अजूनकाही
आज जग एकविसाव्या शतकातल्या तिसऱ्या दशकात प्रवेश करत आहे. या टप्प्यावर उफाळून येणाऱ्या कडव्या राष्ट्रवादाचे, संकुचित व्यापार-उदीम धोरणांचे, परधर्मद्वेषाचे, पर्यावरण बदलाचे, करोनासारख्या वैश्विक महासाथीचे, टोळीयुद्ध-दहशतवाद-लष्करी आक्रमणांच्या धोक्याचे मोठे आव्हान स्थलांतराच्या प्रक्रियेपुढे उभे आहे. या साऱ्या उलथापालथीचा साकल्याने मानवकेंद्री वेध घेणारे ज्येष्ठ पत्रकार शेखर देशमुख यांचे ‘उपरे विश्व : वेध मानवी स्थलांतराचा’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेल्या या पुस्तकाला देशमुख यांनी लिहिलेल्या मनोगताचा हा संपादित अंश...
.................................................................................................................................................................
माणसाने पहिलं पाऊल उचललं ते अन्न आणि सुरक्षित निवाऱ्यासाठी. टोळ्या बनल्या. देव आणि धर्म संकल्पना रुजत गेली. शेतीचा शोध लागला - टोळ्यांना स्थिरता आली - पण, जग जमीनमालक आणि मजूर यांत विभागलं गेलं - समूहांत सरंजामशाही अवतरली - सरंजामशाहीने घोड्याच्या वापराला चालना दिली - यातून मालकीहक्काची भूक विस्तारत गेली - आधी जन्मभूमीवर हक्क प्रस्थापित करण्याच्या इर्ष्येने माणूस एका जागेवरून दुसऱ्या जागी स्थलांतर करत राहिला. तराफा-नावा-बोटी-जहाजांचा शोध लागला. मग केवळ प्रदेश नव्हे - देश पादाक्रांत करण्याच्या आणि देवा-धर्माच्या प्रसार-प्रचाराच्या इर्ष्येने समुद्रमार्गाने स्थलांतराची प्रक्रिया सुरू राहिली. सत्तेने, महत्त्वाकांक्षेने संघर्ष-युद्धाला धग दिली. जेत्यांसोबत समूह स्थलांतर करते झाले. पराभूतांनाही सक्तीने स्थलांतराचा मार्ग पत्करावा लागला.
अठराव्या शतकाच्या प्रारंभी ज्ञान-विज्ञानाच्या प्रसारापाठोपाठ इंग्लंडमध्ये औद्योगिकीकरणाने वेग घेतला. शहरीकरणाच्या प्रक्रियेला धग मिळाली. मानवी इतिहासातला स्थलांतराचा एक टप्पा पूर्ण झाला. औद्योगिकीकरणाची गरज म्हणून दळणवळणाची साधनं जन्माला आली. वेगवान झाली. घोड्याची जागा आधी वाफेवरच्या जहाजाने - मग वाफेवरच्या रेल्वे इंजिनाने आणि रेल्वे मार्गाने घेतली. २०व्या शतकाच्या प्रारंभी लागलेल्या विमानाच्या शोधाने माणसाच्या स्थलांतराचा वेग प्रचंड प्रमाणात वाढला; मात्र ज्ञान-विज्ञानाच्या प्रगतीने माणसाच्या महत्त्वाकांक्षा अधिकाधिक राक्षसीसुद्धा होत गेल्या.
१९ आणि २०व्या शतकांच्या प्रत्येक दशकाने स्थलांतराला वेग दिला. आधी ब्रिटिशांच्या एका वसाहतीतून दुसऱ्या वसाहतीत मजूर-कामगारांना सक्तीने स्थलांतर करणे भाग पडले. पहिले महायुद्ध घडले. मग दुसरे महायुद्ध झाले. दरम्यान जर्मनीत झालेला ज्यूंचा वंशसंहार आणि भारत-पाक फाळणी यामुळे जगाने मानवाच्या इतिहासात प्रथमच लाखोंच्या संख्येने स्थलांतर अनुभवले. जागतिक स्तरावर घडून आलेल्या या घुसळणीतून अमेरिका महासत्ता म्हणून उदयास आली. ब्रिटिशांची जगावरची पकड ढिली पडू लागली. साम्राज्याच्या तावडीत असलेले आशिया-आफ्रिका खंडांतले देश एका पाठोपाठ एक स्वतंत्र होऊ लागले. देशोदेशींच्या सीमा खुल्या होत गेल्या, तसे समुद्र, जमीन, आकाश अशा विविध मार्गांनी स्थलांतराचा वेग वाढता राहिला. परंतु स्वतंत्र झालेल्या अनेक देशांत १९५०च्या दशकानंतर बदलत्या जागतिक राजकारणामुळे अवतरलेल्या हुकूमशाही-अधिकारशाही-भांडवलशाहीने सक्तीच्या स्थलांतराला वेग दिला. त्यानंतरचा २०-३० वर्षांचा काळ शीतयुद्धाने झाकोळला. शीतयुद्धाच्या काळात पुन्हा एकदा जागतिक राजकारणाचे- सत्ताकारणाचे संदर्भ बदलत गेले.
अमेरिका आणि रशिया अशा दोन गटांत जगाची विभागणी झाली. अमेरिकेची दादागिरी वाढत जाऊन व्हिएतनामसारखे देश युद्धाच्या अवस्थेत जखडून राहिले. एकीकडे युद्ध, नागरी उठाव, यादवी नरसंहार अशा घटना घडतच राहिल्या. पूर्व युरोप-आफ्रिका (पूर्व-मध्य-पश्चिम) आखात-पूर्व आशिया आदी देश-प्रांतांत माणसं समूहांनी स्थलांतर करतच राहिली. शीतयुद्ध संपले, पण याच शीतयुद्धाने अफगाणिस्तानातल्या भूमीत आंतरराष्ट्रीय दहशतवादाला जन्म दिला. तेव्हापासून दहशतवादाने एकेक करत सगळ्या जगात उच्छाद मांडायला सुरुवात केली. अफगाणिस्तानात उच्छाद मांडल्यानंतर अमेरिकेने इराकसोबत युद्ध पुकारले. त्याचीही परिणती समूहांच्या सक्तीच्या वा स्वेच्छेच्या स्थलांतरात होत गेली, एकविसावं शतक पर्यावरणाच्या नाशाची चाहूल देत अवतरलं. महापूर-चक्रीवादळं-नद्यांच्या प्रवाहांमध्ये होणारे बदल-भूकंप-समुद्रपातळीत सातत्याने होत चाललेली वाढ, या मुळातच नैसर्गिकपणे होणाऱ्या किंवा मानवाच्या हस्तक्षेपामुळे ओढवलेल्या नैसर्गिक आपत्तींमुळे स्थलांतराचा वेग वाढतच राहिला.
आजच्या घडीला दहशतवाद आणि वातावरणीय बदल हे दोन घटक सक्तीच्या सामूहिक स्थलांतराचं मुख्य कारण ठरताहेत. परंतु त्याच वेळी जगावर अधिराज्य गाजवण्याच्या बलवान राष्ट्रांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षा वेगळ्या अर्थाने स्वेच्छेच्या स्थलांतरावर गंडांतर आणू पाहतात. दहशतवादाचा विस्तार, टोकाचा धर्माभिमान स्थलांतराच्या वाटा रोखू पाहत आहेत. अस्तित्वाच्या एका आव्हानात्मक टप्प्यावर माणूस येऊन पोहोचलाय. त्याचं हे पोहोचणं, त्याने ज्ञान-विज्ञानाच्या बळावर साधलेली प्रगती आणि समृद्धी हे सारं आज त्याच्याच मुळावर येऊ पाहताहेत. प्रगती आणि अधोगतीच्या वाटा समांतर धावू पाहतेय. असुरक्षिततेच्या भावनेतून देशोदेशींच्या सीमा कुंपणांत बंदिस्त होऊ लागल्याहेत. पण, कितीही संकटं आली तरीही मानवजातीच्या अखंड प्रगतीसाठी सक्तीने वा स्वेच्छेने सतत स्थलांतर करत राहणं गरजेचं आहे - हीच गरज मानवी अस्तित्वाची पहिली आणि शेवटची खूण असणार आहे. देश-धर्म-पंथ-वंश यांच्यातले परस्परावलंबित्व, पर्यायाने मानवी अस्तित्व, कधी नव्हे ते धोक्यात आले आहे. हा धोका टाळण्यासाठी स्थलांतराची आजवरची प्रक्रिया समजून घेणं, म्हणूनच कैकपटीने महत्त्वाचं आहे.
आजचं जग आकडेवारी आणि अहवालांचं, पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनचं आहे. व्यवहाराच्या पातळीवर विषयाच्या आकलनासाठी हे महत्त्वाचं आहेच, परंतु जगण्यातला आनंद-दु:ख, संघर्ष-समाधान मानवी चेहऱ्यांच्या माध्यमातून समजून घेण्याला मी नेहमीच प्राधान्य दिलं आहे. मानवी स्थलांतराचा विषयदेखील माणूस केंद्रस्थानी ठेवून उलगडण्याचा माझा प्रयत्न राहिला आहे. काही संकल्पना-प्रक्रिया वैश्विक ‘सत्याचा आभास’ तेवढा निर्माण करत असल्या, तरी मानवी स्थलांतराची प्रक्रिया मात्र वेळोवेळी ‘वैश्विक सत्य’ अधोरेखित करत आली आहे. या संकल्पनेत मानवी प्रगती आणि अधोगती यांची प्रक्रिया शतकानुशतके समांतरपणे अव्याहत सुरूच आहे. ‘यात अर्थातच अधोगतीचा वेग प्रगतीच्या तुलनेत कमीच राहिला आहे’ हे ठळकपणे अधोरेखित व्हावं, हाही पुस्तक लिखाणामागचा एक उद्देश आहे.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
साधारणत: सतरा-अठरा वर्षांपूर्वी महाराष्ट्र-मुंबई, उत्तर प्रदेश-बिहार-राजस्थान-दिल्ली-हरियाणा, आंध्र प्रदेश-तामिळनाडू-पश्चिम बंगाल-मणिपूर आदी ठिकाणच्या शहरी-ग्रामीण भागांत शिरलेल्या एचआयव्ही-एड्सचा शोध घेत असताना मानवी स्थलांतराच्या प्रक्रियेने पहिल्यांदा लक्ष वेधून घेतलं होतं. याच मार्गाने एचआयव्ही मुख्यत: घरा-गावांत शिरल्याचं जाणवल्याने ही प्रक्रिया ‘व्हिलन’च्या रूपात समोर आली होती. परंतु जसजसं या विषयाचं आकलन विस्तारत गेलं, देशोदेशींच्या तज्ज्ञ-अभ्यासकांची मतं कळत गेली, पुस्तकं आणि निबंधांचं वाचन झालं, तसे सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक-आर्थिक-लष्करी-पर्यावरणीय अशा प्रकारचे नागरी उठाव-दहशतवाद असे स्थलांतराला धग देणारे विविध पैलू समोर येत गेले.
या विषयाकडे बघण्याची दृष्टी बदलत गेली. या विषयाला पूर्ण ताकदीनिशी हात घालावा असं वाटू लागलं. पण विषयाची व्याप्ती आणि खोली ध्यानात घेता सुरुवात कुठून करावी आणि शेवट कुठे करावा, हा पेचही समोर उभा राहिला. अर्थात, आताही तो पूर्णपणे सुटलेला नाहीच. परंतु ‘ग्रंथाली’च्या ‘शब्द रुची’ २०१५च्या दिवाळी अंकातील या विषयावरचा लेख वाचल्यानंतर अनेकांनी या विषयावर पुस्तक का लिहीत नाही, अशी विचारणा केली. तशातच एक दिवस श्री. आशिष पाटकरांचा फोन आला. म्हणाले, ‘गेले काही महिने आम्ही या विषयावर विचार करत होतो. पुस्तक लिहाल का?’ मनात म्हटलं, ‘विषयाला पुस्तकरूपाने हात घालण्याची हीच योग्य वेळ का नाही? प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे?’
एका अर्थाने, २००७ ते २०१६ या कालावधीत ‘मानवी स्थलांतर’ या विषयासंदर्भात मला झालेल्या आकलनाची समग्र नव्हे, संक्षिप्त स्वरूपात मांडणी करण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला आहे. अर्थात, वैयक्तिक अडचणींमुळे एका टप्प्यानंतर या विषयात जसं ठरवलं होतं, तसं शिरता आलेलं नाही. महाराष्ट्रातल्या ऊसतोडणी स्थलांतरित कामगार कुटुंबांचं प्रत्यक्ष जगणं अनुभवता आलं नाही. यूपी-बिहारच्या गावांतून पहिल्यांदा मुंबई-दिल्लीकडे स्थलांतर करणाऱ्यांसोबत किंवा मुंबईहून यूपी-बिहारच्या गावांपर्यंत गर्दीने खच्चून भरलेल्या रेलगाडीच्या अनारक्षित डब्यातून, अनेकदा मनात असूनही, प्रवासाचा अनुभव घेता आला नाही, याचीही खंत यापुढे मनात कायम राहणार आहे. म्हणूनही या विषयाचे अनेक पैलू अस्पर्शित-अप्रकाशित राहण्याची दाट शक्यता आहे. हा दोष अर्थातच लेखक या नात्याने माझा एकट्याचा आहे. मात्र, या प्रयत्नाने भविष्यात कुणा अभ्यासक-संशोधकांना दिशा मिळाली, मी केलं त्याहीपेक्षा व्यापक काम त्यांना करता आलं, तरीही पुस्तक लिखाणाचा हेतू सफल झाल्यासारखं होईल.
.................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
सरतेशेवटी, बहुस्तरीय, बहुपदरी आणि बहुमितीय स्थलांतराच्या अविरत प्रक्रियेशी जोडला गेलेला व्यापक पट उलगडण्याचा, स्थानिक तसंच वैश्विक स्तरावरचं स्थलांतरितांचं काहीसं उपरं राहिलेलं विश्व समजून घेण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. यात मानवी अधोगतीबरोबर प्रगतीच्याही खाणाखुणा आहेत; संघर्षाबरोबरच सौहार्दाचेही दाखले आहेत. मुख्य म्हणजे, स्थलांतर थांबलं म्हणजे काय घडतं आणि स्थलांतर सुरू राहिलं म्हणजे काय साधतं, आणि या साधण्याचं मानवजातीच्या अस्तित्वाशी काय नातं आहे, याचाही उलगडा करण्याचा या पुस्तकात प्रयत्न केला आहे.
आपल्याकडे एक प्रश्न आणि त्यावर विधानात्मक असं उत्तर प्रचलित आहे. प्रश्न असतो, प्रत्येकाचं विश्व केवढं? त्यावरचं उत्तर असतं - ज्याच्या त्याच्या मेंदूएवढं! स्थलांतर या विषयाबाबतीतही थोड्याफार फरकाने हेच म्हणता येतं. स्थलांतराचं जग केवढं? ज्याच्या-त्याच्या अनुभवांएवढं! अर्थातच ही अंगभूत मर्यादा माझ्या लिखाणात असणं अपरिहार्य आहे. ती समजून घेऊन वाचक पुस्तकाचं स्वागत करतील, ही आशा आहे.
‘उपरे विश्व : वेध मानवी स्थलांतराचा’ - शेखर देशमुख, मनोविकास प्रकाशन, पुणे, पाने - २६५, मूल्य - २९९ रुपये.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5249/Upare-Vishwa
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment