अजूनकाही
काल होता, १० डिसेंबर. जागतिक मानवी हक्क दिन. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेने केलेल्या ठरावानुसार १९४८ पासून ‘मानवी हक्क दिन’ म्हणून आपण स्वीकारला आहे. त्याच दिवशी संयुक्त राष्ट्रसंघाने ‘जागतिक मानवी हक्क सनदे’लाही मान्यता दिली.
‘मानवी हक्क दिना’चा विचार करताना काल सकाळी महाडचे सन्मित्र मिलिंद टिपणीस यांची एक व्हॉट्सअॅप पोस्ट वाचली. त्यामुळे १९२७ साली चवदार तळ्याच्या सत्याग्रहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रमुख सहकार्य करणारे महाडचे तत्कालीन नगराध्यक्ष सुरबानाना म्हणजेच सुरेंद्रनाथ चिटणीस यांची आज जयंती आहे, हेही समजलं.
सुरबानाना हे मिलिंद टिपणीस यांचे आजोबा (रघुनाथराव हे त्यांच्या वडिलांचं नाव). हे तपशील गेल्या काही महिन्यांत कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या चळवळींचा अभ्यास करताना समोर येत आहेत. महाराष्ट्राच्या समाजपरिवर्तनाच्या लढ्यातील हा एक खूप बळकट असा धागा आहे आणि तितकाच परिणामकारक असा इतिहासाचा दुवा आहे.
.................................................................................................................................................................
बीइंग – विजय अशोक इंदुशोकाई, आऱ्हान मीडियास्मिथस, नाशिक, पाने – २२२ (हार्डबाऊंड), मूल्य - ३६० रुपये
हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5250/Being
.................................................................................................................................................................
आपल्या सर्वांना ठाऊक आहे की, बाबा आढावांना या वर्षी ९० वर्षं पूर्ण झाली. त्यांना आता ९१ वं वर्ष सुरू आहे. या काळातही बाबांच्या चळवळी सुरू आहेतच. दिल्लीच्या तख्तावर धडकलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बाबांनी पुण्यात सभा घेऊन पाठिंबा दिला आहे.
या अभ्यासाच्या निमित्तानं बाबांचं लेखन पाहतो आहे. त्यांची अनेक पुस्तकं आहेत. त्यातलं एक वेगळं पुस्तक माझ्या संग्रहात पाहायला मिळालं आणि मी ते पुन्हा एकदा वाचलं. या पुस्तकाचं नाव आहे, ‘सुंबरान’. हा त्यांच्या लेखांचा संग्रह आहे. हे पुस्तक १९९१ साली प्रकाशित झालं. यात सुरबानाना यांच्यावर एक लेख आहे. त्यामुळे बाबांच्या चळवळीचं त्यांच्याशी असलेलं नातं आणि त्यामुळे डॉ. आंबेडकरांच्या चळवळीशी जोडला गेलेला दुवा समजला.
खरोखर महाराष्ट्रातील समाजपरिवर्तनाचे हे सगळे आपण जितके तपशिलात पाहू, तितक्या त्याच्या मिती आपल्याला समजू, उलगडू लागतात. वेळ द्यावा लागतो ही गोष्ट खरी आहे, पण विलक्षण अशा सामाजिक प्रक्रियेची एक जाणीवही त्यातून आपल्याला होते.
सुरबानानांवरील बाबांचा लेख वाचल्यावर मी त्यांना फोन केला. त्यांनी त्याबाबत थोडी माहिती दिली. महाड चवदार तळ्याच्या अर्ध शताब्दीनिमित्त विषमता निर्मूलन समितीचे प्रा. व. द. देशपांडे, रा.प. नेने, हेमलता राईलकर, अनिल अवचट, विलास वाघ, यदुनाथ थत्ते आणि नानासाहेब गोरे इत्यादी २० मार्च १९७७ रोजी महाडला गेले होते. त्यानिमित्तानं एका विशेष सभेचं आयोजन नानांनी केलं होतं. तेथील राम मंदिरामध्ये ही सभा झाली.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
या सभेतील सुरबानानांच्या भाषणाचा तपशील बाबांनी पुस्तकात दिला आहे. सुरबानाना म्हणाले होते, “ही चौकट मोडून काढण्यासाठी तिच्याविरुद्ध बंड केलं पाहिजे. बंडाशिवाय पर्याय नाही! बंद टाळण्याचा विचार करून भागणार नाही. निवडणुका जिंकाल, सत्तासुद्धा मिळवाल; पण या पोलादी चौकटीचं काय?”
या भाषणातलं ‘तुम्हाला बंड केलं पाहिजे’, हे नानांचं वाक्य माझ्या कानावर सतत आदळत होतं, असं बाबांनी लिहिलं आहे.
त्यानंतर बाबा १० डिसेंबर १९७७ रोजी नानांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त महाडला त्यांच्या घरी गेले होते. त्याच दिवशी तेथील डॉ.आंबेडकर कॉलेजमध्ये समाजवादी युवक दलाच्या पदयात्रेचा समारोप झाला. तेथील भाषणातही बाबांनी नानांच्या योगदानाचा गौरव केला. त्यानंतर २५ मार्च १९७८ रोजी महाडमध्ये भरलेल्या बौद्ध साहित्य संमेलनात उद्घाटक म्हणून बाबा गेले होते. त्या संमेलनात नानांनी प्रमुख पाहुणे म्हणून केलेल्या भाषणातील काही तपशील बाबांना दिला आहे.
त्यानंतर त्याच वर्षी एका अपघातात जून महिन्यात सुरबानाना जखमी झाले आणि नंतर निधन पावले, अशी नोंद बाबांनी केली आहे.
या लेखाचा शेवट बाबांनी फार हृद्य केला आहे. बाबा खूप संवेदनशील आणि हळव्या शब्दांनी लिहिणारे लेखक आहेत, हे मी गेली अनेक वर्षं अनुभवतो आहे, पाहतो आहे. या लेखातून बाबांमधला कुटुंबवत्सल माणूस आपल्याला दिसतो. त्यांनी लिहिलं आहे -
“शारीरिक मारहाणीची वर्णने नानांनी आमच्याजवळ अनेकदा केली होती. महाडचे चवदार तळे खुले केल्याबद्दल स्वजनाकडून नानांना १२ वर्षे बहिष्काराला तोंड द्यावे लागले. एक तपाच्या तपश्चर्येनंतर नानांचा विजय झाला! १९४३ साली महाड नगरपालिकेने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानपत्र दिले… नानांना मारण्याचे कितीतरी कट झाले, पण कटवाल्यांची डाळ शिजली नाही. एसटीने तो डाव साधला!... एक प्रकारे नानांचे आयुष्य कृतार्थ झाले. नाना विचाराने व आचाराने शेवटपर्यंत सत्याग्रहीच राहिले! त्यांच्या निधनाने महाड चवदार तळे सत्याग्रहातील शेवटचा साक्षीदार दृष्टिआड झाला!... का कुणास ठाऊक, स्मशानातील सभेत मला वाटले, ‘आता परत महाडला कधी यावेसे वाटेल का?’ परतीच्या वाटेवर मन विलक्षण अवघडले होते!” (सुंबरान, पान ६०).
महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह, त्यावेळेला डॉ. आंबेडकरांना नानांनी आणि अन्य सहकाऱ्यांनी दिलेली साथ आणि त्यामुळे समाजपरिवर्तनाचा उभा राहिलेला एक महान लढा, या सगळ्याची ही पाने आहेत. ती समतेच्या, परिवर्तनाच्या अभ्यासासाठी जतन केली पाहिजेत, असं तीव्रतेनं वाटतं.
..................................................................................................................................................................
हेही पाहा : स्थलांतरितांचं उपरं विश्व समजून घेण्याचा हा प्रयत्न आहे. यात मानवी अधोगतीबरोबर प्रगतीच्याही खाणाखुणा आहेत
..................................................................................................................................................................
मिलिंद टिपणीस यांच्याशी बोलताना महाड सत्याग्रहाच्या निमित्तानं डॉ. आंबेडकर जेव्हा जेव्हा येत, तेव्हा तेव्हा ते सुरेंद्रनाथ टिपणीस यांच्या गोविंद निवासमध्ये मुक्कामाला असत हेही समजलं. याचे तपशील यापूर्वी मिळालेले होते. मिलिंद यांनी आणखीन एक चांगली माहिती दिली. डॉ. आंबेडकरांनी १९५२मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत सुरबानाना त्यांच्या प्रचारासाठी मुंबईला गेले होते. मिलिंद यांनी त्याचं एक छायाचित्रही मला पाठवलं.
विसाव्या शतकातील मानव मुक्तीचा मोठा लढा डॉ. आंबेडकरांनी उभा केला. धर्माची पोलादी चौकट नाकारून धर्मांतर केलं. या सर्व प्रवासात, चळवळीत, मंथनात त्यांना ज्यांनी ज्यांनी मदत केली, अशा अनेक शिलेदारांची, निकटवर्तीय नेत्यांची, कार्यकर्त्यांची चरित्रं यायला हवीत.
.................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
त्यामुळे मिलिंद टिपणीस यांना मी आवर्जून कळवलं की, तुम्ही सुरबानाना या तुमच्या ऐतिहासिक-सामाजिक चळवळीत सहभागी झालेल्या आजोबांचं चरित्र लिहा. महाराष्ट्रातील आणि भारतातील अभ्यासकांना, कार्यकर्त्यांना असे अनेक समर्पित वृत्तीचे, चळवळीसाठी आपलं आयुष्य वाहून घेणारे अनेक लोक माहितीच नाहीत!
अपेक्षा करूयात मिलिंद टिपणीस निश्चितच येत्या वर्षभरात आपल्याला सुरमानानांचं चरित्र पुस्तक वाचायला देतील आणि त्यातून समतेच्या संघर्षाचा हा कालखंड नव्यानं जाणून घेता येईल. मानवी हक्कांसाठी जे लढत आले आहेत, लढताहेत आणि ज्यांनी आपलं बलिदान मानवी हक्कांसाठी दिलं आहे, अशा सर्वांना कालच्या ‘मानवी हक्क दिना’निमित्त भावपूर्ण श्रद्धांजली.
..................................................................................................................................................................
लेखक अरुण खोरे हे ज्येष्ठ संपादक असून सध्या ‘लोकशाहीसाठी समंजस संवाद’ या मासिकाचे संपादक आहेत.
arunkhore@hotmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment