भारतीय स्त्रियांना ‘सावित्री २.० व्हायचं’ असेल तर...
अर्धेजग - कळीचे प्रश्न
डॉ. वृषाली रामदास राऊत
  • प्रातिनिधिक चित्र
  • Tue , 15 December 2020
  • अर्धेजग कळीचे प्रश्न स्त्री पुरुष लैंगिक संबंध भावनिकता बुद्ध्यांक मानसिक आजार

‘भुलभुलैया’ या हिंदी सिनेमात मंजूलिका या स्त्रीच्या मनातील दबलेल्या भावना किती विचित्र व भयानक रूप घेऊ शकतात, हे बऱ्यापैकी नाटकीय पद्धतीनं मांडलं होतं (सिनेमा ठीकठाक होता, पण २००७मध्ये मानसिक आजारावर आजच्यासारखं कुणीच मोकळेपणाने बोलायचं नाही, त्यामुळे चालला!).

भारतीय समाज पुरुषाकडे ‘मालमत्ता’ (asset) व स्त्रीकडे ‘जोखीम’ (liability) म्हणून बघतो. स्त्रियांना मिळणारी ही दुय्यम/हीन वागणूक त्यांच्या मानसिक त्रासाचं कारण ठरतं. सगळ्यातच कमी वाटा आल्यानं पुरुषाच्या तुलनेत शारीरिक, मानसिक व बौद्धिक वाढ कमी राहून पुढे आत्मविश्वासही कमीच राहतो. पुरुषासाठी आपलं अस्तिव असून त्याला खुश ठेवणं, त्याचा अहंकार दुखावला जाईल असं कृत्य न करणं, आपल्या शारीरिक व मानसिक गरजा दाबणं आणि हेच दुसऱ्या स्त्रियांकडूनही अपेक्षित करणं, किंबहुना त्यांनासुद्धा असंच वागण्यासाठी प्रवृत्त करणं असे प्रकार स्त्रियांमध्ये कमीपणाची भावना, अवलंबित्व, निराशा, चिंता व भावनिक कोंडमारा निर्माण करतात. त्यामुळे स्त्रियांना वेगवेगळ्या प्रकारे व वेगवेगळ्या वयात मानसिक आजार होतात.

भारतातला गेल्या काही शतकांत परकीय आक्रमणांमुळे असंख्य विचित्र रूढी व परंपरा स्त्रीवर लादल्या गेल्या. परकीय आक्रमणांत स्त्रीवर होणाऱ्या अत्याचारांपासून तिला सुरक्षित ठेवण्याच्या प्रयत्नात तिला समाजाने कधी पिंजर्‍यात घातलं, हे त्याच्याही लक्षात आलं नाही. हे करताना आपण तिला सुरक्षा देण्यात कमी पडतो, हे मात्र पुरुष सोयीस्कररीत्या विसरला. स्त्रीसुद्धा आपलं अस्तित्व पुरुषाच्या सुखात आहे, हे मानू लागली. त्यामुळे ‘माझं रक्षण मी पण करू शकते’, मला स्वत:च्या मानसिक व शारीरिक गरजा आहेत व त्या पूर्ण नाही झाल्या तर त्याचा त्रास मलाही होईल, हे स्त्रीला न समजल्याने त्यांच्या जनुकांमध्ये परवालंबित्व ठसलं आहे.

स्त्रीच्या मानसिक आरोग्याचा विचार करताना तिची शारीरिक वाढ लक्षात घ्यायला पाहिजे. जी स्त्री दुसर्‍या स्त्रीला जन्म देते, तीच अशक्त असल्यास जन्माला येणारी स्त्रीसुद्धा अशक्तच राहते. बहुतेक घरात मुलीला सुरुवातीपासूनच जुळवून घेण्याची सवय पडावी म्हणून खायला कमी देतात. ऊर्जा कमी असल्याने अशा मुली मैदानी खेळात कमी भाग घेतात. त्यामुळे आत्मविश्वास, हिंमत, नेतृत्व कुशलता, भावनिक साक्षरता या सगळ्या गोष्टी मुलींमध्ये पुरेशा विकसित होत नाहीत. गेल्या काही वर्षांत तर बारीक व गोरं दिसण्याच्या नादात मुली सकस आहार घेत नाहीत आणि उन्हात त्वचा रापेल म्हणून मैदानी खेळ खेळत नाहीत.

‘Sound mind in sound body’प्रमाणे ‘दुबळ शरीरं व अस्थिर मन’ हे पुढे जाऊन त्रासदायक ठरतं. जननी जर दुबळी असेल तर जन्माला येणारी पिढीसुद्धा दुबळी राहते आणि हे चक्र अव्याहतपणे सुरू आहे. पुरेसा पोषक आहार नसल्याने स्त्रियांमध्ये बुद्ध्यांक, सर्जनशीलता व इतर अनेक बौद्धिक घटक नीट विकसित होत नाहीत.

.................................................................................................................................................................

बीइंग – विजय अशोक इंदुशोकाई, आऱ्हान मीडियास्मिथस, नाशिक, पाने – २२२ (हार्डबाऊंड), मूल्य - ३६० रुपये

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5250/Being

.................................................................................................................................................................

अन्न, पाणी व हवा या प्रमाणे लैंगिक इच्छा हीसुद्धा पूर्ण न झाल्यास शरीर व मन यांवर विपरीत परिणाम होतात. भारतात स्त्रियांची लैंगिक गरज ही कधीच स्वतंत्रपणे मांडली गेली नाही. ‘खजुराहो’ व ‘कामसूत्र’च्या देशात असंख्य स्त्रियांना पाळी का येते, हेसुद्धा माहीत नसतं. इतर घटकांप्रमाणे आपलं शरीर हे पुरुषांच्या सुखासाठी आहे, या एका सूत्रातून सौंदर्य प्रसाधनं, जाहिराती, सौंदर्य स्पर्धा, सिनेमा (नट्या, मॉडेल्स) व पॉर्न जगत चालतं. इतर अनेक सुखांप्रमाणे हे सुखही पूर्णपणे स्त्रीच्या वाट्याला येत नाही. पुरुषाला जशी गरज असते, तेवढीच गरज स्त्रीलासुद्धा असते आणि शरीरसंबंध हे फक्त मूल जन्माला घालण्यासाठी नसून मन व शरीराच्या आनंदासाठी असतात.

पुरुषाची लैंगिक भावना ही नैसर्गिक गरज व स्त्रियांची लैंगिक भावना वाईट चरित्राचं लक्षण, असा भेद केल्याने दाबल्या गेलेल्या किंवा अपूर्ण लैंगिक इच्छा या मानसिक रोगाचं मूळ ठरतात. स्त्रीसाठी शारीरिक संबंध हे अनेक दृष्टीनं महत्त्वपूर्ण असतात. त्यात तिला आवडत्या पुरुषाकडून स्वीकृती (शारीरिक व मानसिक) मिळते. वेगवेगळे हॉर्मोन्सचे स्त्राव आनंदाची अनुभूती देतात. स्वीकृती असलेल्या शारीरिक संबंधात स्त्रीला सुरक्षित वाटतं व आत्मविश्वास वाढतो.

या अगदी उलट जे शरीरसंबंध इच्छेविरुद्ध बळजबरी/व्यवहार/भावना शून्य असतात, त्यातून होणारा त्रास हा स्त्रियांना वेगवेगळे शारीरिक व मानसिक आजार देतो. धार्मिक रूढी/अंधश्रद्धा यांच्या पगड्यामुळे स्त्रियांना वाटणारी शरीरसंबंधाची किळस, जोडीदाराशी नसलेले भावनिक संबंध, शारीरिक दुखणी या सर्वांचा स्त्रीच्या लैंगिक आयुष्यावर परिणाम होतो.

गेल्या काही वर्षांत मात्र स्त्रिया लैंगिक संबंधांच्या बाबतीत काही प्रमाणात मोकळेपणाने बोलत आहेत, पण अनेक वेळा चुकीच्या मार्गानं गोष्टी जात आहेत. विवाहबाह्य संबंधांचं वाढलेलं प्रमाण, दुरावत चाललेली नाती, घटस्फोट, नात्यातला एकटेपणा या सगळ्या गोष्टी मूळ प्रश्न सोडवत नाहीत. अनेक लैंगिक जोडीदार बदलूनसुद्धा असमाधानी असलेल्या स्त्रिया व मुली निराशा, चिंता, व्यसन यांच्या चक्रात अडकलेल्या आढळतात.

त्वचेचा रंग हा भारतीय स्त्रीच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम करणारा सगळ्यात मोठा घटक आहे. मी स्वत: रंगाने सावळी आहे. लहानपणापासून रंगावरून विविध अनुभव येतात. शिक्षण, नोकरी व जोडीदार निवडताना त्वचेचा रंग महत्त्वाचा ठरतो. गोर्‍या रंगाला झुकतं माप दिलं जातं. हा रंग हा देवाशी किंवा श्रीमंतीशी जोडला गेल्याने काळा रंग असणार्‍या स्त्रिया लहानपणापासून कमीपणाची भावना घेऊन जगतात. त्यांच्यात आत्मविश्वास कमी असतो, स्वप्रतिमा दुबळी असते. शाळेत/कॉलेजातसुद्धा त्यांना रंगावरून चिडवलं जातं. त्यात शिक्षकही असतात.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

तरुणवयात जेव्हा दुसर्‍या व्यक्तीविषयी आकर्षण वाटायला सुरुवात होते, तेव्हा गोर्‍या मुलींना भाव मिळाल्याने सावळ्या मुलींच्या मनावर खूप वाईट परिणाम होतो. प्रसारमाध्यमंही सावळ्या स्त्रिया दु:खी व निराश असतात आणि त्वचेचा रंग गोरा केल्यास त्या आनंदी जीवन जगतात, असं सांगून त्यांची उत्पादनं खपवतात. अनेक चांगल्या अभिनेत्रींनी त्वचेचा रंग गोरा केल्याची उदाहरणं आहेत. सावळ्या स्त्रिया स्वत:ला कमी लेखतात. त्यामुळे आपण यश मिळवू शकतो, चांगले पैसे कमवू शकतो, योग्य जोडीदार मिळवून आनंदी आयुष्य जगू शकतो, असा विचार करू शकत नाहीत. कारण ‘तुमची तशी लायकी नाही’ असं त्यांच्या मनावर सतत बिंबवल्याने त्या स्वप्नंच बघत नाहीत. अनेक इच्छा, स्वप्न व भावना दाबून ठेवल्याने वेगवेगळे मानसिक आजार - ताण, निराशा, चिंता, लठ्ठपणा - सुरू होतात. अव्यक्त भावना चुकीच्या पद्धतीने बाहेर येतात. त्यातून सूड, हिंसा व कट-कारस्थानं होतात.

शरीराचा आकार व ज्याला सौंदर्याचे मापदंड मानतात ते स्तन व नितंब यांच्या आकारावरूनसुद्धा स्त्रीला अनेक गोष्टी सहन कराव्या लागतात. कमनीय बांधा हा चांगली जनुकं, पोषक आहार व योग्य व्यायाम यावर अवलंबून असतो. परंतु स्तन/नितंब यांचा लहान आकार हा अनेक स्त्रियांमध्ये कमीपणाची भावना रुजवतो. आपलं शरीर किंवा त्यातील एखादा भाग न आवडणं, त्यावरून दुसर्‍या व्यक्तीशी किंवा पडद्यावरील प्रतिमेशी सतत तुलना करणं व त्यात बदल करून घेण्यासाठी सतत प्रयत्न करणं, हे ताणाला आमंत्रण देतं.

गोरा रंग व बारीक राहणं यामुळे अनेक भारतीय स्त्रिया व तरुण मुली eating disorders म्हणजे anorexia व bulimiaच्या शिकार होतात. काही सन्मानीय अपवाद वगळता बहुतांश मॉडेल्स, टीव्ही व सिनेमांत काम करणाऱ्या स्त्रियांना बराच ताण सहन करावा लागतो. सतत आनंदी, सजून व बारीक राहणं शक्यच नसतं, पण आपल्याला ते कळत नाही. आपण 24X7 तसंच राहण्याचा निरर्थक प्रयत्न करतो. पडद्यावर दिसतं ते सगळंच खरं नसतं. जसं बारीक राहणं शक्य नाही, तसंच पडद्यावर काम करणाऱ्या लठ्ठ स्त्रियांनाही आदर्श मानू नये.

स्त्रियांमध्ये मैत्री न होण्यामागे हेही एक मोठं कारण आहे. सौंदर्य, त्वचेचा रंग, शरीराचा आकार, चेहर्‍याची ठेवण यावरून सतत एकमेकींशी तुलना करण्यानं मन दुखावतात. पुढे ही तुलना लग्न, मुलं व आयुष्यात मिळणारी सुखं यावर जाते आणि मैत्री टिकत नाही.

..................................................................................................................................................................

हेही पाहा : कागदोपत्री मिळालेला वडिलोपार्जित मालमत्तेतला अधिकार व्यवहारात उतरवणं बाईसाठी अतीव जिकिरीचंच आहे...

..................................................................................................................................................................

स्त्रियांची लैंगिक इच्छा यावर अजूनही फारसं बोललं जात नाही. त्या पूर्ण न झाल्याने, दाबल्या गेल्याने वा लैंगिक शोषण किंवा चुकीचे अनुभव मनावर कायमचे ओरखडे सोडतात. शोषण झालेल्या स्त्रिया एकतर कळत-नकळत त्याचा सूड दुसऱ्यावर वेगळ्याच पद्धतीने घेतात किंवा त्या स्वतःला प्रचंड त्रास करून घेतात.

आत्महत्यासारख्या घटना अचानक घडत नाहीत. त्यामागे बऱ्याच दबलेल्या भावना असतात. स्त्रियांच्या भावना व त्यांची भावनिक क्षमता याविषयी बरंच संशोधन झालं आहे. स्त्रिया या जन्मतः भावनिक असतात, असा कोणताही पुरावा नाही. जशी जडणघडण झाली, तसे पुरुष/स्त्रिया वागतात. मी कमालीच्या कठोर, ज्या इतरांच्या मदतीला जात नाहीत, कट-कारस्थान करतात अशा स्त्रिया आणि अत्यंत मृदु व सहसंवेदना असलेले पुरुष बघितले आहेत. पीएच.डी.साठी केलेल्या अभ्यासात स्त्रियांची भावनिक क्षमता पुरुषांपेक्षा कमी असते हे आढळून आले. मुलगा-मुलगी यांना ज्या पद्धतीने भावना समजून घेऊन व्यक्त करायला शिकवले जाते, त्या पद्धतीने त्यांचा भावनिक विकास होतो. मुलं लहानपणी रडतात, पण मुलांना रडणं शोभत नाही असं सांगून गप्पं केलं जातं. याउलट मुलींना मात्र रडू दिलं जातं. रडलं की अनेक गोष्टी आपल्या बाजूनं वळवता येतात, हेही मुली लहानपणीच शिकतात.

कमीपणाची भावना घेऊन स्त्रिया जन्मभर जगतात. स्वतःतील कमीपणाची भावना घालवण्यासाठी नात्यांचा आधार घेण्याच्या नादात मुली, स्त्रिया आणखी दुःखं ओढवून घेतात. गेल्या काही वर्षांत शाळेत असल्यापासून नात्याच्या अनुभव घेऊन पुढेही अनेक नाती करत स्वतःला न भेटलेल्या स्त्रिया असंख्य आहेत. ‘Eat, pray & love’ या सिनेमातील पात्र नात्यांचा गुंता एकटी राहून सोडवते. सतत कुणीतरी सोबत असणं हे co-dependencyचं लक्षण आहे, जर तुम्ही स्वतःसोबत आरामात राहू शकता, तर तुम्ही कुणाशिवाय, कुणासोबतही आनंदात राहू शकता.

मातृत्व हासुद्धा एक सोशल-बायोलॉजिकल अपघात नाही. सगळ्या स्त्रियांना मातृत्व मनापासून हवंच असतं, असं अजिबात नाही. बहुतेक स्त्रिया लग्नानंतरचा सोपस्कार म्हणून किंवा लग्न टिकावं म्हणून किंवा दबाव आहे म्हणून मुलाला जन्म देतात. भारतात अजूनही ठरवून विवाह होतात, अनेक वेळा मुलीच्या मर्जीविरूद्ध लग्न लावण्यात येतं, तिथं न आवडलेल्या पुरुषाशी शरीरसंबंध व त्यातून जन्माला येणारं मूल हेसुद्धा नकोसं ठरतं. अनेक सुसंस्कृत स्त्रियासुद्धा एक आई म्हणून अनेक वेळा अपयशी ठरतात. एक पालक म्हणून हवा असणारा संयम व जबाबदारी अंगभूत नसताना आई होण्याच्या स्त्रीच्या इच्छेचा विचार होणं गरजेचं आहे. लादलेलं मातृत्व हे बाळासाठी घातक ठरतं. अनेक स्त्रिया बाळाला पुरेसं प्रेम व काळजी देऊ शकत नाहीत. त्यामुळे ‘स्त्री ही अनंत काळाची माता असते’ असं सांगून, देवत्व बहाल करून भारतीय समाज तिला व्यक्ती म्हणून जगूच देत नाही.

बाळाला जन्म देणार्‍या नोकरदार स्त्रियांना वेगळी आव्हानं असतात. मूल पोटात असताना कामावर जाणं, कामाच्या ठिकाणी हव्या तश्या सोयीसुविधा उपलब्ध नसणं, घरी आल्यावर घरची कामं, पुरेशी ‘मातृत्व रजा’ न मिळणं आणि त्यामुळे बाळाकडे लक्ष न देणं, अशी कसरत करताना त्या मातृत्वाचा आनंद घेऊ शकत नाहीत. अनेक वेळा हा सल व अपराधी भाव घेऊन स्त्रिया जगतात.

..................................................................................................................................................................

हेही पाहा : करोना महामारी गरिबांच्या, त्यातही महिलांच्या पिळवणुकीत दिवसेंदिवस अधिकाधिक भर टाकत आहे...

..................................................................................................................................................................

गेल्या काही वर्षांत कामासाठी बाहेर पडलेल्या स्त्रीला येणारे अनुभव त्रासदायक आहेत. सॉफ्टवेअर उद्योगामुळे मुंबई-पुण्याकडे गेल्या २० वर्षांत झालेली स्थलांतराचे समाजावर फार वेगळे परिणाम झालेले आहेत. खासकरून कुटुंबव्यवस्था, लग्नसंस्था व स्त्री स्वातंत्र्य यात मोठे बदल घडले आहेत. लिव्ह-इन नाती, लग्न न केलेल्या, घटस्फोटीत स्त्रिया असा एक वेगळा वर्ग उदयास आला आहे. त्यांची आव्हानं वेगळी आहेत, त्यांचे मानसिक ताण वेगळे आहेत. शारीरिक व मानसिक गरजा दाबणं किंवा त्या पूर्ण करण्यासाठी योग्य मार्ग न मिळणं, यामुळे होणारे त्रास, एकटी स्त्री ‘available’ असते अशी धारणा असणारे पुरुष असं सगळं सहन करत स्त्रिया स्वत: आयुष्य जगण्याच्या प्रयत्न करतात. त्यातून येणारा एकटेपणा भयानक असतो. सामाजिक माध्यमांवर कितीही मित्र-मैत्रिणी असले तरी एका विशिष्ट वयानंतर सगळी मंडळी कुटुंबात गुंतल्यामुळे एकट्या स्त्रियांना अनेक प्रकारच्या मानसिक त्रासाचा सामना करावा लागतो. त्यात प्रामुख्याने ताण, चिंता व निराशा हे आजार येतात.

भारतात लग्न हे एका विशिष्ट वयाच्या आधी करायच्या अट्टाहासामुळे करिअर करणार्‍या किंवा काही कारणाने लग्न उशिरा करणार्‍या स्त्रियांना समजून घेणारा जोडीदार मिळत नाही. चाळिशीत लग्न करणार्‍या पुरुषाला त्याच्यापेक्षा अत्यंत लहान वयाच्या स्त्रीशी लग्न करायचं असतं. त्यामुळे पस्तीशीपुढे गेलेल्या स्त्रीला जोडीदार मिळणं कठीण जातं. वाढत्या वयासोबत येणारे शारीरिक व मानसिक आजार, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी राहणं व दुसर्‍या स्त्रियांकडून (आई, बहि‍णी, मैत्रिणी व ऑफिस मधील सहकारी) पुरेसा पाठिंबा न मिळणं, यामुळेही एकट्या स्त्रियांना त्रास  होतो.

महाराष्ट्रात जातीय समाजरचनेनुसार ब्राह्मण स्त्रिया या जास्त स्वतंत्र व पुढारलेल्या दिसतात. खाजगी व सरकारी या दोन्ही ठिकाणी ब्राह्मण समाजातील स्त्रिया मोठ्या प्रमाणात जबाबदारीच्या पदावर काम करताना दिसतात. उशिरा लग्न किंवा दुसरं लग्न हे स्वीकारलं जाण्याचं प्रमाण वाढलं आहे. याउलट बहुजनसमाजात अजूनही हुंडा पद्धती, स्त्रियांना दुय्यम स्थान, लग्नानंतर होणारा छळ, दुय्यम वागणूक व अंधश्रद्धा यांचं प्रमाण मोठं आहे.

बदलत्या पिढीनुसार स्त्रियांची भावनिक कोंडमारा व्यक्त करण्याची पद्धतही बदलतेय. पूर्वी अंगात येणं, उन्माद (hysteria), भूत दिसणं/लागणं असे प्रकार होत, तर आता अनेक प्रकारची व्यसनं दिसतात. दारू, सिगरेट, गांजा व सोशल मीडियावर सतत व्यक्त होणं, व्हॉटसअॅपचे स्टेटस किंवा डीपी बदलत राहणं, फेसबुक-इन्स्टाग्राम-टिकटॉकवर सतत काहीतरी टाकत राहणं इत्यादींचा या व्यसनांत समावेश होतो. अनेकांचं व्हॉटसअॅपचे स्टेटस बघून लक्षात येतं की, हिला कुणाला/अनेकांना ‘काहीतरी सांगायचं’ पण प्रत्यक्ष नाही व्यक्त होता येत. (कोणे एके काळी मी पण हे अनुभवलं आहे). खऱ्या आयुष्यात ‘व्यक्त’ न झाल्यानं, भावना साचत राहून कधीतरी त्या चुकीच्या पद्धतीनं बाहेर पडतात.

याला psychosomatic disorders म्हणतात. यातून depression, anxiety disorder, migraine, headache, thyroid, obesity, eating disorders असे आजार होतात. सोशल मीडिया हा नवीन युगातील भावनिक विरेचन करण्याचे साधन बनला आहे आणि प्रत्येक व्यक्तीची सोशल मीडिया टाइमलाइन ही त्याच्या भावनिक आरोग्याचा आरसा असतो.

..................................................................................................................................................................

हेही पाहा : ‘जाहीर प्रदर्शन मांडलं नाही तर ती भावना तुमच्यात नाही’, अशी वृत्ती असणाऱ्या मंडळींना ‘महात्मा गांधी’ कळणं अशक्य आहे!

..................................................................................................................................................................

काही मानसिक आजार हे फक्त स्त्रियांमध्ये आढळतात. यात PMS (Pre-menstrual symptoms) म्हणजे मासिक पाळीशी संबंधित आजारांचा समावेश होतो. मासिक पाळी येण्यापूर्वी  चिडचिड, भूक व झोपेत बदल होणे, कामांत एकाग्र न होऊ शकणं, आजूबाजूच्या लोकांवर चिडचिड होणं असे प्रकार येतात. बैठं काम, एसी ऑफिस, व्यायामाचा अभाव, निकृष्ट अन्न यामुळे वाढलेला लठ्ठपणा हा पीसीओडी, थायराइड, अनियमित पाळी, रक्तातील साखर वाढणं यास कारणीभूत ठरत आहे. बीपीओ व रात्रीच्या वेळी काम करणार्‍या स्त्रियांना पुरेशी झोप न मिळाल्यामुळेसुद्धा वरील शारीरिक व त्यातून येणारी मानसिक आजाराची लक्षणं दिसून येतात.

प्रत्येक स्त्रीला जन्माला आल्यापासून वेगवेगळ्या शारीरिक अवस्था अनुभवाव्या लागतात. त्या अवस्था मानसिक आरोग्यावर परिणाम करतात. परंतु शारीरिक बदल नीट न समजल्यामुळे होणारा मनाचा गोंधळ, वाटणारी लज्जा व भीती, चुकीची माहिती यामुळे स्त्रियांना या बदलांना नीट हाताळता येत नाही. मासिक पाळी, शारीरिक संबध, लग्न, मूल जन्माला घालणं व त्याचा सांभाळ, घराची जबाबदारी, कामाच्या ठिकाणचा ताण, मेनोपॉज, जोडीदाराचा विरह/मृत्यू, मुलं मोठी झाल्यानंतर येणारी पोकळी, या सगळ्या अवस्थांचा मनावर होणारा परिणाम, याचा विचार करणं गरजेचं आहे.

स्त्रियांच्या मानसिक आरोग्यावर बोलताना धर्म व अंधश्रद्धा यावर बोलावंच लागतं, कारण स्त्रीला धर्माने दुय्यम स्थान देऊन तिच्यावर सगळ्या पुण्यकर्माची जबाबदारी टाकली आहे. स्त्रियांना लहानपणापासून परावलंबी केल्यामुळे त्यांच्यातली आत्मविश्वासाची कमतरता अंधश्रद्धा, व्रतवैकल्यं, अतार्किक गोष्टींवर विश्वास ठेवायला कारणीभूत ठरते. दुबळं शरीर व घाबरलेलं मन हे तार्किक विचार करण्यास असमर्थ असतं.

केशवपन, सती जाणं, बालविधवा हे अघोरी प्रकार ज्यांनी भोगले असतील, त्यांना काय वाटलं असेल याची कल्पना करवत नाही. हे प्रकार स्त्री ही पुरुषाची मालमत्ता असून तिने नवरा गेल्यावर जगूच नये किंवा विद्रूप होऊन जगावं, तिला स्वत:च्या इच्-आकांशा नसाव्यात असे विचार करणार्‍यांनी सुरू केले होते. अजूनही हुंडाबळी, घरगुती हिंसाचार, बलात्कार, gender pay गॅप, कामाच्या ठिकाणी दुय्यम वागणूक अशा स्वरूपात स्त्रियांना अन्याय सहन करावा लागतो.

अपराधीपणा, लज्जा व भीती यामुळे चांगल्या बुद्ध्यांक असणाऱ्या व मोठ्या पदावर काम करणाऱ्या स्त्रिया मी बुवाबाजी, कर्मकांडाच्या नादाला लागतात. त्यातूनही त्यांचं शारीरिक व आर्थिक शोषण होतं.

डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी जे काही अफाट करून ठेवलं आहे, त्यामुळे असंख्य स्त्रियांनी त्यांना रोज हात जोडले पाहिजेत. पण अजूनही शहरातील स्त्रियासुद्धा उपवास, व्रत अशा कर्मकांडात अडकलेल्या आढळतात. सोवळं, विटाळ असे शब्द अजूनही आपल्या शब्दकोशात आहेत.

स्त्रियांमध्ये लज्जा, भीती, चिंता व अपराधीपणा या भावनाचा पगडा जास्त दिसून येतो. तो त्यांच्या मानसिक आरोग्यावर खूप प्रभाव टाकतो. कौमार्याच्या विचित्र कल्पनांमुळे भारतीय स्त्रिया लग्नाआधी शरीरसंबंध ठेवायला घाबरतात. आजसुद्धा अनेक ठिकाणी कौमार्य चाचणी होते. नवर्‍याला कळेल या भीतीनं मुली शस्त्रक्रिया करून परत कौमार्य मिळवतात.

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

कामाच्या ठिकाणी स्त्री अनेक लोकांना अजूनही रुचत नाही. मी घरापासून लांब राहून १३ वर्षं काम केलं आहे. या प्रवासात कामाच्या निमित्तानं जे अनुभव आले, त्यात मोजके सन्माननीय अपवाद सोडल्यास बहुतेक स्त्रियांना आपण कशासाठी काम करतो हे कळत नाही. अनेक जणी झटपट यश मिळवण्याच्या नादात चुकीच्या मार्गांचा अवलंब करतात. बहुसंख्य स्त्रिया परिस्थितीला शरण जाऊन वाट्याला आलेल्या गोष्टी गुपचूप स्वीकारतात. एचआर म्हणून काम करताना दोन स्त्री कर्मचार्‍यांचे अनुभव आयुष्यभर लक्षात राहतील असे आहेत. स्त्रियासुद्धा सत्ता व पैशासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात, हे मी बघितलं आहे. त्यामुळे केवळ पुरुषच भ्रष्ट असतात, हा जनमान्य समज चुकीचा आहे.

मोनिका लेविन्स्की ही व्यक्ती काही लोकांना आठवत असेल. तिचं एक अत्यंत सुंदर भाषण आहे. त्यात तिने अनुभवलेल्या गोष्टी, cyber bullying, स्त्रियांना जाणवणाऱ्या कठीण भावना अप्रतिमपणे मांडल्या आहेत. तिला लोक, विशेषतः स्त्रिया नावं ठेवतील, पण एका चुकीचा स्त्रीला आयुष्यभर किती त्रास सहन करावा लागतो, हे त्यातून लक्षात येतं. त्याच वेळी त्यात गुंतलेल्या एका महासत्तेचा राष्ट्राध्यक्ष मात्र आरामात आयुष्य घालवतो.

स्त्रिया जन्मतः भावनिक असतात असा कोणताही पुरावा नाही. जशी जडणघडण झाली तशीच पुरुष/स्त्रिया वागतात. मी कमालीच्या कठोर स्त्रिया - ज्या मदतीला जात नाही, कट-कारस्थानं करतात, पण अत्यंत मृदु व सहसंवेदना असलेले पुरुष बघितले आहेत. स्त्रियांमध्ये कुठलं टॅलेंट कमी पडतं असं नाही, पण जेव्हा काम करायची वेळ येते, तेव्हा planning, execution, work ethics, commitment, confidence या अनेक बाबतीत स्त्रिया कमी पडतात. त्यात त्यांच्या मानसिक व शारीरिक आरोग्याचा भाग येतोच. त्यांना सामाजिक पाठिंबाही कमी पडतो.

भारतीय संविधानाने स्त्रियांना जे अधिकार दिले आहेत. त्यानुसार ‘सावित्री २.० व्हायचं’ असेल तर निव्वळ पदवी न घेता आर्थिक दृष्टीनं स्वावलंबी होणं, मानसिक व शारीरिक आरोग्य सांभाळणं आणि दुसऱ्या स्त्रीला मदत करण्याचा किमान प्रयत्न करणं (judge न करता ऐकून घेणं), या गोष्टींची गरज आहे.

..................................................................................................................................................................

लेखिका डॉ. वृषाली रामदास राऊत विश्वकर्मा विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक आहेत.

vrushali31@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा