फिसलता बनारस आणि ‘उडता बनारस’!
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
जयदेव डोळे
  • ‘उडता बनारस’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Wed , 09 December 2020
  • ग्रंथनामा वाचणारा लिहितो उडता बनारस Udtaa Banaras सुरेश प्रताप Suresh Pratap नरेंद्र मोदी वाराणसी Varanasi

प्रधानसेवकाचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे तिथे खूप काही सुरळीत अन सुखाचे असेल असे भासवण्यात आले होते. साक्षात ‘माँ गंगा ने बुलाया है’ असे स्वत:च जाहीर करत गुजरातपुत्र मोदी काशीत अवतीर्ण झाले. लोकांनीही वाहत्या गंगेत काँग्रेसचे हात धुवून टाकले आणि कमळाची लागवड सुरू केली. आपला विकास भारतात सर्वांत आधी होईल, या आशेने काशीकर हरखून गेले होते. आता ते त्यांचे हरखणे गंगेत वाहून गेलेले दिसते! वाराणसी पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप दोन्ही जागी पराभूत झाल्याची वाईट्ट बातमी आहे. समाजवादी पक्षाने दोन्ही जागा मोदी पार्टीकडून हिसकावल्या आहेत.

एक डिसेंबरला प्रधानसेवक काशीत हजर होते. निमित्त ‘देवदीपावली’ या आम्ही कधीच न ऐकलेल्या धार्मिक सोहळ्याचे. गंगा, विश्वनाथ, सारनाथ, रवीदास अशा सर्वसमावेशक प्रतीकांचे दर्शन घेत प्रधानसेवकांसोबत अवघा भारतही भटकला! काय करणार, साऱ्या चॅनेल्सना मागे मागे फिरण्याची सक्त दटावणी होती! इतकेच नव्हे, ‘आजतक’ वाहिनीची एक विख्यात महिला पत्रकार मोदींच्या दौऱ्याआधी एक दिवस वाराणसी दाखल होऊन कशी कशी तयारी चाललीय ते भारताला दाखवत होती!

या बाईंनी आपल्या कॅमेरामनला एके ठिकाणी कॅमेरा रोखायला लावला आणि म्हणाली की, प्रधानमंत्र्यांनी जो ‘काशी विश्वनाथ कॉरिडॉर’ विकसित करण्याचा पण केलाय, तो कसा प्रगतिपथावर आहे ते पाहा! आजूबाजूचा जीर्ण परिसर व बांधकामे पाडून टाकून देवळे कशी टिकवून ठेवली आहेत, तेही पाहा! बाईंनी जे दाखवले तेच ‘उडता बनारस’ या पुस्तकाच्या शीर्षकाखाली छायाचित्रात दिसते आहे. त्याचेच नाव ‘उडता बनारस’ असे जरा चटपटीत आणि ‘उडता पंजाब’ या हिंदी चित्रपटाच्या नावाशी स्पर्धा करणारे वाटते. मादक पदार्थांच्या सेवनाने पंजाबी तरुण उदध्वस्त झाला. त्या विषयावरील चित्रपटाचे नाव ‘उडता पंजाब’ होते, नशेतल्या भराऱ्या या अर्थाचे.

.................................................................................................................................................................

बीइंग – विजय अशोक इंदुशोकाई, आऱ्हान मीडियास्मिथस, नाशिक, पाने – २२२ (हार्डबाऊंड), मूल्य - ३६० रुपये

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5250/Being

.................................................................................................................................................................

‘उडता बनारस’ हेही एका विध्वंसाचे चित्रण आहे. बनारसचे एक ज्येष्ठ पत्रकार सुरेश प्रताप यांनी लिहिलेले. या त्यांच्या फेसबुक नोंदी आहेत. त्याच त्यांनी एकत्र करून पुस्तक काढले. कोणतेही मराठी वृत्तपत्र या पुस्तकाचे परीक्षण करू धजणार नाही. भाषा हिंदी आहे, विषय स्थानिक आहे, दुसरी बाजू कळणार कशी, आदी फुसकी कारणे सांगून ते टाळले जाईल. भारतात प्रथमच पंतप्रधानांच्या लोकसभा मतदारसंघात विकासाच्या नावाखाली जी पाडापाडी आणि मनमानी केली जाते, त्याची नोंद घेणारे हे पहिलेच पुस्तक गणले जावे. त्यातल्या त्यात मनमानीचे सम्राट नरेन्द्रभाई मोदी यांच्या स्वप्नाचे वास्तव कसे भयंकर आहे, हे निर्भयपणे सांगणारे हे पुस्तक होय. ते प्रकाशित झाले, असे ‘भडास फॉर मीडिया’वर वाचले अन पत्ता शोधून, पैसे मोजून मागवूनही घेतले. सत्ता, दहशत, आमिषे, प्रलोभने, बेफिकिरी आणि उपेक्षा यांची केलेली उजळणी म्हणजे हे पुस्तक.

२२ फेब्रुवारी २०१८ ते ६ मार्च २०१९ असा एका वर्षाचा दैनंदिनीवजा मजकूर ४७४ पानांवर उमटलेला आहे. त्यात खूप पुनरुक्ती आहे. तेच तेच अनेकदा सांगितले गेलेय, कारण बहुधा फेसबुकवर कायम नवा वाचक जोडून घ्यायला पूर्वपीठिका सांगावी लागत असावी!

विश्वनाथ कॉरिडॉर गंगेच्या काठापर्यंत नेण्यासाठी जुन्या वाराणसीत ३००च्या आसपास घरे, वाडे, देवळे, समाध्या बेमूर्वतखोरपणे पाडल्या गेल्या. त्याबद्दलच्या तक्रारी आणि आक्रोश म्हणजे हे पुस्तक. अरुंद बोळ व गल्ल्या, जुने भव्य वाडे आणि वाड्यांमधील शिवलिंगे हा वाराणशीचा कैक शतकांचा ठेवा. तो अवघा पाडला गेला. त्यावेळी ‘धरोहर और मंदिर बचाओ आंदोलन’ उभे राहिले. पण ते नाना कटकारस्थाने करून मागे घ्यायला लावले गेले. साधूसंत, पत्रकार, नागरिक, रहिवासी असा एकत्रित प्रतिकार झाला, तोही मोडून काढण्यात आला. का? साक्षात प्रधानसेवकाचा धडाकेबाज विकासाचा कार्यक्रम ना तो! मात्र त्यासाठी ‘सब का साथ, सब का विकास’ मुळीच कमावला नाही, याची नोंद म्हणजे हे पुस्तक.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

सुरेश प्रताप यांनी पुढाकार घेऊन विकासाचा हा विध्वंस रोखायची खटपट केली. कसचे काय! वाराणशीचा हा जुना गल्लीबोळांचा परिसर बघायला, त्याचा अभ्यास करायला कसे बाहेरचे लोक येत वगैरे सांगून त्यांनी देवळेच फक्त सांस्कृतिक ठेवा नसतो, तर त्या भोवतीने गावसुद्धा असतो, हे सांगून पाहिले. पण घाबरलेले नागरिक आणि भरपूर मोबदला मिळवणारे घरमालक व वाडावारस प्रशासनाला शरण गेले. पाहता पाहता सांस्कृतिक वारसा मातीमोल झाला. कोणी केला? संस्कृतीच्या नावाने कंठशोष करणाऱ्या अन आपल्या भक्तीप्रदर्शनाने काशी मोहित करणारे प्रधानसेवक खुद्द यांनी.

या पुस्तकात लेखक हळवा होऊन कविताही लिहितो. त्याचा एक मुद्दा फार महत्त्वाचा आहे. प्रत्येक तीर्थस्थानाचा कायापालट पर्यटनकेंद्रात करवून प्रधानसेवक धर्माचे व त्याच्या प्रतीकांचे महत्त्व घटवत आहेत हा तो मुद्दा. गंगेत क्रूझ सुरू करायला लावणे, नर्मदेत हवाई सेवा सुरू करणे, ही त्याची उदाहरणे. खुद्द काशीचा विश्वनाथ कॉरिडॉर याच प्रकारचा असल्याचे गाऱ्हाणे सुरेश प्रतापांचे आहे.

बाकी, या पुस्तकात मोदींच्या निवडणुकांचा प्रचार, त्यांचे आधीचे उत्साही पाठीराखे व या उदध्वस्तेमुळे नाखूश असलेले कार्यकर्ते, मुख्यमंत्री योगींचा कारभार आदी राजकीय बाजूही आहे. मात्र ती तपशीलवार नाही. ३००च्या आसपास ज्या पुराणवास्तू तोडल्या गेल्या, त्यातील थोड्यांचीच माहिती लेखक वारंवार देत राहतात. गंगेभोवतीच्या वस्त्या आणि घाट यांचीही थोडी माहिती लेखक देतो, मात्र त्यात भावनिकता अधिक, तपशील त्रोटक आहे.

स्वत: पत्रकार असूनही बाकीच्या वाराणसीवासी पत्रकारांनी कशी शरणागती पत्करली आणि काही कसे भ्रष्ट झाले, याचेही उल्लेख आहेत. या जुन्या काशीमधील पक्कामहाल भागाची ‘पक्कापा संस्कृती’ तयार करून लेखकाने त्याची हडाप्पाच्या संस्कृतीशी तुलना करतो. काशीची बहुलतावादी संस्कृती सांगत राहतो. गल्लीसंस्कृतीवर हायवे संस्कृतीची मात झाल्याचे दु:ख कळवळून सांगतो. अहमदाबादच्याच कंपनीला कॉरीडॉरचा आराखडा व रचना करण्याचे टेंडर मिळालेय, याचा गौप्यस्फोट करतो. मोदी कसे ‘घोषणागुरू’ आणि ‘गप्पाबाज’ आहेत, हे बिनधास्त लिहितो.

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

नीट संपादित केले असते अन थोडे फेरलेखन झाले असते तर या पुस्तकाची नोंद एका प्राचीन व ऐतिहासिक शहराची विव्हल, व्याकूळ कहाणी म्हणून केली गेली असती. काशी धर्माशी निगडित अनेक व्यवसाय-व्यापार यांचे केंद्र आहे. नव्या बाजारीकरणात त्याची पीछेहाट होईल, तेव्हा गंगापुत्र काय करणार, असा प्रश्न विचारून ते थांबतात, काशीचा व्यापार उलगडून दाखवत नाहीत.

थोडक्यात भाजप व संघपरिवार धर्माचा व्यापार कसा करू पाहतात आणि प्राचीन हिंदू धर्मपरंपरा, स्थळे व इतिहास यांबाबतीत कसे अडाणी व बेफिकीर आहेत, असे सुरेश प्रताप स्पष्टपणे मांडत राहतात.

हे पुस्तक भारतभर मोदींचा खरा चेहरा दाखवायला उपयोगी पडू शकते. मात्र त्याची दखलही कोणी घेण्याची हिंमत करणार नाही. या हिंमतीबद्दल या ज्येष्ठ पत्रकाराचे अभिनंदन. लाळगाळणीच्या आजच्या बव्हंशी पत्रकारितेसमोर धरलेला हा डोळे दिपवणारा आरसाच जणू.

.................................................................................................................................................................

‘उडता बनारस’ – सुरेश प्रताप, मन्दिर बचाओ आन्दोलन न्यास, वाराणसी, पाने – ४७४, मूल्य – ५०० रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.amazon.in/Book-Udtaa-Banaras

..................................................................................................................................................................

लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.

djaidev1957@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......