शब्दांचे वेध : पुष्प अठरावे
धुंद येथ मी, स्वैर झोकितो मद्याचे प्याले
याच वेळी तू असशील तेथे बाळा पाजविले
सुधीर फडके यांनी गायलेले हे एक अतिशय सुमधुर आणि भावपूर्ण गीत आहे. मद्याच्या नशेत एका मद्यप्याने केलेले हे प्रकट चिंतन आहे. ही क्षणिक उपरती आहे की त्याला झालेला साक्षात्कार, कोण जाणे! पण दारू चढली की निदान तेवढा वेळ तरी माणसे बहुधा खोटे बोलत नाहीत, असे पाहण्यात आले आहे. म्हणूनच ‘In vino veritas’ (in wine, there is truth) असे प्लिनी द एल्डर याने इसवी सन ७७ मध्येच लिहून ठेवले होते. दारूच्या नशेत लोक काय वाटेल ते बरळतात, रडतात, पश्चात्ताप व्यक्त करतात, भांडतात, हसतात, आणि मनात दडलेली गुपिते बाहेर काढतात.
सुधीर फडके यांचा हा तळीराम या अशाच मद्यजन्य पश्चात्तापाच्या मूडमध्ये असताना हे हृदयस्पर्शी शब्द उद्गारतो. ते ऐकून दारूबंदीचे कट्टर पुरस्कर्ते आणि भारतातले ‘वाऊझर’ मोरारजी देसाई आणि त्यांच्यासारखे अन्य कर्मठ गांधीवादीसुद्धा खरं म्हणजे हेलावून जायला हवे होते, पण तसे झाले नाही. या लोकांच्या तालावर नाचणाऱ्या तत्कालीन सनदी अधिकाऱ्यांच्या नोकरशाहीने ‘धुंद येथ मी, स्वैर झोकितो’ या गाण्याला आकाशवाणीत प्रवेशबंदी केली होती, हे तुम्हाला माहीत आहे का?
आता काय परिस्थिती आहे, हे मला माहीत नाही, पण एके काळी हे गाणे कोणत्याही आकाशवाणी केंद्रावरून वाजवले जाऊ नये, असा हुकूम जारी झाला होता. ज्या ग्रामोफोन तबकडीवर एका बाजूला हे गाणे होते, तिच्या विरुद्ध बाजूला असलेले गाणे (बहुतेक ‘तोच चंद्रमा नभात’ असावे, मला आत्ता नक्की आठवत नाही!) हमखास वाजायचे, पण हे गाणे असलेल्या तबकडीच्या बाजूला मोठ्ठ्या लाल अक्षरात ‘NOT TO BE BROADCAST’ असे लिहिले असलेली चिठ्ठी चिकटवलेली असायची. आकाशवाणीवर काम करणाऱ्या एका उद्घोषिकेने मला ही माहिती खूप वर्षांपूर्वी दिली होती. सरकारी नोकरांच्या अरसिकतेचे याहून चांगले उदाहरण शोधून सापडणार नाही!
मागच्या खेपेला माझ्या ज्या ८५ वर्षांच्या मित्राचा मी उल्लेख केला होता, तो या अशा अरसिकांना खूप हसतो. या न्यायाने तर ग़ालिब आणि ओमर खय्याम यांच्या रचनांनाही भारतात बंदी असायला हवी होती, असे तो उपरोधाने म्हणतो. खरेच आहे - बिना शराबचे ग़ालिब आणि ओमर खय्याम पूर्ण होऊच शकत नाहीत.
.................................................................................................................................................................
बीइंग – विजय अशोक इंदुशोकाई, आऱ्हान मीडियास्मिथस, नाशिक, पाने – २२२ (हार्डबाऊंड), मूल्य - ३६० रुपये
हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5250/Being
.................................................................................................................................................................
इंग्रजीसह जगातल्या अनेक भाषांत मद्यावर कथा, कविता, नाटक असे ललित साहित्य सापडते. दारू पिणे हे काही फार मर्दुमकीचे किंवा फुशारकी मारण्याचे काम नक्कीच होऊ शकत नाही, पण त्याचबरोबर जगातला एक फार मोठा वर्ग मद्यपान करतो, हेही विसरता येणार नाही. माफक प्रमाणात मद्य प्यायला हरकत नाही, असे अगदी आयुर्वेदाचार्य चरकानेसुद्धा म्हणून ठेवले आहे.
किन्तु मद्यं स्वभावेन यथैवान्नं तथा स्मृतम् ।
अयुक्तियुक्तं रोगाय, युक्तियुक्तं यथाऽमृतं ।।
मद्य हे स्वभावाने अन्नासारखे शक्तीवर्धक, ऊर्जादेयी आहे. प्रमाणात आणि योग्य प्रकारे घेतल्यास मद्य अमृतासारखे गुणकारी आहे, अतिरेक झाल्यास आणि अयोग्य प्रकारे घेतल्यास मात्र ते हानीकारक आहे. (Wine is like a nectar when someone drinks it in the proper manner, in the proper quantity, at the proper time, with wholesome food, adjusted for the strength of the individual and with merrymaking. On the other hand, it acts like a poison when one indulges in drinking wine of poor quality or in the context of a disorderly lifestyle or excess physical exertion.)
माझा हा जो ८५ वर्षांचा मित्र आहे, तो महर्षी चरकांचा हा उपदेश अगदी तंतोतंत पाळतो. तो अगदी उंची दारू पितो. योग्य प्रमाणात, योग्य वेळी आणि भरपेट जेवणासोबत तो मद्यपान करतो. कोणती दारू केव्हा आणि कशी प्यायची, याचे जे सभ्य संकेत आहेत, ते तो कधीही चुकवत नाही. रसिकतेने स्कॉच व्हिस्की किंवा फ्रेंच वाईन पिणाऱ्यांना अशा अनेक अलिखित नियमांचे पालन करावे लागते. त्यांचे मद्यपान हे नज़ाकतपूर्ण असते. त्यात अदब, शालीनता असते. त्यात एक लहेजा असतो, एक ढंग असतो. आकातल्यासारखी, अधाशासारखी दारू पिणे हा त्या पेयाचा अपमान आहे. दारू पिण्याचा एक घरंदाज, सभ्य, औपचारिक तरिका आहे. कोणती वाईन केव्हा प्यावी, कोणत्या प्रकारच्या ग्लासातून प्यावी, कशी प्यावी, याचे काही ‘फंडे’ आहेत. ते न पाळता तुम्ही सरळ बाटली उघडून थेट तोंडाला लावली तर तसे काही बिघडणार नाही, पण त्यातून तुम्ही ‘सुसंस्कृत’ नाही, हे मात्र सिद्ध होते.
खऱ्या स्टायलिश मद्यप्यांना ‘कोनसर’ (connoisseur) असे म्हणतात. तसे पाहिले तर हा शब्द कला, स्वादिष्ट भोजन, संगीत अशा विविध क्षेत्रांमधल्या जाणकार, गुणग्राहक, गुणज्ञ, पारखी, दर्दी, रसिकाला उद्देशून वापरला जातो. त्याचे मूळ ‘connaisseur’ या फ्रेंच शब्दात आहे. माझा मित्र स्वतःला व्हिस्की आणि वाईन यांचा ‘connoisseur’ समजतो. (आणि तो आहेही.) मात्र जगातल्या तमाम बायकांप्रमाणे त्याच्या बायकोचा त्याच्यावर विश्वास नाही. ती त्याला म्हणते, “तू एक साधा बेवडा आहेस. आणि हे जे नज़ाकतीने पिण्याचे वगैरे थोतांड आहे, याला शुद्ध ‘स्नॉबरी’ (snobbery) म्हणतात.” तसे पाहिले तर स्वतः connoisseur सोडून इतर बहुतेकांच्या मते असे सोपस्कार, उपचार ‘स्नॉबरी’ या प्रकारात येतात, आणि म्हणून रसिक व्हिस्कीवाले त्यांना ‘व्हिस्की-स्नॉब’ वाटतात आणि रसिक वाईनवाले त्यांना ‘वाईन-स्नॉब’ वाटतात. (दारूविषयक स्वतःच्या उच्च प्रतीच्या रसिकतेची घमेंड बाळगणारा!)
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
माझा मित्र त्याच्या खास वऱ्हाडी शैलीत या नावे ठेवणाऱ्या लोकांना शिव्या घालतो आणि म्हणतो, ‘या **ना कशाची चव नाही. बंदर क्या जाने अद्रक का स्वाद’. हे पण खरे आहे. माझा हा मित्र जगभर हिंडला आहे. स्कॉटलंड, इटली, आणि फ्रान्सला त्याने अनेकदा भेटी देऊन तिथले व्हिस्की आणि वाईन कल्चर शिकून घेतले आहे, आत्मसात केले आहे. त्यामुळे त्याला खरोखरच स्कॉच व्हिस्की आणि फ्रेंच-इटलियन वाईन या क्षेत्रातले सगळे काही कळते. तो फोका मारत नाही. तो खऱ्या अर्थाने एक व्हिस्की आणि वाईनतज्ज्ञ आहे.
वाईनतज्ज्ञ असलेल्या लोकांना इंग्रजीत ‘इनोफाईल’ (oenophile) म्हणतात. द्राक्ष किंवा काही अन्य फळांपासून तयार झालेली दारू म्हणजे ‘वाईन’ (wine). वाईन शब्दाचे मूळ लॅटिन भाषेतल्या ‘vinum’ या शब्दात आहे. पण त्या लॅटिन शब्दात ग्रीक भाषेतल्या ‘oinos’ या त्याच अर्थाच्या शब्दाचे पडसाद आहेत. लॅटिन ‘vinum’ आणि ग्रीक ‘oinos’ या दोन शब्दांच्या संयोगाने ‘oeno’ हा मिश्र शब्द तयार झाला. ‘oeno’ म्हणजे वाईनशी संबंधित. फ्रेंच लोकांनी पुढे या ‘oeno’ला ‘phile’ हा ग्रीक शब्द जोडला. ‘फाईल’ (phile) म्हणजे भोक्ता, प्रेमी. यातून ‘oenophile’ हा शब्द तयार झाला. १८५० नंतर या फ्रेंच शब्दाचे इंग्रजी भाषेत आगमन झाले. त्यानंतर ‘oenology’ किंवा ‘enology’ म्हणजे वाईन तयार करण्याचे शास्त्र आणि या शस्त्रातला तज्ज्ञ तो ‘oenologist’ किंवा ‘enologist’ असे आणखी दोन शब्द तयार करण्यात आले.
माझा हा मित्र मुरब्बी ‘oenophile’ आहे आणि ‘oenologist’देखील. म्हणूनच आपण त्याला बाप मानतो. फ्रेंच वाईनपेक्षा इटलियन वाईन जास्त चांगल्या असतात, असे त्याचे वैयक्तिक मत आहे. शॅम्पेनला लोकांनी उगीचच लाडवून ठेवले आहे, असे तो म्हणतो. खरा ‘oenophile’ कसा असतो, याचे उदाहरण देताना तो एक वाह्यात जोक सांगतो. या जोकमधला वाह्यातपणा काढून सभ्य शब्दांत त्याचे मराठीकरण असे करता येईल -
एक वयस्क विदेशी गृहस्थ आपल्या मुंबईच्या एका नामांकित पंच-तारांकित हॉटेलमध्ये मुक्कामाला आले होते. एका रात्री हॉटेलच्या भोजनकक्षात डिनरच्या वेळी त्यांनी ‘Rothschild Mouton 1928’ या वाईनची मागणी केली. वाईन वेटरने त्याप्रमाणे बाटली आणली आणि त्यातली थोडीशी वाईन एका ग्लासात ओतून चाखण्यासाठी त्या विदेशी गृहस्थासमोर ठेवली. त्याने त्या वाईनचा जेमतेम एक घोट घेतला न घेतला आणि ओरडला, ‘ही Rothschild Mouton 1928 वाईन नाही’. त्यानंतर आधी तो वाईन वेटर, मग हेड वेटर, मग मॅनेजर, मग महा-मॅनेजर, अशा १०-२० लोकांनी त्या माणसाला समजावण्याचा बराच प्रयत्न केला की, ही तुला पाहिजे तीच म्हणजे Rothschild Mouton 1928 आहे. तो मात्र आपला हेका सोडायला तयार नव्हता. शेवटी त्या वेटरने विचारले, ‘हे तुम्ही एवढ्या खात्रीपूर्वक कसे काय सांगू शकता?’ यावर तो माणूस शांतपणे म्हणाला, ‘माझे बॅरन द रॉथशिल्ड आहे आणि Rothschild Mouton 1928 ही वाईन माझ्याच कंपनीने तयार केली आहे.’ यावर ओशाळवाण्या चेहऱ्याने कसनुसे हसत त्या वेटरने कबूल केले की, ही खरेच ‘Rothschild Mouton 1928’ वाईनची बाटली नसून ‘Clerc Milon 1928’ या वाईनची आहे. त्या वेळी त्या हॉटेलच्या वाईनच्या साठ्यात ‘Rothschild Mouton 1928’ या दुर्मीळ आणि महागड्या वाईनची फक्त एकच बाटली शिल्लक होती आणि ती देखील संपली जावी असे त्या वाईन-ज्ञानी वेटरला वाटत नव्हते. म्हणून त्याने त्यांच्याजवळची next best वाईन पाहुण्यांना देऊ केली होती. त्याला वाटले की, त्याची थाप पचून जाईल. शेवटी तो म्हणाला, “सर, तुम्ही माझी लबाडी कशी ओळखली ते प्लीज सांगा ना. या दोन्ही वाईन फ्रान्समध्ये एकच गावात बनतात, दोघांचेही द्राक्षमळे त्याच गावात आहेत, एकाच जातीची द्राक्षे दोन्ही वाईनसाठी वापरली जातात, एकाच पद्धतीने त्यांना साठवले जाते, एकाच प्रकारचे हवामान, पाणी तिथे आहे, फक्त फरक एवढाच आहे की, एक द्राक्षमळा गावाच्या डावीकडे आहे आणि एक उजवीकडे. बस! एक छोटेसे भौगोलिक अंतर. पण त्याने असा काय फरक पडतो?”
यावर तो परदेशी पाहुणा म्हणाला, “अरे बाबा, तुझ्या या मुंबईत सगळे काही सारखे असतानाही रेल्वे लाईनच्या एका बाजूला असलेल्या पश्चिम उपनगरांतल्या जागांची किंमत आणि दुसऱ्या बाजूला असलेल्या पूर्व उपनगरांतल्या जागांची किंमत यात जो फरक आहे ना, तेच हे एक छोटेसे भौगोलिक अंतर. यानेच सारे बदलते.”
यातला विनोदाचा भाग सोडून द्या, माझ्या या मित्रासारख्या दर्दी वाईन आणि व्हिस्की पिणाऱ्यांना खरेच चवींमधले हे फरक ताबडतोब लक्षात येतात. ते या बाबतीत मोठे चोखंदळ असतात. ‘भुकेला कोंडा आणि उशाला धोंडा’ हा न्याय वापरून ते जे मिळेल, त्यावर तहान भागवत नाहीत. याउलट, ‘नेसेन तर पीतांबर नाहीतर दिगंबर’ हा त्यांचा बाणा असतो. आणि हवी ती(च) दारू मिळाल्यावरही ते तिच्यावर आधाशासारखे तुटून पडत नाहीत. सावकाश, हळूहळू, आणि चवीचवीने ते आपला एक-दीड पेगचा कोटा पूर्ण करतात आणि आटोपतात. अशा लोकांना म्हणूनच कधी ‘हॅंगओव्हर’ होत नाही. या अर्थाने त्यांच्यासारख्यांची ही व्हिस्की किंवा वाईन स्नॉबरी खरेच काबिले-तारीफ आहे.
..................................................................................................................................................................
हेही पाहा : बा(र)मिसाईडच्या मेजवानीतला मेन्यू : बोलाचीच कढी बोलाचाची भात
..................................................................................................................................................................
‘हॅंगओव्हर’ (Hangover) हा एक मोठा मजेशीर शब्द आहे. एखाद्या जुन्या परंपरेचे काही अवशेष शिल्लक राहणे म्हणजे ‘हॅंगओव्हर’. याचेच रूपांतर पुढे दारू जास्त प्यायल्याने दुसऱ्या दिवशी डोके जड होणे, अंगात शैथिल्य येणे, तोंडाची चव बिघडणे, या अशा सर्व अनिष्ट परिणामांचे वर्णन करणाऱ्या अर्थच्छटेत झाले. तीन हजार वर्षांपूर्वी सुश्रुत संहितेत ‘हॅंगओव्हर’चे पहिल्यांदा वर्णन केले गेले होते.
त्यांनी ‘परमद’ ही संज्ञा यासाठी वापरली होती. १९०४ साली ‘Hangover’ हा शब्द या अर्थाने पहिल्यांदा इंग्रजीत वापरला गेला. डोरोथी पार्कर ही अमेरिकन लेखिका स्टाईनबेकच्या ‘Grapes of Wrath’ या कादंबरीच्या शीर्षकावर श्लेष करत म्हणते की, “A hangover is the wrath of grapes”.
पी. जी. वुडहाऊससारख्या कसबी विनोदकाराने दारू, दारुडे, आणि दारूचे परिणाम यांचा बखुबी वापर आपल्या लिखाणात करून घेतला आहे. ‘The Mating Season’ या कादंबरीत त्याने सहा प्रकारच्या हॅंगओव्हरचा उल्लेख केला आहे. तुम्ही किती आणि काय पिता यानुसार दारूपानाच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला ‘the Broken Compass’, ‘the Sewing Machine’, ‘the Comet’, ‘the Atomic’, ‘the Cement Mixer’ आणि सर्वांत खतरनाक असलेला ‘the Gremlin Boogie’ यापैकी एक किंवा अनेक हॅंगओव्हरचा सामना करावा लागतो.
ही सगळी काल्पनिक पण खूप समर्पक नावे आहेत. ब्रोकन कंपास म्हणजे उत्तर दिशा दाखवणाऱ्या होकायंत्रात बिघाड झाला तर जहाज कोणत्याही दिशेला भरकटू शकते. या प्रकारच्या हॅंगओव्हरमध्ये तुमची अवस्था अशीच होते. सोइंग मशिन म्हणजे शिलाई यंत्राच्या आवाजासारखा आवाज कानात सतत होणे. कॉमेट म्हणजे धूमकेतू. हा हॅंगओव्हर धूमकेतूच्या शेपटीसारखा लांबच लांब असतो. अॅटॉमिक हॅंगओव्हरमध्ये डोक्याचे अणूरेणू विलग होऊन डोके गोल गोल फिरल्यासारखे वाटते. सिमेंट मिक्सरमध्ये सारे काही जोरजोरात आवाज करत वेगाने गोल गोल भ्रमण करते आहे, असे वाटते. ग्रेमलिन बुगी म्हणजे खट्याळ, खोडकर परी किंवा भूतसदृश जीवांनी तुमच्या डोक्यात शिरून केलेला नाच. तुमच्या हॅंगओव्हरच्या तीव्रतेनुसार तो यापैकी कोणत्या प्रकारचा आहे, हे तज्ज्ञांना सांगता येते. ‘Katzenjammer’ हा जर्मन शब्दसुद्धा इंग्रजीत हॅंगओव्हरसाठी पर्यायी शब्द म्हणून १८३४ पासून वापरला गेला आहे. संकटात असलेली मांजर ज्या प्रकारे ओरडेल, त्याप्रकारे डोक्यात होणारे आवाज म्हणजे ‘कॅट्झेनजॅमर’.
पी. जी. वुडहाऊसने इंग्रजी भाषेला सुमारे दोन हजार नव्या शब्दांची भेट दिली. त्यातले किमान शंभर शब्द दारू आणि दारूपानाशी संबंधित आहेत. अर्थ एकच पण छटा वेगळी असलेले असे हे त्यातले काही अनोखे शब्द बघा -
awash
blotto
boiled
fried
full to the back teeth
full to the gills
full to the tonsils
hooched
illuminated
lapping the stuff up by the bucket
lathered
lit a bit
lit up (or lit up like a candelabra)
mopping up the stuff to some extent
not as temperate as one should be
off-colour
oiled
ossified
pie-eyed
plastered
polluted
primed to the sticking point
scrooched
shifting it a bit
sozzled
squiffy
stewed (or stewed to the gills)
stinko
tanked
tight (or tight as an owl)
under the surface
whiffled
wozzled
वुडहाऊसच्या अद्भुत प्रतिभेची चुणूक दाखवणारे हे शब्द वाचून आपल्यालाच झिंगल्यासारखे होते.
..................................................................................................................................................................
हेही पाहा : ‘टल्ली’ आणि ‘टीटोटलर’ - मद्यरूपी नाण्याच्या दोन बाजू
..................................................................................................................................................................
दारू - दारुडे - दारूपान या विषयांशी संबंधित सर्वच शब्दांचा आढावा घेतो म्हटले तर दोन-तीन हजार पानांचा एखादा ग्रंथ लिहावा लागेल. ते या ठिकाणी शक्य नाही. त्यामुळे आता आणखी काही ठळक शब्दांकडे एक नजर टाकून मद्यप्यांच्या दुनियेची ही सफर संपवू या.
ग्लासातल्या दारूचे प्रमाण ठरवायला ‘पेग’ (Peg) हा शब्द भारतात आणि नेपाळमध्ये वापरतात. छोटा (small) किंवा मोठा (large) असे त्याचे दोन प्रकार आहेत. हा शब्द कसा तयार झाला, याविषयी काहीही निश्चितपणे सांगता येत नाही. मात्र ब्रिटिशकालीन भारतात तो पहिल्यांदा वापरला गेला, हे नक्की.
कॉकटेल (Cocktail) याही शब्दाच्या व्युत्पत्तीबद्दल गोंधळ आहे. दोन-तीन तर्क आहेत. त्यातला एक म्हणजे हा शब्द ‘coquetier’ (egg-cup) या फ्रेंच शब्दाचा अपभ्रंश आहे. दुसऱ्या तर्कानुसार जातीवंत घोड्यांना संमिश्र प्रजातीच्या (सामान्य) घोड्यांपासून वेगळे ओळखण्यासाठी संमिश्र प्रजातीच्या घोड्यांच्या शेपटीला कोंबड्याच्या तुऱ्यासारखा आकार दिला जाई. हा आकार म्हणजे कॉकटेल. यातून हा घोडा शुद्ध रक्ताचा नसून भेसळयुक्त आहे, असा अर्थ ध्वनित होई. कालांतराने ही कल्पना दोन वेगवेगळे ड्रिंक्स् एकत्र करून तयार झालेल्या मिश्रणासाठी वापरली जाऊ लागली. १७९५ ते १८०० या काळात अमेरिकेत हा शब्द पहिल्यांदा वापरला गेला, हे मात्र नक्की.
इंग्रज लोक फ्रेंच लोकांना जसे हसतात तसेच ते डच लोकांनाही हसतात. डचांना कमी लेखणारे, त्यांची टिंगल उडवणारे अनेक शब्द इंग्रजीत आहेत. त्यातला एक म्हणजे डच करेज (Dutch courage). यालाच ‘pot-valiance’ (किंवा potvaliancy) असेही म्हणतात. पोटात दारू गेल्यावर तिच्या अंमलाखाली शौर्याचा आव आणणे, पोकळ गप्पा, वल्गना करणे म्हणजे डच करेज. जीन (Gin) हे पेय इंग्लंडमध्ये नेदरलंडसमधूनच आले आहे. त्याचे डच भाषेतले नाव ‘jenever’ असे आहे. या ‘jenever’च्या अंमलाखाली एरवी शेळपट आणि भित्रे असणारे डच सैनिक खऱ्या लढाईत चांगली कामगिरी करतात, असे १६१८ ते १६४८च्या दरम्यान झालेल्या तीस वर्षांच्या युद्धात आणि नंतर १६५२ ते १६७४ या दरम्यान झालेल्या अँग्लो-डच युद्धांत इंग्रजांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी डचांना हिणवणारा हा शब्दप्रयोग तयार केला असा समज आहे.
दारू पिणारा ड्रंकर्ड. न पिणारा टीटोटलर. आणि जो आधी दारू प्यायचा पण ज्याने आता दारू सोडली आहे तो कोण? अशा माणसाला तो आता वॅगनवर आहे - he is ‘on the wagon’ now असे म्हणतात. हा वाक्प्रचार कसा तयार झाला? त्याच्या निर्मितीचे श्रेय देखील अमेरिकन लोकांना जाते. एका तर्कानुसार एकोणिसाव्या शतकात अमेरिकेत जी अनेक मद्य-संयम समाजमंडळे निघाली होती. त्यातल्या सर्वांना मद्यपान विरोधी शपथ घ्यावी लागे. यातल्या कोणाला जर कोणी पुन्हा दारू प्यायचा आग्रह केला तर तो म्हणायचा, “I would drink from the water-cart rather than take strong drink.” म्हणजे मी रस्त्यांवर पाणी शिंपडणाऱ्या पाणी-गाड्यांवर चढून तिथले पाणी पिईन, पण मी दारू पिणार नाही. (त्या काळी बहुतांश रस्ते कच्चे आणि मातीचे किंवा दगडांचे असत. त्यांवर धूळ, चिखल, घोड्यांचे मल-मूत्र पडले असायचे. ते धुवून काढायला आजच्या ‘water tanker’सारखे पाण्याचे टॅंकर घेऊन घोडागाड्या रस्त्यांवरून धावायच्या आणि त्यातल्या पाण्याने रस्ते स्वच्छ धुतले जात असत.)
..................................................................................................................................................................
हेही पाहा : तळीराम, बिब्युलस, वाऊझर यांच्यासह मद्यप्यांच्या दुनियेचा फेरफटका
..................................................................................................................................................................
यातूनच पुढे ‘on the water-cart’, मग ‘on the water-wagon’ आणि शेवटी ‘on the wagon’ असे बदल होत गेले. Alice Caldwell Heganच्या ‘Mrs. Wiggs of the Cabbage Patch’ या १९०१ च्या विनोदी कादंबरीत या वाक्प्रचाराचा पहिल्यांदा वापर करण्यात आला होता, असे मानले जाते – “I wanted to git him some whisky, but hoe shuck his head. ‘I’m on the water-cart.” याबाबत आणखीही काही तर्क आहेत, पण हा जास्त सयुक्तिक वाटतो. ‘Off the wagon’ हा वाक्प्रचार मात्र एकदा दारू सोडून जो पुन्हा दारू प्यायला लागतो त्याचे वर्णन करायला वापरतात.
दारूवरच्या या लेखाचा शेवट दारूच्या देवाचे स्मरण न करताच झाला तर तो रागावेल ना! ग्रीक पुराणांमधला ‘डायोनिसस’ (Dionysus) आणि रोमन पुराणांमधल्या ‘बॅकस’ (Bacchus) हे दोन्ही देव मद्याचे अधिष्ठाता होते. बॅकसपासून ‘bacchanalia’ हा शब्द तयार झाला. श्रावण महिना सुरू व्हायच्या आधीच्या अमावस्येला मुंबई-पुण्याकडे तर श्रावण महिना संपतो त्या अमावस्येला नागपूर-विदर्भात ‘गटारी’चा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्याचप्रमाणे होळी आणि धुळवडीच्या दिवशीसुद्धा अखिल महाराष्ट्रात असाच आणखी एक ओला उत्सव धूमधडाक्यात संपन्न होतो. ठिकठिकाणचे आबालवृद्ध पुरुष बहुसंख्येने या ‘जश्न-ए-शराब’मध्ये सामील होतात.
या सणाला आधी एक युरोपियन भाऊ होता. त्याचे नाव ‘बॅकॅनॅलिया’ (bacchanalia). आधी प्राचीन ग्रीक आणि मग रोमन लोक (महिला आणि पुरुष दोघेही) हा बॅकॅनॅलिया साजरा करून बॅकस देवाच्या स्मरणार्थ मनसोक्त मदिरापान करायचे. अर्थातच एवढी दारू प्यायल्यावर त्यांनी तिथे नंगा नाच केला तर त्यात नवल ते काय? अनिर्बंध, खुले आम दारूप्राशन आणि मुक्त सेक्स, यामुळे हा जुन्या काळचा बॅकॅनॅलिया सण फारच गाजायचा. रोमन साम्राज्याचा अस्त झाल्यावर बॅकॅनॅलिया देखील बंद झाला, पण अनिर्बंध दारूपार्ट्यांसाठी आजही इंग्रजीत ‘बॅकॅनॅलिया’ हा शब्द वापरला जातो. त्याच्या जोडीला ड्रग्ज आणि सेक्स असेल तर आजकाल orgy हा शब्द जास्त प्रचलित आहे. ‘ऑर्जी’ (Orgy) या शब्दाला देखील ग्रीक/रोमन बॅकॅनॅलियाची पार्श्वभूमी असून त्याचाही अर्थ तोच होतो.
.................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
तुम्ही दारू प्या की नका पिऊ, दारूवरचे विनोद वाचायला आणि नाटक-सिनेमांमधल्या दारुड्यांची मजा घ्यायला तर तुमची हरकत नाही ना? चला, असे एखाद्या वाऊझरसारखे सुतकी चेहऱ्याने बसू नका. पी. जी. वुडहाऊसने ‘Miss Springtime’ या नाटकासाठी १९१७ साली लिहिलेले हे विनोदी गाणे वाचा आणि हसा. Smile, please!
“But she wouldn’t drink anything on Sunday,
She’d take a sip on Monday,
On Tuesday she’d indulge in beer,
On Wednesday and Thursday –
Whoops, my dear!
She seemed to lose by Friday
All sense of what was right.
She started out to hit the trail
But her efforts seemed of no avail,
So they brought her cocktails in a pail
To save time Saturday night.''
..................................................................................................................................................................
लेखक हर्षवर्धन निमखेडकर वकील आहेत. वुडहाऊसचे अभ्यासकही.
the.blitheringest.idiot@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment