलगुरूंची धोरणे, आपल्या कामावर निष्ठा असूनही विरोधात उभे राहिलेले आंदोलन, एकाकी पडत जाणे आणि या सगळ्यातूनही काहीजणांच्या चांगुलपणाचा आलेला अनुभव, अशा सगळ्या अनुभवांमधून ही कथा साकारली आहे. विद्यापीठीय शिक्षणव्यवस्थेच्या भरकटण्याचे चित्रण ही कथा करते.

..................................................................................................................................................................

हेही पाहा : आधुनिक ‘भारतीय राजकीय विचारा’तले मराठी विचारवंतांचे योगदान स्पष्ट करणारा ग्रंथ

..................................................................................................................................................................

वैयक्तिक हितसंबंध आणि राक्षसी महत्त्वाकांक्षा यांच्या आहारी गेल्यामुळे उच्च शिक्षणातील गुणवत्तेला तर हरताळ फासला जात आहेच, पण त्याचबरोबर ही व्यवस्था आपल्या मूलभूत भूमिकेपासूनही फारकत घेत चालली आहे, हे विदारक वास्तव डॉ. गोरे यांच्यासारख्या या साऱ्याची चाड बाळगणाऱ्या प्राध्यापकाला केंद्रस्थानी ठेवून लेखकाने चितारले आहे.

या कथेचा शेवट कथेच्या शीर्षकाच्या अन्वयार्थाचे सूचन करणारा आहे. सरळमार्गी, कार्यतत्पर, कर्तव्यनिष्ठ वृत्तीची डॉ. गोरे यांच्यासारखी माणसे विद्यापीठीय व्यवस्थेच्या कचाट्यात सापडतात, तेव्हा त्यांची अवस्था खिंडीत पकडले गेल्यासारखी होते. कोणत्याही वाममार्गाचा अवलंब न करता, लांड्यालबाड्या-कटकारस्थाने न करतादेखील वाट्यास येणारा व्यवस्थाधुरिणांचा तुच्छतावादी दृष्टिकोन आणि विरोधात उभा राहणारा सारा भोवताल डॉ. गोरे यांची कुचंबणा करतो.

कथाकार लिहितो, “विद्यापीठ परिसरात माणसं काम करण्याऐवजी गॉसिपिंग जास्त करतात. आणि शिक्षक त्यात सापडला की शिक्षणाचं खोबरं झालंच...(पृ. ८६)... तर ह्या वर्गातले बरेच लोक ‘ड्रिलिंग आणि पंपिंगचं’ कुकर्म करत आनंदानं जीवन व्यतीत करत असतात. अगोदर ड्रिलिंग करून माहिती मिळवतात आणि नंतर पंपिंग करून ती सर्वदूर पसरवतात...”(पृ. ९०)

असा सगळा उच्च शिक्षणव्यवस्थेतील नि:सत्त्वाचा अनुभव आल्यानंतर, आपण सचोटीने काम करत असूनही भोगाव्या लागणाऱ्या अवहेलनेने व्यथित होऊन डॉ. गोरे संतापाच्या भरात एका प्राध्यापकाच्या स्कूटरवर दगडे फेकून मारतात. आतल्या आत धुमसणाऱ्या उद्विग्नतेला या ‍खिंडीतून वाट मोकळी करून देतात आणि शांत चित्ताने “...या सडलेल्या व्यवस्थेत उत्तर द्यायचं असेल, पर्याय निर्माण करायचा असेल तर रक्त जाळणारा फुले व्हायला हवं, घाम गाळणारा आंबेडकर व्हायला हवं, शेती फुलवणारा कुणबी-शेतकरी व्हायला हवं... कापसाच्या बोंडातून कापूस वेचणारा मजूर व्हायला हवं... या खिंडीतनं बाहेर पडण्यासाठी आपण आपलं काम इमानं-इतबारीनं केलं पाहिजे...” (पृ. १०६) अशी स्वत:ची मूल्यात्मक वाट शोधून काढतात.

‘फार न शिकलेल्या साध्या माणसांना बदलवता येतं, पण खूप शिकलेल्या विद्वानांबद्दल खात्री देता येत नाही.” (पृ. ७६) असे एक मार्मिक विधान या कथेच्या निवेदनात आले आहे. प्रबोधनयुगाने उराशी बाळगलेले मानवी संवेदना व विवेक यांच्या विकसनाचे शिक्षणप्रक्रियेचे मूळ उद्दिष्ट आज कुठवर आले आहे, याचा अन्वयार्थ या विधानावरून लावता येतो.

..................................................................................................................................................................

हेही पाहा : स्थलांतरितांचं उपरं विश्व समजून घेण्याचा हा प्रयत्न आहे. यात मानवी अधोगतीबरोबर प्रगतीच्याही खाणाखुणा आहेत

..................................................................................................................................................................

निम्बाकृष्ण ठाकरे यांच्या कथांमधून हा शोध घेण्याची ऊर्मी सतत जाणवत राहते. मात्र उच्च शिक्षणक्षेत्रातील विपरित वास्तवाचे निव्वळ चित्रण करणे वा ढासळणाऱ्या शिक्षणव्यवस्थेबाबत हळहळ व्यक्त करणे, या भूमिकेतून हे कथालेखन आकारास आलेले नाही. तर या व्यवस्थेशी संबंधित सर्वच घटकांच्या अंत:करणातील कर्तव्यनिष्ठा, सचोटी, कार्यप्रवणता आणि या सर्वांच्या मुळाशी असलेली संवेदना व ‍विवेक यांची मूल्यगर्भता यांचे पाझर पुनश्च प्रवाहित व्हावेत, ही तगमग या कथालेखनाला आकार देण्यास प्रामुख्याने कारणीभूत ठरली आहे.

म्हणूनच विपरित शैक्षणिक वास्तवाची असंवेदनशीलता व विवेकहीनता किती भीषण आहे, हे ठळकपणे अधोरेखित करणारी ‘शिमगा’ ही एक उत्कृष्ट कथा या कथासंग्रहात आपल्याला वाचायला मिळते. ४८ पानांच्या या कथेत विद्यापीठ कॅम्पसवरील क्वॉर्टर्समध्ये राहणाऱ्या प्राध्यापकांच्या शिमग्याच्या निमित्ताने घडणाऱ्या मनमुक्त वागण्याचे-गप्पाटप्पांचे चित्रण येते. त्यातून प्राध्यापकी पेशा अंगीकारणाऱ्या विविध व्यक्तींच्या वृत्ती-प्रवृत्तींचे दर्शन तर घडतेच, पण त्याचबरोबर उच्च शिक्षणाच्या माध्यमातून युवापिढीच्या मन-मेंदूची जडणघडण करणाऱ्या विद्यापीठांच्या विकृत अंतरंगावरही मर्मभेदक प्रकाश टाकला जातो. विद्यापीठाच्या निरनिराळ्या विभागांत काम करणाऱ्या प्राध्यापकांच्या व्यक्तिरेखा साकारून दारू, भांग यांना जवळ करून त्यांनी साजरा केलेला शिमगा ही कथाकाराने तयार केलेली एकप्रकारे पार्श्वभूमी आहे.

अशा प्राध्यापकांच्या एकत्र जमण्यातून, नशेच्या आहारी गेल्याने ढासळलेला तोल व संयम यातून घडलेली शाब्दिक चर्चा, त्यातून समाज-संस्कृती-राजकारण-धर्म-लिंग-राष्ट्र आणि शिक्षण यांबद्दल त्यांनी व्यक्त केलेल्या आपापल्या भूमिका कथाकाराला वाचकांसमोर प्रामुख्याने ठेवायच्या आहेत. शैक्षणिक जगताच्या अंतरंगाची विरूपता त्यातून भेदकपणे उलगडली जाते. तथाकथित सुशिक्षित विद्वज्जनांच्या भावनिक व वैचारिक विकसनाची उंची आ‍णि खोलीही त्यातून लक्षात येते.

विद्यापीठ कॅम्पसवरील प्राध्यापकांमध्ये पाळले जाणारे सोवळे-ओवळे, ब्राह्मण व इतर यांच्यात अद्यापही शिल्लक असलेले दृश्य-अदृश्य अंतर, रा.स्व.संघ, दलित, कम्युनिस्ट, सोशलिस्ट यांच्या भूमिकांचे आग्रह-दुराग्रह, विद्यापीठ नामांतर चळवळ, त्याबाबतचे मतप्रवाह, राखीव जागा धोरणाबाबतचे उलट-सुलट दृष्टिकोन अशा विषयांवरील वाद-प्रतिवादातून पुढे जाणाऱ्या या प्राध्यापकांच्या गप्पा, प्राध्यापकांची प्रेमप्रकरणे, बढती मिळवण्यासाठी व ईसीमध्ये जागा मिळवण्यासाठी प्राध्यापक करत असलेल्या उचापती, कुलगुरूंच्या उखाळ्यापाखळ्या, वैयक्तिक लाभासाठी प्राध्यापकाने विद्यापीठाच्या व्यवस्थेचा केलेला दुरुपयोग, प्रसंगी त्यासाठी पत्करलेली लाचारी अशा विषयांकडे कधी वळतात, हे त्यांचे त्यांनाच कळत नाही.

..................................................................................................................................................................

हेही पाहा : एकविसाव्या शतकात ‘आंबेडकरी तत्त्वज्ञाना’त लिहिली जाणारी कविता कशी असेल, याचं उत्तर म्हणजे ‘बीइंग’ हा कवितासंग्रह

..................................................................................................................................................................

त्यात वैयक्तिक उणीदुणी काढली जातात. असभ्य भाषेत एकमेकांवर शाब्दिक चिखलफेक केली जाते. निमित्तच शिमग्याचे असल्याने कोणतेही श्लील-अश्लीलतेचे बंधन न पाळता ही प्राध्यापक मंडळी स्वच्छंदपणे व्यक्त होतात. आणि त्यातूनच “देशाच्या शैक्षणिक आकाशात ह्या शिमग्यापासून नव्या इतिहासाचे असे धूमकेतू आता चमकणार होते.” (पृ. ६४) अशा काहीशा उपरोधिक, काहीशा खेदजनक विधानाने कथेचा शेवट होतो.

अध्ययन-अध्यापन-संशोधन यांमधून ज्ञाननिर्मिती करण्याच्या महत्त्वपूर्ण प्रक्रियेचा एक भाग असलेल्या विद्यापीठातील प्राध्यापकांच्या अंतर्मनाच्या तळाशी दडलेल्या, प्रसंगी त्यांच्या वागण्या-बोलण्यातून कळत-नकळतपणे प्रकट होणाऱ्या संकुचित, विकीर्ण, असंवेदनशील, अविवेकी, अमानवी दृष्टीचे पापुद्रे उलगडून दाखवणारी ही कथा आहे.

उच्च शिक्षणक्षेत्रातील समकालीन वास्तवाचा निव्वळ एक अंशरूप भाग या कथेतून आला आहे, असे म्हणावे लागते. या अधोगामी वास्तवाचा संपूर्ण हिमनग लेखनाशयाच्या आवाक्यात घेण्यासाठी निम्बाकृष्ण ठाकरे यांनी कादंबरीच्या विस्तृत अवकाशाकडे वळायला हरकत नाही. कथासंग्रहाच्या मलपृष्ठावरील मजकुरात भालचंद्र नेमाडे यांनी तसा निर्देश केलेला आहेच.

आपल्या जीवनप्रवासातील अनुभव कथेतून मांडणे, एवढेच या लेखकाला करावयाचे नाही. कारण त्यांचे कार्यकर्तृत्व प्राध्यापक-प्राचार्य-कुलगुरू या भूमिकांमधून घडलेले असले तरी त्यांचा मूलभूत पिंड संवेदनक्षम, निर्मितीक्षम कलावंताचा आहे. एक प्रशासक म्हणून त्यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची (आताचे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव) पायाभरणी करून उभारलेले ‘शिक्षणशिल्प’ त्यांच्या सर्जक पिंडाची साक्ष देणारे आहे.

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

माणसे जाणून-समजून घेणे, त्यांच्याशी प्रसंगानुरूप कठोर-मृदू रीतीने संवादी राहणे, विवेकी दृष्टीची आंतरिक ज्योत तेवत ठेवताना माणसांशी भावनिक बंध जोडून ठेवण्याच्या ऊर्मीने अस्वस्थ होणे, हा त्यांचा जीवनधर्म असल्यामुळे त्यांच्या कथांमधील व्यक्ती-घटना-प्रसंग यांचे चित्रणही त्याच पद्धतीने आले आहे. जीवनप्रवाहाच्या वाहतेपणाकडे वस्तुनिष्ठपणे आणि मूल्ययुक्त दृष्टीने बघण्याची असोशी त्यांच्या कथांमधील निवेदनाला एक विशिष्ट सूर प्रदान करणारी ठरते.

शिक्षणक्षेत्रातील ऱ्हासमान पर्वाचे वास्तव उघड्या डोळ्यांनी पाहताना त्याच्याशी डोळा भिडवून, त्याच्या विरूपेतचा आडवा-उभा छेद घेऊन त्याला आरसा दाखवण्यासाठी अपरिहार्य असे नैतिक मूल्यभान बाळगणाऱ्या व्यक्ती वा निवेदक निम्बाकृष्ण ठाकरे यांच्या कथांमधून येतात. ‘सत्य-असत्याशी मन केले ग्वाही’ असे मूल्यभान केवळ शिक्षणाच्याच नव्हे तर साहित्य-संस्कृतीच्या क्षेत्रांतूनही दुरापास्त होत चाललेले असताना ‘खिंडीत’ या कथासंग्रहातील कथांमधून आलेल्या कथा मात्र आशय आणि अभिव्यक्ती या दोन्ही अंगांनी त्या मार्गाचे अनुसरण करणाऱ्या आहेत, ही बाब लक्षणीय आहे.

एकंदर मानवी संवेदना व विवेक यांच्या समकालीन उच्चविद्याविभूषितांच्या जीवनव्यवहारातून हद्दपार होण्यामुळे उच्च शिक्षणव्यवस्थेची अवस्था खिंडीत गाठल्यासारखी झाली आहे. याचे विदारक दर्शन घडवणारा निम्बाकृष्ण ठाकरे यांचा हा कथासंग्रह शिक्षणप्रक्रियेच्या केंद्रस्थानी असलेल्या मानवी मूल्यभानाच्या गाभ्याला आवाहन करणारा आहे.

‘खिंडीत’ - निम्बाकृष्ण ठाकरे, हर्मिस प्रकाशन, पुणे. मूल्य – १६० रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5254/Khindit

.................................................................................................................................................................

लेखक प्रा. आशुतोष पाटील ‘कवि-तारती’ या केवळ कवितेला वाहिलेल्या द्वै-मासिकाचे संपादक आहेत.

pashutosh30@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......