दिवाळी अंक २०२० : मराठी विज्ञानकथा अजून ठराविक साच्यातून बाहेर का पडत नाही?
पडघम - साहित्यिक
मेघश्री दळवी, स्मिता पोतनीस
  • नवल, धनंजय, अक्षरगंध, मराठी विज्ञान परिषद पत्रिका, पासवर्ड, अनुभव आणि वसा या दिवाळी अंकांची मुखपृष्ठे
  • Wed , 09 December 2020
  • पडघम साहित्यिक नवल धनंजय अक्षरगंध मराठी विज्ञान परिषद पत्रिका पासवर्ड अनुभव वसा

‘विज्ञानकथा’ हा प्रकार मराठी वाचकांना नवा नाही. पण कधी कधी ‘विज्ञान असलेली’ कथा असं तिचं काहीसं ढोबळ स्वरूप समोर येतं. प्रत्यक्षात ‘विज्ञानकथा’ म्हणजे ललितकथेपेक्षा काही वेगळी नाही. आज अस्तित्वात असलेल्या विज्ञान संकल्पनेचं प्रक्षेपण करून तिचा उद्या माणसांवर होऊ शकेल, असा परिणाम दर्शवणारी कथा ती ‘विज्ञानकथा’! मुळात ती आधी एक कथा असायला लागते. वाचकाला जवळची वाटेल आणि विचार करायला लावेल ती चांगली ‘विज्ञानकथा’ म्हणता येईल. गूढ, भय, रहस्य, विनोदी अशा कोणत्याही रूपाचं तिला वावडं नाही. फक्त ती कल्पना मोकाट सोडलेली, तर्काला धरून नसलेली परीकथा मात्र नसते.

‘नवल’चं यंदा सदुसष्टावं वर्ष. पहिल्यापासून सतत मराठी वाचकांपुढे विज्ञानकथा येत गेल्या त्या ‘नवल’सारख्या मासिका-वार्षिकांमधून. या वर्षीच्या अंकात तीन विज्ञानकथा आहेत. शैलेन्द्र शिर्के यांची ‘प्रकरण’ ही कथा अगदी हलकीफुलकी आणि वाचनाचा निखळ आनंद देणारी आहे. श्रीनिवास शारंगपणी यांची ‘व्याधाच्या व्याधी’ या कथेचं शीर्षक आकर्षक आहे खरं, पण अनेक जागी पात्रांची पार्श्वभूमी मांडताना ‘सांगणे’ प्रकारचं लेखन झालं आहे. व्याध-व्याधी ही कोटी काही भाषांमध्ये जमेल, त्या पलीकडे या संबंधावर काहीच प्रकाश पडत नाही. ‘तुतुरगुंफा’ या मेघश्री दळवी यांच्या कथेला आर्किऑलॉजीची वेगळी पार्श्वभूमी आहे, पण कथेचा शेवट मध्यवर्ती कल्पनेचा पुढे मागोवा घेताना दिसत नाही.

‘धनंजय’ म्हटलं की, कथांची रेलचेल असणार आणि त्यात विज्ञानकथांना खास स्थान असणार, हे वेगळं सांगायला नको. या अंकातल्या ‘आणि मारूती जागा झाला’ या गिरीश देसाई यांच्या विज्ञानकथेचा विषय रोचक आहे. मात्र त्याची रचना ठराविक वळणाने जाताना दिसते. श्रीकांत कुमावत यांची ‘तिसरा डोळा’ ही कथा मेंदूतल्या विद्युत लहरी आणि त्याद्वारे विचार प्रभावित करण्याच्या कल्पनेचा चांगला वापर करते. अलीकडे याबाबत नवनवे प्रयोग होत आहेत, त्यांचा साधार उल्लेख आल्याने कथेला एक योग्य बैठक मिळते. मेघश्री दळवी यांनी ‘मुसाफिर’ कथेत फॅन फिक्शन हा लेखनप्रयोग विज्ञानकथेसाठी करून पाहिला आहे. डिझाइनर बेबी या विषयावर स्मिता पोतनीस यांची ‘बाळ माझं गुणाचं’ ही कथा चांगली जमली आहे, तर ‘म्हाताऱ्याची गोष्ट’मध्ये शैलेन्द्र शिर्के यांनी चटकदार स्पेस थ्रिलर सादर केली आहे. वेगवेगळे विषय असल्याने या कथा अंकात एकत्र वाचताना व्यापक अनुभव येतो, हे उल्लेखनीय.

भय-गूढकथा लिहिताना विज्ञानाचा वापर आला तर कथेला वेगळा रंग येतो. ‘धनंजय’मधल्या आशिष महाबळ यांच्या ‘सावट’ या कथेबाबत असं निश्चितच वाटतं. याच अंकातल्या शरद पुराणिक यांच्या ‘कोळेश्वर’ कथेतही तसाच वापर दिसतो. प्रसन्न करंदीकर यांच्या ‘दरवाजा’ कथेला वैज्ञानिक संकल्पनेची डूब दिलेली आहे, तर नील आर्ते यांच्या ‘त्रिकथा’ कथेतल्या तिसऱ्या भागात विज्ञानाचा संदर्भ आला आहे. मात्र असे संदर्भ उपरे वाटू न देणं हे कौशल्याचं काम आहे आणि ते सर्वांनाच जमलं आहे, असं नाही.

.................................................................................................................................................................

बीइंग – विजय अशोक इंदुशोकाई, आऱ्हान मीडियास्मिथस, नाशिक, पाने – २२२ (हार्डबाऊंड), मूल्य - ३६० रुपये

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5250/Being

.................................................................................................................................................................

‘मराठी विज्ञान परिषद पत्रिका’मध्ये या वेळी चार विज्ञानकथा आलेल्या आहेत. ज्ञानेश्वर गटकर यांची ‘गुंता’ ही कथा क्लोनवर आधारित आहे. संवादातील भाषा काहीशी खटकली, पण कथा चांगली आहे. ‘कोरी पाटी’ ही स्वरा मोकाशी यांची कथा स्मृती पुसता आल्या तर काय होईल यावर आहे. विनय खंडागळे यांची ‘पात्रता’ ही कथा स्वयंचलित यंत्रमानवाला पात्रता प्रदान करूनही मानव त्याला त्याचा खरंच उपयोग करून देणार का, यावर आहे. कथाकल्पनेत निश्चितच वेगळेपण आहे, आणि सामाजिक भाष्य करण्याच्या चांगल्या जागा आहेत. कथा अधिक फुलवता आली असती, आणि या जागांचा वापर करून घेता आला असता तर अधिकच रोचक झाली असती. स्वाती लोंढे यांची ‘ती सध्या आहे कुठे?’ ही कथा समांतर विश्व या संकल्पनेवर आधारित आहे. याच संकल्पनेवर निलेश मालवणकर यांची ‘यूँ होता तो क्या होता!’ ही कथा ‘सामना’मध्ये आहे.

‘स्वान्तसुखाय’ या दिवाळी अंकात स्मिता पोतनीस यांची ‘गुलाम’ ही रोबॉट कथा आहे. त्यात विषय वेगळ्या पद्धतीने मांडलेला दिसून येतो. ‘प्रभात’ दिवाळी अंकात मेघश्री दळवी यांची ‘पाहुणा’ ही एलियन कथा आहे. निलेश मालवणकर यांची ‘मुंबईत एलियन’ ही ‘धनंजय’मधली हलकीफुलकी, विनोदी ढंगानं लिहिलेली कथा अर्थातच एलियनवर आहे. एलियन कथा वाचताना गंमत वाटली तरी हा विषय ठराविक दिशेनं न जाता आता त्यात काही नावीन्य यायला हवं.

छोट्या वाचकांसाठी विज्ञानकथा अलीकडे दिसायला लागल्या आहेत, हा खूप आश्वासक ट्रेण्ड आहे. या वयात निराळं काही अन विचार करायला लावणारं या निमित्तानं मुलांपुढे येतं. जागतिक पातळीवर विज्ञानकथा किंवा स्पेक्युलेटीव्ह म्हणजे वेगळा काळ, वेगळं विश्व, वेगळी संस्कृती, वेगळी तत्त्व मांडणाऱ्या कथा त्यातल्या साहसासह मुलांना आवडतात असं दिसून आलं आहे. त्यामुळे मराठीतही हा विचार रुजताना पाहून चांगलं वाटलं.

‘मराठी विज्ञान परिषद पत्रिका’मधली सुनील सुळे यांची ‘विलीज डायव्हिंग स्कूल’ ही कथा मनोरंजक आहे. विषय तर हटके आहेच, सोबत रहस्याची उत्कृष्ट मांडणी आहे. ‘पासवर्ड’ या अंकात असिमोव्हच्या तीन छोट्या विज्ञानकथा निरंजन घाटे यांनी सुरेखपणे अनुवादित केल्या आहेत. त्यातले बारकावे आपल्या काळात आणि आपल्या भूमीतही तितकेच लागू पडतात, हे त्या दोघांचंही यश. स्पेक्युलेटीव्ह अर्थानं त्यातली ‘आणि माणसाने मांजराला जिंकलं’ ही निरंजन घाटेंची कथाही खूप छान जमली आहे. विज्ञानकथा बहुतेक वेळा भविष्यात घडतात. म्हणूनच भूतकाळात काय झालं असेल, याचा वेध घेणाऱ्या अशा स्पेक्युलेटीव्ह कथांचं खास स्वागत करायला हवं.

तंत्रज्ञानावरील कथा हा एक ट्रेण्ड मागच्या वर्षी खूप ठळकपणे दिसला होता. या वर्षीही तंत्रज्ञानकथा मोठ्या संख्येनं आहेत. ‘गोष्ट एका हॅकरची’ ही अमोल सांडे यांची ‘धनंजय’मधली कथा हॅकिंगवर आहे. मुळात कथानक चांगलं आहे, पण केवळ एकामागून एक येणाऱ्या घटना आणि तांत्रिक वर्णन असंच तिचं स्वरूप राहिलं आहे. कथेतील पात्रं कशी आणि का वागतात, त्यांची स्वभाववैशिष्ट्यं यांबाबत कथा कमी पडते.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

डॉ. बाळ फोंडके हे ज्येष्ठ कथालेखक कायम वैशिष्ट्यपूर्ण विषयावर दमदार कथा लिहीत असतात. त्यांची ‘धनंजय’मधली ‘तोंडओळख’ ही कथा वेगवेगळ्या तंत्रज्ञानांची उत्तम सांगड घालते. कथेतील तांत्रिक माहिती अतिशय सहज आणि कथेच्या ओघात आल्यानं एकूण परिणाम रसाळ होतो. छोट्या छोट्या मुद्द्यांकडे त्यांनी आवर्जून लक्ष दिलं आहे.

‘अनुभव’मध्ये मेघश्री दळवी यांची ‘बीमार्टमधली बाई’ ही कथा रहस्यमय रीतीनं सादर केलेली गणिती तंत्रज्ञान कथा मनोरंजक आहे. ‘वुहानचा वाफारा’ ही विजय तांबे यांची ‘वसा’ दिवाळी अंकातली शैलीदार कथा आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आहे. ‘हंस’मध्ये प्रवीण मुळ्ये यांची ‘मुक्तता’ ही कथाही तंत्रज्ञानावर आहे. कल्पना अत्यंत सुंदर थरारक आहे. सुरुवातीचा माहिती देणारा भाग आणि काही अति तांत्रिक तपशील सोडले बाकी लेखन वेगवान हॉलीवुड थ्रिलरची आठवण करून देणारं म्हणता येईल.

‘नवल’मधल्या रमा गोळवलकर यांच्या ‘कोषाविद्या’ कथेत सुरुवातीला तंत्रज्ञानाचा छान वापर दाखवला आहे. पुढे कथा वेगळं वळण घेते, त्यामुळेच बहुधा तिला ‘विज्ञानकथा’ म्हटलेलं नाही. पण अशा पद्धतीच्या विज्ञान वापरून आपल्या इतिहासातल्या काही गोष्टींचा अर्थ लावण्याच्या कथा उत्कंठापूर्ण होतात, यात शंका नाही.

‘ऐसी अक्षरे’ या ऑनलाइन दिवाळी अंकात झंपुराव तंबूवाले यांच्या ‘सत्यमेवा जयते’ कथेतही तसाच प्रयत्न आहे. याच अंकात दोन गमतीदार विज्ञान फॅंटसी कथा आहेत – ‘समांतर विश्वांत पक्की’ ही प्रभुदेसाई यांची, आणि ‘प्लॅन के मुताबिक…’ ही अस्वल यांची. त्या वाचताना पूर्ण suspension of disbelief ठेवावा लागतो. अर्थातच त्या तर्कसंगत विज्ञानकथांच्या व्याखेत बसत नाहीत, परंतु लेखन चांगल्या दर्जाचं आणि वाचनीय आहे. या दोन लेखकांकडून उत्तम विज्ञानकथांची अपेक्षा ठेवता येईल.

..................................................................................................................................................................

हेही पाहा : ‘परिवर्तनाचा वाटसरू’ : ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०’ची मूलभूत, सविस्तर आणि व्यापक परिप्रेक्ष्यात चर्चा करणारा दिवाळी अंक

..................................................................................................................................................................

या वर्षीच्या अंकांमध्ये विशेष जाणवणारा ट्रेण्ड म्हणजे विज्ञानकथांवरील लेख. या साहित्यप्रकाराचा वाचकवर्ग वाढत आहे, त्याच जोडीनं त्याचे अभ्यासकदेखील वाढत आहेत का? की विद्यापीठीय अभ्यासक्रमात विज्ञान साहित्याचा समावेश असल्याचा हा परिणाम आहे? कारणं काहीही असोत, त्यानिमित्तानं विज्ञानकथांची समीक्षा होत असेल किंवा स्वत: लेखक आपले विचार मांडत असतील तर उत्तमच आहे.

ज्यांनी विज्ञानकथांना उर्जितावस्था दिली त्या डॉ. जयंत नारळीकर यांनी ‘अक्षरगंध’ या दिवाळी अंकात विज्ञान लेखाविषयी माहिती देऊन विज्ञानकथा म्हणजे काय हे सांगितलं आहे आणि दोन्हीतील फरक स्पष्ट केलेला आहे. त्याचबरोबर विज्ञानकथा का लिहाव्यात, विज्ञानकथा आणि वास्तविकता, उत्तम आणि निकृष्ट विज्ञानकथा - याविषयी आपलं मत मांडलं आहे. ज्ञात विज्ञानाचे निर्बंध, विज्ञानकथेतील मराठी बाणा, आपल्या पौराणिक वाङ्मयातील विज्ञान, विज्ञानकथांचे टीकाकार कसे असावेत, याविषयीच्या त्यांच्या अपेक्षा, अशा विज्ञानकथेशी संलग्न सगळ्या मुद्द्यांना त्यांनी स्पर्श केलेला आहे. याच अंकात स्मिता पोतनीस यांचा ‘डॉ. जयंत नारळीकर - एक विज्ञान कथाकार’ याविषयी लेख आहे.

फुला बागूल यांचा ‘कोरोनोत्तर काळातील विज्ञानकथेच्या दिशा’ हा लेख ‘साहित्य चपराक’मध्ये आहे. लेखात अनेक बाबींना हात घातला असला, तरी करोनापूर्व आणि करोनानंतर असे दोन कालखंड करण्यामागचा उद्देश नीट पुढे येत नाही. त्यामुळे विज्ञानकथांवर एक लेख असंच त्याचं स्वरूप उरतं. ‘दृष्टी श्रुती’ या डिजिटल दिवाळी अंकात ‘अतिदूरच्या बांधवांची रंजक प्रतिसृष्टी’ हा आश्लेषा महाजन यांचा लेख मुख्यत: एका विज्ञानकादंबरीच्या अनुवादाचा प्रवास मांडणारा आहे. त्यामुळे त्यात वैयक्तिक अनुभव आणि या लेखनप्रकाराची ओळख होत गेल्याचा संदर्भ जास्त आहे.

‘आयझॅक असिमोव्ह’ हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे ख्यातनाम विज्ञानकथा लेखक. त्यांच्या रोबॉट कथा आणि फाऊंडेशन मालिकेचे चाहते जगभर पसरलेले आहेत. निरंजन घाटे हे ज्येष्ठ विज्ञानकथा लेखक असिमोव्हचा आपल्यावरील प्रभाव नेहमीच आदरानं आणि कौतुकानं सांगत असतात. ‘अनुभव’ दिवाळी अंकात त्यांचा ‘आयझॅक माऊली आणि मी’ हा लेख म्हणजे आपल्या दैवताला अनोखी आदरांजली कशी वाहावी, याचा एक अप्रतिम नमुना आहे. गुरु आणि परात्पर शिष्य, त्याच वेळी माऊली म्हणण्याइतकी भक्तीमय दोस्ती हे दोघांमधलं अघोषित नातं घाटे यांनी जबरदस्त खुसखुशीत शैलीत पेश केलं आहे.

..................................................................................................................................................................

हेही पाहा : ‘ऋतुरंग’ : करोनाकाळात आणि करोनोत्तर काळातही लढण्याचं बळ देणारा, जगण्याची प्रेरणा देणारा आणि आपल्यातलं स्फूल्लिंग जाग‌वणारा दिवाळी अंक

..................................................................................................................................................................

शेवटी काही प्रश्न जरूर आहेत. या वर्षी नवे लेखक फारसे दिसले नाहीत. अंकांची संख्या कमी असल्यानं का? कथाविषयांमध्ये नावीन्य नक्कीच येत आहे. खूप दूरच्या काळच्या विज्ञानापेक्षा किंवा संस्कृतींपेक्षा आजच्या अथवा ‘निअर फ्यूचर’ म्हणजे अगदी येत्या काही वर्षांमध्ये आपल्या समोर ठाकणाऱ्या विषयांवर भर दिसतो आहे. हॅकिंग हा विषय तर आता रोबॉट किंवा एलियन यांच्या पंक्तीत जाऊन बसण्याइतका कॉमन व्हायला लागला आहे. मात्र त्या तुलनेत लेखनात अजूनही जुन्या वळणाच्या वर्णनात्मक किंवा पात्रपरिचय करून देण्याऱ्या शैलीचा प्रकार जास्त का आहे? प्रेमकथेवर किंवा विनोदावर भर देण्याचा कल का आहे? प्रचंड मोठ्या व्यापक वैश्विक पातळीवर जाण्याचं सामर्थ्य विज्ञानकथेत आहे. त्याचा वापर फारसा होताना का दिसत नाही? मुख्य प्रवाहात नव्या शैली, नवे प्रयोग होत असताना विज्ञानकथा अजून ठराविक साच्यातून बाहेर का पडत नाही?

घाटे आणि फोंडके यांसारखे ज्येष्ठ लेखक आणि इतर काही अपवाद वगळता बाकीचे लेखक याबाबतीत मागे का पडतात? इथं प्रयोग होणं गरजेचं आहे, आणि त्यात संपादकांचा सहभाग आवश्यक आहे, असं वाटतं. सोबत नव्या लेखकांनी आवर्जून इतर लेखकांचं साहित्य, मुख्य धारेतले नवे प्रवाह, इतर भाषांमधील लेखन, इतर माध्यमांमध्ये होणारे प्रयोग, याकडे नेहमी लक्ष ठेवणं गरजेचं आहे, हेही जाणवतं.

..................................................................................................................................................................

हेही पाहा : ‘पुरुषस्पंदनं’ : ‘विषारी मर्दानगी आणि मानवी नातेसंबंध’ यांचा आढावा घेणारा रौप्यमहोत्सवी वर्षातला नावीन्यपूर्ण दिवाळी अंक

..................................................................................................................................................................

नवी विज्ञान संकल्पना मांडणारी किंवा विज्ञानसंकल्पना मध्यवर्ती ठेवणारी विज्ञानकथा कमी होत असून समकालीन विज्ञान-तंत्रज्ञान कल्पनेवर आधारित कथा जास्त दिसत आहेत, हे आणखी एक निरीक्षण. वाचकवर्गाला अशा कथा जास्त रुचत असतील का? आपल्या आयुष्यात विज्ञान-तंत्रज्ञानाचा सहभाग आता इतका प्रचंड आहे, की ते बाजूला, वेगळं काढता येणार नाही, हेही एक कारण असेल का? यावर इतर अभ्यासकांची मतं जाणून घ्यायला आवडेल.

कोविड-१९च्या छायेत या वर्षीचे दिवाळी अंक निघाले आहेत. त्यात या महासाथीविषयी लेख आहेत. ‘वुहानचा वाफारा’ या एआयवरच्या कथेला या साथीचा काहीसा संदर्भ दिलेला सोडला तर बाकी कुठेच या विषयावर विज्ञानकथा दिसल्या नाहीत. कदाचित या साथीमुळे आपलं आयुष्य इतकं ढवळून निघालं आहे की, त्यापासून दूर जाऊन त्यावर कल्पनेचा, विशेषत: वैज्ञानिक प्रक्षेपण असलेल्या कल्पनेचा साज चढवणं हे कठीण होत आहे. पुढील वर्षीच्या दिवाळी अंकांची तयारी सुरू होईल, तेव्हा बहुधा या विषयावर लिहिण्याची काही लेखकांची मानसिक सज्जता झालेली असेल.

..................................................................................................................................................................

मेघश्री दळवी विज्ञानकथालेखक व समीक्षक असून आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत.

meghashri@gmail.com

स्मिता पोतनीस विज्ञानकथालेखक व समीक्षक आहेत.

potnissmita7@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......