‘प्रबोधनकार ठाकरेंचा संक्षिप्त बायोडेटा पाहिजे आहे. तो तुमच्याकडे आहे का?’
दैनिक ‘सामना’चे पुण्यातील निवासी संपादक आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातील माझे मित्र हरिश केंची यांना मी विचारले. पुणे श्रमिक पत्रकार संघात आम्ही दोघांनीही एकत्र काम केल्याने केंची यांच्याशी माझे जुने संबंध होते.
‘कामिल, प्रबोधनकारांचा माझ्याकडे बायोडेटा नाही, पण आता आऊट ऑफ प्रिंट असलेल्या त्यांच्या ‘माझी जीवनगाथा’ या आत्मचरित्राची एक जुनी प्रत आमच्या ऑफिसात आहे. लवकरात लवकर तू ती परत करत असशील तर ते पुस्तक तू माझ्याकडून घेऊ शकतो,’ तिकडून केंची यांचे उत्तर आले आणि मी आनंदलो.
ही घटना आहे साधारण पंचवीस वर्षांपूर्वीची, साधारणत: १९९६च्या आसपासची. त्या काळात ‘महाराष्ट्र चरित्रकोश’ हा माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेला प्रकल्प मी एकहाती करायला घेतला होता. १८०० पासून तो थेट दुसऱ्या सहस्त्राअखेरीस म्हणजे २००० सालापर्यंत महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आणि इतर विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटवणाऱ्या व्यक्तीची थोडक्यात चरित्रात्मक माहिती देणारा हा कोश असणार होता.
‘इंडियन एक्सप्रेस’च्या पुणे आवृत्तीत वार्ताहर म्हणून काम करताना १९९५च्या आसपास चरित्रकोशाचा हा प्रकल्प मी सुरू केला होता. काम तसे खूप वेळखाऊ होते, कारण फोटोकॉपीचा जमाना अजून सुरू झालेला नव्हता, मोबाईलवर एखाद्या कागदपत्राचे छायाचित्र घेणे तर तेव्हा फार दूरची गोष्ट होती. आंतरजालावर म्हणजे गुगलवर एका क्लिकवर कुणाही प्रसिद्ध व्यक्तीची खरीखोटी, सकारात्मक वा नकारात्मक माहिती त्या वेळी उपलब्ध नसायची. त्यामुळेच एक-दोन परिच्छेदांची माहिती मिळवण्यासाठी त्या व्यक्तीचे संपूर्ण आत्मचरित्र व चरित्र वाचावे लागायचे, त्यातून आवश्यक माहिती गोळा करायला लागायची.
हरिश केंची यांचा तो निरोप ऐकून म्हणूनच मी खुश झालो होतो. दुसऱ्याच दिवशी पुण्यातल्या बाजीराव रोडवर असलेल्या ‘सामना’च्या ऑफिसात जाऊन प्रबोधनकारांच्या आत्मचरित्राची जीर्ण झालेली ती प्रत मिळवली आणि वायदा केल्याप्रमाणे आठवड्याच्या आत परतही दिली.
.................................................................................................................................................................
बीइंग – विजय अशोक इंदुशोकाई, आऱ्हान मीडियास्मिथस, नाशिक, पाने – २२२ (हार्डबाऊंड), मूल्य - ३६० रुपये
हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5250/Being
.................................................................................................................................................................
आम्हा पत्रकारांसाठी कुणाही प्रसिद्ध व्यक्तींची संक्षिप्त माहिती वेळेवर उपलब्ध असणे फार महत्त्वाचे. एखाद्या व्यक्तीची कुठल्याही मोठ्या पदावर नेमणूक होणे, पारितोषिक मिळणे, प्रतिष्ठेची निवडणूक जिंकणे, अशा प्रसंगी आणि महनीय व्यक्तीच्या निधनप्रसंगी अशी माहिती हाताशी असणे खूप गरजेचे असते. अलीकडेच फुटबॉल खेळाडू दिएगो मॅराडोनाचे निधन झाले, तेव्हा त्याच्या ‘हॅन्ड ऑफ गॉड’ या सुप्रसिद्ध वाक्यापासून त्याची सर्व व्यक्तीगत माहिती काही क्षणांत आंतरजालावर एका क्लिकनिशी हजर होत होती. २० वर्षांपूर्वी एखाद्या व्यक्तीविषयी लेख लिहिण्यासाठी आम्हा पत्रकारांसाठी व इतर लोकांसाठी अशी चैन नव्हती! त्यामुळेच पत्रकारांना, संशोधकांना त्यांना आवश्यक असणारी जुजबी माहिती एका कोशात संकलित करण्यासाठी या चरित्रकोशाचे काम मी सुरू केले होते.
‘थेंबे थेंबे तळे साचे’ या म्हणीनुसार मिळेल त्या स्तोत्रांतून मी विविध क्षेत्रांतील मोठ्या व्यक्तींची चरित्रे मिळवण्याचे काम सुरू केले होते. वर्तमानपत्रांत वाढदिवसानिमित्त, जयंती किंवा पुण्यतिथीनिमित्त एखाद्या व्यक्तीविषयी माहिती दिली जाते. घरी येणाऱ्या वृत्तपत्रांच्या, नियतकालिकांच्या त्या लेखांची कात्रणे मी कापून ठेवू लागलो. ‘इंडियन एक्सप्रेस-लोकसत्ता’च्या आमच्या ऑफिसात अनेक मराठी आणि इंग्रजी दैनिके यायची. दररोज ती वाचून त्यातील अशा चरित्रांच्या नोंदी लिहून काढत असे. त्याशिवाय विविध साप्ताहिकांच्या आणि नियतकालिकांच्या, दिवाळी अंकांच्या जुन्या प्रती मिळवून चरित्राच्या संक्षिप्त नोंदी करत असे.
पुण्यातील माझा पत्रकार मित्र पराग रबडेची मुंबईतील ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’च्या (पीटीआय) कार्यालयात बदली झाली होती. महाराष्ट्र विधानमंडळ कार्यालयातर्फे वेळोवेळी सर्व आमदारांचा म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद सभासदांचा अल्पपरिचय त्यांच्या छायाचित्रांसह प्रसिद्ध केला जातो. त्या वेळचे असे एक पुस्तक परागने मला दिले. त्यात अर्थातच मुख्यमंत्री, सर्व मंत्री यांच्या अल्पचरित्रांचा ऐवज मला पाहिजे अशा संक्षिप्त स्वरूपात उपलब्ध होता. पण त्याआधीच्या म्हणजे विधानमंडळाच्या स्वातंत्र्यपूर्व काळच्या स्थापनेपासून किंवा निदान महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासूनची अशी काही माहिती कशी मिळवणार? ‘तशा जुन्या पुस्तिका विधानमंडळाच्या वाचनालयात आहेत, पण त्यासाठी तुला सुट्टी टाकून, मुंबईला येऊन या वाचनालयात बैठक मारून या नोंदी लिहाव्या लागतील,’ असे परागने मला सांगितले.
अशा प्रकारे मुंबईला दोन-तीन वेळेस भेट देऊन तिथे सचिवालयातील वाचनालयात त्या पुस्तिका मिळवून त्यातील आवश्यक राजकीय व्यक्तींची माहिती टिपून घेतली. त्या काळात झेरॉक्स किंवा मोबाईलने फोटोकॉपी घेण्याचा प्रकार नव्हता, त्यामुळे हा प्रपंच. पण यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील मागील चार-पाच दशकांतील अनेक महत्त्वपूर्ण लोकांची माहिती एका ठिकाणी आणि थोडक्यात मिळाली.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
‘महाराष्ट्र चरित्रकोशा’चा इ.स. १८०० ते इ.स. २००० या दोनशे वर्षांचा मर्यादित काळ होता, पण या चरित्रकोशात कुणा व्यक्तीचा समावेश करायचा, असा अगदी सुरुवातीच्या काळात प्रश्न निर्माण झाला. म्हणजे या काळात महाराष्ट्रात म्हणजे मुंबईकर असलेल्या अमिताभ बच्चन, दिलीपकुमार वगैरेंची माहिती द्यावी का, असा प्रश्न होता. फक्त मराठी लोकांची चरित्रे द्यावी, असे पराग रबडेचे मत होते. शेवटी महाराष्ट्रीय देशी वास्तव्य असणाऱ्या सर्व व्यक्तींचा चरित्रकोशात अंर्तभाव असावा यावर एकमत झाले.
आमच्या कार्यालयातील काही पत्रकार सहकाऱ्यांची मला या कामात मोलाची मदत मिळाली. ‘लोकसत्ता’चे मुख्य वार्ताहार मुकुंद संगोराम यांनी पुण्यात अनेक वर्षे बातमीदाराचे काम केले होते. पुणे महापालिकेतर्फे वेळोवेळी अनेक नामवंत व्यक्तींचा मानपत्र देऊन सत्कार केला जातो, अशा वेळी दिल्या जाणाऱ्या अलंकारिक भाषेतील एकपानी मानपत्रांचा एका मोठा संचच संगोराम यांनी माझ्या हवाली केला. त्यात अगदी पंडित भिमसेन जोशी, ‘घाशीराम कोतवाल’चे नृत्य दिग्दर्शक कृष्णदेव मुळगुंदसारख्या विविध क्षेत्रांतील महनीय व्यक्तींची माहिती होती!
‘इंडियन एक्सप्रेस’चे बातमीदार सहकारी अनोष मालेकरने मला मराठी नाट्यक्षेत्रातील व्यक्तींची चरित्रात्मक माहिती असलेले ‘नाट्यपंढरीचें सन्मानित’ हे हरीश केंची-संपादित पुस्तक दिले, तर छायाचित्रकार सहकारी मुकुंद भुतेने ‘चित्रसौरभ’ हा भय्यासाहेब ओंकार संपादित चित्रकलेवरील खास अंक दिला.
या चरित्रकोशासाठी सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांनी संकलित केलेले मराठी भाषेतील खंडात्मक कोश माझ्यासमोर पथदर्शक होते. चित्राव यांच्या ‘भारतवर्षीय अर्वाचीन चरित्रकोश - इ.स. १८१८ - १९४५ अखेर’ या कोशाचा मला फार सर्वाधिक उपयोग झाला.
सिद्धेश्वरशात्री चित्राव यांच्या चरित्रकोशांप्रमाणे आणखी एक मोठा खजिना मला मिळाला, तो विनायक लक्ष्मण भावे यांनी संकलित केलेल्या ‘महाराष्ट्र सारस्वत’ या चरित्रकोशामध्ये. पुण्यातील स्नेहसदन या येशूसंघीय कॅथोलिक धर्मगुरूंच्या संस्थेच्या वाचनालयात अनेक दिवस बसून कितीतरी आधुनिक मराठी साहित्यिकांच्या चरित्रात्मक नोंदी भावे यांच्या ‘महाराष्ट्र सारस्वत’मधून मी लिहून काढल्या. त्या साहित्यिकांची थोडक्यात चरित्रात्मक माहिती आणि त्यानंतर त्यांच्या सर्व पुस्तकांची इत्यंभूत माहिती म्हणजे प्रकाशक, प्रकाशनवर्षे, पुस्तकाची पाने आणि किंमत अशी सर्व माहिती या चरित्रकोशात आहे. काही साहित्यिकांच्या शंभराहून अधिक साहित्यकृतींची या कोशात माहिती आहे. कोशकर्ते भावे यांनी ही अधिकृत माहिती संबंधित साहित्यिकांकडून, प्रकाशकांकडून वा त्यांच्या जवळच्या व्यक्तींकडून घेतली होती, हे स्पष्ट दिसते. मी स्वतः चरित्रकोश करत असल्याने आणि ही माहिती गोळा करणे किती अवघड असते याचा अनुभव घेत असल्याने भावे यांनी ही सर्व माहिती गोळा कशी केली असेल, याचे आजही नवल वाटते.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
काही प्रसिद्ध व्यक्तींची चरित्रात्मक माहिती मिळवणे खूपच अवघड गेले. संपूर्ण महाराष्ट्रात मोठे नाव असूनही त्यांची जन्मतारीख वगैरे चरित्रात्मक अधिकृत माहिती मिळवणे त्या वेळी कठीण होते, यावर आज कुणाचा विश्वासही बसणार नाही. उदाहरणार्थ राज ठाकरे. अनेक ठिकाणी प्रयत्न करून शेवटी त्यांच्याविषयीची अगदी जुजुबी माहिती मिळाली, ती या चरित्रकोशात घेतली आहे.
हा सर्व खटाटोप १९९५ ते १९९९ सालापर्यंतचा आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या राजकीय वारशाची २००० सालच्या महाबळेश्वरच्या शिवसेना मेळाव्यात घोषणा करण्याचा काळ अजून यायचा होता. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांचा खराखुरा राजकीय वारस ठरलेल्या व्यक्तीची म्हणजे आताचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चरित्रात्मक नोंद मला त्या वेळी मिळाली आणि मी ती चरित्रकोशात जमा केली ती अशी - “ठाकरे, उद्धव बाळासाहेब (जन्म २२ जुलै १९६०) शिवसेना नेते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हे कनिष्ठ चिरंजीव. जे.जे. स्कूल ऑफ अप्लाईड आर्टसचे विद्यार्थी. दै. ‘सामना’, ‘दोपहर का सामना’ आणि साप्ताहिक ‘मार्मिक’ प्रकाशित करणाऱ्या प्रबोधन प्रकाशनचे विश्वस्त, वन्यप्राण्यांचे छायाचित्रण हा एक विशेष छंद.”
पुढे काळाच्या पोटात काय आहे, याची मला कशी कल्पना असणार? याच कारणामुळे या चरित्रकोशात माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांच्याविषयी नोंद आहे, मात्र त्यांचे जवळचे नातलग आणि नंतरचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नामोल्लेखही नाही.
तर अशा प्रकारे विविध मार्गांनी चरित्रकोशासाठी मी नोंदी गोळा करत होतो. ‘इंडियन एक्सप्रेस’च्या ऑफिसात दररोज कामाला जाण्याआधी म्हणजे दुपारपर्यंत शनिवार पेठेतील ‘स्नेहसदन’च्या वाचनालयात कितीतरी दिवस अनेक तास बसून तेथील विविध चरित्रग्रंथ, आत्मचरित्रे, संदर्भग्रंथ चाळली आणि नोंदी लिहिल्या. तिथे असलेल्या ‘मराठी विश्वकोशा’चे सर्व उपलब्ध खंड काळजीपूर्वक चाळले.
‘इंडियन एक्सप्रेस’मध्ये माझे बातमीदाराचे काम रात्री साडेआठच्या आसपास संपायचे, त्यानंतर ऑफिसच्या व्यवस्थापकीय कक्षाच्या तोपर्यंत मोकळ्या झालेल्या जागेत एकदीड तास बसून मी चरित्रकोशाचे काम करायचो. आणि रात्री दहाला चिंचवड-निगडीची शेवटची सिटी बस घरी जाण्यासाठी पकडायचो.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
हळूहळू कात्रणांची आणि हस्तलिखित नोंदींची संख्या वाढायला लागली. तोपर्यंत मी संगणकाचा वापर सार्वत्रिक झाला नव्हता आणि संगणकावर मराठी लिहायला मी शिकलोही नव्हतो. मराठी आद्याक्षरांनुसार नोंदी फाईलीत ठेवत होतो. तत्पूर्वी प्रसारमाध्यमांतील लोकांसाठी इंग्रजी-मराठी पॉकेट ‘मीडिया डिक्शनरी’ मी तयार केली होती, तेव्हा मराठी आद्याक्षरांचा क्रम पक्का ध्यानात राहिला होता. चरित्रकोशाच्या नोंदींसाठी खास मोठ्या बॉक्स टाईप फाईली विकत घेत होतो, अशा एका फाईलची किंमत त्या वेळी असायची चाळीस रुपये! फ्लॅटमधल्या माळ्यांचा या जाडजूड फाईली ठेवण्यासाठी यासाठी चांगला उपयोग होत होता आणि घरात जॅकलिनला आणि तेव्हा लहान बाळ असलेल्या आदितीला माझ्या या उपदव्यापाची झळ बसत नसायची.
‘इंडियन एक्सप्रेस’ची नोकरी सांभाळून पाच-सहा वर्षांच्या काळात या प्रकल्पाचे काम हातावेगळे केले आणि हस्तलिखित छपाईला पाठवले. पुणे श्रमिक पत्रकार संघाने या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी थोडी आर्थिक मदत केली होती. पत्रकार मित्र पराग रबडेने आपल्या स्वतःच्या ‘सुनिती प्रकाशन’तर्फे हा कोश पुस्तक प्रकाशित केला. त्यानेच तेव्हा ‘महाराष्ट्र टाइम्स’चे संपादक असलेल्या कुमार केतकर यांच्या हस्ते या कोशाचे प्रकाशन पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या विद्यमाने घडवून आणले.
१८०० पासून २०० वर्षांच्या कालखंडातील महाराष्ट्रातील समाजाच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक वगैरे क्षेत्रांवर प्रभाव टाकणाऱ्या लोकांची अल्पचरित्रे देण्याचे या कोशाचे उद्दिष्ट होते. कुठलेही क्षेत्र या वर्ज्य नव्हते. चरित्रकोशाच्या मलपृष्ठावर वानगीदाखल दिलेल्या काही व्यक्तींची नावे - वासुदेव फडके, बाळशास्त्री जांभेकर, महात्मा फुले, वि.स. खांडेकर, केशव बळीराम हेडगेवार, स्वामी रामानंद तीर्थ, लता मंगेशकर, चंदू बोर्डे, इंदिरा हिंदुजा, गाडगे महाराज, पंडिता रमाबाई, अशी आहेत.
एकूण २०१ पाने असलेल्या या चरित्रकोशात १२४४ व्यक्तींच्या नोंदी आहेत. मला वाटते २००० पर्यंत ज्या व्यक्तींचे निधन झाले होते, अशा सर्वच क्षेत्रांतील बहुतांश महनीय व्यक्तींची माहिती देण्यात हा चरित्रकोश यशस्वी ठरला. त्या दृष्टीने हा कोश मराठी साहित्यसृष्टीत वैशिष्ट्यपूर्ण आणि एकमेव चरित्रकोश ठरतो.
.................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
या प्रकल्पाची खरीखुरी फलश्रुती काय? प्रभावी वितरणपद्धतीच्या अभावी हा चरित्रकोश गरजू लोकांपर्यंत पोहोचला नाही. पदरमोड करून छापल्याने अर्थप्राप्ती काही झालीच नाही. या चरित्रकोशातील काही त्रुटीही नंतर माझ्या लक्षात आल्या. हयात असणाऱ्या मात्र फारसे कर्तृत्व नसणाऱ्या मुंबई-पुण्यातील अनेक व्यक्तींच्या चरित्रनोंदी मी त्यात घुसडवल्या होत्या. भविष्यकाळात यदाकदाचित हा चरित्रकोश आधीच्या त्रुटी दुरुस्त करून मी पुन्हा अधिक समावेशक स्वरूपात संकलित करीलही. त्याचबरोबर अशा स्वरूपाचा प्रकल्प हाती घेणाऱ्या व्यक्तीस, संस्थेस हा कोश आधारभूत ठरू शकतो.
२५ वर्षांनंतर आज मागे वळून पाहताना गुगलयुग निर्माण होण्याआधीच्या काळात असल्या चरित्रकोशाची किंवा माझ्या आधीच्या ‘इंग्रजी-मराठी मीडिया डिक्शनरी’ची नक्कीच गरज होती. आता कदाचित असल्या डिक्शनरीकडे वा चरित्रकोशाकडे नवी पिढी ढुंकूनही पाहणार नाही. श्री. व्यं. केतकरांच्या ‘ज्ञानकोशा’ची, पंडित महादेवशास्त्री जोशी यांच्या ‘संस्कृतीकोशा’ची किंवा अगदी तर्कतीर्थ लक्ष्मणशात्री जोशी यांनी निर्माण केलेल्या ‘मराठी विश्वकोशा’ची मदत आजकाल किती जण घेत असतील? पण म्हणून या चरित्रकोशांचे वा विश्वकोशांचे महत्त्व कमीही होत नाही. गुगलच्या वाढत्या युगातही मराठी साहित्य आणि संस्कृतीच्या संशोधकांना वस्तुनिष्ठ माहितीसाठी या कोशांकडे वळावेच लागते. तोपर्यंत नव्या पिढीतील कोशकर्त्यांनी नाउमेद होण्याची गरज नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment