अजूनकाही
१. निश्चलनीकरणाचा त्रास थोड्या काळासाठीच भोगावा लागणार आहे. मात्र, त्याचे फायदे अधिक आहेत. चांगल्या हेतूने केलेले काम कधीच अपयशी ठरत नाही, असं महात्मा गांधी म्हणायचे. : अरुण जेटली
संदर्भ सोडून का होईना गांधीच उद्धृत करावे लागतात, हे फार बोलकं आहे. मात्र, चांगल्या हेतूने केलेल्या घोडचुकांची भलामण करण्यासाठी गांधींनी हे वचन नक्कीच उद्गारलं नसेल. चांगल्या हेतूने अर्थव्यवस्थेच्या नरड्यावरून सुरी फिरवण्याचा उद्योग असाही अपयशी ठरलेला नाहीच- विकासदरामधली अनावश्यक घट हेच त्याचं 'यश' आहे.
…………………………………
२. भाजपबरोबरची युती संपुष्टात आल्यानंतर काँग्रेस आणि मनसेला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत दाखल होणाऱ्यांची संख्या वाढू लागली असून आणखी काहीजण शिवसेनेच्या वाटेवर आहेत. मात्र, या ‘आयारामां’मुळे निवडणुकीची उमेदवारी मिळवू पाहणाऱ्या शिवसैनिकांवर गंडांतर येऊ लागल्याने शिवसैनिक संतप्त होऊ लागले आहेत.
नेत्यांना कोहिनूर आणि कार्यकर्त्यांना वडापाव, हे सूत्र जर इतकी वर्षं सतरंज्या उचलून पचनी पडलं नसेल, तर मग संताप होणारच. पण, त्याला अर्थ काय? निवडणुकीत निवडून येण्याची ताकद महत्त्वाची. निष्ठेबिष्ठेचं काय लोणचं घालायचंय?
…………………………………
३. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मंगळवारी पुन्हा एकदा माध्यमांवर बरसले आहेत. बहुतांशी माध्यमे विपर्यस्त वृत्तांकन करणारी आणि बनावट असून अमेरिकेला खात्रीलायक वार्तांकनाची गरज आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. बहुसंख्य बातम्या बनावट असतात, बहुसंख्य माध्यमं बातम्या तयार करतात, बहुसंख्य माध्यमं विपर्यस्त वृत्तांकन करणारी आणि बनावट आहेत, असे ट्रम्प यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितलं.
तात्या, ही वाहिनी बनावट नव्हती, याची खात्री करून घेतलीत ना? मग ठीक आहे. बाकी तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे. माध्यमं बनावट नसती आणि त्यांनी बोगस बातम्या दिल्या नसत्या, तर तुमच्याइतका बोगस माणूस सर्वशक्तिमान अमेरिकेच्या प्रमुखपदावर विराजमान होऊ शकला असता का? तुम्हीच आहात माध्यमांच्या बोगसपणाचा धडधडीत पुरावा.
४. देशातील १०००पेक्षा अधिक गावांना मोफत वाय-फाय कनेक्शन देण्याची घोषणा सरकारने केली आहे. याआधी गुगलने मोफत वाय-फाय देण्याची घोषणा केली होती. डिजिटल इंडिया आणि रोकड विरहित व्यवहारांना प्रोत्साहन मिळावे म्हणून सरकार ही योजना लागू करणार आहे. वाय-फाय मुळे अतिदुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांना संपर्काचे साधन उपलब्ध होईल, असा विचार सरकारने केला आहे.
बरोबर आहे. आज हागणदारी योग्य मोकळी जागा कोणती आहे, गावात प्राथमिक आरोग्यसुविधा नसल्याने कोणत्या वैदूशी संपर्क साधता येईल, झाडपाल्याच्या, भोंदू भगताच्या औषधोपचारांनी माणूस दगावल्यानंतर त्याच्या मयतासाठी, विधींसाठी नातेवाईकांना कसं बोलवायचं, किती मैलावरच्या ओहोळात किंवा विहिरीत टिपूसभर पाणी आहे, अशा मौलिक माहितीच्या देवाणघेवाणीची व्यवस्था असलीच दुर्गम गावांत.
……………………………………..
५. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सात मुस्लिमबहुल देशांतील नागरिकांसाठी केलेल्या अमेरिका प्रवेशबंदी निर्णयाचे कौतुक करताना उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'ट्रम्प यांच्याकडून थोडी हिंमत, थोडा देशाभिमान व चिमूटभर प्रामाणिकपणा उधार मिळत असेल तर पाहा', असा उपरोधिक टोला हाणला आहे. 'अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या कणखरपणाची चुणूक दाखवली आहे… पाकड्यांच्या बाबतीत जे मोदी सरकारने करायला हवे होते ते ट्रम्प यांनी एका झटक्यात करून दाखवले…' असे टीकास्त्र त्यांनी 'सामना'च्या अग्रलेखातून सोडलं आहे.
ट्रम्प यांच्या या तथाकथित देशाभिमानाने अमेरिकनांच्या पोटात कसा गोळा आला आहे, हे यांच्या गावी नाही आणि अमेरिकेचं श्रेष्ठत्वच मुळात जगभरातून तिथे गेलेल्या बुद्धिमंतांच्या कष्टांतून आकाराला आलं आहे, याचीही कल्पना नाही. आता ट्रम्पकाका भारतीय आयटी व्यावसायिकांचीही अशीच हकालपट्टी करण्याच्या बेताला आहेत, तेव्हा त्या निर्णयाच्याही गौरवासाठी तयार राहा आणि मायदेशी परतणाऱ्या बांधवांच्या भवितव्यासाठी 'आयटी वडापावा'च्या हायटेक गाड्या तयार ठेवा. शेवटी राष्ट्राभिमान महत्त्वाचा.
editor@aksharnama.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment